कढाई छोले

Submitted by योकु on 10 August, 2017 - 10:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- दीड वाटी काबुली चणे
- २ कांदे बारीक चिरून
- १ टोमॅटो + एक टेबलस्पून टोमॅटो सॉस
- १० लसणीच्या पाकळ्या ठेचून
- इंचभरापेक्षा जरा जास्त आलं किसून किंवा ठेचून
- चमचाभर कसूरी मेथी
- दीड चमचा छोले मसाला
- एक चमचा धणे पूड
- एक चमचा जिरेपूड (भाजक्या जिर्‍याची असेल तर जास्त चांगलं)
- अर्धा चमचा आमचूर
- अर्धा चमचा गरम मसाला
- पाव चमचा हळद
- हवं असेल तर लाल तिखट पाव चमचा
- चवीपुरतं मीठ
- चिमूटभर साखर
- कोथिंबीर
- लोखंडी मोठी कढई असेल तर उत्तम. त्यात करावे.

क्रमवार पाककृती: 

- काबुली चणे ८/१० तास किंवा रात्रभर भरपूर पाण्यात भिजवावे. (हा वेळ कृतीत धरलेला नाहीय)
- भिजवलेले चणे पुन्हा एकदा धुवून कुकरमध्ये शिजवावे. मऊ शिजायला हवेत. (हवं असेल तर चहा + सुक्या आवळ्यासोबत शिजवता येतील)
- एका मोठ्या लोखंडी कढईमध्ये / नसेल तर नेहेमीच्या भांड्यात; पळीभर तेल तापवून त्यात चिमूटभर जिरं आणि चिमूटभर हिंग घालून फोडणी करावी. यात आलं-लसणाचा पेंड टाकून मिनिटभर परतून मग कांदा घालावा. चांगला लालसर झाला की शिजवलेले चणे घालावे. मीठ घालावं आणि ग्रेव्ही होईल इतपत पाणी घालून मंद आचेवर उकळू द्यावे. यात आता बारीक चिरलेला टोमॅटो + गोडसर चव आवडत असल्यास सॉस घालावा.
- कसूरी मेथी सोडून बाकी सगळे कोरडे मसाले एका वाटीत/बोल मध्ये सुकेच एकत्र करून ठेवावे.
- दुसर्‍या एका जरा मोठ्या कढल्यात ३-४ टेबलस्पून तेल तापत घालावं. बर्‍यापैकी तापलं की बोलमध्ये कोरडे एकत्र केलेले मसाले घालावे. जरा जपून सगळ मिश्रण फसफसतं. आधीच जरा मोठं पॅन/ कढलं घ्यायचं.
- मसाले तेलात जरा होऊ द्यायचे आणि मग कसूरी मेथी घालावी.
- आता हे सगळं तळलेलं प्रकरण उकळत्या छोल्यांत घालावं.
- चव पाहून मीठ अ‍ॅडजस्ट करावं आणि मस्त उकळू द्यावं १० मिनिटं तरी; मंद आचेवर, झाकण घालून.
- शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम खायला घ्यावं. भात/ पोळी/ पुरी/ पराठा/ पुलाव/ कुलचे/ नान/ भटूरे कश्यासोबतही मस्त लागतात.
- सोबत एखादी दह्यातली कोशिंबीर आणि तळलेली हिरवी मिरची असेल तर स्वर्ग Happy

हा फोटो.

1.jpg

वाढणी/प्रमाण: 
दोन व्यक्तिंकरता पोटभर
अधिक टिपा: 

- लोखंडी कढईमध्ये केल्यानी मस्त रंग येतो आणि चवही जास्त चांगली येते
- मसाले तेलात नीट तळणं महत्त्वाचं. तेल आधीच खूप तापू न देणे हा सोपा उपाय.
- मी छोले नुसतेच शिजवले होते आणि टोमॅटो प्युरी + सॉस असं वापरलं आहे.
- आमचूर, छोले मसाला, टोमॅटो, सॉस असल्यानी आधी वाटलं की फार आंबट होतील म्हणून चिमूटभर साखर घातली मी पण नाही घातली तरी चालेलच.
- आमचूरीच्या ऐवजी चाट मसालाही वापरता येइल.
- फोटोमध्ये कोथिंबीर मिसिंग आहे याची नम्र जाणीव आहे.

- स्रोतः संजीव कपूर चा खाना खजाना शो. इथे पाहायला मिळेल. काही मॉड्स मी केलेय Wink

माहितीचा स्रोत: 
वर दिलेला आहे
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच..
मम्मीला सांगेन बनवायला

तळलेले मसाले घालायची आयडिया भारी आहे. एकदा या पद्धतीने करणार .

हवं असेल तर चहा + सुक्या आवळ्यासोबत शिजवता येतील) >> टी बॅग घालून शिजवायची आयडिया ऐकली होती. सुका आवळा आधी कधी एकलं नव्हतं. तो कशाकरता घालायचा ?

मस्त. करुन बघतो.
चहात का शिजवायचं? चव सुधारते का? का पटकन शिजतात असं काही आहे?

आवळा घातल्यानी काय होतं माहीत नाही. चहा घातल्यानी मस्त डार्क कलर मात्र येतो. चवीत काही फरक पडणार नाही. म्हणून हे वगळूनच चणे उकडले. बाकी मसाले मात्र हवेत. तळून खरपूस केलेले मसाले उकळत्या रस्श्यात घातल्यावर काय घमघमाट सुटतो! एकदम भारीच!
कसूरी मेथी ची आयड्या निशा मधुलिकाच्या व्हिडिओत आहे.