आतुर- भाग १

Submitted by Harshraj on 9 March, 2018 - 04:21

पाऊस ..असतोच असा ..वेडा! खोडकर पोरांना वाकुल्या दाखवणारा..तर कधी एखाद्याच्या शांत मनाने डोळेभरून पाहण्यासाठी उगाचच बरसणारा...कधी आपल्यासोबत दुःखाचे चार दोन कढ नकळत वाहून नेणारा...तर कधी आनंदाच्या क्षणी आपल्यासोबत ओथंबून वाहणारा..असं आहे माझं. पाऊस म्हटलं कि तो बरसायच्या आधीच मी वाहून जाते त्याच्यात!

हि पेम कथासुद्धा आहे अशाच पाऊसवेड्या मुलीची!

तिचं नाव अक्षदा!

आजही ती खिडकीत एकटीच बसली होती..पाऊस बघून तिला शाळेत असताना पावसात कशी धमाल करायची, हातात चप्पल घेऊन कसे चिखलात चालायचो, आणि चप्पल हातात ना घेता चालल्यावर कशी फजिती वाहायची हे सगळं पुन्हा पुन्हा आठवू लागलं.आणि त्याहूनही जास्त छळू लागली ती त्याची आठवण. पण पावसामुळे तिचं मन मात्र रमलं होतं पुण्यात..खिडकीतून ती रस्त्यावरून जाण्याऱ्या येणाऱ्या लोकांची उडणारी धांदल मजेने पाहत होती. आणि मोबाईल ची रिंग वाजली. तीही अर्धवट..पुनः बंद झाली. तसा तिचा चेहरा चमकला. क्षणभर हृदयात धडधड झाली आणि तसाच मोबाईल उचलून तिने पहिला. त्याचाच. .हो त्याचाच नंबर आहे हा..दोन वर्षात असंख्य वेळा तिने मनातून या नंबरला फोन लावला होता पण..अस्तित्त्वात मात्र एकदाही नाही..मोबाईल उचलून पहिला तर त्याचाच मेसेज..'उद्या येतोय. कुठे भेटूया? ' का कोणास ठाऊक उगीच डोळ्यात पाणी आलं..या क्षणासाठी तिचं मन केव्हाचं आतुर झालं होतं..पण आता भेटीचा क्षण जवळ आला असता हि कसली तगमग? हि कसली भीती? तीने त्याला पत्ता मेसेज केला आणि पुन्हा खिडकीत येऊन बसली. माघाशीच्या आठवणींनी आता जणू फेर धरून नाचायलाच सुरुवात केलेली..

अक्षदा! एक अगदीच सध्या कुटुंबातली मुलगी होती. इंजिनियरिंग च्या तिसऱ्या वर्षाला होती. म्हटलं तर चंचल, मायाळू! सर्वांची लाडकी..सगळयात मिळून मिसळून राहणारी. स्पेशल असं म्हणता येणार नाही पण गोड होती. यावर्षी इयर एन्ड ला २ महिने ट्रैनिंग साठी जाव लागणार होतं. कॉलेजने काही कम्पन्याची नावं सजेस्ट केली होती. अक्षदाने पण मग दोन तीन कंपनीज मध्ये एप्लिकेशन दिले त्यात पुण्याच्या एका कंपनीचा होकार आला. मग तिच्या बाबांनी पुण्याच्या ओळखी काढल्या आणि एक रूम बघून तिची सोय करून दिली. आणि एक साधा मोबाईल सुद्धा घेऊन दिला. तो एक फ्लॅट होता म्हटलं तरी चालेल. मालकाने तो कॉट बेसिस वर भाड्याने दिला होता एवढंच! कंपनीचा पहिला दिवस..गेट वर लेटर दाखवून , व्हिसिटर्स पास घेऊन ती ज्या डिपार्टमेंटला ट्रेनिंग घेणार होती तिथे आली. केबिनच्या दारावर नॉक करून ती आत आली. सरांनी तिला सगळं समजावून सांगितलं आणि ज्या व्यक्तीच्या हाताखाली ती ट्रेनिंग घेणार होती त्याची ओळख करून दिली. हीच होती दोघांची पहिली ओळख! विलास..विलासच्या अंडर ती ट्रेनिंग घेणार होती.

विलास ने तिला डेस्क दाखवला, कम्प्युटर लॉगिन रुल्स सांगितले आणि म्हणाला, "जेव्हा अक्चुअल मशीन वर जायचं असेल तेव्हा मी तुला सांगतो तोपर्यंत तुझा मेल आयडी दे मी काही त्यासंबंधित इन्फॉरमेशन मेल्स पाठवतो ते तू वाच. "

अक्षदाला खूपच ऑकवर्ड झालं होतं. एकतर हि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्यामुळे सगळीकडे वर्कशॉप्स आणि वर्कर. त्यात मॅकेनिकल डिपार्टमेंट..एकही मुलगी नव्हती. विलास सरांना ती फक्त हो हो म्हणाली पण तिचं लक्ष मात्र या सगळ्या वातावरणाकडे होतं. आणि कहर म्हणजे तिला आता वॉशरूम मध्ये जायचं होतं...आणि आता केबिनमधला हा ए सी. काय करू? कोणाला विचारू? आणि यार कसं विचारणार?सगळे जेंट्स ! एक क्षण तिला वाटलं , कुठे अडकलो आपण. पण जायला तर हवंच होतं! मनाचा हिय्या करून तिने शेवटी विलास सरांना विचारलं ,"sir where is washroom ?"

विलास सरांनी तिला सांगितलं, "तुला एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट ला जावं लागेल. चल तुला दाखवतो!"

"नको सर मला सांगा मी जाईल " अक्षदा

"माझं पण काम आहे तिकडे म्हणून म्हटलं दाखवतो चल!" विलास

"ओह, मग ठीक आहे." अक्षदा

पुन्हा लंच ब्रेकमध्ये तेच, सगळे आपल्या आपल्या ग्रुप मध्ये बसलेले. अक्षदाने जेवण वाढून तर घेतलं पण टेबलवर एकटीने बसून तिला जेवण जाईना. तेवढ्यात मागून विलास सर आले.

"अक्षदा , तुझं जेवण झालं कि सांग लगेच केबिन मध्ये ये, आपल्याला मशीनवर जायचं आहे."

मग अक्षदा जेवण करून विलास सरांबरोबर वोर्कशॉप मध्ये गेली. त्यांच्या सांगण्याची पद्धत खरंच खूप वेगळी होती. पटकन समजेल अशी. ट्रेनिंग चा पहिला दिवस असाच गेला. .थोडा अवघडलेला.

दुसऱ्या दिवशी तिला प्रॉपर आयकार्ड मिळाले, मील पास मिळाला. आज तिने जरा कॉन्फिडन्सनेच आत प्रवेश केला. तिचा डेस्क विलास सरांच्या डाव्या बाजूलाच होता. तिने सरांना गुडमॉर्निंग विश केले आणि मेल्स ओपन केले.त्यात सरांचा एक गुड मॉर्निग मेल होता आणि बाकीचे थोडे काही इन्फर्मेटिव्ह मेल्स होते. ती वाचतच होती एवढ्यात सरांचा आवाज आला,

"अक्षदा ब्रेकफास्ट आला आहे बाहेर. येतेस ना? कि आणला आहे घरून?"

"नाही सर, मला नको ऑकवर्ड होतं. ", अक्षदा

"मग काय लंच ब्रेक पर्यंत उपाशी राहणार आहेस का. आत्ता ९ वाजले आहेत फक्त. लंच ब्रेक १ वाजता होणार." विलास

"तरीपण, नको सर! चहा झालाय सकाळी माझा.", अक्षदा

"ठीक आहे" असं म्हणून विलास बाहेर गेला आणि त्याने दोन प्लेट्स मध्ये नाष्ता केबिनमध्येच आणला. आणि अक्षदाला म्हणाला, " हे घे, आता तर ऑकवर्ड होणार नाही ना?"

अक्षदा एकदम गोंधळली, " सर, तुम्ही कशाला आणलात ? माझ्यामुळे तुम्हाला फ्रेंड्स सोबत नाश्ता नाही करता येणार."

विलास, " आता तू माझ्या अंडर ट्रेनिंग घेतेयस तर , तुला इथली सवय होईपर्यंत मला तुझी काळजी करावीच लागणार. आणि आपण सुद्धा फ्रेंड्स होऊच शकतो नाही का ?"

विलासच्या बोलण्याने अक्षदा रिलॅक्स झाली. दोघांनी गप्पा मारत नाश्ता केला. आणि कामाला सुरुवात केली. विलासबरोबर अक्षदा आता बरंच मोकळं वागू लागली होती. दोघे सोबतच असायचे. जेवतानाही विलास आता तिच्या बरोबरच बसायचा. तिला एकटं वाटू नये म्हणून,खूप गप्पा मारायचा. अक्षदा तशी फार बोलायची नाही. पण विलास बोलताना मात्र तिच्याही नकळत खुलायची. अक्षदाला एक सवय होती. ती एकटी असली कि कायम गुणगुणायची. मराठी गाणी तिला खूप आवडायची. काही काम नसलं कि ती केबिनमध्ये हेडफोन लावून मोबाइलमधली गाणी ऐकत बसायची. कुणी नसलं केबिन मध्ये तर गुणगुणायची सुद्धा!

एक दिवस ती गुणगुणत असताना असाच विलास केबिनमध्ये आला, तेव्हा अक्षदाची 'ती गेली तेव्हा रिमझिम ...' या गाण्यात पूर्ण तंद्री लागली होती. तो गुपचूप येऊन डेस्कवर बसला आणि काम करू लागला. पण डोळे आणि मन मात्र तिच्याचकडे वळत होतं. अगदी साध्या वेषातली अक्षदा, पहिल्याच दिवशी त्याला आवडून गेली होती. आणि महिनाभरात तो तिच्याकडे पूर्ण आकर्षित झाला होता. आजही त्याला अक्षदाची ती गुणगुणारी छबी डोळ्यात भरून घ्यायची होती. पण तिला हे कळूही द्यायचं न्हवतं. त्याला स्वतःची मर्यादा माहित होती. अजून ती खूप लहान होती. आणि विलास..नाही म्हटलं तरी दोघांमध्ये ८-९ वर्षाचं तरी अंतर होतं. अजून एक महिन्यांनी ट्रेनिंग संपलं कि अक्षदा निघून जाणार होती. आणि तो पुन्हा एकटा राहणार होता.

गाणं संपल्यावर अक्षदाने डोळे उघडले तो बाजूला विलास होता. अक्षदा थोडीशी ओशाळली.

"सॉरी सर, मला माहित न्हवतं कि तुम्ही आला आहेत."

विलास वर वर "इट्स ओके. चलता है !" म्हणाला. जणू आपल्याला विशेष काही वाटलंच नाही. पण त्याला आतून तिने असंच गाणं म्हणत राहावं असं वाटत होतं. पण...

इकडे अक्षदा मनात म्हणाली, "किती चांगले आहेत सर. काहीच बोलत नाहीत. आणि आपल्याला एकटं वाटू नये म्हणून किती करतात. टी ब्रेक संपला तसा अक्षदाने मेल बॉक्स ओपन केला. तो विलास ने तिला फ्रेंडशिप च ग्रीटिंग असलेली मेल पाठवलेली दिसली. खूपच सुंदर होती. अक्षदाने लगेच nice असा रिप्लाय केला आणि विलास कडे पाहून हसली. झालं, आता गुडमॉर्निंग सोबत विलास तिला मैत्रीच्या सुद्धा मेल्स पाठवू लागला होता. आणि त्या इतक्या अर्थपूर्ण असायच्या कि, अक्षदाला खूप आवडायच्या. विलास हा तिचा पहिलाच मित्र होता. बाकी कन्या शाळेत शिक्षण झाल्यामुळे तेही खेडेगावात, त्यामुळे मुलांशी तिचा जास्त सम्पर्क नव्हताच. कॉलेजमध्ये सुद्धा हॉस्टेलमध्ये असल्यामुळे चिक्कार मैत्रिणी !

विलास दिवसेंदिवस अक्षदा कडे आकर्षित होत होता.

त्यातच पावसाळ्याची सुरुवात झाली. पाऊस म्हणजे अक्षदाचा जीव..पाऊस कोसळायला लागला कि अक्षदा एक तर तो बघण्यात इतकी गुंग होऊन जायची..त्याची निरनिराळी रूपे पाहून भुलून जायची..तशीच त्यादिवशी सुद्धा ती खिडकीतून तो पहिला पाऊस बघताना पूर्ण हरवून गेली होती. ओठावर कविता स्फुरली होती पण ती लिहावी याचासुद्धा भान न्हवतं तिला. तोंडाने पुटपुटत मात्र होती. विलास सगळं आवरून घरी जायच्या तयारीने उठला. अक्षदाकडे पाहतो, तो हिचं आणखी एक रूप! दोन मिनिटे पाहतच राहिला. आणि भानावर येऊन त्याने तिला आवाज दिला,

" ओ अक्षदा मॅडम, ७ वाजले आहेत. जायचं नाही का घरी?"

अक्षदा गडबडून म्हणाली, "हो सर, जायचं आहे, टाइम कडे लक्षच गेलं नाही. सॉरी!"

" त्यात सॉरी काय आता? प्रत्येक छोट्या गोष्टीला सॉरी म्हणायची फार सवय आहे तुला. ते जाऊदे, आता घरी कशी जाणारेस? छत्री पण नसणार, अचानक येऊन आज घोळच केलाय पावसाने! का कंपनीच्या बस ने येतेस?", विलास.

" नको सर, मी जाईन, १० मिनिटावर तर आहे माझी रूम! आणि ट्रेनी ला बस कुठे अलाऊड आहे? गेटवर थांबते थोडं आणि पाऊस कमी झाला कि जाईन."

"बरं बरं, जायचं का आता? बस जाईल माझी. पण तू मात्र जास्त वेळ थांबू नकोस. सरळ ऑटो करा ना नाहीतर. " विलास

" हो सर, जाईन मी नीट, एवढ्या कमी डिस्टन्स ला ऑटोवाले येत नाहीत." अक्षदा बोलता बोलता बॅगमध्ये काहितरी शोधात होती.

"अगं, चलतेस का आता, उशीर होतोय. केबिन लॉक करायचं आहे मला."

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान