विवाहोत्सुक तरुणांसाठी मार्गदर्शिका, भाग :-२

Submitted by अतरंगी on 25 September, 2017 - 10:22

The following content may contain the elements that are not suitable for some audiences, viewer's discretion advised.

भाग १ :- https://www.maayboli.com/node/63974

"तुला किती वेळा सांगितलं की तू धुतलेली भांडी ओट्यावरच ठेवत जा. त्या कप वर डाग अजून तसेच आहेत. "

मुलाचे खेळणे दुरुस्त करण्यात रमलेला मी आणि चहाच्या कपात अडकलेली बायको..."दाग अच्छे होते है।" वगैरे डायलॉग मारण्याचा मोह आवरून मी खेळण्यावर लक्ष केंद्रित केले.

" पण चहा कोणासाठी केला होतास ?"

"नित्या आणि रावत्या आले होते" किती ते प्रश्न....

"अरे पण गॅस तर सकाळीच संपला होता. मग चहा कसा केलात ? " अरे यार हिचे प्रश्न कधी संपतच नाहीत.

"चहा नाही कॉफी केली होती, आणि गॅस संपला होता पण लाईट तर होती ना. नित्याला येताना कॉफीचे सॅशे आणायला सांगितले होते. ते फक्त गिझरच्या गरम पाण्यात टाकले 2 मिनिटात कॉफी तय्यार !!!!"

"तुsssम्ही गिझरssssच्या पाण्याssssत कॉफी करून प्यायलात ?????"

मी निमूटपणे खाली मान घालून स्क्रू पिळत पिळत कान आणि मेंदू मधील स्विच बंद करून टाकला..

मागील भागात आपण काही चुकीच्या, आपली प्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या सवयी पाहील्या. खूप स्वच्छता पाळल्याने आपली प्रतिकारशक्ती कमी होते यावर आमचा बाकी सर्व हॉस्टेलाईट्स प्रमाणे आमचा गाढ विश्वास होता आणि राहील. पण या वाट चुकलेल्या बायकांसोबत आयुष्य काढायचे तर काही गोष्टी शिकाव्याच लागतात. तर...

१. घरातला गॅस संपला म्हणून गिझरमधले पाणी वापरून त्यात टी बॅग टाकून चहा बनवायचा नसतो.

२.किचन मध्ये दोन नळ असतील तर प्यायच्या पाण्याचा आणि वापरायच्या पाण्याचा नळ वेगवेगळा असतो. एकच नळ असेल तर किचन मधल्या बेसिन मधून प्यायचे पाणी भरू नये. पाणी विकत आणावे किंवा फिल्टर बसवतात.

३. पिण्याचे पाणी ठेवण्यासाठी बिअरच्या बाटल्या, कोकच्या बाटल्या, रिकामे खंबे, मिनरल वॉटरच्या जुन्या बाटल्या वापरायच्या नसतात. प्यायचे पाणी साठवण्यासाठी काचेच्या, तांब्याच्या वगैरे बाटल्या वापरतात.

४.रूम झाडणे म्हणजे आठवड्यातून एकदा ज्या भागात आपण जेवायला बसतो तिथली धूळ झाडूने बेडखाली, कपाटाखाली, गॅलरी मध्ये ढकलणे असे नाही. स्वच्छतेचा OCD असलेले लोक रोज कमीत कमी एकदा झाडून काढतात, ते पण सगळ्या फर्निचरच्या खालून. शिवाय आठवड्यातून तीन ते चार वेळा तीच स्वच्छ असलेली फरशी उगीचच आरोग्याला हानिकारक असलेली केमिकल्स टाकून पुसून पण घेतात.

५. जेवायला बसताना खाली बसायला पेपर घेऊ नये. बाजारात बसकण नावाचा कापडाचा रंगीबेरंगी चौकोनी तुकडा मिळतो, तो वापरतात.

६.बायको, सासरचे, आपले आई वडील यासर्वांसमोर लाजिरवाणे प्रसंग यावे असे वाटत नसेल तर च्यायला, मायला, आयचा घो, माठ्या, आणि बाकी बाराखडी वापरणे कमी करा, मुले फार म्हणजे फार पटकन शिकतात

७. KTM, FZ16, R15, CBR वगैरे ज्या गाड्या शायनिंग मारायला घेतल्या होत्यात त्याआता olx वर टाका. त्या ऐवजी splendour, passion, activa, या पैकी घ्या. त्याचे दोन फायदे एक म्हणजे बायको आणि मुलाला घेऊन बऱ्यापैकी नीट बसता येतं आणि एव्हरेज पण चांगला मिळतो.

८. उशीसाठी कव्हर म्हणून अभ्रा मिळतो. बेडशीटने काळीकुट्ट उशी कव्हर करून झोपू नये.

९. लग्नासाठी मुलगी बघताना शक्यतो, गाव, शहर, राज्य या बाहेरील, जिचा आपल्या कोणत्याही भूतकाळाशी कमीत कमी संबंध असेल अशी बघा. ज्या हॉस्टेल आणि कॉलेज मध्ये होतात त्याच शहरात मुलगी बघू नका किंवा तिथेच नोकरी शोधून कधीच सेटल होऊ नका.

१०.लग्न ठरल्यावर बायकोला इंप्रेस करायच्या नादात आपण कसले भारी बॅड बॉय होतो, मुली कशा आपल्यावर मरायच्या, तेव्हा आपण कसे कसे काय काय अतरंगी किस्से केले, कोणत्या पैजा जिंकल्या, पिल्यावर केलेले किस्से वगैरे सांगायचा मोह टाळा. बायकांचा मेंदू म्हणजे असे सॉफ्टवेअर आहे जिथे हे सगळे रेकॉर्ड राहते आणि ते ऐन वेळेस वापरून तुमची विकेट काढण्यात येते.

क्रमशः

भाग ३:- https://www.maayboli.com/node/64031

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त क्लास चालू आहे.. Lol
नऊ नंबर एकच नंबर!!

मस्त Lol

रच्याकाने: ग्लास मध्ये पाणी भरुन त्यात सोल्डरिंग आर्यन बुडवून ठेवून जास्त गरम कॉफी करता येते.

गिझरचे पाणी कडकडीत तापले तर विषाणू किटाणू जीवजंतू असेही मरून जातात ... फक्त त्यांच्या डेड बॉड्या फिल्टर करून घ्यायच्या.. फिल्टर कॉफी यालाच तर म्हणतात.

हे ही चांगलय.. Happy
माझे दोन आणे.. मुद्दा नंबर 8- घरात बायको असेल तर काळीकुट्ट उशी घरात असण्याची सुतराम शक्यता नाही.. पांढरी.. पक्षी स्वच्छ उशी सुद्धा अभ्रा घालूनच कव्हर करावी.. बेडशीट ही गादी कव्हर करण्यासाठी असते Happy

किचन मध्ये दोन नळ असतील तर प्यायच्या पाण्याचा आणि वापरायच्या पाण्याचा नळ वेगवेगळा असतो.
>>>>>
खरं तर असे नसते, सेम पाणी असते. आपणच एकाला तोटी लावून मनाचे समाधान करून घेतो. फक्त डब्ल्यू सी कमोड मधील पाणी हलक्या दर्जाचे असू शकते. पण ते देखील पिणेबल नसले तरी आंघोळेबल असते.
बरेच लोकांना स्वयंपाक करताना दर दोन मिनिटांनी हात धुवायची सवय असते, पण तेच लोक भैय्याकडची पाणीपुरी मिटक्या मारत खातात, सारे मनाचे खेळ आहेत.

५. जेवायला बसताना खाली बसायला पेपर घेऊ नये.
>>>>>>
जेवायला बसताना खाली पेपर ................ आमच्याकडे पेपर घेऊन बसण्याचा वेगळाच अर्थ होतो Lol

मस्त. लै भारी.

>>>>
रच्याकाने: ग्लास मध्ये पाणी भरुन त्यात सोल्डरिंग आर्यन बुडवून ठेवून जास्त गरम कॉफी करता येते.
>>>
त्यात मॅगी मात्र करू नये. सोलदरिंग आयर्नची वाट लागते.

अतरंगी काका पण बघितलेली मुलगी पण होस्टेल मधली असेल तर काय सुचना आहेत ? की त्या पुढच्या भागात ? Lol

<<< शिवाय आठवड्यातून तीन ते चार वेळा तीच स्वच्छ असलेली फरशी उगीचच आरोग्याला हानिकारक असलेली केमिकल्स टाकून पुसून पण घेतात.>>>>

या गोष्टी अमेरिकेत देखील घडतात. ही एक भयंकर गंभीर गोष्ट आहे. या गोष्टी किती थराला जाउ शकतात याची एक गोष्ट -
एकदा ९११ ला फोन आला -
शेजारच्या घरातून बंदुकीचा आवाज आला - दोनदा!
लगेच (म्हणजे जेव्हढ्या "लगेच" पोलिस येतात तेव्हढ्या लगेच) पोलीस आले. मग त्यांनी रिपोर्ट केला -
नवरा ओल्या फरशी वरून चालत आला म्हणून बायकोने त्याला गोळ्या घालून ठार मारले!
वरिष्ठ अधिकार्‍याने विचारले ती बाई दिसते आहे का जवळपास?
उत्तर - हो, समोरच आहे, अजूनहि बंदूक घेऊन उभी आहे.
अधिकारी - मग धरा तिला नि घेऊन या ना!
उत्तर - आत्ता नाही, थांबावे लागेल, अजून फरशी ओली आहे.

सूज्ञांनी यावरून धडा घ्यावा.

Lol
लग्नापुर्वी चुकुनही मित्रांची भेट होणार्‍या बायको बरोबर घालून देऊ नये. नाहीतर ती होणारी बायकोच राहील. मित्रांना (एकदाचं) ठरलेलं लग्न मोडणे हे प्रँकपेक्षा काही वेगळं वाटत नाही.

खाली पडलेलं १० सेकंदात उचलून खाल्लं तर त्याला बॅक्टेरिआ लागत नाहीत हे बर्‍याच जणांना माहितच नसतं.

सगळ्या वस्तू जिथल्या तिथे याचा अर्थ काही वेगळाच असतो म्हणे. जिथल्या तिथे म्हणजे जिकडे काढुन ठेवल्या तिथे... म्हणजे घरात आल्यावर एक बुट उलटा झालेला एकीकडे आणि दुसरा भलतीकडे असं नाहीच! काय तरी विचित्रच सवयी.

हा भाग पण मस्तच जमलाय.....
प्रतिसाद पण एक नंबर....
खाली पडलेलं १० सेकंदात उचलून खाल्लं तर त्याला बॅक्टेरिआ लागत नाहीत हे बर्‍याच जणांना माहितच नसतं. Happy

तसे ईस्त्रीवर पण ३ in 1 कॉफी करता येतो. जर हॉटेल मध्ये राहायची वेळ आली आणि तिथे माय्क्रोवेव्ह ओव्हन नसेल तर कॉफी मशीन मध्ये मॅगी करता येत अर्थात बायको बरोबर नसेल तर.

पण हेच प्रताप मुलाने केले तर बघा कसे तो एकटा राहुन मॅनेज करतो हे पण ऐकावे लागते.

धनि,
Great minds thik alike !

मी कालच हा भाग पोस्ट करताना हा विचार करत होतो.

ऋणम्या, आमच्याकडे सगळीकडे बेसिनला जे दोन नळ आहेत त्यात एकात बोअरिंगचे पाणी येते आणि एकात कॉर्पोरेशनचे.

मानव,
इस्त्री, सोल्डरिंग गन, हॉट पॉट, कॉफी मशीनचे हॉस्टेल वर होणारे विविध वापर, बाजारातून कारचे जुने स्पीकर आणून माठात उलटे ठेऊन केलेले डॉल्बी डिजिटल इफेक्ट्स वगैरे वर अक्षरशः एक लेख पाडता येईल. Happy

बाकी सर्वांना लेख आवडल्याची पोचपावती दिल्याबद्दल धन्यवाद ! Happy

सायली, साहिल, अमित Happy

अंतरंगी छान लेख.

आम्ही १२ वर्षे होस्टेलला काढल्याने आम्हाला गृहस्थाश्रमात यायला/आणायला बरेच कष्ट पडले. पण आता ठिक आहे. Happy

या आमच्या टेन कमांडमेंट्स

१. गादीवरच्या पसार्‍यात किंवा गादीवर पसारा आहे म्हणून जमिनीवर झोपणे चालत नाही.
२. कपडे , पांघरूणे इत्यादी गोष्टी घड्या घालूनच कपाटात ठेवाव्या लागतात. कोंबणे हा प्रकार मान्य नाही.
३. स्ट्डी टेबल वर जास्तीत जास्त ५ गोष्टी आलाउड आहेत.
४. मोजे याप्रकाराला शर्टाचे सर्व नियम लागू आहेत.
५.सिंकमध्ये २४ तासाच्या वर चहाची भांडी पडून असणे आळशीपणाचे लक्षण समजण्यात येइल.
६. सिगारेट हे व्यसनच आहे . आता फार झाले.
७. आपल्याला पसार्‍यातच सर्व गोष्टी सापडतात. बायकांना आवरून ठेवल्या शिवाय काही सापडत नाही हा महत्वाचा फरक लक्षात घ्यावा.
८. होस्टेलमधे असताना घरून पैसे आले नाहीत हे कारण समदु:खी असल्याने मित्रांना समजते. लग्नानंतर समदु:खी कोणी नसते.
९. झोपण्याच्या आणि जेवण्याच्या जागा आणि वेळा इंटरचेंज होउ शकत नाहीत.
१०. मित्रांना त्यांच्या मूळ पाळण्यातल्या नावाने हाक मारायला लागते. त्याचप्रमाणे त्यांच्याशी संभाषण आईने शिकवलेल्या (""आई माई""च्या नव्हे) भाषेतच होणे अपेक्षित आहे. तसेच सर्व थोरांचा आदरपूर्वक उल्लेख करण्याची सवय लावून घेणे आवश्यक. Happy

बायकांचा मेंदू म्हणजे असे सॉफ्टवेअर आहे जिथे हे सगळे रेकॉर्ड राहते आणि ते ऐन वेळेस वापरून तुमची विकेट काढण्यात येते. >>>> हा सल्ला मात्र आवडला.
पुढचा भाग पण लवकर टाका.

हा भाग पण भारी Lol
आपल्याला पसार्‍यातच सर्व गोष्टी सापडतात. बायकांना आवरून ठेवल्या शिवाय काही सापडत नाही हा महत्वाचा फरक लक्षात घ्यावा>> याला मोठ्ठा अपवाद आहे.. पर्स ! Wink

वा.मस्त चाललीये सिरीज.. माझाही नवरा हॉस्टेल्ला राहिलेला असल्याने त्याच्या सवयी रिलेट झाल्या. Happy

@विक्रमसिंह.. प्रतिसाद आवडला.
लग्नानंतर समदु:खी कोणी नसते. Lol Lol Lol

>> २. कपडे , पांघरूणे इत्यादी गोष्टी घड्या घालूनच कपाटात ठेवाव्या लागतात. कोंबणे हा प्रकार मान्य नाही.
२अ. घडी टोकाला टोकं जुळवुनच घालावी, कडा जुळलेल्या नसल्यास त्याला कोंबणे समजण्यात येईल.

बाकी १ आणि ३ मध्ये मी बायकोला चांगल्या सवयी लावण्यात यशस्वी झालोय. ती गादीवरचा पसारा तिथेच सरकवुन जरा जागा मोकळी करुन झोपायला शिकलीय. जोपर्यंत टेबलवरच्या वस्तुंचा मनोरा जमिनीवर कोसळत नाही तोपर्यंत तिथे अजुन वस्तु ठेउ शकतो. ज्याने ढिगारा कोसळवला त्यानेच तो उचलावा लागतो. त्याला इतरांच्या बेशिस्तीबद्दल बडबड करायचा हक्क मिळतो.

विक्रमसिंह Lol

(रच्याकने, तुम्ही माझ्या पुढच्या भागातील दोन मुद्दे कव्हर केले)

मी या मार्गदर्शिकेचे 5 भाग लिहिणार आहे.

त्यापुढील काही भाग/झब्बू म्हणून एखादा भाग कोणी लिहू इच्छित असेल तर जरूर लिहा. या सामाजिक कार्यात तुमचे फुल ना फुलाची पाकळी म्हणून योगदान ...:-)

Pages