मोड आलेल्या मेथी दाण्याची उसळ/ भाजी

Submitted by सायु on 27 November, 2017 - 06:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. मोड आलेले मेथी दाणे = १ वाटी
२. कीसमीस = पाव वाटी
३. एक कांदा, उभा चिरलेला
४. लसुण ५,६ पाकळ्या, बारिक चिरलेल्या
५. तेल २ ते ३ चमचे
६. बारिक चिरलेली कोथोंबीर
६. मोहरी,तिखट, हळद, मिठ अंदाजे

क्रमवार पाककृती: 

कढईत दोन चमचे तेल तापवुन ,मोहरी घाला, मोहरी तडतडली की कांदा आणि लसुण घाला.. गुलाबीसर परतुन घ्या.. मग किसमीस घालुन पाच सात मिनटे पुन्हा परतायचे.. हळद, तिखट घालायचे, मग मेथ्या घालुन पुन्हा परतायचे.. मिठ घालुन एक वाफ काढुन घ्या..
बारिक कोथींबीर घालुन सर्व्ह करा.

हिवाळ्यात मेथी खाल्ली की कंबर दुखणे, हात पाय दुखणे अशा तक्रारी येत नाहीत. म्हणुन ही भाजी / उसळ आठवड्यातुन एकदा तरी होतेच..
पौष्टीक आणि जरा वेगळ्या चवीची आहे त्यामुळे एकदा करुन पहा.

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांना पुरेशी आहे.
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या वहिल्या प्रतिसादा साठी धन्यवाद योकु..
आई मेथीदाणे भिजवून झुणका टाईप भाजी करते. तीही मस्तच होते.++ येस्स ती ही खुप छान लागते.. Happy

मस्त आहे सायु ही रेसिपी. मी एकदा केली होती तर भाजी कच्च्या मोड आलेल्या मेथ्या पेक्षा कडू लागत होती. आता किसमिस घालून करून बघते.

योकु, त्या झुणक्याची रेसिपी ही द्या वेगळा धागा काढून .

मी केली नाही मेथी दाण्यांची भाजी. एकदा करेनच पण आता.
आईच्या पद्धतीत ती मेथ्या रात्रभर भिजवून सकाळी पाणी बदलून उकळून घ्यायची आणि मग त्या निथळून पुढे भाजी करायची अशी पद्धत आठवतेय. यामुळे कडवटपणा बराच कमी होतो (तरीही गुणधर्मानुसार जरासा कडूपणा राहाणारच). तीला विचारून फटूसकट टाकेन मग इथे...

सगळ्यांचे आभार..:) --------/\--------

येस्स! झुणका पण मस्तच लागतो.. कांदे ,टोमाटो , मेथ्या आणि बेसन पीठ घालुन..
मोड आलेल्या मेथ्याच लोणचही छान होत. मी करते नेहमी.++ पा कृ द्या..
खिचडीही करतात.++ अच्छा.:)
ही कडू लागत नाही का?++ विशेष नाही.. कारल्याची लागते ना तेवढीच..
गूळ किंवासाखर नाही घालायची का??++ घालु शकतो.. पण मी नाही घालत.
मी एक दोनदा मेथीला मोड आणायचा प्रयत्न केला पण ती बुळबुळीत होते. काय चुकत असावे?++ पाणी नीट उपसुन मग फडक्यात बांधुन ठेवायची. मेथी दाणे जास्त वेळ पाण्यात ठेवण्यात आलेत का?

दोन्ही बाळंतपणात खाल्लीये Proud छान लागते. Happy

तुम्हा सगळ्यांमुळे कीत्ती तरी प्रकार कळलेत..
झुणका, लोणचं, आमटी, खिचडी.. Happy

कडवट पणा बद्दल खात्री नसेल तर अर्धे मेथी दाणे (मोड आलेले) आणि बाकी अर्धे इतर कोणतेतरी मोड आलेले कडधान्य वापरून उसळ केलेली चालेल का?
मेथी सोबत कोणते कडधान्य जाईल?

दक्षिणा, खुप कडु नाही लागत.. एकदा मुठ भर मेथीची करुन तर बघ.. कोशिंबीरी सारखी.
>मेथी सोबत कोणते कडधान्य जाईल?<< मथी, मटकी, मसुर..

अनघा , मानव आभार.. करुन बघा आणि प्र.ची द्या!

सायु मोड कसे आणले ते लिही ना. मी आता भिजत घातले.++ सकाळी मेथी दाणे भीजवायचे. ७, ८ तास भिजल्यावर, रोळीत ठेवुन उपसुन घ्यायचे.. मग रात्री, एका स्वच्छ सुती फडक्यात बांधुन ठेवायचे .(श्रीखंडा चा चक्का बांधतो ना तसे) सकाळ पर्यंत छान मोड येतील.:)

आहा... मस्त दिसतेय गं...
मी नाही केली कधीच.. आता घरी गेली कि करुन बघणार Happy
हिवाळ्यात करायला आणखीनच छान नाही का..

परवा या पाकृची आठवण झाली आणि वाचून आज केली. आवडली.
घरी सगळ्यांना आवडली ही वेगळ्या चवीची भाजी.
मोड आलेले मूग सुद्धा होते घरात तेव्हा ते सुद्धा घालून केली.

methibhaji.jpg

IMG-20180903-WA0001.jpg

लय भारी झाली ओ, मज्जा आली वेगळ्या चवीची भाजी. फक्त लसूण नाही घातला. ॲधि नवरा बघुन खाणार नाही म्हणाला. पन चव घेउन आवडीने खाल्ली. किसमिस ची चव चांगली लागली.

Pages