रस्त्यावरचे आकस्मिक भांडण: एक प्रचंड मन:स्ताप...

Submitted by एक मित्र on 20 January, 2017 - 02:27

काल एक प्रसंग घडला. असे प्रसंग माझ्या आयुष्यात काही महिन्यातून एकदा घडतातच. पण त्याचे मनावर इतके वाईट डाग पडतात कि अनेक दिवस त्यातून बाहेर येता येत नाही. ते आठवले तरी मनाची प्रचंड चरफड होते. एरवी ज्यांची आपले जोडे सुद्धा पुसायची लायकी नाही असले नीच आणि हलकट लोक आपल्याला सहजगत्या अपशब्द बोलून गेले आणि आपण काहीच करू शकलो नाही हे आठवल्याने मनाचा संताप संताप होत राहतो.

झाले असे कि मी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला चाललो होतो. कारमध्ये बरोबर ऑफिसमधली एक सहकारी मैत्रीण होती. सकाळी आठ-साडेआठची वेळ असेल. रस्त्यावर फार वर्दळ नव्हती. इतक्यात डाव्या बाजूची पण माझ्या बरीच पुढे असलेली एक गाडी (टेम्पो ट्रॅक्स असावी) अचानक थांबली. सिग्नल वगैरे काही नव्हता. मुळात तो चौक पण नव्हता. त्यामुळे पुढे असलेले डाव्या बाजूचे वाहन का थांबले याची फिकीर करायची मला काही गरजच नव्हती. मी आपला माझ्या स्पीडने माझ्या लेन मधून तसाच पुढे जात होतो. डाव्या बाजूला उभ्या राहिलेल्या त्या टेम्पो ट्रॅक्सच्या पुढे आता मी जाणार इतक्यात एक उपटसुंभ (हाच तो हरामी) आपली फडतूस बाईक घेऊन त्या टेम्पो ट्रॅक्सच्या पुढून थेट आडवा माझ्यापुढे आला. मी करकचून ब्रेक दाबला. नशिबाने माझ्या कारचा स्पीड जास्त नव्हता नाहीतर तो जाग्यावरच गचकला असता (एका अर्थाने ते बरे झालेही असते. असले हलकट लोक जगून करायचे तरी काय? दुसऱ्यांना त्रास देत जगत राहणार. असल्या भिकार**ना एकत्र करून कुठेतरी लांब नेऊन जाळून टाकायला हवे खरे तर). पट्कन मी ब्रेक दाबल्याने बेसावध असलेली माझी सहकारी मैत्रीण समोर केवळ आदळायचीच बाकी राहिली होती. मी पण कसाबसा स्टीअरिंग पकडून स्वत:ला सावरले. क्षणार्धात घडलेल्या या प्रसंगाने दोघे पण हबकून गेलो. मी प्रचंड रागात त्या इसमाकडे पाहू लागलो. राग येणे स्वाभाविक आहे. पण मुजोर वृत्ती त्याच्या नसानसात भरलेली. पैदाइशच तशी असावी. डुक्कर घाणीतच लोळणार. तसे काही लोक शिकत नाही. आपली मूळ वृत्ती धरूनच राहतात. स्वत:ची चूक झालेली असूनही केवळ मी रागाने पाहत आहे म्हणून माझ्या कारच्या आडवी बाईक लावून हातवारे करून मला काहीतरी बोलू लागला. मी पूर्ण दुर्लक्ष केले. पण मी प्रतिकार करत नाही म्हणून त्याला जोर चढला. माझ्या कडे पाहून त्याने शिव्या दिल्यासारखे तोंड हलवले.

मग मात्र माझी सटकली. काहीही चूक नसताना माजोरडे पणा आणि वरताण म्हणून शिव्या पण खायच्या? मग मी पण त्याला तसेच हावभाव करून प्रत्युत्तर दिले. तर तो बाईक आडवी उभी करून तावातावाने माझ्या गाडीजवळ येऊ लागला. बरोबर मुलगी असल्याने मी फार काही प्रतिकार करू शकणार नाही असे त्याला वाटले असावे. पण मी पण त्याला न जुमानता दार उघडून बाहेर त्याच्याशी दोन हात करायची तयारी केली. तितक्यात मैत्रीण म्हणाली, "दार उघडून बाहेर जाऊ नकोस. तो चांगला वाटत नाही. ह्या भागात भुरटे गुंड आहेत. त्यांच्या खिशात काहीही हत्यार असते." तिचे म्हणणे मनाला पटले. पूर्वी पण अशा किरकोळ वादावादीतून खून पडल्याचे ऐकले होते. मी कसे बसे स्वत:वर नियंत्रण मिळवले आणि हाताने त्याला, "चल फूट इकडून मा***त" असे काचेतूनच खुणावले. तो अजून चवताळला. ओरडून शिव्या देऊ लागला. अशा प्रसंगी हे हिणकस लोक कारला बाहेरून लाथा मारणे किंवा खिडकीच्या काचेवर जोरजोरात थपडा मारून बाहेर यायला उद्युक्त करतात असा माझा पूर्वअनुभव आहे. पण याने तसे काही केले नाही. थोडा वेळ आरडाओरडा केल्यावर तो तिथून निघून गेला. तशी मी पण पटकन काच खाली करून त्याच्या दिशेने "हाड रे कुत्र्या. हरामी" वगैरे ओरडून थोडी भडास काढली. पण बरोबर सहकारी मुलगी असल्याने त्याच्या शिव्यांना तसेच प्रत्युत्तर देऊ शकलो नाही याचे खूप वाईट वाटले.

नंतर मी ऑफिसला आलो. पण सकाळी सकाळी आपली काहीही चूक नसताना घडलेल्या या प्रकाराने दिवसभर मन अस्वस्थ होते. कामात लक्ष लागत नव्हते. चूक नसताना एका हिणकस दर्जाच्या हलकटा कडून मैत्रिणी समोरच शिव्या खायची वेळ आली हि गोष्ट मनाला दिवसभर खूप बोचत राहिली. अजूनही बोचते आहे. ढेकूण चावल्यावर त्या जागी प्रचंड आग आग होते. तशी इथे हा दलदलीतला किडा चावल्याने मनाची आगआग झाली होती. नक्कीच तो काही कामधंदे न करणारा भुरटा गुंड असणार. कामधंदे करणारा असता तर अशी भाषा याने वापरली नसती. कुणाच्या तरी चुकीमुळे अशा औलादी कुठल्यातरी गटारात जन्माला येतात. काही कामधंदे न करता आयुष्यभर गुंडा मवालीगिरी करत इतरांना त्रास देत जगतात. आमच्या करावर यांना आम्ही पोसायचे. आणि हे वर आम्हालाच शिव्या देणार. आणि एकदिवस कुठल्यातरी गटारातच मरणार. हे लोक जिवंत ठेवायचे तरी कशाला? असले काहीबाही विचार माझ्या मनात दिवसभर येत राहिले. ह्या प्रवृत्तीच्या लोकांना मनातून प्रचंड शिव्याशाप देत दिवस गेला. ह्यांच्या पिढ्या तडफडून मरायला हव्यात. नामोनिशान नष्ट व्हायला पायजे ह्या हरामखोरांचे. इत्यादी इत्यादी शिव्याशाप मन दिवसभर देत होते. मनाची प्रचंड चरफड सुरु होती. अजूनही सुरूच आहे. ती पूर्ण शमायला अजून काही दिवस जातील.

असो. पण वर सुरवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे माझा एक अनुभव आहे. माझ्या आयुष्यात काही महिन्यातून किमान एकदा तरी अशा रस्त्यावरच्या वादावादीला सामोरे जायचा प्रसंग माझ्यावर येतोच असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. मला एक गोष्ट कळत नाही कि हे केवळ माझ्याबाबतच घडते कि सर्वांनाच असे अनुभव येतात? तुमची चूक नसतानाही केवळ तुमच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन कोणी असभ्य भाषेत तुम्हाला शिव्या देऊ लागले तर तुम्ही काय करता? खरोखरच या प्रश्नांची उत्तरे मला हवी आहेत. कारण मला खात्री आहे अजून सहा एक महिन्यात किंवा वर्षभरात मला काहीही ध्यानीमनी नसताना अचानकपणे अशाच अजून एखाद्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे.

Group content visibility: 
Use group defaults

>>>एरवी ज्यांची आपले जोडे सुद्धा पुसायची लायकी नाही असले नीच आणि हलकट लोक आपल्याला सहजगत्या अपशब्द बोलून गेले?/ इतक्यात एक उपटसुंभ (हाच तो हरामी) आपली फडतूस बाईक घेऊन त्या टेम्पो ट्रॅक्सच्या पुढून थेट आडवा माझ्यापुढे आला/(एका अर्थाने ते बरे झालेही असते. असले हलकट लोक जगून करायचे तरी काय? दुसऱ्यांना त्रास देत जगत राहणार. असल्या भिकार**ना एकत्र करून कुठेतरी लांब नेऊन जाळून टाकायला हवे खरे तर). /पण मुजोर वृत्ती त्याच्या नसानसात भरलेली. पैदाइशच तशी असावी. डुक्कर घाणीतच लोळणार. तसे काही लोक शिकत नाही. आपली मूळ वृत्ती धरूनच राहतात/त्याच्या दिशेने "हाड रे कुत्र्या. हरामी" वगैरे ओरडून थोडी भडास काढली. पण बरोबर सहकारी मुलगी असल्याने त्याच्या शिव्यांना तसेच प्रत्युत्तर देऊ शकलो नाही याचे खूप वाईट वाटले. /तशी इथे हा दलदलीतला किडा चावल्याने मनाची आगआग झाली होती. नक्कीच तो काही कामधंदे न करणारा भुरटा गुंड असणार. कामधंदे करणारा असता तर अशी भाषा याने वापरली नसती. कुणाच्या तरी चुकीमुळे अशा औलादी कुठल्यातरी गटारात जन्माला येतात. काही कामधंदे न करता आयुष्यभर गुंडा मवालीगिरी करत इतरांना त्रास देत जगतात. आमच्या करावर यांना आम्ही पोसायचे. आणि हे वर आम्हालाच शिव्या देणार. आणि एकदिवस कुठल्यातरी गटारातच मरणार. हे लोक जिवंत ठेवायचे तरी कशाला?/ह्यांच्या पिढ्या तडफडून मरायला हव्यात. नामोनिशान नष्ट व्हायला पायजे ह्या हरामखोरांचे.
ही भाषा कोणत्या विचारांचे/कशाचे प्रतिबिंब आहे?????

>> मैत्रिणीने जीव वाचवला तुमचा..

हो. जीव कदाचित गेला नसता पण राडा नक्की झाला असता.

>> ऑफिसतही वरचेवर वाजतं का?

स्वत:ची चुकी असूनही त्याबद्दल खेद वाटायचे तर दूरच उलटपक्षी उद्दामपणा करतात काहीजण. हे थेट डोक्यात जातात. कुठेही असोत.

>> तुम्ही बी आहात काय?

बी??? नाही कळले.

>> मन आणि डोक शांत ठेवा व व्यवस्थित शरीर कमवा... अस रोड वर कोण नाही नादी लागनार मग तुमच्या...

मी शरीराने दुबळा नाही. दोघांना तर नक्की पुरून उरेन. पण नंतर बराच काळ जो मानसिक त्रास होत राहतो तो नको वाटतो. मागे एकदा असेच एका बाईकवाल्या कोलेजच्या मुलाबरोबर जोरात वाजले होते. खूप आधीपासून उजवा इंडिकेटर देऊन सुद्धा माझ्या उजवीकडून ओव्हरटेक करणे सुरूच. गाडी धडकली तर मलाच बोलायला लागला. मला इंडिकेटर दिसला नाही तुझे काय म्हणणे आहे अशी उर्मट भाषा. उतरलो आणि कानाखाली हाणली. मग त्याने बाईक माझ्या गाडीच्या आडवी घातली. गर्दी जमली. ट्राफिक जाम झाले. तो फोन करून कुणाकुणाला बोलवायला लागला. म्हटले बा ला बोलव तुझ्या. जवळजवळ अर्धा तास झोंबडं सुरु होतं. खूप राडा झाला. आजूबाजूला लोक हॉर्न वाजवत तोंडाकडे बघून वाट काढत निघून जात होते. सगळ्यात नुकसान हे झालं कि पुढे आठ दिवस माझी मानसिक शांती ठीक नव्हती. तेंव्हापासून हातघाईवर येणे टाळतो.

शिवाय आसपासच्या वस्तीतलाच जर कोणी असेल आणि त्यांनी मॉब जमवला तर शरीर असूनही उपयोग होणार नाही हा भाग आणि वेगळाच.

>> समोरच्याच्या "शब्दाने" माझी "सटकून जावी" इतका निर्बुद्ध मी नाही.
>> मूर्खांसमोरुन दोन पावले माघार घेतली/घ्यावी लागली, तर तो पळपुटेपणा/घाबरटपणा ठरत नाही

सर, मान गये. डोळ्यात अंजन घालणारी हि दोन वाक्ये आहेत. बरोबर माझ्या चुका जिथे होत होत्या तिथेच तुम्ही बोट ठेवलेत. माझ्या कार मध्येच समोर दिसेल असे लिहून ठेवतो आता हे कि कायम लक्षात राहील. मनापासून धन्यवाद. जगण्यातले असे फंडे क्लीअर झाले कि मोकळे वाटते.

>> असाच एक अनुभव मलाही आलेला. टाकू का?

हो लिहा कि

>> ही भाषा कोणत्या विचारांचे/कशाचे प्रतिबिंब आहे?????

मला किती मानसिक त्रास झाला त्याचे प्रतिबिंब आहे. स्वत: चूक करून मलाच शिव्या देणारे नुसते त्याचे थोबाड जरी आठवले तरी तिळपापड होतो अंगाचा. हेलीकॉप्टर मधून पेट्रोलचे फवारे उडवत ह्यांच्या सगळ्या वस्त्या पेटवाव्यात इतका राग आला होता. पण वरती limbutimbu ह्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आता वाटते आहे कि कुणाच्या शब्दाने आपली सटकने हे मूर्खपणाचे लक्षण आहे. आता सुधारेन.

>> मित्रा जरा हसायला शिका. तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील.

:)) :)) :))

एका समारंभात गेलेलो असतांना फक्त गैरसमजुतीवरून झालेला किस्सा आहे.
मित्रासोबत एका समारंभात जेवायला बसलेलो. सहज नजर गेली तेव्हा एका व्यक्तीने मला खुन्नस देऊन मानेनेच "काय?" असे विचारलेले. मला वाटले बहुधा तो माझ्यामागे त्याच्या कोणी परिचिताशी बोलत असावा. म्हणून मी तिकडे दुर्लक्ष करून माझे जेवण चालू ठेवले. थोड्या वेळाने संपूर्ण जेवणारी पंगत माझ्याकडे बघून एकमेकांशी कुजबुजू लागली. तेव्हा मला जाणवले की काहीतरी लोचा आहे.
काही वेळाने त्या व्यक्तीने आपले जेवण संपविले आणि त्याच्या मित्रांना सोबत घेऊन माझ्या बाजूला काही अंतर ठेवून माझे जेवण संपण्याची वाट पाहू लागला. मित्र तर केव्हाच पाणी प्यायला गेले होते. त्यामुळे मी तिथे एकटाच होतो. म्हटलं आता आर या पार. शांतपणे माझे जेवण संपविले आणि थोडीशी खुन्नस देत हात धुण्यासाठी तेथून उठलो. तेव्हा कोणीच मला हटकले नाही. त्यामुळे अर्थातच काही घडले नाही.
मी हात धुवून झाल्यावर मित्रांना फोन केला व विचारल्यावर ते बोलले की तू लवकर बाहेर ये. बाहेर आल्यावर त्यांनी मला सांगितले की त्या व्यक्तीला गैरसमज झाला आहे. त्याला वाटले की मी त्याच्या पत्नीकडे पाहून काही हावभाव केले आहे असे. त्यामुळे त्याने काही जणांना जमवून तुला जाब विचारायचे ठरविले होते.
अर्थात तसे काहीच न झाल्यामुळे मी जास्त काही विचार न करता तो विषय तिथेच सोडून दिला व घरी येऊन शांतपणे झोपलो.

@ सचिन७३८, बापरे! फारच कठीण प्रसंग गुदरला होता हो तुमच्यावर!!!

त्याला वाटले की मी त्याच्या पत्नीकडे पाहून काही हावभाव केले आहे असे. >>> पण त्याला असे का वाटले? सहज एक उत्सुकता म्हणून विचारतोय. गैरसमज नसावा.

माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं की जरी रस्त्या वर तुझी चुकी असेल तरी चुकून पण सॉरी बोलायचं नाही कारण बाकीच्या बघ्यांना काही माहीत नसते आणी जो सॉरी बोलतोय त्याची च चूक समजून तेही दोन चार शिव्या घालतात.

एकदा ट्रॅफिक जाम झालेल्या अरुंद रस्त्यात होतो. मागून लग्नातल्या पीपानी सारखे हॉर्न चालू होते.. उजवी कडून पुढे येणाऱ्यांनीच रस्त्याचा 70% भाग व्यापला होता.
(पुण्यातले रस्ते असेच हो )
अचानक उजवीकडची बाजू थोडी मोकळी दिसल्यावर लगेच गीअर उचलून क्लच सोडला तोवर एक डाव्या बाजू चा भसकन मधे घुसला. त्याच्या मर्तुँग्ड्या स्कूटी चा मागचा मड़गार्ड माझ्या पावरफूल एफ झेड ने तुटून गेला.
मी डोळे व नाक फुगवून त्याच्या कडे सॉरी च्या आपेक्शेने बघितले तर गडी अगदी तस्सेच नाकडोळे फुगवून बोलतो कसा -"क्या यार भैय्या???."
मी- अरे मधे घुसून वर मला च बोलतोय काय ??
तो- क्या ??

आता घ्या !!!

(याला मराठी येत नसाव समजून)
मी - अरे बीच मे घुस के ऊपर से मेरे को बोलता है क्या ??
तो(स्वतः ला अतिशहाणा समजत)
- गाडी चलाना सीख साले..

साले ????
अरे परराष्ट्र वाले !!!

सरळ मराठीत लायकी काढायची ठरवलं.

मी - साला तूझा बाप.. !! शेम्न्या...
त्याला बहुतेक समजलं असाव की मी त्याचा बाप काढलाय.
तो - क्या बोला बे ****???
तेवढ्यात आमच्या बायका (आय मीन बाइक्स ) थोड्या थोड्या सरकत होत्या पुढे. आणी त्या पोराच्या पुढे असलेल्या रिक्षावाल्याने कर्तब दाखवून सुळकन रिक्षा पुढे नेल्याने त्याच्या पुढे जागा रिकामी झाली.

ट्रॅफिक नीवळलं होतं..

संधी चा फायदा घेत त्याच्या स्कूटी ला अजून एक धडक देत पूर्ण हनुवटि वर उचलत बोललो.
-"पुढं बघ रताळ्या!"

'आजुबाजू चे मराठी लोक आपल्या कडे चिडून पाहत आहेत. आपल्या पुढे जागा असून आपण भांडत बसण्या पेक्षा पुढे जाऊन या पोराला थांबवून मग याच्याकडे बघू' असा विचार करत त्याने पुढे जाऊन गाडी बाजूला घेतली आणि मागे वळून त्या पोराला पाहू लागला.

आणि मी...
(अरे एफ झेड दादा....! मागे कुठे बघतोस.....!)

त्याच्या पुढे फर्लांग भर जाऊन विजयी हास्याने मम्मीने सांगितलेले टमाटे आणायला सुसाट सुटलो होतो....

हा प्रसंग मी पुपुवर टाकला होता, पण हे रस्त्यावरचे भांडण, वाहुन जाणार पुपुवरुन म्हणुन इथे देतोय......

>>>>> Submitted by limbutimbu on 5 May, 2017 - 10:54

कान्द्या, फेब१७ मधिल बीआरेम मधे एक प्रसंग घडला होता खंडाळा(खंबाटकी घाटा अलिकडचे) चेकपॉईण्ट वर, (इथे येईस्तोवर सायकलपटूंचे जवळपास १४० किमी इतके अंतर कापुन झालेले होते)
वीसेक एक्स्पर्ट सायकलपटू त्यास साक्षीदार होते.
एक जण होता, तो एका सायकलवाल्याला म्हणाला सायकल दे राईडकरता... सायकल दिड पावणेदोन लाखाची, सायकल वाल्याने नम्रपणे सांगितले की मला लगेच निघायचे आहे, नाही देता येणार.
तो माणुस परत फिरुन आला पंधरावीस मिनिटांनी, अन वाद घालू लागला, अजुन तर इथेच बसलात की मग द्यायला काय झाल वगैरे....
तरी म्यानर्स सांभाळीत सायकलवाला म्हणाला कि, अहो तिचे सेटींग असते, आम्ही रेस मधे आहोत्,सेटींग बिघडुन चालणार नाही, दुसर्‍या कुणाला नाही देता येत....
तर याचे आपले एकच पालुपद अन टीपकल आडव्यात शिरणे...
समजावुन सांगता सांगता, काही जणांनी त्यास हसर्‍या चेहर्‍याने सांगितले की सायकल नाही देता येणार... रेस मधे आहेत...
तर मग त्याची भुणभुण सुरु झाली.... तुम्ही माझ्याकडे बघुन हसलातच का......
मग नेहेमीची टीपिकल रोडसाईड गुंडागर्दी, याला फोन कर त्याला फोन कर, माणसे बोलावतोय वगैरे , अंगावर धावुन येणे वगैरे....
मी एकदा त्याला दमात घेतला, की इथे काय मोगलाई नाय लागलेली, जा तुला काय करायचे ते कर.....
तोवर चेकपॉईण्टवर आलेल्या इतर सायकलपटूंना प्रसंगाचे गांभिर्य कळले.
माझेबरोबर लिंबी होती, तर तिच्याशीही हा वाद घालत बसलेला.... पिऊन नव्हता...
ज्याची सायकल मागितली होती तो केव्हाच निघुन गेला.
याने मोटर सायकल काढताना मुद्दामहुन एका सायकल ला ठोकले....
तरी सगळे सायकलपटू, आमचा चेकपॉईण्ट लिडर, स्वतःस सावरुन होतो... कुठे या मूर्खांच्या नादी लागणार?
या सगळ्यात मीच वयस्कर, शिवाय सोबत लिंबी.... त्यामुळे आम्हाला भिती वाटू नये म्हणुन व इतर परिस्थिती बघुन साताठ सायकल पटू पुढे न निघता आमच्या सोबतीला थांबुन राहिले.....
या आडग्याचे तुणतुणे चालुच, मला हसलात का?
त्याला काहीही करुन भांडण उकरुन काढायचेच होते...
शेवटी एका क्षणाला, आमच्यातील एका सायकलपटूची सटकली....
म्हणाला, उखाड, माझी काय उखाडणार आहेस, इथेच, आत्ताच.... (अगदी अभ्भी के अभ्भी स्टाईलने) मग मी पण बघतो...! एका बापाचा असशील तर माणसे बोलवायचि धमकी का देतोस, उखाड की..... !
हा सायकलपटू आडदांड होताच.... अन त्याने बाकिच्यांना आम्हांला बजावले, एकानेही मध्यात पडायचे नाही... मी बघतो हा काय करतोय ते.....
लई राडा झाला राव.....
इतक्या जोरदार पद्धतीने झालेला विरोध बघता त्या आडग्याची त त प प होऊ लागली....
त्या आडग्याचे बरोबरचे माणसास सांगितले मी, की आवरा या येड्याला...
ही लोक शहरी दिसली तरी अस्सल गावरानच आहेत, दोन चारशे किमी सायकलिंग एका दमात करणारी ही लोकं, मस्क्युलर पॉवर्बाज आहेत, त्यांच्या हाताची एक झापड किम्वा दणदणीत तंगडीची एक लाथ बसली, तर हे ब्येण पाणी मागायला उठणार नाही.... कशाला उगा पंगा घेतोय? कुणाशी? काय गरज? आम्ही "रेसचे ऑफिसर" असुनही कुणाच्या सायकल ला हातही लावत नाही. समजवा त्याला....
मग बरोबरच्याने त्याला धरुन नेले, तरी त्याची बोम्बाबोम्ब चालुच होती, वाटेत बघतो, खपवतो एकेकाला..... वगैरे !
असेही प्रसंग येतात... <<<<<<<<<<
**********************

खूप जुना एक किस्सा आठवला ... law कॉलेज रोड वरचा ... माझा सिग्नल सुटला म्हणून मी नळ स्टॉप कडे निघालो तर एक हिरो सिग्नल तोडून घुसला. त्याच्याशी होणारी धडक टाळण्यासाठी मी ब्रेक मारला आणि bike घसरली ... silencer खाली पाय अडकून भाजला .. एक पोलीस पण आला तर हा माझ्यावर आरडाओरडा करायला लागला ... मी आधी शांतपणे पाय सोडवला आणि पोलिसांसमोर दिली त्याच्या मुखात वाजवून ... गप झाला ना गाडी एकदम .. चुपचाप सॉरी म्हणून निघाला ...
पोलीस म्हणाला यांना हीच भाषा समजते ... आता बोला

<<
तुमची चूक नसतानाही केवळ तुमच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन कोणी असभ्य भाषेत तुम्हाला शिव्या देऊ लागले तर तुम्ही काय करता?
>>
आयुष्यात काय महत्वाचे आहे? हे आठवतो आणि मार्गस्थ होतो.

Pages