पुळण - भाग १४ (अंतिम)

Submitted by मॅगी on 28 July, 2017 - 02:34

भाग १३

"समिपा, बाळा उठतेस ना? बरं वाटतंय का आता? उठ उठ.. हि बघ मात्रा उगाळून आणल्ये. पटकन चाटून टाक बघू आणि हा सोमेश्वराचा अंगारा पण लावतोय हं.. मग पटकन बरं वाटेल आमच्या सोनीला.." आबांचा आवाज तिच्या कानात घुमत होता.

"मी.. मी बरी आहे आबा. मला बाहेर जायचंय. मला समुद्रावर जायचंय. तिथे बघा, खिडकीत! शुभुताई मला हाक मारतेय. मला प्लीज जाऊद्या, प्लीज.." समिपा तोंडातल्या तोंडात बडबडत होती.

तिचा चेहरा सुकून गेला होता. डोळ्यांखाली मोठमोठी काळी वर्तुळे उमटली होती. एका हाताला सलाईन लावलेले होते. शुद्ध येत जात होती. तिच्या हॉस्पिटल बेडशेजारी आईबाबा एकमेकांचे हात घट्ट धरून उभे होते. नलिन हताश होऊन नखं खात तिच्या बेडसमोरच्या खुर्चीत बसला होता.

नर्सने येऊन एक प्रिस्क्रिप्शन सुनीलच्या हातात दिले. नलिन लगेच ते घेऊन औषधे आणायला खाली गेला.

नलीन बाहेर जाताच सुनील रेवतीला खुर्चीकडे घेऊन गेला. "रेवा, तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. आजवर मी हा विषय काढणे टाळतो आहे पण मला वाटतं हे मान्य न करून आपलंच नुकसान आहे."

रेवती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात होती. रात्रीपासून जागरण आणि रडून तिचे डोळे लालेलाल झाले होते. एक खुर्ची तिच्यासमोर ओढून बसत सुनीलने तिचे हात हातात घेतले. "आजवर आपलं समीच्या प्रॉब्लेमकडे खूप दुर्लक्ष झालं. त्या टेस्ट केल्यापासून माझ्या डोक्यात असं घोळतंय की तिला न्यूरॉलॉजिस्ट नाही तर सायकायाट्रीस्टची गरज आहे"

"सुनील!! काय म्हणतोयस तू हे! असं कसं होईल.. किती व्यवस्थित आहे ती.. कसं शक्य आहे असं काही.." रेवती तोंडावर हात दाबत म्हणाली.

"रेवा, तू आधी शांत हो प्लीज.. गेले कित्येक वर्ष, कित्येक महिने तू बघते आहेस तिला. नीट विचार कर. तुला नाही वाटत, तिला काही प्रॉब्लेम आहे असं? खरं सांग. तिला वारंवार चक्कर येणं, बेशुद्धी, धुंदीत असणं, काहीतरी बेताल बडबड, वेगवेगळे आवाज ऐकू येणं, स्वतःच स्वतःला जखमा करून घेणं हे सगळं नॉर्मल नाहीये. मी हे मिलिंदजवळही बोललो आणि त्यालाही पटतंय ते. रादर त्यानेच मला त्याच्या एका डॉक्टर मित्राचं कार्ड दिलंय. आपण समीला नेऊ त्याच्याकडे.." सुनीलच्याही डोळ्यात आता पाणी तरळत होतं. रेवतीने आवंढा गिळत त्याच्या हातावरील पकड घट्ट केली.

------------------------------------------------

समिपा हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर एक दिवस सुनीलने तिच्याशी बोलता बोलता ह्या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी आपण थोडं counseling घेऊया असा विषय काढला. बराच वेळ तीला समुपदेशनाची गरज का आहे हे पटवून दिल्यानंतर ती डॉक्टरांना भेटायला तयार झाली.

डॉ. विकासच्या क्लिनिकमध्ये सुनील एकटाच समिपाबरोबर आला होता. भिंतींचा उबदार निळसर पांढरा रंग, बांबूने विणलेले गडद निळ्या रंगाची गुबगुबीत कुशन्स असणारे दोन सोफा, कोपऱ्यात टेराकोटाच्या पॉटमध्ये ठेवलेले हिरवेगार पाम, लाकडी फ्लोअरिंग आणि हसऱ्या चेहऱ्याची रिसेप्शनिस्ट यांच्यामुळे आत आल्याआल्या मन शांत होत होते. तिने आत डॉक्टरांना रिंग केल्यावर डॉक्टर स्वतःच सौम्य हसत consulting room मधून बाहेर आले.

"समिपा! राईट? हाय! मी डॉक्टर विकास." म्हणत त्यानी हात पुढे केला. समिपाने हसून हॅलो म्हटल्यावर त्यांनी तिला आत जायला सांगितले. वळताना सुनीलकडे मान हलवून निर्धास्त रहा अशी खूण केली. सुनील थोडा आश्वस्त होऊन सोफ्यावर बसून समोर ठेवलेले नॅशनल जिओग्राफिक चाळू लागला.

साधारण पाऊण एक तासाने समिपा बाहेर आली. बोलून तिला बरंच हलकं वाटत होतं. "बाबा, आता तुला बोलावलंय" म्हणून तिने सुनीलला आत पाठवले.

खोलीत फक्त दोन तपकिरी रंगाचे फॅब्रिक सोफा आणि भिंतीवर दोन पिवळ्या रंगाच्या छटा असणारे ऍबस्ट्रॅक्ट कॅनव्हास लावले होते. लॅम्पशेडमधून सौम्य शुभ्र उजेड झिरपत होता.

या! म्हणून डॉक्टरांनी सुनीलला बसायला सांगितले. सुनील ज.. रा थरथरणारे हात एकमेकांत गुंफून, मागे सरकून टेकून बसला. "डॉक्टर, कसं झालं सेशन? व्यवस्थित उत्तरं दिली का तिने?"

सुनिलकडे बघून डॉक्टर जरा हसून म्हणाले, "रिलॅक्स सुनील! सेशन अगदी छान झालं. मला हवी ती बरीचशी माहिती मिळाली. मी समिपाच्या एकदोन टेस्ट ही केल्या." आता डॉक्टर थोडे गंभीर होऊन बोलू लागले.

"समिपाने सांगितलेल्या फॅमिली हिस्टरीनुसार तुमच्या आई त्यांच्या शेवटच्या दिवसात हिस्टेेरीक झाल्या किंवा डिप्रेशनमध्ये होत्या आणि त्यांच्या भावाला लहानपणापासून सायकोपॅथीक टेंडंसीज होत्या. बरोबर?"

"हो, खरे आहे. मी खूप लहान असतानाच आई गेली. पण तिला एक मोठा मानसिक धक्का बसल्यामुळे शेवटची काही वर्षे ती उन्मादात असल्यासारखी वागत होती. तिच्या भावाला तो विकार असू शकेल हे आम्हाला फक्त ऐकूनच माहिती आहे. सुनील म्हणाला.

"समिपाशी बोलल्यावर मला हे जाणवलं की ती लहानपणापासून बरीच एकटी पडली होती. तुम्हाला तिच्यासाठी वेळ नव्हता आणि ज्या सुट्ट्या तिने आजोबांबरोबर घालवल्या त्या तिच्या मनावर अजून कोरलेल्या आहेत. एकटेपणा घालवण्यासाठी तिने स्वतःच आपले एक विश्व बनवून त्यात ती गुंग झाली. पण तिच्या आधीच नाजूक असलेल्या मनावर मोठा आघात झाला तो म्हणजे तिने ऐकलेली सावण्याच्या पुळणीची गोष्ट! त्यावेळी ती खूपच लहान होती आणि गोष्ट तिच्या मेंदूला नीट प्रोसेस करता आली नाही." डॉक्टर बोलू लागले.

"त्यानंतर कधीही ती एकटी असेल, तेव्हा त्याच गोष्टीची कल्पना करत राही. तेव्हाच तिला हा सगळा त्रास सुरू झाला. अर्थात अश्या धक्क्यामुळे मानसिक आजार होत नाहीत, पण त्यामुळे ते उघडकीला नक्की येतात. समिपाला पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया आहे. ही एक मेंटल डिसऑर्डर आहे. यात पेशंटला सारखं आपल्यावर कोणीतरी नजर ठेवतंय, आपल्याला मारायला येतंय असे भास होतात. माणूस समाजापासून दूर दूर जाऊ लागतो. डोक्यात वेगवेगळे आवाज ऐकू येतात, माणूस कल्पनेच्या जगात वावरू लागतो आणि खऱ्या जगाशी त्यांचा संपर्क तुटतो. हि सगळी लक्षणे खूप गंभीर आहेत. वेळीच निदान झाल्यामुळे आपण योग्य औषधोपचार आणि समुपदेशन करून स्किझॉईड लक्षणे कंट्रोल करू शकतो पण पूर्णपणे घालवू शकत नाही. काही रेअर केसेस मध्ये पेशंट्स बरेही झाले आहेत "

सुनीलचे डोळे भरून आले. "डॉक्टर पण हे कशामुळे झालं असेल? आम्ही तिच्याकडे लक्ष देण्यात कमी पडलो हेच कारण आहे का?"

"नाही.. या गोष्टी आधीच असलेल्या मानसिक आजाराला पूरक ठरतात. जेनेटिक्स, मेंदूतल्या केमिकल बॅलन्समध्ये गडबड वगैरेमुळे ह्या डिसऑर्डर्स होतात. थँकफुली तुम्ही खूप उशीर नाही केला, अजून आपण तिला व्यवस्थित ट्रीट करू शकतो. तुम्ही आणि तिच्या आजूबाजूच्या सर्व लोकांनी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह रहाण्याची गरज आहे. बाकी सगळी काळजी माझ्यावर सोडा" डॉक्टरांच्या बोलण्याने सुनीलला जरा धीर आला.

डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन आणि औषधं घेऊन दोघे घरी निघाले. डॉक्टरांना भेटल्यापासून समिपाला खूप हलकं हलकं वाटत होतं.

-----------------------------------------------

समिपा जेऊन आराम करायला म्हणून तिच्या बेडवर येऊन पडली. बाहेर आभाळ भरून यायला लागले, खिडकीतून पानांची सळसळ तीव्र होत होती, एक कबुतर घाणेरडा आवाज करत फडफडत उडून गेले..

तितक्यात.. आकाश पुन्हा निरभ्र झाले आणि कोवळ्या उन्हाचे कवडसे तिच्या खिडकीत चमकू लागले.

संपूर्ण.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लिहिलीत कथा..... भाग सगळे पटापट आले..रोज मी मायबोली पाहत असे , पुळण चा पुढचा भाग वाचायला ... शेवट तर खूपच आवडला... . अभिनंदन....

उत्कंठा टिकवून ठेवणारी कथा होती,
कथा लेखनाची शैली आवडली,

रोगाचे निदान करून गोष्ट संपते, हा शेवट गुंडाळलेला वाटला,

चालू सिरीयल अचानक संपवायची वेळ आल्यावर जसे सगळी कथानके एक भागात लॉजिकल एन्ड ला नेतात, तसे वाटले.

हा भाग खुप पटकन संपवला अस वाटल. डॉक्टरांची ट्रिटमेंट थोडी अजून फुलवून सांगायला हवी होती.

सगळ्या वाचकांना आणि प्रतिसाद लिहून मला लिहीते ठेवणार्‍यांना धन्यवाद. प्रतिसाद वाचून खूप आनंद झाला.

शेवट गुंडाळलेला वाटत असेल तर सॉरी.. कंटाळले नाही पण लिहायला विचार करणे आणि वेळ काढणे खरंच कठीण आहे. इतकंसं लिहायला किती पेशन्स लागतो हे आता कळलंय, त्यामुळे सगळ्या कथालेखकांना _/\_

तिच्या आजाराची सगळी लक्षणं आधीच्या भागांमध्ये आलेली आहेत त्यामुळे त्याचा ऊहापोह टाळला. कथा लिहिण्याचा मुख्य हेतू माणसांच्या वागण्यामुळे अंधश्रद्धा कश्या मूळ धरतात हे दाखविणे आणि मानसिक आजारांबद्दल थोडी जनजागृती हा होता.

समीपाची ट्रीट्मेंट फुलवून लिहिली नाही कारण मी डॉक्टर नाही, काही चुकीचं लिहिलं तर अश्या सेंसिटिव्ह गोष्टीत काही चुकीचे समज होऊ शकतात.

कथा वाचल्याबद्दल पुन्हा सगळ्यांना खूप धन्यवाद.

या भागा पेक्षा आधिचे भाग जास्त आवडले.>>>>>>>> मलाही.
छान लिहिली आहे कथा. खरेतर रोज प्रत्येक भाग आवडीने वाचला आहे, पण प्रतिसाद आज देत आहे. मस्तच कथा. Happy

कंटाळले नाही पण लिहायला विचार करणे आणि वेळ काढणे खरंच कठीण आहे. इतकंसं लिहायला किती पेशन्स लागतो हे आता कळलंय, त्यामुळे सगळ्या कथालेखकांना _/\_>>>>> +११११११

कथा आवडली आणि शेवटही Happy

तितक्यात.. आकाश पुन्हा निरभ्र झाले आणि कोवळ्या उन्हाचे कवडसे तिच्या खिडकीत चमकू लागले.

= > खुप सुंदर आणि सूचक शेवट. समिपाला बरे होण्यासाठी योग्य दिशा मिळाली , इथे शेवट योग्य वाटला. पुढे काय होईल हे अध्यहृत आहे.

छान आहे कथा.
शेवट भुलभुलैया सिनेमाचा आहे.
आता भुत मग भुत अशी वाट बघताना मधेच डॉक्टर मानसिक आजारचं निदान करतो. Happy

सगळी मालिका वाचली सलग परत..
मस्तच लिहिलयस आत्मधून Wink (किती दिवसांनी म्हटल ना हिही)..
समीपाची ट्रीट्मेंट फुलवून लिहिली नाही कारण मी डॉक्टर नाही, काही चुकीचं लिहिलं तर अश्या सेंसिटिव्ह गोष्टीत काही चुकीचे समज होऊ शकतात.>>एकदम पटलं..