निचरा

Submitted by सई. on 22 June, 2017 - 03:04

एका सुंदर कार्यक्रमाहून परतत होते. गवयाचा गळा तापतो तशी माझीमाझीच मनाची मैफलही रंगली होती. त्याच तंद्रीत सिग्नलला उभी असताना अचानक एक अगदी टिपेचा चिरका स्वर कानावर पडला. थांबलेले सगळेच चमकून पलिकडच्या फुटपाथकडंं बघायला लागले आणि तिथंच खिळले. मीही रेंगाळलेच क्षणभरासाठी, खोटं का बोला, पण नशिबानं झटकन भानावर येऊन मान वळवली.

मध्यमवयीन, शेलाटी, जीन्समधले लांब पाय, हल्ली स्टायलीश रुपेरी छटा वागवतात तशी पोनी वगैरे. माझ्या उडत्या दृष्टीक्षेपातलं हे चित्र. उद्रेक झाला होता तिचा. जो कुणी सोबत होता त्याच्यावर. मोठ्या आचेवरच्या दुधासारखी ती भसाभसा नुसती उतू जात होती. कुण्याकाळापासूनचं किती काय काय साचवलेलं, दडपलेलं आज काळवेळ ठिकाणाचा मुलाहिजा न राखता सैरावैरा झालं होतं बहुतेक. कशाकशाचंही भान नव्हतं तिला. डोळ्यांच्या घळघळण्याचं, बेंबीच्या देठापर्यंत पोचलेल्या आवाजाचं, तिची रथसप्तमी आयती पहाणा-या समोरच्या गर्दीचं, त्या सोबत्याचं, स्वत:चं. उलट्या जशा थोपवता येत नाहीत तसं त्या वेळी फक्त आतलं साठवण्याच्या कक्षेबाहेर पोचलेलं बाहेर फेकलं जात होतं. हा सगळा निव्वळ ९०-१२० सेकंदांचा खेळ. मला ऐकू आलेला, काहींनी हौसेनं बघितलेला.

मला हिरवा कंदिल मिळाल्यावर मी निघाले, पुढे तिचं काय झालं असेल माहिती नाही. कारण काही असेल, घरात काही बिनसलं असेल, दोघातला बेबनाव असेल, तिस-याच कुणाचा तरी उद्वेग ह्याच्यासमोर उफाळला असेल, तब्येतीची काही तक्रार असेल, अपयश असेल, तिची स्वत:ची काही चूक असेल, जे काही होतं ते अत्यंत तीव्र होतं एवढं खरं. पण तिथून निघाल्यावर उगीचच मला वाटलं की त्या आवेगाच्या क्षणी तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावर थोपटायला हवं आपण. तिच्या तिच्या काय त्या जखमा आणि आता त्यावर मीठ चोळल्यासारख्या ह्या अनोळखी नजरांच्याही जखमा. अर्थात पूर्णपणे खाजगी बाब चव्हाट्यावरच उघड झाल्यावर हे अटळ आहे. आच कमी झाली की उतू जाणं आपसूक खाली बसेल, पण ही चव्हाट्यावरची जखम खात राहील तिला. मनात असो, नसो, संयमाबरोबर काळवेळ आणि ठिकाण हे अहिमही बाळगावेच लागतात, नाहीतर रांगोळी फिसकटलीच समजायची. मुद्दा तोही आहे आणि,

मुद्दा हाही आहे की त्या अनोळखीसारखे काही चेहरे मला माझ्याभोवतीसुद्धा दिसतात. मित्र, मैत्रिणींमधे. असं वाटतं की त्यांनी खूप दडपलंय आत काहीतरी, तो कोंडलेल्या वाफेचा दाब चेह-यावर, सगळ्या वागण्यावावरण्यावर कंदिलावरच्या काजळीसारखा स्पष्ट जाणवतोय. त्यांनाही जवळ घ्यायला हवंय, पाठीवर हात फिरवायला हवाय. जवळ घेणं सोडा, नुसतं अलगद बोट टेकवलं तरी पिकलेलं गळू फुटल्यासारखे ते भळभळ वाहतील आणि सगळी साचलेली ठणक काही क्षणात विरून जाईल, ते मोकळे, निरभ्र होतील, खळखळून साजरं हसतील. आनंदानं हरखतील, दु:खानं रडवेले होतील. स्वत:च्या आणि इतरांच्याही. खरेखुरे. वेळच्या वेळी.

पण जर असं काही केलं तर हल्ली व्यक्तीवाद, स्पेसेसबिसेस देण्याच्या जमान्यात हे फारच अतिक्रमण होईल, त्यामुळं मनात लाख वाटलं तरी तसं करता येत नाही प्रत्यक्षात. दिसतंय ते तसं नाही हे दिसत असूनही ते तसंच आहे असं बजावून बघावं लागतं. पण हीसुद्धा मैत्रीच. असतात काही गोष्टी निशिद्ध. असो, त्या अनोळखीचे प्रश्न काय असतील ते असतील, पण सध्या तरी ती रिती होऊन हलकीफुलकी नक्की झाली असेल एवढं खरं. त्यापायी माझे मात्र हे शब्दांचे फुकाचेच बुडबुडे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सई, कालच तुझ्या या लेखाची आठवण झाली. (इथे वाद्/भांडण नव्हते.)
मी घरी जात असताना, स्टॉपवर एक मुलगी, हातात मोबाईल होता आणि त्यात बघत बघत रडत होती. काय झालं कळलं नाही. स्टॉपवरची लोकंही तिच्याकडे बघत होती. एकदा वाटलं तिला जाऊन विचारावं, "काय झाल? ". परत विचार केला,
ती म्हणायची "तुम्हाला काय करायच आहे?" . मग न विचारताच गेले बाई घरी.

खुपच मस्त लिहीलयस सई, . मलापण पुर्वी घडलेला एक ट्रेन मधला प्रसन्ग आठवला, एक मुलगी ( नुकतच लग्न झालेली असावी ) मोबाईल वर बोलताना एवढी हमसुनहमसुन रडत होती , मला वाट्लं कि तिच्या पाठीवरुन हात फिरवावा, बेंगॉली होती बहुतेक.
मी फक्त पाणी विचारलं तिला. अजुन काही बोलायचा धीर नाही झाला.

Pages