कशी लावायची भाज्यांची गोडी?

Submitted by सई केसकर on 22 April, 2017 - 01:55

माझा मुलगा ६ महिन्याचा झाला तेव्हापासून तो ८ महिन्यांचा होईपर्यंत मी आदर्श माता होते. कारण मी जे देईन ते तो बकाबका खायचा. नाचणी, अंडे, चिकन सूप, भाज्यांचे सूप, कुस्करलेली भाकरी, दही, फळं काही नाही म्हणून नाही. पण ८ महिन्यांचा झाला आणि त्याला जीभ फुटली. त्यानंतर त्यानी जे काय खाण्याचे नखरे सुरु केले ते कमाल होते. तरीसुद्धा १-२ या वयात त्याला थोडीतरी समज होती. २ वर्षांचा झाल्यापासून थयथयाट करणे हे एक नवीन अस्त्र त्याच्या हाती लागले आहे. त्यामुळे कुठलीही अप्रिय सवय लावताना आमच्या घरात प्रचंड दंगा होतो. आधी तो तीन बाजूंनी असायचा. मी, माझा नवरा आणि मुलगा तिघेही एकमेकांवर चिडायचो. पण हल्ली आम्ही त्याच्याकडे त्याच्या या दंग्यात दुर्लक्ष करायला शिकलोय.

कुणी कितीही "मुलांच्या कलानी" घ्या असं सांगितलं तरी काही बाबतीत थोडी शिस्त या वयातही लावावीच लागते. जेवणाच्या बाबतीत आम्ही काही नियम केले आहेत ते मी इथे देते. या धाग्यावर सगळ्या अनुभवी आई बाबांनी आपापल्या मुलांना चौरस आहार घेण्याकडे कसे नेऊन ठेवले त्याच्या युक्त्या लिहाव्यात ही विनंती. कारण आमच्यासारखे मायबोलीकर नित्य अशा युक्त्यांच्या शोधात असतात.

आम्ही केलेले नियम

१. जेवताना कुठलेही करमणुकीचे साधन/खेळणे वापरायचे नाही.

एकदोनदा त्याचा दंगा बंद व्हावा म्हणून मी त्याला यूट्यूबवर गाणी लावून दिली. पण त्यानंतर त्याला काही दिवस तशी सवय लागली. आणि मग आपण काय जेवतो आहोत याकडे त्याचे लक्ष नसायचे. त्या ऐवजी आता जेवताना मी त्याला त्याच्या जेवणाबद्दलच काहीतरी गंमत करून सांगते. आणि तटाकडे लक्ष द्यायला लावते. हे आता गेल्या २-३ महिन्यात नीट जमले आहे.

२. नो बेकरी
मध्यंतरी विक्रमला वेगवेगळी बिस्किटे खायचा फारच नाद लागला होता. त्यामुळे त्याच्या जेवणावर परिणाम व्हायचा. यासाठी आम्ही दोघांनी घरी बिस्किटे आणणे किंवा, आपण ती खाणे, पण त्याला न देणे हे बंद केले. तसे केल्यापासून त्याचे बिस्कीटवेड बरेच कमी झाले आहे. आजी आजोबांकडे गेला की ते त्याला काय हवं ते देतात. पण म्हणतातच ना, व्हॉट हॅपन्स अॅट ग्रॅनीस, स्टेज अॅट ग्रॅनीस! बिस्किटांबरोबर ब्रेड, बाहेरचे केक सुद्धा पूर्ण बंद केले. मी आठवड्यातून एकदा घरी केक बनवते.

३. मधल्या भुकेला सिझनल फळे आणि केळी
कुठेही बाहेर फिरायला वगैरे गेलो की आम्हाला फळांचा खूप आधार वाटतो. मधल्या भुकेला आंबा, संत्रे, केळी दिल्याने चिप्स, बिस्किटे वगैरे टाळले जाते. पण यातही मुलं हट्ट करतातच. त्यामुळे ६० % जरी यश मिळाले तरी आम्ही खूप मानतो.

४. भाज्यांचे पराठे
वेगवेगळ्या भाज्या घालून केलेले पराठे हल्ली नियमितपणे घरी केले जातात. त्यामुळे ताशा भाज्या तो खातो.

फक्त, पोळी-भाजी-भात-आमटी असा सगळा आहार घेताना भाजी नको म्हणतो. मग मी भाजी भातात कमी कॉन्सन्ट्रेशननी कालवून देते. हे कॉन्सन्ट्रेशन जरी जास्त झाले तरी लगेच ड्रॉवर उघडल्यासारखा घास साभार परत येतो!
मुलांना अशा भाज्या फसवून कधीपर्यंत द्याव्या लागतात? आणि त्या त्यांनी खाव्यात म्हणून काही गमती जमती कुणी केल्या आहेत का?

भाज्या घालून करायच्या रेसिपीज सुद्धा चालतील कारण कुठल्याही रूपात भाजी गेली तरी तिच्या चवीशी मैत्री होतच असते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले उपाय आहेत.

मी असे ऐकलेय की लहान मुलांना मीठ मसाला फारसा न टाकता जशी भाज्यांची मूळ चव आहे त्या स्वरुपातच सुरुवात करावी. म्हणजे त्यांना भाज्यांच्या मूळ चवीची सवय होते. बाकी आपले भारतीय जेवण फारच मसालेदार असते.

सई, धन्यवाद.
आता प्रतिसाद वाचयाला येइनच इथे वारंवार.

@दिनेश

फारच उपयुक्त धागा! धन्यवाद. आता यातले सगळे करून पाहीन आणि प्रतिसाद देईन. Happy

माझा अनुभव,
तसेही आमच्या घरी स्वयंपाक गोडसरच असतो, पण माझ्या आई ने मुलीसाठी मुद्दामहून वेगळी भाजी(तिखट घालायच्या आधी भाजी काढणे, किंवा भाजीत गूळ वाढवणे etc) करायला सुरवात केली (तिला भाजी खायची सवय लागावी म्हणून)
आता तिला त्याचीच इतकी सवय झाली आहे कि कोणतीही गोष्ट तिला तिखट लागते. आणि नॉर्मल जेवण तिला खाता येत नाही ,
तेव्हा भाज्या खाव्यात म्हणून मुद्दामहून वेगळ्यां चवीच्या बनवू नका.

सगळे एकत्र जेवायला बसत असाल तर आपण जे खातो ते सगळ सहसा मुलं आवडीने खातात.
भाजी-पोळी किंवा भाजी-भात सोडून काहीच खायला द्यायचं नाही. प्रत्येकवेळी भूक लागली की तेच गरम करून पुढे करायचं.
भाजीला हॉटेल सारखी स्टायलिश नावं द्यायची, रेड पंपकिन इन येल्लो ग्रेव्ही / बीन्स सॉते इ.
भाजीची सवय होईपर्यंत त्यांच्या भाजीत त्यांना दिसतील असे चार मटार / कॉर्न दाणे, पनीर क्यूब्ज घालायचे (हे प्रकार आवडत असतील तर.

होय सिंजी, तुमचा लेख वाचल्यावर मला हेच पाहिले आठवले होते,
आता तिची जीभ तपासणार आहे Happy

वय वर्ष दोन म्हणजे अजुन आशा ठेवायला जागा आहे. अगदी भरपुर. हे वय २ वरुन १२ आणि २० वर गेलं कि आईच खरं फ्र्स्ट्रेशन काय असतं ते कळेल. टीन एजर मुलं जेवायची वेळ झाली कि आपल्या आखोंके तारे, दुलारे अगदी असह्य होतात. म्हणजे चाइल्डलेस शेजारीण किती लकी इथपर्यंत वाटतं. Happy जोक्स अपार्ट - पण त्या वयात सारखं 'समथिंग नाइस' हवं असतं. आणि ते काय हे ठरवताना डोक्याचा भुगा होतो.

आम्ही कोबीची भाजी खावी म्हणुन कोबीमधे चायनिज सॉसेस घालुन रॅप्स बनवतो. पालक खावा म्हणुन पालकचे परोठे. या वयात प्रत्येक पदार्थ वासावरुन आणि त्याच्या अ‍ॅपिअरन्सवरुन खायचा कि नाही हे ठरतं. त्यामुळे प्रेझेंटेशन भारी असणं मस्ट. (स्नॅपचॅट वर फोटो टाकता यायला हवा ही मुख्य कंडिशन हे आईला थोड्याच दिवसात कळतं. मग उच्च क्रोकरी, फॅन्सी शेप्स च्या प्लेट्स मधे सर्व करणं, आजुबाजुला गार्निशिंग साठी केचपच्या लाइन्स, फॅन्सी सलाड्चं डेकोरेशन इ इ हवं) कोबी आणि गाजर किसुन स्टफ्ड पराठे केले कि त्यात चीज क्युब्ज किसुन टाकायचे, अशा ट्रीक्स जमायला हव्यात. मुख्य इन्ग्रेडिअंट आवडता नसेल पण आपल्या दृष्टीने तो खाणं जरुरी असेल तर तो असा बनवायचा कि दिसायला नाही हवा. मेथी खावी असं वाटत असेल तर समोर इंग्लिश प्रिमिअम लिग लावुन ( हे उदाहरण झालं), आम्ही चक्क जेवण भरवतो.
आणि ज्या दिवशी माया, ममता कमी पडेल त्या दिवशी सरळ उपाशी ठेवणे. नो फॅन्सी कुकिंग, आपण भरवण्यासारखे लाडही नाहीत. अक्खा दिवस उपास झाल्यावर पाय आपटत ' दे जे काही बनवलं असेल ते' असं सांगितलं कि कोणतीही कुजकट कमेंट न करता जे बनवलं असेल ते शांत डोक्याने सर्व करायचं. हो आणि त्या क्षणी डोकं शांत हवं असेल तर एक नियम पाळायचा, मुलं उपाशी राहिली तरी मन घट्ट करुन आपण दुपारी लंचची वेळ झाली कि पोटभरुन जेवण करुन घ्यायच< Proud

समथिंग नाइस----+1 आणि समथिंग different!( तरी बरं रोज different च असतं. ) Friend's expert mom is making paneer butter / mushroom masala for डबा and you are always giving me bhendi / cauliflower / palak bhaji / ghevda (I can't even explain my friends ghevda or dudhi) ! Why can't you atleast make palak paneer or alu-palak.

त्याला अश्या भाज्या डब्यात नेल्या की मित्रांचे डबे share करता येत नाहीत. कारण कोणालाही त्याच्या डब्यातली weird भाजी खायची नसते. त्याच्याकडे interesting stuff नाही म्हणून मित्र त्यांचे डबे त्याला share करत नाहीत.

त्याचा स्वभाव, तुमच्या सवयी आणि घरातील/बाहेरच्या कामांचे तुमचे वेळापत्रक यावरून तुम्हाला कसे/काय जमेल ते ठरवा --
१. साधारण त्याचा स्वभाव बघून (कसे सांगितले की ऐकतो, काय केले की विरोध करतो) काही करता येईल.

२. तुमचा नियम १च भाजीच्या बाबतीत वापरायचा. अधून मधून (रोज नको) भाज्यांच्या गोष्टी बनवून सांगायच्या.
त्याचे आवडते पात्र आवडीने भाजी खातेय असे काहीतरी गुंफून. /// किंवा भाज्यांची सहल, शर्यत; /// किंवा भाजीचे आई-बाबा नि भाजी त्याच्या नेहमीच्या बघण्यातल्या प्रसंगात वगैरे.. /// किंवा भाजी आणि मिकी माउस / छोटा भीम यातला संवाद असे काही तरी... /// किंवा शेतात वाढणार्‍या भाजीचे रोप आणि वारा, सूर्य, पाऊस यांची मैत्री असं काही.
पण फक्त गोष्ट... तात्पर्य : म्हणून तू भाजी खा, असं नाही शक्यतो. ('मी भाजी खावी म्हणून तू असं सांगते आहेस ना?' इतका स्मार्ट तो होईपर्यंत हे वापरता येईल)

३. आमटी-वरणात पण बर्‍याच भाज्या जातात. फक्त त्या कुस्करून आमटीत एकजीव करायचे काम पूर्ण करून मग ताट त्याच्या पुढ्यात न्यायचे.
४. केकच्या ओव्हनमध्ये तिखट-गोड मफिन्स, कपकेक करू शकतो किंवा तिखट/गोड आप्पे किंवा धिरडी इ. पीठ भिजवायला पाणी/दूध/ताक याऐवजी उकडलेल्या भाज्यांची प्युरी वापरता येईल.
५. अर्धी पोळी भाजीबरोबर खाल्ली तर उरलेली मुरांबा / दही / लोण्याबरोबर असं आमीष.
६. भाजी ताटात वाढण्याऐवजी त्याला आकर्षक वाटेल अशा फूड-ग्रेड मोल्ड / बाऊल / कार्टून आकारातील भांड्यात वाढता येईल.

७. भाजी आणायला सोबत नेणे. ताज्या, रंगीबेरंगी भाज्यांचे ढीग बघून ही घेऊया का असे विचारीत खरेदी झाली तर कदाचित त्याने आणलेल्या भाज्या तो खाईल. भाजी निवडताना / धुताना / चिरताना / करताना पण त्याला सोबत घेता येईल फार चळवळ्या नसेल तर. नुसते बघू दे, सोबत आपण भाजी खा / खाशील ना असे काही बोलायचे नाही.

८. तुम्ही भाजीसाठी खूप मागे लागत असाल तर, ताटं वाढताना त्याला हवी/नको, कमी/जास्त वाढू विचारा. किंवा सरळ तुला नको ना, मी आणि बाबाच घेऊ ना असे विचारा. मग त्याच्या संमतीने वाढलेली खाईल. किंवा ही अशी कशी सुधारली या धक्क्याने खाईल.

९. त्याला शेजार्‍यांचे जेवण आवडत असेल तर तुमचीच भाजी शेजारी ठेवा; जेवायच्या वेळेला त्यांच्या वाटीतून, त्यांच्या घरून आणा आणि आजी/काकूने तुझ्यासाठी दिली असे सांगून भरवा. मात्र हे बेमालूमपणे करायला हवे आणि काही काळच चालेल.

१०. त्याच्या आवडीची बाहेरची माणसे -- वॉचमन, शेजारी, फुगेवाला, फळवाला, मामा, मावशी इ. यांच्याकडून भाजी खाल्ल्याबद्दल शाबासकी मिळवून द्या. याबद्दल आपले कौतुक होते हे कळल्यावर विरोध कमी होईल.

११. तुम्ही दोघे वाटी-चमच्याने फक्त भाजी खा. तो खेळत असेल तिथे बसून, आपापसात गप्पा मारत, त्याला खाताना दिसेल असे. आपल्याला सोडून आई-बाबा काय खातात ते बघायला तो येईलच. मग सांगायचे, 'राजा, काही नाही, भाजी आहे, तुला आवडत नाही ना म्हणून आम्ही दोघेच खातोय'. मग मला पण हवी म्हणालाच तर निर्विकारपणे १ चमचा द्यायची. अजून हवी विचारायचे नाही. आपण खात रहायचे. पुन्हा आला तर पुन्हा १ चमचा द्यायची.

१२. रोज भाजी पण नको. २-३ दिवसाआड त्याच्या भाजी खाण्याला सुट्टी द्या. त्यादिवशी हाताने जेवायचे. करू दे, खाऊ दे काय हवे ते. आयुष्य पडलेय जीवनसत्त्व मिळवायला. कंटाळत खाल्ले तर अंगाला नाही लागणार, मग कशाला त्याच्या आणि तुमच्या जिवाला त्रास.

बघा यापैकी कशाचा उपयोग होतो का ते...

अडगुलं मडगुलं -- डॉ श्रीकांत चोरघडे -- या पुस्तकाचीही मदत घेता येईल.

धन्यवाद, वावे, सचिन काळे.
@ सचिन -- स्वतंत्र काही लिहिता येत नाही, कथा / कविता वगैरे. अभ्यासपूर्ण लिहिण्याइतका सखोल / अचूक ज्ञानसाठा नाही. त्यामुळे स्वतंत्र लिखाण बहुतेक नाहीच.... सल्ले द्यायची हौस गप्प बसू देत नाही, म्हणून हे दिसतेय... नाहीतर प्रतिसाद पण क्वचित असतात.

@ सई केसकर, अवांतराबद्दल क्षमस्व.

@ कारवी, मृगाला आपल्या जवळील कस्तुरीची जाणीव नसते. पण मला तुमच्याकडे असलेल्या प्रतिभेची चुणूक दिसून येतेय. थोडं मनावर घ्याच, ही विनंती. आपणांस शुभेच्छा! Happy

सई, भाज्यांचे पराठे तू लिहीले आहेतच.
वेगवेगळ्या भाज्या घातलेला फ्राईड राईस, भरपूर भाज्या घातलेला पास्ता, भाज्या (मशरूम्स, पातीचा कांदा, ब्रोकोली, गाजर असं काहीही ) घालून अंडा बुर्जी/पनीर बुर्जी, डोसे/पेसरट्टू/ धिरडी/ इडल्या - या सारख्या पदार्थांत एखादीतरी भाजी (गाजर, पालक वगैरे) किसून घालणे - हे उपाय आमच्याकडे कामी येतात.

फारच मस्त धागा...
दिदा लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद..
आत्ताच ताई आणि वहिनीला फॉरवर्डते हा धागा .. त्यांचे किटकुरं पण जेवणासाठी नखरे करतात..

भाज्या वगैरे खाण्याच्या बाबतीत माझ्या आज्जीची पद्धत, जी माझ्यासाठी आणि भावासाठी वापरली आणि पुढे आमच्या मुलांसाठीही वापरली ती मला एकदम बेस्ट वाटते. नॉर्मल दिवशी (म्हणजे आजारी नसताना) घरात त्या दिवशी केलेली भाजी पानात वाढली जाणारच आणि ती खाल्लीच पाहीजे. भाजी अगदीच नावडती असेल तर बरोबर चटणी, लोणचं, गुळांबा, दहीसारखर, तूपसाखर वगैरे मिळेल पण पानातली भाजी संपवल्यावर. एखाद्याला आवडत नाही म्हणून दुसरी भाजी अजिबात केली जाणार नाही. खायचं तर खा नाहीतर उपाशी रहा. मुलांसाठी कमी तिखट, वेगळ्या चवीचं वगैरेही काही केलं गेलं नाही. त्यामुळे घरातले सगळे जे खातात तेच मुलंही खातात.
आज्जीचा फंडा होता की "लाड करेन पण फाजिल लाड करणार नाही". तो जवळ जवळ सगळ्याच बाबतीत उपयोगी पडतो. Happy

लेख वाचून एकच विचार आला not only us.. बरेच लोकं आहेत आपल्या बोटीत.
आमच्या 12 वर्षाच्या Neil ला लहानपणापासूनच भारतीय जेवणा ची गोड़ीच लागली नाही कधी. (आमचीच चूक )
आता तर काय प्री टीन्स म्हंजे विचारायला नको.
त्या नेच बनवून दिलेल्या मेनू त दुधी,भोपळा व या फॅमिली तील फळभाज्या सूप्स, चिकन स्टाॅक इ.मध्ये बेमालूम लपवता येतात. मात्र फरसबी, कोबी,पालक, lettuce, अवाकाड़ो, मश्रूम, तुरई , bakchoi ,kale इ. भाज्या तो आवड़ीने खातो.. फक्त ऑथेंटिक चायनीज किंवा इंड़ोनेशियन स्टाईल मधे स्टरफ्राय केलेल्या.
म्हणून आता थोड़े रिलॅक्स आहोत.

सई जेवताना फोन किंवा टीव्ही पाहण्याचा नियम सर्वात महत्वाचा. Happy अभिनंदन त्याबदद्ल.

बाकी भाज्यांबद्द्ल खालि मोठी पोस्ट लिहीत आहे. Happy

मुलीच्या अमेरिकन डे-केअर मुळे केवळ उकडलेल्या किंवा कच्च्या भाज्या खायची तिला सवय लागली. तीच पुढे मुलालाही चालू ठेवली. त्यामुळे रोज शाळेत जाताना एका डब्यात बीन्स, ब्रोकोली, गाजर, काकडी, टोमॅटो, ऑलिव्ह, कॉर्न यातील काहीतरी एक नक्की असते. भाज्या फारतर उकडलेल्या असतात पण मसाले नाहीच. हे एक सर्व्हिंग झाले. या उकडलेल्या किंवा मूळ स्वरूपात भाज्यांची जी चव लागते ती आवडली की मग त्या देणे सोपेही होते. उदा: बीन्स किंवा कॉर्न मावे मध्ये एक मिनिट गरम करून त्यात थोडे तूप/बटर, मीठ-मिरेपूड टाकली की स्नॅक साठीही देता येते पटकन. डब्यातच मेथी/पालक/आलू पराठेही असतात. किंवा पास्ता मध्ये भाज्या असतात.

रात्रीच्या जेवणात मात्र जे आम्ही नियमित बनवतो त्याच भाज्या खाव्या लागतात. त्यात कारले, वांगी, दोडकी, फ्लॉवर, वाटाणा, भेंडी, वाल, कांद्याची पात, मेथी कोरडी अशा अनेक भाज्या असतात. त्या आलटून पालटून आणते म्हणजे कंटाळा येत नाही. शक्यतो वरण आणि एक भाजी असे असते म्हणजे भाजी खूप आवडली नाही तर वरण नीट खातात. पनीर, चिकन, अंडाकरी, छोले हे प्रोटीनसाठी आहेतच. हे आठवड्यातून ३-४ वेळा होतं.

बाकी दिवशी चिकन सँडविच केले तर त्यात लेट्युस, टोमॅटो, इ घातले जाते. सोबत सलाड किंवा सूप मध्ये बाकी भाज्या घातल्या जातात. मी मध्ये ५ वेगवेगळ्या सूपच्या रेसिपी पोस्ट केल्या होत्या. आठवड्यातून त्यातील एक तरी सूप किमान होते. त्यातून भाज्या खाणे जास्त सोपे जाते. थंडीत सूप अजून चांगले. सलाड मध्ये २-३ वेगवेगळे ड्रेसिंग आणून ठेवलेले आहेत. त्यामुळे थोडा बदल होतो. मेक्सिकन स्टाईल सलाड मध्ये पेपर्स, कॉर्न, ब्लॅक बीन्स, टोमॅटो हे असे घालून थोडे अजून वेगळे सलाड बनते. अगदी टिपिकल कोशिंबीर आणि मग मोड आलेल्या उसळींची कोशिंबीरही(मोड आलेले मूग/मटकी, काकडी, टोमॅटो, कैरी असेल तर, कोथिंबीर, लिंबू,इ) असते सलाड म्हणूनच.

एकूण काय तर या ना त्या कारणाने भाज्या खाल्ल्या जातात. एखाद्या दिवशी अगदीच वरण-भात खाल्ला तरी चालतो. Happy पण मुलांच्या बाबतीतच काय मलाही विविधता जितकी जास्त तितके जास्त आवडीने खाल्ले जाते. एकदा व्हरायटीचा पॅटर्न झाला की मुलांना त्याचीही सवय लागते. Happy
All the best.
विद्या.

"लाड करेन पण फाजिल लाड करणार नाही". >> +१
जेवणाच्या बाबतीत आम्हाला दोघांनाही पानात अन्नं टाकणे आणि कायम मुलांसाठी वेगळे पदार्थ करणे मान्य नाही. त्यामुळे मुलगी सगळे खाते. आणि 'जंक फूड'चे ढोबळमानाने दिवस ठरवले आहेत. महिन्यातून दोनतीनदा, सुट्ट्यांमध्ये वगैरे, त्यामुळे, सगळ्या पदार्थांचे कौतुक आणि अप्रुप आहे, चवीढवी कळतात.

काही नियम
- आमच्याकडे पानात / डब्यात टाकलेले चालत नाही. (माझ्या ओळखीची काही मुलं, त्यांच्या आया, न खाल्लेला डब्बा रोज/ नियमीतपणे कचर्यात टाकतात). आमच्याकडे डबा परत आणला तर तो शाळेतून आल्यावर संपवावा लागतो.
- नवीन पदार्थ केला असला तर मुलांना तो करण्यात सहभागी करुन घेतले आहे. चव घेऊन पहावीच लागते.
- जेवणाच्या वेळा ठराविक आहेत. त्यात फार बदल होत नाही/ करत नाही.
- सुट्ट्यांचे दिवस सोडून बाहेर जेवायला फार जात नाही. महिन्यातून दोन-तीनदा जात असू फारतर. त्यामुळे त्याचेही अप्रुप आहे.

युक्ती
- रोजच्या जेवणातलेच पदार्थ सगळ्यांनी खायचे. अगदी लहान मुलांसाठी ०-२ वर्षे वेगळे, कमी तिखट पदार्थ केले असतील तेवढेच
- टम्म फुगलेली पोळी खाणे, कणकेशी खेळणे, पोळी लाटु देणे, शंकरपाळी कातरणे वगैरे फार मजेचे आहे
- भाज्या घातलेली खिचडी, पुलाव
- फळं, भाज्या विकत घ्यायला सोबत घेऊन जाणे
- मौसमी फळांचे तर प्रचंड अप्रुप आहे. त्याला कारणीभूत माझे सासरे आणि नवरा असे म्हणावे लागेल. त्यांच्याकडे फळं जाऊन आणणे आणि ती रोज खाणे जवळजवळ सोहळाच असतो. ती सवय मुलीला आपसूक लागली.
- कोशींबिरी / उसळी आणि आनंदाने स्वयंपाक करायची सवय माझ्यामुळे लागली असे म्हणायला हरकत नाही.
- तसेच आईवडलांची 'पूर्णवेळ' नोकरी आहे. त्यामुळे एखादा लाडाकोडाचा पदार्थ हवा असेल तर आई तो आनंदाने करते, पण पुर्वतयारीसाठी तिला वेळ आणि सूचना द्यावी लागते, हे आता एव्हाना चांगलेच उमगलेआहे.
- मी रोज दोनच चॉईस देऊ शकते. उदा- उद्या डब्यात काय देऊ ? अमुक की तमुक ? आज जेवायला काय करु- हे की हे / तिसरा पर्याय समजा उत्तरादखल आला , तर शक्य असेल तर तो करते, किंवा त्याच्या पूर्वतयारीची कल्पना देऊन दुसर्‍या/तिसर्‍या दिवशी तो करते.
- कढी-वरण-तूप-भात, ऊनऊन खिचडी, इडल्या, डोसे, पास्ता वगैरे अजूनही प्राणप्रिय आहे
- प्रत्येक सुट्टीत सोबत स्वैपाक करणे, निदान स्वैपाकघरात लूडबूड करु देणे, पाककृती शोधणे, ती करुन पाहणे या सग्ळ्या गोष्टी उपयोगी ठरल्या असे म्हणावे लागेल.
- सणावारांना सणावारांचे पदार्थ करणे, त्यात मुलांना सहभागी करुन घेणे हेही उपयोगी पडले असावे
- ऋतूमानानुसार पदार्थ बदलणे. त्यामुळे 'अप्रुप' राहते. आणि पदार्थांशीही ओळख राहते
- इडली/ डोसा/ धिरडी हेही मुलांना सहसा आवडते

यातली कुठलीही सवय कायमस्वरूपी अशी रहात नाही. एकदा आपण छान तक्ता केला की मुलं/ मदतनीस स्त्रिया ती सवय आज्ञाधारकपणे पाळतात, असे काहीही होत नाही. पुढेमागे होतेच. पण पूर्णतया सोडून देऊन मात्र चालत नाही.
- मला वाटत २-४ या वयामध्ये थोडे कलाने घेऊन पहावे. साधारण १०- २० नेहमीचे, सार्वकालिक पदार्थ, ४-७ भाज्या खाता येणे पुरेसे आहे.
- त्यानंतर ४-६/७ या वयात डबा संपवणे आणि डब्यातले पदार्थ हा एक तिढा होऊन बसतो. शिक्षकांच्या सहकार्याने तो हळूहळू सुटतो. खेळायचे आकर्षण असते. वगैरे.
- आमच्या नवर्‍याचा उपाय . मुलीच्या वय वर्षे ६ वर्षानंतर त्याने जागतिक अन्नंधान्यतुटवडा यावर बोलणे, आणि व्हिडियो दाखवणे चालू केले. हे माझ्याच्याने होत नाही. अजूनही त्याचा पारा चढला तर मुलीला सोमालियाचे व्हिडियो पहावे लागतात. पण अशी वेळ वर्षाकाठी दोनदा येत असेल फारतर.
- ७- ९ वर्षांमध्ये आता प्रचंड फरक जाणवतो. सातत्याने केलेले प्रयत्न फळाला आल्यासारखे वाटतात. पण हे चित्रं फक्त आमच्या घरात. तिच्या बहुतेक मित्रमैत्रिणींच्या आयांची मुलांच्या खाण्याबाबत तक्रार आहे. आमची तक्रार नाही. तासन तास जेवण आमच्याकडे होत नाही. आमची मुलगी सणसणीत पोहते, नाचते आणि अतिशय आनंदाने या घरात तयार होणारे सगळे पदार्थ खाते. निदान ८०% वेळा. बाकी २०% टक्के कुरकूर होते, नाही असं नाही. ते आमच्या दृष्टीने 'नॉर्मल' आहे. तिला व्यवस्थित 'भूक' लागते आणि वयाच्या मानाने ताडमाड उंच झाली आहे.

रैना खूपच छान प्रतिसाद. बरेचसे नियम आमच्याकडेही लागू होतातच. Happy
२-४ वर्षच्या काळात मात्र थोडे कलाने घेऊन वर दिलेल्या यादितिल जमेल त्या गोष्टि करावया.

सहभाग असेल तर जास्त फरक पडतो. मुलाना सारखे सांगावेही कुठले पदार्थ खाल्याने काय होते.

प्रोटिन, कार्ब, फायबर हे सर्व आता ऐकुन माहित आहे.

@कारवी

>>>आमटी-वरणात पण बर्‍याच भाज्या जातात. फक्त त्या कुस्करून आमटीत एकजीव करायचे काम पूर्ण करून मग ताट त्याच्या पुढ्यात न्यायचे.
४. केकच्या ओव्हनमध्ये तिखट-गोड मफिन्स, कपकेक करू शकतो किंवा तिखट/गोड आप्पे किंवा धिरडी इ. पीठ भिजवायला पाणी/दूध/ताक याऐवजी उकडलेल्या भाज्यांची प्युरी वापरता येईल.

हे मी करते आणि त्या पद्धतीने भाजी खाल्ली जाते. पण भाजी म्हणून भाजी पोळीला लावून खायची असे होत नाहीये अजून. कदाचित या वयाला ही अपेक्षा थोडी जास्त असावी.

>>>भाजी आणायला सोबत नेणे. ताज्या, रंगीबेरंगी भाज्यांचे ढीग बघून ही घेऊया का असे विचारीत खरेदी झाली तर कदाचित त्याने आणलेल्या भाज्या तो खाईल.

त्याला भाजी आणणे आवडते. भाजीवालीचा दोस्त आहे तो. पण खायला नको. सगळ्या भाज्या पुस्तकातून आणि दुकानात नीट ओळखता येतात.

>>>त्याच्या आवडीची बाहेरची माणसे -- वॉचमन, शेजारी, फुगेवाला, फळवाला, मामा, मावशी इ. यांच्याकडून भाजी खाल्ल्याबद्दल शाबासकी मिळवून द्या. याबद्दल आपले कौतुक होते हे कळल्यावर विरोध कमी होईल.

हे नुकतेच करायला लागले आहे. अजून काही फरक पडला नाहीये. पण त्याला आजी आजोबा पोळीला लावून भाजी खातात हे सांगितले. तो मधेच आजी आजोबा पण भाजी खातात का असे विचारतो. म्हणजे कुठेतरी त्याचा विचार चालू आहे.

सगळे एकत्र जेवायला बसलो की तो भाजी बद्दल कमी चिडचिड करतो. तसेच ताटात सगळे एकत्र वाढले की एका नंतर एक असा सिक्वेन्स ठरवून दिला की तसं खातो.

फारच मस्त सजेशन आहेत कारवी. तुम्ही खरंच याबद्दल पोस्ट लिहा!

परागनी लिहिलंय तीच पद्धत आमच्या लहानपणी होती, मी तीच चालू ठेवलीय. घरी खूप वेगवेगळे पदार्थ बनतात, पण जे असेल ते सगळ्यांनी कुरकूर न करता थोडंतरी खायलाच हवं ही आईची शिस्त होती, यामुळे आपल्यावर फार काही अन्याय झाला असं मला तरी वाटत नाही. म्हणजे मी लहानपणापासून सगळ्या भाज्या (आवडल्या नाही तरी) बिनबोभाट खायचे. हळूहळू आधी न आवडणार्‍या बहुतेक सगळ्या भाज्या आवडायला लागल्या. मी कॉलेजला असतांना भाजी खरेदीचं काम माझ्याकडे आलं, त्यानंतर कार्ल्याची भाजी आणली, मग आवडायला लागली ती! त्यामुळे मनापासून आवडलं नाही, तरी खायची सवय असायला हवी असं मला वाटतं.

मुलगी दोन वर्षांची होईपर्यंत अजिबात खळखळ न करता सगळं नीट जेवायची. आता साडेचार वर्षांची आहे. जीभ (आणि शिंग) आल्यापासून खळखळ सुरू झाली आहे. यात नावड म्हणण्यापेक्षा शाळा, डे केअर मधली बाकी मुलं हट्ट करतात, नीट जेवत नाहीत त्यांचं बघून तसं करायचा प्रयत्न जास्त होता. पण मी तिच्यासाठी वेगळं काहीही बनवत नाही. (आमच्या घरचं जेवण अजिबात तिखट / मसालेदार नसतं.) सुदैवाने तिच्या खास मैत्रिणीची आईही असंच करते. (दोघी मैत्रिणी कधी आमच्याकडे, कधी मैत्रिणीच्या घरी जेवतात, आणि एकटीने खाल्ल्या नसत्या अशा कितीतरी गोष्टी एकमेकींच्या नादाने खातात!) मला वाटतं मुलांसाठी सगळीकडून एकच मेसेज मिळणं महत्त्वाचं. आई भाजी खायला लावते पण टाकून दिलेलं बाबाला चालतं / आजी आपली बाजू घेते अशी परिस्थिती असेल तर मुलं त्याचा वापर करून घेणार.

अगदीच नावडती भाजी असेल तर आवडती चटणी - कोशिंबीर - गूळतूप असलं काहीतरी मिळतं जेवणात, पण भाजी संपवल्यावर. भूक नसेल तर नंतर खा, हे संपल्याशिवाय दुसरं काहीही मिळणार नाही म्हणून सांगते मी. बहुतेक मी फार खडूस आई आहे. Happy

@रायगड
इडल्या - या सारख्या पदार्थांत एखादीतरी भाजी (गाजर, पालक वगैरे) किसून घालणे - हे उपाय आमच्याकडे कामी येतात.

येस!! मी हे परवाच कुठेतरी रेसिपीत वाचलं. त्यामुळे इडली कुकर ऑर्डर केला आहे. तो आला की प्रयोग सुरु. Happy

@ पराग

>>>घरात त्या दिवशी केलेली भाजी पानात वाढली जाणारच आणि ती खाल्लीच पाहीजे. भाजी अगदीच नावडती असेल तर बरोबर चटणी, लोणचं, गुळांबा, दहीसारखर, तूपसाखर वगैरे मिळेल पण पानातली भाजी संपवल्यावर. एखाद्याला आवडत नाही म्हणून दुसरी भाजी अजिबात केली जाणार नाही. खायचं तर खा नाहीतर उपाशी रहा.

हा नियम आमच्याकडे बाबांना सुद्धा लागू आहे. फक्त २-३ वयात मुलं खूप टॅनट्रम देतात आणि त्या चिडचिडीत कायमची अढी बसायला नको म्हणून जरा गोडीने घेऊन बघते आहे.

@विद्या

>>>या उकडलेल्या किंवा मूळ स्वरूपात भाज्यांची जी चव लागते ती आवडली की मग त्या देणे सोपेही होते. उदा: बीन्स किंवा कॉर्न मावे मध्ये एक मिनिट गरम करून त्यात थोडे तूप/बटर, मीठ-मिरेपूड टाकली की स्नॅक साठीही देता येते पटकन.

या अशा भाज्या मी खाते रोज ब्रेकफास्टला. त्यामुळे सध्या तो खात नसला तरी त्याच्या डोळ्याखालून जातायत मधेच तो त्यातील एखादी टेस्ट करून बघतो. सो आय एम ऑन द राईट ट्रॅक!

@रैना

>>>च्याकडे पानात / डब्यात टाकलेले चालत नाही. (माझ्या ओळखीची काही मुलं, त्यांच्या आया, न खाल्लेला डब्बा रोज/ नियमीतपणे कचर्यात टाकतात). आमच्याकडे डबा परत आणला तर तो शाळेतून आल्यावर संपवावा लागतो.
- नवीन पदार्थ केला असला तर मुलांना तो करण्यात सहभागी करुन घेतले आहे. चव घेऊन पहावीच लागते.
- जेवणाच्या वेळा ठराविक आहेत. त्यात फार बदल होत नाही/ करत नाही.
- सुट्ट्यांचे दिवस सोडून बाहेर जेवायला फार जात नाही. महिन्यातून दोन-तीनदा जात असू फारतर. त्यामुळे त्याचेही अप्रुप आहे.

वाह! हे नक्कीच करून बघीन. भातुकली हा आवडता खेळ आहे. आणि त्यात आमची जेवणाची डिस्कशन होतात. पण तिथेही भाजी कर म्हंटलं की तो कढई फेकून हात पाय आपटायला लागतो!!

मानव, सई, धन्यवाद.
रैनांची पोस्ट पण खूप छान आणि उपयुक्त आहे.

@ पराग, सई -- आवडत असो / नसो, पहिल्यांदा वाढलेले संपलेच पाहिजे (२ल आणि २च). असा नियम आमच्याकडे पण होता. अजूनही आहे. त्यात सूट नाही. पुन्हा नका घेऊ हवं तर, नंतर मुरांबा / दही मिळेल. पण भाजी संपल्यावरच, पर्याय म्हणून नाही.

मुळा, सुरण, भोपळा, या भाज्यांच्या दिवशी माझे ताट डाव्या हाताशी असायचे. आपण चापटीच्या रेंजमध्ये आहोत ही जाणीव पुरे असायची, भाजी संपायला. राग व्यक्त करायला पाण्याबरोबर भाजी गिळलेली पण आठवतेय. ( पण ती जाणीव, त्या वयात सुखावह नसते, मग आपल्या मुलांना थोड्या वेगळ्या प्रकारे करून बघू असं वाटून भाचीच्या वेळी वेगळे उपाय करून पाहिले.)

पण तेव्हा आम्ही शाळेत होतो. पहिली-दुसरीत. हा अजून लहान आहे, त्याला गोडीगुलाबीतच घ्यावे लागेल.

@ सई -- तो जर भातुकलीत पण भाजीच्या विरोधात आहे, तर भाजी या विषयाचा अतिरेक झालाय -- त्याच्या दृष्टीने. बाकीच्या मार्गाने भाज्या पोटात जातात, तर पोळी-भाजीच्या घासाचा आग्रह धरू नका. तुमचा आग्रह आणि त्याचा विरोध, साद-पडसाद आहेत बहुतेक. साद थांबवा, पडसाद थांबेल.

एकत्र जेवताना मुले बाकीच्यांचे बघून खातात; हे खाल्ले पाहिजे, सगळे खातात याची आपसूक नोंद घेतात. त्याला आधी भरवू नका. आपण जेवताना एक-एक घास त्याला पण द्यायचा. आणि नियम सगळ्यांना सारखा. त्याच्यासमोर आपण आपल्या नावडीचे पदार्थ खाणे टाळले तर तो मुद्दा ते बरोबर मांडतात. आता बाबांना का नाही सांगत.... वगैरे.

हल्ली शाळेत पण भाजी-पोळीचा डबा रोज आणि १ दिवस जंकफूड असे असते. तेव्हा आपोआप गाडी रूळावर येईल.

तुम्हाला राग येईल कदाचित पण -- तुम्ही प्रतिसादात जे जे लिहिलेय त्यावरून, तो त्याच्या वयोमानाप्रमाणे योग्य टप्पे घेतोय भाजी खाण्याचे, अगदी शून्यावर नाहीये. तुमचे समाधान / संयम थोडा वाढला की काम फत्ते होईल.

>>> तुम्ही प्रतिसादात जे जे लिहिलेय त्यावरून, तो त्याच्या वयोमानाप्रमाणे योग्य टप्पे घेतोय भाजी खाण्याचे, अगदी शून्यावर नाहीये. तुमचे समाधान / संयम थोडा वाढला की काम फत्ते होईल.

हो. इतर प्रतिसाद वाचून माझ्याही ते लक्षात आलं. त्यामुळे धन्यवाद. पण खूप नवीन गोष्टी कळल्या.
संयम वाढवणे खूप गरजेचे आहे माझ्यासाठी.

Pages