तू माझ्यापर्यंत कधीच पोहचू शकणार नाहीस

Submitted by क्षास on 27 March, 2018 - 09:41

तू माझ्यापर्यंत कधीच पोहचू शकणार नाहीस,
तुला माझ्यातली 'मी' कधीच सापडणार नाही,
तू जिथे शोधशील तिथे मी गवसणार नाही,
जिथे जाशील तिथे गैरसमजाच्या धुक्यात हरवशील,

तुला माझ्यातल्या "मी "चा पत्ता सापडेल कधी ना कधी,
तू त्या दिशेने चालायला लागशील,
वाटेत तुला तो गाठेल - माझा भूतकाळ,
त्याचे किस्से ऐकून तू अर्ध्या रस्त्यातून परतशील,

इकडचे तिकडचे कितीतरी वारे तुझे कान भरतील,
खोट्या, ऐकीव गोष्टी गोंगाट करतील,
तुला 'माझा' आवाज ऐकू येईनासा होईल,
सत्य कुठेतरी कोपऱ्यात दडी मारून बसेल,

तू शेवटपर्यंत गैरसमजाचा चष्मा घालून वावरशील,
त्यातूनच मला बघशील.....आणि हसशील..
तुला मी दिसूनही दिसणार नाही,
तुला मी कळूनही कळणार नाही,
तू माझ्यातल्या "मी" पर्यंत कधीच पोहचणार नाहीस....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला मी दिसूनही दिसणार नाही,
तुला मी कळूनही कळणार नाही,
तू माझ्यातल्या "मी" पर्यंत कधीच पोहचणार नाहीस....>>> खूप छान