ऱ्हुबार्बचे आंबटगोडतिखट तोंडीलावणे आणि सरबत

Submitted by स्वाती_आंबोळे on 15 May, 2017 - 17:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ऱ्हुबार्बची देठं*
साखर
आल्याचा रस
मीठ
लाल तिखट
जिऱ्याची पूड

क्रमवार पाककृती: 

ऱ्हुबार्बची देठं धुवून, पुसून, चिरून घ्या. साधारण अर्ध्या इंचाच्या फोडी चालतील. फार बारीक चिरायची आवश्यकता नाही.
सहसा ऱ्हुबार्बच्या चार कप फोडींना एक कप साखर आणि अर्धा कप पाणी किंवा रेड वाइन व्हिनिगर लागतं. मी पाणीच घातलं यावेळी.
तसंच चार कप फोडींना एक टीस्पून आल्याचा रस घाला.
हे सगळे जिन्नस मोठ्या जाड बुडाच्या भांड्यात एकत्र करून मध्यम आचेवर शिजवा. अधून मधून परतत रहा.
ऱ्हुबार्ब शिजायला फार वेळ लागत नाही. पाचेक मिनिटांत फोडी मऊ व्हायला लागतील. त्या मॅशरने मॅश करत जा.
पाणी आळून मिश्रण छान मिळून आलं की गॅस बंद करा.
आता त्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट आणि जिऱ्याची पूड घाला.
पूर्ण गार झालं की बाटलीत भरा.
चवसुद्धा बघण्याआधी फोटो काढून फेसबुकवर टाका.
'फीलिंग ऱ्हुबार्बी' किंवा तत्सम क्याप्शन द्या.
मग चव बघून तिखटमीठ ॲडजस्ट करा.

rhubarb stems.JPGcut rhubarb.JPGchutney.JPG

आणि हे र्‍हुबार्बेड :
rhubarbade.jpg

चार कप र्‍हुबार्बच्या फोडींना प्रत्येकी एक कप साखर आणि पाणी घालून शिजवा आणि मग मिश्रण बारीक गाळणीने गाळून घ्या. आयत्या वेळी पाणी किंवा सोडा (आणि/किंवा वोडका किंवा टकीला) घालून प्या.
गाळून उरलेले फायबर्स दह्यात, आइस्क्रीमवर, पॅनकेक्सवर घालून खायला सुंदर लागतात आणि दिसतात - वाया जात नाहीत.

वाढणी/प्रमाण: 
आठ वाट्या फोडींची साधारण १२औंसाची बाटली भरून चटणी झाली.
अधिक टिपा: 

*ऱ्हुबार्बची पानं विषारी असतात, ती काढून टाकावीत!
मी शॉपराइटमधून आधीच स्वच्छ केलेले देठच आणले होते.
हे देठ लालभडक सेलरी स्टिक्स असाव्यात तसे दिसतात आणि तसंच फायब्रस टेक्स्चर असतं.
आल्याच्या रसाऐवजी आल्याचा कीस किंवा बारीक चिरलेलं आलं चालेल.
नेटवर बऱ्याच रेसिपीज आहेत. त्यात लवंग, वेलची, दालचिनी असे स्वाद वापरलेले दिसतील. तसंच पातीचे किंवा साधे कांदे, बेदाणे असंही घालतात. लेमन झेस्टही.
मी प्रथमच केली म्हणून अगदी बेसिक कृती करून पाहिली, आता हळूहळू बाकी व्हेरिएशन्सही ट्राय करेन.
चटणी पूर्ण मॅश (गरगट!) न करता साल्सासारख्या मऊसर फोडीही ठेवू शकता.
सगळ्या घटकपदार्थांची प्रमाणंदेखील आवडी/चवीनुसार ॲडजस्ट करा.
ही रेसिपी वाचतांना किंवा खाताना क्रॅनबेरी सॉसची आठवण झाल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

माहितीचा स्रोत: 
इन्टरनेट आणि माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, जुड्या नाही, स्वच्छ केलेल्या देठांचं एक पाकीटच घेतलं मी. दहाबारा देठं होती त्यात.

रेसिपी लिहायचा प्लॅन नव्हता, नाहीतर स्टेप बाय स्टेप काढले असते फोटो. आता पुन्हा करेन तेव्हा काढेन. Happy

ही रेसिपी वाचतांना किंवा खाताना क्रॅनबेरी सॉसची आठवण झाल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. << अगदी हेच आले डोक्यात. तुझीच रेसीपी...
फोटो मस्त एकदम

मस्तच दिसतेय. साधारण किती दिवस टिकते ?
ऱ्हुबार्बचा फोटू (देठं आणि पानं) ही द्या.

(देठांना चांदणी का दिलीत? काही नमूद करायचे राहिलेय का?)

दोन नं वर साखर शब्द वाचताच पुढचं वाचायचच बंद केलं. साखर आणि चटणी हे एकाच ठिकाणी कसे राहू शकतात. ?

माझं लिंक देण्याचं काम करून टाकल्याबद्दल धन्यावाद योकु! Happy
गजाभाऊ, चांदणी पानं खाद्य नसल्याच्या इशाऱ्यासाठी होती. पण तिथे द्यायला विसरले. (वय... Proud )

बर झाल विषारी असतात हे सांगितलस, भाजी आणली असती तर कांदा मिरची लसुण घालुन नक्कीच पानांची भाजी केली असती. Happy

फोटो टाकले आहेत - आणि र्‍हुबार्बेड अ‍ॅड केलं आहे. Happy
फोनवरून टाकलेले फोटो नीट पोस्ट झाले नव्हते.

मी_अनु, माझ्या माहितीनुसार तरी नाही मिळत भारतात.