या उन्हाळ्यात स्वत:हून पोहायला असे शिका (Step by step instructions)

Submitted by अतुल. on 7 February, 2018 - 03:52

घता बघता यावर्षीचा उन्हाळा सुरू पण झालाय. थोड्याच दिवसात अनेक ठिकाणचे उन्हाळी स्वीमींगपूल सुरु होतील. मागच्या उन्हाळ्यात प्रशिक्षक किंवा अन्य कुणाचीही मदत न घेता मी पोहायला शिकलो. मागे कुठल्याश्या एका धाग्यावर त्यासंबंधी ओझरते लिहिले आणि नंतर त्यावर तपशिलात लिहायचे राहून गेले. बघता बघता हा उन्हाळा तोंडावर आला. तर म्हटले लिहून काढू. कोणाला उपयोगी आले तर खूप आनंद होईल यासाठी हा लेखनप्रपंच.

असो. सुरवातीलाच एक महत्वाची सूचना: मी कोणी व्यावसायिक प्रशिक्षक नाही. इथे दिलेली पद्धती आणि स्टेप्स मी स्वत: शोधलेल्या आहेत आणि त्या जास्तीत जास्त सुरक्षित असतील याची मी काळजी घेतलेली आहे. तरीही या पद्धतीद्वारे पोहायला शिकणाऱ्या व्यक्तीने या स्टेप्सचे स्वत:च्या जबाबदारीवर अनुकरण करावयाचे आहे याची कृपया नोंद घ्यावी.

पूर्वतयारी:

१. हि पद्धती जलतरण तलाव (Swimming Pool) साठीच बनवली आहेत. तेंव्हा जवळपासचा Swimming Pool शोधा कि जिथे दिवसा एक तासभर तुम्हाला जाता येईल. हे आवश्यक आहे. स्विमिंगपूल व्यतिरिक्त अन्य ठिकाणी (नदी, विहीर, धरण, तलाव, समुद्र इत्यादी) या पद्धतीचा वापर करून शिकणे अतिशय धोकादायक आहे. तसेच स्विमिंगपूल मध्ये रात्रीच्या वेळी या पद्धतीने शिकणे सुध्दा सुरक्षित नाही.

२. तुमचे वय अठराहून जास्त असणे आवश्यक, तसेच उंची कमीतकमी स्विमिंगपूलमधील उथळ भागातील (चार फुट) पाण्यात पाय न डगमगता स्थिरपणे उभे राहता येईल इतकी असावी (शक्यतो छातीइतकेच पाणी). बहुतेकांची ती असते. उंची कमी असेल अथवा पाणी छातीपेक्षा बरेच वर येत असेल तर या पद्धतीचा अवलंब करू नये.

३. स्विमिंगपूल मधील उथळ भागाकडील साईडबार (ज्याला धरून पोहायला शिकवले जाते) सुस्थितीत आहे याची खात्री करा. तो तिथे नसेल अथवा असून सुस्थितीत नसेल तर या पद्धतीचा वापर करू नका.

४. स्विमिंग गॉगल आणि कॅप असल्यास उत्तम. किंबहुना ते आवश्यकच समजा. त्याने शिकण्याची क्रिया सुलभ होते. डोळ्यात क्लोरीनचे पाणी जाणे अथवा केसातून सतत तोंडावर पाणी येत राहणे यामुळे आत्मविश्वास ढळू शकतो. म्हणून हे आवश्यकच (आजकाल तर या वस्तू शंभर दीडशे रुपयेपर्यंत अनेक दुकानांतून उपलब्ध झाल्यात. ऑनलाईन सुद्धा मिळू शकतात. तेंव्हा, पोहायला शिकायचे असेल तर त्या खरेदी कराच)

५. जरी "कोणाच्याही मदतीशिवाय" असा उल्लेख मी वरती केला असला तरी खबरदारी म्हणून एखादी व्यक्ती बरोबर असल्यास उत्तम होईल. त्या व्यक्तीने पाण्यात उतरायची गरज नाही. फक्त आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास तुमच्यावर लक्ष असावे म्हणून त्यांची उपस्थिती आवश्यक. आणि हे शक्य नसेल व एकटेच जावे लागत असेल तर त्या स्वीमिगपूलावर निदान लाईफसेव्हर गार्ड तसेच अन्य काही पोहणारे आहेत याची खात्री करा. आजूबाजूला कोणीहि नसलेल्या सुनसान पूल मध्ये या पद्धतीने एकटेच शिकायचा प्रयत्न करू नका.

६. आणि शेवटचे पण महत्वाचे, हे तुम्हाला सांगायची तशी आवश्यकता नाहीच तरीही नोंद करतो, तब्येतीची कोणतीही तक्रार नसावी (उदाहरणार्थ दमा, अस्थमा, हृदयविकार, धाप लागणे, फिट/चक्कर येणे, गरगरणे, विषाणूजन्य आजार इत्यादी).

वरील सर्व गोष्टींची पूर्तता झाली असेल तर जास्त वेळ न घालवता चला आता थेट पाण्यातच उतरू. डोक्याला कॅप आणि डोळ्यावर गॉगल घालून स्विमिंगपूलच्या उथळ बाजूच्या जिन्याने पाण्यात अलगद उतरा आणि उथळ भागातीलच साईडबारला पकडून उभे राहा.

आपण पोहायला शिकण्याचे चार टप्पे केले आहेत. एक टप्पा पूर्ण आल्याशिवाय पुढच्या टप्प्यात सांगितलेले करू नका.

पहिला टप्पा: पाण्याशी मैत्री अथवा शरीराला पाण्याची सवय होणे:

पोहायला येत नसेल तर जितके वय वाढेल तितके आपल्याला पाण्यात उतरण्याची भीती वाढतच जाते. कारण शरीराला पाण्यात पूर्ण बुडून जाण्याची सवय नसते. म्हणून पहिल्या टप्प्यात हि सवय आपण लावून घेऊ. साईडबारला धरून उभे असताना तोंडाने श्वास पूर्ण आत घ्या. आता श्वास तसाच आत रोखा आणि बारला धरूनच हळूहळू गुडघे वाकवत छाती, चेहरा व पूर्ण डोके पाण्याखाली राहील इतके खाली या. काही केल्या बारची पकड मात्र सोडू नका त्याचबरोबर खालून पाय उचलले जाणार नाहीत याची पण काळजी घ्या. गॉगल असल्याने डोळे उघडेच ठेवा. त्यामुळे भीती वाटणार नाही. पण कान सुद्धा पाण्यात असल्याने व त्यामुळे बाहेरचे कोणतेही आवाज ऐकायला येणे बंद झाल्याने अगदी सुरवातीला थोडी भीती वाटू शकते. या टप्प्यात हीच भीती आपल्याला घालवायची आहे. जितका वेळ श्वास रोखून धरू शकाल तितका वेळ तसेच बारला धरून पाण्याखाली राहा. नंतर वर या आणि नाकाने श्वास बाहेर सोडा. पंधरा वीस सेकंदानी हि क्रिया पुन्हा एकदा करा. तोंडाने हवा आत घ्या व पुन्हा तसेच खाली जा. श्वास रोखून धरा. वर या. नाकावाटे श्वास बाहेर सोडा. इथे पाण्याची भीती घालवण्याबरोबरच तोंडाने हवा आत घेणे आणि नाकावाटे सोडणे हि सवय सुद्धा आपण मुद्द्दाम लावून घेणार आहोत. कारण याचा नंतर आपल्याला उपयोग होणार आहे.

श्वास नियंत्रित करून पाण्यात डोके बुडवून राहण्याची हि क्रिया वारंवार करत राहा. जितका वेळ श्वास रोखून पाण्यात राहू शकाल तितके चांगले. कालांतराने पाण्याची भीती निघून जाईल कि पहिला टप्पा संपला. पण घाई नको. पहिले पाच सहा दिवस केवळ हेच केलेत तरी हरकत नाही. एकदा हि सवय झाली कि जर जमत असेल तर पाण्यात असतानाच श्वास नाकावाटे सोडत सोडत वर येण्याचा सराव करा. वर असताना तोंडावाटे हवा आत घेऊन पाण्यात असतानाच श्वास सोडत सोडत डोके वर आणण्याची हि सवय आपल्याला पुढे खूपच उपयोगी पडणार आहे.

थोडक्यात: तोंडावाटे हवा आत घ्या व बारला धरूनच हळूहळू खाली बसा व डोके पाण्याखाली घ्या. श्वास सोडण्याची वेळ आल्यावर नाकावाटे श्वास सोडतच वर या व डोके पूर्ण पाण्याबाहेर काढा.

दुसरा टप्पा: पाण्यावर तरंगणे:

एकदा श्वास रोखून पाण्यात डोके बुडवायला आणि श्वास सोडत पाण्यावर यायला शिकलात कि पाण्याची भीती गेली. पुढचा टप्पा म्हणजे श्वास रोखलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगणे. यासाठी पहिल्या टप्प्यात जे केले तसेच करून बारला धरून पाण्याखाली जा. आता खाली असताना हळूहळू पाय उचला. हात मात्र बारला घट्ट पकडलेलेच पण ताठ राहू देत. हात वाकवू नका. आता दोन्ही पाय उचलल्यानंतर बारला सरळ हातानी धरलेल्या अवस्थेत तुम्ही पाण्यात पालथे तरंगू लागाल. डोके अजून पाण्याखालीच असेल. डोके वर काढू नका, डोळे बंद करू नका. बस्स श्वास रोखलेल्या अवस्थेत बारला खांद्यापासूनवर ताणलेल्या सरळ हातानी धरून पालथे तरंगत राहा. आता श्वास सोडण्याच्या वेळी नाकावाटे श्वास सोडत डोके पाण्याबाहेर काढा. आता इथे एक गम्मत होईल. बारला धरून जेंव्हा तुम्ही डोके पाण्यावर आणाल तेंव्हा तुमचे पाय आपसूकच खाली जातील. पण हे नॉर्मल आहे. श्वास रोखून बारला धरून खाली बघत तरंगत राहणे व पुन्हा श्वास सोडत डोके वर काढणे आणि पायांवर उभारणे याचा चांगला सराव होऊ द्या.

एकदा याचा सराव झाला कि हा टप्पा संपला असे नाही. यानंतर या टप्प्यात अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे. ती म्हणजे असे पालथे तरंगत असताना बारचा हात सोडणे. खरे तर यात आपल्याला कौशल्य वापरावे लागेल असे काहीच नाही. फक्त, बारचा हात सोडल्यास आपण पाण्यात खाली तळाला जाऊ किंवा दुसरीकडे अनियंत्रित वाहत जाऊ हि नाहक भीती जी मनात असते तिच्यावर मात करणे इतकेच इथे आहे. बहुतांश मानवी शरीरे हि तरणशील (Buoyant) असतात. तुमचे शरीर खूपच पिळदार, भरीव स्नायूंचे आणि जराही चरबी नसलेले असेल तरच तुम्ही पाण्याच्या तळाला जाल असे विज्ञान सांगते. जगातील ९५% लोकांचे शरीर पाण्यावर आपसूकपणे तरंगू शकते असे संख्याशास्त्र सांगते. त्यामुळे अगदी निर्धास्त राहा. तसेच स्विमिंगपूलचे पाणी वाहते नसते त्यामुळे आपण तरंगत दुसरीकडे जाऊ हि भीती सुद्धा अनाठायी आहे. आपले डोळे उघडे असतात आणि स्विमिंगपूलचा तळ आपल्याला स्पष्ट दिसत असतो. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. तेंव्हा आपण बुडून खाली जाऊ हा विचार मनातून पूर्ण काढून टाका आणि बारचा हात बिनधास्त सोडून द्या. मात्र हात खांद्यापासून वर अगदी सरळ ताठ राहू द्या, तसेच पायसुद्धा ताठ ठेवाय आणि एकंदर सर्व शरीरच ताठ अवस्थेत पालथे तरंगत राहू द्या. अगदीच भीतीवर नियंत्रण नाही राहिले तर चार फूटच पाणी आहे, डोके वर काढले कि पाय आपोआप खाली जातात आणि पट्कन उभे राहता येते हे लक्षात घ्या. काही झाले तरी घाबरून पॅनिक व्हायचे नाही एवढे एकच लक्षात ठेवा. पाणी तुम्हाला वर ढकलून तरंगत ठेवते यावर विश्वास असू द्या. पण तुम्हीसुद्धा पाण्याला सहकार्य करायला हवे. घाबरून गाळण उडाली तर मात्र चार फुट पाण्यात सुद्धा उभे राहता येणार नाही. तेंव्हा या टप्प्याचा मंत्र: अज्जिबात घाबरायचं नाय.

थोडक्यात: तोंडावाटे श्वास आत घेऊन बारला धरून डोके पाण्याखाली करून तरंगत राहा. श्वास सोडण्यासाठी डोके वर घ्या. पाय खाली जातील. नाकाने श्वास सोडा. तोंडाने घ्या. पुन्हा डोके खाली घ्या. पाय पुन्हा वर येतील. हे करण्यात आत्मविश्वास निर्माण झाला कि डोके खाली घेतले असतानाच बारचा हात बिनधास्त सोडून द्या व हात पाय व संपूर्ण शरीर ताठ करून पाण्यावर पालथे तरंगत राहा. श्वास सोडतेवेळी डोके वर काढून पाण्यात अलगद उभे राहा व नाकाने श्वास सोडा.

तिसरा टप्पा: तरंगत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे:

वरचे दोन टप्पे पार केलेत कि तुमची पाण्याची भीती पूर्ण नष्ट होऊन तुम्हाला पोहण्याविषयी खूपच आत्मविश्वास निर्माण होईल. हेच महत्वाचे आहे. या तिसऱ्या टप्प्यात आपल्याला फार काही करायचे नाही. दुसऱ्या टप्प्यात असताना बारला सोडून डोके पाण्यात घालून खाली पाहत जसे पालथे तरंगत होतो तसे तरंगत राहायचे. पण यावेळी फक्त हाताने पाणी वल्हवायचे इतकेच. यासाठी डोक्याच्या वर धरलेले हात तसेच आडवे कमरेच्या दिशेने आणा. हाताच्या पंजाच्या सहाय्याने (बोटे एकमेकांना चिकटलेली) पाणी पायांच्या दिशेने मागे सारले जाईल व आपण डोक्याच्या दिशेने पुढे जाऊ. हे तसे अवघड अजिबात नाही. तुम्ही आपोआप करू शकाल. फक्त काळजी इतकीच घ्यायची कि तरंगत तरंगत स्विमिंगपूलच्या खोल भागात जायला नको. हे अतिशय महत्वाचे आहे कारण आपण श्वास रोखून धरलेला असतो व तो कोणत्याही क्षणी सोडवा लागू शकतो. त्यासाठी डोके वर करून पाय टेकून उभे राहावे लागते. त्यामुळे खाली बघून हात मारत मारत स्विमिंगपूलच्या खोल भागात जाऊ नये याची काळजी घ्या. यासाठी आपली तरंगत जाण्याची दिशा स्विमिंगपूलमध्ये उथळ भागातच आडवी असेल असे पहा. त्याचबरोबर हात मारून पुढे जोरात जात असताना आपले खाली पाहत असलेले डोके स्विमिंगपूलची भिंत अथवा अन्य वासू वा आजूबाजूला इतर कशास धडकू नये याची पण काळजी घ्या.

व्वा! या टप्प्यात तुम्हाला पोहायला आले असे म्हणायला हरकत नाही. फक्त श्वास जेवढा आहे तेवढेच अंतर जाता येईल इतकी मर्यादा या पोहण्याला असेल. काही हरकत नाही. पेट्रोल भरल्यासारखे भरपूर हवा तोंडावाटे आत घ्या. मग स्वत:ला पाण्यात पालथे झोकून द्या आणि श्वास असेपर्यंत हातानी वल्हवत बिनधास्त जा. पेट्रोल म्हणजेच श्वास संपला कि डोके वर काढून पाण्यात उभे राहा आणि नाकावाटे श्वास सोडून द्या. असे खाली तळाकडे बघत बघत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे हा खूप सुंदर अनुभव असतो. पक्षी जसे पंख हलवत हवेत तरंगत जातो व खालची धरा त्यास दिसते तसे इथे आपली अवस्था पक्षाप्रमाणेच असते. फक्त ते हवेत तरंगतात तर आपण पाण्यात. इतकाच फरक.

थोडक्यात: शरीर ताठ ठेऊन श्वास आत घेतलेल्या अवस्थेत पाण्यावर पालथे तरंगत असताना आडवे वल्हे मारल्याप्रमाणे हाताची हालचाल करा व डोके पाण्यात असलेल्या अवस्थेतच पाण्याला मागे रेटून शरीराला पुढे गती द्या. श्वास सोडण्याच्या वेळी डोके वर काढून पाय खाली जाऊ द्या व पाण्यात उभे राहा.

चौथा टप्पा: तरंगत जात असताना श्वासोच्छवास करणे:

तिसऱ्या टप्प्यात एका श्वासात जाण्याईतके पोहायला आपण शिकलो. पण इतके अर्थातच पुरेसे नाही. कारण तुमचा छातीचा भाता कितीही मोठा असला तरी एका श्वासात जास्तीत जास्त काही फूट इतकेच जाता येईल. मग पुन्हा उभे राहायचे. अर्थात पोहायला येऊनही अजूनही आपण स्विमिंगपूलच्या खोल भागात जाऊ शकत नाही (कारण तिथे पाय न टेकल्याने उभे राहता येणार नाही). याला कारण पोहताना आपल्याला अजून श्वास घेता येत नाही. श्वास घेण्यासाठी आपल्याला उभे राहावे लागते. म्हणूनच या टप्प्यात पोहता पोहता श्वास कसा घ्यायचा ते आपण शिकणार आहोत.

तुम्हाला सांगितल्यास विश्वास बसणार नाही पण वरचे तीन टप्पे मी महिन्याभरात पार केले, पण हा एक शेवटचा टप्पा पार करायला मात्र मला अजून तीन-चार महिने घालावे लागले. याला कारण म्हणजे पोहताना श्वासोच्छवास करण्याचे प्रभावी व सोपे तंत्र मला काही केल्या अवगत होत नव्हते. यासाठी मी अनेक युट्युब व्हिडीओज पाहिले, पोहायला येणाऱ्यांना सल्ला विचारला पण कशाचा काहीच फायदा नाही. मला त्यातले एकही तंत्र जमत नव्हते. ज्यांच्या शरीराची नैसर्गिक तरणशीलता (Natural buoyancy of body) चांगली आहे त्यांना डोके वर काढून श्वास घेणे व पुन्हा डोके आत घेणे लगेच जमते. तुम्ही याबाबत लकी असाल तर तुम्हालाहि हा टप्पा लगेच जमून जाईल. पण मी लकी नव्हतो. मी डोके बाहेर काढले तर माझे पाय खाली जात, शरीर बुडायला सुरवात होई आणि श्वास सोडून पुन्हा हवा आत घेईपर्यंत डोके पण पाण्यात जात असे. पाय खाली जाऊ नयेत म्हणून ते हलते वगैरे ठेऊन पाहिले, तसेच डोके पूर्ण वर न घेता एका बाजूने फक्त नाक व तोंड वर घ्यायचे (Freestyle मध्ये घेतात तसे) इत्यादी विविध प्रयोग करून पाहिले. पण व्यर्थ. हे सगळे प्रयोग करण्यातच खूप काळ गेला.

पोहायला शिकणाऱ्या (त्यातल्या त्यात माझ्याप्रमाणे उशिरा शिकणाऱ्या) अनेकांची हीच अडचण आहे असे मला काही जणांशी बोलताना जाणवले. तुमची पण हीच अडचण असेल तर आता तुम्हाला मात्र तितका वेळ घालवावा लागणार नाही. कारण इथे श्वासोच्छवास करण्याची Dog Paddling पद्धतीवर आधारित मी स्वत: निर्माण केलेली पध्द्त सांगत आहे ती तुम्हाला थेट उपयोगी पडेल. (Dog Paddling मध्ये डोके सतत वर राहिल्याने पाय आपसूक खाली जातात हि माझी अडचण होती हे लक्षात घ्या. शिवाय Dog Paddling मध्ये डोके सतत पाण्याच्या वर राहिल्याने पोहताना पाण्याचा विरोध वाढतो व म्हणून लवकर थकायला होते. म्हणून मला त्यामध्ये बदल करावा लागला)

या पद्धतीत सगळी मदार आहे ती हातांच्या योग्य पद्धतीने केलेल्या हालचालींवर. तिसऱ्या टप्प्यात हातांची आडवी हालचाल करून वल्हे मारल्याप्रमाणे पाण्याला मागे रेटत पुढे जायचे आपण पाहिले. इथे तसे न करता आपल्याला हातांची हालचाल उभी करावयाची आहे. सायकलचे पायडल मारताना पायांची जशी हालचाल आपण करतो अगदी तशीच हालचाल पण इथे हातांची करायची आहे. पायडल मारल्याप्रमाणे दोन्ही हात पाण्यातच हलवायचे. म्हणजे एक हात मागे असेल तर दुसरा पुढे यायला हवा. आणि जेंव्हा दुसरा मागे जाईल तेंव्हा पहिला पुढे. असे सायकलच्या पायडल सारखेच उभे हात पाण्यातल्या पाण्यातच हलवायचे. पाण्याच्या वर हात कदापि आणायचा नाही. डोके मात्र टप्पा तीन प्रमाणेच खाली पाहिलेल्या अवस्थेत पाण्यात बुडालेलेच राहील. आता इथे आपल्याला ट्रिक करायची आहे. वरून खाली येणाऱ्या हाताचे तळवे पूर्ण उघडा (पण बोटे एकमेकांना चिकटलेलीच हवीत). जेंव्हा उजवा हाताचा तळवा पायडल मारल्याप्रमाणे वरून खाली पाणी रेटत असतो, आपल्याला नेमक्या त्याच रेट्याचा वापर करून डोके वर काढायचे आहे. पण जास्त वर घेऊ नका. फक्त नाक व तोंड वर येईल इतकेच. अशा रीतीने डोके वर आल्यास नाकावाटे श्वास सोडून तोंडावाट पट्कन जितकि येईल तितकी हवा आत घ्या. हे करण्यासाठी दोन सेकंदाचा अवधी पुरेसा आहे तो आपल्याला उजवा हाताचा तळवा पाण्याला खाली रेटत असताना अगदी पुरेपूर मिळतो (तुम्ही जर डावखुरे असाल तर इथे तुम्हाला उजव्या ऐवजी डाव्या हाताचा वापर करावा लागेल). ये हुई ना बात! हि ट्रिकच महत्वाची आहे. तिच्यामुळे तोंडाने श्वास घेणे, डोके पाण्याखाली घेणे, उजव्या हाताने पाणी खालून मागे रेटने, ते रेटत असताना डोके वर काढून पटकन नाकाने श्वास सोडणे व तोंडाने आत घेणे, व पुन्हा डोके पाण्याखाली घेणे असा एक रिदमच तयार होतो ज्यायोगे आपण श्वासोच्छवास करत पोहायला लागतो. वाचताना हे खूप सोपे असेल असे वाटते पण प्रत्यक्षात ते इतके सोपे नाही. पण अथक प्रयत्न करीत राहिलात तर अजिबात अवघड पण नाही. तेंव्हा पहिल्या काही प्रयत्नात जमले नाही तर सराव सोडू नका. इथे जिद्द आणि चिकाटी अत्यंत महत्वाची आहे हे लक्षात ठेवा.

थोडक्यात: तिसऱ्या टप्यात सराव केल्याप्रमाणे श्वास आत घेऊन खाली डोके घालून तरंगत असताना सायकलच्या पायडल प्रमाणे हातांची उभी हालचाल करा. पण हात पाण्याच्या वर येऊ देऊ नका. जेंव्हा उजव्या (तुम्ही डावखुरे असाल तर डाव्या) हाताचे पायडल (पसरलेला तळवा) पाण्याला खाली रेटत असते तेंव्हा त्या रेट्याचा वापर करून डोके हळूच पाण्याच्यावर काढा. मिळालेल्या दोनेक सेकंदांच्या अवधीत नाकाने श्वास सोडून तोंडाने पुन्हा हवा आत घ्या. डोके पुन्हा पाण्याखाली घ्या व पुन्हा स्विमिंगपूलच्या तळाकडे खाली पाहत राहा. या टप्प्यात चिकाटी व प्रयत्नांचे सातत्य लागेल.

---x---

हुर्रेऽऽऽ... यायला लागले एकदाचे पोहायला. पण इतक्यात खोल भागात जाऊ नका. श्वासोच्छवास करत उथळ भागातच सराव करत राहा. सतत काही मिनिटे पाय न टेकता पोहायला आल्याखेरीज खोल भागात जाऊच नका. जेंव्हा जाल तेंव्हा पोहायला येणाऱ्या कोणालातरी आधी कल्पना द्या मगच जा. पहिल्यांदा खोल भागात जाणे हा अविस्मरणीय अनुभव असतो. तो तुम्ही कधीच विसरणार नाहीत. पण एकदा खोलगट भागात पोहू लागलात तर याचा अर्थ तुम्हाला लगेच नदीत किंवा तलावात वगैरे पोहायला येईल असे नव्हे. यापुढे सुद्धा खूप टप्पे आहेत विविध पद्धती आहेत. पण या पद्धतीने स्विमिंगपूल मध्ये पोहायला शिकलात हे हि नसे थोडके.

स्वत:हून एखादी गोष्ट शिकणे यात एक अवर्णनीय आनंद असतो. त्यात आणि जी गोष्ट "लहानपणीच शिकायला हवी" असे वारंवार ऐकायला मिळते ती जर आपण मोठेपणी स्वत:हून शिकली तर होणारा आनंद अवर्णनीय. त्यामुळे कमरेइतक्या पाण्यात उतरायला घाबरणारा मी, एकदा मनाने घेतले आणि आपल्याआपणच पोहायला शिकलो आणि जेंव्हा प्रथमच स्विमिंगपूलच्या सहा फुट खोल भागात पोहत जाऊन आलो तेंव्हाच आनंद काय वर्णावा! Happy

हाच आनंद इतरांनाही मिळावा म्हणूनच हा लेखनप्रयास. आशा आहे कि तुम्ही नक्की प्रयत्न करून पाहाल व पोहायला शिकाल. माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुलजी, धन्यवाद ह्या लेखासाठी.
आमच्या पूलमध्ये प्रशिक्षक तोंड पाण्याबाहेर ठेवून पोहायला शिकवतात. तोंड पाण्याबाहेर, हात आणि पाय एकाच वेळी चालवत पुढे जायचे. माझी प्रगती किकबोर्ड धरून पाय मारत पुढे जाण्यापुरतीच झाली आहे. हातातला बोर्ड सोडून हात मारायला जावे तर तोल रहात नाही, डोके बुडते आणि मग पँनिक व्हायला होते.

मी लहानपणी विहिरीत पोहायला शिकले ( dod peddling). आता २/३ वर्षांपूर्वी फ्रीस्टाईल शिकायला गेले तेव्हा मला वाटलं होतं की आपल्याला बेसिक पोहता येते. मग काय, सोप्पंच आहे! पण नाही! सगळं पहिल्यापासून शिकायला लागलं! Happy तेव्हा हे टप्पे पार केले. अजूनही श्वास घेता येत नाही मात्र. त्यासाठी तुमची पद्धत वापरून बघते.
पण नवीन शिकणारा हे सगळं लक्षात कसं ठेवणार? तुम्ही खूप मेहनत घेऊन लिहिलं आहे हे जाणवतंय पण! जमल्यास त्या त्या टप्प्यांचे व्हिडिओ टाका.

>> प्रशिक्षक तोंड पाण्याबाहेर ठेवून पोहायला शिकवतात. तोंड पाण्याबाहेर, हात आणि पाय एकाच वेळी चालवत पुढे जायचे.

बहुधा ते Dog Paddling पद्धतीने शिकवत असावेत. लहान किंवा टिनएज मुलांना Dog Paddling पध्दतीने शिकणे सोपे जाते. मोठेपणी तसे शिकणे अशक्य नसले तरी कठीण जाते. शिवाय Dog Paddling ची सवय (नेहमी डोके वर काढून पोहणे) लागली तर त्या पद्धतीने पोहण्याचा जास्त stamina राहत नाही (या लेखात मी त्याचा उल्लेख केला आहे)

>> हातातला बोर्ड सोडून हात मारायला जावे तर तोल रहात नाही, डोके बुडते आणि मग पँनिक व्हायला होते.

सुरवातीला बार ला धरून याचा सराव केला होतात का? पॅनिक नक्की कशाने होता? पाण्यात संपूर्ण डोके बुडण्याची सवय नसल्याने कि आपण खाली बुडून जाऊ अशी भीती वाटल्याने? या लेखातील पहिले दोन टप्पे वाचा.

@mi_anu: धन्यवाद Happy

@वावे

>> पण नवीन शिकणारा हे सगळं लक्षात कसं ठेवणार?
म्हणून आपण चार टप्पे केलेत. एका वेळी एका टप्प्यावरच फोकस करायचा. प्रत्येक टप्प्यात काय करायचे त्यासंबंधी तपशिलात वाचून टप्प्याखाली "थोडक्यात" जे दिलेय तितके लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे. पोहायला शिकण्यासंबंधी नेट वर बरेच व्हिडिओ तसेच इतर ट्रेनिंग मटेरियल उपलब्ध आहे. मी सुद्धा खूप काथ्याकूट केला होता शिकताना. आणि शेवटी जे सोपे वाटले ते इथे लिहून काढले Happy

>> जमल्यास त्या त्या टप्प्यांचे व्हिडिओ टाका.
हो हे मी ठरवले आहेच. आमच्या इथला पूल सुरु झाला कि फोटो/व्हिडीओ टाकेन नक्की.

धन्यवाद Happy

हा लेख वाचून कोणीही जोशात येऊन पाण्यात एकटे उतरायची घोडचूक करू नका. पोहणारा जाणकार माणूस सोबत असेल तरच पाण्यात उतरा. वाचण्यासाठी लेख छान आहे. पण एकदा का नाका तोंडात पाणी गेले कि काहीही आठवणार नाही. वेडे वाकडे हातपाय मारून माणूस खोल पाण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा लेख कोणाच्यातरी जीवावर बेतू शकतो, ऍडमिनने वेळीच दखल घ्यावी हि विनंती.

>> हा लेख कोणाच्यातरी जीवावर बेतू शकतो

पूर्वतयारी मध्ये मी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक काय तयारी असावी याचा उल्लेख केला आहे. संभाव्य धोक्यांचा सुद्धा तिथे उल्लेख केला आहे. इथे लिहिलेला बहुतांश सराव हा स्विमिंगपूल मधील उथळ पाण्यात, जिथे प्रौढ व्यक्ती पाण्यात आरामात उभी राहू शकते, करायचा आहे. नीट काळजी घेतल्यास धोका अजिबात नाही. स्विमिंग कसे करावे यावर धडे देणारे अनेक लेख/व्हिडिओ नेट वर आहेत.

आपल्या इथे पब्लिक ला सर्वात मोठा धडा स्वतःला वाचवायला आलेल्याच्या गळ्याला कोणत्याही परिस्थितीत मिठी न मारणे हा धडा अत्यंत बजावून बजावून देणे गरजेचे आहे.
जीवाच्या भितीत हे नेमकं विसरलं जातं आणि वाचवणारा पण प्राण गमावतो.

कल्पतरू प्लस वन. प्लीज सर्व वाचकांनो ट्रेंड व सर्टिफाइड कोच कडूनच स्विमिन्ग शिका अशी नम्र विनंती. हे आर्टिकल बेसिस म्हणून जरूर वापरा पण स्विमिंग शिकायला कोच मस्ट आहे. अ‍ॅडमिन प्लिज दखल घ्या. लोकांच्या जिवाचा प्रश्न आहे.

<बघता बघता यावर्षीचा उन्हाळा सुरू पण झालाय. थोड्याच दिवसात अनेक ठिकाणचे उन्हाळी स्वीमींगपूल सुरु होतील>
नाही हो. अजून हिवाळाच आहे आमच्याकडे.

@ atulpatil, तिसर्‍या टप्प्यात एक गोष्ट अजून add करा. हात मारताना (वल्ह्याप्रमाणे) हातांची बोटे एकमेकांना चिकटलेली हवीत, मध्ये gap नको. नाहीतर पुरेसा forward push मिळणार नाही.

>> हात मारताना (वल्ह्याप्रमाणे) हातांची बोटे एकमेकांना चिकटलेली हवीत, मध्ये gap नको.

बरोबर आहे. हा बदल केलाय. धन्यवाद.

>> ट्रेंड व सर्टिफाइड कोच कडूनच स्विमिन्ग शिका... स्विमिंग शिकायला कोच मस्ट आहे.

अहो असे काही नाही. खेड्यापाड्यातली कित्येक मुले किती छान पोहतात. ते सुद्धा थेट नदीत किंवा विहिरीत शिकतात. त्यांना कोठून सर्टिफाइड कोच मिळतो? आजूबाजूला इतर जे पोहतात त्यांच्याकडूनच शिकतात. त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे बहुतांशी यात इच्छाशक्तीच जास्त महत्वाची असते. मी सुद्धा स्वत:हून शिकलो व ते हि आता प्रौढ वयात. आणि मगच हे आर्टिकल लिहिले. शिकताना अनेक पट्टीच्या पोहणाऱ्याना विचारले, निरीक्षणे केली, अनेक आर्टिकल वाचली, खूप सारे ट्रेनिंग व्हिडीओज पाहिले आणि त्याहून महत्वाचे स्वत:हून अनेकविध प्रयोग केलेत. त्या सगळ्याचे सार म्हणजे हे आर्टिकल. यात सर्व बारीकसारीक गोष्टींचा विचार केला आहे, सूचना लिहिल्या आहेत. पूर्ण नीट वाचून एक एक गोष्ट काळजीपूर्वक अंमलात आणून शिकणाऱ्याला कोणताही धोका नाही.

मी जरा उशिरा (दहावीच्या सुट्टीत) पोहायच्या क्लासला जायला सुरूवात केली.
- पहिले चार दिवस पाठीला रिकामा डबा बांधून अगदी आरामात पोहत होतो
- मग प्रशिक्षकाने डबा न बांधता ढकलून दिले आठ फूटात Sad
- बराच प्रयत्न करून देखील जमेना, मग काय धरला शेजारच्या एकाला, त्याने नेऊन काठावर पटकले (रागानेच)
- मग प्रशिक्षकाने कमरेला दोर बांधला आणि पुन्हा ढकलले
- बराच प्रयत्न करून देखील जमेना, मग काय धरला दोर आणि आलो वर Happy
- त्यानंतर आजतागायत कधी पाण्याच्या वाटेला गेलो नाही

लोक मूर्ख आहेत का लेख वाचून लगेच पाण्यात उड्या मारायला? प्रिकोशन घ्यायला सांगितलंय लेखकाने.
उत्तम स्टेप्स आहेत, आवडल्या..

लेख छान आहे.. मनापासून लिहिलेय तुम्ही हे जाणवतंय. ज्यांना शिकायचंच आहे ते तुम्ही लिहिलंय त्या प्रमाणे योग्य ती काळजी घेऊन प्रयत्न करतीलच.
अस्मादिकांनी प्रयत्न केले पण खरंच अवघड आहे मोठं झाल्यावर शिकणं.. बॉडी फार स्टिफ होऊन जाते बहुतेक. बोर्ड घेऊन थोडंफार जमते.

प्रशिक्षकाने डबा न बांधता ढकलून दिले आठ फूटात <<<<<< ह्या असल्या गोष्टी वाचून भयंकर राग येतो. कोणाच्या जीवावर बेतू शकते. जे आपल्याला येतं आणि दुसर्‍याला येत नाही ते नीट शिकवता येतं की... हे भलते उद्योग कशाला.

मला फार आवडला लेख.
उपयोगी १००%.
कल्पतरु च्या प्रतिसादाचा निषेध । अगदी बाळबोध टिका आहे ती.

मोठा श्वास राहण्यासाठी काय करावे? सलग पोहायला(न थांबता मोठे राउंड) जमत नाहीये काही केल्या..>>>>
सरावाने जमेल. सध्यातरी श्वास जास्तीत जास्त रोखण्याचा सराव करण्यासाठी स्विमिंग पूलच्या काठाशी असलेल्या रॉडला धरूनच श्वास रोखून पाण्यात जा (तोंड बंद ठेवून नाकाने हळूहळू श्वास सोडा, त्यामुळे नाकात पाणी जाणार नाही.) आणि शक्य तितका वेळ पाण्यात राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी मनातल्या मनात आकडे मोजा. समजा आज १० अंक होईपर्यंत पाण्यात राहू शकलात तर उद्या १४-१५ अंक होईपर्यंत पाण्यात राहण्याचे उद्दिष्ट ठेवा.

पोहताना श्वास कसा घ्यायचा? तोंडाने की नाकाने?
नाकाने श्वास घेतल्यावर थोडे पाणीदेखील नाकात शिरते आणि मग कसेतरी होते.
तोंडाने श्वास घेतल्यावर लवकर दमायला होते.

>> मोठा श्वास राहण्यासाठी काय करावे? सलग पोहायला(न थांबता मोठे राउंड) जमत नाहीये काही केल्या..

मोठा श्वास सरावाने जमेल. घरी बसल्या बसल्या सुद्धा दीर्घकाळ श्वास रोखून धरायचा सराव (प्राणायाम) आपण करू शकतो. जमल्यास योगा किंवा जिम जॉईन करा. त्याने सुद्धा खूप फायदा होतो. पण केवळ मोठ्या श्वासाने मोठे राउंड घेता येणार नाहीत. मोठ्या राउंड साठी श्वासोच्छवास करतच पोहता यायला हवे. वरच्या लेखातली तिसरी आणि चौथी स्टेप वाचा. केवळ यावरच खूप तपशिलात लिहीले आहे. पोहताना श्वासोच्छवास करणे हि पोहायला शिकण्यातली सर्वात कठीण गोष्ट आहे. म्हणूनच मी त्यावर जास्त भर दिला आहे या लेखात.

>> पोहताना श्वास कसा घ्यायचा? तोंडाने की नाकाने?
>> तोंडाने श्वास घेतल्यावर लवकर दमायला होते.
डोके वर असताना तोंडाने श्वास घेऊन डोके पाण्यात बुडवायचे आणि नाकाने श्वास सोडत पुन्हा वर आणायचे. पण एकदम खूप हवा आत घेऊन जास्त वेळ श्वास रोखून धरला तर दमल्यासारखे होते. तसे न केवळ आवश्यक तेवढा श्वास घेऊन एका रिदम मध्ये या क्रिया करत राहा.

ह्या असल्या गोष्टी वाचून भयंकर राग येतो. कोणाच्या जीवावर बेतू शकते. जे आपल्याला येतं आणि दुसर्‍याला येत नाही ते नीट शिकवता येतं की... हे भलते उद्योग कशाला.

>> आपला विश्वास बसणार नाही पण एका गावठी ट्रेनरने मला पुण्यात अशी फोर व्हीलर चालवायला शिकवली आहे. मुद्दाम समोरच्याच्या गाडीवर गाडी घालायला लावणे, मुद्दाम रस्ता अरुंद असतानाही गाडी इंचभरसुद्धा न हलवता बिनधास्त समोरच्यावर चाल करून जाणे, एकदा तर त्या ट्रेनरची कोणी मैत्रीण बाई होती तिच्या अंगावर गाडी घालायला लावली होती आणि अगदी एक बोटाच्या अंतरावर गाडी थांबवली होती वगैरे गोष्टी करून. याच स्ट्रॅटेजीने सोबत शिकायला येत असलेली मुलगी शिकली व मला मात्र भीती वाटायची म्हणून मला खूप हिणवले त्या ट्रेनरने. Angry सेम ड्रॅईव्हिंग स्कुल मधून माझ्या मैत्रिणीने क्लास लावला आणि तिला खूप सॉफीस्तिकेटेड ट्रेनर मिळाला आणि आज ती खूप चांगले ड्रयव्हिंग करू शकते.

सॉरी फार अवांतर लिहिले मी. परंतु हे सगळे या निमित्ताने आठवले आणि शेअर करावे वाटले.

@पियू... मुद्दा बरोबर आहे. माझ्या मुलाला तो पोहायला शिकत असताना खोल भागात जायला घाबरायचा. म्हणजे तसे त्याला येत होते पोहायला पण अजून इतका आत्मविश्वास नव्हता म्हणून तो खोल भागात जात नव्हता इतकेच. तर तेंव्हा ट्रेनरने "तू खोल भागात का पोहत नाहीस" म्हणून जबरदस्तीने उचलून त्याला खोल भागात टाकत होता. चारपाच वर्षाचा एव्हढासा जीव. घाबरून जोरात ओरडायला लागला. छाती धापापू लागली. मी तीव्र आक्षेप घेऊन वेळीच हस्तक्षेप केला. तर तो ट्रेनर मला म्हणतो "अहो मी आहे ना. तुम्ही इतके का काळजी करता?" मी म्हणालो "तुम्ही आहात त्यामुळे तो बुडेल वगैरे या भीतीचा प्रश्न नाही. पण जबरदस्ती केल्याने त्याच्या मनात जर भीती बसली तर तो आता जेवढा पोहतोय ते सुद्धा बंद होईल. कदाचित नंतर पाण्याकडे तो फिरकणारही नाही. मला ते व्हायला नको आहे" नंतर काहीच दिवसात तो स्वत:हून खोल भागात जाऊ लागला आणि आता तर कित्येक फुट वरून जम्प वगैरे करतो त्याला काही भीती नाही वाटत.

अगदी कालचीच गोष्ट. एका तीन-चार वर्षाच्या मुलीला तिच्या वडीलांनी फ्लोटर लावून पाण्यात सोडून दिले. आधी ती नेहमी पुलाच्या किड्स सेक्शन मध्ये खेळायची. खोल पाण्यात ती घाबरून जोर जोरात किंचाळायला लागली. नंतर कितीतरी वेळ ती घाबरून जोरजोरात रडत ओरडत होती. तरी हे ढिम्म. स्वत: अन्यत्र निवांत पोहत होते. "त्याशिवाय पाण्याची भीती जाणार नाही" असे लॉजिक असते या लोकांचे. अरे? तुम्ही भीती घालवताय का निर्माण करताय? काही मुले शिकतात या पद्धतीने पण अनेकजण भीतीने शिकणे कायमचे सोडून पण देतात.

अय्यो पियू.मलाही नसतं जमलं.
(मी मारुती मध्ये शिकले त्यांनी अगदी उलट सांगितलं होतं.समोरच्याने/मागच्याने शिव्या घातल्या, खुन्नस देऊन पाहिलं तरी विनम्रपणे हसून पुढे जायचं.स्पष्टपणे समोरच्याची चूक असल्याशिवाय रोड वरची भांडणं इगोवर/मनावर घ्यायची नाहीत)
खरं तर हे सगळं जे तिने करायला लावलं ते इतर कोणत्याही देशात स्ट्रॅटेजी म्हणून स्वीकारार्ह/नैतिक नाही.पण पुणे/हैदराबाद च्या द्रायव्हिंग स्टाईल ला मे बी इट वर्क्स बेटर.
मी स्वतः असं काही करण्यापेक्षा 10 मिनिट थांबून समोरच्याला जाऊ देणं जास्त पसंत करेन.

अतुलजी खूपच छान माहिती दिली आहे.

मी लहानपणी नदीत पोहायला शिकलो. विनाआधार.... म्हणजेच पाठीला थर्मोकोल, डबा न बांधता...

पोहताना केवढ्या शारीरिक क्रिया घडतात. हे वाचून लक्षात आले. मी पोहताना कधीच एवढा विचार केला नव्हता.

आपला हा लेख नवीन पोहायला शिकणाºयांना नक्कीच मार्गदर्शनपर लेख आहे.

@ferfatka: खूप खूप धन्यवाद Happy

@दीप्स: अभिनंदन! Happy हा टप्पा थोडा वेळ घेणारा आहे. शुभेच्छा!

Pages