आप हमसे मिले थे - भाग 2 (समाप्त)

Submitted by सनव on 9 December, 2017 - 14:32

पहिल्या भागाची लिंक -
https://www.maayboli.com/node/64663

एका शनिवारी शरद निहारला घेऊन जिमखान्यावर क्रिकेट बघायला गेला होता. सोनालीने जाईला घरी बोलावून घेतलं. उदास चेहरा, लालसर डोळे आणि एकूणच विचारमग्न अशी जाईची अवस्था पाहून सोनालीला काळजीच वाटली.

जाईच्या मते तिने अभीला पुरेसे इशारे दिले होते. आता तिने करण्यासारखं आणखी काही उरलं नव्हतं. 'त्याच्या मनात नसेल तर मग आता तू त्याचा विचार मनातून काढूनच टाक. करीयरचा विचार कर. मुलं काय हजार मिळतील तुला..कशात काही नसताना तू स्वतःला त्रास का करून घेतेयस..' सोनालीने जे बोलायचं ठरवलं होतं ते बोलायला सुरुवात केली. पण जाईच्या मते 'कशात काही नाही' हेच वादग्रस्त विधान होतं. गेल्या काही महिन्यांत त्यांच्यात बरंच काही झालं होतं.

एकदा रात्री नऊच्या सुमारास मैत्रिणीसोबत डिनर करून ती एकटीच रेस्टोरन्टच्या बाहेर उभी होती. रिक्षा पटकन मिळेना आणि पावसाची लक्षणं दिसत होती. अचानक अभी तिथे आला आणि त्याने तिला सोसायटीच्या कोपर्याशी सोडलं. तसं दोघांच्यात बोलणं काहीच झालं नाही. आजोबांची औषधं आणायची आहेत असं सांगून आणि इतक्या रात्री तिने बाहेर असू नये असा एक सल्ला देऊन तो निघून गेला. एकदा तिने केलेला गाजराचा एगलेस केक तिने डबा भरून त्याच्या आजीला दिला. चार दिवसांनी डब्यात दुसरा खाऊ घालून डबा परत देताना त्या म्हणाल्या - 'एरवी आमचा अभी गोडाला हात लावत नाही पण तुझा केक मात्र दोन दिवसांत सम्पवलान..' आणि हो, एकदा तो सकाळी कामावर निघाला असताना ती क्लासला निघाली होती. तर स्कुटी चालू होईना. त्याने पार्किंगमध्ये तिला गाडीशी खटपट करताना पाहिलं आणि आपणहोऊन येऊन गाडी सुरु करून दिली. उशीर झाला असेल तर मी कारनी सोडू का असंही विचारलं. ती हो म्हणणारच तितक्यात तिचा बाबाच नेमका खाली आला. मग अर्थात बाबानेच तिला क्लासला सोडलं. तेव्हा अभीचा चेहरा बाबाला येताना पाहून तिच्याइतकाच पडला होता असं तिला वाटलं. शिवाय तनुजाकडचा फोटोही महत्वाचा होता.

सोनालीने निश्वास सोडला. यातला कुठलाच प्रसंग ठामपणे काहीच दर्शवत नव्हता. तो सहज सोसायटीतील सहनिवासी म्हणून मदत करत असेल, ही शक्यता तिने बोलून दाखवली. 'खरंय काकू, त्याला काही बोलायचं असतं तर तो एव्हाना बोलला असता..' जाईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिला रडू द्यावं असा विचार करून सोनाली स्वयंपाकघरात गेली आणि तिने दोन कप कॉफी केली. बाहेर कप नेऊन ठेवले तोच बेल वाजली. जाई दचकून डोळे पुसत उठू लागली.

कोण असेल ते सोनालीला माहीत होते. 'अगं बस..कुरियरवाला असेल अमेझॉनचा.' ती म्हणाली. जाई पुन्हा खाली बसली. डोळे वहात होतेच.
सोनालीने दार उघडलं तर समोर कुरियरवाल्याच्या ऐवजी अभिराम. ती दचकून त्याच्याकडे पाहू लागली. गोंधळून त्याने एक पाकीट पुढे केलं. 'रिपेअर कमिटीचे पेपर्स. आजोबांनी दिलेत. तुमच्याकडेच द्यायचे आहेत ना?'
'अं..?हो..हो..शरद बघतो हे सर्व' सोनालीने पाकीट घेतलं आणि म्हणाली , 'तू जरा आत ये रे मला तुझ्याशीही बोलायचंय. '

त्यावर तो 'नको जरा घाईत आहे' म्हणून सटकतच होता तेव्हढ्यात त्याची नजर सोफ्यावर बसलेल्या जाईकडे गेली. तिची अवस्था बघून तो काही न बोलता आत शिरला. जाई लगेच उठून डावीकडच्या निहारच्या बेडरूममध्ये निघून गेली. त्या बेडरूमचं दार उघडं असेल तर बाहेरचं बोलणं ऐकू यायचं.

'तिची ही अवस्था तुझ्यामुळे आहे अभिराम. नाही- तुझा दोष काहीच नाहीये. पण तिला तू आवडतोस यात तिचाही दोष नाही ना. तू एकदा काय ते क्लियर करून टाकतोस का- सो दॅट जाई कॅन मूव्ह ऑन..' सोनालीने भराभरा बोलून टाकलं.
'ओह..' अभिने सुस्कारा सोडला.
'निहारच्या आई..मला जाईला हर्ट करायचं नाहीये. '
'तुझी काही चूक नाहीच आहे..'
'तसं नाही..पण माझंच काही नक्की नाही. हा प्रोजेक्ट सम्पल्यावर पुढे काय करायचंं, कम्पनी मागे लागलीय जपानला जा. आय हॅवन्ट डिसायडेड. रिसर्चवर फोकस करायचा की बिझनेस साईडला शिफ़्ट करायचं माहित नाही. एकूणच..माझे विचार तपासून घ्यायचा हा काळ असणार आहे. करीयर हा एक भाग झाला. इन जनरल, आय डोन्ट नो व्हॉट आय वॉन्ट इन लाईफ..मग त्यात जाईला काय प्रॉमिस करू? तिला मी आवडतो मला माहीत आहे. आणि ती कोणी दुसरी मुलगी असती तर एव्हाना आमचं अफेअर सुरुपण झालं असतं. शॉर्ट टर्म अफेअर ऑफकोर्स. पण जाईशी मी तसं नाही करू शकत. केलं असतं तर सरळ लग्नच तिच्याशी..'
अरे देवा...किती गोंधळ होऊन बसलाय..सोनालीला आता स्वतःचाच रक्तदाब वरखाली होईल अशी भीती वाटू लागली.

जाई अजूनही बाहेर येईना.
'हे बघ मला मान्य आहे. तुमचं वय लहान आहे, डोक्यात गोंधळ आहेत. जितके पर्याय जास्त तितकं कन्फ्युजन जास्त. पण 'मनासारखं माणूस' या गोष्टीला अनेक पर्याय नसतात. तू तिच्याशी बोल, हवं तर साखरपुडा करून ठेवा. थोडं प्लॅनिंग,दोन्हीकडून थोडी तडजोड- चर्चा करून मार्ग काढता येतोच. दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, अनुरूप आहात, घरून विरोध होण्याची काहीही शक्यता नाही..डोन्ट थ्रो धिस अवे देन..'
अभीचा चेहरा ठाम होता. सोनालीचं म्हणणं त्याला पटलेलं दिसत नव्हतं. डोळे पुसत जाई बाहेर आली.
तिने सोनालीचा हात हातात घेऊन 'थॅन्क्स काकू' म्हटलं आणि सोफ्यावरचा मोबाईल उचलून ताठ मानेने दार उघडून निघून गेली. अभीच्या चेहर्यावर क्षणभर वेदना तरळून गेली. सोनालीकडे बघून एकवार मान झुकवून तोही निघून गेला.

जाई आता घरी जाऊन रडेल का, तिच्या आईबाबाचा मला फोन येईल का..अशा प्रतीक्षेत सोनाली होती पण तसं काहीच झालं नाही. निहार आणि शरद आता कधीही परत येतील आणि जेवण तयार नाहीये याची जाणीव होताच ती स्वयंपाकघरात कामाला लागली.

पुढे मग सगळं रुटीन जसं सुरु होतं तसंच सुरु राहिलं. पण काहीतरी बदललं होतं. जाई..ती बदलली होती. चेहर्यावरचे उदास, हरवलेले भाव जाऊन आता एक प्रसन्न स्थिर शांतपणा दिसत होता. तिची लाईफस्टाईलही बदलत चालली होती. अभी पळायला जायचा तेव्हा ती योगाच्या क्लासला जाऊ लागली होती. हल्ली जाता येता तिच्या हातात पुस्तकं दिसू लागली होती आणि बोलण्यात पुस्तकांचे उल्लेखही येऊ लागले होते. फावल्या वेळात निहार आणि त्याच्या गँगवर न डाफरता त्यांना क्राफ़्ट शिकवू लागली होती. त्यामुळे छोटी मुलं मुली जाईताईवर खुश झाली होती. जाईचं अभिसाठी अधीर होणं आता इतिहास झाला होता, आता तिच्या बोलण्यात त्याचा उल्लेखही होत नव्हता.
भल्या पहाटे योगाला निघालेली जाई पाठमोर्या अभिकडे काहीच क्षण का होईना पण डोळ्यांची निरांजनं करून पाहते हे सोनालीने तिच्या टेरेसवरून काही वेळा पाहिलं होतं. जर अभी थोडा लवकर खाली आला तर समोरच्या विंगमध्ये जाई खाली येईपर्यंत तो जागचा हलत नाही असाही भास सोनालीला झाला होता.
हे काहीतरी वेगळंच होतं. ही म्हणजे जुन्या दिवसांची आठवण करून देणारी ब्लॅक एन्ड व्हाईटच्या जमान्यातली अबोल प्रेमकथा होती.

या सर्वाचं पुढे काय होणार हा प्रश्न होताच. पुढे अभी परदेशात निघून गेला. जाई तरीही योगाला जातच होती पण आता तिची नजर त्याचा शोध घेत नसे. नन्तर तीही मास्टर्स करायला बंगलोरला निघून गेली.

‎दोन वर्षांनी गणेशोत्सवात सोसायटी नेहमीप्रमाणे उत्साहात होती. गोल्ड मेडल मिळवून अभ्यासक्रम पूर्ण करून जाई नुकतीच बंगलोरहून परतली होती. डॉ वाघमारेंकडच्या महाप्रसादासाठी नेहमीप्रमाणे मंडप उभारला होता. केटररची माणसं लगबग करत होती. स्पीकरवर झिंगाट , लैला वगैरे गाणी खूप वेळ वाजल्यावर कोणीतरी दम दिला असावा कारण आता जुनी हिंदी गाणी सुरु होती.
‎यही वो जगह है यही वो फिजाएँ यही पर कभी आप हम से मिले थे.
‎इन्हे हम भला किस तरह भूल जाए यही पर कभी आप हम से मिले थे

गडद हिरव्या रंगाची नारायणपेठ साडी नेसलेली जाई मंडपात आली. मंडप जवळपास रिकामाच होता. मागच्या बाजूला काही सोफे ठेवले होते. ती एका सोफ्यावर बसली. मैत्रिणी थोड्या वेळात येणार होत्या. तिला त्याक्षणी एकटंच राहायचं होतं. दोन वर्षांनीही..त्याची आठवण झाली की अजूनही त्रास का होतो? आसपास पसरलेल्या अनेक आठवणी, सांकेतिक स्थाने. गेटबाहेरील कोपरा, हाच असाच मंडप. सोनालीकाकूच्या घराचा दिवाणखाना. ए विंगचं पार्किंग.
‎यहीपर मेरा हाथ मे हाथ लेकर कभी ना बिछडनेका वादा किया था..
‎सदा के लिए हो गये हम तुम्हारे गले से लगाके हमे ये कहा था
‎कभी कम ना होगी हमारी वफाए यही पर कभी आप हम से मिले थे..

‎समोरुन ऑफ व्हाईट कुर्ता आणि जीन्समधला अभी तिच्याकडे चालत येतोय असा तिला भास झाला. स्ट्रेसमुळे आता आभासही होऊ लागले की काय आपल्याला, तिने निरखून पाहिलं. तो खरंच अभी होता आणि तिच्याच दिशेने येत होता. तो येऊन तिच्या उजवीकडे सोफ्यावर बसला, कायमच तिथे बसायचा निर्णय घेऊन टाकल्यासारखा. जे काही बोलायचं, समजायचं ते एकमेकांचे चेहरे बघून त्यांना कळलंच होतं. त्याने तिचा हात हातात घेतला. तिने रोखून धरलेला श्वास सोडला आणि त्याच्याकडे हसून पाहिलं.

तिकडे ‎स्पीकरवरची हिंदी गाणी सम्पून आता सनईच्या प्रसन्न शुभमंगल सुरांनी मंडप भारावला होता.

||समाप्त||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान , प्रसन्न कथा.
शेवटही सुरेख.
सबुरी का फल हमेशा मीठा होता है। हे हल्लीच्या पिढीला सांगुनही पटत नाही मात्र !

कथा आवडली. परंतु मला सोनाली फार भोचक वाटली. त्यांना त्यांच ऑर्गॅनिकली फिगर आऊट करुन द्यायला हवे होते. तिला क्युपिड बनण्याची गरज नव्हती. Happy
अर्थात अशा प्रकारचे ललित म्हणजे संपूर्ण समाज नसतो. तर समाजातील एखाद्या विशिष्ट स्वभावाचा पैलू असतो. त्यामुळे ललित म्हणुन आवडलच.