विरूष्का आणि मी

Submitted by विद्या भुतकर on 13 December, 2017 - 22:37

डिस्क्लेमर:
हे आपलं लिखाण आपणच 'विनोदी' म्हणवून घ्यायचं म्हणजे भीतीच वाटते. त्यातही संसाराचं रडगाणं लिहिताना, हसावं की रडावं हे कन्फ्युजन असतंच. मी तर म्हणते 'अवघाचि संसार' नावाची अजून एक कॅटेगरी केली पाहिजे हे असल्या पोस्ट लिहायला. असो. तर डिस्क्लेमर हा की, यातील सर्व पात्रे काल्पनिक नसली तरी त्यातील घटनां पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा लेखिकेच्या आयुष्याशी किंवा स्वभावाशी कुठलाही सुतराम संबंध लावू नये. शिवाय, घरची भांडणे अशी पब्लिकमध्ये मांडण्यावरुन आधीच भांडणे झाल्यामुळे, त्यावर लिहिणे हा अजूनही घरी वादाचाच मुद्दा आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------
तर तुम्हांला सांगते त्या तिकडे विराट आणि अनुष्काचं लग्न तिकडे लागलं आणि आमच्या घरात महायुद्ध पेटलं. एक तर या असल्या बातम्यां बाहेर पडल्या की लगेचच दिसेल त्या पोर्टल, सोशल मीडिया आणि वेबसाईटवर नको इतकी माहिती येऊलागतात. ढिगाने फोटो, मग त्याचं एकदम भारी लोकेशन, हसणारं जोडपं, त्यांचे पर्फेक्ट ड्रेसेस सगळं आलंच. आणि हो, फॉरवर्ड होणारे तेच तेच जोक्स.

मी काही अजून बातमी वाचली नव्हती, त्यात अमेरिकेत रात्र. त्यामुळे अगदी झोपायच्या वेळीच माझ्या एका शाळेतल्या मैत्रिणीने सर्वात पहिले व्हाट्स ऍपवर पाठवलेले व्हिडीओ पाहिले. इतके घरगुती होते ते व्हिडीओ की पहिलं तिला झापलंच. म्हटलं, "युरोप, भूतान वगैरे फिरुन आली होतीस ते ठीक आहे, यांच्या लग्नाला पण? तेही आम्हाला न सांगता ? आमच्या मैत्रीत मेजर ब्रेक अप येणार हे नक्की होतं. इतक्यात तेच व्हिडीओ दुसऱ्या ग्रुपवरही आले आणि ती वाचली. मी आता रात्री १२ वाजता भांडण न करता मुकाट्याने झोपून जाईन हे पाहून नवऱ्यानेही सुटकेचा श्वास घेतला. हो ना, नाहीतर अनेकवेळा अशा ग्रुपवर एथिक्स वरून वाद घातल्यावर तर कधी जवळच्या मैत्रिणीसोबत सासरच्या गॉसिपनंतर अनेकवेळा त्याला उठवलं आहे. मग काय? नणंदेनं माझ्याशी कसं वागावं हे मला त्याला त्याचवेळी सांगणं आवश्यकच आहे. असो. त्यावर पुन्हा कधीतरी.

दुसऱ्या दिवशी उठेपर्यंत सगळीकडे बातमीने वेग धरला होता. लगेचच पुढचे हनीमून फोटो, रिसेप्शनचे इन्व्हिटेशन कार्ड आले होते. नवऱ्याने लगेच त्यावर,"मी बिझी आहे, तू जाऊन ये" असा फालतू जोक मारुन घेतलाच. पुढचा व्हिडीओ होता, तो म्हणजे,"विराटने अनुष्कासाठी अंगठी शोधायला तीन महिने कसे लावले आणि कशी भारी अंगठी घेतली" यावर. आता हे म्हणजे आमच्या घरी चालू असलेल्या आगीत तेल, तूप आणि बटर सर्व घालण्यासारखं होतं. लग्नातली अंगठी वगैरे ठीक आहे पण गेले दोनेक वर्षं झाली मी नवऱ्याला म्हणतेय, "ते हिऱ्याच्या जाहिरातीत दाखवतात ना? तशी 'हीरा है सदा के लिये' टाईप्स अंगठी घे की!". आता दरवेळी याला 'काय गिफ्ट घ्यायचे' असा मोठा प्रश्न असतो. मी काय हवंय हे स्पष्ट सांगूनही दोन वर्षात काहीही हालचाल झालेली नाहीये. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून सकाळ-सकाळी आमचं भांडण जुंपलं. दोन वाढदिवस, दोन ऍनिव्हर्सरी आणि दोन ख्रिसमस संपले तरी अंगठी काही मिळाली नाहीये. तुम्ही म्हणाल 'ख्रिसमस का'? तर? इथे याच वेळेत अशा अंगठ्याच्या जाहिरातींचा भडीमार होतो आणि त्यात हा व्हिडीओ. पोरांना डब्यांत देण्यासाठी गरम गरम पराठे करुन रागारागाने मी ते डबे आपटले. मग काय ना? इतकी कर्तव्यदक्ष, कष्टाळू बायकोची काही किंमतच नाही!!

आमचं भांडण झाल्याने दिवसभर बोलणं तर होत नव्हतंच. त्यात पुढे माहिती येतच होती. मीही ऑफिसमध्ये दुसरं काही काम नसल्याने सर्व एकदम फॉलो करत होते. अगदी त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंग प्लँनर पासून. आता हिच्या नवऱ्याचं नाव काय, तो काय करतो आणि त्यांची स्टोरी पण आम्ही वाचायची. तर त्यांच्या प्लॅनरने म्हणे स्वतःच्याआई-वडिलांनाही सांगितलं नव्हतं ती इटलीला जाऊन आली तरी, की ती कशावर काम करत आहे? म्हटलं, "नसतं कौतुक. आम्ही इथे अमेरिकेत येऊन ढिगाने प्रोजेक्ट केले, आले कधी आणि गेले कधी. आमच्या आई-बाबांनी 'बरे आहात ना?' आणि 'काम कसंय' या पलीकडे एक प्रश्न विचारला नाही.".जाऊ दे.

तर त्या दुपारी नवीन आलेल्या फोटोच्या लॉटमध्ये इटलीच्या डेस्टिनेशनचे सुंदर फोटो होते. इतकी चिडचिड झाली सांगू. आजतागायत प्रत्येक वेळी ट्रीपला जायचं म्हणजे नुसता वैताग येतो. एकतर कधी वेळेत ठरवत नाहीच आम्ही, कुठे जायचं ते. वेळेत उठणं, सामान बांधून जिथे जायचं तिथे वेळेत पोहोचणं म्हणजे जीव अर्धमेला झालेला असतो. त्यात पोरांचे खाणे-शी-शू- झोप वगैरे पाहणे आलेच. मग अगदी शेवटी ठरवल्याने अख्खा गाव पोहोचल्याने भयंकर गर्दी झालेली असतेच, ट्राफिक वाढलेली असतेच. एखाद्या ठिकाणी जाऊन खूप मजा केलीय असं नाहीच मुळी. भारतात असताना अगदी त्या मॅप्रो गार्डनला वेळेत गेलो तरी मिळवलं. त्यातही आम्ही जातो तेंव्हाच ढगफुटी व्हावी तसा पाऊस पडत असतो. वाटलं, मला पण दिवसभर असं एक माणूस पाहिजे हाताशी, प्लॅनर! सर्व कसं टापटीप, वेळेत आणि हो,एकही वस्तू न विसरता जाऊन परत घेऊन येणारा. लै धावपळ होते हो. विचार चालूच होते, इतक्यात जोडप्याचे हनीमूनचे फोटोही आलेच लगेच. मी आपलं दुकान(लॅपटॉप) बंद करुन घरी आले.

कितीही म्हटलं तरी असली फिल्मी भांडणं विसरुन आपल्या कामाला लागलेलंच बरं असतं, हे मला दीपिका आणि रणबीर, कतरीना आणि रणबीरच्या प्रकरणानंतर कळलं होतंच. तरीही मधेच रणवीर आणि दीपिकाचे फोटो आले की माझे टॉन्ट येत असतातच. ते झेलून नवराही मुकाट्याने सोडून देतो. आता त्यांच्या इतक्या जोड्या बदलल्या तरी आम्ही कसे 'गोइंग स्ट्रॉंग' आहोत यावर नवऱ्याने काही कमेंट केली नाहीये हे माझं नशीबच म्हणायचं. तरीही कधी बोलला तर,"मलाही काही कमी ऑप्शन नव्हते" असा डायलॉग मी तयार ठेवला आहेच. संध्याकाळी आम्ही नेहमीसारखं आवरलं. कांदाही त्यालाच कापायचा असल्याने रडू लपवणे वगैरे प्रकार मला करता आले नसतेच. भांडण करायचं नाहीच असं ठरवून एकदम गप्प बसले. रात्री सर्व काम उकरुन आम्ही आपापले फोन समोर बसलो होतो. तेव्हा मधेच नवरा 'फनी व्हिडीओ' आणि फॉरवर्डेड जोक्स वाचून जोरजोरात हसत होता. सकाळी झालेल्या भांडणाने त्याच्यावर काडीचाही परिणाम झालेला नाहीये हे बघून इतका संताप झाला त्याच्यावर.

तेव्हढ्यात 'विराट गिव्हींग बॉयफ्रेंड गोल्स' नावाचा का काहीतरी व्हिडीओ माझ्या फेबुवर सुरु झाला. त्या व्हिडीओ मध्ये विराटने ब्रेकअप झाल्यावरही कसा अनुष्काला सपोर्ट करण्यासाठी जाहीरपणे ट्विट केलं यावर, तर 'वुमन्स डे' ला पोस्ट केलेल्या आई आणि अनुष्काच्या सोबतच्या पोस्टवर छान कमेंट लिहिली होती हे सर्व सर्व काही दिलं होतं. तुम्हाला सांगते, असा राग आला होता माझ्या नवऱ्याचा. इथे बायको भांडून, स्वतःच स्वतःला समजावून पुन्हा नॉर्मल वागायला लागली तरी या नवऱ्याला काहीही फरक पडला नव्हता. त्याचं जोक्स वाचून हसणं चालूच होतं. पुढे जाऊन शिवाय फॅमिली, फास्ट फ्रेंड्स, फ्रेंड्स फॉरेव्हर वगैरे सर्व ग्रुपवर तेच जोक्स फॉरवर्ड करायलाही कमी ठेवली नव्हती.

आणि जोक तरी काय हो? "फक्त ५० लोक लग्नाला? इतके तर आमच्याकडे लग्नाला रुसतात".
बरोबर, यांच्या घरचे लोक ना? असणारच तसले.
इतका झापला त्याला. म्हटलं, "इथं साधं तुझ्या आईसोबत भांडण झालं तरी माझी बाजू घ्यायला नको तुला. कधी कुणी मला काही बोललं म्हणून सांगितलं तर लगेच म्हणतोस, जाऊ दे ना? कधी बायकोची बाजू घेऊन माहीतच नाही. मग अख्ख्या ट्विटरवर ट्रोलर्सशी भांडण तर जाऊच दे. मेलं, नशीबच फुटकं."

तर म्हणतो कसा? "हुशार आहे तो. तिची बाजू घेऊन बोलला ट्विटरवर म्हणून परत मिळाली त्याला. आणि बायकोचा एकटीचा फोटो पोस्ट नाही केला त्याने, आईचाही केलाच ना?".

"हो बरोबर तू तेव्हढेच बघणार?", मी.
त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. अजून आमच्या लग्नातली अर्धवट राहिलेली भांडणं सुरु झाली असती. बरंच काही होतं बोलण्यासारखं पण दमले होते. मी आपली पुन्हा फोनमध्ये घुसले. पुन्हा अजून काही पोस्ट दिसायला लागल्यावर मात्र माझी चिडचिड झाली. च्या मारी, यांची मजा आणि आमचं भांडण. त्यातही त्रास फक्त मलाच. रागाने फोन आपटून बंद करुन टाकला आणि लवकर झोपायला गेले. रात्री कधीतरी येऊन त्याने माझ्या पोटावर हात घेऊन जवळ ओढून घेतलं, मीही सवयीने त्याच्या हातावर हात ठेवला आणि झोपून गेले.

लवकर झोपल्यामुळे निदान झोप तरी पूर्ण झाली. सकाळी शांतपणे आवरत विचार केला, म्हटलं जाऊ दे, नव्या लग्नाचे नऊ दिवस झाले की त्यांच्या भांडणांचे गॉसिप वाटायला परत येईनच. आधी १० वर्षं लग्न टिकवून तरी ठेवा म्हणावं. ऑफिसमध्ये, सकाळच्या मेल चेक करुन झाल्यावर, बॉलीवूड मॉर्निंग अपडेट मध्ये शाहिद आणि मीराच्या मॅचिंग ड्रेसचा फोटो आला होता. ऍनिव्हर्सरीला असाच एखादा मॅचिंग ड्रेसमध्ये फोटो काढायची खूप इच्छा होती. त्याची प्लॅनिंग मी आतापासूनच सुरु केली आहे. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

WhatsApp Image 2017-12-12 at 8.07.07 PM.jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विद्याताई तुमचं लेखन खरंच खूप छान असतं....पण हा लेख तेवढा दर्जेदार वाटला नाही..ही प्रामाणिक प्रतिक्रिया...पण नकारात्मक प्रतिक्रियामुळे तुमचं लेखन प्रसिद्ध न करण्याचा विचार मात्र करू नका....मला फार आवडतं तुमचं लिखाण..तेव्हा निगेटिव्ह प्रतिक्रियामकडे दुर्लक्ष करून लिहित रहा...आणि हार्श reply देणार्यांनी कोणाला motivate नसेल करता येत तर demotivate तरी करू नये असं लाटतं

1) अमांची प्रतिक्रिया पातळी नाही, प्रायव्हेट मोमेंट,नाट लावणे वगैरे तर टू मच
2) लेखातील लग्न टिकवून दाखवा वगैरे वाक्य आवडली नाहीत
3) इतर लेख आवडतात हा आवडला नाही, विनोदी वाटला नाही पण या गोष्टीची लेखिकेने ऑलरेडी दखल घेतली आहे सो त्यावर आणखी काही लिहीत नाही
4) लेखिकेने ब्रेक घ्यावा का नाही हा तिचा पर्सनल प्रश्न आहे आपण लेख आवडला का नाही तेवढं लिहून मोकळं व्हावं असं मला वाटतं. प्रतिक्रियांतून जो शिकतो तो फार पुढे जातो
5) लेखिकेने यापुढे लेख प्रसिद्ध करायचे का नाही हा पूर्णपणे तिचा निर्णय असला तरी केवळ अशा प्रतिक्रिया आल्या म्हणून हा निर्णय घेणे चुकीचे हे माझे मत आहे (त्याचा विचार केलाच पाहिजे असं काही नाही). अर्थात हा निर्णय घेण्यामागे निगेटिव्ह प्रतिक्रिया हे कारण नाहीये याची मला पूर्ण जाणीव आहे

Once again, I really appreciate all your feedback always. All the comments are duly noted and definitely give
Me a lot to think about. Thank you all so much. Happy
Vidya.

विरुष्काबद्दल गोग्गोड वाचून कंटाळा आलाय ना?
हा घ्या झणझणीत मसाला.
http://m.indiatoday.in/story/virat-kohli-anti-national-bjp-mla/1/1113656...
आपल्या तुपल्या लग्नात नातलग रुसतात. इथे तो राष्ट्रीय प्रश्न आहे.

विराट कोहलीला भारतीय क्रिकेट संघातून वगळावं आणि त्यासाठी तो जाहिरात करत असलेल्या गोष्टींवर बहिष्कार टाकावा म्हणून मी चळवळ सुरू करतोय.

हा लेख इतर लेखांइतका अजिबात आवडला नाही. विशेष विनोदी पण वाटला नाही.

पण लेख वाचून त्यावर मत न देता लेखिकेवर वैयक्तिक पातळीवर टीका करायची लोकांची गरज काय ते समजलं नाही.

विद्या, पु ले शु.

Pages