विरूष्का आणि मी

Submitted by विद्या भुतकर on 13 December, 2017 - 22:37

डिस्क्लेमर:
हे आपलं लिखाण आपणच 'विनोदी' म्हणवून घ्यायचं म्हणजे भीतीच वाटते. त्यातही संसाराचं रडगाणं लिहिताना, हसावं की रडावं हे कन्फ्युजन असतंच. मी तर म्हणते 'अवघाचि संसार' नावाची अजून एक कॅटेगरी केली पाहिजे हे असल्या पोस्ट लिहायला. असो. तर डिस्क्लेमर हा की, यातील सर्व पात्रे काल्पनिक नसली तरी त्यातील घटनां पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा लेखिकेच्या आयुष्याशी किंवा स्वभावाशी कुठलाही सुतराम संबंध लावू नये. शिवाय, घरची भांडणे अशी पब्लिकमध्ये मांडण्यावरुन आधीच भांडणे झाल्यामुळे, त्यावर लिहिणे हा अजूनही घरी वादाचाच मुद्दा आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------
तर तुम्हांला सांगते त्या तिकडे विराट आणि अनुष्काचं लग्न तिकडे लागलं आणि आमच्या घरात महायुद्ध पेटलं. एक तर या असल्या बातम्यां बाहेर पडल्या की लगेचच दिसेल त्या पोर्टल, सोशल मीडिया आणि वेबसाईटवर नको इतकी माहिती येऊलागतात. ढिगाने फोटो, मग त्याचं एकदम भारी लोकेशन, हसणारं जोडपं, त्यांचे पर्फेक्ट ड्रेसेस सगळं आलंच. आणि हो, फॉरवर्ड होणारे तेच तेच जोक्स.

मी काही अजून बातमी वाचली नव्हती, त्यात अमेरिकेत रात्र. त्यामुळे अगदी झोपायच्या वेळीच माझ्या एका शाळेतल्या मैत्रिणीने सर्वात पहिले व्हाट्स ऍपवर पाठवलेले व्हिडीओ पाहिले. इतके घरगुती होते ते व्हिडीओ की पहिलं तिला झापलंच. म्हटलं, "युरोप, भूतान वगैरे फिरुन आली होतीस ते ठीक आहे, यांच्या लग्नाला पण? तेही आम्हाला न सांगता ? आमच्या मैत्रीत मेजर ब्रेक अप येणार हे नक्की होतं. इतक्यात तेच व्हिडीओ दुसऱ्या ग्रुपवरही आले आणि ती वाचली. मी आता रात्री १२ वाजता भांडण न करता मुकाट्याने झोपून जाईन हे पाहून नवऱ्यानेही सुटकेचा श्वास घेतला. हो ना, नाहीतर अनेकवेळा अशा ग्रुपवर एथिक्स वरून वाद घातल्यावर तर कधी जवळच्या मैत्रिणीसोबत सासरच्या गॉसिपनंतर अनेकवेळा त्याला उठवलं आहे. मग काय? नणंदेनं माझ्याशी कसं वागावं हे मला त्याला त्याचवेळी सांगणं आवश्यकच आहे. असो. त्यावर पुन्हा कधीतरी.

दुसऱ्या दिवशी उठेपर्यंत सगळीकडे बातमीने वेग धरला होता. लगेचच पुढचे हनीमून फोटो, रिसेप्शनचे इन्व्हिटेशन कार्ड आले होते. नवऱ्याने लगेच त्यावर,"मी बिझी आहे, तू जाऊन ये" असा फालतू जोक मारुन घेतलाच. पुढचा व्हिडीओ होता, तो म्हणजे,"विराटने अनुष्कासाठी अंगठी शोधायला तीन महिने कसे लावले आणि कशी भारी अंगठी घेतली" यावर. आता हे म्हणजे आमच्या घरी चालू असलेल्या आगीत तेल, तूप आणि बटर सर्व घालण्यासारखं होतं. लग्नातली अंगठी वगैरे ठीक आहे पण गेले दोनेक वर्षं झाली मी नवऱ्याला म्हणतेय, "ते हिऱ्याच्या जाहिरातीत दाखवतात ना? तशी 'हीरा है सदा के लिये' टाईप्स अंगठी घे की!". आता दरवेळी याला 'काय गिफ्ट घ्यायचे' असा मोठा प्रश्न असतो. मी काय हवंय हे स्पष्ट सांगूनही दोन वर्षात काहीही हालचाल झालेली नाहीये. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून सकाळ-सकाळी आमचं भांडण जुंपलं. दोन वाढदिवस, दोन ऍनिव्हर्सरी आणि दोन ख्रिसमस संपले तरी अंगठी काही मिळाली नाहीये. तुम्ही म्हणाल 'ख्रिसमस का'? तर? इथे याच वेळेत अशा अंगठ्याच्या जाहिरातींचा भडीमार होतो आणि त्यात हा व्हिडीओ. पोरांना डब्यांत देण्यासाठी गरम गरम पराठे करुन रागारागाने मी ते डबे आपटले. मग काय ना? इतकी कर्तव्यदक्ष, कष्टाळू बायकोची काही किंमतच नाही!!

आमचं भांडण झाल्याने दिवसभर बोलणं तर होत नव्हतंच. त्यात पुढे माहिती येतच होती. मीही ऑफिसमध्ये दुसरं काही काम नसल्याने सर्व एकदम फॉलो करत होते. अगदी त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंग प्लँनर पासून. आता हिच्या नवऱ्याचं नाव काय, तो काय करतो आणि त्यांची स्टोरी पण आम्ही वाचायची. तर त्यांच्या प्लॅनरने म्हणे स्वतःच्याआई-वडिलांनाही सांगितलं नव्हतं ती इटलीला जाऊन आली तरी, की ती कशावर काम करत आहे? म्हटलं, "नसतं कौतुक. आम्ही इथे अमेरिकेत येऊन ढिगाने प्रोजेक्ट केले, आले कधी आणि गेले कधी. आमच्या आई-बाबांनी 'बरे आहात ना?' आणि 'काम कसंय' या पलीकडे एक प्रश्न विचारला नाही.".जाऊ दे.

तर त्या दुपारी नवीन आलेल्या फोटोच्या लॉटमध्ये इटलीच्या डेस्टिनेशनचे सुंदर फोटो होते. इतकी चिडचिड झाली सांगू. आजतागायत प्रत्येक वेळी ट्रीपला जायचं म्हणजे नुसता वैताग येतो. एकतर कधी वेळेत ठरवत नाहीच आम्ही, कुठे जायचं ते. वेळेत उठणं, सामान बांधून जिथे जायचं तिथे वेळेत पोहोचणं म्हणजे जीव अर्धमेला झालेला असतो. त्यात पोरांचे खाणे-शी-शू- झोप वगैरे पाहणे आलेच. मग अगदी शेवटी ठरवल्याने अख्खा गाव पोहोचल्याने भयंकर गर्दी झालेली असतेच, ट्राफिक वाढलेली असतेच. एखाद्या ठिकाणी जाऊन खूप मजा केलीय असं नाहीच मुळी. भारतात असताना अगदी त्या मॅप्रो गार्डनला वेळेत गेलो तरी मिळवलं. त्यातही आम्ही जातो तेंव्हाच ढगफुटी व्हावी तसा पाऊस पडत असतो. वाटलं, मला पण दिवसभर असं एक माणूस पाहिजे हाताशी, प्लॅनर! सर्व कसं टापटीप, वेळेत आणि हो,एकही वस्तू न विसरता जाऊन परत घेऊन येणारा. लै धावपळ होते हो. विचार चालूच होते, इतक्यात जोडप्याचे हनीमूनचे फोटोही आलेच लगेच. मी आपलं दुकान(लॅपटॉप) बंद करुन घरी आले.

कितीही म्हटलं तरी असली फिल्मी भांडणं विसरुन आपल्या कामाला लागलेलंच बरं असतं, हे मला दीपिका आणि रणबीर, कतरीना आणि रणबीरच्या प्रकरणानंतर कळलं होतंच. तरीही मधेच रणवीर आणि दीपिकाचे फोटो आले की माझे टॉन्ट येत असतातच. ते झेलून नवराही मुकाट्याने सोडून देतो. आता त्यांच्या इतक्या जोड्या बदलल्या तरी आम्ही कसे 'गोइंग स्ट्रॉंग' आहोत यावर नवऱ्याने काही कमेंट केली नाहीये हे माझं नशीबच म्हणायचं. तरीही कधी बोलला तर,"मलाही काही कमी ऑप्शन नव्हते" असा डायलॉग मी तयार ठेवला आहेच. संध्याकाळी आम्ही नेहमीसारखं आवरलं. कांदाही त्यालाच कापायचा असल्याने रडू लपवणे वगैरे प्रकार मला करता आले नसतेच. भांडण करायचं नाहीच असं ठरवून एकदम गप्प बसले. रात्री सर्व काम उकरुन आम्ही आपापले फोन समोर बसलो होतो. तेव्हा मधेच नवरा 'फनी व्हिडीओ' आणि फॉरवर्डेड जोक्स वाचून जोरजोरात हसत होता. सकाळी झालेल्या भांडणाने त्याच्यावर काडीचाही परिणाम झालेला नाहीये हे बघून इतका संताप झाला त्याच्यावर.

तेव्हढ्यात 'विराट गिव्हींग बॉयफ्रेंड गोल्स' नावाचा का काहीतरी व्हिडीओ माझ्या फेबुवर सुरु झाला. त्या व्हिडीओ मध्ये विराटने ब्रेकअप झाल्यावरही कसा अनुष्काला सपोर्ट करण्यासाठी जाहीरपणे ट्विट केलं यावर, तर 'वुमन्स डे' ला पोस्ट केलेल्या आई आणि अनुष्काच्या सोबतच्या पोस्टवर छान कमेंट लिहिली होती हे सर्व सर्व काही दिलं होतं. तुम्हाला सांगते, असा राग आला होता माझ्या नवऱ्याचा. इथे बायको भांडून, स्वतःच स्वतःला समजावून पुन्हा नॉर्मल वागायला लागली तरी या नवऱ्याला काहीही फरक पडला नव्हता. त्याचं जोक्स वाचून हसणं चालूच होतं. पुढे जाऊन शिवाय फॅमिली, फास्ट फ्रेंड्स, फ्रेंड्स फॉरेव्हर वगैरे सर्व ग्रुपवर तेच जोक्स फॉरवर्ड करायलाही कमी ठेवली नव्हती.

आणि जोक तरी काय हो? "फक्त ५० लोक लग्नाला? इतके तर आमच्याकडे लग्नाला रुसतात".
बरोबर, यांच्या घरचे लोक ना? असणारच तसले.
इतका झापला त्याला. म्हटलं, "इथं साधं तुझ्या आईसोबत भांडण झालं तरी माझी बाजू घ्यायला नको तुला. कधी कुणी मला काही बोललं म्हणून सांगितलं तर लगेच म्हणतोस, जाऊ दे ना? कधी बायकोची बाजू घेऊन माहीतच नाही. मग अख्ख्या ट्विटरवर ट्रोलर्सशी भांडण तर जाऊच दे. मेलं, नशीबच फुटकं."

तर म्हणतो कसा? "हुशार आहे तो. तिची बाजू घेऊन बोलला ट्विटरवर म्हणून परत मिळाली त्याला. आणि बायकोचा एकटीचा फोटो पोस्ट नाही केला त्याने, आईचाही केलाच ना?".

"हो बरोबर तू तेव्हढेच बघणार?", मी.
त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. अजून आमच्या लग्नातली अर्धवट राहिलेली भांडणं सुरु झाली असती. बरंच काही होतं बोलण्यासारखं पण दमले होते. मी आपली पुन्हा फोनमध्ये घुसले. पुन्हा अजून काही पोस्ट दिसायला लागल्यावर मात्र माझी चिडचिड झाली. च्या मारी, यांची मजा आणि आमचं भांडण. त्यातही त्रास फक्त मलाच. रागाने फोन आपटून बंद करुन टाकला आणि लवकर झोपायला गेले. रात्री कधीतरी येऊन त्याने माझ्या पोटावर हात घेऊन जवळ ओढून घेतलं, मीही सवयीने त्याच्या हातावर हात ठेवला आणि झोपून गेले.

लवकर झोपल्यामुळे निदान झोप तरी पूर्ण झाली. सकाळी शांतपणे आवरत विचार केला, म्हटलं जाऊ दे, नव्या लग्नाचे नऊ दिवस झाले की त्यांच्या भांडणांचे गॉसिप वाटायला परत येईनच. आधी १० वर्षं लग्न टिकवून तरी ठेवा म्हणावं. ऑफिसमध्ये, सकाळच्या मेल चेक करुन झाल्यावर, बॉलीवूड मॉर्निंग अपडेट मध्ये शाहिद आणि मीराच्या मॅचिंग ड्रेसचा फोटो आला होता. ऍनिव्हर्सरीला असाच एखादा मॅचिंग ड्रेसमध्ये फोटो काढायची खूप इच्छा होती. त्याची प्लॅनिंग मी आतापासूनच सुरु केली आहे. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

WhatsApp Image 2017-12-12 at 8.07.07 PM.jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे. काही काही पंचेस मस्त जमलेत.

फॅमिली, फास्ट फ्रेंड्स, फ्रेंड्स फॉरेव्हर वगैरे सर्व ग्रुप>>> Lol

आधी १० वर्षं लग्न टिकवून तरी ठेवा म्हणावं. >> हे वाक्य नाही आवडले.

आजिबात विनोदी किंवा हलका फुलका वाटत नाहीये लेख.
आजिबात हसु आलं नाही. उलट लेख बराच उथळ वाटला.

काही ठिकाणी तर रीयली?? सिरीयसली??? अशी प्रतिक्रिया झाली.

विराट आणि अनुष्काचं लग्न तिकडे लागलं आणि आमच्या घरात महायुद्ध पेटलं.>>>> का ते काही कळलं नाही.
दीपिका आणि रणबीर, कतरीना आणि रणबीर, रणवीर आणि दीपिका ह्या सेलिब्रेटीवरुन घरात भांडण होणं हेच मुळी पटत नाहीये.
होतही असतील कुणाची. माझ्या पाहण्यात असं कपल अजुनही आलं नाहीये.

अजून काही पोस्ट दिसायला लागल्यावर मात्र माझी चिडचिड झाली. च्या मारी, यांची मजा आणि आमचं भांडण. >>>>
आधी १० वर्षं लग्न टिकवून तरी ठेवा म्हणावं.>>>>
ही वाक्य खरंच इम्मॅचुअर आहेत.

तुमच्या चाहत्यांमधली एक असली तरी हा लेख नाही आवडला..
तुमच्या लेखनामध्ये नवरा बायको हे एवढ कॉमन झालयं की आता तेच तेच नकोस वाटतं.
काहीतरी नवीन लिहा Happy

Thank you all for the frank feedback. I always look forward to comments here because they definitely give me real picture than just ‘number of likes’. Sorry to write in English, but won’t get to this during the day otherwise. Marathi Editor from phone is terrible.
Just wanted to say, thank you.
Vidya.

हे लग्न त्यांचं आहे इट इज नॉट अ‍ॅट ऑल अबाउट यु. विराट हॅज पर्फॉर्म्ड एक्षेप्शनली वेल. आणी अनुश्का करीअर मध्ये सेट आहे. यू कॅन जस्ट विश देम अँड मूव्ह ऑन. तुमच्याशी कंपेअर करणे बरोबर नाही. हे लग्न किती टिकेल वगैरे तर नाट लावणे आहे. ब्लेस देम अँड मुव्ह ऑन.

गुलमोहर - विनोदी लेखन मध्ये लिहिलंय तरीही लोक सिरीयसली घेऊन टीका करताहेत हे बघून गम्मत वाटली. मूळ लेख वाचून तितकीशी वाटली नव्हती, पण फिट्टमफाट झाली म्हणायचे.

विराट आणि अनुष्काचं लग्न तिकडे लागलं आणि आमच्या घरात महायुद्ध पेटलं.>>>> का ते काही कळलं नाही.>> मलाही जरासच अस वाटल, जनरली तुलना नात्यागोत्यात किवा फ्रेन्डस मधे होवुन कुरबुरी होण समजु शकते .
लेख विनोदी पेक्षा ललित म्हणुन जास्त सुट होतोय त्यातले विरुश्काच्या लग्नाचे सदर्भ मात्र उगाच ओढुण-ताणून वाटतायत.

म्हटलं जाऊ दे, नव्या लग्नाचे नऊ दिवस झाले की त्यांच्या भांडणांचे गॉसिप वाटायला परत येईनच. आधी १० वर्षं लग्न टिकवून तरी ठेवा म्हणावं. this is too much..!
बाकी लेख नाही आवडला..
लेख विनोदी पेक्षा ललित म्हणुन जास्त सुट होतोय त्यातले विरुश्काच्या लग्नाचे सदर्भ मात्र उगाच ओढुण-ताणून वाटतायत.+१

गुलमोहर - विनोदी लेखन मध्ये लिहिलंय तरीही लोक सिरीयसली घेऊन टीका करताहेत हे बघून गम्मत वाटली.>>>>> विनोदी लेखन असं लिहिलंय म्हणुन तर लिहिलंय ना की आजिबात विनोदी नाही वाटत आहे.
आणि कुणा सेलिब्रेटीजचा विषय घेउन स्वत:ची चिडचिड जी मांडलीय ती विनोदी किंवा फनी न वाटता खरी चिडचिड वाटतेय. कारण त्यांनीच लिहिलेलं भांडण / महायुध्द.
आणि कुणा नवीन लग्न झालेल्या जोडप्याला "आधी १० वर्षं लग्न टिकवून तरी ठेवा म्हणावं." असं मस्करीत / विनोदानेही म्हणु नये कुणी.

अमा, खुप दिवसानी नाट लावणे शब्दप्रयोग ऐकला. Happy

>>कुणा सेलिब्रेटीजचा विषय घेउन स्वत:ची चिडचिड जी मांडलीय ती विनोदी किंवा फनी न वाटता खरी चिडचिड वाटतेय.
+१

>>त्यातही संसाराचं रडगाणं लिहिताना, हसावं की रडावं हे कन्फ्युजन असतंच.
>>शिवाय, घरची भांडणे अशी पब्लिकमध्ये मांडण्यावरुन आधीच भांडणे झाल्यामुळे, त्यावर लिहिणे हा अजूनही घरी वादाचाच मुद्दा आहे.

हे डिसक्लेमर मधे असल्यामुळे विनोदी नसून खरंच असावं.

१० वर्ष लग्न टिकवुन दाखवा..का बरं एवढी शंका न टिकऩ्याची? ते सेलिब्रिटीज आहेत म्हणुन?
अमांशी सहमत. atleast u can bless them.
लेखहि बोअर झाला.

10 वर्षे इरिटेटिंग लाईफ जगण्यापेक्षा वेगळे झालेले काय वाईट.. उगाच भांडत भांडत टिकवायचे का.

घर, मुलं, ऑफिस, अमेरिकेत राहणं असं सगळं असून ही त्या दररोज एक लेख लिहितात . तेव्हा थोडं इकडे तिकडे होणारच ना!

मी लेख पूर्ण वाचला नाही. जेवढा वाचला तो भाग बोअर झाला.
मनीमोहर, रोज एक लेख लिहायचं प्रेशर स्वतःवर टाकून क्वालिटीबद्दल काँप्रोमाईज करु नये. (अवांतर- दर विकेंडला त्या सचिन कुंडलकरला लोकसत्तात लेख लिहावा लागतो म्हणून काय सुमार पाट्या टाकल्या आहेत त्या बघितल्यात ना?)

नवविवाहित दांपत्याने आज हनिमूनचा एक सुंदर फोटो रिलीज केला आहे. दोन लाख च्या वर लाइ क्स आहेत इन्स्टाग्रामवर. सर्व मॅरेज प्लानर टीमचे उत्तम शब्दात आभार मानले आहेत. मला अनु चा घागरा फार आव्डला. सम सीरीअस मॅरेज सेरीमनी गोल्स. २१ ला दिल्लीत व २६ ला मुंबई त रिसेप्शन आहे. हे दोघांसाठी बेस्ट इअर आहे.
मिलेनिअल एज गृप मध्ये ह्या दोघांना चांगले फॉलोइन्ग आहे ट्विटर व इन्स्टावर. मी अनूला फेसबुक वर फॉलो करते तर विराटला इन्स्टा ग्राम वर. माझा काही ही संबंध नसूनही एक छान वॉर्म फीलिन्ग आहे त्यांच्या लग्न व नात्या बद्दल . जळफळाट झाला नाही एक कण पण.

रात्री कधीतरी येऊन त्याने माझ्या पोटावर हात घेऊन जवळ ओढून घेतलं, मीही सवयीने त्याच्या हातावर हात ठेवला आणि झोपून गेले.>> हे इतक प्रायवेट मोमेंट शेअर करायची गरज का भासत असावी? ह्या वाक्यावर गौरी देश्पांडेंचा कॉपीराइट आहे खरेतर.

घर, मुलं, ऑफिस, अमेरिकेत राहणं असं सगळं असून ही त्या दररोज एक लेख लिहितात . तेव्हा थोडं इकडे तिकडे होणारच ना!
>>>>
+७८६

फ्रॅकली स्पिकींग मी आज सकाळी हा लेख अर्धा वाचून न आवडल्याने सोडला. आता वाढलेले प्रतिसाद पाहून पुढे चांगला तर नाही ना या आशेने पाहिला कारण मुळात या छान लिहित असल्याने एक विश्वास. पण प्रतिक्रिया लेख चांगला असल्यामुळे नाही तर चांगला न जमल्याने आल्या हे दिसले. आणि पुन्हा एकदा फ्रॅकली स्पिकींग त्यातल्या काही मला हार्श वाटल्या Happy

हे मी विद्या भुतकर यांना सपोर्ट म्हणून लिहिले नाहीये, कारण वरचेवर लिहिणार्‍यांना अश्या सपोर्टची गरज नसते, उद्या त्यांचा पुढचा लेख आला असेल आणि हा लेख त्यांच्यासाठी विस्मरणात गेलेला भूतकाळ झाला असेल Happy

१. मी रोज उठून लेखन करते म्हणून मला कुणी सवलत द्यावी असं मी म्हटलं नाहीये आणि म्हणणारही नाही.
मनीमोहोर>> तरीही धन्यवाद.
२. लेख आवडला नाही, इतर लेखांच्या मानाने आवडला नाही, बोअर आहे, उगाच ओढून ताणून संदर्भ आणले आहे, असे आणि हे सर्व मी वाचून घेतलं. आणि ते स्वीकारलंही. पण पुढे ज्या प्रतिक्रिया येत गेल्या त्यावरून कळलं की लोकांना खरंच त्या डिस्क्लेमरशी काहीही संबंध नाहीये. अमा तुमची कमेंट आली मी माझं मौन सोडायचं ठरवलं.
मी प्रत्येक लेखाच्या वर डिस्क्लेमर टाकत नाही. जे लेख मी स्वतःचे अनुभव म्हणून लिहिते त्यात डिस्क्लेमर नसतात. हा प्रसंग काल्पनिक आहे असे सांगूनही लोकांनी तो माझ्याच आयुष्यात घडला आहे असे गृहीत धरूनच, 'इतके प्रायव्हेट मूमेंट द्यायची गरज का भासावी' असे लिहिले आहे. हे म्हणजे अति झाले आहे. त्यावर पुढे काही लिहायची माझी इच्छा नाही.
३. असे कुणी भांडत असेल का? मला माहित नाही. मी कुठल्याही सेलेब्रिटीला फॉलो करत नाही. अगदी शाळा कॉलेजात असतानाही कुणी हिरो जीव ओवाळून टाकावा किंवा त्याचा फोटो ठेवावा इतका आवडला नाही. आणि तसे कधी होणारही नाही.
पण अशा बातम्यांचा सगळीकडून भडीमार होत असताना त्यातून एक प्रसंग लिहिणे यात मला चूक वाटले नाही. मला आता खरंच कंटाळा आलेला एका गोष्टीचा ते म्हणजे, लेखन कुठलेही असो, कथा किंवा ललित, प्रत्येक वेळा ते वाचून माझेच विच्छेदन करणे.
४. ऋन्मेष म्हणाला तसे मी इतर वेळी मागच्या कमेंट सोडून पुढे निघून जातेही. पण यावेळी मला बोललेच पाहिजे. इथल्या अनेक वाचकांना समोर असलेलं लिखाण आणि ते लिहीणारी व्यक्ती यांचा संबंध लावायचाच असतो. त्यामुळे समोर असलेला लेख आहे तसा कधीच घेतला जात नाही. त्याच्या मागे वाचणाऱ्याच्या डोक्यात माझ्या बाबतचे संदर्भ येतंच असतात. आणि हे विशेषतः कथा आणि काल्पनिक लेखांत जास्त खटकते कारण तिथे खरेतर समोर आहे ते तसेच वाचता आले पाहिजे. उदा: या लेखाच्या बाबतीत बोललेले : 'आता नवरा बायकोचे लेख वाचायचा कंटाळा आला आहे'. मला नाही आठवले मी आधी लिहिलेल्या कुठल्या लेखात असा भांडणाचा संदर्भ होता. पण तो वाचकांच्या डोक्यात आहे. माझ्या कुठल्या लेखात असेल हे त्यांनाच जास्त आठवत असावे. असो.
५. इथे लेख लिहिताना आपल्या लिखाणांत मिळणाऱ्या सूचनांचा फायदा करून घेण्याचा विचार असायचा. मध्ये एकूणच या आणि अशाच प्रकारच्या कमेंटमुळे मध्ये लिखाण इथे प्रसिद्ध करणे खूप कमी केले होते. आता त्या विचाराला पुन्हा उफाळी येत आहे हे नक्की.

काही लोक वड्याचे तेल वांग्यावर काढायलाच माबोवर येतात विद्याजी. Ignorance is bliss .

not about contents of article - but isn't it under "vinodi lekhan"?
Do people really think things written under this r happening in writers life? Whether one likes it or not is different story.
But come on - this is not under lalit/kisse category !

विद्याताई, तुम्ही खरंच चांगलं लिहिता. फक्त सायो यांनी लिहिल्याप्रमाणे मलाही असं वाटतं की रोज किंवा जवळजवळ रोज लिहिण्याचं प्रेशर स्वतःवर आणू नका.
हा विशिष्ट लेख मलाही फारसा आवडला नाही. तुमचं इतर काल्पनिक लिखाण मला आवडलेलं आहे. कदाचित हा लेख तितकासा काल्पनिक वाटत नाही हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे काल्पनिक असेल, पण तसा वाटत नाही ( कारण कदाचित तुमचं इतर बरंचसं नॉन- फिक्शन लिखाण रोजच्या आयुष्यातल्या प्रसंगांवर असतं आणि त्यामुळे हाही लेख तसाच घेतला गेला ) .

AMA’s comment is sort of childish. People don’t realise that these celebrities are leavereaging their fan-base to garner cheap publicity. Vidya’s Write-up just attacks this cheap publicity stunt in a diff way.

Pages