मन मोरा बावरा - रफी पुण्यस्मरण

Submitted by अतुल ठाकुर on 31 July, 2017 - 02:37

38466-jiufqgctvr-1469899635.png

असं म्हणतात की हिर्‍याला जितके पैलू जास्त तितका तो तेजस्वी आणि मौल्यवान असतो. रफी नावाच्या हिर्‍याचे पैलू मात्र असंख्य आहेत. मोजण्यापलिकडलेच. त्यामुळे ते मोजण्याचा उद्योग सोडून एकेक पैलू निरखत त्यांचा आस्वाद घेणंच आनंदाचं वाटतं. आज रफीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने रफीने काही अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांना आवाज दिला त्यांच्याबद्दल लिहावंसं वाटतं. मी निवडलेल्या या चार अभिनेत्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या चारही जणांनी आपल्या उदंड कर्टुत्वाने आपली नावे हिन्दी चित्रपटसृष्टीत अमर करून ठेवली आहेत. असे असून देखील रफीचा आवाज यांच्या बाबतीत क्वचितच वापरला गेला. अर्थातच त्याची काही कारणे असतील. तरीही यांच्यासाठी रफीने गायिलेल्या गाण्यात रफीचं असं खास वेगळेपण जाणवतंच. आणि या लेखाचा उद्देशही रफीचे ते वेगळेपण मांडणे हाच आहे. हे चार अभिनेते आहेत राज कपूर, अशोक कुमार, किशोर कुमार आणि प्राण. यात किशोरकुमारने स्वतंत्र गायक म्हणून अगदी रफीला झाकोळून टाकेपर्यंत घोडदौड मारली.

hqdefault_3.jpg

राजकपूरचा आवाज म्हणजे मुकेश हे फिट्ट बसलेलं समिकरण. त्यानंतर मन्नाडे. क्वचित "मै दिल हूं इक अरमान भरा" हे तलतच्या मुलायम आवाजात म्हणणारा राजकपूरही दिसतो. पण रफीचे राज्य सुरु असताना राजकपूरच्या गळ्यावर मात्र राज्य केलं ते मुकेशनेच. आणि लोकांनी या जोडीला त्यांची गाणी अमाप लोकप्रिय करुन मान्यताही दिली. पुढे आला "मेरा नाम जोकर". राजकपूरचं स्वप्न म्हणता येईल असा चित्रपट. त्यात पुन्हा मुकेश आणि मन्नाडे होतेच. मात्र त्यात एक गाणं रफीलाही होतं हे अनेकांना ठावूक नसेल. कदाचित चित्रपटाच्या वाढलेल्या लांबीमुळे त्याला कात्री लावण्यात आली असावी. मात्र मला ते रफीच्या सर्वोकृष्ट गाण्यांपैकी एक वाटते. या गाण्याच्या प्रकाराला बहुधा "हीर" म्हटले जाते. हीररांझाच्या प्रेमकहाणीवर बेतलेले "हीर" गाणे सोपे नाहीच. त्यात ताना आहेत. आणि ते गाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. अनेकांची "हीर" ऐकल्यावर ही पद्धत लक्षात येते. या अतिशय कठिण अशा प्रकारासाठी बहुधा रफीला पर्यायच नव्हता. आणि रफीने या संधीचे सोने केले. आज जर हे गाणे चित्रपटात असते तर मुकेशच्या "जाने कहां गये वो दिन" ला या गाण्याने नक्कीच टक्कर दिली असती असे माझे प्रामाणिक मत आहे. बाकी हे गाणे जितके ऐकण्याचे तितकेच पाहण्याचेही आहे. रफीने ज्या मेहनतीने "हीर" गायिली आहे ती मेहनत राजकपूरच्या अभिनयात जाणवते. काही जोरकस ठिकाणी त्याचे खांदे आपोआप श्वास घेण्यासाठी वर उचलले जातात. एका जबरदस्त गायिलेल्या गाण्याचे जबरदस्त अभिनेत्यानेही सोने केले आहे.

download.jpg

यानंतर विचार करायचा आहे तो नटश्रेष्ठ अशोककुमारचा. अशोककुमारने स्वतःच्या आवाजात गाणी गायिली तो काळ अगदीच आधीचा. त्यानंतर प्रमुख भूमिका करताना किंवा पुढे चरित्र अभिनेत्याची कामे करतानादेखील खुप गाणी या अभिनेत्याला मिळाली नाहीत. पण जी काही मिळाली ती गाजली. त्यातही इतकी प्रदीर्घ कारकीर्द असलेल्या अशोककुमारने रफीच्या आवाजात क्वचितच गायले असेल. मला येथे फार पूर्वी पाहिलेल्या "मेरी सुरत तेरी आंखे" चित्रपटाची आठवण होते आहे. अत्यंत जोरकस ताना असलेले "नाचे मन मोरा" हे सुरेख गाणे. आणि आश्चर्य म्हणजे पडद्यावर ते अशोककुमारच्या व्यक्तीमत्वाला चपखल बसले. जन्मजात दोषामुळे काळा आणि कुरुप म्हणून टाकून दिलेला मुलगा गायक बनतो. मात्र त्याच्या आयुष्यात या वैगुण्याच्या न्युनगंडामुळे एक उदासवाणेपण सतत वावरत असतं. या गायकाची भूमिका अशोककुमारने अतिशय परिणाकारकरित्या साकारली होती. मला तर त्या विशिष्ट गेटअपची भूमिका स्विकारण्याचे धाडस करण्यालाच सलाम करावासा वाटतो. शास्त्रीय बाजाचे हे गाणे रफीने जितके अप्रतिम गायिले आहे तितकेच ते पडद्यावर अशोककुमारने सुरेख सादर केले आहे. त्याच्या काळ्या चेहर्‍यावर फक्त ठळकपणे दातच दिसतात. आणि त्या केविलवाणेपणाचे बेयरिंग अशोककुमारने छान सांभाळले आहे. या एकंदर पार्श्वभूमिवरदेखील रफीचा आवाज सुयोग्य वाटला. यात आणखी एक "तेरे बिन सुने नयन हमारे" हे देखील सुरेख गाणे रफीच्याच आवाजात आहे. रफी आणि अशोककुमार असा दुर्मिळ संगम झालेला हा चित्रपट. अशोककुमारसाठीही रफीने लावलेला आणि फिट्ट बसलेला स्वर.

hqdefault (1).jpg

किशोरकुमारच्या गायक म्हणून मोठेपणाबद्दल शंकाच नाही. पण पडद्यावर गायन शालेत हातात तानपूरा घेऊन बसल्यावर त्याच्या गळ्यासाठी रफीचाच आवाज निवडला गेला याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. "पायलवाली देखना" यासारखी क्वचित काही शास्त्रीय बाजाची गाणी किशोरने दिली. मात्र येथे रफीची निवड झाली आणि ती अचूक ठरली. "रागिणी" चित्रपटातील "मन मोरा बावरा" हे अजरामर गाणे रफीने दिले. किशोरने तानपुरा घेऊन गाताना थेट शास्त्रीय गायकच उभा केला. आणि रफीच्या आवाजात हे गीत म्हणताना त्याचा अभिनय पाहता मलातरी एका श्रेष्ठ गायकाने दुसर्‍या श्रेष्ठ गायकाला दिलेली ती मानवंदनाच वाटली. रफीच्या आवाजात किशोरने गायलेल्या आणखी एक गीताचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतो. "शरारत" चित्रपटातील "अजब है दास्तां तेरी ऐ जिंदगी" हे आणखी एक सुरेख गाणे रफीन किशोरसाठी गायिले आहे. येथे रफीला का बोलावले गेले या कारणमीमांसेत मला शिरायचे नाही. मात्र या गाण्याचे रफीन सोने केले आहे हे नक्की. पडद्यावरदेखील पाहण्यासारख्या असलेल्या या गाण्यात मीना कुमारी आणि किशोरकुमारने अभिनयाची कमाल केली आहे. आई मुलाच्या नात्याचा इतरांनी केलेला गैरसमज ही या गाण्याची पार्श्वभूमी आहे. त्यात आपली कैफियत मांडणारा आर्त स्वर रफीशिवाय दुसरा कोण देणार? ती आर्तता किशोरने आपल्या चेहर्‍यावर तितक्याच ताकदीने दाखवली आहे. रफी आणि किशोरचा हा खरोखरचाच पडद्यावरचा दुर्मिळ संगम एक रसिक म्हणून माझ्या मनाला अतिशय लोभसवाणा वाटणारा.

320x240--BX.jpg

चित्रपटाच्या नामावलीत शेवटी "अँड प्राण" असा प्राणचा नामनिर्देश होत असे. लेखाचा समारोप करतानादेखील या नटश्रेष्ठाचा उल्लेख करताना मला हीच परंपरा पाळावीशी वाटते. खलनायक आणि त्यानंतर चरित्र अभिनेता या प्रवासात प्राणला अशोककुमारप्रमाणेच फार गाणी मिळाली नाहीत. पण जी मिळाली ती खास आणि आपले स्वतःचे वैशिष्ट्य बाळगणारी होती. रफीनेही प्राणला क्वचितच आवाज दिला. येथे मला आठवतेय ती "धर्मा" चित्रपटातील आशाभोसले समवेत रफीने प्राणसाठी गायिलेली "राज की बात कहदूं तो" ही लोकप्रिय कव्वाली. समोर बिंदू प्राणचे रहस्य उघडे करण्याची धमकी देत आहे. निरागस रेखा उभी आहे. रांगडा अजीतही तेथेच आहे आणि प्राणची धडपड ते रहस्य रहस्यच रहावे "राज को राज रहने दो" अशी आहे. ती शेरवानी, काठी, दाढी आणि टोपी प्राणला शोभुन दिसते. आणि त्या धमकीला भीक न घालणारा, उलट बिंदुलाच गाण्यात धमकवणार्‍या प्राणसाठी तो तीक्ष्ण आणि तिखट स्वर पुन्हा रफीशिवाय कोण देणार? येथेही रफी "नही पैदा हुवा कोई जो रोके मेरी राहों को" असे बुलंद आवाजात म्हणून जातो. आणि त्या भुमिकेत ते प्राणला चपखल दिसतेही. जेथे गरज आहे तेथे आवाजात विशिष्ट धार आणावी ती रफीनेच. या गाण्यात ती धार अनेक ठिकाणी जाणवते. रफी आणि प्राण असा संगम असलेले हे लोकप्रिय गाणे. रफीचा वेगळा पैलु दाखवणारे.

आधी सांगितल्याप्रमाणे रफीच्या आवाजाचे पैलु असंख्य आहेत. ते मोजता येणार नाहीत. आज रफीच्या पुण्यस्मरणानिमित्त माझ्यासारख्या जुन्या जगात रमणार्‍या माणसाला रफीची कमतरता बदलत्या काळागणिक आणखीनच जाणवते. नव्या चित्रपटांत फारसे मन रमत नाही. संगीतात तर नाहीच. अशावेळी रफीसाहेबांनी जो खजिना आमच्यासाठी ठेवला आहे त्याकडेच पाय वळतात. हा अक्षय खजिना आहे. कधीही न संपणारा. त्यातली हिरे माणकं वेचत राहायची. त्यांच्या एकेक छटा निरखत आनंद घ्यायचा. मात्र ही हिरेमाणकं वेचताना काय काय घेऊ असं होऊन जातं. अगदी "मन मोरा बावरा" अशी स्थिती होऊन जाते.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला लेख. वरील दिलेली चारही गाणी पाहिलीत .... खरंच अप्रतिम आहेत ....

" तुम मुझे युं भूला न पाओगे .....जब कभीभी सुनोगे गीत मेरे .....

संग संग तुम भी गुन गुनाओगे "

खरंच रफीसाहेब ..तुम्ही आमच्या मनात कायमचे अढळ स्थानी आहात _/\_

लेख मस्त आहे. काही माहिती नसलेल्या गाण्यांची ओळख झाली आणि काही माहिती असलेल्यांना परत ऐकता आले Happy

३१ जुलै आणि अतुल सरांचा रफी साहेबांबद्दल लेख हे आता एक समीकरण च बनलं आहे
एक आणि एकच, रफी !!!!
वेगळा लेख आणि छान माहिती,धन्यवाद.