आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञांची माहिती

Submitted by कुमार१ on 11 August, 2017 - 01:10

काल माबोवरील एका धाग्यात ‘पुण्यातील gastroenterologist सुचवा’ अशी विनंती होती. तेथील प्रतिसाद वाचल्यानंतर असे लक्षात आले की सामान्यजनांमध्ये ‘विशेष वैद्यकीय तज्ञ’ शोधण्याबाबत काही गैरसमज आहेत. तेव्हा असे वाटले, की आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञांची माहिती या लेखाद्वारे करून द्यावी. पदव्यांच्या चढत्या श्रेणीनुसार भारतातील माहिती पुढे देत आहे:

१. मूलभूत पदवी : MBBS. हे कुटुंबवैद्य असतात.
२. पदव्युत्तर शिक्षणाच्या दोन प्रमुख शाखा : MD & MS
३. MD मध्ये जवळपास ५० उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे डॉ.( Consultant / Specialist) खालील शाखांचे असतात:

• मेडिसिन : हे डॉ. हृदय, फुफ्फुस, पोटातील अवयव, मेंदू , मधुमेह, रक्तदाब इ. चा एकत्रित अभ्यास केलेले असतात.
• फुफ्फुसरोग तज्ञ
• बालरोगतज्ञ
• स्त्री रोग व प्रसूती तज्ञ
• त्वचा व गुप्तरोग तज्ञ
• मनोविकार तज्ञ
. Pathology ( laboratory medicine)
• Radiology ( X ray, sonography, CT scan, MRI इ.) तज्ञ
• भूलतज्ञ

४. MS मध्येही खूप उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे तज्ञ असे :

• जनरल सर्जन
• हाड व सांधे विकारतज्ञ ( Orthopedics)
• डोळ्यांचे विकार तज्ञ
• कान, नाक व घसा तज्ञ
• Plastic surgeon

५. DM ही MD च्या पुढील Superspeciality आहे. यात सुमारे ३० उपशाखा आहेत. त्यातील नेहमीच्या अश्या :
• हृदयविकार तज्ञ
• मेंदूविकार तज्ञ
• कर्करोग तज्ञ
• पोट व यकृत विकार तज्ञ
• रक्तविकार तज्ञ
• हॉरमोन विकार तज्ञ
• मूत्रपिंड विकार तज्ञ
• सांधे विकार तज्ञ (Rheumatologist)
• संसर्गजन्य विकार तज्ञ
• अतिदक्षताविभाग तज्ञ ( Critical Care Medicine)
• Immunologist

६. MCh ही MS च्या पुढील Superspeciality आहे. त्यातील प्रमुख उपशाखा :

• हृदय शस्रक्रिया तज्ञ
• मेंदू शस्रक्रिया तज्ञ
• पोट, यकृत इ. चा शस्रक्रिया तज्ञ
• बालक शस्रक्रिया तज्ञ
• कर्करोग शस्रक्रिया तज्ञ
• मूत्रमार्ग व प्रोस्टेट शस्रक्रिया तज्ञ
• हात शस्रक्रिया तज्ञ

MD & MS ना समकक्ष असणारा अजून एक अभ्यासक्रम म्हणजे Diplomate of National Board (DNB). ही पदवी राष्ट्रीय पातळीवर परिक्षा घेऊन दिली जाते. या अंतर्गतही वर उल्लेखिलेल्या अनेक उपशाखा असतात. सर्वसामान्य लोकांना DNB हे नेमके काय हे फारसे माहित नसते. तेव्हा अशी पदवी असणारा डॉ. हा स्पेशालिस्टच असतो हे ध्यानात घ्यावे.
तर थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. उपयोगी पडावा ही अपेक्षा. काही शंका असल्यास त्यांचे स्वागत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरारा , "नॉनअ‍ॅलोपॅथ्स, मेडिकल स्टोरवाले इ.ना आधुनिक औषधोपचार करायला मान्यता देणे" >> हे व्हायला नाही पाहिजे हे बरोबर. पण आम्ही सामान्य लोक अजुनही काही गोष्टींसाठी होमेयोपथी वा आयुर्वेदिक तज्ञांकडुन औषधे घेतो 'हो' व 'आ' ची व त्याचा उत्तम गुण येतो. भारतात गेले असता हमखास हे होतेच. छोट्यामोठ्या तक्रारी पळुन जातात. विटिलिगोवर गुण आलेला डोळ्यानी पाहिलाय. आणि नवीन डाग नाही आले हे पण पाहिले. फक्त औषध बराच काळ घ्यावे लागले हे माहित आहे. त्यामुळे ती शास्त्रे एकदम निकामी करायचे योग्य वाटत नाही. अहो आयुष्य गेलंय ही औषधे घेत. कधी अपाय झाला नाही.
या दोन्ही शाखात काही उपचाराचा गुण यायला वेळ लागतो त्यामुळे असे आजार ज्यात असा वेळ जाणे घातक आहे (उदा. कर्करोग , मधुमेह व इतर ) तिथे अलोपथी.
उत्तर द्यायचे तर अपमान न करता उत्तर द्या. Happy

हा प्रतिसाद धाग्याचा विषय नसला तरी आरारांचा जो इतर सर्व शाखा बंद करा हा विचार भितिदायक वाटल्याने इथेच लिहिला.

लेख चांगलाय.

<< विटिलिगोवर गुण आलेला डोळ्यानी पाहिलाय. आणि नवीन डाग नाही आले हे पण पाहिले. फक्त औषध बराच काळ घ्यावे लागले हे माहित आहे. >>
------ विषयान्तर होते आहे म्हणुन क्षमस्व पण रहावले नाही म्हणुन...
जुने असलेले डाग गेलेत का ? तुम्ही केवळ नवीन डाग आले नाहीत, बराच काळ असे लिहीले आहे.... कुठलेही औषध न घेता 'बर्‍या काळा नन्तर' व्हिटिलिगोचे नवे डाग येत नाही, सॅचुरेशन स्टेज येते, फार कमी केसेस मधे १०० % व्हिटिलिगो पसरतो. मग केवळ औषधामुळेच नवे डाग आले नाहीत असे म्हणणे कितपत योग्य आहे?

अरारा - मी तुमच्याशी मताशी सहमत आहे, विषय खुप वादग्रस्त आहे, वेगळा बा फ सुरु कराल का? सर्वान्नाच फायदा होईल.

DHMS (किव्व BHMS) लोक नावाआधी डॉ कसे लावतात हे मला बारावीला असतानाचे कोडे अजुनही सुटले नाही...

बायको सोबत चर्चा केल्यावर कळते तिच्या कडे DMLT झालेले लोक पण लॅब चालवताना नावा आधी डॉ. लावतात. या क्षेत्रात काहीच regulation नाही का? मग पेशन्ट गेल्यावर Dr. च्या नावाने शन्ख फोडताना तो खरा आहे का फेक आहे हे कसे समजणार?

सुनिधी, आयुर्वेद हे पारंपारिक वैद्यकशास्त्र आहे याबाबत कुणाचेच दुमत नाही. त्याचा स्वतंत्र अभ्यासक्रम असण्यापेक्षा शरीरशास्त्र, औषधशास्त्र, शरीरातील विविध अवयवांचे विषय याचा एकत्रित अभ्यास झाल्यावर ज्यांना रस आहे अश्यानी तो पीजीला विषय शिकावा. त्यामुळे खरे तर आयुर्वेदाचाच फायदा आहे. आज जे दुय्यम दर्जाचे शिक्षण मिळते आहे ते तरी थांबेल अश्या विद्यार्थ्यांना.

होमिओपॅथीबद्दल भरपूर लिटरेचर उपलब्ध आहे. जगात जवळपास सर्वत्र ही उपचार पद्धती बोगस म्हणून जाहीर केली गेली आहे, काही ठिकाणी बेकायदेशीरदेखील. भारतात दुर्दैवाने ती अजूनही मान्यताप्राप्त आहे. एव्हडे सर्व पुरावे उपलब्ध असताना जर सुशिक्सित लोकांना त्या उपचारपद्धतीने उपाय करावेसे वाटत असेल तर भारतात तरी ते बेकायदेशीर नाही. ते बेकायदेशीर करावे यासाठी चळवळ करण्यास तरी मज्जाव नाहीये. तेच इथे नोंदवले आहे.

उदय हो, जुना डाग गेला. खुप वेळ लागला. व्यक्तिला एकच डाग आला आणि त्यांनी लगेच उपचार चालू केले. त्यामुळे नवीन डाग आले नाहीत व आलेला हळुहळु गेला. याहून जास्त नाव न लिहिताही गोपनियता ठेवायला लिहीत नाही. समजुन घ्यावे.
टण्या, होमियोपथीची देखील उपयोग झालेला आहे. आता उपयोग झाला हे पेशंटच्या शरिराला कळतंय तरी जर ते बोगसच आहे म्हणुन बंद करा याकरता चळवळ करायची तर काय बोलणार? ते प्लासिबो वगैरे उठसूठ होत नसेल ना होमियोपथीत. असो, प्रत्यक्ष अनुभवावर ही मते लिहिली आहेत त्यामुळे याहून जास्त मुद्दे लिहिता येणार नाही. एक माहितेय की यात काही पटकन बरे होते, काहीला खुप वेळ लागतो. त्यामुळेच मग तुम्हा लोकांना वाटत असेल ही याचा काही उपयोग नाही. यावर उपाय माहीत नाही. चिकाटीने औषध घेत रहाणे, जीवघेणा आजार नसेल तर हेच काय ते.

आयुर्वेदाचा मुद्दा मान्य. दुर्दैवानी प्राचीन काळी कितीतरी उपचारांची माहिती लिहून ठेवली नसेल म्हणुन नामशेष झाली असेल.

मी जे दुसर्‍या विज्ञानाच्या धाग्यावर लिहिले होते ते हेच. देवदानव हे विषय बाजुला ठेऊन इतर अनुभवांबद्दल कोणी सांगतंय तरी ते सरळ नाकारायचे , बोगसच जाहीर करून टाकायचे. उदय तुम्हीच लिहिले होते माझ्या मुद्द्याला उत्तर आणि आता वरती सपशेल उलटी भुमिका? म्हणजे तुम्हाला अनुभव नाही म्हणजे शहानिशा न करते लगेच ते खोटे?

आरारा वगैरेना जास्त माहिती हे निर्विवाद पण आमचे अर्धे आयुष्य संपले की. अनुभवांवर थोडीतरी माहिती होते की हो.

असो, इतर शाखा बाद झाल्या तर फक्त अलोपथी घेऊ तोवर या तिन्हीपैकी त्यावेळी जे योग्य वाटेल ते घेऊ.

सर्व नवीन प्रतीसादाकांचे आभार. या धाग्याचा उदेश लोकांना आधुनिक वैद्यकातील विविध तज्ञांची माहिती व्हावी एवढाच होता. “पॅथियुद्ध” हा सनातन वादाचा विषय आहे. बहुधा तो जगाच्या अंतापर्यंत चालू राहील. Bw तेव्हा त्यासाठी वेगळा धागा इच्छुकांनी काढावा ही वि.

आता हे जे नावाआधी ‘डॉ” चे प्रकरण आहे त्याबाबत माझी सूचना.
खरे वैद्यकीय, वैदू, paramedics , PhD असलेले आणि सन्मान्य डी. लिटवाले हे सगळेच ते बिरूद लावत असल्याने समाजात एकूणच ‘डॉ’ चा गोंधळ माजतो. तेव्हा, आपण सरळ अमेरिकेसारखी पद्धत आणावी. कोणीच ‘डॉ’ लावायचे नाही. आपले नाव, स्वल्पविराम आणि पुढे पदवी.
या पदवीचा अर्थ सर्व समाजाला समजवायचे काम मात्र सरकार आणि आपण सर्वांना मिळूनच करावे लागेल.

तसेही कोशात ‘डॉ” चे अनेक अर्थ आहेत. त्यामुळे जो कोणी स्वतःला eminent scholar समजतो, त्याला ते लावायचा आपसूक अधिकार प्राप्त होतो. तसे कायदे थोडेच आहेत?

उत्तर द्यायचे तर अपमान न करता उत्तर द्या. Happy
<<
मी काय बोलतो आहे, ते तुम्हास समजले व त्यानुसार नीट भाषेत विचारलेत, तर नीट उत्तर देईन. मी तुम्हाला उद्देशून या धाग्यात एक शब्दही बोललेलो नाही तरीही आधीच मी अपमान करणार हे जर तुम्ही ठरवून घेतले असेल, तर मी टवणे सरांककडे पाहून सोशल स्माईल दिले तरी तुमच्या पूर्वग्रहदूषीत मनाला ते तुमच्यासाठी अपमानास्पद वाटेलच. आय कान्ट हेल्प इट. असली अ‍ॅक्युझेशन्स केल्याबद्दल निषेध.

टण्या यांनी जे लिहिले, व त्याला मी प्रतिसाद लिहिला, त्यात "एमबीबीएस समकक्ष" एक पायरी खाली अभ्यासक्रमाबद्दल होते. ते आपणास आकळले नसावे असे वाटते.

आपण अमेरिकेत आहात. जगातील सर्व प्रकारचे अल्टरनेट मेडिसिन तिथे मिळते. त्याबद्दल अधिक माहिती इथे लिहा. नुसते भारतात येऊन "आ" अन "हो" उपचार करवतो, अन कोड बरे झाले असले धादांत " " अ‍ॅनेक्डोटल एविडन्स इ. लिहू नका. तिथे अमेरिकेत असे उपचार आपण करवून घेता का ? आपल्या मेडिकल इन्शुरन्समधे ते उपचार कव्हर्ड आहेत का? तिथे, अर्थात, प्रगत जगात (सो कॉल्ड फर्स्ट वर्ल्ड मध्ये) मॉडर्न मेडिसिन व आल्टरनेटिव्ह मेडिसिन यांच्याबद्दलचा अधिकृत दृष्टीकोण काय आहे?

अहो आयुष्य गेलंय ही औषधे घेत. कधी अपाय झाला नाही. < - > अहो, आयुष्य गेलंय न्यूयॉर्कमधे, कधी मगिंग झालं नाहिये.

या दोन वाक्यांत काही साधर्म्य दिसतंय का तुम्हाला?

***

असो. तुमच्या सन्माननीय प्रतिसादातून तुम्ही माझा केलात त्या सन्मानाच्या अनुषंगाने वर झाला तेवढा सन्मानयुक्त भाषेतील प्रतिसाद पुरे. आता मुद्दा.

आयुर्वेद, होमिओपदी बंद करा असे मी कुठे लिहिले आहे? ज्यांना हवे त्यांनी खुशाल यात पदवी घ्यावी, पण, "शुद्ध" आयुर्वेद अथवा होमिओपथी अथवा युनानी, सिद्ध, योगा इ. "पॅथी" शिकावी, व एक्झॅक्टली त्याचीच प्रॅक्टिस करावी.

अजिब्बात, क्रोसिनचीदेखिल गोळी लिहायची नाही. होमोपथी / युनानी / आयुर्वेदात न लिहिलेले : रक्त-लघवी तपासणी, ईसीजी, सोनोग्राफी, एक्सरे, सीटीस्कॅन्, एमाराय अन तत्सम अजिब्बात वापरायचे नाहीत. गपगुमान नाडीपरिक्षा किंवा काय त्या होम्योपदिक डायग्नोस्टिक टेस्ट्स अस्तील त्या करायच्या. आपली चूर्णे, भस्मे, लेप, बस्ती, नस्य, साबुदाणे, योगासने, सूए जमजमचे पवित्र पाणी, मंत्रोच्चार इ.इ. जे काय असतील ते वापरायचे. : याला माझा फुल सपोर्ट राहील.

माधवबाग, रामदेव, बालाजी तांबे असली स्युडोसायंटिफिक येडी घालायची मशिनं बनवायची नाहीत. हे करू शकणार आहोत का आपण? की आयुश मिनिस्ट्र्या काढून भारतातील पब्लिकच्या जिवाशी अघोरी खेळ सुरू ठेवणार आहोत?

या लोकांनी आम्हीपण "डॉक्टर", असे म्हणत मॉडर्न मेडिसिनचे ओ की ठो कळत नसताना तेही आम्ही करू हा बावळटपणा कृपया करू नये. असला वेडेपणा लोकांनी सहन करू नये, यासाठीच माझा प्रतिसादप्रपंच आहे.

कोड बरे झाल्यासारख्या स्टोर्‍याच सांगायच्या, तर मीही डोळ्याने पाहिलेल्या हजारो गमतींपैकी एक गम्मत लिहितो.

फारा वर्षांपूर्वी (किमान पाव शतक) केटॅमिन नावाचे औषध इंजेक्शन रुपात लहान मुलांसाठी भूल म्हणून आम्ही वापरू लागलो. (आजकाल याचा दुरुपयोग नशाखोर लोक करतात व याच्या वापरावर गेल्या ४-५ वर्षांत कडक निर्बंध आलेत. पण स्टोरी २५-३० साल पुरानी हय.)

आमच्या आधुनिक-वैद्यकशास्त्र-नवपदवी-संपन्न-अस्थिरोगतज्ञ उर्फ हाडवैद्य मित्राने शहराशेजारच्या एका उपनगरी खेड्यातून आलेल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाच्या हाताचे फ्रॅक्चर या भूलीखाली सेट केले. पेशंट जागा झाला, प्लॅस्टर लावून गावी गेला.

आता रेफरिंग जीपीजना जिपड्यांना खाऊ म्हणून काही मल्टिव्हिटॅमिनसारखी इंजेक्शने किंवा सलाईने लिहून देऊन "गावात टोचून घ्या" असे सांगण्याचा उद्योग आमच्यातले बरेच मूर्ख करतात, अन त्यामुळे यांनाही कन्सल्टंटच्या कागदावर इंजेक्शन दिसले, की ते आपण टोचले पाहिजे असे वाटू लागते. आता गम्मत म्हणजे त्याच काळी कीटोरोलॅक नामक पेनकिलरही बाजारात आलेले होते.

तर, पेशंट गावात गेल्यावर तिथल्या प्रथितयश "सिनियर" गाववैद्याने (पुण्याचाच बीएएमएस पदवी धारक. नुसती पुणे युनिवर्सिटी नव्हे) केवळ या ऑर्थोवाल्याचे कागद पाहून, याच्या नावाने चिठ्ठी वा स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स नसतानाही, चक्क inj. ketamine मागवून, पेशंटला दंडात टोचले.

या भाऊची कन्सेप्ट काय, तर फ्रॅक्चर आहे, अन मला पेनकिलर टोचायचे आहे. *

नशीब, शिरेतून द्यायचे औषध दंडात टोचून तिसरेच काही न होता, याचा जो व्हायचा तोच परिणाम झाला. पोरगं अ‍ॅनास्थेशियात गेलं. मान टाकली. श्वास जड झाला.

पेशंटच्या नातेवाईकांचे संताप कपाळात.

आता या बेअक्कल गाववैद्याने किमान आपली काय चूक झाली ते पहायचा प्रयत्न करावा?

नाही. हे लोक कधीही आपली चूक झाली, किंवा आपल्या औषधात, उपचारांत साईड इफेक्ट्स आहेत, इ. मान्यच करीत नाहीत.

या भाऊने पेशंटच्या नातेवाईकांना सांगितले, की त्या डॉक्टरने दिलेल्या औषधाची रिअ‍ॅक्शन आलेली आहे. व ही ते औषध लिहून देणार्‍या डॉक्टरची चूक आहे.

तात्काळ बेसिसवर गावातील मंडळी जिपा, मोटरसायक्ली करून डॉक्टरची गच्ची धरायला हजर!

लोकहो,

माकाचु? त्या नव्या ऑर्थोपेडिशियनने काय करावे?

गावातल्या/समकक्ष वगैरे अल्टरनेटिव्ह पदवी धारकांना अ‍ॅलोपथीची औषधे द्यायला परवानगी द्यावी, ती कशाच्या जोरावर? अरे भौ, चड्डीत र्‍हा ना!

अन असे एक नाही, डोळ्याने पाहिलेले अक्षरशः हजारो किस्से आहेत. नाईलाजाने या टिनपॉटांच्या चुकांवर पांघरुणे घातली आहेत. असो.

( * बद्दल टीप : हे नंतर या सदगृहस्थांनी खासगीत येऊन माफी मागताना सांगितले. प्रकरण निस्तरायला आम्हाला जास्त त्रास झाला नाही, कारण पेशंट जागा झाला.)

(पुण्याचाच बीएएमएस पदवी धारक. नुसती पुणे युनिवर्सिटी नव्हे)
<<
याचा अर्थ असा, की आजकाल मौजे गधेवाडी खु। इथे असलेल्या मुळशी तालुक्यातील 'आयुर्वेद महाविद्यालया'तून पास होणार्‍या कुणालाही पुणे विद्यापीठाची डिग्री मिळते. हे तसे नव्हते. त्यांच्या काळी आयुर्वेद महाविद्यालये फक्त पुण्यात होती. एक रास्ता पेठेतलं अन एक टिळक आयुर्वेद. अर्थात, हे गृहस्थ तथाकथित प्रतिष्ठित कॉलेजाचे पदवीधर होते.

sports medicine नावाची एक शाखा आहे.त्याची वेगळी पदवी असते का?? >> होय, M.D. (sports medicine) अशी शाखा आहे.

चांगला आहे लेख. DNB चा अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद .मला या शब्दात आणि क्रिकेट मध्ये असलेल्या DNB शब्दात कायम गोंधळ उडायचा.

होमिओपॅथीबद्दल भरपूर लिटरेचर उपलब्ध आहे. जगात जवळपास सर्वत्र ही उपचार पद्धती बोगस म्हणून जाहीर केली गेली आहे, काही ठिकाणी बेकायदेशीरदेखील. भारतात दुर्दैवाने ती अजूनही मान्यताप्राप्त आहे>>>>माय बॅड ! आमच्या परिसरात एक होमिओपथ डॉक्टर (?) मोठा दवाखाना थाटून बसलाय आणि कॉस्मोटोलॉजी का काय असते ते त्यावर पण consulatation पण करतो . भोंदूगिरीचाच प्रकार आहे म्हणजे हा Angry

आरारा, तुमचे प्रतिसाद उपयुक्त आहेत .वेगळा बाफ काढला तर बरं होईल .

जेव्हा डॉ ही उपाधी लोक लावतात त्यावेळी तो वैद्यकीय क्शेत्रातील डॉ आहे की पीएचडी आहे हे समजत नाही. त्यामुळे लोकांचा गोंधळ होतो. त्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे.

डिड नॉट बॅट ब्याटिण्गला यायची पाळीच आली नाही. वरच्याच भाऊण्नी मॅच जिण्कली अथवा ड्रॉ केली.

स्वामी, आभार
अनु, धागा पच वायला मदत हवी आहे का ? जरूर करेन ☺

@ट वणे, 20 वर्षांपूर्वी एक साडेतीन वर्षांचा bare foot Drs असा एक अभ्यासक्रम राबविला होता पण, त्याचा बोऱ्या वाजला. 12वी नंतर साडे पाच वर्षे कठोर परिश्रमा ला पर्याय नाही

@ सादः
MBBS नंतर २ वर्शांचे डिप्लोमा असतात.
DGO Dip in Gynecc & Obst.
DCH Dip in Child Health.
MD ३ वर्षांचे असते.

खूप उपयुक्त धागा, धन्यवाद.
आरारा, विविध पॅथींबद्दलची माहिती आणि त्यासंबंधी किस्से वाचायला आवडेल, कृपया नवीन धागा काढा.

ओर्थोपेडिक डॉक्टर सर्दी, तापावर औषध देऊ शकत नाही का?
मागे एकदा ऑफिसमधून घरी येताना सणसणून ताप आला होता, रात्री उशीर झाल्याने फॅमिली डॉ. चा दवाखाना बंद झाला होता, बाजूलाच ऑर्थो डॉ. चे हॉस्पीटल होते, तिथे जाऊन चौकशी केली तर रिसिप्शनवर बसलेली नर्स (नर्सचा युनिफोर्म घातलेला होता), म्हणाली की हे हाडाचे डॉ आहेत. ताप वगैरे वर औषध नाही देऊ शकत. मी म्हटले की एखादा डोस तरी देतील का? उद्या सकाळी फॅ. डॉ. कडे जाईपर्यंत? तर नाहीच म्हणाली.
शेवटी घरी येऊन क्रोसीन घेतली.

छान माहिती मिळत्येय. Laparoscopic Surgeon म्हणजे काय
अवांतर - हे लोक कधीही आपली चूक झाली, किंवा आपल्या औषधात, उपचारांत साईड इफेक्ट्स आहेत, इ. मान्यच करीत नाहीत. > अगदी. मी फार सोसल आहे या प्रकारातून. Sad - (प्रतिसाद अस्थानी / भरकटवणारा वाटला तर जरूर उडवा. )

Laparoscopy surgery : दुर्बिणीतून केलेली शस्त्र क्रिया. सुटसुटीत व कमीतकमी टाके . रूग्ण खूष !

एक (बाळ्बोध) शंका. < दुर्बिणीतून केलेली शस्त्र क्रिया. सुटसुटीत व कमीतकमी टाके . रूग्ण खूष !> तर मग सर्वच (अशा होउ शकणार्‍या ) शस्त्रक्रिया या प्रकाराने केल्या जातात का? नसेल तर का? Happy

भविष्यात 90% सर्जरी laparoscopy ने होऊ शकतील. त्यासाठी डॉ ची पूर्ण नवी पिढी हे तंत्र शिकून बाहेर पडणे जरूर आहे
पुढच्या 50 वर्षांत तर त्याच्याजागी robotic surgery आलेली असेल !

Pages