संवाद - अफाट आणि अतर्क्य

Submitted by राफा on 7 October, 2017 - 14:36

सलीम-जावेद विषयी लेख लिहिल्यावर आलेल्या उस्फूर्त आणि अप्रतिम प्रतिसादानंतर अजून झटक्यात लिहावे वाटले..
गप्पांचे एक्स्टेंडेड सेशन दारात निरोप घेताना व्हावे तसे!

ऑलरेडी पावरबाज संवादांचे तुम्हीही फ्यान असाल तर सोन्याहून पिवळे. जर उल्लेख केलेला चित्रपटच पाहिलेला नसेल तर उर्वरित लेख वाचायचे बंद करून आधी चित्रपट पाहून आनंद लुटावा ही विशेष विनंती… लेख वाचण्याचे प्रि-रिक्विझिट म्हणून नव्हे… तर एका चित्रपटप्रेमीने दुस-या चित्रपटप्रेमीला केलेला प्रेमळ आग्रह म्हणून (जेणेकरुन एका उत्तम चित्रपटाचा तुम्ही आनंद लुटू शकाल)

चित्रपटांच्या इतिहासाकडे पाहिले तर सुरुवातीला ते ‘मूक’ असत.. मग संगीत आले आणि मग संवाद. खरं म्हणजे चित्रभाषा कमीत कमी शब्दांमधे भावना व आशय पोहोचवत असेल तर ते दिग्दर्शक, नट (व पटकथा-संवादलेखकाचेही) यश म्हणायला हवे…संवादलेखकाचेही अशासाठी किती कुठे किती हवे आणि कुठे थांबायचे ह्याचे भान हवे त्याला, दिग्दर्शकाला आणि एडीटरलाही.

अशा परिस्थितीत, जर मॉडर्न चित्रपट जर संवादाशिवाय असेल तर ते अतुलनीय धाडस म्हणावे लागेल… ह्याचे एक अत्युत्तम उदाहरण म्हणजे 'ब्लॅक होल' (https://www.youtube.com/watch?v=P5_Msrdg3Hk) हा लघुपट! एकही संवाद नसताना माणसाच्या हव्यास/लालसा ह्यावर यथोचित टिप्पणी करणारा हा लघुपट आहे.

‘पुष्पक’ ह्या चित्रपटातली सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे संवाद ‘टाळण्याच्या’ ज्या युक्त्या दिग्दर्शक/पटकथा लेखकाने वापरल्या आहेत त्याला तोड नाही.दुसरे असे की चित्रपट पाहिल्यावर हे उमगते की जर शब्दांशिवाय प्रेम, भिती, उत्सुकता, निराशा, आशा ह्या आणि अजून कितीतरी भावना जर व्यक्त होऊ शकतात तर आपण मग रोज इतकी बडबड का करतो? तर ते असो.

हिंदी चित्रपटांविषयी बोलायचे तर संवाद हे त्यांचे बलस्थान व लोकप्रिय होण्याचे एक महत्वाचे कारण आहे… ‘क्या ड्वायलॉक मारा है’ (‘क्या एन्ट्री है’ च्या चालीवर) हे आपले चित्रपटाच्या दर्जाचे एक मोजमाप असते/असायचे. पण इंग्रजी चित्रपटात ह्याइतकेच (किंवा जास्त चतुर/वास्तववादी/नाट्यमयता वाढवणारे) संवाद आढळून येतात. असंख्य रॅंडम उदाहरणे डोळ्यासमोर येत आहेत. सगळीच देणे शक्य अर्थातच नाही. (‘विटनेस टू द प्रॉसिक्युशन’ पाहिला आहात का?)

अगदी ‘गोल्डफिंगर’ ह्या बॉंडपटाचे उदाहरण घ्या ना. 

bond do you expect me to talk.jpg

बॉंड ला पकडल्यावर व्हिलन गोल्डफिंगर त्याला मारण्यासाठी ‘लेझर बीम’ चालू करण्याची आज्ञा देतो.. बॉंडला जखडून झोपवले आहे त्या टेबलाचे लाकूड चिरत तो लेझर हळूहळू बॉंडकडे सरकतो आहे… गोल्डफिंगरचे आता बॉंडकडे दुर्लक्ष आहे.. तो विषय संपला अशा थाटात तो त्याच्या शास्त्रज्ञाशी काहीतरी गुफ्तगू करु लागला आहे… बॉंडला खरे म्हणजे घामटे फुटले आहे.. निर्वाणीचा उपाय म्हणून तो वाटाघाटीचा मार्ग स्वीकारतो.

एक डोळा आपल्याकडे सरकणा-या ‘प्रकाशमान’ मृत्यूकडे ठेवून पण वरकरणी शांत असल्याचे भासवून बॉंड विचारतो

‘डु यू एक्स्पेक्ट मी टू टॉक?’

गोल्डफिंगर चे चित्त बोलण्यातून काहीसे विचलित होते. तो थंडपणे उत्तर देतो: 

‘नो मिस्टर बॉंड, आय एक्स्पेक्ट यू टू डाय!’

  
क्या ड्वायलॉक है बॉस!

अशीच बहारदार वाक्ये अनेक इंग्रजी चित्रपटात आहेत.. विशेषत: जुन्या! 

मात्र एक लक्षात येते की इंग्रजी चित्रपट जरा पन्नासच्या दशकातला असेल तर संवाद चांगले असले तरी ब-याच वेळा शब्दबंबाळ वाटायचे… एका वाक्याचा अर्थ डोक्यात पेटतो ना पेटतो तोवर दुसरे वाक्य सटकन यायचे.. थोडक्यात ‘रिअल टाईम’ मधे सर्व पात्रांना इतके चुरचुरीत संवाद इतक्या फास्ट (ट पूर्ण) बोलायला कसे सुचतात असा सवाल पडायचा.

पण काही चित्रपटांत मात्र उत्कृष्ट संवाद आणि त्याहून उत्कृष्ट टायमिंग असा सुंदर मिलाफ पहायला मिळतो… केस इन पॉईंट: ‘कम सप्टेंबर’!

हा माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी! (नुसती मादक  ‘जीना लोल्लोब्रिजिडा’ आहे म्हणून नव्हे बरं!) .. 

तसे इथे उल्लेखलेले बहुसंख्य चित्रपट मर्मबंधातली ठेवच!

ह्यात ‘मिडल एज्ड’ रॉक हडसन त्याच्या तशाच मध्यमवयीन प्रेयसीला, (त्याच्याच व्हिला मधे घुसलेल्या) उत्साही पण नवथर कॉलेज तरुण तरुणींना एकत्र पिकनिकला का नेऊ नये हे समजावताना काय म्हणतो? इंग्रजीतच वाचा:

Robert: I can go to jail for what can happen to those girls! 
Lisa: What can happen to them? There are four boys and six girls. That add up to ten, and there`s a safety in numbers. 
Robert: Now there's more to mathematics than adding. Those boys look quite capable of dividing and multiplying! 

आपल्या मराठी चित्रपटांचे उदाहरण घेऊ. (पटकन ‘वाकडोजी धने’ आठवले)

‘सिंहासन’ हा अनेक अर्थानी ‘युनिक’ चित्रपट म्हणता येईल. तर, ‘सिंहासन’’ मधे पत्रकार दिगू (निळू फुले) फोनवर बोलत आहे… पलिकडून सवाल येतो 

‘पण असं झालं काय अचानक, मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडायला?’

ह्यावर दिगू मिश्किलपणे म्हणतो 

‘काही नाही, खाऊ नये ते खाल्लं असेल!’

क्या बात है!

आता काही अतर्क्य संवाद पाहू. नाही, तसे हिंदी चित्रपटांमधे अशा संवादाना काही तोटा नाहीच. शिवाय कादर खान कारखान्यात बनलेल्या एकेक ‘चिजा’ म्हणजे… (अर्थात त्याने काही मार्मिक किंवा खरोखरीच विनोदी संवादही लिहीले आहेत). पण कादर खान म्हणजे बहुदा ‘उसने ऐसे कसके झापड मारा की मेरे मनके मंदिरकी घंटियॉं हिलने लगी’ किंवा ‘मेरी बेईमानी की किताब में लिखा है कि सोचो कुछ, बोलो कुछ, करो कुछ, हो जाए कुछ.. समझे कुछ?’ ह्या स्टाईलच जास्त (ही अत्यंत त्याच्या रेंजच्या मानाने खूपच साजूक तुपातली उदाहरणे आहेत Happy ).

पण धक्का बसतो जेव्हा अनपेक्षित ठिकाणी असा संवाद ऐकू येतो. आता एखाद्या गावगुंडाने जर रस्त्यावर कोणासोबत अश्लाघ्य भाषा वापरली किंवा ‘असंसदीय’ वर्तन केले तर आपण ते समजू शकतो. परंतु, एखाद्या विद्यार्थ्यांमधे लोकप्रिय असलेल्या, सज्जन सात्विक प्राध्यापकाने जर भर वर्गात एखादा तरल विषय शिकवताना समजा पानाची पिचकारी टाकली किंवा तद्दन बाजारु नवीन फिल्मी गाण्याची ओळ गुणगुणली तर ऐकणा-या/बघणा-या विद्यार्थ्यांची जी अवस्था होईल, अशी अवस्था काही वेळा होते ती मातब्बर लोकांच्या काही अपवादात्मक कलाविष्कारामधून.

आता हिंदी चित्रपटातील घिसेपिटे ड्वायलॉक तर सर्वांनाच परिचीत आहे. त्यंत लोकप्रिय चित्रपटातील अत्यंत अतर्क्य संवाद कुठले असा विचार मी करतो तेव्हा हटकून सुरुवातीला ‘गोलमाल’ चे उदाहरण डोळ्यासमोर येते. 

'गोलमाल' म्हणजे अर्थातच ह्रुषिकेश मुखर्जींचा ‘गोलमाल’!

त्यात हिरॉईन बिंदिया गोस्वामी ला तिची मैत्रिण म्हणते

“ले, खा!”
“क्या? ”
“दहिबडा”
“नही रे खाने को जी नही चाहता”
“कया ? दहीबडा खाने को जी नही चाहता ? हं.. अगर लडकी दहीबडा खानेसे इन्कार कर दे तो इसके दो मतलब हो सकते है. या तो धीरे धीरे लडकीसे लडका बन रही है ! ”
(इथे बिंदिया गोस्वामी मैत्रिणीचे नाव घेत ताडकन उठते! समजा.. “अंजू!”)
“नही नही. वो लक्षण तो मुझे भी दिखायी नही देता. तो दूसरीही बात सही है”
“दूसरी बात क्या है”
“जरूर तुझे प्रेम का रोग हो गया है ! …… एक दिन मेरा भी मन दहीबडा खानेको नही चाहा तो दुसरे दिन मुझे पता चला की मुझे बंटू से प्रेम हो गया है.. ”

आता बोला! माझी तर बोलतीच बंद झाली! दोन दहीवडे तोंडात एकदम कोंबल्यासारखी!

वरील संवाद लिहीताना संवादलेखकाने काय खाल्ले (किंवा बहुदा प्यायले) असावे? (संवाद लेखक: डॉ. राही मासूम रझा). दहीबड्याचे ‘हे असे’ संदर्भ जर सर्वसामान्य ज्ञानात मोडत असेल तर मग माझेच घोर अज्ञान असणार! कदाचित त्यावेळची ती ‘मीम’ असूही शकेल जी आता संदर्भहीन आणि अतर्क्य वाटते आहे.

ह्या चित्रपटातील बाकीचे काही अप्रतिम संवाद बघा आणि मग वरील संवादाचे विचित्रपण अजूनच जाणवते.

रामप्रसाद: “आप घडीघडी, घडी मत देखिये”
उर्मिला: “साडे छे बज गये”
रामप्रसाद: “साडे छे तो रोजही बजते है इस समय!”

रामप्रसाद: “… तो भूल जाओ मुझे!”
उर्मिला: “तुम क्या हिस्टरी हो, जो पढू और भूल जाऊ?”

रामप्रसाद: “सांस की तकलीफ हुई थी.. अब नही है”
भवानीशंकर: (वैतागला असल्यामुळे) क्या नही है? सांस या तकलिफ?”

अतर्क्य संवाद शोधायला फार दूर जायची गरज नाही. ‘शोले’ ! हो हो ओरिजनल, रमेश सिप्पीचा, आणि 2D शोले!
‘शोले’ मधला पहिलाच महत्वाचा संवाद कुठला? (म्हणजे ‘अं, ठाकूर साब..’ , आईये जेलर साब, आईये’ व अप्रतिम टायटल म्युझिक झाल्यानंतर)

जेलर म्हणतो

“ठाकूरसाब, आपका खत मिलतेही मैने सोचा, आपने मुझे याद किया है. अगली गाडीसे चला आया.”

म्हणजे काय?

खत म्हणजे काय युरिया खताची पिशवी पाठवली होती का आंब्याची पेटी पाठवल्यासारखी?
काहीतरी ‘खता’मधे लिहीले असणारच ना?
मग ते न वाचण्याजोगी अशी कुठली ‘खता’ केली ठाकूरने? लक्षात घ्या तो 'खत' म्हणतो, 'तार' नाही.

थोडक्यात, सोचा आपने मुझे याद किया म्हणजे काय?

‘गोलमाल’ मधे उत्पल्ल दत्त विधवा बहिणीने (शोभा खोटे) रामप्रसाद समजून त्याच्या डोक्यात काठी हाणते वर म्हणते ‘भैय्या, मैने सोचा की रामप्रसाद है’. त्यावर उद्विग्न होऊन उत्पल दत्त म्हणतो ‘सोचा? सोचा! तुमने सोचना भी शुरु कर दिया!’ असचं काहीसं त्या जेलरला म्हणावसं वाटतं मग!

चला.... एक्स्टेंडेड गप्पा छान झाल्या. पण आता निघतो. भेटूयात.

- राफा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आठवण
तो दही वड्याचा संवाद मलाही प्रत्येक वेळी तितकाच बुचकळ्यात पाडतो.आणि त्यात मैत्रिणीचं प्रेम बन्टु आहे.ते तर अजूनच कॉमेडी.बन्टु वगैरे सारखं हाफ चड्डी मधल्या मुलाचं भासणारं नाव आणि मैत्रीण अगदी सिंसीयरली मंगळसूत्राशी खेळत सांगत असते.

धन्यवाद सर्वांना !

केदार, गप्पा कधीच पूर्ण होत नाहीत ना Happy

अनु, खरंच की... बिट्टू कसं लिहीलं गेलं .. संवाद स्मरणात आहे (आवाज) तोही बंटू च ऐकू येतोय Happy (पण मंगळसूत्राही खेळत वगैरे नाही हां .. आत्ताच युट्युब वर चेकले). बंटू करेक्टतो आता शक्य असेल संपादन तर.

हां बहुधा ती खेळत नाही.
नुसतीच लाजत बोलते.मी पण बरेच दिवस झाले तो सीन पाहून .
मुळात तो डायलॉग ऐकून ("आठवतं का तुला, मला बघ, बंटू च्या खेपेला कडक डोहाळे होते आणि दहिवडे अगदी नक्को नक्को झाले होते..") वाल्या सिनारिओ मधले डायलॉग आठवतात
पुढच्या सीन मध्ये ती मैत्रिण बर्‍यापैकी नॉर्मल छोट्या दुमजली बंगल्यात अमोल पालेकर ला रोबो सारखे तीन वेळा आईये, आईये, आईये, उपर चले जाईये तीन वेळा म्हणते जसे काही ती एका मोठ्या महालाच्या कॉरिडॉर मधून रस्ता दाखवत एस्कऑर्ट करत असावी!!
मुळात दोघे २ फूट अंतरावर आहेत.सरळ बोट दाखवून 'ते बघ त्या जिन्याने वर जा तुझी आयटम तिथेच आहे' सांगता आले असते Happy

मस्त लिहिलंय. पण असं पट्कन ब्रेक लागल्यासारखं का संपवलंय.
दहीबडेचे ड्वायलाग जाम विनोदी आहेत.
पण गोलमाल ऑलटाईम फेव्हरीट आहे. उत्पल दत्त आणि अमोल पालेकरचा.
शेट्टी अनाची गोलमाल सिरीज म्हणजे राम राम.

सगळेच संवाद भारीच आहेत. मी प्रत्येक वेळेस गोलमाल बघताना हा विचार नक्की करतो की हिंदी मध्ये दही वड्यांना दही बडा असेच म्हणतात का ? Lol

अरे हो
गोलमाल वरुन आठवले
अंगूर मध्ये एक लाख वाला संजीव कुमार दिप्ती नवल ला कँटिन मध्ये पाहून म्हण म्हणतो ती काय आहे कोणाला कळलीय का?
यक ना शुद दो शुद.

मुंजिर रंजिर कुंदि क्यो मुंदर इत्तिर कुंजि क्यो प्रमाणे हेही कोडे कोणी उलगडेल म्हणून वर्षानुवर्षे प्रतिक्षेत आहे.

पण गोलमाल ऑलटाईम फेव्हरीट आहे. उत्पल दत्त आणि अमोल पालेकरचा.
शेट्टी अनाची गोलमाल सिरीज म्हणजे राम राम.>>+१

पण असं पट्कन ब्रेक लागल्यासारखं का संपवलंय.>>+१

'ते बघ त्या जिन्याने वर जा तुझी आयटम तिथेच आहे' सांगता आले असते >>>> हाहाहा Happy

पण केव्हा तरी दुसर्‍-या सीन मधे ती मंगळसूत्राशी खेळते बहुतेक Happy

मला आता बंटू आणि ही बंटूडी ह्यांची backstory इमॅजिन करण्याचा मोह अनावर होत आहे Happy

यक ना शुद दो शुद = एक संकट काय पुरेसे नव्हते तिथे हे दुसरेही येऊन उभे ठाकले.

https://www.youtube.com/watch?v=TXEHKnPzK5s

------------------------
ते दहिबडा संवाद त्या वयाच्या अवखळ युवावर्गाच्या उथळ संकल्पनांचा नमुना आहे. फसलेला नव्हे तर कसलेला संवाद आहे. त्या त्या वयात अनेक तरुण तरुणींना असल्या उटपटांग कल्पना सुचतच असतात. कसेही करुन माझे कुणावर किंवा कुणाचे माझ्यावर प्रेम बसलंय ह्या निष्कर्षाला येणे, मग दहिबडा काय, दिलमें घंटी बजना काय.. सारखेच.

-------------------

खत मिलतेही सोचा..... हा नीट आला नाहीये. कदाचित बिनमहत्त्वाचा असल्याने पुरेसे लक्ष दिले नसेल लेखकद्वयींनी. मला आकलन झाले ते असे की नुसते ठाकूरसाहब का आपके लिये खत, एवढे ऐकताच त्याने गाडी पकडायला आवराआवर केली, म्हणजे " आता ठाकूरने आपल्याला पत्र पाठवले तर काही महत्त्वाचे काम असल्याखेरिज नाहीच, व ते महत्त्वाचे काम असे पत्रात लिहिणार नाही, प्रत्यक्ष जाऊन भेटावे लागेल, आणि तेच लिहिलेले असावे, मग पत्र वाचत विचार काय करत बसायचा, त्यापेक्षा पुढची ट्रेन पकडा, आधीच कमी असायच्या त्या काळात"

सोचा आपने मुझे याद किया म्हणजे काय? (हे सॅरकॅजम नाहीये असे सम्जून पुढे लिहिले आहे)

"मैने सोचा, आपने मुझे याद किया". हिंदीमध्ये एखाद्याने एखाद्याला याद करणे म्हणजे 'भेटायला आमंत्रण धाडणे', बहुतेक लखनवी लहेजा असावा. त्यात तो "मला वाटलं, तुम्ही नक्कीच मला बोलावणं धाडलं असणार" असे म्हणत आहे.

राफा यांना हिंदीची शिकवणी मी द्यावी इतका मी विद्वान नाही, पण अशा सरळ संवादात विचित्र काय व कसे वाटले याचे मला आश्चर्य जरुर वाटले आहे.

-------------

नानाकळा, तुम्हाला 10 गावे ईनाम!!

तो सोचा आपणे याद किया वाला डायलॉग ठाकूर च्या व्यक्तिमत्वा समोर किंचित गोंधळलेल्या पोलिसांचा असू शकतो.मे बी विशेष अर्थ नसावा

छान लिहिले आहे
पण असं पट्कन ब्रेक लागल्यासारखं का संपवलंय.>>> +१

त्या त्या वयात अनेक तरुण तरुणींना असल्या उटपटांग कल्पना सुचतच असतात.
>> 'डोळे बंद केल्यावर डोळ्यासमोर (मनात) कोणाचा चेहरा येतो तेच तुमचे खरे प्रेम' ही पण अशीच एक कल्पना

प्यार तो कई बार होता है लेकिन मोहब्बत सिर्फ एक बार होती है

म्हणजे नेमक काssssssय?
दिल तो पागल है
हे असलं काहीतरी अरूणा ईराणी माधुरीला समजावते