"हाल चाल ठीक ठाक है"

Submitted by फारएण्ड on 30 April, 2017 - 13:10

जनरली आपण गप्पा मारताना सरकार, समाज/लोक यांचा विषय आला, की "पूर्वीपेक्षा आता बेकार आहे" असा टोन आपोआप ऐकू येतो. दहा वर्षांपूर्वी, वीस वर्षांपूर्वी तेव्हाच्या परिस्थितीबद्दल तसेच ऐकू यायचे. मग प्रश्न पडतो की हे सगळे चांगले होते कधी? गुलजार च्या 'मेरे अपने' मधले हे गाणे ऐकले तर पूर्वीही लोक तसेच म्हणत असेच वाटेल.

हा पिक्चर आला १९७१ साली. जरा संदर्भ समजून घ्यायला तेव्हाची स्थिती/घडामोडी बघितल्या तर स्वातंत्र्य मिळून २५ वर्षे होत आली होती, तो नेहरूंच्या काळचा आदर्शवाद वगैरे सगळे बहुधा तोपर्यंत लोक विसरले होते, गूँगी गुडिया म्हंटल्या गेलेल्या इंदिरा गांधींनी सरकारात स्वतःचा जम बसवताना राजकारणाला ही वेगळे वळण दिले होते, आणि बांगला देश युद्धात मिळालेल्या विजयामुळे त्यांचे स्थानही पक्के झाले होते. पण सरकार व समाज भ्रष्ट होत गेल्याने एकूण सामाजिक परिस्थितीवर अशा प्रकारची भाष्ये साधारण याच काळात येउ लागली असावीत. कारण पुलंनी ही त्यांचा "एका गांधी टोपीचा प्रवास" हा कॉंग्रेस पक्षाच्या बदललेल्या इमेज बद्दल याच सुमारास लिहीला (हा 'खिल्ली' च्या नंतरच्या आवृत्त्यांमधे सुद्धा आहे). त्यामुळे भारतात हा असा 'cynical' टोन नक्की कधीपासून पॉप्युलर कल्चर मधे येउ लागला ते माहीत नाही पण कदाचित याच सुमाराला असेल.

त्याच परिस्थितीवर हे गुलजारचे गाणे आहे - "हाल चाल ठीक ठाक है". एकूण उपरोधिक भाषा मस्त जमली आहे. किशोर व मुकेश नी गायलेही आहे मस्त.

"आब-ओ-हवा देश की बहोत साफ है, कायदा है कानून है इन्साफ है
अल्ला मियाँ जाने कोई जिये या मरे, आदमी को खून वून सब माफ है"

हे त्यातल्या त्यात लगेच समजणारे कडवे, पण यात व इतर दोन्ही मधे सुद्धा असलेला उपरोधिक टोन सहज कळतो. अन्नधान्याचे रेशनिंग सगळीकडे सुरू असताना "भाषण पे राशन नहीं है यहाँ" सारखी वाक्ये, "छोटी मोटी चोरी, रिश्वतखोरी, देती है अपना गुजारा यहाँ" सारखी वाक्ये एकदम चपखल आहेत.

सुरूवातीलाच एका भिंतीवर "Save people from massacre in Bangladesh" लिहीलेले दिसते. त्यातही " Save people from massacre in" हे आधीचेच आहे आणि खालचे ठिकाण बहुधा घटनेप्रमाणे बदलत असावे, कारण आधीचे पुसून त्यावर बांगला देश लिहीलेले आहे. हा खास गुलजार टच आहे की काय कोणास ठाउक. ७१ साली बांगला देश प्रश्न होता त्यामुळे बांगला देश चा उल्लेख साहजिक आहे, पण ज्या पद्धतीने ते भिंतीवर लिहीलेले गुलजार ने पकडले आहे ते ठरवून असावे.

गाण्याची शब्दरचना कोणाला तरी पत्र लिहीताना केल्यसारखी, पण मजेदार वाटते. मेरे अपने बघून अनेक वर्षे झाली त्यामुळे पूर्ण संदर्भ माहीत नाही. पण एका मोहल्ल्यात मारामारी होते, तेव्हा तिथे "हा मोहल्लाच सोडून दुसरीकडे जायला हवे" असे कोणीतरी म्हणते, त्यावर एक जण "अब बात गली मोहल्ले की नही रही, पूरे देश का यहीं हाल है" असे म्हणतो, आणि हे गाणे सुरू होते. "हालचाल ठीक ठाक है/आपकी दुआसे बाकी ठीक ठाक है" हे सतत असलेले वाक्य, काही गोष्टी सांगून झाल्यावर "और क्या कहूँ?" असे पुन्हा पुन्हा येणे, यातून तो पत्राचा "फॉर्म" मस्त पकडला आहे गुलजार ने. ते पहिले पाच तरूण लोक कदाचित सुशिक्षित बेकार असावेत. एक दोघे अगदी टिपिकल बेकार लोक चित्रपटात दाखवत तसेच दिसतात. पेंटल व डॅनी ओळखले, बाकी तिघे कोण आहेत माहीत नाही. तो एक जाकीट वाला म्हणजे ६० च्या दशकात मदनमोहन च्या काही लोकप्रिय गाण्यांत अगम्य हीरो असायचे त्यातला चुकून इकडे आल्यासारखा वाटतो.

आणि निव्वळ गाणे म्हणून ऐकताना किशोर ची रेंज जाणवते. पेंटल च्या माकडउड्यांना सुसंगत तसा आवाज देत काही ओळी त्याने विनोदी स्टाइलने गायल्या आहेत, तर विनोद खन्ना च्या गंभीर ओळी म्हणताना तो तितकाच गंभीरही झालेला आहे. दोन वेगळे गायक गात आहेत असे वाटेल इतका फरक आहे.

विनोद खन्ना बद्दल आलेले लेख, फोटो पाहताना हे गाणे आज परत आठवले. विनोद खन्ना, धर्मेन्द्र, सुनील दत्त वगैरे सारख्या हीरोज च्या तेव्हाच्या अनेक सीन्स मधे त्यांच्या मूळच्या हॅण्डसम व्यक्तिमत्त्वामुळे एक नॅचरल ग्रेस असे. विनोद खन्ना यातही तसाच वाटतो. कसलीही कृत्रिम हीरोगिरी न करता तो आपोआप स्टायलिश दिसतो यात. एकूणच ते ७० च्या दशकातले हीरो लोक गरीब्/मध्यमवर्गीय रोल्स मधे आपोआप सूट होत (आता एखादा परश्या किंवा तो मसान मधला हीरो असे फार थोडे लोक असे गरीब रोल्स मधे नॅचरल वाटतात). यातही विनोद खन्ना सायकलवरून चढावर येताना, किंवा नंतर नुसता पाय टेकवून उभा राहताना वेगळी अॅक्टिंग करतोय असे वाटत नाही.गेल्या २-३ दिवसांत आलेले लेख व फोटो बरेचसे हे ८०-९० च्या दशकातील त्याच्या रोल्स बद्दल होते. तरूणपणीचा विनोद खन्ना कसा होता याचे उदाहरण बघायचे असेल तर हेच गाणे पाहा - विशेषत: "जीने की फुर्सत नहीं है यहाँ" म्हणताना!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यातल्या शिट्टीने बरेच दिवस डोक्याला भुंगा लावला होता. मग अचानक एक दिवस सापडलं - शपथ या बोटांची - या मराठी गाण्यात ही शिटी कॉपी केलीय. बाकी मेरे अपने कायमच अॉल टाईम फेव्हरिट मधे आहे.

मेरे अपने मोस्ट फेव्हरेट मध्ये कायम आहे,

बाकी, अगदी माझ्या मनातलं उतरवलंय हो फार एण्ड!!! तरी थोडासा आवरलेला वाटला, वेळ मिळाला की मीही थोडं लिहितो धाग्यावर...

मस्त लिहिलंयस.
गुलजारकडे जीतेंद्रसुद्धा मध्यमवर्गीय आणि (तरी Proud ) ग्रेसफुल दिसला तिथे विनोद खन्ना दिसेल यात नवल नाही. Happy

आँधी चार वर्षांनी आला, त्यातही (गुलजारचंच) 'सलाम कीजिये, आली जनाब आये हैं' हे असंच सिनिकल गाणं आहे.

त्याआधीही साहिर इ. मंडळी स्वातंत्र्यानंतर झालेल्या भ्रमनिरासाबद्दल असंच किंवा याहून कडवट लिहितच होती.
(आसमाँ पे है खुदा और जमीं पे हम - फिर सुबह होगी)

छान थोडा हटके लेख. ते मध्यमवर्गीय हिरोचे लिहिलेले पटले. हल्ली मध्यमवर्गीय असे काही मेन स्ट्रीम हिण्दी चित्रपटात नसतेच बहुधा..

विनोद खन्ना गेला.. पण या निमित्ताने त्याचे फारच चिकणे फोटो बघायला मिळाले. रिअल हॅण्डसम गाय !

जेव्हा टीवीवर पाहिला तेव्हा मला त्या वयात खूपच बोरींग आणि दु:खी वाटलेला. बाबांच एकदमच फेवरेट गाणं, हालचाल ठिकठाक है... लहानपणी एकून एकून पाठ एकदम... शिट्टी सुद्धा तसेच वाजवत.

७१-७२ वगैरे दर्म्यान, नोकरी मिळाणे कठीण झाले होते... बाजूच्या देशाबरोबर झालेले युद्ध, परतलेले लोकांचे लोंढे, बकाली , बेरोजगारी वाढलेले असले बाबांनीच सांगितलेले संधर्भ आठवताहेत. माझा एक चुलत काका हेच गाणं शिट्टी मारत बसायचा , दोन वर्षे नोकरी न्हवती.. काळ तो ह ७०-७२.

तसेही मी विनोद खन्नाचे मूवीच कमी पाहिलेलेत. विनोद खन्ना दिसायला खूपच रूबाबदार होता. त्यामानाने दोन्ही मुलगे अगदी चमू आहेत.
तो तिसरा मुलगा येडपट वाटतो..

माझ्या आईला राज कपूर, शम्मी कपूर, राजेश खन्ना नंतर विनोद खन्ना इतके आवडायचे की त्यावेळी टीवी ह्यांचे मूवी आले की परत पहाते.
आधी पाहिले असले तरी..

छान थोडा हटके लेख.>>>> +१ Happy

ते आधी दुसरं खोडून बांग्ला देश वगैरे नक्की गुलझार डोकं वाटतय.
त्या ५ जणांमधला अजून एक म्हणजे दिनेश ठाकूर.

यातही विनोद खन्ना सायकलवरून चढावर येताना, किंवा नंतर नुसता पाय टेकवून उभा राहताना वेगळी अॅक्टिंग करतोय असे वाटत नाही>>>>> परफेक्ट!! Happy

मस्त लिहिलय. तो डॅनी आहे विश्वासच बसत नाही. तो दाढीवाला म्हणजे दिनेश ठाकूर. रजनीगंधा मधे पण होता.

असंच अजून एक गाणं आठवलं - रोटी, कपडा और मकान मधलं. बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई. फार सुरेख आहे हे देखील गाणं.

छान लिहील आहे.
हे गाण आधी ऐकल नव्हत पण विनोद खन्ना काय हॅन्ड्सम दिसतोय..
डेनी टायगर सारखा दिसतोय ह्या गाण्यात Lol

धन्यवाद लोकहो!

नानाकळा - जरूर लिहा.

त्याआधीही साहिर इ. मंडळी स्वातंत्र्यानंतर झालेल्या भ्रमनिरासाबद्दल असंच किंवा याहून कडवट लिहितच होती. >> माझ्या डोक्यात अशी स्पेसिफिक गाणी आली नाहीत मी आठवत होतो तेव्हा. 'प्यासा' मधली गाणी सुद्धा एकूण सामाजिक परिस्थितीवर असली तरी या गाण्यात एक सरकारवर रोख आहे तो वेगळा वाटला.

मस्तच! गुलजारची पोलिटिकल कॉमेंट्स करणारी 'हुतूतू' मधली गाणीही अशीच टोकदार आहेत.
'बीए किया है एमए किया, लगता है वो भी एवैं किया', मधला टिपीकल पंजाबी 'एवैं' मला तरी यानंतर थेट बँडबाजाबारात मधेच भेटला.

मस्त. मी हे गाणं पाहिलं नव्हतं.
आणि विनोद खन्नासाठी तो हार्ट्स-फॉर-आईज वाला इमोजी.
एकूणच त्या काळातले सिनेमे पाहून आपण तेव्हा तरुण असायला हवं होतं असं मला अजूनही वाटतं. गुलजार, श्याम बेनेगल, किशोर कुमार, स्मिता पाटील वगैरे वगैरे.

मस्त लिहिले आहे.

पूर्वीच्या काळातील विनोद खन्ना आणि धर्मेंद्र हे प्रचंड आवडीचे हिरोज. मी सिनेमा पहिलेला नाही. रडका आहे असे वाटते म्हणून.
मध्यमवर्गीय हिरोचे लिहिलेले पटले. मध्यमवर्गीय असे काही मेन स्ट्रीम हिण्दी चित्रपटात नसतेच बहुधा >>>+१

मस्त लिहिले आहे. गुलझार हा अत्यंत प्रतिभावान कवी आणि कलाकार आहे ह्यात शंकाच नाही. त्याचा फाळणी, काँग्रेस ह्या प्रकारांवर एक सुप्त राग आहे तो व्यक्त होत असतो. मला वाटते माचिसमधेही असे काहीतरी संवाद आहेत.

विनोद खन्नाचेही काम मस्तच आहे. दिग्दर्शकाने (गुलझारच) सगळ्यांकडून खूपच चांगले काम करुन घेतले आहे.

आज जे काही ऐकायला मिळते आहे त्यावरून बांगला देशात खरोखरच कत्तली होत होत्या. मुक्ती वाहिनी वगैरे आंदोलने तेव्हाच चालू असली पाहिजेत. पंजाबी पाकिस्तान्यांनी बंगाली लोकांच्या मोठ्या प्रमाणात कत्तली केल्या होत्या. अर्थात भारतात आपली दुखणी असताना बांग्लादेश वगैरे भानगडी कशाला असे सामान्य लोकांना वाटणे स्वाभाविक आहे.

खूप छान आठवण.

सुरेख लेख!!
विनोद खन्ना माय ऑल टाईम फेव्हरेट Wink

छान लेख फार एंड. फोन वरून वाचला आधीच. पण इंग्रजीत प्रतिक्रिया द्यायची नव्हती. मुळामध्ये शीर्षक वाचल्यावर माझी कल्पना अमेरिकेतील चालू घडामोडीवर फारेंडने उद्वेगाने काहीएक लेख लिहीला असावा अशी झाली. पण लेख उघडल्यावर वेगळेच होते. [ थोडा विचार केल्यावर वाटले की ह्यातच त्या गाण्याचे यश आहे. सत्तरच्या दशकात कॉलेज मध्ये असलेल्या मुलांच्या भावना ह्या सिनेमात आहेत.
तेव्हा रवी व त्याचे मित्र फर्गुसन मध्ये हॉस्टेलात राहून शिकत होते. व त्यांच्यातही असे वेगवेगळे मत प्रवाह, भांडणे काही मारामारी करणारे गृप असे सर्व होते. त्यांना हे गाणे व चित्रपट खूप अपील झाले होते असे रवी कडून ऐकले होते बर्‍याचदा. गाणे मला पण खूप आवडते. विनोदखन्नाची मी काही फॅन नव्हते पण त्याचे काम आवडायचे. इम्तेहान मधील गाडी बुला रही है व रुक जाना नही जास्त करून आवडीचे. काय ती उंची व स्वॅगर. बेल बॉटम तो कॅरी करू शके. अमर चा रोल पण नीट होता पण माझी पसंद तेव्हाही एंथनी भाईच होती. श बाना व विनोद कपल जरा अंडर स्टेटेड वाटे.

अजून एक अश्या धर्तीचे गाणे : चीनों अरब हमारा, हिंदोस्ता हमारा, रहने को घर नहीं है सारा जहां हमारा.

मध्यमवर्गीय हिरो असले पाहिजेत असे मला नेहमी वाट्त आले आहे आता सध्या सर्व अमीर व फॉरिन मध्ये राहणा रे प्रायवेट जेट टाइप्स. ह्रि तिक रोशन रनवीर कपूर कंपनीचे ते एक लिमिटेशन आहे. अति श्रीमंत वाटतात. व वागतातही. त्यामानाने रजनीकांत जुन्या सिनेमात तरी साध्या घरात राहणे आईची सेवा करणे लायनीत उभे राहणे असे डेफिनेशन असलेले रोल सुद्धा नीट करत असे. त्यामुळे कॉमन पब्लिकला त्या च्याशी र्हाइम करणे सोपे जाई. असले रोल्स बॉलिवूड मध्ये लिहीले जात नाहीत फारसे. मेन स्ट्रीम मध्ये तरी नाहीच.

जास्त करून आवडीचे. काय ती उंची व स्वॅगर. बेल बॉटम तो कॅरी करू शके. >>>>> परफेक्ट!! बेल बॉटम भारी कॅरी करायला उंची जास्त हवी. म्हणूनच बच्चन खरं दिसायला खन्ना पुढे डावा असला तरी अंगभूत असलेला प्रचंड कॉन्फिडन्स आणि उंचीमुळे एकदम उजवा वाटायचा. अमर अकबर मध्ये आंथोनीभाय (आणि जेनी ऑफ कोर्स! Blush ) सोडून दुसरीकडे कुठे नजरच जात नाही. Happy

शेवटच्या पॅरा ला +१ अमा! तुमचं आमचं पिच्चरांमध्ये जमलय! Happy