विवाहोत्सुक तरुणांसाठी मार्गदर्शिका, भाग :-२

Submitted by अतरंगी on 25 September, 2017 - 10:22

The following content may contain the elements that are not suitable for some audiences, viewer's discretion advised.

भाग १ :- https://www.maayboli.com/node/63974

"तुला किती वेळा सांगितलं की तू धुतलेली भांडी ओट्यावरच ठेवत जा. त्या कप वर डाग अजून तसेच आहेत. "

मुलाचे खेळणे दुरुस्त करण्यात रमलेला मी आणि चहाच्या कपात अडकलेली बायको..."दाग अच्छे होते है।" वगैरे डायलॉग मारण्याचा मोह आवरून मी खेळण्यावर लक्ष केंद्रित केले.

" पण चहा कोणासाठी केला होतास ?"

"नित्या आणि रावत्या आले होते" किती ते प्रश्न....

"अरे पण गॅस तर सकाळीच संपला होता. मग चहा कसा केलात ? " अरे यार हिचे प्रश्न कधी संपतच नाहीत.

"चहा नाही कॉफी केली होती, आणि गॅस संपला होता पण लाईट तर होती ना. नित्याला येताना कॉफीचे सॅशे आणायला सांगितले होते. ते फक्त गिझरच्या गरम पाण्यात टाकले 2 मिनिटात कॉफी तय्यार !!!!"

"तुsssम्ही गिझरssssच्या पाण्याssssत कॉफी करून प्यायलात ?????"

मी निमूटपणे खाली मान घालून स्क्रू पिळत पिळत कान आणि मेंदू मधील स्विच बंद करून टाकला..

मागील भागात आपण काही चुकीच्या, आपली प्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या सवयी पाहील्या. खूप स्वच्छता पाळल्याने आपली प्रतिकारशक्ती कमी होते यावर आमचा बाकी सर्व हॉस्टेलाईट्स प्रमाणे आमचा गाढ विश्वास होता आणि राहील. पण या वाट चुकलेल्या बायकांसोबत आयुष्य काढायचे तर काही गोष्टी शिकाव्याच लागतात. तर...

१. घरातला गॅस संपला म्हणून गिझरमधले पाणी वापरून त्यात टी बॅग टाकून चहा बनवायचा नसतो.

२.किचन मध्ये दोन नळ असतील तर प्यायच्या पाण्याचा आणि वापरायच्या पाण्याचा नळ वेगवेगळा असतो. एकच नळ असेल तर किचन मधल्या बेसिन मधून प्यायचे पाणी भरू नये. पाणी विकत आणावे किंवा फिल्टर बसवतात.

३. पिण्याचे पाणी ठेवण्यासाठी बिअरच्या बाटल्या, कोकच्या बाटल्या, रिकामे खंबे, मिनरल वॉटरच्या जुन्या बाटल्या वापरायच्या नसतात. प्यायचे पाणी साठवण्यासाठी काचेच्या, तांब्याच्या वगैरे बाटल्या वापरतात.

४.रूम झाडणे म्हणजे आठवड्यातून एकदा ज्या भागात आपण जेवायला बसतो तिथली धूळ झाडूने बेडखाली, कपाटाखाली, गॅलरी मध्ये ढकलणे असे नाही. स्वच्छतेचा OCD असलेले लोक रोज कमीत कमी एकदा झाडून काढतात, ते पण सगळ्या फर्निचरच्या खालून. शिवाय आठवड्यातून तीन ते चार वेळा तीच स्वच्छ असलेली फरशी उगीचच आरोग्याला हानिकारक असलेली केमिकल्स टाकून पुसून पण घेतात.

५. जेवायला बसताना खाली बसायला पेपर घेऊ नये. बाजारात बसकण नावाचा कापडाचा रंगीबेरंगी चौकोनी तुकडा मिळतो, तो वापरतात.

६.बायको, सासरचे, आपले आई वडील यासर्वांसमोर लाजिरवाणे प्रसंग यावे असे वाटत नसेल तर च्यायला, मायला, आयचा घो, माठ्या, आणि बाकी बाराखडी वापरणे कमी करा, मुले फार म्हणजे फार पटकन शिकतात

७. KTM, FZ16, R15, CBR वगैरे ज्या गाड्या शायनिंग मारायला घेतल्या होत्यात त्याआता olx वर टाका. त्या ऐवजी splendour, passion, activa, या पैकी घ्या. त्याचे दोन फायदे एक म्हणजे बायको आणि मुलाला घेऊन बऱ्यापैकी नीट बसता येतं आणि एव्हरेज पण चांगला मिळतो.

८. उशीसाठी कव्हर म्हणून अभ्रा मिळतो. बेडशीटने काळीकुट्ट उशी कव्हर करून झोपू नये.

९. लग्नासाठी मुलगी बघताना शक्यतो, गाव, शहर, राज्य या बाहेरील, जिचा आपल्या कोणत्याही भूतकाळाशी कमीत कमी संबंध असेल अशी बघा. ज्या हॉस्टेल आणि कॉलेज मध्ये होतात त्याच शहरात मुलगी बघू नका किंवा तिथेच नोकरी शोधून कधीच सेटल होऊ नका.

१०.लग्न ठरल्यावर बायकोला इंप्रेस करायच्या नादात आपण कसले भारी बॅड बॉय होतो, मुली कशा आपल्यावर मरायच्या, तेव्हा आपण कसे कसे काय काय अतरंगी किस्से केले, कोणत्या पैजा जिंकल्या, पिल्यावर केलेले किस्से वगैरे सांगायचा मोह टाळा. बायकांचा मेंदू म्हणजे असे सॉफ्टवेअर आहे जिथे हे सगळे रेकॉर्ड राहते आणि ते ऐन वेळेस वापरून तुमची विकेट काढण्यात येते.

क्रमशः

भाग ३:- https://www.maayboli.com/node/64031

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माठातले स्पीकर आणि डॉल्बी - काय आठवण करून दिलीत.

एकदा आम्ही एका रिक्षावाल्याचा पाठलाग करून त्याला विचारलं की तुझ्या रिक्षातले स्पीकर कुणाकडून करून/बनवून घेतले आहेस. कारण त्याची रिक्षा लै म्हणजे लैच भारी वाजत होती. मग त्याने सांगितलेल्या टपरीवर जाऊन, सामान आणून होस्टेल रूमवर मुजिक सिस्टम डिजाइन केली. थर्ड इयरला 'राज' सिनेमाची गाणी त्यावर एव्हडी वाजली एव्हडी वाजली की आमचे परममित्र रूममेट जुनी कॅसेट वाजून वाजून घासल्याने नवीन घेऊन आला. नदीम-श्रवणच्या सुपर-ट्रेबल (खिळे मोळे खुळखुळ्यात घालून ठेका दिलेल्या) 'अपनी शादी के दिन अब नही दूर है, तुम भी पर्दा करो, हम भी पर्दा करे' हे गाणे आजही कानात माझ्या आदळते त्या रूमची आठवण आली की.

त्याच दरम्यान 'सच केह रहा है दिवाना' हे माधवनचे गाणे फार हिट झाले होते. आख्ख्या हॉस्टेलात एकाही मुलाला एकही मुलगी पटलेली नसली तरी सगळे प्रेमभंग झाल्याच्या थाटात हे गाणे ऐकत सिगारेटी फुंकत बसायचे. प्रत्येकाच्या चेहर्‍यावरील दर्द पाहिला तर जणु यांना दिया मिर्झाच सोडून गेली आहे याची खात्री पटली असती.

ते एक तडप तडप के सुद्धा त्यातलेच...
>>>

या गाण्याचं तर नावच काढू नका. गॅदरिंगला सगळ्या पोरांना हे गाणे म्हणायची लै हौस असायची. ऑडिशन्सला जाऊन बसले की एक से एक इनोदवीर शीरा ताणून ताणून तडप तडप के म्हणायचे. ऑडिशन्स/फिल्टर नसते तर संगीतातल्या सर्व पट्ट्यात तडप तडप के गाणारे एकाच संध्याकाळी लोकांना दिसले असते.

गॅदरिंगला सगळ्या पोरांना हे गाणे म्हणायची लै हौस असायची.
>>>>>>
या गॅदरींगच्या हौसेने आठवले... अब तो आदत सी है मुझको, ऐसे जीने की... आमच्यावेळी ऑडीशनला आतिफ अस्लम घुसायचा

हा विषय वरवर अवांतर वाटत असला तरी अशी गाणी लग्नानंतर गाऊ नयेत.. हे धाग्याचा अनुषंगाने बोलता येईल.

मागे माझे एक ब्रेक अप केवळ याच कारणासाठी झालेले की मी रॉकस्टारची गाणी आवडीने ऐकायचो... आणि त्यातले साडा हक्क चक्क गायचोही ... शेवटी एके दिवशी मी `जो भी मै कहना चाहू..' असे म्हणताच ती पळून गेली.. आणि तिला परत बोलवायचे सोडून मी ए नादान परींदे घर आजा म्हणत राहिलो

Pages