एका कल्पनेचा वनवास

Submitted by डॉ अशोक on 5 July, 2017 - 02:07

एका कल्पनेचा वनवास

व्हॉट्स ऍप वर आमचा मेडीकलच्या सहाध्यायांचा ग्रूप आहे. अकोल्याच्या डॉ. अलका तामणेनं तिथं सुरेश भटांची एक कविता पोस्ट केली. ती कविता अशी:

माझिया कवितेत वेडे
दु:ख संतांचे भिनावे;
वाळल्या वेलीस माझ्या
अमृताचे फूल यावे.
आशयाच्या अंबरांनी
*
टंच माझा शब्द व्हावा;
कोरडा माझा उमाळा
रोज माधुर्यात न्हावा
*
पूर्ण कविता देत नाही कारण भटांच्या "रंग माझा वेगळा" या संग्रहात ती आहे. जिद्न्यासूंनी ती मूळातून वाचावी. आपल्या पूर्वसूरींचं ऋण मान्य करून त्याच्या प्रतिभेचा अंश का होईना आपल्या कवितेत यावा अशी प्रार्थना असलेली "एव्हडे दे पांडुरंगा" ह्या शीर्षकाची ती कविता. अलकाचं एक वैशिष्ठ्य म्हणजे ती नुसती तिला आवडलेली कविता पोष्ट करून थांबत नाही, तर ती कविता आपल्याला कां भावली ते ती समर्पक शब्दात मांडते सुद्द्धा. ती म्ह्णते: "दान तर उदात्त असतेच, पण ’मागणे’ देखिल किती उदात्त असू शकते!"
कविता आणि अलकाचं मनोगत वाचून माझं मन भूतकाळात गेलं. १९७९-१९८९ दहा वर्षं मी नोकरी निमित्त पैठणला होतो. तेंव्हा एक छंद म्हणून साहित्यिकांच्या हस्ताक्षरांचा संग्रह करायला सुरुवात केली. साहित्यिकांचे पत्ते मिळवायचे आणि त्यांना पत्र पाठवून विनंती करायची की त्यांनी सोबत पाठवलेल्या कार्डावर त्यांची एखादी कविता किंवा कथेतला उतारा इत्यादी लिहून स्वाक्षरी करून पाठवावा. त्यासाठी मी स्वत:चा पत्ता लिहिलेलं व त्यावर आवश्यक तितकी तिकिटं चिकटवून पाठवत असे. बहूतेक साहित्यिकांनी त्वरीत प्रतिसाद दिला. आता माझ्याकडे अनेक साहित्यिकांच्या कविता इत्यादी साहित्य त्यांच्या हस्ताक्षरात त्यांच्या सहीसह आहे. माझा अमूल्य असा ठेवाच आहे तो! ह्याच उपक्रमात सुरेश भटांनी त्यांच्या वर डॉ अलकानं पाठवलेल्या आणि उल्लेखलेल्या कवितेतलं एक कडवं लिहून पाठवलेलं मला आठवलं. ते साल १९८०-८१. त्याचं छायाचित्र चित्र मी इथं दिलंय.
सुरेश भट.jpg

भटांचा "रंग माझा वेगळा" हा संग्रह मी (विकत घेऊन) वाचला. आपण लिहितो त्यामागच्या प्रेरणा, आपल्या पूर्वसूरींचं ऋण मान्य करून त्यातला काही अंश तरी आपल्या साहित्यात उतरावा म्हणून मनोभावे केलेली ही प्रार्थना मला खूपच भावली. पायात एखादा कांटा रुतून बसावा आणि तो निघूच नये तशी ही कविता आणि त्यातली मध्यवर्ती कल्पना मनात रुतून बसली.
याच सुमारास मी कविता लिहायला सुरुवात केली. "स्पंदन" आणि "तुझी आठवण" हे दोन कविता संग्रह प्रसिद्ध झाले. ही कल्पना मधूनच उसळी मारून वर यायची, पण तिला मनाजोगता आकार काही येत नव्हता. वर्षामागून वर्षे गेली, मी सेवानिवृत्त झालो आणि सेवानिवृत्ती नंतरच्या सेवेसाठी पुण्यात असतांना जून २०१३ मधे खाली दिलेली ही कविता झाली.

पाच प्रार्थना

झूळूक यावी सहज तैसे गदिमांचे
हरवून जावे प्रेमात तैसे मंगेशाचे
.........शब्द माझ्या कवितेत यावे!
*
कोसळावा जणू प्रपात तैसे भटांचे
आगीत आग तैसे कुसुमाग्रजांचे
.........शब्द माझ्या कवितेत यावे!
*
प्रासादिक द्न्यानेशांचे, नेमके ते तुकयाचे
मातेचेच जणू तैसे बहिणाईचे
.........शब्द माझ्या कवितेत यावे!
*
वेढते गूढ तैसे माणिकाचे
चमकावी वीज तैसे स्वातंत्र्यवीरांचे
.........शब्द माझ्या कवितेत यावे!
*
राहू दे ईश्वरा, पाच या प्रार्थनांचे
माझे म्हणावे ऐसे रसिक जनांचे
.........शब्द माझ्या कवितेत यावे!
*
दोन्ही कवितेल्या मध्यवर्ती कल्पनेतलं साम्य कुणाच्याही नजरेत यावं इतकं ठळक आहे. अर्थात भटांची प्रतिभा, शब्दसामर्थ्य माझ्याकडे नाही हे उघड आहे आणि ते थोडं तरी माझ्याकडे यावं अशी मी कवितेतून ईश्वराला प्रार्थना केली आहे. मला सांगायचं ते इतकंच की एक कल्पना ३०-३२ वर्षं माझ्या मनात रुतून बसली. तिनं मला वेळोवेळी अस्वस्थ केलं. वेळ आली तेंव्हा आणि तेंव्हाच त्या कल्पनेला शब्दरूप प्राप्त झालं आणि कवितेच्या रुपात ती बाहेर पडली. एका कल्पनेचा ३०-३२ वर्षांचा वनवास अशा रितीनं संपला! आमची दुसरी एक सहाध्यायी डॉ लता बिचिले म्हणते: "मी याला वनवास नाही म्ह्णणार, तर उपासनेचं मूर्त स्वरूप म्ह्णेन!" वनवास असो की उपासनेचं मूर्त स्वरूप.... मधला प्रवास ३०-३२ वर्षांचा होता हे नक्की!
-डॉ. अशोक कुलकर्णी
(औरंगाबाद- ५ जुलै, २०१७)

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर लेख! सुंदर कविता!!!

"मी याला वनवास नाही म्हणणार, तर उपासनेचं मूर्त स्वरूप म्हणेन" हे तुमच्या सहाध्याईंचा विचार पटला.