कशी लावायची भाज्यांची गोडी?

Submitted by सई केसकर on 22 April, 2017 - 01:55

माझा मुलगा ६ महिन्याचा झाला तेव्हापासून तो ८ महिन्यांचा होईपर्यंत मी आदर्श माता होते. कारण मी जे देईन ते तो बकाबका खायचा. नाचणी, अंडे, चिकन सूप, भाज्यांचे सूप, कुस्करलेली भाकरी, दही, फळं काही नाही म्हणून नाही. पण ८ महिन्यांचा झाला आणि त्याला जीभ फुटली. त्यानंतर त्यानी जे काय खाण्याचे नखरे सुरु केले ते कमाल होते. तरीसुद्धा १-२ या वयात त्याला थोडीतरी समज होती. २ वर्षांचा झाल्यापासून थयथयाट करणे हे एक नवीन अस्त्र त्याच्या हाती लागले आहे. त्यामुळे कुठलीही अप्रिय सवय लावताना आमच्या घरात प्रचंड दंगा होतो. आधी तो तीन बाजूंनी असायचा. मी, माझा नवरा आणि मुलगा तिघेही एकमेकांवर चिडायचो. पण हल्ली आम्ही त्याच्याकडे त्याच्या या दंग्यात दुर्लक्ष करायला शिकलोय.

कुणी कितीही "मुलांच्या कलानी" घ्या असं सांगितलं तरी काही बाबतीत थोडी शिस्त या वयातही लावावीच लागते. जेवणाच्या बाबतीत आम्ही काही नियम केले आहेत ते मी इथे देते. या धाग्यावर सगळ्या अनुभवी आई बाबांनी आपापल्या मुलांना चौरस आहार घेण्याकडे कसे नेऊन ठेवले त्याच्या युक्त्या लिहाव्यात ही विनंती. कारण आमच्यासारखे मायबोलीकर नित्य अशा युक्त्यांच्या शोधात असतात.

आम्ही केलेले नियम

१. जेवताना कुठलेही करमणुकीचे साधन/खेळणे वापरायचे नाही.

एकदोनदा त्याचा दंगा बंद व्हावा म्हणून मी त्याला यूट्यूबवर गाणी लावून दिली. पण त्यानंतर त्याला काही दिवस तशी सवय लागली. आणि मग आपण काय जेवतो आहोत याकडे त्याचे लक्ष नसायचे. त्या ऐवजी आता जेवताना मी त्याला त्याच्या जेवणाबद्दलच काहीतरी गंमत करून सांगते. आणि तटाकडे लक्ष द्यायला लावते. हे आता गेल्या २-३ महिन्यात नीट जमले आहे.

२. नो बेकरी
मध्यंतरी विक्रमला वेगवेगळी बिस्किटे खायचा फारच नाद लागला होता. त्यामुळे त्याच्या जेवणावर परिणाम व्हायचा. यासाठी आम्ही दोघांनी घरी बिस्किटे आणणे किंवा, आपण ती खाणे, पण त्याला न देणे हे बंद केले. तसे केल्यापासून त्याचे बिस्कीटवेड बरेच कमी झाले आहे. आजी आजोबांकडे गेला की ते त्याला काय हवं ते देतात. पण म्हणतातच ना, व्हॉट हॅपन्स अॅट ग्रॅनीस, स्टेज अॅट ग्रॅनीस! बिस्किटांबरोबर ब्रेड, बाहेरचे केक सुद्धा पूर्ण बंद केले. मी आठवड्यातून एकदा घरी केक बनवते.

३. मधल्या भुकेला सिझनल फळे आणि केळी
कुठेही बाहेर फिरायला वगैरे गेलो की आम्हाला फळांचा खूप आधार वाटतो. मधल्या भुकेला आंबा, संत्रे, केळी दिल्याने चिप्स, बिस्किटे वगैरे टाळले जाते. पण यातही मुलं हट्ट करतातच. त्यामुळे ६० % जरी यश मिळाले तरी आम्ही खूप मानतो.

४. भाज्यांचे पराठे
वेगवेगळ्या भाज्या घालून केलेले पराठे हल्ली नियमितपणे घरी केले जातात. त्यामुळे ताशा भाज्या तो खातो.

फक्त, पोळी-भाजी-भात-आमटी असा सगळा आहार घेताना भाजी नको म्हणतो. मग मी भाजी भातात कमी कॉन्सन्ट्रेशननी कालवून देते. हे कॉन्सन्ट्रेशन जरी जास्त झाले तरी लगेच ड्रॉवर उघडल्यासारखा घास साभार परत येतो!
मुलांना अशा भाज्या फसवून कधीपर्यंत द्याव्या लागतात? आणि त्या त्यांनी खाव्यात म्हणून काही गमती जमती कुणी केल्या आहेत का?

भाज्या घालून करायच्या रेसिपीज सुद्धा चालतील कारण कुठल्याही रूपात भाजी गेली तरी तिच्या चवीशी मैत्री होतच असते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी मोठी मुलगी अगदी लहान असल्यापासून सगळ्या भाज्या, अगदी शेपूपासून पडवळापर्यंत व्यवस्थित खायची. त्या उलट धाकटी मुलगी अत्यंत कंटाळा करायची भाज्या खायला. उसळी सगळ्या व्यवस्थित खायची. पण भाजीचा एकही घास नाही. त्यावेळी मी खूप पॅनिक झाले होते. मोठ्या मुलीला इतक्या चांगल्या सवयी आणि हिला काय झालं अजिबात भाजी न खायला असं वाटून. समजावण्याच्या पेशन्स संपल्यावर जबरदस्तीने ताटातली भाजी संपवायला लावणं, ओरडणं वगैरे रोज व्हायचं. एकदा पालकाची भाजी खाताना तिला जोरदार उलटी आली. त्यावेळी मात्र मला फार वाईट वाटलं. मी ठरवलं की हिला अजिबात भाज्यांचा आग्रह करायचाच नाही. मग जेवताना ती जे मागेल पोळीबरोबर ते द्यायचे. तिला विचारायचे काय हवं आहे. तिला वरणात पोळी कुस्करुन खायला आवडायची. मग मी वरणात लाल भोपळा, दूधी भोपळा, कोबी वगैरे एकजिव करुन द्यायचे. माझ्या लक्षात आलं ती कच्च्या कोशिंबिरी खूप आवडीने खाते, तिला फळं आवडतात सगळी. पराठ्यांमधली भाजी खाते. मग मी जवळ जवळ तीन वर्षं यावरच समाधान मानलं. ती स्वतःहून भाजी मागेस्तोवर द्यायचीच नाही. ताटात वाढायची, पण नाही संपवली तर ओरडायचं नाही. एरवी फळं भरपूर खाते, कोशिंबिरी खाते ना, बास आहे असं म्हणायचे. त्यावेळी भरपूर ऐकून घेतलं सगळ्यांकडून कुठे गेल्यावर की हे काय? अशी कशी अजिबात भाजी खात नाही.
मजा म्हणजे शेंगांच्या भाज्या, पडवळ वगैरे सोडलं तर ती स्वतःहून सगळ्या भाज्या आवडीने खायला लागली साधारण आठेक वर्षांची झाल्यावर. तिला कोणतीही भाजी पंजाबी स्टाईल ग्रेव्हीमधे करुन दिली तर नुसतीही खाते आवडीने. दह्यामधेही घालून खाते काही वेळा ती भाज्या. आता तर सगळ्याच खाते. पण अजूनही कोशिंबिरी, सलाडचं प्रमाण भाजीपेक्षा दुप्पट असतं तिच्याबाबतीत. मटार वगैरे कच्चे कितीही खाते, पण शिजवलेले आवडत नाही वगैरे. पण उलट मी हे हेल्दी मानते.
त्यामुळे मुल भाज्या खात नसेल तर आपण भाजीबाबत ऑब्सेस्ड होण्यात काही अर्थ नाही. खातात मुलं स्वतःहूनच नंतर.

दिवसातून एकदा ताज्या भाज्यांचं सूप मुलांना आवडतं ते सिझनिंग घालून द्यावं, वेगवेगळी रंगिबेरंगी सलाड्स छानशा ड्रेसिंगमधे करुन द्यावीत. कशाला हव्या आहेत तेलातल्या, फोडणी, मसाल्यांमधल्या, शिजवलेल्या भाज्या ज्यांना आवडत नाहीत त्यांना. मोठी झाली की खातात ती.

अवांतर आठवलं. माझ्या शेजारणीचा मुलगा आई किंवा आजीच्या हातची भाजी अजिबात खायचा नाही, पण आमच्याकडे आला की नीट खायचा, माझा पुतण्या बाहेरची तयार भाजी कितीही तिखट असली तर पटकन संपवायचा. तेव्हा चवबदल करुन बघावा भाज्यांच्या बाबतीत.

माझा मुलगा वयाची पहिली २ वर्ष फक्त फळं खायचा, दिवसातुन २ ग्लास दुध, ताक, दही, खाल्ला तर ४ घास भात एवढयावरच असायचा. मात्र व्यवस्थित अॅक्टिव्ह होता.
तो भाज्या, भात, वरण खात नाही याचा मी प्रचंड त्रास करुन घेतला आणि त्यालाही पिडलं पुष्कळ.
आता तो ६ वर्षाचा आहे बर्यापैकी सगळ्या भाज्या, चपाती, वरण- भात, उसळी खातो अधून मधून थोडे नखरे असतात पण ते त्या त्या वयाचा भाग आहेत.
.धाकटी मुलगी झाल्यावर मी ठरवलं होतं की तिला उगीच त्रास देणार नाही नशीबानं ती पोळी-भाजी, भात-वरण, काही ठराविक फळं आवडीने खाते.दही-ताकाचा मात्र वासही घेत नाही.
ऐवढ्या अनुभवाने मी काही गोष्टी शिकले
१ जेवताना टिव्ही लावुन द्यायचा नाही लावलाच एखाद्या दिवशी तर
मुलांना स्वत: बसुन भरवायचं.मुलांसाठी जेवणापेक्शा टिव्ही खुप जास्त ईन्ट्रेस्टिंग असतो.
२ जंक फुड कमी करायचं.
अवेळी खाल्लेलं एक बिस्किट एक वाटी वरणाची भुक घालवतं, असं म्हणतात.
३ अति लाडानं किंवा सुपरमॉम होण्याच्या नादात जेवताना फार ऑप्शन द्यायचे नाहीत. विकेंडला करुन खाऊ घालेन असं सांगायचं. मात्र दिलेला शब्द पाळायचा
४पिस्ते खाल्ले तर बदाम का नाही खाल्ले, आंबा खाल्ला तर गाजर का नाही खाल्लं असं म्हणून आपण त्रास करुन घ्यायचा नाही.
एका जेवणात सगळी पोषणमुल्य जातात का हे पाहण्यापेक्शा दिवसभरात काय खातात ते पहावे.

५ एखाद्या दिवशी पुर्ण मोकळीक द्यायची. दुधाला सुट्टी द्यायची.
मात्र याची ऊरलेला आठवडा अधे-मधे आठवण करुन द्यायची की आपणही त्यांच ऐकतो.
६ मुलाला ज्या सुपरहिरो चं प्रेम अाहे त्याच्या गोष्टी सांगायच्या.
आमच्याकडे हनुमान कसा डोंगर ऊचलतो कारण तो दुध पितो, हेल्दी खातो हे वर्क होतं.
७ डबा संपवला, नीट जेवले तर रिवॉर्ड करायच,कौतुक करायचं.
बागेत घेउन जाऊ किंवा नवीन गोष्ट सांगु असं.
८ ताजं, हेल्दी जेवणं, नीट अभ्यास करणं आणि भरपुर खेळणं हे लहान मुलांचं काम हे त्यांच्या मनावर बिंबवायचं
लॉंग रन मधे उपयुक्त ठरते.
९ अधून मधून जगात कित्येक मुलं पोटात भुक घेउन झोपतात हेही सांगत राहते.
१० आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांनी सणसणीत जेवावं असं वाटत असेल तर त्यांच आधी खाल्लेलं अन्न पचलं पाहीजे त्यासाठी मैदानात भरपूर खेळलं पाहीजे.

इथे अनेक पालकांनी जेवताना मुलांना टिव्ही, आयपॅड लावून देण्याच्या विरोधात मत व्यक्त केलं आहे. पण मी मात्र त्याच्या फारशी विरोधात नाही. २ ते ५ वर्षाची मुलं एका जागी स्थिर बसणं तसं कठिण असतं. त्यासाठी त्यांना गोष्टी सांगणे, पुस्तकं वाचून दाखवणे असं काहीतरी करावं लागतं. थोडक्यात त्यांची करमणूक करावी लागते. मग ही करमणूक करायला technology ची मदत घेतली तर काय बिघडतं? बाकी कितीतरी बाबतीत, बालसंगोपनात सुध्दा आपण technology ची मदत घेतोच की....
माझी मुलगी २ ते ५ वर्ष ह्या वयात जेवताना बर्‍याचदा आयपॅड बघायची. ह्या वयात मी तिला भरवायचेही बरेच वेळा. पण वय वर्ष ५ ते ६, ह्या १ वर्षा च्या काळात नेटाने प्रयत्न करून तिची जेवताना आयपॅड बघायची सवय मी मोडली आणि स्वतःच्या हाताने जेवायची सवय तिला लावली.
आता ती स्वतःच्या हाताने व्यवस्थित जेवते. भाजी, पोळी, भात, आमटी, कोशिंबीर असा चौरस आहार अठवड्यातले किमान ६ दिवस तरी फारशी कुरकुर न करता घेते.
६ व्या वर्षा नंतर जेवताना टेबलवर एकमेकांशी गप्पा मारणे, दिवसभरातील घडामोडी share करणे हे तिला आवडायला आणि जमायला लागले. ५ व्या वर्षापर्यंत ते फारसे आवडायचे नाही किंवा जमायचे नाही. त्यामुळे इतर करमणुकीची (गोष्टी, पुस्तकं, आयपॅड) जास्त गरज वाटायची.

सोहा, मी तुमच्याशी सहमत आहे. नेटवरच्या चर्चांमध्ये बरेच वेगवेगळे मतप्रवाह वाचायला मिळतात. तिथे लिहिलेलं योग्य असलं तरी सगळ्यांकरताच उपयोगी पडेल असं नाही. शेवटी आपल्याकरता जे वर्क होतंय ते करावं.

@ सोहा

मी वरती धाग्यात मुद्दाम लावलेली सवय मोडली असे लिहिले आहे.
याचा अर्थ आता मी व्हिडियोचा आधार घ्यायचे पूर्ण बंद केले आहे असा नक्कीच नाही.
कधी कधी ते अपरिहार्य असते. खास करून एवढ्या लहान मुलांना.

पण पूर्ण ताट वाढून जेवणाबद्दल बोलतच जेवण करायचे ही युक्ती आमच्यासाठी कामी आली आहे.
या धाग्यावर जजमेंट होऊ नये असा प्रयत्न सगळ्यांनीच करावा. कारण आपण सगळे यात पालक म्हणून एकत्र आहोत. कुठलीही एक पद्धत दुसरीपेक्षा वरचढ नाही.

शर्मिला, पोस्ट आवडली. आयपॅड, गाणी बघणे, टीवी बघणे याबाबत मी सोहा, सायो शी सहमत. माझ्या दृष्टीने गोष्ट सांगणं, गाणी ऐकणं, पुस्तक वाचणं, टीव्ही बघणं याचा मूळ उद्देश एकच - जेवताना करमणूक. ते इंटरॅक्टिव करणं पालकांच्या हाती असतं. हे चांगलं आणि ते वाईट अशी विभागणी इतकी सोपी नाहीये
मला स्वतःला अजूनही हातात पुस्तक नसेल तर जेवणं कठीण जातं Proud

शर्मिला, पोस्ट आवडली. माझ्या मुलाच्या बाबतीत हे ट्रान्झिशन होते आहे. सुरवातीला अगदी मोजक्या, मुख्यतः बटाटा इत्यादी फळभाज्यांपासून सर्व पालेभाज्या आवडण्यापर्यंत प्रवास झाला. पराठ्यात काहीही घातले तरी खाल्ले जाते आणि वरुन चीज अ‍ॅड केल्यानेही. जेवण करण्याचा वेग मात्र अफाट हळू आहे

शर्मिला
पोस्ट खूप आवडली.

मुलांनी आपल्या आग्रहामुळे जेवणाचा ताण घेऊ नये हेच या चर्चेचे महत्वाचे कन्क्लुजन.

माझा तर प्रोब्लेम वेगळाच आहे. माझा ४.५ वर्शाचा मुलगा पोळी,ब्भाकरी, सर्व भाज्या, वरण, आमटी खातो. पण पावभाजी, उप्पीट, पोहे, एडली असे पदार्थ अजिबात खात नाही. त्यामुळे सकाल्ळी, सन्ध्याकाली त्याला काय द्यावे समजत नाही.
आणि स्वताच्या हातानेही जेवत नाही. अजुन भरवावे लागते. Sad

भाज्यांचे प्रिपरेशन हा पण एक मुद्दा आहे. एखादी भाजी प्रत्येकवेळी त्याच पद्धतीने केली,
तर कुणालाही कंटाळा येईल. आता तर प्रांतोप्रांतीच्याच नव्हे तर देशोदेशीच्या कृती
सहज उपलब्द्ध आहे. रोज एकच मसाला वापरण्यापेक्षा वेगवेगळ्या तर्‍हेने भाजी
करून खुप फरक पडतो.

आमच्याघरी शेपू क्वचित आणला जायचा कारण कोणाला फारसा आवडायचा नाही.
मी गोव्यात असताना तिथे सौ. सोयरा थोरात यांच्या स्टॉलवर जी शेपूची भाजी खाल्ली,
त्यानंतर मला ती खुपच आवडू लागली. तिथे असताना तर मी मुद्दाम चौकशी करत असे,
आज ती भाजी आहे का म्हणून ( रोज वेगवेगळ्या भाज्या असत त्यांच्याकडे. )

किती तो आयांच्या जिव्हाळयाचा विषय! Happy
मी पण त्यातलीच एक.. धागा आवडला आहे वाचतेय. माझ्या मुलांची पण थोडीफार बोंब आहेच पोळी भाजी लावून खाण्यातली. पराठे, धिरडी, थालिपिठात ढकललेले सगळे खातात त्यामुळे मी एवढी चिंतीत नाही. बाकी फळं मोस्टली सगळी खातात. ओट्स, खजूर, लाडु, शंकरपाळे, चक्ल्या, बाकरवड्या हे पण आवडते. पण त्याशिवाय वेगळे म्हण्जे खिचडि, दलिया, शेवयाचा ऊपमा असले काही खात नाहीत. (खिचडि खात नाहीत यावर मी अनेक तुक झेललेले आहेत) बाकी अंडी, चिकन अधून मधून देते. आणि हो क्वांटीटी हा मुद्दा आला नाही का अजून? Wink किती वर्षाच्या मुलांनी किती पोळ्या खाव्या? किती पराठे खावे?

अवांतरः माझी एक मैत्रिणची फॅमिली आणि आम्ही व्हेकेशन ला गेलो असताना तिचा लहान ४.५ वर्षाचा मुलगा आणि माझा पण त्याच वयाचा मुलगा यांच्या खाण्याच्या क्वांटिटीत जमीन अस्मानाचा फरक होता. तिने मला भंडावून सोडलं की तुझा मुलगा आणी मुलगी फार कमी खातात.
हे असं थोड्या फार फरकाने भारतात काय कुठेही मित्रमैत्रींणींकडच्या पार्ट्यात ऐकावंच लागतं. अरे म्हटलं त्यांच्या जिवाला जेवढं पाहिजे तेवढं खातात त्यांना कळतं कुठे थांबायचे.

आता मी फारसं लक्ष देत नाही. विचार करणं सोडुन दिलेय जेव्हा स्वतः ला समज येईल आपोआप खायला लागतील या आशेवर. कित्येक आया मुलांच्या तोंडात कोंबत असतात आणि ती मुलं पण मुकाट्याने खातात. आमच्याकडे तर साभार परतच येतं .

असो, चर्चा वाचत आहे. Happy

@सई

मी अजिबात जजमेंट देत नाही आणि एक पद्धत चांगली आणि दुसरी वाईट म्हणत नाहीये. ज्याला जे सोयीचं वाटेल त्या पद्धतीने मुलांना खाऊ घालावे.

@अंजली_१२

मला पण मुलीच्या जेवणाच्या क्वांटिटी वरून अनेक पार्ट्यात ऐकावं लागलं आहे. मी generally party किंवा vacation ला गेल्यावर मुलीने हेल्दी गोष्टी खायला पाहिजेत हा आग्रह सोडून देते. आपण सुद्धा अश्या प्रसंगी आपलं diet बाजूला ठेवतो. मग मुलांच्या मागे का लागायचं?

माझ्या दृष्टीने गोष्ट सांगणं, गाणी ऐकणं, पुस्तक वाचणं, टीव्ही बघणं याचा मूळ उद्देश एकच - जेवताना करमणूक. >> वरदा, हे एकदम पेंड्यूलमचं दुसरं टोक गाठून ट्रिविअलाईझ करणं वाटलं. गोष्ट सांगून, बडबड करून साधारण लहान मुलं खातात (३ वर्षाखालील) कारण लक्ष दुसरीकडे गेलं की काय चाललंय ते कळत नाही आणि तोंडासमोर काही आलं की प्रतिक्षिप्त क्रियेने तोंड उघडून घास गिळला जातो. माझा अनुभव असा आहे की टीव्ही समोर बसलं आणि आवडतं काही लावलं की पोरगा नेहेमी पेक्षा जवळ जवळ डबल खातो (वय १.२५). त्याने त्याला काही त्रास होत नाही, म्हणजे भूक असते म्हणायचं का? मला माहित नाही. कारण मी पण पाव भाजी/ पुरणपोळी असली की डबल खातो आणि त्याने ही जीवघेणा त्रास होत नाहीच. टीव्ही समोर तो डोझ होऊन खातो असं मला वाटतं. ते चूक/ बरोबर या फंदात मला पडायचं नाही. ते त्यावेळची परिस्थिती आणि इंडीव्हीज्युअल वर अबलंबून असेल.
मी आधी काही व्हिज्युअल करमणूक न करता जितकं भरवता येईल तितकं भरवतो. खाईनासा झाला की त्याचा दादा गाणी कम माकडचाळे करून करमणूक करतो, मग टीव्ही लाऊ का विचारून त्या आनंदात भरवतो, मग टीव्ही लाऊन युट्युब लोड होई पर्यंत आणि थोडे घास. मग काला चष्मा आणि नशेसे चढ गई होय.... मग तो आणि मी टीव्हीच बघत बसतो.
थोडी मोठी मुलं खाताना इतर काही करत असतील तर ते करमणूक इ. सदरात जाईल मला वाटतं.

मला स्वतःला अजूनही हातात पुस्तक नसेल तर जेवणं कठीण जातं >> मला आपलं ते हे करणं कठीण जातं... Biggrin जाउदे..

अमितव, ते डोझ होणं नको म्हणूनच इंटरॅक्टिव लिहिलं आहे. तिथे काय गोष्ट चालली आहे/गाणी कसली आहेत इत्यादी गप्पा मारत खाल्लं तर तंद्रीत खाणं होत नाही. गोष्ट सांगताना जे होतं तेच फक्त सोबतीला हलणारी चित्रं... आणि अशी टीव्हीच्या नादात देऊ ते देऊ तितकं खाणारी पोरं असतात? लकी आहेस Wink

आमचा बारक्या फार अ‍ॅलर्ट आहे, थोडा चवित किवा अ‍ॅपीरियन्स मधे बदल त्याला लगेच कळतो, मग तोन्डातला घास रिजेक्ट होतोच वर गनिमी कावा केल्याबद्दल यथेच्छ थयथयाट होतो.. सध्या आजीने " बघ मी कस सगळ सगळ खायच्या सवयी लावते" असा विडा उचलाय मग शिवाजीच्या वर गनिमी कावे चालतात आणी गड लढवला जातो.

गनिमी कावे चालेनासे झाले की पंचाइत होते खरी.
आमच्या कडे धाकली विचारते की ही खरी इडली आहे की फेक(इंस्टंट्/रवा)

भाज्या न खाणार्‍या पोरांमुळे कावलेल्या आईबापांनो, ती मुली ठराविक भाज्यांच्या फर्माइशी करतील अशी वेल पण येते अनेकदा.

I want to share one point. The thali way of eating is going away in india. And youngsters prefer coursewise meals. Small individual courses. Kids tend to get overwhelmed by an entire plate to finish. Instead if you serve small but filling courses soup salad main dessert they like it and can stop when they are full. I do believe in making mealtimes entertaining instead of strict prison routines. They are our kids. bound to be smart and individualistic. Respect their decisions just facilitate nutrition dont push it by being helicopter parent. Mothers are already stressed. Keep mealtimes for bonding. Be a partner in your kids growth instead of enforcing like the parents of older generation. No offence to anyone.

अमितव +१

हा हा. खूप हसले परत. कला चष्मा आम्हाला पण आवडतं.

माझादेखील थोडाफार असाच अनुभव आहे. पण माझ्या केस मध्ये मी आधी एक एके गोष्ट आणायचे आणि भरवायचे. आधी वरण भात, मग पोळी असे.
पण आम्ही गणपतीपुळ्याला एका रिझॉर्टमध्ये गेलो होतो. तिथे बुफे ब्रेकफास्ट होता. सकाळी उठल्या उठल्या विक्रम, "आई आज बप्पाप मध्ये काय काय असणार?" असे विचारायचा. तेव्हा माझी ट्यूब पेटली. त्याला सगळे ताट वाढून दिले की तो आलटून पालटून असे सगळेच जास्त खातो. आणि हल्ली आम्ही क्लॉकवाईज रोटेशननी एक एक घास खातो. सो त्याला आता कुठला घास खायचा असं विचारलं की तो बरोबर पुढचा पदार्थ सांगतो. किंवा हल्ली पोळीचे ७ तुकडे करून ताटात ठेवते. मी भात भरवते आणि पोळी तो स्वतः खातो. प्रत्येक घास खाल्ला की आता किती उरले? असे विचारले की त्याच्या परीने काउंटिंग करतो.

त्यामुळे हल्ली जेवण हीच करमणूक झाली आहे. आणि इथल्या डिस्कशन नंतर मी भाजीचा आग्रह सोडून दिला आहे पण ताटात भाजी वाढायचे सोडले नाही. जेव्हा खाईल तेव्हा खाईल . Happy

मला स्वतःला अजूनही हातात पुस्तक नसेल तर जेवणं कठीण जातं >>मला आपलं ते हे करणं कठीण जातं... जाउदे..>>> कसं काय जमतं बुवा तुम्हाला ते हे करणं? Uhoh

माझ्या मुलीला मोबाईल लागतो. Biggrin

त्यामुळे हल्ली जेवण हीच करमणूक झाली आहे. >> खूप छान. तुमचा लेक मनात म्हणेल, मला सुधारता सुधारता स्वतःच बदलली.
पण आवडीने, हसत-खेळत खाल्लेले सगळ्यात चांगले. काय-काय खातो आणि किती खातो हे नंतर.

आपले पण नखरे / नावडी असायचे / असतात. माझ्या बहिणीला कडधान्याच्या आमटीतले दाणे नको असायचे आणि मला फक्त दाणे हवे, रस नको. ५-७ व्या इयत्तेत होतो तेव्हा. मग आमची मंदामावशी चहाच्या गाळणीने पळी पळी आमटी गाळायची. आधी पाणी तिच्या भातावर, गाळणीतले दाणे मला...,
इतके लाड करून घेतल्यावर आपली वेळ आली की दिलखुलास लाड करावेत चिल्ल्यापिल्ल्यांचे. त्याने नकळत छानसे बंध जुळतात, मग अशा व्यक्ती सांगतील ते खुषीने करतात मुलं. तेव्हा मग चांगल्या सवयींचे प्यादे पुढे करायाचे.

हल्लीची पिढी स्मार्ट असते, धमकावून, तोंड वाजवून ऐकत नाहीत. उलट आणि योग्य प्रतिप्रश्न विचारतात. तेव्हा आपला अ‍ॅप्रोच प्रामाणिक आणि दोस्तीचा असेल तर अपेक्षित परिणाम लौकर दिसतो. तुमच्या शाणुल्याला गोड पापा आणि शाबासकी.

Pages