तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग ३

Submitted by कुमार१ on 11 March, 2018 - 09:20

(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)

भाग २ इथे आहे:
https://www.maayboli.com/node/65494
************************************************************************************************

वयोगट २-१८ वर्षे : स्वप्नातल्या कळ्यांनो .....

या भागात दोन उपविभाग पडतील – वय २-१२ आणि १३-१८. त्यापैकी २-१२ मध्ये प्रत्येक मुलाच्या चाचण्या करण्याची गरज नसते. फक्त ज्यांच्या बाबतीत एखाद्या आजाराचा कौटुंबिक इतिहास किंवा अन्य काही जोखीम असते, त्यांच्याच बाबतीत विचार करावा. त्यामुळे या भागातील मुख्य विवेचन हे १३-१८ या वयोगटाचे असेल. यांच्यासाठी ज्या चाचण्यांची शिफारस केली आहे, त्या सर्वांच्या करण्याबाबत मतांतरे आहेत. काही चाचण्यांबाबत तज्ञांचे एकमत आहे तर काहींच्या बाबतीत नाही. इथे स्थलकालपरत्वे मतभेद असणारच.

मुख्यतः ४ आजारांसाठी चाचण्या सुचवल्या आहेत. त्यांचे दोन गट असे आहेत:

१. चयापचयाचे आजार : लठ्ठपणा, मधुमेह (प्रकार-२) आणि उच्च-कोलेस्टेरॉल पातळी. (हा गट गरज वाटल्यास २-१२ वयोगटालाही लागू होतो).
२. जंतूसंसर्ग आजार : HIV ची बाधा

या वयोगटात मधुमेह आणि कोलेस्टेरॉल ही नावे पाहिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल. एकेकाळी चाळीशीला यांचा विचार व्हायचा. पण आज ही अनिष्ट परिस्थिती येऊन ठेपली आहे.
आता या प्रत्येकाचा आढावा घेतो.

लठ्ठपणा :
पौगंडावस्थेतील लठ्ठपणा हा सध्याच्या काळात जगभरात बराच वाढत चालला आहे. बिघडलेल्या जीवनशैलीचा त्यात मोठा वाटा आहे. अतिरीक्त वजनावर याच वयात नियंत्रण ठेवले नाही तर पुढील आयुष्यात अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. त्यांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, संधिवात, झोपेतील श्वसनदोष, हृदयविकार आणि काही कर्करोग यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अशा व्यक्तीला मानसिक त्रास आणि समाजात वावरतानाचे अवघडलेपण हेही भोगावे लागते.
त्यामुळे वर्षातून किमान एकदा शरीराचे वजन मोजले पाहिजे. या चाचणीला सामोरे जाताना त्या व्यक्तीला फक्त वजनकाट्यावर उभे राहायचे आहे, बाकी कुठलाही त्रास नाही ! त्याच्या जोडीला उंची मोजून मग BMI हा निर्देशांक काढला जातो. याची ‘योग्य’ पातळी ही जगातील विविध वंशांप्रमाणे ठराविक असते. त्यानुसार व्यक्ती ही योग्य का अतिरीक्त वजनाची का लठ्ठ हे ठरवले जाते. मग वजन योग्य ठेवण्यासाठी आहार, व्यायाम आणि जीवनशैलीविषयक सल्ला देता येतो.

मधुमेह (प्रकार-२) :
गेल्या दोन दशकांमध्ये विशीच्या आत मधुमेह(प्रकार-२) होण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. सुमारे ५० वर्षांपूर्वी मधुमेह म्हणजे मध्यमवयीन व सुबत्तेचे जीवन असणाऱ्यांचा आजार असे साधारण चित्र होते. ते केव्हाच पुसले गेले असून आता तो कोणालाही आणि कुठल्याही वयात होऊ शकतो. हे धक्कादायक असले तरी वास्तव आहे.
जेव्हा हा आजार या वयात होतो तेव्हा पुढचे संपूर्ण आयुष्य त्याच्यासह काढावे लागते. या दीर्घ कालावधीमुळे आजाराचे पुढचे वाईट परिणाम होण्याचा धोका वाढतो. हे धोके म्हणजे हृदयविकार, मूत्रपिंड-विकार, दृष्टीवर घातक परिणाम आणि पाय सडण्याचा विकार.

आता या वयात मधुमेह(प्रकार-२) होण्याची शक्यता लठ्ठ आणि अजिबात व्यायाम न करणाऱ्या मुलांना अधिक असते.जर अशा मुलांना खालीलपैकी अजून २ मुद्दे (risk factors) लागू होत असतील तर ही शक्यता बळावते:

१. मुलाच्या आई, वडील वा भावंडे यांना मधुमेह असणे,
२. मुलाचे जन्मतःचे वजन बरेच कमी असणे,
३. गर्भावस्थेत असताना त्याच्या / तिच्या आईला मधुमेह झालेला असणे,
४. मुलाला सध्या उच्चरक्तदाब वा मेदांची वाढलेली रक्तपातळी असणे आणि
५. मुलीच्या बाबतीत तिला अंडाशय-विकार (PCOS) असणे.

तेव्हा वरील निकष पूर्ण करणाऱ्या मुलांसाठी मधुमेहाच्या चाचण्या जरूर कराव्यात. या चाचण्या सर्वपरिचित आहेत. खालीलपैकी कोणतीही एक करावी:
१. ग्लुकोज-रक्तपातळी (उपाशीपोटी)
२. --------- ,,----------( ७५ ग्राम ग्लुकोज खाल्ल्यानंतर २ तासांनी)
३. हिमोग्लोबिन- A1c मोजणी

चाचणीचा रिपोर्ट ‘नॉर्मल’च्या वर आल्यास ती दुसऱ्या दिवशी पुन्हा करून खात्री करावी. या रिपोर्ट्स वरून जरी प्रत्यक्ष ‘मधुमेह’ हा निष्कर्ष निघाला नाही तरी मधुमेहाची ‘पूर्वावस्था’ कळू शकते. ते महत्वाचे आहे. या अवस्थेत जीवनशैलीत योग्य बदल केल्यास निरोगीपणाकडे पूर्ववत जाता येते.

उच्च कोलेस्टेरॉल रक्तपातळी :
ही चाचणी सर्वांसाठी गरजेची नाही. ज्या मुलांना खालील मुद्दे लागू होतात त्यांच्यासाठी करावी:

१. उच्च कोलेस्टेरॉल चा कौटुंबिक इतिहास: आई, वडील,भावंडे, काका, मामा यांना असेल तर. किंवा कुटुंबात कुणाला पन्नाशीपूर्वी हृदयविकाराचा झटका आला असेल तर.
२. लठ्ठपणा, मधुमेह वा उच्च-रक्तदाब असणे
३. भरपूर मेदयुक्त आहार आणि व्यायामाचा अभाव
४. सिगारेट अथवा तंबाकूचे व्यसन असणे.

वरीलपैकी ३ व ४ हे मुद्दे विशेष महत्वाचे. १३-१८ या वयांत बरीच मुले याच्या आहारी गेलेली दिसतील. त्याचे अनिष्ट परिणाम १-२ दशकांनी दिसू शकतात. म्हणून आताच जागे होणे हे हितावह असते.

HIV ची रक्तचाचणी:
हे नाव काढताक्षणी काहींच्या भुवया एकदम उंचावतात. बऱ्याचदा आपला दृष्टीकोन “अहो ते सगळे पलीकडच्या देशांमध्ये ठीक आहे हो, आपल्याकडे तेवढे वाईट चित्र नाही”, असा असतो. पण वास्तव नाकारून कसे चालेल? युवकांचे असुरक्षित लैंगिक संबंध हा आता सर्व जगाला भेडसावणारा प्रश्न आहे. वरून ‘निरोगी’ दिसणाऱ्या कित्येक युवकांना याची लागण झालेली असू शकते.

HIV चाळणी चाचणीचे फायदे:
१. या संसर्गाचे निदान लवकर झाल्यास प्रभावी उपचार करता येतात आणि प्रत्यक्ष AIDS होण्यापासून बचाव होतो.
२. त्या व्यक्तीपासून या संसर्गाचा समाजात प्रसार कमी करता येतो.
३. जरी चाचणीचा निष्कर्ष नकारात्मक असेल पण त्या व्यक्तीस पुढे संसर्ग होण्याचा धोका असेल, तर तिला प्रतिबंधात्मक उपचार घेता येतात.

ही चाचणी कोणाची करावी?
जी व्यक्ती खालीलपैकी एखाद्या गटात (high risk) मोडते तिची:

१. एकापेक्षा अधिक जोडीदाराशी असुरक्षित संभोग
२. दुसरा एखादा गुप्तरोग झालेला असणे
३. समलिंगी संबंध असणे
४. इंजेक्शनने मादक पदार्थ घेणारे व्यसनी
५. लैंगिक जोडीदार HIV-positive असणे
६. हिपटायटीस किंवा क्षयरोग झालेला असणे
ज्या भागांमध्ये HIVचा प्रादुर्भाव खूप आहे तिथे १६ वर्षांपुढील सर्वांची ही चाचणी करावी अशी शिफारस प्रगत देशांत केलेली आहे.

चाचणीचे निष्कर्ष
:
१. जर चाचणी नकारात्मक ठरली तर त्याचा अर्थ एवढाच असतो की ती करतेवेळीस संसर्गाचा पुरावा नाही. ज्या व्यक्तीत जोखीम जास्त आहे तिथे नियमित स्वरुपात चाचणी करीत राहावे.
२. जर चाचणी होकारात्मक ठरली तर मात्र अजून पुढची चाचणी करून निदान करावे लागते.

तर असा हा या वयोगटाचा आढावा. खरे म्हणजे आयुष्याच्या सर्व टप्प्यांमधील सर्वात निरोगी असा हा गट असतो. पण बिघडलेल्या जीवनशैलीने अनेक आजारांची बीजे या वयातच रोवली गेली आहेत. दिवसेंदिवस अनेक आजार हे प्रत्येक पिढीगणिक अलीकडच्या वयोगटात येत आहेत. तसेच त्यांचे दीर्घकालीन दुष्परिणाम वाढत्या प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे आरोग्यरक्षणासाठी संबंधित चाळणी चाचण्यांचे महत्व निःसंशय वाढलेले आहे. एखाद्या आजाराची जोखीम जास्त असणाऱ्यांनी या वयांत अशा चाचण्यांचा जरूर लाभ घ्यावा.
**********************************************************************************************
भाग ४ https://www.maayboli.com/node/65597
(क्रमशः )

.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमी प्रमाणेच मस्त लेख
या वयोगटात मधुमेह आणि कोलेस्टेरॉल ही नावे पाहिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल. एकेकाळी चाळीशीला यांचा विचार व्हायचा. पण आज ही अनिष्ट परिस्थिती येऊन ठेपली आहे.>>>>>
हे चिंताजनक आहे

@ कुमार १,

लेख आवडला.

अतिरिक्त वजन आणि लठ्ठपणा अनेक रोगांना निमंत्रण असते हे वारंवार कानावर पडते. त्याबद्दल लोक जागरूक होत आहेत. पण अगदी योग्य बीएमआय असलेल्यांना / तरुण मुलांना मधुमेह का व्हावा कळत नाही.

साद व अनिंद्य, आभार
पण अगदी योग्य बीएमआय असलेल्यांना / तरुण मुलांना मधुमेह का व्हावा कळत नाही.>>
अनुवांशिक ता व आहारशैली हेही महत्त्वाचे घटक आहेत

डॉक्टरसाहेब, या चांचण्यांपैकी एखादी पाझिटिव निघाली तर एव्हढ्या बालवयात मुलांवर औषधांचा मारा करणं (एस्पेशियली डायबिटीस-२, हाय कोलस्टरॉल) योग्य आहे का? कारण अशा आजारांवर उपचार्/नियंत्रण ठेवणार्‍या औषधांचा इंटर्नल ऑर्गनस्वर हळुहळु वाईट परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत सुवर्णमध्य कोणता?..

@ राज,
तर एव्हढ्या बालवयात मुलांवर औषधांचा मारा करणं (एस्पेशियली डायबिटीस-२, हाय कोलस्टरॉल) योग्य आहे का?
>>>>>
नक्कीच नाही. आधी आहार, व्यायाम आणि जीवनशैली सुधारण्याचेच सल्ले द्यावेत. मधुमेहाची पूर्वावस्था असल्यास अजून सोपे जाईल.
जर अनुवांशिक उच्च-कोलेस्टेरॉल आजार निघाला आणि ती पातळी खूपच उच्च निघाली तरच नाईलाजाने औषधाचा विचार करावा.

साद, चांगला प्रश्न.
मधुमेह -१ हा उलट लवकर समजून येतो कारण त्याची लक्षणे तीव्र असतात. बऱ्याचदा अशा मुलांना त्रास झाल्यावर थेट रुग्णालयात दाखल करावे लागते. तेव्हा ती बेशुद्ध असू शकतात. त्यांची ग्लुकोज पातळी खूप जास्त असते. नंतर त्यांच्या रक्त तपासणीत काही antibodies सापडल्या की प्र-१ चे निदान पक्के होते.

याउलट प्र-२ हा छुपा असतो. जरी ग्लुकोज पातळी वाढलेली असली तरी रुग्णास लक्षणे बराच काळ दिसत नाहीत. त्यामुळे चाचणी करून पाहिल्यासच आजाराचा शोध लागतो.