दिवाळी अंक २०१७

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 16 October, 2017 - 05:40

हा धागा यावर्षीच्या दिवाळी अंकांबद्दल चर्चा करण्यासाठी आहे.

कुठले दिवाळी अंक आपण वाचले, त्यातील कुठलं साहित्य वाचलं, काय आवडलं, काय नाही आवडलं इत्यादी समग्र गोष्टींबाबत आपली मतं इथे मांडता येतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॉमेडी कट्टा चांगला आहे. साहित्यिक दुष्काळ ही ह. मो. मराठे यांची व्यंगकथा लेखकांना विशेष आवडेल. प्र. के. अत्रे यांचा पुणेरी टांगावाल्यांवरील खुमासदार लेख विशेष वाटला. इतर विनोदी अंकांत न आढळणारे काही सेक्शन्सही आहेत

पासवर्ड तर लहान मुलांसाठी बेस्ट, मोठ्यानाही वाचायला मजा येते

ॠतुरंग अंक सुरेख आहे.अरुण शेवते संपादक असून या अंकाची थीम 'माझ्या मनातलं' ही आहे.
गुलजार,परवीन सुलताना,गिरीश कुबेर्,सुशिलकुमार शिंदे,पर्रीकर्,गडकरी आदी मान्यवरांचे लेख आहेत.थीम जरी एकच असली तरी कुठेही साचेबंदपणा नाही.अंक मस्त अ॑अणि वाचनीय आहे.
अजून बराच वाचायचा आहे.

किस्त्रीम माझा (दरवर्षीच) अत्यंत आवडता दिवाळी अंक.
संपादक विजय लेले यांनी 'सावध ऐका पुढल्या हाका ' या लेखात २०१९ ची तयारी केलीय. नमनाला पुरोगाम्यांना पोटभर बोल लावल्यावर त्यांनी देशातील सद्य परिस्थितीचा आढावा घेतलाय. सद्य सरकारच्या अचीव्हमेंट्सबद्दल लिहिल्यावर पुढे सगळं काही आलबेल नाही, असं ते म्हणतात, हीच एक मोठी गोष्ट आहे. राज्यसभेत अनुपस्थित खासदारांबद्दल लिहिताना रेखाचा उल्लेख एकेरी तर सचिनचा आदरार्थी केलाय.
"भारतीय वैज्ञानिकांचा मोर्चा कशासाठी?" या लेखात मोर्चेकर्‍यांवर शरसंधान आहे. जगभरातल्या मोर्चांपेक्षा या मोर्चाची वेळ आणि उद्देश (मोदींविरुद्ध जनमत तयार करणे) वेगळे का? ९ ऑगस्टच्या मोर्चात अंनिसवाले , शाळकरी मुले आणि सरकारी नोकरीतलेच वैज्ञानिक होते. मोर्चाच्या मागण्यांचीही वासलात लावलीय. एकीकडे संशोधन संस्थांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढल्याचे आकडे आणि संशोधकांचे उत्तरदायित्व असा ताळेबंद मांडलाय. त्यातलं एक वाक्य - पांढरा हत्ती असणार्‍या विज्ञानक्षेत्राचे, ओझे वाहून समाजाला उपयोगी ठरणार्‍या बैलामध्ये रूपांतर करण्याचे (नरेंद्र मोदी सरकारने) ठरवले.

छद्मविज्ञानाबद्दल लिहिताना "हेही सर्वमान आहे," असे शेपूट लावलेल्या वाक्यांची जंत्री आहे. पण त्यात गणपती-प्लास्टिक सर्जरी हे नेमके टाळून अन्य काही उदाहरणे देऊन "पंतप्रधानांनी जे काही सांगितले ते अगदीच अवैज्ञानिक नव्हते" अशी पुस्ती जोडली आहे. विमान शास्त्र, गांधारीचे १०० पुत्र हेही पुढे आलेच आहे.
शेवटच्या परिच्छेदातलं वाक्य : चार- साडेचार शतकांच्या छोट्याशा काळातच आधुनिक विज्ञानाच्या अनियंत्रित झालेल्या प्रगतीने जगाला विनाशाच्या कड्यावर आणले आहे, हे अनेक ज्येष्ठ शास्त्रज्ञ मान्य करतात.
पंप्रंनी पॅरिस कराराला दिलेल्या बिनशर्त पाठंब्याने काही पुरोगामी, बुद्धिनिष्ठांची पंचाईत होऊ लागली आहे, म्हणून हा मोर्चा असा निष्कर्ष शेवटी दिला आहे. (जे अमेरिकेतले वैज्ञानिक ट्रंप यांच्या पर्यावरणविरोधी भूमिकेच्या विरोधात रस्त्यावर आले याची ही भारतीय कॉरोलरी असावी).
इतर लेखांबद्दल थोड्या वेळाने लिहितो.

ॠतुरंग अंक सुरेख आहे. त्यातील लता मंगेशकर , मनोहर परीकर यांचे लेख सुंदर आहेत. राजीव खांडेकर पण. सगळेच लेख सुंदर आहेत.

किस्त्रीम : सर्वव्यापी गुंडाराज या लेखात दादुमियाँनी सगळ्या क्षेत्रांतल्या गुंडाची यादी बनवलीय.
पहिली यादी अंडरवर्ल्ड डॉन, बाहुबली, डाकू (फूलनदेवी) यांची आहे.
राजकारणातल्या गुंडोबांत फारुख अब्दुल्ला, लालु यादव्म पी चिदंबरम, के करुणाकरन, बन्सीलाल आणि शरद पवार आहेत.
धर्म गुंडांत स्वामी अग्निवेश (हिंदू द्वेष्टा म्हणून) , आचार्य रजनीश (मराठी नेत्यांना पुण्याची बामणी संस्कृती बदलायची होतील त्यांनी लाच घेऊन कोरेगाव आश्रमाला परवानगी दिली). जयेंद्र सरस्वती हीदेखील नावे आहेत.
अर्थकारणातले गुंड म्हणजे एनपीए करणार्‍या कंपन्या. इथे विजय मल्ल्याला दोन वाक्ये आणि बाकी कंपन्यांना फक्त आकडे मिळालेत.
शिक्षणक्षेत्रातील गुंडसम्राट म्हणजे शिक्षक, विद्यार्थी आणि संस्था.

'नथुरामच्या गोळीने हिंदुराष्ट्र खल्लास' हा लेख लिहिणारे अनिरुद्ध बिडवे यांनी सावरकरांना कलंकमुक्त करायचा वसा घेतलाय. त्यामुळे गांधीहत्येशी (हो, हत्याच म्हटलंय) सावरकरांचा कसा संबंध नाही, त्यांच्या विरोधकांप्रमाणेच त्यांचे काही अनुयायीही व गोडसेंचे सहकारीही तो जोडतात, इ. मजकूर आहे.
: सावरकरांचे हिंदुराष्ट्राचे स्वप्न स्वातंत्र्यानंतर जवळजवळ साकार झालेच होते. "वयपरत्वे विकल झालेले गांधी आज ना उद्या जाणारच होते, त्यांच्यामागे त्यांचे (मुस्लिम अनुनयाचे) तत्त्वज्ञानही संपणार होते. आणि मग हिंदुराष्ट्राच्या मार्गात कोणताही अडथळा राहणार नव्हता. पण नथुरामचा आततायीपणा नडला" हिंदुराष्ट्राचे सेनानी वि.रा.पाटील यांच्याशी बोलून हा लेख त्यांनी लिहिलाय.

श्यामसुंदर मुळेंचा "तीन वादग्रस्त मुद्दे" रामजन्मभूमी प्रकरणाबद्दल लिहिताना व्ही पी सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात लालू प्रसाद यादव यांनी लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा रोखल्यावर , डायरेक्ट भाजपने राममंदिराच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. १९९१-९२ ही वर्षं पाडलेल्या बाबरीमशिदीसोबत आणि देशभरात झालेल्या दंग्यांसोबतच गायब झाली. लेखातला समान नागरी कायदा आणि कलम ३७० वरचा भाग मी वाचला नाही.

अपेक्षाभंगाची लाट हा ह मो मराठेंचा लेख उगाच आहे. स्वतःच्या आयुष्याला देशाच्या राजकारणाची पार्श्वभूमी असा वाटला.

डॉ पु ग सहस्रबुद्धेंचा "हिंदू समाजाचे भवितव्य" हा पन्नास वर्षं जुना लेख किस्त्रीमने छापला आहे.
राष्ट्रवाद म्हणजे हिंदुत्व असं काहीतरी गृहीतक ठेवून हा लेख लिहिलाय. लेखातला काही भाग पटण्यासारखा आहे. पण बरेच अंतर्विरोध आहेत. हिंदु धर्मातल्या अनिष्ट गोष्टींमुळे पिछेहाट झाली, पारतंत्र्य आले. दुसरीकडे परकीय आक्रमकांनाही दोष.
भारतीयांना राष्ट्रवादाची जाणीव इंग्रजी शिक्षणामुळे झाली, पण शिवाजीमहाराज, राणाप्रताप, इ. राष्ट्रासाठी लढले.
राजा राममोहन रॉय, आगरकर, स्वामी दयानंद सरस्वती, इ. सुधारकांनी हिंदू धर्माच्या उत्थानाचेच काम केले.
मिशनर्‍यांचा आदर्श ठेवून गरीब, रोगी, दीनदलितांची, आदिवासी सेवा, प्रगती करून त्यांना हिंदू धर्मात आणले पाहिजे (तेच काम करणारे मिशनरी मात्र आपले शत्रू)
हिंदू रोग्यांची सेवा करतात तेव्हा बाबा आमटे हे हिंदू धर्मासाठी काम करतात.
हा लेख लिहिताना लेखकाला तेव्हा नुकत्याच स्थापन झालेल्या विश्व हिंदू परिषदेकडून बर्‍याच आशा होत्या असे दिसते.

`इंग्रजी माध्यम मुक्त महाराष्ट्र' या लेखात अनिल गोरे यांनी खासगी इंग्रजी शाळां व महाराष्ट्र बोर्डाखेरीज अन्य बोर्डांच्या शाळांईल शिक्षण कमी दर्जाचे असते. शासननियंत्रित (म्हणजे अनुदानित असावे) मराठी शाळांतील विद्यार्थी पुढे अधिक यशस्वी होतात. याची त्यांच्या परीने कारणे देऊन मीमांसा केली आहे.
मराठी माध्यमातून शिकवण्याचे त्यांनी दिलेले एक कारण - मराठी शब्द कमी अक्षरांचे. मराठी शब्द कमी वाक्यांची.शब्दक्रम लवचिक. इंग्रजीत अन्य अनेक भाषांतील शब्द आल्याने त्या त्या भाषांची ओळख नसेल, तर बारकावे कळणार नाहीत. मराठीत असे नाही.इंग्रजीतून शिकवलेलं समजायला वेळ जास्त लागतो म्हणुन शाळेची वेळ जास्त, दप्तरंजड. इतकंच काय तर इंग्लंडमध्येच १८६० मध्ये शिक्षणतज्ज्ञ नको नको म्हणत असताना इंग्रजी माध्यम लादले, त्यामुळे इंग्लंडची गेल्या १५७ वर्षांत घसरण, कडेलोट असं काय काय झालंय.

अंकातली एकच कथा मी वाचली. स्नेहलता दसनूरकर यांच्या जनशताब्दीवर्षाची सुरुवात म्हणून त्यांची पहिली कथा 'उलटलेला डाव' या अंकात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातली कथा आहे. आज ती वाचताना गंमत वाटते. किती दशकं लोटली तरी अशा फ्लॅशबॅकने सुरू होणार्‍या , एखादा महत्त्त्वाचा प्रसंग आणि त्याचवेळी नायक किंवा नायिकेला आपला आयुष्यपट आठवावा, अशा कथा अजूनही लिहिल्या जातात, याचीही गंमत वाटते.

एका कथेतील रेखाचित्रातले चेहरे पंकजा मुंडे, आर जे मलिश्कासारखे का आहेत ते कळलं नाही.

इतक्यातच दिवाळी अंक वाचून झाले की काय सगळ्यांचे?
हा आठवडा धावपळीचा होता, त्यामुळे फार वाचता आलं नाही.
अनुभवचा दिवाळी अंक मधे दोन तीन वर्ष मला वाचता आला नव्हता. त्यामुळे आताच वेगळा वाटतोय. म्हणजे आधी मासिकाचा आणखी एक अंक असं न वाटता, दिवाळी अंक वाटतोय. पानं झुळझुळीत, गुळगुळीत. नाववाले लेखक. नेहमीचा वाचक पत्रव्यवहार, नेहमीचेच लेखक आणि विषय (विशेषतः मराठी भाषेच्या शुद्धतेबद्दल आणि भवितव्याबद्दल न संपणारी चर्चा) नाहीत.

श्याम मनोहरांची "योग्य तेवढे प्रेम" त्यांच्या कथेसारखीच. मला अजूनतरी त्यांच्या शैलीचा, विषयांचा आणि विचारपद्धतीचा कंटाळा आलेला नाहीए.
जयंत पवारांची कथा एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. शेवट अंगावर आला.
डोरोथीची गोष्ट - रत्नाकर मतकरींचं असं लेखन मी याआधी वाचलेलं नाही किंवा ते असंही लिहितात हे माहीत नव्हतं. त्यामुळे हे वेगळंच वाटलं.
निळू दामलेंचा टाईमलेस न्यू यॉर्कर हा लेख आवडला. राजेश्वरी देशपांडेंचा मेरिल स्ट्रीप- तिने साकारलेल्या भूमिका आणि स्त्रियांचे अर्धे जग हा राजेश्वरी देशपांडेंचा लेख, ते चित्रपट पाहिले नसल्यामुळे फार उमजला नाही.
सहाय्यक संपादक मायबोलीकर प्रीति छत्रे आहेत.

हंस : नवलप्रमाणेच हाही अंक ४०० रुपयांचा आहे. कोंब प्रीतिच रुजवी जीवन अशा नावाची शशिकांत जागीरदार यांची कथा वाचायला घेतली. "लक्कडकोटच्या पडक्या तटबंदीच्या बुरजावर उभा राहून मंदार काहीशा व्याकूळ नजरेने समोरचे सातपुड्याचे हिरवेगार मनोवेधक दृश्य मनात साठवून ठेवत होता." असं विशेषणसंपृक्त पहिलंच वाक्य. जंगलातलं कसलंस देऊळ बांधणार्‍या राणीचं नाव राणी काजोल हे दोनतीनदा आल्यावर कथा पुढे वाचवली नाही.

अंक परत करायच्या आधी किरण येलेंची कथा वाचेन.
अंकात कलावंताचं भागधेय हा जी ए कुलकर्णींचा लेख आहे.

महाराष्ट्र टाइम्सचा दिवाळी अंक वाचला.
समाज आणि राजकारणमधले तिन्ही लेख नवं म्हणावं असं थोडंच काही देतात. तरीपण त्या लेखांची मांडणी आवडली.
अंतःस्फोटाच्या पाऊलखुणा (सुहास पळशीकर), भाजपची घोडदौड : वेग आणि मर्यादा (सुहास कुलकर्णी) , लाख मराठी..एकाकी मराठा (प्रताप आसबे)
मुलखावेगळे मधले गौरी सावंत (प्रगती बाणखेले) आणि पुलेला गोपीचंद( विनायक राणे) वरचे लेख आवडले. टेस्लाच्या इलॉन मस्कवरचा लेख मी भाषेमुळे अर्ध्यात सोडला. नमुन्यादाखल - इलॉन दहा वर्षांचा असताना त्याची कॅनडाची आई आणि दक्षिण आफ्रिकेचे वडील वेगळे झाले.
चीनवरच्या दोन लेखांपैकी आर आर पळसीकरांचा लेख इतिहासाचा पट मांडून वर्तमानाबद्दल सांगतो. तर दिवाकर देशपांडेंचा लेख वर्तमानाचा विस्तृत आढावा घेऊन भविष्याचा वेध घेतो. जलयुद्धाच्या ठिणग्या हा भावेश ब्राह्मणकरांचा लेख आगामी संकटांची भयाण जाणीव करून देतो.
डिजिटल इंडिया, वेब सिरीजवरची दुनिया या लेखातून काही मिळालं नाही.
खरा सिनेमा बनवण्यासाठी ही अमृत सुभाष यांनी घेतलेली सुमित्रा भावेंची विस्तृत मुलाखत अजून वाचली नाही.
गेम ऑफ थ्रोन्स पाहिलं नसल्याने त्यावरच्या लेखाला पास.

मीडिया वॉचच्या पानांचा आणि अक्षरांचा आकार इतर अंकांपेक्षा बर्‍यापैकी मोठा आहे. अंकातल्या बहुतेक जाहिराती राजकारण्यांच्या आहेत.
बदलत्या माध्यमांवर - लाइव्ह स्ट्रीमिंग, व्हिडिओ कंटेंट आणि नवी उमेद हे फेसबुक पेज यांच्याबद्दलचे लेख माहितीप्रद वाटले.
विचारधारा कालबाह्य होत आहेत का? या परिसंवादात प्रत्येकाने आपापल्या चष्म्यातून लिहिलं आहे. आनंद करंदीकरांनी लिहिलेला ज्ञानक्षेत्रीय अराजकावरचा भाग मला रुचला. नुकतंच `विज्ञानाचे तत्त्वज्ञान' हे अनुवादित पुस्तक वाचायचा प्रयत्न केला. त्यातल्या अनुवादित मराठीच्या तुलनेत या लेखात त्या पुस्तकातला काही आशय अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला आहे. रमेश पतंगे यांचा लेख पूर्णपणे सद्य भारतीय राजकारणाचा भाग म्हणून आला आहे.
आजात झाली जात हा लेख या माहितीपटाचा लिखित सारांश वाटावा असा उतरला आहे. गंमत म्हणजे माहितीपटाचं पोस्टरही एका छायाचित्रात दिसतं.

हिंसेचा शोध या विषयावरचा परिसंवाद आणि वैदिक ब्राह्मणांबद्दल संजय सोनवणी आणि मा. गो. वैद्य यांचे लेख अजून वाचायचेत.

भरत, मटाच्या अंकामधला केवळ सुहास कुलकर्णींचा लेख आवडला. थोडक्यात चांगला आढावा घेतलाय त्यांनी.
<टेस्लाच्या इलॉन मस्कवरचा लेख मी भाषेमुळे अर्ध्यात सोडला. नमुन्यादाखल - इलॉन दहा वर्षांचा असताना त्याची कॅनडाची आई आणि दक्षिण आफ्रिकेचे वडील वेगळे झाले.>
अगदी अगदी. हे असले मटाने छापावे याचा अचंबा आधी वाटला. परत, मटाचे बाकीचे उद्योग आठवले आणि मग हे त्याच्याशी सुसंगतच आहे असे वाटले.
लोकसत्तेच्या अंकाबद्दल काय मत?

हंसमधील हृषीकेश गुप्ते यांची घनगर्द दीर्घकथा जबरदस्त आहे. ती किशोरीच्या मानसिक अवस्थांचा खोलवर वेध घेते.
किरण येले यांची इसाकची घरवापसी ही कथाही खूप आवडली. कथेला बाबरी मस्जिद घटनेची पार्श्वभूमी आहे, पण तरीही ही कथा व्यापक भाष्य करण्यात यशस्वी झाली आहे. डेन्मार्कचा राजपुत्र ही अरविंद कुलकर्णी यांची कथाही आवडली. हॅम्लेटच्या भूमिकेने झपाटलेला जोसेफ अन या वेडापायी जीव गमावलेली त्याची प्रेयसी ग्लोरिया यांची ही कथा आहे. लेखकाला ती रोज मध्यरात्री चर्चच्या आवारात भेटते. पण असं असलं तरी ही so called भुताची गोष्ट नाहीये.

धुरंदरांच्या चित्रसंपदेवर आधारित लेख आणि street photography वरील हे दोन लेख आवडले. आवडले म्हटल्यापेक्षा समजले Happy

वावराच्या वाटेने अन वांग्याचं भरीत या दोन अनुभवपर लेखांनी ग्रामीण जीवनाची सफर घडवली. खानदेशी भरीताच्या शेतातल्या पार्टीचं वर्णन करणारा वरील लेख खूप चवदार झालाय.

जी. ए. कुलकर्णी यांचं एक जुनं पत्र लेखकांनी तरी वाचायलाच हवं असं आहे. हेमा अंतरकर यांच्या पत्राला दिलेलं ते उत्तर आहे. आपल्याच काही कथांच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल त्यांनी सविस्तर लिहिलंय.

बाकी अंक वाचणे सुरू आहे

मधे जत्रा थोडा वाचायला मिळाला होता. मंगला गोडबोले यांचं विनोदी लिखाण मला आवडत नाही यावर शिक्कामोर्तब झालं. एकदोन कथा बऱ्या वाटल्या. निलेश मालवणकर यांची मिसळ खाणारी मुलगी ही कथा चांगली जमली आहे.

सामनाचा संपूर्ण अंक ( दोन लेख अन राशिभविष्य सोडल्यास ) एका बैठकीत वाचला. वाचनीय अंक आहे. दोन लेखमालिका आहेत, दोन्ही जमल्या आहेत. एक आहे भविष्याचा वैज्ञानिक वेध घेणाऱ्या लेखांची मालिका अन दुसरी आहे ट्रोलिंग विषयावरील.

भरतजी, आपलं दिवाळी अंकाचं वाचन दांडगं आहे. प्रतिक्रिया अभ्यासपूर्ण आहेत. बरीच माहिती मिळत आहे

हंस मीही आणला होता, पूर्ण अंक वाचनीय आहे. इथे लिहायचे राहून गेले.

तुम्ही जे लिहीले त्या सगळ्याला *999. मलाही लेख आवडले. वांग्याचं भरीत खास आवडला. दीर्घकथा खूपच दीर्घ झाली, मध्ये मध्ये बोअर झाली त्याचे कारण कथा बोअर नव्हती तर त्या वयाच्या मुलांच्या आयुष्यातील काही गोष्टी मला आता बोअर वाटतात आणि त्यामुळे कथेतला तेवढा भाग मला बोअर वाटला Happy

नवल वाचायचा राहिला आहे. हंस लायब्ररीतुन आणला होता. तो परत करायचा म्हणून घाईघाईत फक्त छोट्या फ्लॅश कथा फक्त वाचता आल्या. त्या छान वाटल्या. विनय खंडागळे नाव होतं बहुतेक लेखकाचं. बाकीचं आता पुन्हा अंक हाती आला की वाचेन.
धनंजय, आवाज, जत्रा,कॉमेडी कट्टा आणि सामना दिवाळी अंकांमधल्या काही कथा छान आहेत. बऱ्याचदा प्रथितयश लेखकांपेक्षा नव्या लेखकांचं लिखाण थक्क करून सोडतं, ताजं वाटतं, हे निरीक्षण नोंदवतो.

कथाश्री ठीक वाटला.साधना कामत्,अर्चना अकलूजकर्,संध्या रानडे प्रभुतींच्या कथा ओ.के. गणेश मतकरींची कथा आणि काही लेख वाचायचे राहिले,परत आणून वाचायला हवा.
मौज आणला आहे.लेखक / लेखिका चांगले आहेत.

विनय खंडागळे नाव होतं बहुतेक लेखकाचं म्हणजे अ‍ॅस्ट्रोनॉट विनय ना? / का?
>> हो तो विनय खंडागळे मीच Lol

बऱ्याचदा प्रथितयश लेखकांपेक्षा नव्या लेखकांचं लिखाण थक्क करून सोडतं, ताजं वाटतं

>> अगदी अगदी. माझंही हेच मत आहे. काही नवलेखक दमदार लेखन करतात. अशांना शोधण्यात संपादक कमी पडत असावेत ( अपवाद आहेत )
काही जुने लेखक त्याच त्या प्रकारच्या जिलब्या पाडतांना दिसतात. मला वाटतं लेखकांशी ओळख वाढली की संपादकांना त्यांचं साहित्य नाकारणं अवघड जात असावे. प्रथितयश नावे म्हटल्यावर वाचकांचाही त्या अंकांकडे असलेला ओढा वाढतो.

काही संपादकही जुनाट विचारसरणीचे आहेत. साहित्यातील नवोन्मेशांना सामावून घेण्याची त्यांची इच्छा नाही.

Spoiler alert

गणेश मतकरी यांची कासव कथा वाचली. अक्षर / पद्मगंधा पैकी कुठेतरी. कथा निवेदकाच्या पत्नीला कासव सापडतं, ते रस्त्यात आडवं आलेलं असतं. ती त्याला घरी आणते, त्याचा सांभाळ करते. तिच्या मुलीलाही त्याचा लळा लागतो. पुढे ते कासव मरायला टेकतं. प्राण्यांचा डॉक्टर त्यांना मिळणार नसतो. ( का ते माहीत नाही किंवा मला कळालं नाही ) निवेदक रात्रीला चुपचाप कासवाला दूर कुठेतरी टाकून येतो. बायकोचा फोन येतो की तुम्ही कुठेय अन कासव कुठे गेलं. नवरा काही बोलणार तेवढ्यात कासव आपोआप चालू लागतं. ( !!) मग त्याला तो घरी आणतो, ते पुन्हा नाचू बागडू लागतं. एवढी कथा दहावीस पानं लांबवलेली. मधेमधे तत्वज्ञानाचे लांबच लांब paragraphs

अक्षरमध्ये प्रणव सखदेव यांची कथा वाचली. अपार्टमेंटमधील कुत्र्याचा खून होतो अन एक पत्रकार त्याचा तपास लावतो. काहीतरी हाती येईल असं मला वाटत होतं, पण निराशा झाली. शेवट तर कै च्या कै वाटला.

रेषेवरची अक्षरे चा बालसाहित्याची चर्चा करणारा सुरेख दिवाळी अंक होता. त्यातले काही लेख वाचून झाले होते, एका लेख ठकठकच्या निर्मात्यांविषयी होता. सुंदर लेख होते. काही वाचायचे राहिले होते. पण दुर्दैवाने आता तो अंक ऑनलाइन दिसत नाही आहे. अंकाची पीडीएफ टाकण्याचं काम देखील पूर्ण झालेलं दिसत नाही Sad

पद्मगंधा, अक्षर, इत्यादी यांतील कथा वाचल्या. प्रत्येक अंकातील एकदोन आवडल्या. लेख वाचायचे राहिले.

मौज, अनुभव, किस्त्रीम वाचायला हवेत

Pages