पुळण - भाग १०

Submitted by मॅगी on 23 July, 2017 - 23:31

भाग - ९

"टापांचा आवाज जवळ जवळ येऊ लागला आणि एक विचित्र हाकारा आसमंतात गुंजला. त्यासरशी केतकीच्या जंगलातून पंधरा वीस माणसे बाहेर आली आणि बैलांवर दगडांचा वर्षाव झाला. गाडीवान घाबरून थांबला. गाडीतली तिघंही घाबरून घामाघूम होऊन एकमेकांना चिकटून बसली होती." समिपा आता उठून भिंतीला टेकून बसली. तिने उशी पोटावर घट्ट आवळून धरली होती.

एव्हाना तो काळा पांढरा घोडा बैलगाडीला आडवा येऊन फुरफुरत थांबला. त्याच्यावरून उडी मारून एक बलदंड माणूस एका ढांगेत खाली उतरला. त्याने डोक्यावरून पांघरलेले घोंगडे तोंडावर लपेटले होते. त्यातून दिसणाऱ्या त्याच्या लालभडक डोळ्यात कमालीची जरब होती. एक मातकट झालेले धोतर आणि पायातल्या चामड्याच्या वहाणा सोडता बाकी तो उघडाच होता. त्याच्या दंड-पोटऱ्यांचे स्नायू टरटरुन फुगलेले दिसत होते. आश्चर्य म्हणजे तो खूप गोरा होता अगदी आपल्या सोनूएवढा!

जोरजोरात पुढे येऊन त्याने ताडकन गाडीवानाच्या कानाखाली वाजवली.. तो किंचाळत बाजूला पडल्यावर त्याचा मोर्चा गाडीच्या मागच्या बाजूला वळला. दोन्ही आज्या मान खाली घालुन रडत होत्या. दोघीनी मुद्दाम काहीच दागिने घातले नव्हते, जवळ रोकडही फार नव्हती. तुझ्या आजीने हळूच वर बघून त्याला सांगितले की "ही दोन बोचकी तेवढी आहेत, त्यातलं काय हवं ते तुम्ही घेऊ शकता"

तसं लगेच त्याने बोचकी धुंडाळली पण त्यात कपडे नी एकदोन खेळणी सोडून काहीच नव्हते. चिवडालाडूंचे डबे त्याने दुसऱ्या माणसाला काढून घ्यायला सांगितले. सोनं-नाणं न मिळाल्यामुळे तो इतका चिडला की त्याने लाथा घालून बैलगाडी जवळपास मोडून टाकली. शेवटी त्याने त्याचा मोठा पाजळलेला कोयता काढला आणि मारायला जवळ जवळ यायला लागला.

तेवढयात तुझी आजी उठून उभी राहिली आणि त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणाली, "मारू नको, मी थांबते इथे. ह्या लहान मुलाला घेऊन त्याच्या आईला घरी जाऊदे, ती सोनं घेऊन माणूस पाठवेल इथे! सोनं तू घे आणि मला सोडून दे."
समिपा आता रडवेली होऊन ऐकत होती.

"त्याचे हावरट डोळे चमकले. त्याने मान डोलवून त्याच्या माणसांना बाजूला घेतले. तुझी आजी खाली उतरली आणि गाडीवान मोडकी गाडी सुसाट पळवत नलुआजी आणि राघवकाकाला घेऊन गेला. एक अजब गोष्ट होती की त्याने आजीला स्पर्शही केला नव्हता आणि ती दिसल्यापासून एक शब्द बोलला नव्हता."

"आजीला घेऊन तो आणि त्याची माणसे परत आत जंगलात गेली. तो कोयत्याने केवड्याची काटेरी पानं खटखट तोडत पुढे जात होता. आत थोड्या मोकळ्या जागेत त्याने आजीला बसायला बोट दाखवले आणि स्वतः राखण करत बसला, बाकी टोळीला इशारा करून त्याने दुसरीकडे जायला सांगितले."

"काळोखी रात्र, खाली चिखल, काटेरी जंगल त्यात वरून पावसाचा मारा आणि तोंडाभोवती गुणगुणणारे डास यामुळे आजी अंगाखांद्यावर पदर गुंडाळून गाठोडं होऊन रात्रभर बसली होती. संतापाने तिच्या जीवाची काहिली होत होती.
इतक्या माणसांचा जीव घेणाऱ्या, बायकांना त्रास देणाऱ्या ह्या लुटारू सैतानाला संपवायचेच असे तिच्या मनाने घेतले होते."

"रात्र चढत गेली तसा तो झोप आणि दारूच्या अंमलाने अंगातोंडावर घोंगडी लपेटलेल्या अवस्थेतच बाजूला चिखलात कलंडला. आजीचे डोळे चमकले. ती तशीच हळूहळू सरकत त्याच्या जवळ पोचली. आजूबाजूला दारूचा आणि कुजलेल्या पानांचा भयाण वास येत होता. राग आणि संतापाने आजीच्या अंगात कुठून बळ आलं माहीत नाही, तिने उभी राहून बाजूला पडलेला एक मोठा धोंडा उचलला आणि जोराने त्याच्या डोक्यात घातला.."

समीच्या तोंडून अस्फुट किंचाळी निघाली तशी लगेच शुभुने तोंडावर हात ठेवून तिला गप्प केलं.

"तो बहुतेक लगेच मेला, पावसाच्या झडीमुळे त्याचा आवाजपण गेला नाही कुणाला. पण यामुळे त्याच्या तोंडावरून घोंगडी सरकली आणि रक्ताळलेला चेहरा आजीला दिसला. तत्क्षणी तीने तोंड वळवून भडाभडा उलटी केली.."

शुभु एवढं बोलून पाणी प्यायला उठली, तांब्या-भांडं घेऊन आत आली तोच तिला भयंकर घाबरून कोपऱ्यात भिंतीला चिकटून थरथरणारी समिपा दिसली. तिच्या जवळ जाऊन, पाणी प्यायला देऊन शुभु म्हणाली, "एवढी काय घाबरतेस, सांगू की नको पुढे?" समिपाने हळूच हो म्हणून मान हलवल्यावर तिने पुढे सांगायला सुरुवात केली..

"तर.. तुझ्या एवढ्या स्ट्रॉंग आजीला इतकी किळस का आली माहितेय? तो तिचा सख्खा भाऊ होता! हो तोच तो श्रावण!!"
क्काय??? समिपा किंचाळलीच, तीला प्रचंड धक्का बसला होता.. शूsss शुभुने तोंडावर बोट ठेवत तिला गप्प केलं.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

aavdli..chaan chalu aahe...ekda sagle bhag parat vachayla havet...yei dya pudhche bhag..:)