वेल्डिंग- बिगिनींग ऑफ ए लव्हस्टोरी

Submitted by आनंद. on 24 January, 2018 - 11:18

"वेल्डिंग-बिगिनींग ऑफ ए लव्हस्टोरी"

नविन मित्रमैत्रिणी बनत असताना एखादा असा काही प्रसंग घडतो की त्या प्रसंगाने समोरचा अथवा समोरची आपल्यासाठी एकदमच खास बनून जातात. मग तो प्रसंग म्हणजे एखादा भांडणाचा क्षण, मुद्दामहून काढलेली खोडी, नकळत घडलेला लहानसा अपघात किंवा लहानश्या प्रसंगात घेतलेली एकदुसर्याची काळजी असलं काहीही असू शकतं. अशा खास प्रसंगानंतर मैत्रीचं रोपटं सर्वांगानं आणखी बहरतं हे आपल्यापैकी अनेकांनी अनेकदा अनुभवलं असेल. अशीच माझी एक लहानशी आठवण.

एम एस फ्लैट, साईज पन्नास बाय पन्नास बाय आठ एम एम. पॉवर हेक्सॉवर कटींग करणे आणि नंतर त्याला फाइलिंग करून (कानशीने घासून) अठ्ठेचाळीसचा चौरस बनवणे ही मेकैनिकल इंजिनियर बनण्याची पहीली प्राथमिक पायरी असते. एकदा हे जमलं की मग त्या तुमच्या 'जॉब'वर ड्रिलिंग, टैपिंग, वेल्डिंग आदी ऑपरेशन्स केले जातात. प्रत्येक मैकेनिकलवाल्याला ही घिसापिटी करावी लागते. तर अशीच त्या काळातली म्हणजे मी डिप्लोमाच्या पहील्या वर्षाला होतो त्यावेळची ही गोष्ट.

एके दिवशी कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये प्रैक्टिकल्सच्यावेळी मी वेल्डिंग करत असताना; खरंतर वेल्डिंग करणं शिकत असताना चुकून वेल्डिंग इलेक्ट्रॉड आणि वर्कपिस या दोन्हींना एकाचवेळी हातांचा स्पर्श झाला न् जोराचा झटका बसला. आपोआप हात बाजूला फेकला गेला. थोडं घाबरल्यासारखंही वाटलं पण मग लगेच ध्यानातही आलं की हा शॉक इतकासुद्धा जोराचा नाहीये की त्यामुळे जिवाला काही धोका निर्माण होईल! उलट सगळं अंग (शरीर) झटका बसल्यानं 'मोकळं' होतं हा नविनच शोध त्यावेळी मला लागला. Lol मी आधी आजूबाजूला बघितलं. जवळपास माझ्याकडे लक्ष असेल असं कोणीही नव्हतं. मग हलकेच पुन्हा एकवार तो 'थरारक' अनुभव घेण्यासाठी परत एकदा दोन्हींना स्पर्श करुन बघितला. पुन्हा अंग मोकळं! मज्जा, गंमत असलं बरंच काही त्यावेळी वाटलेलं. शोध तर लागला आता कोणीतरी गिर्हाईक बनवायचं असा भन्नाट विचारही मनात आला. इतक्यात समोरून 'ती', तिचे जॉब घेऊन येताना दिसली, लैप जॉईंट साठी. मनांत म्हणालो, 'ही मस्त आहे आणि.. आणि स्वस्त सुद्धा!' मला माझंच हसू आलं.

"ऐ आनंद, एवढं वेल्डिंग करून दे ना." ती जवळ येत आणि चेहर्यावर स्मित आणत बोलली.

मी आधी थोडासा 'भाव' खाल्ला कारण वेल्डिंग रॉड, वर्कपिसला न चिकटता वेल्डिंग करणं आमच्या सगळ्यांमध्ये तोपर्यंत फक्त मला एकट्याला जमत होतं. [वेल्डिंग करत असताना वेल्डिंग इलेक्ट्रॉड आणि वेल्डिंग पॉईंट (ज्या ठिकाणी वेल्डिंग करायचं तो सरफेस) यांमध्ये स्पार्क गैप मेंटेन करणं आवश्यक असतं. तसं करता न आल्यास इलेक्ट्रीक आर्क प्रोड्यूस न झाल्यानं इलेक्ट्रॉडचं मेल्टिंग होत नाही आणि तो वर्कपिसला चिकटून बसतो परिणामी वेल्डिंग होत नाही किंवा झालंच तर अगदीच ओबडधोबड होतं.)

ती पुन्हा एकदा मला विनंतीवजा बोलली, "दे ना रे, प्लिज."

"चल मी शिकवतो तुला कसं करतात वेल्डिंग ते." मी म्हणालो.

"नको बाबा, तूच दे करून. मला भिती वाटते, शॉक बसण्याची." ती म्हणाली.
मला जाम हसू आलं, कारण मी तेच तर करणार होतो.

"आण इकडे तुझे जॉब." हसू आवरत मी तिला ते पट्टीचे तुकडे देण्यास सांगितलं.
तिने ते दिले आणि माझ्यासमोर दोन पायांवर जमिनीवर खाली बसली. तिनं दिलेले ते दोन्ही पट्टीचे तुकडे एकमेकांवर हव्या त्या पोझिशनमध्ये ठेवून मी जवळच पडलेल्या एका आठ-दहा इंच लांबीच्या लोखंडी पाईपच्या सहाय्याने तिला तिचे ते जॉब एकमेकांवर ठेवलेल्या, आहे त्या स्थितीत दाबून धरण्यास सांगितले. तिने उजव्या हातात पाईप पकडून त्याच्या मदतीने पट्टीचे तुकडे दाबून धरले.
मी वेल्डिंगच्या होल्डरला इलेक्ट्रॉड बसवला आणि हाताने तो थोडा वाकवला. वेल्डिंग करण्यासाठी होल्डर पकडलेला हात उचलला आणि.. आणि तिचं लक्ष नाही असं बघून तिच्या डाव्या मोकळ्या असलेल्या हाताला, जसं काही चुकूनच माझ्याकडून घडलंय अशा तर्हेनं वेल्डिंग इलेक्ट्रॉडचा ओझरता स्पर्श करवला!
क्षणात करंट बसल्याने तिच्या हातामधला पाईप सुटला न् तोंडाने 'आंss' असा आवाज करत ती पटकन् उठून उभी राहत दूर बाजूला झाली. प्रचंड घाबरलेली ती थरथर कापायला लागली. दोन्ही डोळ्यांतून गंगाजमुना वाहू लागलेल्या. माझी तिला तसं कावरीबावरी होऊन रडताना बघितल्यानं हसून हसून पुरेवाट झालेली. तिचं रडणं आणि माझं हसणं बघून आजूबाजूला विखुरलेले आमचे दोघांचे मित्रमैत्रिणी आमच्याजवळ पटापट जमा झाले. सगळेजण विचारू लागले, 'काय झालं काय झालं..'
तिची अवस्था फारच केविलवाणी झालेली दिसत होती मग मात्र मला तिची थोडी दया आली, जागेवरून उठून मी तिच्याजवळ गेलो. दोन्ही गालांवर ओघळणार्या पाण्याच्या धारा, फुललेला मुळचा गोरा असलेला पण आता ताम्रवर्णी झालेला चेहरा, लालबुंद झालेला नाकाचा शेंडा, वाढलेली श्वासांची गती आणि मला पुढ्यात नजरेसमोर बघून रागाने काहीतरी सुनावण्यासाठी उघडलेले थरथर करणारे नाजूक ओठ.. मी शांतपणे तिच्या डोळ्यांत बघत खिशातून रूमाल बाहेर काढला आणि तिच्यासमोर धरला. ती तशीच जाग्यावर स्तब्ध; काय बोलावं, करावं तेही तिला सुचेनासं झालेलं. मी 'सॉरी' बोलत रूमालाची घडी अलगद तिच्या गालावर टेकवली. मग मात्र तिने रूमाल आपल्या हातात घेतला, हलकेच त्यानं डोळे पुसले. शांत झाली आणि प्रसन्न हसली. विचारपूस करणार्या मित्रमैत्रिणींना तिनं सांगितलं, 'वेल्डिंगचा गरम चटका बसला.' कारण 'करंट बसला' सांगितलं असतं तर विषय कुठल्या कुठे पोहोचला असता! तिला ते नको होतं. तिनं दाखविलेल्या प्रसंगावधानाचे आणि हुशारीचे मला कौतुक वाटले.
जरा वेळाने सर्वजण पांगले. आम्ही दोघेजण पुन्हा तिचे जॉब वेल्डिंग करण्यासाठी खाली बसलो.
माझ्या कानाजवळ येत हलकेच दबक्या आवाजात ती कुजबुजली, "मला एकदा करून बघू दे ना.. सगळं अंग मस्त मोकळं मोकळं होतं." आणि दिलखुलास हसायला लागली.
तिच्या हसण्यानं माझी कळी खुलली!

वर्कशॉपचा इन्चार्ज त्यावेळी तेथे नसल्यानं आम्हाला हा उद्योग करता आला, त्यालाही धन्यवाद द्यायला हवेत!

―आपलाच अ।नंद. /२४.०१.१८

[तळटीप- हा प्रयोग रिस्की असतो कारण
१) नॉर्मली सेकंडरी कॉईलचे व्होल्टेज कमी केलेले असले तरी जर ट्रांसफार्मर शॉर्टसर्कीट झाला असेल तर जिवावर बेतू शकते.
२) बहुतांश आर्क वेल्डिंग मशीन्स खालच्या बाजूने संपूर्णपणे मोकळ्या असतात, तसेच बाजूनेसुद्धा कुलिंगसाठी वेंटीलेशन केलेलं असल्याने आतमध्ये पाल, उंदीर, घूस, मांजराचं किंवा कुत्र्याचं लहानसं पिल्लू वैगरे गेल्यानं टर्मिनल्स जोडले जाऊन विजेचा जोरदार धक्का बसून मृत्यू ओढावू शकतो.
३) एखादी इनपुटची लाईव्ह वायर उघडी पडून आतमध्ये इतरत्र टच होऊन इलेक्ट्रीक सप्लाय लिकेज झालेला असू शकतो.
आणखीही बर्याच गोष्टी सांगता येतील, सर्वांचा उद्देश्य एकच- आम्ही केलं तसं कुणीही करू नये. या फोरमवर वाचनमात्र असलेले अनेक लहान कॉलेजवयीन मुलंमुली असतील ज्यांना हे वाचून वर्कशॉप प्रैक्टिकल्सच्यावेळी आम्ही केलं तसं करावं वाटेल. कृपया करू नका, ते धोकादायक असतं.]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळाच अनुभव....
वेड्या वयातले वेडे प्रयोग... Bw
पण असं नाही केलं तर त्या वयाला वेडं वय कस म्हणणार..?

मस्त झटकेबाज अनुभव..
बाकी वेल्डींग आणि तत्सम मेकेनिकल प्रकार पहिल्या वर्षाला वर्कशॉपला सर्वांनाच असतात आणि थोडेफार आम्हीही केले आहेत .. अर्थात मी सारे कोणाकडून तरी करून घेणे केटेगरीतील असल्याने मी स्वतः फारसे काही केले नाहीये Happy