या उन्हाळ्यात स्वत:हून पोहायला असे शिका (Step by step instructions)

Submitted by अतुल. on 7 February, 2018 - 03:52

घता बघता यावर्षीचा उन्हाळा सुरू पण झालाय. थोड्याच दिवसात अनेक ठिकाणचे उन्हाळी स्वीमींगपूल सुरु होतील. मागच्या उन्हाळ्यात प्रशिक्षक किंवा अन्य कुणाचीही मदत न घेता मी पोहायला शिकलो. मागे कुठल्याश्या एका धाग्यावर त्यासंबंधी ओझरते लिहिले आणि नंतर त्यावर तपशिलात लिहायचे राहून गेले. बघता बघता हा उन्हाळा तोंडावर आला. तर म्हटले लिहून काढू. कोणाला उपयोगी आले तर खूप आनंद होईल यासाठी हा लेखनप्रपंच.

असो. सुरवातीलाच एक महत्वाची सूचना: मी कोणी व्यावसायिक प्रशिक्षक नाही. इथे दिलेली पद्धती आणि स्टेप्स मी स्वत: शोधलेल्या आहेत आणि त्या जास्तीत जास्त सुरक्षित असतील याची मी काळजी घेतलेली आहे. तरीही या पद्धतीद्वारे पोहायला शिकणाऱ्या व्यक्तीने या स्टेप्सचे स्वत:च्या जबाबदारीवर अनुकरण करावयाचे आहे याची कृपया नोंद घ्यावी.

पूर्वतयारी:

१. हि पद्धती जलतरण तलाव (Swimming Pool) साठीच बनवली आहेत. तेंव्हा जवळपासचा Swimming Pool शोधा कि जिथे दिवसा एक तासभर तुम्हाला जाता येईल. हे आवश्यक आहे. स्विमिंगपूल व्यतिरिक्त अन्य ठिकाणी (नदी, विहीर, धरण, तलाव, समुद्र इत्यादी) या पद्धतीचा वापर करून शिकणे अतिशय धोकादायक आहे. तसेच स्विमिंगपूल मध्ये रात्रीच्या वेळी या पद्धतीने शिकणे सुध्दा सुरक्षित नाही.

२. तुमचे वय अठराहून जास्त असणे आवश्यक, तसेच उंची कमीतकमी स्विमिंगपूलमधील उथळ भागातील (चार फुट) पाण्यात पाय न डगमगता स्थिरपणे उभे राहता येईल इतकी असावी (शक्यतो छातीइतकेच पाणी). बहुतेकांची ती असते. उंची कमी असेल अथवा पाणी छातीपेक्षा बरेच वर येत असेल तर या पद्धतीचा अवलंब करू नये.

३. स्विमिंगपूल मधील उथळ भागाकडील साईडबार (ज्याला धरून पोहायला शिकवले जाते) सुस्थितीत आहे याची खात्री करा. तो तिथे नसेल अथवा असून सुस्थितीत नसेल तर या पद्धतीचा वापर करू नका.

४. स्विमिंग गॉगल आणि कॅप असल्यास उत्तम. किंबहुना ते आवश्यकच समजा. त्याने शिकण्याची क्रिया सुलभ होते. डोळ्यात क्लोरीनचे पाणी जाणे अथवा केसातून सतत तोंडावर पाणी येत राहणे यामुळे आत्मविश्वास ढळू शकतो. म्हणून हे आवश्यकच (आजकाल तर या वस्तू शंभर दीडशे रुपयेपर्यंत अनेक दुकानांतून उपलब्ध झाल्यात. ऑनलाईन सुद्धा मिळू शकतात. तेंव्हा, पोहायला शिकायचे असेल तर त्या खरेदी कराच)

५. जरी "कोणाच्याही मदतीशिवाय" असा उल्लेख मी वरती केला असला तरी खबरदारी म्हणून एखादी व्यक्ती बरोबर असल्यास उत्तम होईल. त्या व्यक्तीने पाण्यात उतरायची गरज नाही. फक्त आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास तुमच्यावर लक्ष असावे म्हणून त्यांची उपस्थिती आवश्यक. आणि हे शक्य नसेल व एकटेच जावे लागत असेल तर त्या स्वीमिगपूलावर निदान लाईफसेव्हर गार्ड तसेच अन्य काही पोहणारे आहेत याची खात्री करा. आजूबाजूला कोणीहि नसलेल्या सुनसान पूल मध्ये या पद्धतीने एकटेच शिकायचा प्रयत्न करू नका.

६. आणि शेवटचे पण महत्वाचे, हे तुम्हाला सांगायची तशी आवश्यकता नाहीच तरीही नोंद करतो, तब्येतीची कोणतीही तक्रार नसावी (उदाहरणार्थ दमा, अस्थमा, हृदयविकार, धाप लागणे, फिट/चक्कर येणे, गरगरणे, विषाणूजन्य आजार इत्यादी).

वरील सर्व गोष्टींची पूर्तता झाली असेल तर जास्त वेळ न घालवता चला आता थेट पाण्यातच उतरू. डोक्याला कॅप आणि डोळ्यावर गॉगल घालून स्विमिंगपूलच्या उथळ बाजूच्या जिन्याने पाण्यात अलगद उतरा आणि उथळ भागातीलच साईडबारला पकडून उभे राहा.

आपण पोहायला शिकण्याचे चार टप्पे केले आहेत. एक टप्पा पूर्ण आल्याशिवाय पुढच्या टप्प्यात सांगितलेले करू नका.

पहिला टप्पा: पाण्याशी मैत्री अथवा शरीराला पाण्याची सवय होणे:

पोहायला येत नसेल तर जितके वय वाढेल तितके आपल्याला पाण्यात उतरण्याची भीती वाढतच जाते. कारण शरीराला पाण्यात पूर्ण बुडून जाण्याची सवय नसते. म्हणून पहिल्या टप्प्यात हि सवय आपण लावून घेऊ. साईडबारला धरून उभे असताना तोंडाने श्वास पूर्ण आत घ्या. आता श्वास तसाच आत रोखा आणि बारला धरूनच हळूहळू गुडघे वाकवत छाती, चेहरा व पूर्ण डोके पाण्याखाली राहील इतके खाली या. काही केल्या बारची पकड मात्र सोडू नका त्याचबरोबर खालून पाय उचलले जाणार नाहीत याची पण काळजी घ्या. गॉगल असल्याने डोळे उघडेच ठेवा. त्यामुळे भीती वाटणार नाही. पण कान सुद्धा पाण्यात असल्याने व त्यामुळे बाहेरचे कोणतेही आवाज ऐकायला येणे बंद झाल्याने अगदी सुरवातीला थोडी भीती वाटू शकते. या टप्प्यात हीच भीती आपल्याला घालवायची आहे. जितका वेळ श्वास रोखून धरू शकाल तितका वेळ तसेच बारला धरून पाण्याखाली राहा. नंतर वर या आणि नाकाने श्वास बाहेर सोडा. पंधरा वीस सेकंदानी हि क्रिया पुन्हा एकदा करा. तोंडाने हवा आत घ्या व पुन्हा तसेच खाली जा. श्वास रोखून धरा. वर या. नाकावाटे श्वास बाहेर सोडा. इथे पाण्याची भीती घालवण्याबरोबरच तोंडाने हवा आत घेणे आणि नाकावाटे सोडणे हि सवय सुद्धा आपण मुद्द्दाम लावून घेणार आहोत. कारण याचा नंतर आपल्याला उपयोग होणार आहे.

श्वास नियंत्रित करून पाण्यात डोके बुडवून राहण्याची हि क्रिया वारंवार करत राहा. जितका वेळ श्वास रोखून पाण्यात राहू शकाल तितके चांगले. कालांतराने पाण्याची भीती निघून जाईल कि पहिला टप्पा संपला. पण घाई नको. पहिले पाच सहा दिवस केवळ हेच केलेत तरी हरकत नाही. एकदा हि सवय झाली कि जर जमत असेल तर पाण्यात असतानाच श्वास नाकावाटे सोडत सोडत वर येण्याचा सराव करा. वर असताना तोंडावाटे हवा आत घेऊन पाण्यात असतानाच श्वास सोडत सोडत डोके वर आणण्याची हि सवय आपल्याला पुढे खूपच उपयोगी पडणार आहे.

थोडक्यात: तोंडावाटे हवा आत घ्या व बारला धरूनच हळूहळू खाली बसा व डोके पाण्याखाली घ्या. श्वास सोडण्याची वेळ आल्यावर नाकावाटे श्वास सोडतच वर या व डोके पूर्ण पाण्याबाहेर काढा.

दुसरा टप्पा: पाण्यावर तरंगणे:

एकदा श्वास रोखून पाण्यात डोके बुडवायला आणि श्वास सोडत पाण्यावर यायला शिकलात कि पाण्याची भीती गेली. पुढचा टप्पा म्हणजे श्वास रोखलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगणे. यासाठी पहिल्या टप्प्यात जे केले तसेच करून बारला धरून पाण्याखाली जा. आता खाली असताना हळूहळू पाय उचला. हात मात्र बारला घट्ट पकडलेलेच पण ताठ राहू देत. हात वाकवू नका. आता दोन्ही पाय उचलल्यानंतर बारला सरळ हातानी धरलेल्या अवस्थेत तुम्ही पाण्यात पालथे तरंगू लागाल. डोके अजून पाण्याखालीच असेल. डोके वर काढू नका, डोळे बंद करू नका. बस्स श्वास रोखलेल्या अवस्थेत बारला खांद्यापासूनवर ताणलेल्या सरळ हातानी धरून पालथे तरंगत राहा. आता श्वास सोडण्याच्या वेळी नाकावाटे श्वास सोडत डोके पाण्याबाहेर काढा. आता इथे एक गम्मत होईल. बारला धरून जेंव्हा तुम्ही डोके पाण्यावर आणाल तेंव्हा तुमचे पाय आपसूकच खाली जातील. पण हे नॉर्मल आहे. श्वास रोखून बारला धरून खाली बघत तरंगत राहणे व पुन्हा श्वास सोडत डोके वर काढणे आणि पायांवर उभारणे याचा चांगला सराव होऊ द्या.

एकदा याचा सराव झाला कि हा टप्पा संपला असे नाही. यानंतर या टप्प्यात अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे. ती म्हणजे असे पालथे तरंगत असताना बारचा हात सोडणे. खरे तर यात आपल्याला कौशल्य वापरावे लागेल असे काहीच नाही. फक्त, बारचा हात सोडल्यास आपण पाण्यात खाली तळाला जाऊ किंवा दुसरीकडे अनियंत्रित वाहत जाऊ हि नाहक भीती जी मनात असते तिच्यावर मात करणे इतकेच इथे आहे. बहुतांश मानवी शरीरे हि तरणशील (Buoyant) असतात. तुमचे शरीर खूपच पिळदार, भरीव स्नायूंचे आणि जराही चरबी नसलेले असेल तरच तुम्ही पाण्याच्या तळाला जाल असे विज्ञान सांगते. जगातील ९५% लोकांचे शरीर पाण्यावर आपसूकपणे तरंगू शकते असे संख्याशास्त्र सांगते. त्यामुळे अगदी निर्धास्त राहा. तसेच स्विमिंगपूलचे पाणी वाहते नसते त्यामुळे आपण तरंगत दुसरीकडे जाऊ हि भीती सुद्धा अनाठायी आहे. आपले डोळे उघडे असतात आणि स्विमिंगपूलचा तळ आपल्याला स्पष्ट दिसत असतो. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. तेंव्हा आपण बुडून खाली जाऊ हा विचार मनातून पूर्ण काढून टाका आणि बारचा हात बिनधास्त सोडून द्या. मात्र हात खांद्यापासून वर अगदी सरळ ताठ राहू द्या, तसेच पायसुद्धा ताठ ठेवाय आणि एकंदर सर्व शरीरच ताठ अवस्थेत पालथे तरंगत राहू द्या. अगदीच भीतीवर नियंत्रण नाही राहिले तर चार फूटच पाणी आहे, डोके वर काढले कि पाय आपोआप खाली जातात आणि पट्कन उभे राहता येते हे लक्षात घ्या. काही झाले तरी घाबरून पॅनिक व्हायचे नाही एवढे एकच लक्षात ठेवा. पाणी तुम्हाला वर ढकलून तरंगत ठेवते यावर विश्वास असू द्या. पण तुम्हीसुद्धा पाण्याला सहकार्य करायला हवे. घाबरून गाळण उडाली तर मात्र चार फुट पाण्यात सुद्धा उभे राहता येणार नाही. तेंव्हा या टप्प्याचा मंत्र: अज्जिबात घाबरायचं नाय.

थोडक्यात: तोंडावाटे श्वास आत घेऊन बारला धरून डोके पाण्याखाली करून तरंगत राहा. श्वास सोडण्यासाठी डोके वर घ्या. पाय खाली जातील. नाकाने श्वास सोडा. तोंडाने घ्या. पुन्हा डोके खाली घ्या. पाय पुन्हा वर येतील. हे करण्यात आत्मविश्वास निर्माण झाला कि डोके खाली घेतले असतानाच बारचा हात बिनधास्त सोडून द्या व हात पाय व संपूर्ण शरीर ताठ करून पाण्यावर पालथे तरंगत राहा. श्वास सोडतेवेळी डोके वर काढून पाण्यात अलगद उभे राहा व नाकाने श्वास सोडा.

तिसरा टप्पा: तरंगत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे:

वरचे दोन टप्पे पार केलेत कि तुमची पाण्याची भीती पूर्ण नष्ट होऊन तुम्हाला पोहण्याविषयी खूपच आत्मविश्वास निर्माण होईल. हेच महत्वाचे आहे. या तिसऱ्या टप्प्यात आपल्याला फार काही करायचे नाही. दुसऱ्या टप्प्यात असताना बारला सोडून डोके पाण्यात घालून खाली पाहत जसे पालथे तरंगत होतो तसे तरंगत राहायचे. पण यावेळी फक्त हाताने पाणी वल्हवायचे इतकेच. यासाठी डोक्याच्या वर धरलेले हात तसेच आडवे कमरेच्या दिशेने आणा. हाताच्या पंजाच्या सहाय्याने (बोटे एकमेकांना चिकटलेली) पाणी पायांच्या दिशेने मागे सारले जाईल व आपण डोक्याच्या दिशेने पुढे जाऊ. हे तसे अवघड अजिबात नाही. तुम्ही आपोआप करू शकाल. फक्त काळजी इतकीच घ्यायची कि तरंगत तरंगत स्विमिंगपूलच्या खोल भागात जायला नको. हे अतिशय महत्वाचे आहे कारण आपण श्वास रोखून धरलेला असतो व तो कोणत्याही क्षणी सोडवा लागू शकतो. त्यासाठी डोके वर करून पाय टेकून उभे राहावे लागते. त्यामुळे खाली बघून हात मारत मारत स्विमिंगपूलच्या खोल भागात जाऊ नये याची काळजी घ्या. यासाठी आपली तरंगत जाण्याची दिशा स्विमिंगपूलमध्ये उथळ भागातच आडवी असेल असे पहा. त्याचबरोबर हात मारून पुढे जोरात जात असताना आपले खाली पाहत असलेले डोके स्विमिंगपूलची भिंत अथवा अन्य वासू वा आजूबाजूला इतर कशास धडकू नये याची पण काळजी घ्या.

व्वा! या टप्प्यात तुम्हाला पोहायला आले असे म्हणायला हरकत नाही. फक्त श्वास जेवढा आहे तेवढेच अंतर जाता येईल इतकी मर्यादा या पोहण्याला असेल. काही हरकत नाही. पेट्रोल भरल्यासारखे भरपूर हवा तोंडावाटे आत घ्या. मग स्वत:ला पाण्यात पालथे झोकून द्या आणि श्वास असेपर्यंत हातानी वल्हवत बिनधास्त जा. पेट्रोल म्हणजेच श्वास संपला कि डोके वर काढून पाण्यात उभे राहा आणि नाकावाटे श्वास सोडून द्या. असे खाली तळाकडे बघत बघत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे हा खूप सुंदर अनुभव असतो. पक्षी जसे पंख हलवत हवेत तरंगत जातो व खालची धरा त्यास दिसते तसे इथे आपली अवस्था पक्षाप्रमाणेच असते. फक्त ते हवेत तरंगतात तर आपण पाण्यात. इतकाच फरक.

थोडक्यात: शरीर ताठ ठेऊन श्वास आत घेतलेल्या अवस्थेत पाण्यावर पालथे तरंगत असताना आडवे वल्हे मारल्याप्रमाणे हाताची हालचाल करा व डोके पाण्यात असलेल्या अवस्थेतच पाण्याला मागे रेटून शरीराला पुढे गती द्या. श्वास सोडण्याच्या वेळी डोके वर काढून पाय खाली जाऊ द्या व पाण्यात उभे राहा.

चौथा टप्पा: तरंगत जात असताना श्वासोच्छवास करणे:

तिसऱ्या टप्प्यात एका श्वासात जाण्याईतके पोहायला आपण शिकलो. पण इतके अर्थातच पुरेसे नाही. कारण तुमचा छातीचा भाता कितीही मोठा असला तरी एका श्वासात जास्तीत जास्त काही फूट इतकेच जाता येईल. मग पुन्हा उभे राहायचे. अर्थात पोहायला येऊनही अजूनही आपण स्विमिंगपूलच्या खोल भागात जाऊ शकत नाही (कारण तिथे पाय न टेकल्याने उभे राहता येणार नाही). याला कारण पोहताना आपल्याला अजून श्वास घेता येत नाही. श्वास घेण्यासाठी आपल्याला उभे राहावे लागते. म्हणूनच या टप्प्यात पोहता पोहता श्वास कसा घ्यायचा ते आपण शिकणार आहोत.

तुम्हाला सांगितल्यास विश्वास बसणार नाही पण वरचे तीन टप्पे मी महिन्याभरात पार केले, पण हा एक शेवटचा टप्पा पार करायला मात्र मला अजून तीन-चार महिने घालावे लागले. याला कारण म्हणजे पोहताना श्वासोच्छवास करण्याचे प्रभावी व सोपे तंत्र मला काही केल्या अवगत होत नव्हते. यासाठी मी अनेक युट्युब व्हिडीओज पाहिले, पोहायला येणाऱ्यांना सल्ला विचारला पण कशाचा काहीच फायदा नाही. मला त्यातले एकही तंत्र जमत नव्हते. ज्यांच्या शरीराची नैसर्गिक तरणशीलता (Natural buoyancy of body) चांगली आहे त्यांना डोके वर काढून श्वास घेणे व पुन्हा डोके आत घेणे लगेच जमते. तुम्ही याबाबत लकी असाल तर तुम्हालाहि हा टप्पा लगेच जमून जाईल. पण मी लकी नव्हतो. मी डोके बाहेर काढले तर माझे पाय खाली जात, शरीर बुडायला सुरवात होई आणि श्वास सोडून पुन्हा हवा आत घेईपर्यंत डोके पण पाण्यात जात असे. पाय खाली जाऊ नयेत म्हणून ते हलते वगैरे ठेऊन पाहिले, तसेच डोके पूर्ण वर न घेता एका बाजूने फक्त नाक व तोंड वर घ्यायचे (Freestyle मध्ये घेतात तसे) इत्यादी विविध प्रयोग करून पाहिले. पण व्यर्थ. हे सगळे प्रयोग करण्यातच खूप काळ गेला.

पोहायला शिकणाऱ्या (त्यातल्या त्यात माझ्याप्रमाणे उशिरा शिकणाऱ्या) अनेकांची हीच अडचण आहे असे मला काही जणांशी बोलताना जाणवले. तुमची पण हीच अडचण असेल तर आता तुम्हाला मात्र तितका वेळ घालवावा लागणार नाही. कारण इथे श्वासोच्छवास करण्याची Dog Paddling पद्धतीवर आधारित मी स्वत: निर्माण केलेली पध्द्त सांगत आहे ती तुम्हाला थेट उपयोगी पडेल. (Dog Paddling मध्ये डोके सतत वर राहिल्याने पाय आपसूक खाली जातात हि माझी अडचण होती हे लक्षात घ्या. शिवाय Dog Paddling मध्ये डोके सतत पाण्याच्या वर राहिल्याने पोहताना पाण्याचा विरोध वाढतो व म्हणून लवकर थकायला होते. म्हणून मला त्यामध्ये बदल करावा लागला)

या पद्धतीत सगळी मदार आहे ती हातांच्या योग्य पद्धतीने केलेल्या हालचालींवर. तिसऱ्या टप्प्यात हातांची आडवी हालचाल करून वल्हे मारल्याप्रमाणे पाण्याला मागे रेटत पुढे जायचे आपण पाहिले. इथे तसे न करता आपल्याला हातांची हालचाल उभी करावयाची आहे. सायकलचे पायडल मारताना पायांची जशी हालचाल आपण करतो अगदी तशीच हालचाल पण इथे हातांची करायची आहे. पायडल मारल्याप्रमाणे दोन्ही हात पाण्यातच हलवायचे. म्हणजे एक हात मागे असेल तर दुसरा पुढे यायला हवा. आणि जेंव्हा दुसरा मागे जाईल तेंव्हा पहिला पुढे. असे सायकलच्या पायडल सारखेच उभे हात पाण्यातल्या पाण्यातच हलवायचे. पाण्याच्या वर हात कदापि आणायचा नाही. डोके मात्र टप्पा तीन प्रमाणेच खाली पाहिलेल्या अवस्थेत पाण्यात बुडालेलेच राहील. आता इथे आपल्याला ट्रिक करायची आहे. वरून खाली येणाऱ्या हाताचे तळवे पूर्ण उघडा (पण बोटे एकमेकांना चिकटलेलीच हवीत). जेंव्हा उजवा हाताचा तळवा पायडल मारल्याप्रमाणे वरून खाली पाणी रेटत असतो, आपल्याला नेमक्या त्याच रेट्याचा वापर करून डोके वर काढायचे आहे. पण जास्त वर घेऊ नका. फक्त नाक व तोंड वर येईल इतकेच. अशा रीतीने डोके वर आल्यास नाकावाटे श्वास सोडून तोंडावाट पट्कन जितकि येईल तितकी हवा आत घ्या. हे करण्यासाठी दोन सेकंदाचा अवधी पुरेसा आहे तो आपल्याला उजवा हाताचा तळवा पाण्याला खाली रेटत असताना अगदी पुरेपूर मिळतो (तुम्ही जर डावखुरे असाल तर इथे तुम्हाला उजव्या ऐवजी डाव्या हाताचा वापर करावा लागेल). ये हुई ना बात! हि ट्रिकच महत्वाची आहे. तिच्यामुळे तोंडाने श्वास घेणे, डोके पाण्याखाली घेणे, उजव्या हाताने पाणी खालून मागे रेटने, ते रेटत असताना डोके वर काढून पटकन नाकाने श्वास सोडणे व तोंडाने आत घेणे, व पुन्हा डोके पाण्याखाली घेणे असा एक रिदमच तयार होतो ज्यायोगे आपण श्वासोच्छवास करत पोहायला लागतो. वाचताना हे खूप सोपे असेल असे वाटते पण प्रत्यक्षात ते इतके सोपे नाही. पण अथक प्रयत्न करीत राहिलात तर अजिबात अवघड पण नाही. तेंव्हा पहिल्या काही प्रयत्नात जमले नाही तर सराव सोडू नका. इथे जिद्द आणि चिकाटी अत्यंत महत्वाची आहे हे लक्षात ठेवा.

थोडक्यात: तिसऱ्या टप्यात सराव केल्याप्रमाणे श्वास आत घेऊन खाली डोके घालून तरंगत असताना सायकलच्या पायडल प्रमाणे हातांची उभी हालचाल करा. पण हात पाण्याच्या वर येऊ देऊ नका. जेंव्हा उजव्या (तुम्ही डावखुरे असाल तर डाव्या) हाताचे पायडल (पसरलेला तळवा) पाण्याला खाली रेटत असते तेंव्हा त्या रेट्याचा वापर करून डोके हळूच पाण्याच्यावर काढा. मिळालेल्या दोनेक सेकंदांच्या अवधीत नाकाने श्वास सोडून तोंडाने पुन्हा हवा आत घ्या. डोके पुन्हा पाण्याखाली घ्या व पुन्हा स्विमिंगपूलच्या तळाकडे खाली पाहत राहा. या टप्प्यात चिकाटी व प्रयत्नांचे सातत्य लागेल.

---x---

हुर्रेऽऽऽ... यायला लागले एकदाचे पोहायला. पण इतक्यात खोल भागात जाऊ नका. श्वासोच्छवास करत उथळ भागातच सराव करत राहा. सतत काही मिनिटे पाय न टेकता पोहायला आल्याखेरीज खोल भागात जाऊच नका. जेंव्हा जाल तेंव्हा पोहायला येणाऱ्या कोणालातरी आधी कल्पना द्या मगच जा. पहिल्यांदा खोल भागात जाणे हा अविस्मरणीय अनुभव असतो. तो तुम्ही कधीच विसरणार नाहीत. पण एकदा खोलगट भागात पोहू लागलात तर याचा अर्थ तुम्हाला लगेच नदीत किंवा तलावात वगैरे पोहायला येईल असे नव्हे. यापुढे सुद्धा खूप टप्पे आहेत विविध पद्धती आहेत. पण या पद्धतीने स्विमिंगपूल मध्ये पोहायला शिकलात हे हि नसे थोडके.

स्वत:हून एखादी गोष्ट शिकणे यात एक अवर्णनीय आनंद असतो. त्यात आणि जी गोष्ट "लहानपणीच शिकायला हवी" असे वारंवार ऐकायला मिळते ती जर आपण मोठेपणी स्वत:हून शिकली तर होणारा आनंद अवर्णनीय. त्यामुळे कमरेइतक्या पाण्यात उतरायला घाबरणारा मी, एकदा मनाने घेतले आणि आपल्याआपणच पोहायला शिकलो आणि जेंव्हा प्रथमच स्विमिंगपूलच्या सहा फुट खोल भागात पोहत जाऊन आलो तेंव्हाच आनंद काय वर्णावा! Happy

हाच आनंद इतरांनाही मिळावा म्हणूनच हा लेखनप्रयास. आशा आहे कि तुम्ही नक्की प्रयत्न करून पाहाल व पोहायला शिकाल. माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उताणे पोहणे थोडे शिकले आहे(म्हणजे अर्धी लॅप झाली की परत सरळ होते.
पाण्यावर पूर्ण विश्वास ठेवून मान मागे करून पाय सोडून द्यावे लागतात(पाणी पाय टेकेल असे असल्यास).यातला पाय सोडणे पार्ट सुरुवातीला कठीण जातो.

वाह मानव अभिनंदन Happy इतका लेखनप्रपंच केला त्याचा कुणालातरी उपयोग होतोय हे छान वाटतंय.

तिसऱ्या टप्प्यात समस्येचे जे तुम्ही वर्णन केलंय त्यावरून पाण्याची पातळी जास्त तर नव्हती ना, असे वाटत आहे. कमर आणि छातीच्या दरम्यान पाणी असेल तर उभे राहणे फार अवघड जात नाही असा माझा तरी अनुभव आहे. उभे राहताना जरा सावकाशच हालचाली कराव्या लागतात हे बाकी खरे. पण ते असो. आपण हा टप्पा पार केलात अखेर. याचा अर्थ एका श्वासात शक्य तितके अंतर काटू शकता आपण आता Happy चौथा टप्पा झाला कि नकी अपडेट द्या. उताणे पोहण्याच्या बाबत मला तरी काही सांगता येणार नाही. @व्यत्यय आणि @mi_anu यांनी दिलेल्या टिप्ससाठी धन्यवाद.

>> तिथे आपल्याला पाण्यात तरंगाचीही भिती वाटते हे न्यूनगंड आणनारे आहे>> मला तर वाटतं हीच बेस्ट अपॅार्चुनिटी आहे

सहमत आहे @म्हाळसा Happy कमरेहून अधिक खोल पाण्यात उतरायला घाबरणारा मी, मुलगा सात-आठ वर्षाचा होता तो पोहायला लागला तेंव्हा त्याच्या निमित्ताने नियमितपणे पाण्यात उतरायला लागलो. मग मीच ठरवले स्वत:हून शिकायचे. शिकत असताना बाजूची मुले मला "तसं नाही हात मारायचा काका, असा मारायचा" म्हणून मला टिप्स देत Lol त्यामुळे @ऋन्मेऽऽष येत्या उन्हाळ्यात ६५ वर्षाचे झालोय असे समजा आणि करा सुरु Wink Biggrin

@हरचंद पालव... शिरा पोहा Lol

हा लेख उन्हाळ्यात पोहायला शिकण्याबद्धल आहे.. तुम्ही सगळे डिसेंबर मध्ये ट्राय करताय म्हणून जमत नाहीय.. उन्हाळा येऊ द्या...

अतुल मी छाती एवढ्या पाण्यातच सुरवात केली होती. मी आधी घाई करत होतो श्वास पूर्ण बाहेर सोडला की वर येऊन श्वास घ्यायची, त्या नादात तसे होत होते, नीट रिदम जमत नव्हते सुरवातीला. एकदा ती अडचण पार केली, आता खोल पाण्यात डुबकी मारायला भीती नाही वाटत, तरी नाक पाण्याबाहेर राहील एव्हढ्याच पाण्यात जातोय सध्या.

व्यत्यय, अनु तुम्ही सांगितलेल्या ट्रिकने उताणे तरंगणे जमले.
पण जरा धांदल होऊन नाकात थोडं पाणी शिरतय, सायनसमध्ये. जलनेती केल्या सारखं वाटलं. (आज रविवार असल्याने चांगलीच गर्दी होती, पोरं धुमाकुळ घालत होते पाण्यात बऱ्यापैकी लाटा येत होत्या, त्यामुळेही असेल.)
पण ट्रिक कळली, प्रॅक्टिस करावी लागेल.

पालथं पोहताना तोंड थोडे जरी बाहेर काढले, मान वर करून किंवा आडवी करून की पाय चांगलेच खाली जातात. पाण्यात श्वास बाहेर सोडत गेलं तरी पाय आणि डोकं खाली जातंय. वेगवेगळे स्ट्रोक्स ट्राय केले. त्यातल्या त्यात ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये तोंड पाण्याबाहेर काढुन श्वास घेणे तीन स्रोक्स पर्यन्त जमते मग पाय खाली टेकतात.
चौथा टप्पा अवघड वाटतोय. चांगले रिदम जमायला हवे हे लक्षात आले. वेळ लागेल.
दरम्यान फ्रॉग किक + ब्रेस्ट स्ट्रोकने पूल आडवा पार केला श्वास रोखुन, ५० फूट.

चौथा टप्पा अवघड वाटतोय. चांगले रिदम जमायला हवे हे लक्षात आले. वेळ लागेल.

>>> जमेल जमेल... इतके सगळे जमले.. कल्पनाशक्ती चांगली आहे... हे पण जमले असा प्रतिसाद लिहायला लवकर जमु दे...

लाटा आल्या किंवा कोणी खूप धबाधब हात पाय मारुन जवळ पोहत असेल तर की उताणे तरंगणे सुरुवातीला कठीण होते. (मी समुद्रात भरतीच्या लाटांवर उताणे होऊन किंचीत डुलकी लागणारे एक्स्पर्ट लोक पण पाहिले आहेत, हे फारच डेंजर आहे.)

लेख माहितीपूर्ण आहे. धन्यवाद. टप्पा दोन अजुन माहिती पाहिजे. आठ दिवस झाले बारला पकडून नाकाने पाण्यात श्वास सोडला की पाय तरंगतात, पण बारवरील हात सोडायची भिती वाटते. सध्या पाण्यावर श्वास घेऊन पाण्यात नाकाने श्वास सोडतोय. डुबकी मारतोय. हात सोडला तर डाव्या-उजव्या बाजूला तोल जाईल असे वाटते म्हणून हात सोडवत नाही.

-दिलीप बिरुटे

धन्यवाद सर _/\_ छाती भरून श्वास घेतलेल्या अवस्थेतच बार ला धरून डोके पाण्यात असताना व शरीर तरंगत असताना फक्त बारचा हात सोडायचा आहे. जसे मी तिथे लिहिले आहे तपशिलात कि इथे भीती वाटणे स्वभाविक आहे (वाहत दुसरीकडे जाणे किंवा तोल जाणे वगैरे) त्या भीतीवरच तर मात करायची आहे. तुम्ही स्विमिंग गॉगल आणि कॅप घाला. डोळे उघडे ठेऊ शकत असल्याने आत्मविश्वास वाढेल. चार फुट पाण्यात तुम्ही उभे राहू शकत असाल तर भीतीचे काहीच कारण नाही. शुभेच्छा!

>> Submitted by मानव पृथ्वीकर on 12 December, 2021 - 20:08
मानव जमले का हो अखेर?

>> समुद्रात भरतीच्या लाटांवर उताणे होऊन किंचीत डुलकी लागणारे
अहो आमचे प्रायमरी स्कूल चे सिल्याबस आहे हो. तुम्ही डॉक्टरेटचा मुद्दा उपस्थित केला Lol

>>> तरंगत असताना फक्त बारचा हात सोडायचा आहे
नेमके हेच होत नै, असं करायला गेलो एकदा आणि भितीने एक पाय खाली वर झाला गडबडलो नाका तोंडात पाणी गेलं आणि कांफिडेंस लेवल पार ६७ .% वरुन लेवल ०६. १२ % वर आलीय. पोहणे नको आणि काही नको असे वाटले. तरुण पोरं फ्लोटिंग वगैरे करतांना पाहुन आता आपल्याला हे शक्य नाही असे वाटले, पुन्हा आठ एक दिवस बघतो आत्मविश्वास वाढावा असे वाटते. यूट्यूब वगैरे सगळं पाहून आलो प्रात्यक्षिकही सुरु आहे, पण वय आणि आत्मविशवास ही गोष्ट महत्वाची आहे, आपल्या धाग्याने हुरुप वाढलाय तो किती टीकतो ते लिहीनच. धन्स.

-दिलीप बिरुटे

कमी खोल पाण्यात पहिले try करा.
तुम्ही उभे राहायला तर डोक पाण्याच्या वर च राहील इतकीच खोली असावी.
तरण तलाव मधील पाणी शांत असते .
त्या मुळे तुमचा तोल जाण्याचा प्रश्न च नाही.
तुम्हाला भीती वाटली किंवा कोणी तलावात उडी मारली तर लाटा तयार होतील आणि तुम्ही तुमचा तोल सांभाळू शकणार नाही.
ते फक्त सुरवातीला टाळा

आर्किमिडीज च्या तत्व नुसार .कोणत्याही घन पदार्थ पाण्यात टाकला तर त्या वस्तू च्या आकारमान इतके पाणी बाजूला सारले जाते.
आणि त्या पाण्याच्या वजना इतका फोर्स त्या वस्तूला वर उचलून धरतो.
त्या मुळे पाण्यात बुडणे तसे अशक्य असते.
फक्त भीती मेली पाहिजे.
सरळ पाण्यात उभे राहून नॉर्मल हात जरी हलवले तरी बुडण्याची शक्यता खूप च कमी असते.
भीती पहिली मनातून काढून टाका

@ अतुल Nov 2021 नंतर गेलोच नाही पोहायला.
परत जायचे आहे बघु केव्हा मुहूर्त निघतो. जेवढे शिकलो तेवढे विसरलो नसेन अशी आशा आहे.

@दिलीप बिरुटे: श्वास पूर आत घेऊन छाती एवढ्या पाण्यात बारचा हात सोडून अगदी सावकाश पणे दोन्ही पावले एकत्रच ठेवून हळूहळू खाली आणुन उभे राहायला शिका. पॅनिक न होता. एक पाय वर खाली असे केले तर पॅनिक व्हाल. असे उभे राहणे जमले की आपोआप आत्म विश्वास वाढेल. मग तेवढ्याच पाण्यात दोन्ही पावले एकत्र ठेवुन आडवे वळुन / गिरकी घेऊन मग उभे राहणे असे करा.
हे एकदा जमले की पाय एकत्र नसले तरी योग्य वेळी ते एकत्र आणुन उभे रहाणे आपसूकच येईल.

बाफ वर आला का. मला लैच आ वडते पोहायला . पण इथे मस्त टँकच नाही. कालि दास मध्ये विचारून बघते. नाही तर ठाणे क्लबचा आहे. पैसे भरुन मग न केलेली अ‍ॅक्टिविटी. आमच्या पुण्याच्या टिळक ट्यांकची सर नाही हो मुंबईच्या पाण्याला.

सध्या पाठीवर तरंगण्यासाठी (back floating) धडपड सुरू आहे. नेहमीचे पोहताना मधे मधे काठावर थोडा प्रयत्न करते तेपण कठड्याला धरून च. त्या बारवरचा हात सोडून करेन तो आनंदाचा दिवस असेल माझ्यासाठी.

पोहणे हे सहज माणूस कमी वयातच शिकतो.
अगदी बाल वयातच पोहणे सहज शिकू शकतो.
,30 ओलांडल्या नंतर पोहणे ही कला आत्मसात करणे खूप अवघड असते.
सायकल विषयी पण तेच आहे.
लहान वयातच आरामात आत्मसात केली जाते ती कला

म्हणून असे बोलले जाते.
योग्य वयात योग्य ती कला शिकून घ्या.
आणि योग्य वयात योग्य ती काम उरकून घ्या.
वेळ कोणासाठी थांबत नाही.

पोहण्याविषयी म्हणाल तर यामध्ये माइंड गेम जास्त आहे. तिशीनंतर शिकायला त्रास होणारच हा समज आधी काढून टाका. जेष्ठ नागरिक सुद्धा पोहायला शिकू शकतात.
तसेच काही लहान मुले अशीही पाहिली आहेत जी पाण्याच्या भितीने अजिबात शिकत नाहीत. पालक व प्रशिक्षक हरतर्हेने प्रयत्न करून शेवटी हात टेकतात.

पोहता येणे,
ही प्राथमिक अवस्था आहे.
नदी मध्ये पोहता येणे हे वेगळे.
तलावात पोहता येणे हे वेगळे
समुद्रात पोहता येणे हे वेगळे.
शांत पाण्यात पोहता येणे हे वेगळे.
वाहत्या तीव्र वेग असलेल्या पाण्यात पोहता येणे वेगळे .

भोवरे असणाऱ्या जागेतून बाहेर पडणे हे वेगळे

प्रवाह विरुद्ध पोहता येणे हे वेगळे.
तलावात किंवा शांत पाण्यात पोहणाऱ्या व्यक्ती नी मला पोहायला येते म्हणून.
वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरू नये.
समुद्रात उतरू नये.
ज्या पाण्यात भोवरे आहेत त्या पाण्यात उतरू नये.

चला चला उन्हाळा आला
स्विमिंग करायचा वेळ झाला

आमच्या सोसायटीमधला स्विमिंगपूल बऱ्याच कालावधीनंतर यावर्षी पुन्हा सुरू झाला कालपासून Happy

माझी आतापर्यंत झालेली प्रगती म्हणजे पाठीवर पोहता येऊ लागले आहे. आता पाठीवर पोहता पोहता वळून पोटावर पोहायचे (back to front) आणि तसेच उलट्या प्रकारे असा प्रयत्न सुरू आहे. त्याबरोबर सूर मारणे (?) Under water swimming याचाही सराव सुरू केला आहे.

नाही ना. होळी/रंगपंचमीला स्विमिंग पूल बंद ठेवतात. Wink

उलट पोहायला येण्यासाठी body buoyancy तशी असावी लागते का? कारण मी कितीही वेगवेगळे प्रयत्न केले तरी चेहरा पूर्ण पाण्याखाली बुडतो. श्वास घेताच येत नाही. हात पाय सतत हलवून वगैरे पाहिले पण उपयोग नाही.

याउलट काही लोक विनासायास अगदी निवांत पाण्यावर उलट झोपू शकतात. खुद्द आमचे चिरंजीव. बेडवर झोपल्यासारखे अगदी निवांतपणे पडून राहतो पाण्यावर Lol

body buoyancy >> हो ती थोडी बदलू शकते आणि त्याने खूप फरक पडतो. body buoyancy ही displaced पाण्याच्या वजनापेक्षा किंचित जरी कमी झाली, तरी body बुडते. आपल्या शरीरात असणारं एकूण मेद (पूर्ण वजनाच्या टक्केवारीत) किती आहे यावर body buoyancyत थोडासा फरक पडतो. लहान मुले दिसायला बारीक असली तरी मेद एकूण वजनाच्या प्रमाणात थोडेसे जास्त % असावे असा कयास आहे. किंचित जास्त प्रमाण सुद्धा पुरते.

Kids burn more fat, and need more fat, than adults

तुम्हाला सांगितल्यास विश्वास बसणार नाही पण वरचे तीन टप्पे मी महिन्याभरात पार केले, पण हा एक शेवटचा टप्पा पार करायला मात्र मला अजून तीन-चार महिने घालावे लागले. याला कारण म्हणजे पोहताना श्वासोच्छवास करण्याचे प्रभावी व सोपे तंत्र मला काही केल्या अवगत होत नव्हते. यासाठी मी अनेक युट्युब व्हिडीओज पाहिले, पोहायला येणाऱ्यांना सल्ला विचारला पण कशाचा काहीच फायदा नाही. मला त्यातले एकही तंत्र जमत नव्हते.

===> Same - Same

मला अजून चौथा टप्पा पार करता आला नाही. बॅकस्ट्रोक मला छान जमते. "Survival Pose: Backstroke" असे माझ्या कोच ने सांगितले होते.( म्हणून शिकले लगेच). दोन- तीन महिने प्रयन्त करून सुद्धा freestyle काही जमली नाही. हा लेख आणि सर्वांचे प्रतिसाद बघितल्या नंतर परत एकदा आपण पोहायला शिकू शकतो अशी आशा निर्माण झाली आहे.

@संकेता, माफ करा तुमचा प्रतिसाद अनेक महिन्यांनी पाहिला. खूप खूप धन्यवाद आणि पुढील पाणपोहीसाठी शुभेच्छा.
(जनरली वाटचाली साठी शुभेच्छा देतात. पण इथे वाटही नाही आणि चालणेही नाही. जे आहे ते पाणी आणि पोहणे. म्हणून पाणपोहीसाठी Lol )
बॅकस्ट्रोक सहजी जमतोय म्हणजे नशीबवान आहात आणि तुमच्याही प्रयत्नांना मनापासून दाद Happy

@हरपा, तुमचाही प्रतिसाद जवळपास वर्षभराने वाचला. होय body buoyancy ला खूप महत्व आहे. विशेषतः बॅकस्ट्रोक मध्येच body buoyancy चा जास्त फायदा होतो असे माझे मत आहे.

Pages