रहे ना रहे हम - डॉ. मृदुला दाढे-जोशी

Submitted by जिज्ञासा on 4 June, 2017 - 13:50

सुप्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी ही माझी सख्खी आत्तेबहीण! तिच्या 'रहे ना रहे हम' ह्या कार्यक्रमाला जाण्याचा काल योग आला. हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील प्रयोगशील संगीतकारांच्या योगदानावर आधारीत असा हा कार्यक्रम आहे जो काल अतिशय रंगला. त्याची ओळख मायबोलीच्या सर्व रसिक वाचकांना व्हावी म्हणून तिला लिहिलेलं एक पत्र मी इथे प्रसिद्ध करत आहे. कारण हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. माझ्या बहिणीचा आहे म्हणून नव्हे तर ह्या कार्यक्रमातून ती जे सांगू पाहते आहे ते फार अभिरुचीपूर्ण आहे असं मला वाटतं म्हणून!
अमेरिकेतील रसिकांसाठी खास: येत्या बीएमएमच्या अधिवेशनात ८ जुलै रोजी ह्या कार्यक्रमाचा प्रयोग होणार आहे! तेव्हा ज्यांना शक्य असेल त्यांनी ह्या कार्यक्रमाचा आस्वाद जरूर घ्यावा!
_________________________________________________________________________________________________________________

प्रिय मुदूताई (उर्फ डॉ. मृदुला दाढे – जोशी),
माझं तुला हे पहिलंच पत्र आहे बहुतेक आणि ते ही जाहीर! पण कालचा तुझा पार्ल्यातला ‘रहे ना रहे हम’ कार्यक्रम पाहीला आणि राहवलेच नाही म्हणून तुला हे पत्र!

साधारण दोन-तीन वर्षांपूर्वी तू लोकसत्ताच्या रविवारच्या लोकरंग पुरवणीत ‘रहे ना रहे हम’ हे सदर लिहायला लागलीस. त्या आधीही तुझ्याशी गप्पा मारताना ‘भारतीय चित्रपट संगीतात प्रयोगशील संगीतकारांचे योगदान’ ह्या तुझ्या पीएचडीच्या विषयावर आपल्या गप्पा झाल्या होत्या. पण जेव्हा लोकसत्तामध्ये नियमित लेख येऊ लागले तेव्हा ते वाचून जाणवायला लागलं की हे काहीतरी वेगळं, छान आहे. ही अनेकदा ऐकलेली गाणी ह्याआधी आपण अशी ह्याप्रकारे ऐकलेली नाहीत. मग जसजसे लेख येत गेले माझ्या आयपॉडमध्ये गाण्यांच्या प्लेलिस्ट्स संगीतकारांनुसार व्हायला लागल्या! ह्या लेखमालेतून तुझ्या सौंदर्यशास्त्राची ओळख झाली खरी पण त्याची खरी मजा प्रात्यक्षिकाशिवाय अपुरी होती. कालच्या कार्यक्रमाने ती उणीव भरून निघाली!

१९५०-६० ची दशकं म्हणजे भारतीय चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ! त्यावेळी तयार झालेली गाणी आजही आपल्या सर्वांच्या मनांवर राज्य करत आहेत. पण हे असं का? काय एवढं खास आहे ह्या गाण्यांत? ह्या संगीतकार, गीतकार, वादक, आणि गायकांनी अशी काय जादू केली आहे की ही गाणी पुन्हापुन्हा ऐकावीशी वाटतात? ‘रहे ना रहे हम’ हा कार्यक्रम म्हणजे ह्या प्रश्नांच्या शोधाचे तुला सापडलेले उत्तर आहे! हा कार्यक्रम म्हणजे फक्त मनोरंजन नाही तर बुद्धिरंजन पण आहे. तुझ्याच शब्दांत सांगायचं तर हा कार्यक्रम म्हणजे ‘edutainment’ आहे.

मदनमोहन, जयदेव, एस डी बर्मन, खय्याम, सलील चौधरी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आरडी यांच्या काही निवडक गाण्यांचं तू रसग्रहण करतेस, ती गाणी सादर करतेस. आता ह्या सर्व संगीतकारांचे काम एक्वढे प्रचंड आहे (शिवाय यात अजून कितीक नावे राहिली आहेतच)! खरंतर या प्रत्येक संगीतकारावर एक किमान तीन तासांचा कार्यक्रम होऊ शकेल. काल हे तुझ्या बोलण्यातून जाणवत होतं की तुला काय सांगू आणि किती गाण्यांविषयी बोलू असं होत होतं!! जसे film appreciation किंवा sculpture/painting/architecture appreciation चे courses असतात ना तसा हा कार्यक्रम म्हणजे ह्या संगीतकारांच्या गाण्यांचे सौंदर्य, त्यातील aesthetics उलगडून दाखवतो. गंमत म्हणजे माझं मलाच जाणवलं की कार्यक्रमातलं पहिलं गाणं मी जसं ऐकलं तसं शेवटचं नाही ऐकलं! कारण प्रत्येक सादर होणाऱ्या गाण्यातल्या जागा, त्यातली सौंदर्यस्थळं जशा तू समजावून सांगत होतीस त्याने मला पुढची गाणी अधिक चांगल्या रितीने कळायला लागली होती. ही जाणीव किती छान आहे! ह्या तू दिलेल्या दृष्टिकोनाबद्दल मनापासून आभार Happy

मला वाटतं, कालचा कार्यक्रम पार्ल्यात असल्यामुळे तिथल्या रसिक श्रोत्यांमुळे अधिक रंगला! आणि अर्थातच तुझ्या साथीला असलेल्या गायक, निवेदक आणि वादक सहकलाकारांमुळे सुद्धा! संध्याकाळी सव्वासहाला सुरु झालेली ही मैफिल कोणतेही मध्यांतर न होता रात्री सव्वानऊला (केवळ वेळेच्या बंधनामुळे) संपली. मला खात्री आहे जर हे वेळेचं बंधन नसतं तर अजून तीन तास ही मैफिल नक्की रंगली असती!

मला स्वतःला spoilers आवडत नाहीत म्हणून मी कालच्या कार्यक्रमात नेमकी कोणत्या संगीतकारांची कोणती गाणी होती वगैरे तपशील लिहित नाहीये. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मला असं वाटतं की हा तुझा कार्यक्रम अधिकाधिक लोकांनी प्रत्यक्ष पाहावा. त्याचा अनुभव घ्यावा. त्यातून त्यांना ह्या अजरामर गाण्यांची पुन्हा नव्याने ओळख होईल. तुझ्या ह्या कार्यक्रमाचे शेकडो, हजारो प्रयोग व्हावेत. जे वेड ह्या गाण्यांनी तुला लावले आहे, ज्या आनंदरसाचा अनुभव तुला आला आहे, त्या वेडाची आणि आनंदरसाची अनुभूती हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचावी ह्यासाठी मनापासून शुभेच्छा! Love you loads!

जिज्ञासा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! मस्त लिहिलंयस जिज्ञासा. मृदुला आमच्या डोंबिवलीची. मी ज्या गाण्याच्या क्लासला जात होते तेथे मृदुला आणि तिची आई देखिल येत असत. तेव्हाच ती गायनातच पुढे येणार हे स्पष्ट दिसत होतं. फार शांत आणि फोकस्ड वाटायची ती मला. तिचं ते सदरही मी अतिशय आवडीनं वाचायचे. फार छान लिहायची ती.

पुढे योग्यवेळी क्लास आणि क्लासिकल गाणं सोडून मी भारतीय संगीतावर महान उपकार केले आहेत याची मला नम्र जाणीव आहे.

मृदुला आमच्या डोंबिवलीची. >>>> मामी, तुम्ही डोबिंवलीच्या का?? मला माहित नव्हतं. Happy
मी दाढे बाईंच्या (म्हणजे मृदुला दाढेंच्या आईच्या) किलबिल नावाच्या बालवाडीत जायचो. त्यांचं घर आमच्या अगदी एक गल्ली सोडून होतं. मृदुला दाढेंचे कार्यक्रम गणपतीच्या देवळात ऐकले होते. सुंदर गातत त्या.

अतिशय सुंदर लिहीलंयस जि!! कार्यक्रम किती सुरेख असेल याची कल्पना येत्ये. कार्यक्रम बघायची उत्सुकता लागल्ये आता. बी. एम. एम. ला जावे की काय!!

मंजूताई, मामी, पराग, रायगड, आणि पद्मावती, तुमचे सर्वांचे मनापासून आभार! इतके दिवस laptop वरून मायबोलीवर यायचं रहात होतं आणि त्यामुळे आभार मानायला उशीर झाला!
पराग, मामी, दुनिया खरच गोल आहे Happy
मुदूताईच्या 'रहे ना रहे हम' ह्या लेखमालेत भरपूर भर घालून तयार झालेलं तिचं पुस्तक रोहन प्रकाशनातर्फे लवकरच येणार आहे. मला जसे तपशील कळतील तसे मी इथे कळवेनच!

खूपच छान कन्सेप्ट आहे. इथे परिचय दिल्याबद्दल धन्स!
असं काहीतरी (गाण्याचं सौंदर्यशास्त्र) ऐकायला मिळावं ही जुनी इच्छा आहे. कार्यक्रम बघण्याचा योग आला तर नक्की बघणार, निदान पुस्तक तरी घेऊन वाचणार.

मृदुला दाढे हे नाव खूप ओळखीचे वाटले. बहुतेक 'स्मरणयात्रा' ह्या पूर्वी झालेल्या गाण्यांच्या कायक्रमात होत्या का त्या?? ती व्हिडिओ कॅसेट होती आमच्याकडे व खूपदा वाजायची.
हा कार्यक्रम लक्षात ठेवीन. भारतात आले असताना जमलं तर जाईन. थॅम्क्स जि!

हो स्मरणयात्रा..मला नाव आठवत नव्हतं..लहानपणी खूप वेळा पाहिली आहे ती व्हिडियो कॅसेट. त्यात मृदुला दाढे होत्या आय गेस. आता पुन्हा एकदा बघायला पाहिजे, यूट्यूबवर आहे!
Some serious nostalgia..thanks baske!

बस्के, हो स्मरणयात्रा मध्ये ताई होती Happy
धन्यवाद सनव! हा कार्यक्रम युट्यूबवर आहे हे मलाही माहित नव्हते.

माझे आई बाबा मृदुला दाढेंच्या ठाण्यात होणार्‍या सर्व कार्यक्रमांना जातात. सुंदर आवाज, अभ्यासपूर्ण सादरीकरण ह्यामुळे ते दोघे मृदुला दाढेंचे मोठे फॅन आहेत Happy

खुप छान आवाज आहे त्यांचा. माझ्या भाच्याच्या लग्नात त्यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. खुप छान झाला होता. त्यांनी 'महल' मधिल आयेगा आनेवाला हे गाणे फारच छान म्हणले होते. जवळ जवळ ७/८ वर्श झाली पण अजुन आठवतेय ती सुरवातीची सुरेल तान. कधिहि विसरणार नाहि.

छान लेख. बघायला हवा कार्यक्रम.

मृदुला दाढे पेंढारकर कॉलेजमध्ये मला दोन वर्ष सिनियर होती. तेव्हाच ती फेमस होती आणि आम्हाला कौतुक वाटायचं तिचे. तिचा वावर पण गोड आणि प्रसन्न होता, आम्ही आपले लांबून बघायचो. जागतिक मराठी परिषद तर्फे गाणी झालेली, तेव्हा ती टीव्हीवर दाखवायचे तेव्हापासून आवडते ती, त्यामुळे घराघरात पोचली आणि आमच्या डोंबिवलीची, कॉलेजची म्हणून आमची कॉलर उगाच ताठ.

धन्यवाद सनव! हा कार्यक्रम युट्यूबवर आहे हे मलाही माहित नव्हते. >>> +१. झपाटा मार्केटींगने ती व्हीडीओ कॅसेट काढली होती. बरीच घासली आम्ही, मग भावाच एक मित्र घेऊन गेला त्याने परत केलीच नाही. मी झपाटाशी संपर्क साधुन कॅसेट आहे का हे विचरलं देखिल पण नाही मिळाली. आता यु ट्युब वर पाहतो. त्या स्मरणयात्रेमधे मुकुंद फणसळकरदेखिल छान गायला आहे.

या कार्यक्रमाला खूप छान प्रतिसाद मिळाला. रसिक श्रोत्यांनी हॉल पूर्ण भरला होता.
IMG_2798_mb.jpg
फोटो समीर सरवटे
IMG_2797_mb.jpg

आगामी कार्यक्रम! खास कोपुकरांकरता!
दिनांक 06 अॉगस्ट रविवारी देवल क्लब कोल्हापूर येथे सायंकाळी 6:00 वाजता रहे ना रहे हम चा प्रयोग होणार आहे! जरूर उपस्थित रहा Happy

जिज्ञासा
तुम्ही मायबोलिच्या जाहिरात विभागात याबद्दल विनामूल्य जाहिरात प्रकाशीत करू शकता. उदा. हे पहा.
https://jahirati.maayboli.com/node/1770

डॉ. म्रुदुला या खूपच गुणी कलाकार आहेत आणि नावप्रमाणेच अगदी शांत, म्रुदू, नम्र व्यक्तीमत्व.
मुम्बईत यशवंतराव च्व्हाण सभाग्रुहात एका खाजगी मैफिलीत त्यांच्या बरोबर गायनाचा योग आला होता... तेव्हा देखिल त्यांच्या कलात्मक व अतीशय अभ्यासपूर्ण सादरीकरणाचा अनुभव आला होता.
कुठल्याही प्रकारची फाजिल प्रसिध्धी, आत्मप्रौढी वा सेल्फ प्रोजेक्शन न करता आपल्या कलेशी प्रामाणिक राहीलेल्या फार थोड्या कलाकारांपैकी त्या एक आहेत. दुर्दैवाने असे कलाकार आणि त्यांचे गुण सातत्याने समाजासमोर येत नाहीत. परिणामी नुसत्याच सवंग प्रसिध्धी आणि पैशापासरी कार्यक्रमांच्या हैदोसामूळे नविन पिढी समोर चूकीचे आदर्श ऊभे केले जातात.
असो.
म्रुदुला जीं नी त्यांची कला, व कलात्मकता अशीच सातत्याने रसिकांसमोर मांडावी यासाठी त्यांना अनेक शुभेच्छा!