आप हमसे मिले थे.. भाग - १

Submitted by सनव on 5 December, 2017 - 09:49

सोनाली नेहमीप्रमाणे संध्याकाळीे भाजी वगैरे घेऊन घरी परतली. सोसायटीच्या गेटपाशीच स्नेहा, तनुजा वगैरे घोळका उभा होता.
"सोनालीकाकू!! बरं झालं भेटलीस. तुला एक सांगायचं होतं. निहारच्या बर्थडे पार्टिला तू त्या अभीला पण बोलव."
स्नेहाने सांगून टाकलं.
"तो अभी? तो कशाला? किती शिष्ट आहे तो."
"अगं काकू त्याला काही नावं ठेवू नको. जाईला राग येईल."
"म्हणजे?"
"अगं म्हणजे जाईला आवडतो तो." स्नेहाने आसपास कोणी नाही ना ते पाहून हळूच सांगितलं.

पंधरा मिनिटांनी सोनाली घरी आली तेव्हा बर्याच गोष्टी समजल्या होत्या.
या स्नेहा, जाई वगैरे पोरी इतक्या मोठ्या कधी झाल्या!
सोनाली-शरद लग्नानन्तर लगेच सुहृद सोसायटीत राहायला आले. तेव्हा ही सगळी मुलं शाळेत होती. सोनाली-शरद त्यांचे हक्काचे लाडके काका-काकू झाले. आता या मुली मोठ्या होऊन शिक्षण , नोकरीच्या चरकात अडकल्या होत्या पण अजून सोनालिकाकूसोबत आपल्या डोक्यातील विचार, आसपास घडणाऱ्या गोष्टी शेअर करायच्या.

तो अभी काही या ग्रुपमधला नव्हता. बर्वेंचा नातू. म्हणजे मुलीचा मुलगा. कित्येक वर्षं तो शाळेचा अभ्यास, कॉलेज वगैरे कारणामुळे सुहृदमध्ये कधी फारसा आलाच नव्हता. बर्वे आजीआजोबाच मुलीकडे अधूनमधून जायचे. आता त्याला याच शहरात नोकरी होती म्हणून तो हल्लीच इथे आजोळी राहायला आला होता.

स्कॉलरशिपवर परदेशात इंजिनीयरिंग सायन्स (म्हणजे काय नेमकं?) शिकलेला खूप हुशार नातू म्हणून बर्वे आजी कौतुक करायच्या. असेल तो हुशार आणि कर्तबगार पण खूपच शिष्ट होता. दिसायला उंचापुरा, देखणा होता, मोठी कार होती सगळं ठीक पण सोसायटीत अजिबात मिक्स होत नसे. कोणीतरी त्याला सोसायटीच्या ग्रुपमध्ये ऍड करतो म्हणून व्हॉट्सअप नंबर मागितला तर म्हणे मी व्हॉट्सअप वापरतच नाही. (हे कसं शक्य होतं? त्याचे आजीआजोबापण व्हॉट्सअपवर होते. सर्व आजीआजोबांचा सुहृद सिनियर्स म्हणून ग्रुप होता, त्यावर सी विंगमधल्या डॉ वाघमारेंच्या घरच्या गणपतीचा फोटो होता. याशिवाय शरदने तिला सांगितलं होतं की आजोबा लोकांचा आजी लोकांना माहीत नसलेला अजून एक सिक्रेट ग्रुप आहे. त्याचं नाव सुहृद एव्हरग्रीन आहे आणि त्यावर झी मराठीवरील शनायाचा फोटो डीपी म्हणून आहे. पण ते एक असो.)

एकूण हा अभी तिरसटच होता. पहाटे लवकर उठून पळायला जायचा. मग दिवसभर कामावर जायचा. घरी येऊन लवकर झोपायचा. नाईट आऊट्स नाहीत, टीव्ही बघणं नाही. सोसायटीत कोणाशी मिक्स होणं नाही. नाही म्हणायला रविवारी पोरं फुटबॉल खेळायची तेव्हा हा जमेल तेव्हा यायचा, चांगलं खेळायचा पण नन्तर फार टाईमपास न करता घरी निघून जायचा. कोणी उगाच अघळपघळ बोलू लागलं तर तुसडेपणा करून टाळून निघून जायचा.
घरी असतो तेव्हा जड पुस्तकं वाचत बसतो असं आजी म्हणायच्या. असला रुक्ष प्राणी. आणि जाईसारख्या गोड मुलीला हाच आवडावा- अवघड होतं.

जाईने त्याला अनेक हिंट दिल्या होत्या म्हणे. काहीतरी निमित्त काढून त्याच्याशी बोलणे, आजींकडे काम काढून तो घरी असताना त्यांच्या घरी जाणे वगैरे. पण अभिराम उर्फ अभी काही प्रतिसाद देत नव्हता.

"त्याचं दुसरीकडे जुळलं असेल." सोनालीने शन्का काढली.
"शक्यच नाही. मी आजींकडून कन्फर्म केलंय." जाई निवांत होती.
मग काय बरं असेल? हा अभी 'गे' असेल का? फक्त गर्ली वाटणारे पुरुषच गे असतात की अभिसारखे मॅनली मेन पण गे असू शकतात? म्हणून त्याला जाईमध्ये इंटरेस्ट नसेल का?
ही शन्का बोलून दाखवणे शक्य नव्हते.
पण 'लेट मी शो यू समथिंग' म्हणून तनुजाने फोनवरचे काही फोटो दाखवले. वाघमारे डॉक्टरांच्या घरचा गणपतीउत्सव म्हणजे सोसायटीतल्या सर्वांचाच सहभाग असायचा. एक दिवस सर्वाना प्रसादाचं सुग्रास जेवण असायचं. त्या फ़ंक्शनमध्ये मोठ्या लाल काठाच्या राखाडी सिल्क साडीत जाई फार सुरेख दिसत होती आणि एका फोटोत अभिराम तिच्याकडे तिचं लक्ष नसताना एकटक रोखून पहात होता. फ्रॉम द वे ही वॊज लुकिंग - सोनालीने तिच्या 'गे थिअरी'वर फुली मारून टाकली.
आता तरी दोन शक्यता होत्या. एक - तो जाईशी लग्नाचा विचार करू इच्छित नाही. दोन - त्याला गर्लफ्रेंड आहे पण ते आजींना अजून माहीत नाही. कदाचित 'ती' परदेशातली असेल, घरून विरोध होण्याची शक्यता असेल.

निहारच्या वाढदिवसाचं आजींना आमंत्रण देताना तिने चार वेळा बजावलं की अभीला सोबत घेऊन या. पण शेवटी तो आलाच नाही. काहीतरी महत्वाची मीटिंग होती म्हणे. डॉ वाघमारे त्यांचे फॅमिली डॉक्टर. अगदी घरच्यासारखे संबंध. म्हणून त्यांच्या फ़ंक्शनला नाईलाजाने आला असावा, इथे तसा काही दबाव नव्हता. सुरुवातीला अभीच्या प्रतिक्षेला उत्सुक जाईचा चेहरा तो येणार नसल्याचे कळल्यावर पारच पडला. पार्टिच्या गडबडीतही जाईचा उदास चेहरा सोनालीच्या लक्षात राहिला.

रात्री निहार ,शरद दोघे झोपले. एकटीच आवराआवर करताना सोनालीच्या डोक्यात विचार घोळू लागले. इतके दिवस ती हे प्रकरण गांभीर्याने घेत नव्हती. या पिढीसाठी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड क्रश प्रकार म्हणजे काय ते मिम म्हणतात तसाच हलकाफुलका टॉपिक, असं सोनालीला वाटत होतं. पण जाई प्रचंड सिरीयस झालेली दिसत होती. इंस्टाग्राम जमान्यात एकदम 'छुपा लो यूं दिल में प्यार मेरा के जैसे मन्दिर में लौ दिये की ' सुरु व्हावं तसं काहीसं झालं होतं. हे धोकादायक होतं. काय करायला हवं? तिच्या घरच्यांच्या कानावर घालावं का? पण तिने ज्या विश्वासाने हे शेअर केलं त्याच्याशी ही प्रतारणा होईल का? पार्टिच्या दगदगीने थकलेली असूनही जाईच्या काळजीने सोनालीला झोप येईना.

क्रमश:

दुसरा (शेवटचा) भाग इथे -

https://www.maayboli.com/node/64698

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग सुरुवात. व्याकरणाच्या, शुद्धलेखनाच्या चुका नाहीत, परिच्छेद नीट पाडलेत, विरामचिन्हे, अवतरण चिन्हे योग्य प्रकारे वापरलीत त्यामुळे वाचनात इंटरेस्ट टिकून राहिला. आजकाल असे लेखन आउट ऑफ फॅशन होत चालले आहे मायबोलीवर.

इंस्टाग्राम जमान्यात एकदम 'छुपा लो यूं दिल में प्यार मेरा के जैसे मन्दिर में लौ दिये की ' सुरु व्हावं तसं काहीसं झालं होतं. >> किती जुनं गाणं उकरुन काढलंय Happy

जाई, धन्यवाद. जाईच्या गोष्टीवर जाईचा पहिला प्रतिसाद बघून छान वाटलं!!
मेधा, ग्रामरबद्दल आवर्जून लिहिल्याबद्दल थँक यू. आणि ते छुपा लो माझं आवडतं गाणं आहे Happy
सायुरी, सायो, पाफा, स्वाती, अजय सर्वांचे आभार. पुढील भाग लवकरच येईल.