इस्किलार: काही आठवणी

Submitted by डॉ अशोक on 27 May, 2017 - 11:52

इस्किलार: काही आठवणी
डॉ ए. पी. कुलकर्णी

दहा जानेवारी. कुमार (देशमुखचा) स्मृतीदिन. कुमार हा मराठवाड्याच्या रंगभूमीचा बिनीचा शिलेदार. त्याच्या स्मृतीदिनाला त्याची कुटुंबीय मंडळी आणि मित्र कार्यक्रम आखतात. मागील दोन- तीन वर्षांपासून त्यानं लिहिलेल्या नाटकांचं प्रकाशन होतंय. या वर्षी त्याच्या एक नाही दोन नाही तर चक्क तीन नाटकांचं प्रकाशन होतंय. "अघटीत", " व्यथा ही मानवाची" आणि "इस्किलार". यातलं "इस्किलार" म्हटलं की त्याच्या प्रयोगाच्या काही आठवणी जाग्या होतात.

त्या वर्षी दिवाळी अंकात जी.एं ची ही दीर्घकथा आली आणि राज्य नाट्य स्पर्धेसाठी दर वर्षी नव्या स्क्रीप्टच्या शोधात असलेल्या कुमारला तर जणू घबाड सांपडल्याचा आनंद झाला. जी.ए. परवानगी देतील कां ही शंका मनात होती. पण आश्चर्य घडलं आणि त्यांनी परवानगी दिली. मोत्यासारख्या अक्षरातलं त्यांचं पत्र आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. आपल्या कथेवर नाटक होऊ शकेल यावर दस्तुरखुद्द जी.एंचा विश्वास बसला नव्हता. पण मन मोठं करून त्यांनी परवानगी दिली. त्यांनी कुमारनं केलेल्या नाट्यरुपांतरात फक्त एक बदल सुचवला. दिवाळी अंकात त्यातल्या एका पात्राचं नाव "अनीस" असं छापलं होतं. ते अनीस नसून "अर्नास" आहे हे त्यांनी आवर्जून कळवलं... परवानगी मिळाली आणि मग जाणवलं की कित्ती मोठी जवाबदारी आमच्यावर येवून पडली होती ! या नाट्काचे तीन प्रयोग झाले. दोन औरंगाबादला सरस्वती भुवन च्या स्टेजवर आणि एक मुंबईला ... रविंद्र नाट्य मंदीरात... राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत !! थिएटर फुल्ल होतं.... जी.एंची पुण्याई !! दुस-या दिवशी वृत्त पत्रात परिक्षण आलं आणि आम्हाला आमच्या श्रमाची पावती मिळाली. प्रयोगाचं भरभरून कौतुक झालं. काय होतं असं त्या प्रयोगात?

त्यापूर्वीही आमच्या "नाट्यरंग"नं राज्य स्पर्धेत प्रयोग केले होते. पण तेंव्हा महत्व दिलं जायचं ते चोख संवाद म्हणून अभिनय करण्याला. अभिनया व्यतिरिक्त नेपथ्य, प्रकाश योजना, वेषभूषा, रंगभूषा, संगीत अशा नाटकाच्या सर्व अंगानी विचारपूर्वक, मेहेनतीनं आणि अत्यंत काटेकोर नियोजन करून सादर केलेला आमचा तो पहिला प्रयोग होता. "नाट्यरंग" भविष्यात राज्य स्पर्धेवर उमटवणा-या ठशाची ती नांदी होती. नाट्काचं कथानक... ती जी.एंची अत्यंत लोकप्रिय कथा असल्यानं फार तपशीलात जात नाही. त्यांच्या रूपक कथांची सर्व वैशिष्ठ्ये त्यात एकवटली आहेत. भव्य कॅनव्हास, जीएंची विलोभनीय भाषा, ठसठशीत व्यक्तिरेखा आणि त्यांची आवडती नियती. जन्मत:च त्या राजकुमाराचे वडील रमल मांडून त्याचं भविष्य जाणून घेतात आणि त्यांना कळतं की हे मूल आपल्या बहिणीची हत्या करेल आणि वडीलांच्या मृत्यूला कारणीभूत होईल. वडील मुलाला लहानपणीच सोडून देतात. हा राजपूत्र जसजसा मोठा होतो तस तसं त्याला हे कळू लागतं. इकडे वडील परचक्र आल्यानं परागंदा होतात. बहीण शत्रूच्या हाती पडते. हा मात्र आपल्या नशिबात कोणता साप आहे याचा शोध घेत देशोदेशी भटकत, फिरत रहातो. योगायोगानं त्याला कळतं की एका मंदीरात भविष्य सांगितलं जातंय. हा तिथे अगदी शेवटच्या क्षणी पोहोचतो. त्याला भविष्य सांगितलं जातं... तीन शब्दात: सेरेपी, इस्कहार आणि एली. आता याचा अर्थ काय याचा शोध म्हणजे ही कथा... हे नाटक....

कथेत अनेक लोकेशन्स आहेत. रस्ता, मद्यागार, बाग, समुद्रावरचा पूल, मंदीर, समुद्रकाठ, तलवारीचं दुकान इत्यादी... इतक्या लोकेशन्स कशा दाखवायच्या? यावर उपाय... लेव्हल्सचा वापर. मला आठवतं. तेंव्हाच्या रविंद्र नाट्य़ मंदीराचं स्टेज... जवळ पास साठेक फूटाची डेप्थ आणि मागे दगडी साइक... तिरपासा... डेप्थमुळे त्या साईकचा कुणी फारसा उपयोग केला नव्हता. रविंद्रच्या तेंव्हाच्या तंत्रद्न्यांना कुमारनं जेंव्हा सांगितलं की त्या साईकचा तो वापर करणार आहे तेंव्हा त्यांचे चकित झालेले चेहेरे मला अजूनही आठवतात. साइकच्या समोर रंगमंचावर आडवा असा एक लांब तीन फूट रूंद आणि वीस पंचवीस फूट लांब डायस टाकून त्यावर काळं कापड टाकलं. इथं समुद्रा काठचे सीन्स आणि मंदीरा कडे जाणारा पूल दाखवला. त्यासाठी तीसेक फूट लांब दोरखंड वापरून पूलाचा आभास केलेला. डायस आणि साइक याच्या मधल्या जागेत मंदीराच्या सीन च्या वेळी दोन उंच खांब... ते प्रेक्षकांच्या बाजूने खांब पण आतील बाजूस पोकळ... त्याला आतून धरण्यासाठी आडवे छोटे बांबू लावले आणि सीनच्या वेळेला आत्त उभं राहून एक माणूस हा खांब लिलया उचलून आणी. सीन पूर्ण होईपर्यंत तो खांबाच्या आत उभा राही आणि सीन संपला की खांबा सकट विंगेत नाहीसा !! दोन खांब दोन विंगेत गायब !! डायस च्या पूढे मोकळी जागा... इथं रस्ता, बागेतला बाक, तलवारविक्याचं दुकान, मद्यागार इत्यादी सीन्स साठी राखून ठेवलेली. मात्र त्यासाठी कुमारनं जी शक्कल लढवली त्यानं या नाटकाला अंतिम फेरीत नेपथ्याचं पारितोषिक मिळालं. कल्पना काहीशी अशी... दीड बाय दीड बाय एक फुटाचे बॉक्सेस तयार केले. सहा बाजूंपैकी एक बाजू रिकामी... या बॉक्सेस चे दोन संच केलेले. प्रत्येक संचात दहा बॉक्सेस. एक संच रंगमंचावर असेल तेंव्हा दुसरा संच विंगेत आणि त्यावर पुढच्या सीनचं काम चालू. यातून मग बागेतलं बाक, तलवार विक्याच्या दुकानातलं कपाट, रस्त्यावरचे ओळीत असलेले दगड, गारूड्याच्या खेळाच्या वेळेला बसण्यासाठी सिटीज... नेपथ्याच्या दोन टीम्स.. एका टीमनं स्टेजवरचे बॉक्सेस सीन संपला की उचलून आणायचे तर दुस-या टीमनं विंगेत तयार झालेलं पुढच्या सीनचं "नेपथ्य़" जागेवर नेवून ठेवायचं. दोन सीनच्या दरम्यान होणा-या अंधारात नेपथ्य बदल करायचा. प्रेक्षकांना दिसू नये म्हणून नेपथ्याच्या टीमनं काळे कपडे घातलेले आणि सर्वांगाला काळा रंग फासलेला. नेपथ्याच्या टीमनं पण रंगभूषा केल्याचं हे अपवादात्मक उदाहरण असावं ! मद्यागाराच्या सीन मधे मद्यपींना बसायसाठी म्हणून आलोक (चौधरी)च्या शेतातली नारळाची दोन झाडं कापून, त्यांची खोडं वापरलेली. मात्र ती जड आहेत हे शेतातून नेतांनाच जाणवलेलं... म्हणून आतून कोरून पोकळ केलेले !! कथेत इस्कहार रत्न हे एक जणू पात्र म्हणूनच समोर येतं. मंदीराच्या सेविकेच्या गळ्यातल्या या रत्नाचं वर्णन (जीएंच्या भाषेतलं) प्रेक्षक आधी ऐकतात. ते जणू श्वास घेतंय असा भास होतो असं काहीसं वर्णन !! काचेच्या एका एँटीक पीस मधे छोटे छोटे बल्ब टाकून ते बॅटरीवर चालू केले. त्याच्या वायर वर कलाकुसर करून त्याचा हार केलेला. त्याला उघड झाप होईल अशी व्यवस्था केलेली. कलाकारानं योग्य वेळी बटन ऑन करून ते सुरू करायचं आणि मग प्रकाश योजना आणि संगीत याच्या सहाय्यानं ते जणू श्वास घेतंय ही कल्पना डृष्य स्वरूपात साकार झालेली. !! अल्थीया नावाच्या सुंदरीला रंगमंचावर येण्यासाठी मेणा तयार केला. मात्र त्याच्यातून ती इतरांसारखी उतरली तर काय मजा? मेणा थांबल्यावर दोन हबशी सेवक ओणवे होतात आणि त्यांच्या पाठीवर पाय देवूनच ती उतरते. या एका ऍक्शन मधून तिचा गर्व, तिचा उद्दामपणा अधोरेखीत झाला.

नाट्काच्या वेषभूषेनं जाणकारांची वाहव्वा मिळवली. अर्नासच्या व्यक्तिरेखे साठी धान्याचं पोतं लाल-हिरव्या-निळ्या रंगात भिजवून त्याचा अंगरखा केलेला. मंदिराकडे जाणा-या पुलावरच्या सेनापती साठी हेल्मेट चा वापर करून त्याचं ग्रीको-रोमन स्टाईलचं शिरस्त्राण तयार केलेलं.... स्त्री व्यक्तिरेखांसाठी जरा हटके अशी वस्त्रे खास शिवून घेतलेली. प्रकाश योजना हा तर आलोक (चौधरी)चा खास प्रांत. त्यानं यात क्रॉस लायटींगचा मनसोक्त वापर केला. दगडी साईकवर वेगवेगळ्या रंगाचे स्पॉट्स सोडून कधी समुद्र, तर कधी मंदीर, तर कधी समुद्रावरचा पूल हा खेळ त्यानं असा काही रंगवला की पूछो मत ! शेवटच्या दृष्यात कथा नायक प्रेक्षकांच्या कडे पाठ आणि त्या दगडी साइक कडे तोंड करून हात ऊंच करून बोलतो. तेंव्हा फूट-लाईट त्याच्या मागून दिल्याने त्याची भली मोठी सावली साईक वर दिसू लागते आणि जणू ती सावलीच आपल्याशी बोलतेय असा भास होतो. जीएंचे शब्द, कुमारचा भरदार आवाज, पार्श्व- संगीत आणि त्या भव्य सावलीचं गारूड... या सर्वांच्या एकत्रित परिणामानं हा सीन "अंगावर आल्याचा भास होतो" असं एका समीक्षकानं लिहिलेलं. प्रा. विजय दिवाणांनी या नाट्कासाठी केलेलं संगीत नियोजन हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होवू शकेल. नाट्काचा काळ मध्ययुगीन तर स्थळ मध्यपूर्वेत कुठेतरी ! हे लक्षात घेवून तिथल्या मद्यागारासाठी, अल्थीयाच्या मेण्याच्या एंट्री साठी, मद्यागारातल्या नर्तिकेच्या नृत्या साठी, इस्कहार रत्न दिसतं आणि ते श्वास घेतंय असा आभास होतो त्या प्रसंगासाठी, समुद्राचा भास होण्या करिता लाटांच्या आवाजासाठी, सैन्याच्या घोड्याच्या टापांच्या आवाजासाठी आणि नायक आणि त्याची प्रेयसी यांच्या बागेतली ताटातूट अशा अनेक प्रसंगांसाठी यथायोग्य संगीताचा वापर करून त्या-त्या प्रसंगात वेगळीच जान फुंकली होती.

कुमार या नाट्काचा लेखक आणि दिग्दर्शक तर होताच पण त्यानं यातली मध्यवर्ती भूमिका मोठ्या ताकदीनं रंगवली. दिग्दर्शक म्हणून कुमारला या नाट्कानं मोठा आत्मविश्चास दिला. यातली पात्र निवड कुमार मधला दिग्दर्शक दाखवून देते. वास्तविक कुमार आणि अजित (दळवी) समवयस्क. पण यात कुमारनं अजितला त्याच्या वडीलांची (धीवर) भूमिका दिली. ते किती योग्य होतं हे अजितनं ही भूमिका ज्या ताकदीनं वठवली त्यावरून दिसून आलं. अजितनं त्यानंतरही काही चांगल्या भूमिका केल्या पण अजितनं आपल्यातल्या अभिनेत्याला म्हणावी तशी संधी दिली नाही असं म्हणावसं वाटतं. यातल्या याकिर च्या भूमिकेसाठी प्रा. अशोक व्हटकरांची निवड आम्हाला सुरूवातीला चकित करून गेली, रांगड्या दिसणा-या व्हटकरांनी आपल्या दमदार आवाजात साक्षात याकिरच डोळ्यांपूढे उभा केला. गारूड्याची भूमिका नंद्कुमार (मामा) पत्कीं साठीच जणू जन्माला आली होती. ती त्यांना सूट होतीच. ते त्त्या काळात हौशी जादूगार म्हणून जादूचे प्रयोग करत असत. त्यामुळे त्यांनी तोंडातून आगीचे लोट काढत आणि डमरू वाजवत स्टेज वर प्रवेश केला तेंव्हा लहान तर सोडाच पण मोठे पण अवाक झालेले मी पाहिले आहेत. यातला मद्यागारातील मद्यपींचा प्रवेश हा मला तरी जीएंचा लेखक म्हणून मास्टरपीस वाटतो. यशवंत देशमुख (क्रीसस), सुभाष वैद्य (कवी) आणि आलोक चौधरी (घोड्याचा व्यापारी) यांनी या प्रसंगाला न्याय दिला आणि तो कमालीचा रंगवला. कथेतल्या अल्थियाच्या वर्णनानं पागल झालेले जीएंचे फ़ॅन्स आजही आहेत. या भूमिकेला अमिता जरीवाला शिवाय अन्य कोणताच पर्याय तेंव्हा नव्हता आणि तिनं ही भूमिका अल्थियाच्याच दिमाखात सादर केली. नायकाच्या बहिणीचं काम करणा-या सुजाता कांगोला संवाद नव्हते. पण तिला प्रयोगात हे टेन्शन होतं की इस्कहार रत्न ऐनवेळेला सुरू होईल की नाही याचं आणि आपल्याला वीजेचा शॉक लागेल की काय याचं ! सुदैवानं तिन्ही प्रयोगात ते वेळेवर प्रकाशमान झालं.

आता या नाटका्ची संहिता पुस्तक रूपात प्रसिद्ध होत आहे याचा मला अत्यंत आनंद आहे कारण या नाट्काच्या प्रयोगात नेपथ्याची जवाबदारी पार पाडून (आणि एक अत्यंत छोटी भूमिका करून) मी माझा खारीचा वाटा उचलला आहे. आनंदा बरोबरच खंत या गोष्टीची आहे की कुमारनं दिग्दर्शित केलेल्या प्रयोगानंतर या नाटकाचा प्रयोग कुणीही केला नाही. (हिंदीत झाला, पण तो ही कुमारनंच केलेला) औरंगाबादला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग आहे. सरस्वती भूवन महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय, एमजीएम इथं पण नाट्यशास्त्र विभाग आहेत. या संस्थामध्ये काम करणा-या रंगकर्मींनी अशी आव्हानं पेलायची नाहीत तर मग कुणी?

डॉ ए.पी. कुलकर्णी
ए-२०४, वैदेही रिव्हीएरा
विद्न्यान नगर जवळ, ऑफ एनडीए पाषाण रोड
बावधन, पुणे ४११०२१
दूरध्वनी: ९४२२७ ०१६५०
ई-मेल: drapkulkarni@gmail.com

या नाटकाचा प्रयोग १९७४ मधे महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत "नाट्यरंग, औरंगाबाद"नं केला.
*
नाटकाची मुद्रित प्रत "जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद"नं जाने, २०१३ ला प्रकाशित केलं.
*
त्यांचा पत्ता:
जनशक्ती वाचक चळवळ, पिनाक, २४४, समर्थ नगर, औरंगाबाद, ४३१००१"
*
किंमत: २२५ (इस्किलार, अघटित, व्यथा ही मानवाची ही तीन नाटके समाविष्ट)
उपरोक्त लेख सदर पुस्तकाच्या प्रस्तावनेत समाविष्ट आहे.

Group content visibility: 
Use group defaults

कुमार1
इस्किलार हा शब्द कोणत्याच भाषेंत नाही- ती जी ए ची निर्मिती. या दीर्घ कथेत जीएनी असे बरेच स्वनिर्मित शब्द वापरलेत
स्कीलार म्हणजे नाटक
इसकीलाड म्हणजे सम्राटाच्या मनोरंजनासाठी खास सादर केलेला हिजड्यांचा नाच
इस्किलार म्हणजे प्रेताभोवती करून ठेवलेल्या पिठाच्या लहान लहान बाहुल्या. प्रेत रात्री उठते, व त्या बाहुल्या एकेक करून खाऊन टाकते अशी समजूत आहे (कथेतल्या राज्यात)

जबरदस्त!!
इस्किलार ची आठवण जिवंत झाली.

काय जबरदस्त वर्णन केले आहे डॉ. अशोक तुम्ही. अगदी डोळ्यासमोर सर्व जिवंत झाले. एखाद्या प्रयोगाच्या मागची कथा सांगणार्‍या लेखाचे हे एक उत्तम उदाहरण म्हणून देता येईल. जीएंची सेरिपी इस्किलार एली ही एक वेगळीच नशा असलेली दीर्घकथा आहे. त्यावर नाटक बेतून ते पेलणार्‍या तुम्हा सर्वांचेच कौतूक. या लेखामुळे या आगळ्या वेगळ्या प्रयोगाची माहिती आम्हाला झाली त्याबद्दल तुमचे आभार मानतो.

त्याच दिवशी वाचले होते. प्रतिक्रिया द्यायची राहिली की पोस्ट करताना गडबड झाली लक्षात नाही. आवडला लेख. जीए कुलकर्णींची २-३ पुस्तके वाचली आहेत पण याबद्दल काहीच माहिती नव्हती. कुमार देशमुखांबद्दलही.

अप्रतिम !
इस्किलार वर नाटक म्हणजे जबरदस्त अनुभव असणार
आता कोणी असा प्रयोग करत नाही Sad
अर्थात जी ए च्या कथेवर नाटक करणे म्हणजे खायचं काम नाही