"द सर्कल" (The Circle) च्या निमित्ताने

Submitted by चौकट राजा on 3 August, 2017 - 15:54

काल मी "द सर्कल" (The Circle) चित्रपट पाहिला. भारतात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे कि नाही ते मला माहिती नाही. पण अमेरिकेत थिएटरांमधे येऊन गेला आणि आता नेटफ्लिकस इ. ठिकाणी उपलब्ध झाला आहे. हा चित्रपट आहे "द सर्कल" ह्या सोशल नेटवर्किंग कंपनी / वेबसाईट बद्दल आणि चित्रपटाचा विषय आहे अशा वेबसाईट्स नी घेतलेला आपल्या जीवनाचा ताबा. समाजात डोळे (आणि बुद्धी) उघडी ठेऊन वावरणार्‍या अनेकांच्या डोक्यात हा विचार चाललेला असेलच! "द सर्कल" फक्त तो विचार विस्तृतपणे दाखवतो आणि आपले डोळे अजून उघडतात. फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप चे नाव न घेता हा चित्रपट त्याबद्दल थेट भाष्य करतो.

ह्या लेखाचा उद्देश चित्रपटाचे परिक्षण लिहिणे नाही. ते लिहायचे झाल्यास - टॉम हॅन्क्स सारख्या उत्तुंग अभिनेत्याला अक्षरशः वाया घालवले आहे, एमा वॅटसन चा अभिनय नेहेमीसारखाच (बरचसा एकसुरी) आहे. दिग्दर्शन चांगले पण खास म्हणावे असे नाही. कथानक दमदार असले तरी दिग्दर्शन कमी पडल्यामुळे कथेचे सार, द्यायचा संदेश जरी प्रेक्षकाला कळाला तरी विषय ज्वलंत असूनही चित्रपट "घुसत" नाही. त्यामुळे एक चित्रपट म्हणून बघता मी ३ स्टार देईन.

असे असूनही चित्रपट संपल्यावर मला बराच वेळ झोप लागली नाही. कारण वर म्हटल्याप्रमाणे विषय ज्वलंत आहे. चित्रपटाची कथा सांगता सांगता विषय सुद्धा उलगडून सांगायचा प्रयत्न करतो.

***स्पॉयलर अ‍ॅलर्ट***
पुढे चित्रपटाची कथा दिलि आहे.

मे हॉलंड (एमा वॅटसन) ही एका सामान्य नगरपालिकेतल्या ग्राहक संपर्क विभागात काम करणारी, कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातली मुलगी. वडिलांना झालेला असाध्य रोग व त्याच्यामुळे त्यांना होणारे कष्ट, तिच्या आई वरचे त्यांचे अवलंबित्व आणि इन्शुरन्स त्यांच्यावरील काही आवश्यक उपचार कव्हर करत नसल्यामुळे मे कायम तणावात असते. तिच्या कामातही ती खुश नाही. त्या तणावातून काही काळ मुक्ती मिळवण्यासाठी तिचा कयाकिंगचा छंद दिला मदत करतो. मर्सर (एलार कोल्त्रेन) नावाचा तिचा बालपणापासुनचा मित्र तिच्यावर प्रेम करतो पण ती त्यालाही लांब ठेवत रहाते. ह्या मे ला तिची मैत्रीण अ‍ॅनी (कॅरन जीलन) "द सर्कल" मधे जॉब मिळवून देते. अ‍ॅनी "द सर्कल" मधे मोठ्या पदावर आहे आणि कामानिमित्त सतत परदेशी फिरत असते. त्यामुळे तिचे आयुष्य धावपळीचे पण मे साठी एकदम "हॅपनिंग" आहे. मे चे काम इथेही ग्राहक संपर्क / तक्रार निवारण विभागात आहे. कामाच्या पहिल्या आठवड्यापासुनच "द सर्कल" तिच्या आयुष्याचा ताबा घ्यायला सुरुवात करते. त्यांच्या प्रत्येक कर्मचार्‍याने सोशल प्रोफाईल बनवलाच पाहिजे आणि त्याने कंपनीमधल्या इतरांशी सतत संपर्कात राहिलेच पाहिजे अशा त्यांच्या अपेक्षा आहेत. प्रत्येकाने सतत काहीतरी शेअर करत राहिले पाहिजे, "शेअरिंग इज केअरिंग" वगैरे तत्वज्ञानातून "द सर्कल" त्यांच्या कर्मचार्‍यांवर सतत लक्ष ठेवून असते. वीकेंडला सुद्धा कॅम्पसवर अनेक कार्यक्रम आयोजित करून कर्मचारी कॅम्पस मधेच रहातील, त्यांना बाहेरच्या जगात जायलाच लागणर नाही अशी सोय केलेली आहे. सगळ्या जगाशी सगळे सतत शेअर करणारे हे कर्मचारी "द सर्कल" च्या प्रवाहाखाली अक्षरशः ब्रेनवॉश होताना आपल्याला दिसतात. सुरुवातीला हे सगळे विचित्र वाटणारी मे नंतर त्यात ओढली जाते आणि मग त्यातलीच एक होऊन जाते. तिला "आपल्यात" सामावून घेण्यासाठी सर्कल वाले तिच्या वडिलांना खुप चांगल्या वैद्यकिय सुविधा प्रदान करतात. तिलाही भविष्यात आजार होण्याची लक्षणे (आणि उपचार) आधीच लक्षात यावे म्हणून तिच्याही शरीराचा प्रत्येक क्षणाचा डेटा साठवयाला सुरुवात होते. हा तिचा प्रवास बघताना आपल्याला सतत जाणवत रहातं कि हे चाललय ते बरोबर नाही पण त्याच वेळी "द सर्कल" तिला देत असलेल्या सुविधांंमुळे तिचे ते ओढले जाणे कुठेतरी आपल्या मनाला पटते सुद्धा.
(इथे मला आठवण झाली फेसबूक, गूगल, इन्फोसिस ए. कंपन्यांची, ज्या आत्त्ता हेच तर करत आहेत..)
हळुहळु "प्रत्येक गोष्ट सर्वांबरोबर शेअर करणेच कसे योग्य आहे" हे विविध उदाहरणे, कारणे देऊन "द सर्कल" कर्मचार्‍यांना पटवत रहाते आणि नवनवीन कल्पना मांडत रहाते. उदाहरणार्थ, आपल्या टॅक्सच्या पैशावर जगणार्‍या आणि आपल्याच भविष्याबद्दल निर्णय घेणार्‍या सरकारी मंत्र्यांची सर्व माहिती (इ मेल्स, फोन कॉल्स, सर्व संभाषणे, सर्व काही) सर्वांना कळाली पाहिजे अशी कल्पना पुढे येते आणि उचलून धरली जाते. त्या कल्पनेला विरोध करणार्‍या मंत्र्याच्या मागे चौकशीचा फेरा लागतो (अर्थातच) आणि तिची जागा घेणारी नवीन मंत्री स्वतःच्या सर्वच्या सर्व गोष्टी सतत जगजाहीर होत रहातील म्हणून शपथ घेते!
इकडे "द सर्कल" मधे मान्यता मिळावी म्हणून "सोशल" बनलेली मे, तिच्या मित्राच्या (मर्सरच्या) लाकडापासून बनवलेल्या पण हरणाच्या शिंगांप्रमाणे भासणार्‍या झुंबरांचे फोटो शेअर करते आणि मर्सर अचानक प्रसिद्धिच्या झोतात येतो. सोशल मिडिया पासून दूर रहाणार्‍या आणि आपल्या छोट्या व्यवसायात रमणार्‍या मर्सरला ही प्रसिद्धी नको असते पण त्याला ती सोसावी लागते. पुढे जाऊन मात्र जेव्हा त्याला लोक हरिणांचा हत्यारा ठरवतात आणि तसे करण्याबद्दल त्याला जीव घेण्याच्या धमक्या यायला लागतात तेव्हा त्याचा कडेलोट होतो. तो मे ला येऊन भेटतो. ती त्याला सर्वकाही दुरुस्त करते म्हणत असते पण त्यातील फोलपणा आपल्याला जाणवतो. मर्सर तिच्या पासून दूर अज्ञातवासात निघुन जातो. त्या नैराष्याच्या भरात मे रात्री एकटीच कयाक काढुन बाहेर पडते आणि खोल पाण्यात पोचल्यावर संकटात सापडते. सुदैवाने तिचा जीव वाचवायला पोलीस वेळेत येतात पण ते येतात कारण "द सर्कल" च्या कोणा युजर ने तिला अपरात्री पाण्यात जाताना पाहिले असते आणि "द सर्कल" च्या कॅमेराने तिला कयाक पळवताना पाहून पोलीसांना कळवलेले असते म्हणून! आणि इथे "द सर्कल" च्या चालकांच्या (टॉम हॅन्क्स व पॅटन ऑस्वाल्ट) हातात आयते घबाड लागते.
(इथून पुढे आपल्याला दिसतो तो मानवी जीवनमुल्यांचा र्‍हास. जो आपल्याला सतत अंतर्मुख करत रहातो कारण जे जे घडते ते ते खर्‍या आयुष्यातही घडले तर काय होईल ही भिती ह्यापुढे चित्रपट पहाताना मनावर दाटून येते)
"द सर्कल" च्या शेअरिंग सुविधेमुळे तिचा जीव कसा वाचला हे संचालक मे ला पटवून देतात आणि माहिती सगळ्यांकडे असल्यामुळे कसा फायदाच होतो हे तिच्या गळी उतरवण्यात यशस्वी होतात. मे सुद्धा (त्या मंत्र्याप्रमाणे) मग "टोटल शेअरिंग उर्फ ट्रान्स्परन्सी" ला तयार होते. ती कायम एक कॅमेरा लावणार असते ज्याद्वारे झोपेच्या व नैसर्गिक गरजांच्या वेळा वगळता बाकि सगळा वेळ सर्व जगाला ती काय करते आहे हे दिसणार असते. अर्थातच "द सर्कल" मे ची प्रचंड जाहिरात करतात व "ट्रुमन शो" प्रमाणे जगभर सगळे लोक मे ला तीन्ही त्रिकाळ बघायला लागतात. मे प्रचंड लोकप्रिय होत असते. तिच्या निमित्ताने अशी "टोटल ट्रान्स्परन्सी" लोकशाहीला कशी पूरक आहे हे लोकांना सांगताना कंपनी आता पुढची पावलं टाकायला लागते. मे सुद्धा त्यात पुढाकार घेऊ लागते. "द सर्कल" चे अकाऊंट असणे म्हणजेच मतदाराचे नोंदणीकरण असावे अशी कल्पना ती मांडते. तसे झाले कि सगळ्या मतदारांना मतदान करायलाच लागेल आणि १००% मतदान होईल म्हणजे लोकशाही पर्फेक्ट होईल असा विचार पुढे येतो. सरकारचे किती पैसे वाचतील असे कारण दाखवत कंपनी जगभरच्या सरकारांना प्रपोजल पाठवते आणि काही देश तयारही होतात.
(प्रेक्षकांना आता जाणवते कि हा सगळा प्रवास नागरिकांच्या आयुष्यातील "खासगी" असे काही रहाणारच नाही ह्या दिशेने चालला आहे. "कोणाच्याही जीवनात खासगी काही नसलेच पाहिजे" असे तत्व मांडून चित्रपटातील घटना घडू लागतात आणि त्याला दिली जाणारी कारणे वरकरणी योग्य भासली तरी त्यातील फोलपणा सतत जाणवत रहातो.)
मे ला आता असे अनुभव यायला लागतात जे खरतर खासगी म्हणूनच रहायला हवेत. जसे कि कामावरुन घरी आल्यावर ती आई बाबांशी बोलुयात म्हणून कॅमेरा चालु करते आणि सगळे जग तिच्या आई बाबांना नको त्या क्षणी पहाते. मे ला अर्थातच मेल्याहुन मेल्यासारखे होते. मे ची मैत्रीण, अ‍ॅनी (जिने तिला नोकरी लावून दिली), आता तिच्याशी नीट बोलत नाहिये. मे तिला नक्कि काय झालय विचारायला जाते तेव्हा ती मे ला टाळते. शेवटी बाथरूम ब्रेकच्या निमित्ताने मिळालेल्या ३ मिनिटांच्या वेळात ती मे ला सांगते कि तिला कामाचा ताण सहन होत नाहिये. संचालक मंडळ तिला देशोदेशी जाऊन तिथल्या नियमात "द सर्कल" कसे बसतय ते पटवायला सांगतात आणि तसे जमत नसल्यास तिने मार्ग शोधायचा असतो. सतत नैतिक - अनैतिकतेच्या उंबरठ्यावर काम करत रहाणे अ‍ॅनी ला असह्य झालेले असते पण ते सांगायला तिची जवळची मैत्रीण मे उपलब्ध नसते कारण ह्या मैत्रिणीचे सर्व जीवन सतत जगाला दिसत असते. अशा ह्या घटनांमुळे मे ला सुद्धा ह्या उपक्रमातला फोलपणा जाणवायला लागलेला असतो पण आता मागे फिरणे शक्य नसते.
सुप्रसिद्ध झालेली मे आता "द सर्कल" ची प्रवक्ती बनलेली असते. त्यांच्या दर आठवड्याला लाँच होणार्‍या नवनवीन कल्पना ती मांडत असते. असेच त्या दिवशी "द सर्कल" नवीन संकल्पना आणते, फरार कैदी किंवा अपराध्यांना "द सर्कल" च्या युजर्सनी शोधायचे आणि रिपोर्ट करायचे! त्यांचे नेटवर्क इतके दाट आहे आणि सगळे युजर्स सतत सगळे बघत आहेत कि २० मिनिटात कोणालाही शोधणे शक्य आहे असा त्यांचा दावा असतो. आणि खरच एका फरार आरोपीला १० मिनिटात शोधले जाते. त्या आरोपीला आपल्या बचावार्थ काहीही बोलू न देता, एका दुकानात सामान्य कामगाराप्रमाणे काम करणार्‍या त्या स्त्रीला लोक पकडून देतात आणि "द सर्कल" चे युजर्स जल्लोश करतात. आणि मग कोणीतरी मे कडे मागणे करते तिला सोडून गेलेल्या मर्सर ला शोधायची. तिच्या पोटात खड्डा पडतो. आधिच्या अनुभवामुळे तिला महिती असते कि मर्सरला ते अजिबातच चालायचे नाही. पण आता कोणतीही माहिती मिळणे हा ग्राहकांचा अधिकार झालेला असतो! दूर गेलेल्या मित्राला सुद्धा शोधून काढायचा हक्क लोकांना बजावायचा असतो. अखेर संचालकांच्या आग्रहाखातर मे मर्सरला शोधण्यास होकार देते. आणि खरोखरच युजर्स त्याला १० मिनिटात शोधून काढतात. तो त्यांच्यापासून पळायचा प्रयत्न करतो तर त्याचा पाठलाग सुरु होतो. दोन गाड्या, एक ड्रोन, एक मोटरसायकल आणि त्याच्या गाडीवर युजरने लावलेला कॅमेरा, सगळे मिळून त्याला सोडत नाहीत. आणि त्या पाठलागाच्या खेळामधे त्याला अपघात होऊन मर्सर मरण पावतो. मे पुर्णपणे कोसळून पडते. हळुहळु ती ह्या धक्क्यातून सावरते आणि "द सर्कल" कडे परत जाते ते एका ठराविक उद्देशाने.
(तशी मी आता संपुर्ण चित्रपटाची कथा सांगितलीच आहे पण ती पुढे काय करते हे लिहुन शेवट सांगून टाकत नाही. ईच्छा असल्यास ते वाचकांनी स्वतःच बघावे. (किंवा मला विपू करा Happy )

ह्या सर्व अनुभवातुन मला प्रकर्षाने येऊन बोचलेला विचार म्हणजे "आजच्या जगातील माहितीची उपलब्धता". आज आपल्यावर सतत माहितीचा अक्षरशः मारा होतोय. पुर्वी आपण सकाळी एक किंवा दोन वर्तमानपत्र वाचायचो, संध्याकाळी (एकाच चॅनेल वरच्या) बातम्या बघायचो आणि उरलेला वेळ स्वतः काहितरी विचार करायचो. त्याबद्दल इतरांशी चर्चा करायचो. आता आपण सतत नुसते वाचत असतो. आणि जे वाचतो ते कोणीतरी, म्हणजे कोणीही ऐर्‍यागैर्‍याने (तो त्या क्षेत्रातील एक्स्पर्ट असेल असे अजिबात नाही) लिहिलेले काहीतरी असते. कोणतीही माहिती स्वतः प्रोसेस करायच्या आधी पुढे पाठवायची घाई का आहे सर्वांना? म्हणून मग दिलीप पाडगांवरांऐवजी दिलीप प्रभावळकर निवर्तल्याची बातमी पसरते. जीवंतपणी ती वाचताना प्रभावळकरांना, त्यांच्या कुटुंबीयांना जो मनस्ताप झाला असेल, त्याचे काय? हा सगळा माहितीचा भडिमार अती होतोय असं नाही वाटत? त्यामुळे आपल्या भावना सुद्धा बोथट होत चालल्या आहेत असं नाही वाटत?
फेसबूक वर दिवसाला ४ फोटो आणि ६ स्टेटस बदलले पाहिजेत असा अट्टाहास का झालाय? आपल्या आयुष्याची अशी का सतत जाहिरात करायची? परवा एका ओळखीच्या बाईंनी महेश काळेंच्या मैफिलीचे एका तासात बत्तीस व्हिडिओ आणि ८० फोटो फेसबूक वर टाकले! समोर काहिही, अक्षरशः काहिही चालले असले तरी ते कॅमेरात पकडलेच पाहिजे का? कलेचा आस्वाद घेणे विसरलो आहोत का आपण? कोणाचा समोर जीव जातोय हे लक्षात न घेता बघणारे लोक व्हिडिओ काढत आहेत, आणि ते करोडो लोकांना पाठवत आहेत. आपल्या आप्तजनाचा असा जीव जातानाचा व्हिडिओ व्हायरल होताना पाहून त्याच्या आईवडिलांना, जवळच्या लोकांना काय वाटत असेल? समोर दिसणार्‍या प्रत्येक फोटोला आणि कशालाही लाईक करत बसण्याचा खेळ आपण खेळतो. पण रोज रोज इतरांचे पर्फेक्ट आयुष्य बघुन बघुन आपल्या सामान्य आणि कटकटींनी भरलेल्या आयुष्याचा अंत करावा असे एखाद्याला वाटत असेल किंवा आपल्यालाच नैराष्य येत असेल ह्याची जाणीव आहे का आपल्याला? आपल्या येणार्‍या पिढीच्या भविष्यात ह्या दैत्यामुळे किती हाहा:कार होणार आहे ह्याची कल्पना करवत नाही. त्यांचे आयुष्य, भावनाविश्व ह्या आभासी जगाला बांधले जाणार आहे. दुसर्‍या माणसाशी प्रत्यक्ष संवाद साधणे जमेल का त्यांना? एका कार्यक्रमात ऐकत होतो.. टीन एजर मुलगी म्हणाली कि मित्र मैत्रीणींशी बोलण्यापेक्षा टेक्स्ट करणे तिला जास्त आवडते. कोणी मित्रानी फोन केला तर काय बोलावे कळत नाही पण त्याच मित्राशी टेक्स्ट वर, चॅट वर तासन तास गप्पा मारता येतात. आभासी जगानी आपला विळखा पसरायला सुरुवात केलेली नसून तो ऑलरेडी पसरला आहे. फेसबूक वरुन बुलींग, रीवेंज पॉर्न, काय ते म्हणे ब्ल्यु व्हेल च्या घटना आत्ताच वारंवार ऐकायला मिळत आहेत. पुढे काय काय वाढुन ठेवलय देव जाणे!
सोशल नेटवर्क हे मनोरंजनाचे, विरंगुळ्याचे साधन न रहाता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होते आहे. पण माणसे जोडण्यापेक्षा ते समाज तोडण्यात जास्त माहीर आहे असं वाटायला लागलय. मला खात्री आहे कि आपल्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी रोज जाणवत असतील. पण "द सर्कल" च्या निमित्ताने मला त्या येऊन बोचल्या म्हणून हा लिखाणप्रपंच. खरच विचार करा, उद्या निवडणुका फेसबूक वर व्हायला लागल्या तर? आज प्रिविलेज म्हणून सतत मिळणारी माहिती, उद्या कोणासाठी हक्क होणार नाही कशावरून? तुमच्या आयुष्याबद्दल आम्हाला सगळी माहिती कळत राहिलीच पाहिजे असं कोणी म्हणालं तर? आणि २०५० साली, अचानक एक दिवस हे सगळं इंटरनेट ( इ मेल, फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम इ इ) बंद पडलं.... केवळ काही दिवसांसाठी जरी ते बंद पडलं तर जगू शकेल का माणूस?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिनेमाच्या अनुषंगाने लिहीलेला लेख आवडला. माहितीचा मारा खरंच जीवघेणा वाटतो कधीकधी आणि सतत कनेक्टेड राहणंही नकोसं वाटतं. +1

ह्यावर उपाय तसे पाहता आपल्याच हातात आहे पण , हा पण आडवा येतो:)

लेख आवडला. कधी कधी एकदम पुर्वीच्या दिवसांप्रमाणे गुगल न वापरता ,कसलीही सोशला साईट न वापरता अधुन मधुन रहायला आवडते. कधी कधी वस्तु वगैरे विकत घेताना रिव्यु,फायदे तोटे, उलट सुलट चर्चा वाचून खूप कंटाळा येतो. वस्तु विकत घेण्यातला उत्साह निघून जातो.
सोशल साईटचा कंटाळा अलिकडे तर खूप यायला लागलाय.
गंमत म्हणजे आपण सगळे फेसबुकला नाव ठेवतो पण मायबोलीवर तेच करत असतो. एकुणच आपण सगळेच याचा भाग झालो आहोत आणि यातून अधून मधुन तरी ब्रेक घेतला पाहिजे अस वाटत.

Spoilers चा भाग वाचला नाही. पण लेखात मांडलेल्या प्रश्नाची गंभीरता मान्य आहे. आजच हा लेख वाचला.. त्यातील निष्कर्ष अनपेक्षित नसले तरी धक्कादायक नक्कीच आहेत. लेखाचा दुवा: https://www.theatlantic.com/magazine/archive/2017/09/has-the-smartphone-...

फार सुरेख लिहिलंय. सिनेमाच्या निमित्ताने हे चिंतन लिहिलंय ते खरंच विचार करण्यासारखं आहे.

सध्या नेटफ्लिक्सवर ' ब्लॅक मिरर' सिरीज बघतेय. त्यातही भविष्यात विविध टेक्नॉलॉजीमुळे कसे भयावह परिणाम होऊ शकतील याच्या गोष्टी आहेत. फँटस्या असल्या तरी अशक्य नाहीत.

चित्रपटाच्या निमित्ताने छान लेख लिहिला आहे. गेल्या २०-२५ वर्षातील तंत्रज्ञानाची वेगवान प्रगती झाली आहे. पण माणूस इवॉल्व्ह झालेला नाही. आजकाल कित्तेकांना "माहिती म्हणजे ज्ञान नव्हे" हे समजतच नाही. माणसाची सारासर विचार करण्याची क्षमता संपते आहेच पण काही वर्षात विचार करण्याची क्षमताच संपली नाही म्हणजे मिळविले. सतत कनेक्टेड रहाण्याच्या अट्टाहासामुळे आपण स्वत:शीच कनेक्ट संपवतो आहोत.

विषय चांगला आहे आणि चित्रपट काही खास नाही असे कळले होते त्यामुळे पाहिला नाही.

पण या विषयाबद्दल सतत चर्चा चालू असते. मी दळणवळण क्षेत्रात काम करतो त्यामुळे गुगल चे ट्रॅकिंग किती प्रगत आहे याचा अनुभग घेत असतो. माझ्या मागच्या फोन वर गुगल असिस्टंट चालू होता. त्यावेळेस माझ्या दररोज च्या सवयींनी गुगल मला ट्रॅफिन न दाखवता माझी बस किती मिनीटांत येणार आहे आणि मला आता ती बस पकडायला निघायला पाहिजे असे सांगत असे. या बरोबरच इतरही अनेक गोष्टी आहेत. असे असताना आपल्याला उपयोगी गोष्टी मिळत असताना आपण आपले स्वातंत्र्य , प्रायव्हसी गमावून बसतो आहे असे वाटायला लागते. नविन फोन घेतल्यावर तर मी फेसबुक चे अ‍ॅप सुद्धा डाऊनलोड केले नाही. अजूनही पूर्णपणे बाहेर पडता आलेले नाही कारण अधे मधे दिवसातून एकदा तरी कॉम्प वर फेसबुक उघडले जातेच. पण आता निदान ते २४ तास फोन वर येत नाही.

कधी कधी वाटते की यापेक्षा ते साधे नोकीयाचे फोन बरे होते. फोन आला तरच फोन कडे पहायचे नाही तर आपण इतर उद्दोग करायला मोकळे. आता म्हणजे १० मिनीटे त्या स्क्रीनकडे नाही पाहिले की चुकल्यासारखे वाटते.

ह्यावर उपाय तसे पाहता आपल्याच हातात आहे पण , हा पण आडवा येतो:) >>> येतो खरा! Happy पण तरी छोट्या स्केलवर प्रयत्न करतेय मी गेले काही दिवस. उदा: दिवसातून १०-१५ मिनीटंच फेसबुक चेक करणं, व्हॉअ‍ॅ वर सतत न रेंगाळणं, व्हॉअ‍ॅ ग्रूप्स कमी करणं, इ. खूप फरक जाणवतो आहे. शांत वाटतंय. सतत कोणाशीतरी बोलत राहण्याची सवय बंद झाली आहे. स्वतःकरता वेळ मिळतो आहे.

मी फे बु चा सदस्य नाही. Smartphone मुलाने मागच्या महिन्यात भेट दिला म्हणून वापरतो. कटाक्षाने whatsapp ची सोय घेतली नाही. येऊन जाऊन माबो चेच थोडे व्यसन आहे.

चित्रपटाचा विषय आणि त्याअनुषंगाने आपण केलेले विश्लेषण आवडले.

हल्ली तरूण पिढी तर स्मार्टफोनमुळे या आभासी विश्वात इतकी गुंतली आहेत की जर स्मार्टफोन पाच मिनिटे त्यांच्यापासून दूर झाला तर त्यांच्या आयुष्यात काहीच उरलेच नाही इतपत परिस्थिती झाली आहे. फेसबुक, व्हॉट्सअप म्हणजे त्यांचे जीव का प्राण. वर तुम्ही लिहिले आहे त्याप्रमाणे कोणताही शहानिशा न करता मिळेल ती माहिती शेअर करण्याची अहमहमिकाच लागलेली असते. नवनविन प्रकारच्या अ‍ॅप्समुळे काही गोष्टी इतक्या सहजगत्या उपलब्ध होतात त्यामुळे आपण पुर्णपणे त्यावरच विसंबून राहतो. शाळेत असताना निबंधासाठी एक विषय असायचा" विज्ञान शाप की वरदान" त्याची प्रकर्षाने आठवण झाली.

लिखाण आवडलं.
सिनेमा टीव्हीवर कधी दाखवला जाईल त्याकडे लक्ष ठेवणार आणि नक्की बघणार.