प्राणी

Submitted by मोहना on 23 June, 2017 - 09:09

मी स्वयंपाकघरात सभा बोलावली. आधी शुकशुकाटच होता. पण भाषणाचा आवाज नरसाळ्यातून येतो तसा यायला लागल्यावर इथे बसायचं तर तिथे असा विचार झाला असावा. बरीच गर्दी जमली. ३ माणसं आकाश कोसळल्यासारखा चेहरा करुन समोर उभी राहिली. मी जाहिर केलं.
"मी गाय पाळणार आहे." सर्वांनी टाळ्या वाजवल्या. सभेतले २ सदस्य नेहमीप्रमाणे तोंडात मीठाची गुळणी धरुन होते. स्त्री सदस्य फारच आगाऊ होती. ती अगदी पटकन माझ्यासारखंच म्हणाली,
"घरातले प्राणी कमी पडतायत वाटतं. हे कसलं अचाट खूळ?" ती माझा वारसा चालवते त्यामुळे ’आगाऊ’ न म्हणता तिच्या उर्मटपणाचं मी कौतुक केलं."
"नशीब, तुला तरी कळलं मानव प्राण्याला सांभाळणं किती कठीण आहे."
"मग आता तू गाय नावाच्या प्राण्याला का पाळणार आहेस? आधी आम्हाला नीट पाळ." परत आगाऊ स्त्री सदस्य.
"पण आम्हाला पाळायला तुला कुणी सांगितलं?" कनिष्ठ सदस्य रुसक्या स्वरात म्हणाला.
"आता आणलं घरात तर पाळायलाच हवं ना?" मारक्या म्हशीसारखं मी ’वाक्य’ उगारलं. वरिष्ठ सदस्य नेहमीप्रमाणे शांततेचं धोरण स्वीकारत विचारता झाला,
"पण तुला आता गाय का पाळायची आहे? दूध असतं की घरात." खरंतर ते सगळे दुधावरच जगतात. म्हणजे खायला काही नाही, खायला काही नाही, या घरात काही नसंतच असं पुटपुटत फ्रिज उघडतात. तिथे फक्त दुध असतं. बूच उघडून तोंडात धार धरली की झालं. आता गाईच्या आचळाखाली कसं तोंड लावणार? इतकं सहजसाध्य, सकस अन्न नाहिसं होणार हे लक्षात आल्यावर सभेतून प्रश्न यायला लागले.
"गाय का पाळायची? तिचं दुध कोण काढणार? आम्ही उपाशी मरायला लागलो की दुध पितो. तिने तू काही करत नाहीस तसंच दूध न देण्याचं धोरण स्वीकारलं तर आम्ही काय करायचं?" इतक्या प्रश्नांना मी एका वाक्यात उत्तर देऊन धुळीला मिळवलं.
"विकतच्या गायीच्या दुधात माशाचं तेल मिसळतात असं कळलंय नुकतंच." सभेतून वेगवेगळे चित्कार उमटले.
"पण म्हणून इतकं टोक गाठायचं?" आगाऊ स्त्री सदस्य म्हणाली.
"मग? एक दिवस दूध बाजूलाच, नुसतंच माशाचं तेल प्यायला लागाल." मला गाय पाळण्याच्या बेतावर आता पाणी पडू द्यायचं नव्हतं.
"पण दूध काढणार कोण गाईचं?" वरिष्ठाने कालच कोंबडी मारली होती. आता रोज दूध काढायच्या कल्पनेने त्याच्या अंगावर काटा आला.
"ते बघू नंतर." कधी नव्हे तो वर आलेला आवाज दाबून टाकला मी.

तेवढ्यात मागच्या अंगणातून खिडकीतून कुणीतरी डोकावलं. सर्व सदस्याच्या माना तिकडे वळल्या.
"कोंबडा - कोंबडी ऐकतायत." वरिष्ठ म्हणाला.
"आईच्या भाषणाला तिने पाळलेली सगळी येतात." कनिष्ठ कौतुकाने माझ्याकडे बघून म्हणाला. तेवढ्यात घोड्याने दारातून आत पाहिलं. आगाऊ सदस्य फुत्कारली.
"हा अन्याय आहे आमच्यासारख्या पाळीव प्राण्यांवर."
"काय गं ए ठके. अन्याय कसला? आम्ही आया मुलांना सकस अन्न मिळावं म्हणून रक्त आटवतो आणि तुमच्या जीभा नुसत्या वळवळतात सापासारख्या." मी भाषण ठोकतेय हे विसरले. पण ती सभेलाच आली होती. ती ओरडली.
"नीट करा भाषण. अंडी फेकू का?" सभेतल्या समस्त २ जणांनी टाळ्या वाजवल्या.
"कोंबड्या पिंजर्‍यात ठेवतात त्यामुळे त्यांची अंडी, मांस सकस नसतं. म्हणून आपण कोंबड्या पाळतो." मी मृदू आवाजात म्हटलं.
"गाड्या वेळेवर येत नाहीत म्हणून घोडा." आता सभेला तोंड फुटलं.
"हरिण आणि ससे आपलेआपणच या प्राण्यांना भेटायला येतात."
"आणि सतत आपण त्या सर्व प्राण्यांपेक्षा ’सरस’ आहोत हे सिद्ध करत राहावं लागतं. नाहीतर तुमच्यापेक्षा हे प्राणी बरे असं ऐकवतेस तू." आता सभेतलं नक्की कोण बोललं ते समजेनासं झालं होतं. ’सभे’ चा तोल ढळलाच. वैयक्तिक उखाळ्यापाखाळ्य़ांना ऊत यायला लागला. आता सभेत गोंधळ माजणार अशी चिन्ह दिसायला लागली. बाहेरचे प्राणीही पाय हलवून गोंधळ बघायला मिळाला म्हणून नाचत होते. त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला मी सभेतल्या ३ जणांना दार उघडून पाठवून दिलं.

तिघंही सभेतून सुटल्याच्या आनंदात घोडा, कोंबडी, हरिण, ससा या प्राण्यांमध्ये रमले. तेवढ्यात जोरात चित्कार ऐकू आला. मी माझं तोंड काचेला लावलं होतं ते दचकून बाजूला झालं. कोणत्या प्राण्याने कुठल्या प्राण्याला काय केलं ते पाहायला मी दार उघडून बाहेर धावले. सगळ्या प्राण्यांची नजर कुठेतरी लागली होती. मी पुढे होऊन पाहिलं.

ॲमेझॉन वरुन मी मागवलेली गाय ड्रोनने खाली उतरत होती. शेजारपाजारचे मानवप्राणी आणि आम्ही पाळलेले प्राणी सारेच एकत्र गोळा झाले आणि ड्रोन मधून उतरलेल्या गायीचं स्वागत करायला पुढे धावले. प्राण्यांची सभा आता खरंच मस्त रंगली!

Group content visibility: 
Use group defaults

"घरातले प्राणी कमी पडतायत वाटतं. हे कसलं अचाट खूळ?" ती माझा वारसा चालवते त्यामुळे ’आगाऊ’ न म्हणता तिच्या उर्मटपणाचं मी कौतुक केलं."
"ते बघू नंतर." कधी नव्हे तो वर आलेला आवाज दाबून टाकला मी.
आगाऊ सदस्य फुत्कारली.
वरिष्ठाने कालच कोंबडी मारली होती. आता रोज दूध काढायच्या कल्पनेने त्याच्या अंगावर काटा आला.
<<<जबराट !! झकास !!! भन्नाट!!! अफाट!!! >>>++१११

सर्वांचे आभार.
IRONMAN - वरिष्ठ, कनिष्ठ मुळे गोंधळ झाला का?