आत्ता चोर आला होता!

Submitted by मोहना on 16 July, 2017 - 23:57

खरंच! म्हणजे झालं काय की तसा तो यावा असं मला बरेच दिवस वाटत होतं. मध्ये एकदा शेजारी येऊन गेला तेव्हापासून. काय तो तेव्हा गहजब, प्रसिद्धी आणि गोंधळ. फारच आवडलं होतं बाई मला. शेजारीण तर हिंदी सिनेमातल्या नटीसारखी हवेत तरंगत होती काही दिवस. मलाही तिच्यासारखाच तरंगण्याचा अनुभव घ्यावासा वाटायला लागला. पोहायला गेलं तर मला तरंगताच येत नाही निदान असं तरी. तर झालं ते असं. चोराला दाराची उघडी फट दिसली. घर इतकं शांत दिसत होतं की घरात कुणी असेल असं त्याला वाटलंच नाही. शेजारणीला वाटलं, आला वाटतं नवरा. दोघं एकमेकांसमोरच आले. शेजारीण किंचाळली तशी तोही जोरात ओरडला. चोर आणि शेजारीण दोघं एकमेकांना प्रचंड घाबरले होते. तरीही त्या अवस्थेतच डोंट बी स्केअर्ड असा दोघांनीही एकमेकांना धीर दिला आणि मगच पळत सुटले. चोर ज्या दारातून आला त्याच दारातून पळाला. शेजारणीला आपल्याच घराची दारं कुठे आहेत ते आठवेनात. त्यामुळे ती आधी घरातल्याघरातच इकडे तिकडे पळाली आणि एका दारातून निसटून माझ्या घरात पोचली. तिचं घाबरणं पूर्ण झाल्यावर मी घाबरत घाबरत ९११ ला फोन लावला. असा फोन मी पहिल्यांदाच लावत होते त्यामुळे आता मी घाबरले. एकाचवेळी दोन वेगवेगळ्या कहाण्या आम्ही सांगितल्या. तिने चोराचं वर्णन केलं. मी शेजारीण माझ्याकडे कशी धावत आली त्याचं. पोलिसांच्या गाड्या आल्याच लगेच.
"मुखवटा घातला होता त्याने." ती पोलिसांना सांगायला लागली.
"बंदूकही होती हातात." ऐकलं आणि मी समोरच कुणीतरी बंदूक रोखल्यागत चित्कार काढला. तर पोलिसाने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. तो पाहताच बाल्या.... असं काय काय झालं काळजात त्या कटाक्षाने. पण प्रसंग काळजाचा नव्हता त्यामुळे ते खलास न करता मी बंदूकीवर लक्ष केंद्रित केलं. तो पोलिस खूपच खोदून खोदून विचारायला लागल्यावर शेजारणीचं मानसिक संतुलन पुढे मागे झालं. म्हणजे तिला वाटायला लागलं की त्याने डोंट बी स्केअर्ड म्हणण्यासाठी बोट उगारलं ते तिला बंदुकीसारखं वाटलं. एकूणच तिच्या चोराचं वर्णन तिने टी.व्ही., चित्रपटातून पाहिलेल्या चोराचं होतं. कारण नंतर ती म्हणाली,
"आत्ता समोर आणलात तरी ओळखीन मी त्याला." पोलिस म्हणाला,
"अहो, मुखवटा घातला होता म्हणालात ना? मग कसं ओळखाल?" हे असं तिचं उलटसुलट चालू असताना तेवढ्यातल्या तेवढ्यात मी फेसबुकवर लाइव्ह गेले, एकीकडे आमच्या कायप्पा कट्ट्यावर टाकून दिलं काय चाललंय ते. काय मजा नं! कायप्पावर सगळ्या शेजारणीच. एकमेकींच्या घरावर कायम नजर ठेवणार्‍या. कायप्पा कट्टा त्या दिवशी तर गाजलाच पण नंतरही काही दिवस गाजत राहिला. कारण अर्धवट टाकलेली चोरी करायला चोर परत येईलच अशी प्रत्येकीची खात्री होती. त्यामुळे येईल, जाईल तो चोर असंच वाटत होतं प्रत्येकीला. तसे संदेश सारखे जायचे. सगळे सावध व्हायचे. आला, आला, आला असं वाटायचं पण स्वप्न धुळीलाच मिळायचं एकदम. अगदी गाढ नैराश्यात जाणार मी असं वाटायला लागलं आणि अखेर आला तो!

झालं काय मी मुलाशी फोनवर बोलत होते. नाटकाच्या नेपथ्याचं काम गॅरेजमध्ये चालू आहे म्हणून सायकली घराच्या पुढच्या व्हरांड्यात ठेवल्या आहेत. सोफ्यावर बसलं की व्हरांडा खिडकीतून दिसतो तसंच रस्ताही. कुणीतरी आमच्या घराच्या दिशेने वळलं. चोर की काय म्हणून मी बारीक नजरेने बघत होते. फेसबुक, कायप्पाला तयारीत ठेवलं. पण पाहुणा येतो तसा एक तरुण मुलगा घराच्या दिशेने यायला लागला. चोर असा येत नाही त्यामुळे त्या मुलाने दार वाजवलं की उघडायचं असा मी विचार मनात येतोय तेवढ्यात तो सरळ सायकलींच्या दिशेने गेला. आमच्या तीन सायकली तो हात लावून पाहत होता. मी फोनवर मुलाला कुजबूजत्या आवाजात म्हटलं,
"थांब, थांब कुणीतरी सायकल चोरतंय." मुलाला नीट ऐकू जाईना. पण सायकली जायच्या आधी दार उघडणं भाग होतं. तो मुलगा पटकन वळला.
"काय करतोयस?" मी ओरडून विचारलं.
"काही नाही." हे म्हणजे कुठल्याही प्रश्नाला माझी मुलं उत्तर देतात तसं वाटलं मला. शाळेत काय शिकवलं? ’काही नाही’ पद्धतीचं.
"काही नाही कसं? सायकलींना का हात लावून पाहतो आहेस?"
"माझी सायकल कुठली ते बघत होतो."
"तुझी? हे घर तुझं नाही." स्वत:च्या घरी स्वत:ची सायकल तत्वावर मी म्हटलं.
"माझी सायकल इथे असण्यासाठी घर पण माझंच कशाला असायला हवं?" त्याचा प्रश्न विचार करण्यासारखा होता. ही हल्लीची तरुण पिढी फारच हुशार अशा नजरेने मी त्याच्याकडे पाहणार तेवढ्यात तो म्हणाला.
"माझी सायकल चोरीला गेली आहे. यातली कुठली माझी आहे ते पाहत होतो."
"या आमच्या सायकली आहेत."
"तुम्ही चोर आहात असं नाही म्हणत मी." वा, वा चोराच्या उलट्या बोंबा का रे या तुझ्या गधड्या. काही केल्या हे इंग्रजीत कसं म्हणायचं ते समजेना. चोर मराठी असता ना तर घातल्या असत्या तंगड्या....असे काय काय विचार तरळून गेले मनात. ते गिळत म्हटलं,
"सायकल तुझी नाही ना याची खात्री करायची होती तर तुला दार वाजवायला काय झालं?"
"चुकलं माझं." तो माझ्याकडे बेरक्या नजरेने (म्हणजे आता मला त्याची नजर तशी वाटायला लागली) पाहत तसाच उभा राहिला.
"बघतोयस काय गुरकावल्यासारखा. निघ इथून." मराठी - इंग्रजी भेळ त्याला कितपत समजली कुणास ठाऊक. पण केसाची झुलपं उडवत तो तरुण मुलगा आला तसा निघून गेला.

आमचं हे संभाषण चालू असताना पुत्ररत्न फोन तसाच धरुन होते. चोर गेल्यावर थरथरत्या स्वरात मी ’हॅलो’ म्हटलं. म्हणजे आताच एका चोराला मी पळवून लावलं होतं. हातापायाला कंप सुटलेला. पण खूश होते. चोर कसा पळाला मला घाबरुन म्हणून.
"अगं आई, तो चोर बाहेर होता तेव्हा तू माझ्याशी का कुजबूजत बोलत होतीस?"
"त्याला ऐकू गेलं असतं ना?" मी कुजबूजले. अजून चोरातच गुंतले होते.
"त्याला कळायलाच हवं होतं ना घरात कुणीतरी आहे. तो गेला ना? बोल मोठ्याने आता." मुलगा खिजवल्यासारखा म्हणाला.
"बरं, बरं...अरे तुझ्याएवढा आहे. त्याची सायकल हरवली म्हणत होता." मला जरा त्या चोराचा कळवळा यायला लागला होता.
"माझ्या वयाचा आहे तर कॉलेज किंवा कामावर का नाही तो?"
"तू मलाच काय बडबडतोस? मी नाही विचारलं त्याला." माझी चिडचीड जाणवून त्याने समजूतीने घेतलं.
"असं दार कसं उघडलंस? आणि उघडलंस तर उघडलंस. हवापाण्याच्या गप्पा मारल्यासारखं बोलत होतीस. पोलिसांना फोन करते सांगायचं ना त्याला."
"आता गेला तो. थांब, दिसतोय अजून जाताना. परत हाक मारुन सांगू का?"
"आई..."
"मग? कोणत्याही बर्‍यावाईट प्रसंगाला तुम्ही उपस्थित नसता. तू असा फोनवरुन भाषण देणार. तुझा बाबा समोर उभं राहून. सतराशेसाठ सूचना तुमच्या. "
तेवढ्यात वरती नवर्‍याला काहीतरी गडबड झाली असावी याचा अंदाज आला असावा. थोडंफार संभाषणही ऐकलं असावं त्याने. तो धाडधाड खाली आला.
"तुला फोडणीला टाकल्यासारखा मी लागतोच का? जिथे तिथे माझं नाव घुसडवतेस. आणि फोटो काढायचास ना त्याचा. पोलिसाना देता आला असता लगेच. लक्ष ठेवतात मग ते."
"सुचलं नाही. घाबरले होते. पण थांबा तुम्ही दोघं. तू फोनवर थांब तसाच. आणि तू तिथेच जिन्यावर राहा." एकाला समोर आणि एकाला फोनवर बजावलं. दोघंही स्तब्ध झाले.
"काय करायचा बेत आहे तुझा?" बापलेकाने एकाचवेळी तोच प्रश्न विचारला.
"मी धावत जातेय त्या मुलाच्या मागून. त्याला पुन्हा चोरी करायला बोलावते. मग एकाने पोलिसांना फोन करा, दुसर्‍याने फोटो काढा..."

तो मुलगा कुठे पोचलाय ते पाहायला जायचं की शेजारणीच्या घरात धावत जाऊन पोलिसांना फोन करायचा, कायप्पा जागवायचा या पेचात मी तशीच उभी राहिले. फेसबुक लाइव्ह तर विसरलेच होते मी या धांदलीत. पण जाऊ दे आता सगळंच. निदान चोर तर येऊन गेला. सराव झाला थोडासा. पुढच्यावेळेस उरलेलं जमवू! काय खरं ना?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट Lol

आणि किती वेगवान लिहिलय
जणु सगळं समोरच घड़तय/पाहतोय

"तुला फोडणीला टाकल्यासारखा मी लागतोच का? जिथे तिथे माझं नाव घुसडवतेस" >>>> पोट धरून हसले, ऑफिस मध्ये आहे हे विसरून. अगदी कहानी घर घर की.
पण मस्त लिहल आहे तुम्ही.

Rofl खुप हसले. काही प्रसंगी तर अगदी मोठ्याने.
काही नाही." हे म्हणजे कुठल्याही प्रश्नाला माझी मुलं उत्तर देतात तसं वाटलं मला. शाळेत काय शिकवलं? ’काही नाही’ पद्धतीचं.>> इथे तर रीलेट होऊन फुटलेच Lol

खूप मस्त लिहिलंय...

("मग? कोणत्याही बर्‍यावाईट प्रसंगाला तुम्ही उपस्थित नसता. तू असा फोनवरुन भाषण देणार. तुझा बाबा समोर उभं राहून. सतराशेसाठ सूचना तुमच्या. ") .... भन्नाट

खूप मस्त लिहिलंय.
हे पंचेस एकदम भारी
म्हणजे झालं काय की तसा तो यावा असं मला बरेच दिवस वाटत होतं. मध्ये एकदा शेजारी येऊन गेला तेव्हापासून
तरीही त्या अवस्थेतच डोंट बी स्केअर्ड असा दोघांनीही एकमेकांना धीर दिला आणि मगच पळत सुटले.
"त्याला ऐकू गेलं असतं ना?" मी कुजबूजले.
तुला फोडणीला टाकल्यासारखा मी लागतोच का?

प्रत्येकाचे मनापासून आभार.

कऊ - हो. पण ब्लॉगवर शेजारणीचा भाग नाही. म्हणजे काय झालं शेजारणीकडे आलेल्या चोरावर वेगळाच लेख लिहिला हल्लीच. तो फेसबुकवर टाकला पण असं वाटलं की शेजारीण अर्धवट उचलावी त्यातली आणि माझ्या घरात टाकावी :-). तर त्यामुळे हा चोर म्हणजे, दोन वेगवेगळ्या लेखातून कापाकापी करुन तयार झालेला नवीन चोर आहे!

धमाल.
चोराला परत बोलवायची आयडिया भारी.

Pages