गाऊट : युरिक अ‍ॅसिडचे ‘खडे’ बोल !

Submitted by कुमार१ on 8 April, 2018 - 21:51

आपल्या शरीराच्या कुठल्याही हालचालींमध्ये विविध सांधे महत्वाची भूमिका बजावतात. सांध्यांमध्ये जे अनेक आजार उद्भवतात त्यांना आपण ‘संधिवात’ (arthritis) या सामान्य नावाने ओळखतो. सांध्यांचा दाह होण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यानुसार या संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काहींमध्ये सांध्यांत विशिष्ट प्रकारचे खडे (crystals) जमा होतात आणि त्यामुळे तिथे दाह होतो. या प्रकारातील सर्वात जास्त आढळणारा आजार म्हणजे ‘गाऊट’. या आजाराचा इतिहास, त्याची कारणमीमांसा, स्वरूप, रुग्णाला होणारा त्रास व त्याचे भवितव्य आणि रोगनिदान या सगळ्यांचा उहापोह या लेखात करायचा आहे.

आजाराचा इतिहास:
गाऊट हा अगदी प्राचीन काळापासून माहित असलेला आजार आहे. वैद्यकशास्त्रात त्याची प्रथम नोंद ख्रिस्तपूर्व २६४० मध्ये इजिप्तमध्ये झालेली आढळते. पुढे ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात Hippocrates ने त्याची दखल घेतली. या आजारात पायाच्या अंगठ्याचा सांधा चांगलाच सुजतो आणि रुग्णास असह्य वेदना होतात. त्यामुळे तेव्हा गाऊटला ‘चालणे पंगू करणारा आजार’ असे म्हटले जाई. तो मुख्यतः बेबंद जीवनशैली असणाऱ्या श्रीमंत लोकांत आढळून येई. त्यांच्या आहारात महागडे मांसाहारी पदार्थ असत आणि त्यांचे मद्यपानही बेफाम असे. त्या काळी संधिवाताचे जणू दोन सामाजिक गटांत विभाजन झाले होते - गाऊट हा श्रीमंतांचा तर rheumatism हा गरीबांचा आजार होता ! किंबहुना गाऊट हा ‘राजा-महाराजांचा आजार’ म्हणूनच ओळखला जाई.

पुढे इसवी सनाच्या पहिल्या शतकात Galenने त्यावर सखोल अभ्यास करून गाऊटचे कारण शोधून काढले. सांध्यांमध्ये जे खडे जमा होतात ते युरिक अ‍ॅसिडचे बनलेले असत. त्यांमुळे सांध्याचा दाह होई. अतिरिक्त मांसाहारामुळे रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. Galenनेही गाऊटचा संबंध बेबंद जीवनशैली आणि बाहेरख्यालीपणाशी जोडला. तसेच तो बऱ्यापैकी अनुवांशिक असल्याचे मत नोंदवले.

त्यानंतर काळ जसा पुढे सरकत गेला तशी राजेशाही संपुष्टात आली आणि बऱ्याच देशांत लोकशाही नांदू लागली. मग प्रगत देशांतील औद्योगिक क्रांतीमुळे जनसामान्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारला. त्यांनाही आर्थिक सुबत्ता लाभली. हळूहळू मद्यपान आणि अतिरिक्त मांसाहार हे समाजाच्या बहुतेक स्तरांत झिरपत गेले. परिणामी गाऊट हा आता केवळ श्रीमंतांचा आजार राहिला नाही आणि तो समाजाच्या सर्व आर्थिक स्तरांमध्ये आढळू लागला.

संभाव्य रुग्ण आणि जागतिक प्रसार (prevalance) :
आजच्या घडीला याबाबतच्या काही गोष्टी ठळकपणे दिसून येतात. हा आजार साधारण ५०+ वयोगटात जास्त दिसतो. तो मुख्यतः पुरुषांचा आजार आहे (पुरुष : स्त्री = १० :१). जोपर्यंत स्त्रीची मासिक पाळी चालू असते त्या वयांत तो सहसा तिला होत नाही. स्त्रियांमध्ये तो ६०+ नंतर अधिक दिसतो. गाऊट जगभरात आढळतो पण पाश्चिमात्य जगात भारतापेक्षा सुमारे १० पट अधिक आढळतो. गेल्या दोन दशकांत आजाराचे प्रमाण जगभरात जवळपास दुप्पट झालेले आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील केरळमध्ये याचे वाढलेले प्रमाण लक्षणीय आहे.

कारणमीमांसा:
गाऊट होण्याचे मूलभूत कारण म्हणजे रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे वाढलेले प्रमाण. हे अ‍ॅसिड शरीरात कसे तयार होते ते आता पाहूया.
DNA व RNA हे पेशींमधील मूलभूत पदार्थ आपल्या परिचयाचे आहेत. या गुंतागुंतीच्या रेणूंमध्ये Purines हा एक नायट्रोजनयुक्त घटक असतो. दररोज शरीरात पेशींची उलाढाल चालू असते. जेव्हा जुन्या पेशींचा नाश होतो तेव्हा या Purinesचे विघटन होते आणि युरिक अ‍ॅसिड तयार होते. तसेच आहारातील DNA/RNA पासूनही ते शरीरात तयार होते. पुढे मूत्रपिंडातून त्याचे लघवीत उत्सर्जन होते. त्यामुळे रक्तातील त्याचे प्रमाण अल्प असते ( पुरुष : ३ – ७ mg/dL). हे प्रमाण स्त्रियांमध्ये अजून कमी असते. ते थोडेसुद्धा वाढणे का हितावह नसते ते आता पाहू.

इथे युरिक अ‍ॅसिडचा एक महत्वाचा गुणधर्म लक्षात घेतला पाहिजे. हे संयुग पाण्यात मोठ्या मुश्किलीने विरघळते. त्यामुळे रक्तात ते जोपर्यंत ६.८ mg/dL च्या आत असते तोपर्यंतच ते जेमतेम विरघळलेल्या अवस्थेत राहते. जेव्हा ते या प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा विरघळू न शकल्याने त्याचे खडे निर्माण होतात. मग हे खडे सांधे व मूत्रपिंड यांत साठू लागतात. हाच तो गाऊट.
युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढलेल्या सर्वच लोकांना गाऊट होत नाही. तशा सुमारे एक दशांश जणांना तो होतो. तो दिसून येण्याआधी १० ते २० वर्षे युरिक अ‍ॅसिडची पातळी सतत वाढलेली राहावी लागते.

जीवनशैलीशी संबंध :
१. हा आजार शहरात राहणाऱ्या लोकांत अधिक दिसतो. बुद्धीजीवी लोकांत त्याचे प्रमाण काहीसे जास्त असते.
२. अतिरिक्त मांसाहाराशी त्याचा संबंध आहे. विशिष्ट मासे (anchovies, sardines, इ.), मांसाहारातील यकृत व मूत्रपिंड या पदार्थांमध्ये purines भरपूर असतात.
३. अतिरिक्त मद्यपान हेही आजार होण्यास अनुकूल ठरते.
४. अलीकडे फ्रुक्टोजयुक्त पेये (उदा. high-fructose corn syrup) पिण्याचे वाढलेले प्रमाण हेही युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढवते.

गाऊट आणि अनुषंगिक आजार :
साधारणपणे चयापचयाच्या बिघाडातून जे आजार उद्भवतात (metabolic syndrome) त्यांच्या जोडीने गाऊट होण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढते. हे आजार असे आहेत:
• उच्च रक्तदाब
• मधुमेह
• दीर्घकालीन मूत्रपिंड विकार
• उच्च कोलेस्टेरॉल व TG हा मेद
• लठ्ठपणा
याशिवाय गाऊट होण्यात अनुवंशिकतेचा वाटा खूप मोठा आहे.

युरिक अ‍ॅसिडची वाढलेली रक्तपातळी:
शरीरात तयार झालेले बरेचसे युरिक अ‍ॅसिड हे लघवीत उत्सर्जित होते. त्यामुळे निरोगीपणात त्याची रक्तपातळी फक्त ३ – ७ mg/dL चे दरम्यान असते. तिची वरची मर्यादा पुरुषांत ७ तर स्त्रियांमध्ये ६ असते.

ही पातळी वाढण्याच्या कारणांचे दोन गटात विभाजन होईल:
१. युरिक अ‍ॅसिडचे उत्सर्जन कमी होणे
२. युरिक अ‍ॅसिडचे उत्पादन वाढणे.
आता दोन्हींचा आढावा घेतो.

१. युरिक अ‍ॅसिडचे उत्सर्जन कमी होणे:
९०% रुग्णांना हा मुद्दा लागू होतो. त्याची कारणे अशी आहेत:
• अनुवंशिकता
• दीर्घकालीन मूत्रपिंड विकार
• अतिरिक्त मद्यपान
• औषधांचे दुष्परिणाम : यात aspirin व काही diuretics येतात

२. युरिक अ‍ॅसिडचे उत्पादन वाढणे:
१०% रुग्ण यात मोडतात. त्याची विविध कारणे अशी:
• अतिरिक्त मांसाहार
• Purinesचे जनुकीय आजार
• काही कर्करोग : यांमध्ये पेशींची उलाढाल खूप वाढते. तसेच जर त्यांवर उपचार म्हणून केमोथेरपी चालू केली तर त्याने पेशींचा खूप नाश होतो.

गाऊटचा तीव्र झटका (acute attack):
यात बहुतांश रुग्णांचे बाबतीत एकाच सांध्याचा तीव्र दाह होतो आणि तो सांधा म्हणजे पायाच्या अंगठ्याचा. हा सांधा खूप सुजतो आणि प्रचंड दुखतो.
थोड्या रुग्णांचे बाबतीत एकदमच अनेक सांधे सुजतात. त्यामध्ये टाच, गुडघे, हाताची बोटे आणि कोपर यांचा समावश असतो.
या झटक्यानंतर थोड्याच दिवसात संधिवात ओसरतो. नंतर तो काही काळाने पुन्हा उपटतो. अशा तऱ्हेने हे झटके वारंवार येऊ लागतात आणि अधिक तीव्र होतात.

दीर्घकालीन गाऊट
:
सुमारे १० वर्षांनंतर हे रुग्ण दीर्घकालीन गाऊटची शिकार होतात. तेव्हा अनेक सांधे, स्नायू , कानाची पाळी आणि मूत्रपिंड अशा अनेक ठिकाणी युरिक अ‍ॅसिडचे खडे (tophi) साठतात.

chr gout.jpg
अशा रुग्णांना भविष्यकाळात हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. तसेच त्यांचे आयुष्यमान काहीसे कमी होते.

रोगनिदान चाचण्या:
१. युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी मोजणे: मात्र ही अजिबात निर्णायक ठरत नाही. काही रुग्णांत ती वाढलेली, काहींत नॉर्मल तर काहींत चक्क कमी झालेलीही असू शकते. किंबहुना या पातळीत अचानक झालेल्या चढउतारांमुळे झटका येतो.
२. सांध्यातील वंगण-द्रवाची (synovial fluid) तपासणी : ही खऱ्या अर्थाने रोगनिदान करते. हे द्रव विशिष्ट सूक्ष्मदर्शकाखाली तपासले असता त्यात युरिक अ‍ॅसिडचे सुई सारखे स्फटिक दिसतात.
३. निरनिराळी इमेजिंग तंत्रे : पहिल्या झटक्याचे वेळी यातून काही निष्पन्न होत नाही. दीर्घकालीन गाऊटमध्ये यांचा गरजेनुसार वापर केला जातो.

उपचारांची रूपरेषा:
१. तीव्र झटका असताना वेदनाशामक आणि सूज कमी करणारी औषधे देतात.
२. दीर्घकालीन उपचारात युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी कमी करणारी औषधे देतात. यांचे तीन मुख्य प्रकार आणि कार्य असे असते:
अ) युरिक अ‍ॅसिडचे लघवीतून उत्सर्जन वाढवणे
आ) युरिक अ‍ॅसिडचे पेशींमध्ये उत्पादन कमी करणे.
इ) युरिक अ‍ॅसिडचे विघटन करणे : यासाठी uricase हे एन्झाइम दिले जाते.

पहिल्या दोन गटांत विविध औषधे उपलब्ध आहेत. रुग्णाच्या आजाराची कारणमीमांसा करून त्यापैकी योग्य ते औषध दिले जाते. ही औषधे कायमस्वरूपी घ्यावी लागतात.

३. पथ्यपाणी सांभाळणे: यामध्ये भरपूर पाणी पिणे, मांसाहार अत्यंत मर्यादित ठेवणे, मद्यपान (विशेषतः बिअर) तसेच फ्रुक्टोजयुक्त गोड पेये टाळणे आणि आपले वजन नियंत्रणात ठेवणे यांचा समावेश असतो.

तर अशी ही गाऊटची कथा. प्राचीन काळी ‘राजांचा आजार आणि आजारांचा राजा’ असे बिरूद गाऊटने मिरवले आहे.त्या काळी योग्य त्या उपचारांचा शोध लागेपर्यंत हे रुग्ण वेदनांनी अक्षरशः पिडलेले असत. तसेच तसेच त्यांच्या मूत्रपिंडांची वाट लागत असे. परिणामी इतर अवयव सुद्धा अकार्यक्षम होत. आता आधुनिक वैद्यकीय उपचारांनी हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. मुळात तो होण्यास चयापचय बिघडवणारी आहार-जीवनशैली कारणीभूत ठरते किंवा खतपाणी घालते. ती जर आपण सुधारली तर समाजातील गाऊटचा प्रादुर्भाव कमी होईल.

जाता जाता .....

युरिक अ‍ॅसिड, जैविक उत्क्रांती आणि बुद्धिमत्ता :
आता जरा गाऊट बाजूला ठेऊन युरिक अ‍ॅसिडकडे कुतूहलाने बघूया. त्यासाठी आपल्याला माणूस आणि उत्क्रांतीच्या टप्प्यातील इतर प्राणी यांची तुलना करायची आहे. त्यात माणूस आणि वानर(ape) हे एका बाजूस तर इतर सस्तन प्राणी दुसऱ्या बाजूस असतील. आपण वर लेखात पाहिले की मानवी शरीरात Purinesचे विघटन होऊन युरिक अ‍ॅसिड तयार होते आणि ते पाण्यात मोठ्या मुश्किलीने विरघळते.

मात्र या दुसऱ्या गटातील प्राण्यांमध्ये युरिक अ‍ॅसिडचे अजून पुढे uricase या एन्झाइमने विघटन होऊन allantoin हा पदार्थ तयार होतो आणि तो पाण्यात सहज विरघळणारा असतो. त्यामुळे त्या प्राण्यांमध्ये युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी नगण्य असते. परिणामी त्यांना गाऊट होत नाही.
उत्क्रांती दरम्यान मानवाने uricase गमावले आणि त्यामुळे युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी बऱ्यापैकी राहिली. त्यातून गाऊटची कटकट आपल्या मागे लागली. पण त्याचबरोबर या नाठाळ युरिक अ‍ॅसिडचे काही फायदेही आपल्याला मिळाले. त्यातील प्रमुख २ असे आहेत:

१. युरिक अ‍ॅसिडला ‘antioxidant’ गुणधर्म आहे. याचा फायदा कर्करोग-प्रतिबंधात्मक आणि मज्जातंतूना संरक्षक असा होतो.
२. युरिक अ‍ॅसिड आपल्या मेंदूतील cerebral cortex या सर्वोच्च भागाला उद्दीपित करते. त्यामुळे (प्राण्यांच्या तुलनेत) आपल्या उच्च बुद्धिमत्तेशी युरिक अ‍ॅसिडचा काही प्रमाणात तरी संबंध आहे असे काही वैज्ञानिकांना वाटते.
...
प्राणी ते मानव या जैविक उत्क्रांतीवर नजर टाकता आपल्या लक्षात येते की या दरम्यान मानवाने काही गमावले तर काही कमावले. कमावलेल्या सर्वच गोष्टी ‘वरदान’ आहेत का, याचे उत्तर देणे तसे सोपे नाही. युरिक अ‍ॅसिड हे त्यापैकीच एक रसायन. ते आपल्यासाठी “शाप की वरदान” हा विचारात टाकणारा एक प्रश्न आहे खरा.
***************************************************************************************************
(लेख व प्रतिसादातील चित्रे : जालावरुन साभार)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच मस्त लेख. अत्यंत चांगली माहीती सोप्या शब्दात मांडली आहे.
तुमचे सर्व लेख अजून जास्त वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजेत.
पुलेशु.

मला दोन वर्षांपुर्वी हे डिटेक्ट झाले. टाच व पाउल अचानक दुखु लागले. शाश्वत मधील ऑर्थोपोडिक डॉ ऋषिकेश सराफ यांच्याकडे गेलो. त्यांनी पाउल हातात घेउन दाबले. प्रचंड वेदना झाल्या. त्यानी युरिक अ‍ॅसिड तपासायला सांगितले. त्यासोबत सीआरपी quantative व पाउलाचे एक्स रे पण करुन घेतले. बाकी नॉर्मल पण युरिक अ‍ॅसिड १०.७ आढळले Fbustat 40 ,emanzen दिले. तीन आठवड्यात परत युरिक अ‍ॅसिड तपासले मग ते ३.७ आढळले. डाळ प्रोटीन , नॉनव्हेज,मद्य पुर्ण वर्ज्य सांगितले. पाणि भरपूर प्यायला सांगितले. तसे ही मी मद्य फार घेत नव्हतो. कधी बिअर घ्याय्चो. हल्ली अधुन मधून हा त्रास होउ लाग्ला. अचानक दुखते नंतर पीक व नंतर ओसरते. ७-८ दिवस कधी जास्त. दुखण्यात तीव्रता असते. अक्षरशः देव आठवतो. मी आयबीएस साठी मानसोपचार तज्ञांची पण मदत घेतो ते म्हणतात प्रोटीन युक्त आहार घ्या, हे म्हणतात अजिबात नको. करायच काय? मी आपल तारतम्याने ठरवतो. हल्ली स्वतःच्या मनानेच ही औषधे घेतो. नंतर डॉक्टर कडे जातो व सांगतो. डॉक्टर मंडळी फार बिझी असतात. त्यांना माझी केस माहिती असल्याने पहिले युरिक अ‍ॅसिड रिडिंग आणायला सांगतात. नॉर्मल रेंज मधे असताना पण कधी दुखते. भरपूर पाणी प्याले तर प्रचंड लघवी होत रहाते. व नंतर पाउल दुखणे थांबते पण मांड्यां व पोटर्‍याचे स्नायू जाम होतात.नंतर नॉर्मल होते. कार्डियाक हिस्ट्री आहे म्हणून अ‍ॅस्प्रीन वीसपंचवीस वर्षे सातत्याने चालू आहे.

बुद्धीजीवी लोकांत त्याचे प्रमाण काहीसे जास्त असते>>'
दुसर्‍यांच्या बुद्धीवर जगल्यावर काहितरी शिक्षा नको का Wink

हा खूप छान माहितीपूर्ण लेख आहे . धन्यवाद. काही होलिअर दॅन दाउ प्रवृत्तीचे लोक्स माहीत आहेत जे आधी रेड मीट दारू ह्या लाइफस्टाइलचे भक्त होते पण गाउटने इंगा दाखवल्यावर एकदम शाकाहाराचे गुणगान गाउ लागले आहेत.

काही प्रश्न
१) कायम स्वरुपी प्रतिबंधात्मक इलाज काय करावा?
२) अजिबात प्रोटीन नको हे व्यवहार्य आहे का?
३) तुम्ही बाहेरगावी असाल व अचानक त्रास झाला तर काय करावे?

१) कायम स्वरुपी प्रतिबंधात्मक इलाज काय करावा? >>
आहार व जीवनशैली सुधारणे (याचे विवेचन लेखात आले आहेच). सतत पाणी भरपूर पिणे. मद्यपान आयुष्यातून हद्दपार करणे. निव्वळ आहार-नियंत्रणाने युरिक असिड पातळी फार तर १ mg नेच खाली येईल. तेव्हा औषधे घ्यावीच लागतील.

२) अजिबात प्रोटीन नको हे व्यवहार्य आहे का? >>>
अजिबात नाही आणि ते शक्यही नाही. डाळी व अंडे जरूर खावे.

३) तुम्ही बाहेरगावी असाल व अचानक त्रास झाला तर काय करावे? >>
नेहमीच्या डॉ नी सुचविलेली वेदनाशामक आणि सूज कमी करणारी औषधे जवळ हवीतच. ती घ्यावीत.

मद्यपान आयुष्यातून हद्दपार करणे. >>
मद्य या संवर्गात नेमके काय काय मोडते? वाईन/बिअर/व्हीस्की/रम/व्होडका/ब्रँडी यात अल्कहोलचा अंश कमीजास्त प्रमाण असतो . पण आयुर्वेदातील अरिष्ट/ आसव या प्रकारातील औषधे सुद्धा एक प्रकारे मद्यच असतात. मग या सर्वांनाच मद्य म्हणावे का? दोन तीन महिन्यांनी सोशल ड्रिंक म्हणून एखाद दुसरा पेग घेणे देखील घातक समजावे का? थोडे फार घेतले तर चालेल असे डॉक्टर कधी सांगत नसतो. कारण लोक पडत्या फळाची आज्ञा म्हणून लगेच ड्रिंक घ्यायला टपलेले असतात असे मला एका डॉक्टर ने सांगितले. Happy

मद्य या संवर्गात नेमके काय काय मोडते?>>>
कोणतेही मद्य असले तरी त्यात ethyl alcohol असतेच.
ज्याला गाउट झालाय त्याने तरी वर्ज्य करावे, हे बरे.
डॉ चा सल्ला तसाच पाहिजे .

काही होलिअर दॅन दाउ प्रवृत्तीचे लोक्स माहीत आहेत जे आधी रेड मीट दारू ह्या लाइफस्टाइलचे भक्त होते पण गाउटने इंगा दाखवल्यावर एकदम शाकाहाराचे गुणगान गाउ लागले आहेत.>>>
आपले होलियर दॅन दाऊ अजेंडे खपवायला दुसर्‍यांचे धागे हायजॅक करू नये. कडबाहारी/टीटोटलर असून गाउटचे शिकार झालेले माहिती आहेत.

गाऊटचा रुग्ण मी अगदी जवळून पाहिलाय. माझ्या ऑफिसमध्ये ५० वर्षे वयाचा माझा एक गर्भश्रीमंत सहकारी होता. त्याचे राहणीमान कुछभी और कितनाभी, खाओ पीओ ऐश करो असेच होते. अधेमधे त्याच्या पायाचा अंगठा वरील फोटोतल्याप्रमाणे सुजत असे. तेव्हा त्याला जमिनीवर पायही टेकवता येत नसे. लंगडत कामावर येई. दर महिन्यातून दहा दहा दिवस सुट्टी घेऊन घरी बसावे लागे. मग नंतर कधीतरी गाऊटचे निदान झाले. दोन वेळा बसने प्रवास करताना पायात एव्हढी कळ उठली की वेदना सहन न होऊन बसमध्ये चक्कर येऊन पडला. हळूहळू त्याचे पलंगावरून उतरणेही बंद झाले. अखेर दीड वर्षात राजीनामा देऊन घरी बसावे लागले. आता तर परिस्थिती अजूनच चिघळलीय.

बहुतांश रुग्णांचे बाबतीत एकाच सांध्याचा तीव्र दाह होतो आणि तो सांधा म्हणजे पायाच्या अंगठ्याचा. >>> पायाचा अंगठाच का? त्याचे काय कारण असावे बरे!!!?

@ कुमार१, आमवात (RA) यावरही एक लेख येऊ द्या.

@अंकु,
जाता जाता नंतरचे पॅरा आवडले. >>>>> ' जैविक उत्क्रांती आणि बुद्धिमत्ता ' याबद्दल मुद्दामहून लिहीले आहे. तो भाग रंजक आहे आणि वाचकांना आवडणार याची खात्री होती. नाहीतर सारखेच 'आजारीपणा' चे वाचून कंटाळा येतो !

@ सचिन,
पायाचा अंगठाच का? त्याचे काय कारण असावे बरे!!!? >>> चांगला प्रश्न. त्याचे एक स्पष्टीकरण असे आहे. पायाच्या सांध्यातील तापमान हे अन्य शरीरापेक्षा कमी असते. त्याने 'खडे' होण्याची प्रक्रिया वेग घेते.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

स्वाती आभार.
सचिन, गाऊट ला मराठी शब्द प्रचलित आहे का ?

माझ्या वडिलांना गाउट होता. Gout with CRF आणि त्यातच ते गेले! आनुवंशिक होता, त्यांच्या मामांकडून आला. वडिलांचे मावसबंधु देखिल गाउटने त्रस्त आहेत आणि माझे आतेभऊ देखिल Sad

सचिन, गाऊट ला मराठी शब्द प्रचलित आहे का ? >>> काही कल्पना नाही, सर! आमवात (RA) माझ्या सासूबाईंना होता. त्यामुळे मला त्या रोगाची कल्पना आहे. सुरवातीला त्यांचा एक हात बारीक झाला. मग दोन्ही हातापायांच्या बोटांचे सांधे डिसलोकेट होऊन बोटे वाकडीतिकडी झाली. हात खांद्याच्या वर आणि पुढेमागे जाईना झाला. दोन्ही गुढगे ' L' आकारात अडकले. त्यांचा अक्षरशः लाकडी पुतळा झाला होता. न हलणारा, न वाकणारा. सर्व विधी पलंगावरच करत. दुसऱ्याने भरवल्याशिवाय खाऊपिऊ शकत नसत. असह्य वेदनांनी त्या रात्रभर गुरासारख्या ओरडत असत. अंगावरच्या साध्या चादरीच्या वजनाने त्यांच्या हाडांची आग होई. अंगावरचे कपडे काढून फेकत नाहीतर कपडे पाण्याने ओले करायला लावत. पाच वर्षे फार भोगलं त्यांनी आणि आम्हीही. गेल्यावर्षी गेल्या. सुटल्या! आम्हाला जीवनाकडे पहाण्याचा नवा दृष्टिकोन देऊन गेल्या. Sad

अवांतराबद्दल क्षमस्व.

कुमार१, चांगला लेख
मला गाउट झाला होता तो डाव्या हाताच्या अनामिकेच्या खालुन पहिल्या सांध्याला. बराच त्रास झाल्यावर निदान झाले.
कारण कळले नाही कारण मी शाकाहारी आहे पण त्यावेळेस ऑफिस मध्येच जेवण होत असे त्यामधुन काही त्रास झाला असावा असे वाटते. त्या वेळे पासुन लोणची, पापड आणि तत्सम टाकण्खार युक्त पदार्थ बंदच आहेत.

क्रॅन्बेरी ज्यूस चा काही फायदा होतो का?

सचिन, आभार. तुम्ही वर्णन केलेल्या वरून RA च्या तीव्रतेची कल्पना येते.
मॅक्स, आभार.
क्रॅन्बेरी ज्यूस बद्दल वाचून बघतो. तब्बेतीसाठी शुभेच्छा

छान चर्चा. अनेकांचे स्वानुभव चांगले आहेत.
डॉक, एक शन्का:
तो मुख्यतः पुरुषांचा आजार आहे (पुरुष : स्त्री = १० :१). >>>>>
याचे कारण जरा उलगडून सांगणार का?

@ मॅक्स,
गाऊटमध्ये क्रॅन्बेरी ज्यूस चा काही फायदा होतो का? >>>>

या रसामध्ये पुढील घटक आहेत: salicylic acid, oxalate व calcium. यूरिक A वाढलेल्या व्यक्तीस salicylic acid खाणे हे वाईटच. Aspirin मध्येही हे असते. त्यामुळे तीही कटकटीचीच.
तसेच oxalate व calcium हे घटक तर मूतखडे होण्यास पोषक.
हे सर्व बघता माझ्या मते हा रस घेणे तोट्याचेच होईल.

@ साद:
तो मुख्यतः पुरुषांचा आजार आहे (पुरुष : स्त्री = १० :१). >>>>>

स्त्रीची मासिक पाळी जोपर्यंत चालू असते तोपर्यंत इस्ट्रोजेनचा शरीरावर प्रभाव असतो. हे हॉर्मोन युरिक अ‍ॅसिडचे लघवीतून उत्सर्जन वाढवते. हे स्त्रीसाठी गाऊट-संरक्षक ठरते.

Pages