गाथा माझ्या गझलेची

Submitted by mi_anu on 11 September, 2017 - 08:19

(लेख पूर्वप्रकाशित आहे.जुन्याच बाटलीतली जुनीच दारु.)

गझलांची काही संकेतस्थळे जन्माला आली आणि त्यांवर होणाऱ्या गझला वाचून मला न्यूनगंड वाटू लागला. तशा काही कविता/एकाखाली एक ठराविक संख्येने शब्द रचलेली काही गद्ये मी लिहीली होती, पण "हात मर्दा! जिंदगीत एक गझल लिहीली नाहीस? थू तुझ्या जिनगानीवर!" वगैरे धमक्या मन सारखं देऊ लागलं आणि मी ठरवलं. "बास! आता एक तरी गझल लिहील्याशिवाय मी केस बांधणार नाही!"(ती द्रौपदी नाही का, दु:शासनाच्या रक्ताने केस बांधायला मिळेपर्यंत केस मोकळेच सोडते तसे.)

गझल लिहीण्यातली पहिली पायरी म्हणजे थोडे उर्दू येणे. आमचे उर्दू म्हणजे 'मोहब्बत' आणि 'कयामत' यापेक्षा वेगळे असलेले सगळे शब्द सारखेच वाटणारी. त्यात बाकी काफिया, मतला, मक्ता, नुक्ता, रदिफ़,अलामत, सानी मिसरा, उला मिसरा,तरही,शेर,जमीन हे अगम्य शब्द वाचून उच्चारापुरते माहिती होते. 'गझलेची बाराखडी' वाचायला घेतली. आणि

"गझलेतला प्रत्येक शेर ही स्वतंत्र अभिव्यक्ती असते, पण पूर्ण गझल वाचली असता त्यातून एकच अर्थ व्यक्त झाला पाहिजे." या नियमापाशी आमचं घोडं अडखळून खिंकाळलं. हा हा म्हणजे, 'हिरण्यकश्यपूला मार, पण दिवसाही नाही, रात्रीही नाही, घरातही नाही आणि बाहेर नाही' असा पेच झाला. पण तरीही गझलनामक हिरण्यकश्यपूला हरवण्याची प्रतिज्ञा केली.
म्हणजे जरा डोकं खाजवून साधारण व्यवहारातलं सीआयडी टिमच्या भाषेतलं उदाहरण घ्यायचं म्हटलं तरः
------------------------------------
बघ रे अभिजिता
माणूस पडला आडवा...
-------------------------------------
अरे विवेक ये रे
कुठे मेलास गाढवा..
--------------------------------------
ये गं ये गं सारे
हवा तुझ्या अस्तित्वाचा गोडवा..
--------------------------------------
साळुंके, किती उशीर?
आणा चंबू, कोडं सोडवा..
---------------------------------------
दया मेल्या कधी येणारेस
सरसाव खांदा, दरवाजा तोडवा..
----------------------------------------
- या सगळ्या स्वतंत्र कडव्यांचा मतितार्थ "माय गॉड, यहां तो ये लाश मरी पडी है" असा यायला पाहिजेल.

काफिया आणि रदिफ़ यांच्याबद्दल वाचलं, पण तरीही थोडा गोंधळ राहिलाच. प्रत्येक समान ओळीतले शेवटचे दोन शब्द, त्यातला शेवटचा शब्द रदिफ़ आणि त्याच्या आधीचा काफिया असा काहीसा अंदाज बांधला. पण मग तीन शब्द लयीत असले तर शेवटून तिसऱ्याला काय म्हणायचं?प्री काफिया?? जाऊदे ना चक्रमादित्य! इथे शेवटच्या शब्दाचं काय, अक्षराचं यमक सांभाळताना फेफे उडते आणि निघालीय बया तीन शब्दांचं यमक सांभाळायला. मी दोन शब्दांचं यमक बनवायचं ठरवून नियम पुढे वाचायला घेतले.
"गझलेच्या शेवटच्या शेरात गझलकाराचं नाव काहीजणं लिहीतात." ही कल्पना मात्र मला फार आवडली. माझी ही गझल पिढ्यानुपिढ्या काव्यप्रेमी मंडळी गुणगुणणार, त्यांच्या ओठी प्रत्येकदा गझल गुणगुणताना आपलं नाव येणार ही कल्पना मनाला फारच गुदगुल्या करायला लागली. माझं नाव "कनकलतिका","प्रियदर्शिनी","विजयालक्ष्मी","अपराजिता", असं मालगाडीसारखं लांबलचक नसून लहानसं 'अनु' आहे याचा मला अभिमान वाटू लागला.

आता गझल बनवायची म्हणजे वृत्त हवे. तिथेही उजेडच होता. 'सदा सर्वदा योग तुझा घडावा ।' म्हणजेच भुजंगप्रयात, 'वदनि कवळ घेता ।' म्हणजेच मालिनी, 'शुक्रता ऽऽ रा ऽऽ मंदवा ऽऽऽ रा ऽ' म्हणजेच देवप्रिया सोडून बाकी सर्वच मंडळी जरा अनोळखी होती. भुजंगप्रयातात काहीतरी करायचं ठरवून पुढे वाचू लागले. आता गझल लिहायची म्हणजे विषय हवाच.
लोकप्रिय झालेले गझलेचे विषय हे असे:
१. प्रेम
२. प्रेमभंग
३. विरह
४. मद्य
५. जीवनाचा कंटाळा
मला नक्की कोणत्या विषयाची कास धरावी कळत नव्हतं. म्हणून विषय सावकाशीने ठरवायचं ठरवून लिहायला अस्तन्या सावरल्या. आधी टिपणवहीत काही शब्दांच्या जोड्या लिहून पाहिल्या. दोन शब्दांचा काफिया? काय बरं घ्यावा? शेवटी 'आहे' किंवा 'नाही' या शब्दांचं शेपूट लावलं की एक शब्द निश्चित झाला. आता राहिला शेवटून दुसरा शब्द. तो सहा वेळा जुळवायचा. (मी ज्या ज्या गझला वाचल्या त्यात पहिल्या शेरात दोन्ही ओळीत आणि बाकी उरलेल्या शेरात दुसऱ्या ओळीत काफिया होता. आणि गझल लिहायची म्हणजे कमीत कमी पाच शेर हवे असेही वाचल्याचे आठवत होते.) मी काफियांची यादी करायला घेतली. तशी मी जरा याद्या, तक्ते करण्याकडे जास्त कल असलेली आहे. अभियांत्रिकी परीक्षेत माहिती असलेल्या तुटपुंज्या चार ओळी उत्तरात नीट तक्ते पाडून, खाली रेघा मारुन लिहील्या की त्या सपाट लिहीण्यापेक्षा जास्त मार्क मिळतात या गाढ श्रद्धेतून हा रोग बळावला असावा.

"अमुक तमुक (काहीतरी अक्षर) रडा आहे" असा काफिया घ्यायचे ठरवले. 'कोरडा आहे', 'ओरडा आहे' इथवर ठीक होतं, पण पुढे डोक्यातून 'थेरडा आहे', (शॅमॅलिऑन)'सरडा आहे',(हवाबाण)'हरडा आहे',(मिरचीचा)'खरडा आहे' वगैरे भीषण काफिये निघायला लागल्यावर घाबरुन रद्द करुन टाकले.
"अमुक तमुक (काहीतरी अक्षर)रते आहे" अशा काफियावर आले. पण परत 'करते आहे','भरते आहे','मरते आहे','झुरते आहे','पुरते आहे','घोरते आहे','धरते आहे' याच्या आधीच्या अमुक तमुक जागा भरायला भयंकर त्रास व्हायला लागला. 'मी प्रेम करते आहे, मी तोय भरते आहे','मी खूप घोरते आहे','मी प्रेत पुरते आहे' वगैरे काहीतरी पाट्या टाकल्या असत्या तर प्रतिभावान गझलाकारांनी शाब्दिक बाण मारुन मारुन मलाच पुरायला कमी केलं नसतं.

आपण बापडे 'अमुक तमुक नाही' चा काफिया अजमावून बघुयात.
ह्म्म.."अमुक तमुक रवा नाही".. 'गारवा नाही','थोरवा नाही','मारवा नाही','गुरवा नाही' छ्या! काहीही सुचत नाही पुढे. आपल्याच भाषेतील शब्दांनी गरजेच्या वेळी असा दगा द्यावा? कोण हा दैवदुर्विलास? बरं. 'अमुक तमुक व नाही' कसं वाटतं? 'गाव नाही, पाव नाही, भाव नाही, पाव नाही, साव नाही, राव नाही, शेव नाही, पेव नाही, नाव नाही.' जबरा! किती सुचले. पण पाहिले तर यातले बरेच 'व नाही' एका गझलेत आधीच राबवले होते. जाऊ दे. आता आपण थेट ओळच लिहायला बसू.

"जीव माझा अंतरी या फारसा नाही" लिहीलं आणि पाठ थोपटायला आपला हात जास्त मागे जाणार नाही याची खंत वाटली. ठरलं तर मग. 'अमुक तमुक रसा नाही' असा काफिया. पण मला भूक लागल्याने सारखा 'अनारसा नाही', 'आमरसा नाही' च आठवत होतं. हाकून हाकून 'फारसा नाही', 'वारसा नाही', 'आमरसा नाही' इतकंच आठवत होतं. आता प्रोसेस म्हणजे प्रोसेस. 'रेफर टू डॉक्युमेंट' ची इतकी सवय झालेली की सवतः म्हणून काही सुचायलाच तयार नाही. शेवटी उघडला मोल्सवर्थ शब्दकोष आणि 'रसा' शेवटी असलेले शब्द हुडकले. आणि सगळे 'रसा नाही' असलेल्या ओळी मधे मधे भरल्या. मग त्यांच्या आधीच्या ओळी(यात यमक बिमक पाळायचं नसल्याने त्या जरा सोप्या होत्या.) भरुन काढल्या आणि ही अप्रतिम (काही छिद्रान्वेषी मंडळी मागून 'टुकार!टुकार!' ओरडत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन)गझल जन्माला घातली. (काही छिद्रान्वेषी मंडळी मागून 'पाडली! पाडली!' ओरडत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन) माझी ही 'कलाकुत्री' तुमच्या पुढे सादर करते:

"जीव माझा अंतरी या फारसा नाही
आज का न्याहाळला मी आरसा नाही

का मला नाकारले केवळ धनासाठी
(कर्तृत्व माझे,हा पिढ्यांचा वारसा नाही)

प्रेम छोट्याश्या नशेचे मद्य का आहे?
प्रेमकैफाची तुला त्या सुधारसा नाही

ते किती आले नि गेले मोजणी नाही
खूप शोध शोधून तुझा अंगारसा नाही

"अनु" म्हणे ही वेदना तर रोजची आहे
बामचा खोका अता बेवारसा नाही"

कोणाला गझल लिहायची शिकायची असल्यास मला व्यक्तीगत निरोप करावा आणि फी जमा करावी.
-अनु

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"गझलेतला प्रत्येक शेर ही स्वतंत्र अभिव्यक्ती असते, पण पूर्ण गझल वाचली असता त्यातून एकच अर्थ व्यक्त झाला पाहिजे." >>
स्वतंत्र अभिव्यक्ती इथपर्यंत माहीती होतं पण एकच अर्थ प्रतीत व्हायला हवा हे लक्षात घेतलंच नाही कधी. धन्यवाद अनुजी! मनोरंजनात्मक लिहील्यामुळे सोपं वाटलं. Happy

म्हणजे सीआयडी च्या भाषेत म्हणायचं तर

बघ रे अभिजिता
माणूस पडला आडवा

अरे विवेक ये रे
कुठे मेलास गाढवा

ये गं ये गं सारे
हवा तुझ्या अस्तित्वाचा गोडवा

साळुंके, किती उशीर?
आणा चंबू, कोडं सोडवा

दया मेल्या कधी येणारेस
सरसाव खांदा, दरवाजा तोडवा

या सगळ्या स्वतंत्र कडव्यांचा मतितार्थ "माय गॉड, यहां तो ये लाश मर पडी है" असा यायला पाहिजेल.

अरारारा! Biggrin
कलाकुत्री... कुठून सुचतात गो हे भीषण शब्द Rofl

Lol भन्नाट!
प्रतिसादातली गझल तर अफाट

मस्त लिहिले आहे.

'थेरडा आहे', (शॅमॅलिऑन)'सरडा आहे',(हवाबाण)'हरडा आहे',(मिरचीचा)'खरडा आहे' वगैरे भीषण काफिये निघायला लागल्यावर घाबरुन रद्द करुन टाकले. >>>> Rofl Rofl Rofl

भारीच !! Lol तुमच्या " कलाकुत्री " च्या जन्मकथेला / गाथेला दंडवत !! _/\_

अनु, तू अशक्य आहेस Rofl अग काय काय लिहिलयस कलाकुत्री, सरडा, थेरडा, घोरते, पुरते.... :lol:
पूर्ण गझल तर ____/\___

अनु अग किती हसवशील
Cid ची गझल म्हणजे तर अगदी थलिपीठावर लोण्याचा गोळाच
किंवा चेरी ऑन द केकच

खल्लासच लिहिलय. "तुटपुंज्या चार ओळी उत्तरात नीट तक्ते पाडून, खाली रेघा मारुन लिहील्या की त्या सपाट लिहीण्यापेक्षा जास्त मार्क मिळतात या गाढ श्रद्धेतून हा रोग बळावला असावा" हे जबरदस्त आवडले Happy

अमुक तमुक (काहीतरी अक्षर) रडा आहे" असा काफिया घ्यायचे ठरवले. 'कोरडा आहे', 'ओरडा आहे' इथवर ठीक होतं, पण पुढे डोक्यातून 'थेरडा आहे', (शॅमॅलिऑन)'सरडा आहे',(हवाबाण)'हरडा आहे',(मिरचीचा)'खरडा आहे' वगैरे भीषण काफिये निघायला लागल्यावर घाबरुन रद्द करुन टाकले.>> Lol

CID :हहपुवा:

शिर्षकात "गझल" वाचुन धागा उघडायला घाबरत होतो. पण मग ललितलेखन बघुन धीर करुन आलो इथे आणि सार्थक झालं.
मस्तच लिहिलंय. खुप मजा आली वाचायला.

Pages