रसग्रहण - बालकवी - फुलराणी (निवडक बालकवी) भरत.

Submitted by भरत. on 5 March, 2018 - 12:44

आनंदी-आनंद गडे!
इकडे, तिकडे, चोहिंकडे,
वरती-खाली मोद भरे,
वायूसंगे मोद फ़िरे,
नभांत भरला,
दिशांत फ़िरला,
जगांत उरला,
मोद विहरतो चोहिंकडे,
आनंदी-आनंद गडे!

या ओळींनी अगदी लहानपणी बालकवींशी ओळख झाली.

सोनेरी सूर्यकिरण, हंसणारी कौमुदी, आनंदात गाणारी संध्या, रंगलेले मेघ - निसर्गाच्या या अनेक सुंदर रूपांतच रमणारे आणि आनंद शोधणारे बालकवी. नुसताच आनंद नाही, तर सौंदर्याची आणि दिव्यत्वाची आस धरलेले बालकवी. कवितेच्या अखेरच्या चरणात स्वार्थाच्या बाजारात रडणार्‍या पामरांना आनंद मिळतच नाही. तो स्वार्थाला सोडून जातो, असं म्हणून त्यांनी कवितेवर विचाराच्या प्रश्नाची सोयही करून ठेवलेली.

मानवी व्यवहारांत न रमणारा, निसर्गात गुंगलेला, तिथल्या अनेक घटकांत चैतन्य फ़ुंकून त्यांना आपल्या काव्यविश्वात वसवणारा हा कवी ही त्यांची ओळख त्यांच्या बहुतेक कवितांत कायम राहते.

निसर्गाचे वर्णन करताना त्यांच्या मनाला कुंचले फ़ुटतात. त्यातही ते वर्णन गतिशील आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर अ‍ॅनिमेशनसारखं.

गिरिशिखरे , वनमालाही
दरीदरी घुमवित येई!
कड्यावरुनि घेऊन उड्या
खेळ लतावलयी फ़ुगड्या.
घे लोळण खडकावरती,
फिर गरगर अंगाभंवती;
जा हळुहळु वळसे घेत
लपत छपत हिरवाळींत.
पाचूंची हिरवी राने
झुलव गडे , झुळझुळ गाने!
वसंतमंडप वनराई
आंब्याची पुढती येई.
श्रमलासी खेळुनि खेळ
नीज सुखे क्षणभर बाळ। (निर्झरास)

या ओळींतील लय-गतीही निर्झराच्या प्रवासासोबत बदलते. डोंगरदर्‍यांतून उड्या मारत येणारा प्रवाह हिरवळीत हळूहळू वळसे घेतो. आमराईशी पोचेतो तो दमलेलाही असतो. हे एक नादचित्रच आहे.
अरुण या कवितेत पूर्वक्षितिजावर चाललेले रंगांचे कौतुक वर्णिताना त्यांनी अशीच लड लावलीय.

यमक-अनुप्रासांनी नटलेल्या त्यांच्या कवितेत एकाच दृश्याचे वर्णन करताना दिलेल्या अनेक उपमांच्या लडींनी ज्ञानेश्वरांच्या दृष्टांतांची आठवण व्हावी. फरक हा की तिथे मानवी जीवनाचे मर्म सांगताना ज्ञानेश्वर निसर्गातले दृष्टांत देतात , तर इथे बालकवी निसर्गातल्या घटितांवर मानवी कृत्यांचा आरोप करतात.

अरुण चितारी नभ:पटाला रंगवितो काय,
प्रतिभापूरित करी जगाला कीं हा कविराय?
की नवयुवती उषासुंदरी दारी येवोनी
रंगवल्लिका रम्य रेखिते राजस हस्तांनी?
दिवसयामिनी परस्परांचे चुंबन घेतात---
अनुरागाच्या छटा तयांच्या खुलल्या गगनांत!
स्वर्गीच्या अप्सराच अथवा गगनमंडलांत
रात्रीला शेवटची मंगल गीते गातात?
किंवा ‘माझी चोरुनि नेली मोत्यांची माला’
म्हणुनि नभ:श्री रुसली आली लाली गालांला?...

...प्रगट जाहले सोन्याचे पुष्पक किंवा हे?
की सोनाची पुरी द्वारका लखलखते आहे?

आपल्या अवतीभवतीच्या जगापासून, मानवी व्याहारापासून दूर निसर्गात मन रमलेल्या बालकवींच्या कवितेत संध्यासमयीची, रात्रीची वर्णनेही अधिक येतात. संध्यारजनी कवितेत ते

रजनीदेवी वैभवशाली तू अमुची राणी

असं म्हणतात.

....काळ्या अंधारात खेळते विश्व लपंडाव
तार्‍यांवरती बसून बघती ते कौतुक देव.

आद्यदेवते, रजनी, ये , ये, निजले श्रीभगवान,
ब्रह्मांडाचा भार माउली तुजविण साहिल कोण?
असे ’आवाहन’ ते रात्रीला करतात.

निसर्गाचे गतिमान वर्णन करणार्‍या शब्दकुंचल्यानेच ते थकलेल्या, शिणलेल्या , उदासवाण्या जगाचेही प्रत्ययकारी चित्र रेखाटतात.

श्रमले दमले वणवण फ़िरुनी गगनी रविकरजाल
शिणल्या सुंदर सांध्यदेइचे हो घर्मांकित भाल
शिणले मारुत, खिन्न पयोधर दुर्धर साहुनि ताप
शून्य गिरिदरी, जर्जर निर्झर गळती आपोआप

व्यवहाराकडे पाठ फिरवली म्हणून त्यांना जनाचा बोल लागतो.

वेडा झाला, म्हणा हवे तर उठला जनतेतुनी
कवी हा तन्मय निजगायनी
सुखदु:खाच्या व्यामोहाच्या सुटला फेर्‍यांतुनी
नसे जग त्याच्या ध्यानीमनी
स्वार्थ विसरला, अविरत फिरतो गुंगत विजनी , अनी
म्हणुनिया निंदो याल कुणी (कवि)

कधी कविमन त्याची पर्वा करत नाही.

जगाचे बंध कोणाला? - जगाला बांधला त्याला;
मला जो थांबवी ऐसा - जगीं निर्बंध ये कैसा? (कवीची इच्छा)

पण कधी - स्वर्गलोकात खेळणारी देवाची लाडकी कविबाळे, कुणा तीव्र विषारी वायूच्या आघाताने कोसळून खाली भूमिगर्तेत आली. त्यांचे ...

दिव्य तेज मालवुनी
पाषाण क्षणार्थी झाला!
हा प्रभाव या जगताचा
दोषावे यांत कुणाला?

अशी तीव्र खंत व्यक्त करते.

कवींचे उद्गार म्हणजे तरी काय?

जीवास आग लागोनी
तळमळती माशावाणी
स्मरुनी ती पूर्वकहाणी
फ़ोडितात टाहो चित्ती - बाळे ती खेळत होती.

परि त्याच दीर्घ किंकाळ्या
ठरतात जगाची गाणी!
नि:श्वास आंत जे कढती
ती स्फ़ूर्ति लोक हा मानी.

अगतिक अवस्थेत कवीने फोडलेल्या दीर्घ किंकाळ्यांना लोक काव्य मानतात. त्यांना कवीचे अंतःकरण कळणे नाही.

फ़ुलराणी आणि तू तर चाफ़ेकळी या दोन प्रेमकविता. दोन्ही मराठी नाटकांत आल्या. फ़ुलराणी ही पुलंना इतकी आवडे की "वॉल्ट डिस्नेने या सबंध कवितेचेच आपल्या पद्धतीने मानुषीकरण करावे असे त्यांच्या मनाने घेतले. या कवितेचे इंग्रजी भाषांतर करून वॉल्ट डिस्नेकडे पाठवावे, अशी विनंती त्यांनी मर्ढेकरांना केली होती." दोन्ही कवितांतल्या- काव्यनाट्यांतल्या नायिका अबोध आहेत.

प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला.
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फ़ुलराणीला?

’साजणी’ अशी हाक मारणार्‍या नृपाळाला चाफ़ेकळीची नायिका आपल्या भावाबद्दल सांगतेय!
मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा.
घेउनि हाती गोड तिला त्या कुरणावरती फ़िरे-
भाऊ माझा...

फ़ुलराणीवर ’पुरा विनोदी संध्यावात’ , रात्रीचे ग्रहगोल यांनी जादूटोणा केला. रात्रीची प्रणयदृश्ये पाहून फ़ुलराणी प्रणयचिंतनात विलीन झाली, विरहार्ताही झाली. आणि दुसर्‍याच दिवशी सकाळीच तिचे लग्नही लागले.
पण चाफ़ेकळीने मात्र राजाची ’ये चल माझ्या घरी’ ही मागणी सहजी स्वीकारली नाही.

सांज सकाळी हिमवंतीचे सुंदर मोती पडे
हात लाविता परि नरनाथा ते तर खाली पडे

सकाळी पानाफ़ुलांवर दंवबिंदू दिसतात, पण त्यांना स्पर्श करताच ते फ़ुटून जातात. चाफ़ेकळीचं हे उत्तर अपूर्ण राहिलेलं पाहून आपण निरखीत असलेली काचेची एखादी सुंदर वस्तू आपल्या समोरच खळ्ळकन फ़ुटून जावी, तसं वाटलेलं ही कविता पहिल्यांदा वाचली तेव्हा. बालकवींच्या अशा कितीक कविता अपूर्ण राहिल्यात.

"लक्ष्मीबाई, मला ज्योतिषाने आज अपघाताने मी मरणार असे सांगितले आहे........... मला मेलेच पाहिजे. ते भविष्य खोटे कसे ठरणार?"
भविष्य खरे करण्याचा हा बेत ऐकून लक्ष्मीबाईंनी त्या रात्री ठोंबर्‍यांना दृष्टीपुढून हालू दिले नाही. पण पुढे पाच वर्षांनी ते खरे ठरले.

बोलवितात । विक्राळ यमाचे दूत,
गिरिशिखरावर आ पसरोनी,
काळ्या अंधारांत दडोनी,
किंवा पडक्या बुरुजावरुनी,
शब्द येतात । ‘चल नको बसू जगतांत.’ (यमाचे दूत)

हे जग सोडून निघून जायची इतकी घाई त्यांना लागली होती? पलीकडल्या हाका त्यांना ऐकू येत होत्या की स्वतःच निर्मिलेल्या कल्पनाविश्वात गुरफटून त्यातून बाहेर पडण्याचा अन्य कोणता मार्ग सुचेनासा झाला?

लपवू दिग्वदनी मुख होइल तरी मजला सुख?
ये काळा, ध्यान तुझे मात्र मला लागले!

विस्मृतिमधि बुडवि जीव, तव हृदयी हृदय ठेव
तू आतां आप्त - जगा संबंधचि संपला! (काळास)

आपण या जगताचे नाही, ही जाणीव दूर सारण्यासाठीच की काय बालकवींचे मन निसर्गात, त्याच्या सौंदर्यात, काव्यात रमत राहिले. दिव्यत्वाचा शोध घेत राहिले. इथे आलोच आहोत, तर

सुंदरतेच्या सुमनावरचे दंव चुंबुनि घ्यावे,
चैतन्याच्या गोड कोंवळ्या उन्हांत हिंडावे (बालविहग)

परंतु,

हाय! सुटेना दृढ देहाची परि बसली गांठी
दिव्यानंदी म्हणुन उमाळा दु:खाचा दाटे
सत्यहि जो आनंद कल्पनामय केवळ वाटे

अशी अवस्था प्रौढत्वाकडे वाटचाल करताना होत राहिली.

शैशव, बालपण मागे सोडून प्रौढत्वात जाणे बालकवींना नको होते का?

प्रेमपूर्ण मधु बाल्य अहा ते
तुम्हांसंगती येइल येथे
मीही सोडुन तारुण्याते
होइन बाल पुन्हा

...त्या बाल्याच्या सीमेवरती
दुष्ट मत्सरी जगतापरते
प्रेमाचे साम्राज्य सभोति
बनवोनी राहू. (सुकलेली फ़ुले)

प्रौढत्वाच्या , व्यवहारी जगाच्या झळा येऊ लागल्या, तशी कविमनाची तगमग होऊ लागली.

हृदयाची गुंतागुंत कशी उकलावी?
ही तीव्र वेदना मनामनाची ठाई,
अंधार दाटला अपार भरला पूर,
परि पार तयाच्या कोण मला नेणार?

आतापर्यंत मनाला रिझवणारी फ़ुले, पक्षी, वृक्षलता, निर्झरही हेही रुचेनासे झाले.

मज रुचे न किमपी व्यापकता गगनाची
ती अनंततेची किरणे ग्रहगोलांची

कर्तव्य आणि वृत्ती, बुद्धी आणि चित्त, वैराग्य आणि प्रीती यांचा झगडा होऊ लागला. त्यांतून वाट दाखवणाराही कोणी दिसेना.

हा हाक मारितो उठवा मजला कोणी,
या वर निद्रेच्या दुस्तर गहनांतूनी
दिन पक्षमास ऋतु वर्ष भराभर गेले
हे रक्त जसेच्या तसेच सांकळलेले

ईश्वराबद्दलही मन शंका घेऊ लागले.

अज्ञाने परि वाहिले निजमनी ज्या ईश्वरालागुनी,
साह्या त्या समयास तो तरि असो येईल का धांवुनी?
नान प्रश्न असे उठून करिती जेव्हां मना व्याकुळ
त्यांचे शांत करील अद्भुत असे आहे कुणा का बळ?

पण याच अवस्थेत काही नितांतसुंदर अशा आत्मगत कविता बालकवींच्या हातून लिहिल्या गेल्या.

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला

सुंदर सगळे, मोहक सगळे
खिन्नपणा परि मनिचा न गळे
नुसती हुरहूर होय जिवाला - का न कळे काही! (निराशा)

बालकवींच्या प्रतिभेतल्या कितीक शक्यता नुकत्याच आकारू लागल्या होत्या आणि त्या पुरत्या स्पष्ट होण्याआधीच विरून गेल्या!

भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनि पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो. (पारवा)

त्या उजाड माळावरती
बुरुजाच्या पडल्या भिंती
ओसाड देवळापुढती
वडाचा पार -अंधार दाटला तेथ भरे भरपूर (खेड्यांतील एक रात्र)

कधीकाळी आनंदी-आनंद गडे म्हणत नाचणार्‍या वार्‍याचे, निर्झराचे भूत होऊन शून्य मनाच्या घुमटांत फ़िरू लागले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिलंय.

मर्ढेकरांनी फुलराणीचं भाषांतर कसं केलं असतं म्हणून जरा धास्तीच वाटली. Happy

हे रसग्रहण नाही, खरं तर! संयोजकांनी शीर्षक कशा पद्धतीने द्यायचं, त्याबद्दल निर्देश दिले होते, म्हणून रसग्रहण म्हटलंय.

आतापर्यंत कवितासंग्रह कधी सलग वाचला नाही. मूड लागेल तशा कविता वाचून पॅसिव्हली त्यातलं जे डोक्यात शिरेल आणि भावेल ते घेऊन पुढे जायचं असंच वाचन असे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने निवडक बालकवी (संपादक - कुसुमाग्रज) सलग, तेही दोनदा वाचले. ( संयोजकांचे आभार Happy ) रा. शंं वाळिंबेंची प्रस्तावना वाचली. ती तितकीशी आवडली नाही. लिहिताना त्यातलं काही डोक्यात येंणार नाही, असा प्रयत्न होता.
"बालकवी -तीन संदर्भ" हे प्रा. रमेश तेंडुलकरांचं पुस्तक कधीचं घेतलेलं. तेही आता वाचलं. आवडलं.

आताच निवडक केशवसुतही सलग वाचलं. त्याच्या प्रस्तावनेतून कळलं की वामन देशपांडे संपादित 'निवडक बालकवी' (१९९०) सुद्धा आहे.

वरच्या लेखनात न लिहिलेली एक गोष्ट :
बालकवींची "तृणपुष्पास" ही कविता आहे. इंदिरा संतांच्या गवतफुला रे गवतफुला
या कवितेत रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला हे वाचताना शब्दांची आणि नादांची पुनरावृत्ती बालकवींची आठवण करून देते.

सुंदर ...