कसं बनवायचं दही ?

Submitted by दीपा जोशी on 5 April, 2017 - 11:51

कसं बनवायचं दही ?

dahi  IMG_20170404_124428420.jpg

‘दही’ म्हटलं, की आठवतं पूर्वी आई चिनीमातीच्या छोट्या ठेंगण्या बरणीत लावायची ते सायीचं, घट्ट, गोड दही. अहाहा! काय त्या मलईदार दह्याची चव असायची! डॉ. अनिल अवचटांच्या ‘छंदांविषयी’ या पुस्तकात त्यांच्या दही लावायच्या छंदाचं वर्णन आहे. ते वाचून, त्यांच्यासारखाच आता माझाही ‘उत्तम दही लावणे’ हा छंद झाला आहे. खरोखरी, ‘‘कोमट दुधात विरजण (विरजण म्हणजे आधी तयार असलेलं दही किंवा ताक ) घातलं की ७-८ तासांनी दही बनतं’’ या एका वाक्यात दही कसं तयार करायचं हे सांगताच येणार नाही; इतक्या खाचाखोचा आणि बारकावे हा साधा पदार्थ तयार करताना वापरावे लागतात.

दही तयार करायला कच्चं दूध काही ठिकाणी वापरतात, पण त्यात इत्तर जिवाणू असण्याची शक्यता असते. म्हणून, गायीचं- म्हशीचं- गवळ्याकडंच- पिशवीतलं..... कोणतंही असो…दूध विरजण्याआधी एकदा व्यवस्थित तापवून घेतलेलं असलं पाहिजे. नंतर दही लावताना, वेगवेगळ्या ऋतूंमधील वेगवेगळ्या हवेप्रमाणे दुधाच्या तापमानात आणि घालायच्या विरजणाच्या प्रमाणात फरक पडतो. एकदम गरम दुधाला विरजण लावलं, तर दही चोथा- पाणी होतं आणि आंबटही होतं. एकदम गार दुधाला विरजण लावलं तर दही लागत नाही. दही लावायला वापरायचं विरजण चांगलं असावं लागतं. ते गोड आणि ताजं असेल तर दही देखील छान बनतं.

उन्हाळ्यात दही लावताना, साधारणतः आपलं अंग जेवढं गरम असतं, तेवढं सायीसहित दूध कोमट करायचं. एक मध्यम वाटी दूध असेल, तर त्यामध्ये एकच थेम्ब ताक- (दही असलं तर अगदी मूगाच्या डाळीएवढं, घोटून) - घालायचं. कडक उन्हाळ्यात तर दह्याचा/ताकाचा चमचा किंचित कोमट दुधात नुसता फिरवायचा. दही घट्ट लागायचं गुपित म्हणजे, विरजण घातलेलं दूध एका भांड्यातून दुसऱ्यात उंचावरून ओतायचं...... असं ६-७ वेळा तरी करायचं. दुसरी पद्धत म्हणजे, ज्या भांड्यात दही लावायचंय, त्याला आतून सगळीकडे थोडंसं विरजण लावून घ्यायचं, कोमट दूध त्यामध्ये ओतायचं, आणि चमच्याने बराच वेळ गोल गोल ढवळत बसायचं! यामुळे हवेतला ऑक्सिजन छानपैकी मिसळला जातो; आणि घातलेल्या विरजणाचा कण आणि कण मोकळा होऊन संपूर्ण दुधात विरजणाचा अंश मिसळतो. नंतर झाकून उबदार ठिकाणी ठेवायचं. पुढच्या ८-१० तासात विरजणात असलेले ‘लॅक्टोबॅसिलस’ नावाचे जिवाणू, संपूर्ण दुधात आपलं साम्राज्यं वसवतात. हे जीवाणू, दुधातील ‘लॅक्टोज’ नावाच्या साखरेचं, ‘लॅक्टिक ऍसिड’ या आम्लधर्मी पदार्थामध्ये रूपांतर करतात. या आम्लामुळे दुधाचा प्रवाहीपणा जाऊन दह्याचा साका बनतो. दुधातले स्निग्ध पदार्थ हलके असल्याने यावर सायीच्या रूपात जमा होत राहतात. आणि मस्त कवडी पडेल असं, घट्ट सायीचं दही तयार होतं. दही चमच्यात घेतल्यावर जे पाणी सुटलेलं दिसतं , त्याला आयुर्वदात ‘मस्तु’ असं म्हणतात. ते ही दह्याएवढंच आरोग्यदायी असतं.

हिवाळ्यात दही बनवताना दूध थोडंसं जास्त गरम करायचं- म्हणजे बाळाला पाजतो तेवढं. थंडी खूप जास्त असेल तर विरजण घालताना थोडंसं जास्त - म्हणजे साधारणतः एक वाटी गरम दुधाला हरबर्याच्या डाळीएवढं दही घोटून घालायचं. उंचावरून दूध ओतायची पुढची पायरी तशीच. थंडीमध्ये काही वेळा दही लागण्यासाठी भांडं गरम पाण्यातही ठेवावं लागतं. सकाळी लावलेलं दही उन्हात ठेवलं तर अगदी ३/४ तासात ...जेवायच्या वेळेपर्यंतही तयार होतं. कुणी कुणी दही लवकर लागावं म्हणून ‘कॅसेरोल’ मध्येही ठेवतात.

दुधामध्ये स्निग्धांश जितका जास्त तितकं दही चवीला चांगलं लागतं. त्यासाठी साय न काढलेलं दूध घ्यावं. दही चवीला उत्तम लागण्यासाठी, ते फार आंबट होऊनही चालत नाही. त्यासाठी दही लावलेलं भांडं उन्हाळ्यात गार पाण्यात ठेवायचं. दही लागलं की, फ्रीज मध्ये ठेवायचं. चिनी मातीच्या भांड्यात किंवा मातीच्या मडक्यात दही तयार केलं तरी ते घट्ट आणि कमी आंबट होतं. कारण, चिनी मातीच्या भांड्यात बाहेरच्या हवेचा परिणाम फारसा होत नाही आणि मातीच्या मडक्यामुळे आत गारवा तयार होतो.

इतकी काळजी घेऊन, साईसकट दुधाचं दही लावायचं आणि ७/८ तासांनी त्याच्यावरचं झाकण उघडून बघायचं..... मुलायम, मलईदार, गोड , घट्ट दही तयार झालेलं असतं !
बंगाल, ओरिसामध्ये ‘मिष्टी दोई‘ नावाचे, वेगळ्या प्रकारे बनवलेले दही आवडीने खातात. ते बनवताना, दूध जवळ - जवळ निम्मं आटवायचं, कोमट झाल्यावर त्यामध्ये ताडाचा किंवा साधा गुळ अथवा साखर (१ लिटर दुधाला १ कप) या प्रमाणात घालायची , खूप ढवळायचं , आणि मग पुढे दही लावतो तसं दही लावायचं. रात्री लावलं, तर सकाळी मिष्टी दोई तय्यार असतं.
पाश्चिमात्य देशात वापरात असलेलं ‘योगर्ट’ आणि आपलं ‘दही’ हे दोन्ही सारखाच पद्धतीनं बनत असले, तरी दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. आपल्या भारतीय जिभेला तो पटकन जाणवतो! ..... चवीमध्ये, रंगामध्ये, लॅक्टोबॅसिलस च्या प्रकारामध्येसुद्धा. काही वेळा मला तर ‘फ्लेव्हर्ड ग्रीक योगर्ट’ म्हणजे फळं घातलेलं, थोडंसं पातळ, कमी गोडीचं, श्रीखंडच वाटतं. अमेरिकेत असताना एकदा मी ताजं, घरगुती योगर्ट बनवायचा प्रयत्न केला होता. दही बनवतो, त्याच प्रमाणात कोमट दुधात विकतचे ‘प्लेन’ योगर्ट थोडंसं टाकलं होतं. पण एक पूर्ण दिवस गेला तरी योगर्ट बनलं नाही. दुसऱ्या दिवशी ते तयार झालेलं दिसलं तेव्हा जीव भांड्यात पडला! तेव्हापासून लक्षात आलं की बहुदा योगर्ट साठी ‘विरजणा’चं प्रमाण जास्त घालावं लागतं. (त्या माझ्या घरगुती योगर्टची चव जास्त छान होती हे सांगणे नलगे! )

तसं जगभर दही वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलं जातं. आयर्लंड मध्ये पाश्चराइज्ड, होमोजिनाइज्ड दूध वापरून चक्क्यासारखं बनवलेलं ‘स्किर (skyr)’नावाचं दही; तर पश्चिम सुमात्रा, इंडोनेशिया मध्ये वापरतात ते ‘दहिया’ हे थोडंसं वेगळं दही. बांबूच्या पोकळ भागात केळीच्या पानाचा द्रोण ठेवून त्यात कच्चं दूध ओततात, आधीच्या शिल्लक ‘दहिया’ चं विरजण लावतात, दोन दिवस झाल्यानंतर ‘दहिया’ बनतं. नेपाळमध्ये दही ‘धोऊं‘ नावाने ; तर अर्मेनिया, जॉर्जिया भागात योगर्ट ‘मझुन’ (अश्याच काहीतरी नावाने) खाल्लं जातं.
तर अशी ही दह्याची कहाणी!
dahi  IMG_20170404_124428420.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख छान!
आलं का दही सादबादप्रमाणे! माबोवर आप्पे, दही, गुळपोळ्या, माकाचू तर कितीतरी... या चर्चा होतातच... Happy
इथे पाहा बरं जरा... सही दही!

राया , योकु, धन्यवाद.
योकु- <<< इथेआलं का दही सादबादप्रमाणे>>> दही आणि उन्हाळा यांचं साटंलोटंच तसं आहे!
<<<पाहा बरं जरा... सही दही>>>- हेही उपयुक्तच.

मी पण उद्या आईला फोन करुन विचारतो तिची रेसेपी.. आणि लिहतो इथे..

आमच्या घरी रोज ५ ते ६ लिटर दुध लागायच ( ४ लिटर म्हैस आणि २ लिटर गाईच ).
मला आठवत त्या प्रमाणे आई २ ते ३ वेगळ्या पद्धतीने दही लावयची... त्यांची चव वेगवेगळी असायची..

ता.क. : फक्त माहिती म्हणुन .. प्रत्येक गाई वा म्हशीच दुध व त्या पसुनच दही याची चव वेगळी लागते. मला आमच्या एका ठरावीक म्हशीचच दुध आवडायच. याच कारण त्या जनावराच वय आणि त्याच्या खायच्या सवयी त्या मुळे दुध वेगवेगळ्या चविच असत..
पण डेअरी वर सगळ्याच दुध एकत्र करुन विकतात तेव्हा चविचा फरक कळत नाही...

म्हणजे डेअरीचे दुध आणायचे तर तिथेच आयते दही पण मिळते की!>> आणुमोडण. मी पण आयते दहीच आणते. श्याम डेअरी फार्म ऑफिस च्या समोरच आहे. उन्हाळ्यात महाग मिळते. परवा पाड्व्याला उन्हात बाहेर जायचा कंटाळा आला तर श्यामरावांच्या दह्याचे झट्पट श्री खंड केले नैवेद्यापुरते. घरी गारव्यात बसून शाम रावाचे दही एक चमचा साखर घालून खाण्यासारखे सूख नाही उन्हाळायात.

>>>>दही घट्ट लागायचं गुपित म्हणजे, विरजण घातलेलं दूध एका भांड्यातून दुसऱ्यात उंचावरून ओतायचं...... असं ६-७ वेळा तरी करायचं. दुसरी पद्धत म्हणजे, ज्या भांड्यात दही लावायचंय, त्याला आतून सगळीकडे थोडंसं विरजण लावून घ्यायचं, कोमट दूध त्यामध्ये ओतायचं, आणि चमच्याने बराच वेळ गोल गोल ढवळत बसायचं! यामुळे हवेतला ऑक्सिजन छानपैकी मिसळला जातो; आणि घातलेल्या विरजणाचा कण आणि कण मोकळा होऊन संपूर्ण दुधात विरजणाचा अंश मिसळतो.
वाह! या टीप बद्दल खूपच आभार. इथे इलेकट्रीक हॅन्ड मिक्सर पण वापरता येईल.

>>>त्याच प्रमाणात कोमट दुधात विकतचे ‘प्लेन’ योगर्ट थोडंसं टाकलं होतं. पण एक पूर्ण दिवस गेला तरी योगर्ट बनलं नाही. दुसऱ्या दिवशी ते तयार झालेलं दिसलं तेव्हा जीव भांड्यात पडला! तेव्हापासून लक्षात आलं की बहुदा योगर्ट साठी ‘विरजणा’चं प्रमाण जास्त घालावं लागतं. (त्या माझ्या घरगुती योगर्टची चव जास्त छान होती हे सांगणे नलगे! )

विकतचे योगर्टस दही लागल्यावर त्यातले जीवाणू मारून टाकतात. कारण जर ते तसेच ठेवले तर दही आंबट होऊन खराब होतं. त्यामुळे विकतचे दही खूप दिवस टिकते. घरचे लगेच आंबट होते. विरजण लावायचे असेल अमेरिकेत, तर वेगळं जिवंत कल्चर आणावं लागतं.

आमच्या कडे(आई, आजी कडून आलेल्या परंपरेत), आम्ही दहीभात सुद्धा विरजून बनवतो. भात शिजवून त्यात आलं, लसूण आणि सायीचे कोमट दूध घालायचे आणि त्यातच दही घालून छान ढवळून, ओल्या कापडात गुंडाळून रात्रभर ठेवायचे. सकाळी डब्यासाठी दहीभात तयार! वरून फक्त चरचरीत कुटाच्या मिरचीची फोडणी द्यायची भरपूर हिंग घालून. असा दही भात दुपारी ऑफिस मध्ये खायला फार मजा येते. मी संपूर्ण फर्स्ट हाल्फ सारखा डब्याचाच विचार करत असते. Happy

डेअरीचे दुध आणायचे तर तिथेच आयते दही पण मिळते की! Lol ----- चव, ताजेपणा, उरलेले दूधाचा योग्य उपयोग आणि किंमत.

इथे भारतात दूध, दही, पनीर, चीज, ताक इत्यादी सर्व पदार्थांची होम डिलीव्हरी मिळते सक्काळी सक्काळी ६ पर्यंत दूध घराबाहेर अडकवलेल्या पिशवीत drop करतात. काहीही आणायला जावं लागत नाही. गावाला जाणार किंवा इतर कारणांनी दूध नको असेल तर अँप मध्ये तसं अपडेट करायचं. Directly from farm, non-pasterised, organic, A२ milk etc.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद morpankhis , मानव पृथ्वीकर, नंद्या ४३, अमा, सई केसकर, राजसी , दक्षिणा.

morpankhis - <<मी पण उद्या आईला फोन करुन विचारतो तिची रेसेपी.. आणि लिहतो इथे.>>. जरूर. आम्हाला आवडेल ऐकायला तुमच्या आईंच्या दह्याच्या पद्धतीबद्दल!

नंद्या ४३ , अमा -<<म्हणजे डेअरीचे दुध आणायचे तर तिथेच आयते दही पण मिळते की! >> कोणतीही विकतची खाद्यवस्तू आणि घरची यामध्ये चवीचा, ताजेपणाचा, शुद्धतेचा फरक हा राहतोच. शिवाय घरातली मंडळी करतात ते प्रेमाने. व्यावसायिक पदार्थाना कशी त्याची सर येईल? म्हणूनच तर के. प्र. , बेडेकर वगैरे मंडळी म्हणतात ना, ‘अगदी घरच्या सारखं लोणचं (किंवा मसाले )..... अगदी आजीच्या हातची चव ...... ‘
जर कोणत्याही पदार्थाचं ‘तंत्रं ‘ अवगत झालं, की तो पदार्थ फक्त नाइलाजास्तव कधीतरीच बाहेरून आणावासा वाटतो.

सई - <<आम्ही दहीभात सुद्धा विरजून बनवतो. भात शिजवून त्यात आलं, लसूण आणि सायीचे कोमट दूध घालायचे आणि त्यातच दही घालून छान ढवळून, ओल्या कापडात गुंडाळून रात्रभर ठेवायचे.>>
असा भात आम्हीही करतो, सुंठपूड घालून. ओल्या कापडात गुंडाळून करून बघेन आता.

मला आवडला लेख..
आपल्या चवीचं दही इथे अंगोलात मिळत नाही. पुर्वी एक भारतीय हॉटेल होते, त्यांच्याकडे मिळायचे आता तेच बंद झाले.
मी भारतातून विरजण आणले तरच इथे तसे दही बनू शकते.

मी खुप दिवस रेडीमेड कल्चर शोधतोय. भारतात ते फक्त इण्डस्ट्रीयल वापरासाठी दिसले होते मागे. आता मिळते का ते माहीत नाही.
बाकी बहुतेक योगर्ट ची आहेत बाजारात.

कोणतीही विकतची खाद्यवस्तू आणि घरची यामध्ये चवीचा, ताजेपणाचा, शुद्धतेचा फरक हा राहतोच. शिवाय घरातली मंडळी करतात ते प्रेमाने. >> असहमत. ह्यामुळेच बायका किचन मध्ये अडकून पडतात असे माझे विनम्र मत आहे. गोड गैरसमज आहेत हे. चित ळे, नेस्ले वगैरे लोक्स शास्त्रशुद्ध प्रोसेस फॉलो करतात. घरात किती ठिकाणी पदार्थ कॉटॅमिनेट व्हायचे चान्सेस अस्तात. हौस असेल त्याने करावे. आय हॅव फन थिंग्स टू डू.

नंद्या ४३ , ...............................................यामध्ये चवीचा, ताजेपणाचा, शुद्धतेचा फरक हा राहतोच.
तुमचे बरोबर आहे. गुळाची चव नसलेल्या आळशी माणसाकडून आलेले फालतू प्रतिसाद म्हणून सोडून द्या. मला माफ करा, तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता.

दही घट्ट लागायचं गुपित म्हणजे, विरजण घातलेलं दूध एका भांड्यातून दुसऱ्यात उंचावरून ओतायचं...... असं ६-७ वेळा तरी करायचं. हे माहित नव्हतं.आता ट्राय करून बघेन.

अमेरीकेमध्ये ईण्डीयन ग्रोसरी शॉप मध्ये मिळणारे दही विरजण म्हणून वापरून बर्याचदा दही लावायचा प्रयत्न केलाय पन प्र्त्येक वेळेस ते चिकट झालेय Sad
त्या साठी काय करता येईल ?

विरजण कमी पडणे
पुरेसे उबदार वातावरण पुरेसा वेळ नसणे
दुधात स्निग्धांश कमी असणे

ही किंवा यापैकी कारण असू शकतील.

>>आय हॅव फन थिंग्स टू डू.--
दही लावणे कॅन बी फन टु. स्वतः लावलेलं दही चांगलं झालं (माझ्यासारखे लोकं ज्यांना हे क्वचितच जमतं) की खुप आनंद होतो Happy वरती त्यांनी लिहिलेय ना की हा एक छंद असु शकतो. आणि चिनीमाती च्या भांड्यांशी खेळायला आवडत असेल तर मग अजुनच मज्जा.

अमेरीकेमध्ये ईण्डीयन ग्रोसरी शॉप मध्ये मिळणारे दही विरजण म्हणून वापरून बर्याचदा दही लावायचा प्रयत्न केलाय पन प्र्त्येक वेळेस ते चिकट झालेय Sad
त्या साठी काय करता येईल ? >>>>>>>>

लोकल फार्म किंवा डेरी मधून जिथे गायीच कच्च दूध, पोल्ट्री इत्यादी मिळतं तिथे काऊ मिल्क योगर्ट मिळतं ते आणा
त्याच दही इंडियन ग्रोसरी मधल्या दह्यापेक्षा जास्त छान लागत बाकी सगळी पद्धत साधारण तशीच ठेवा

दिनेश, बी. एस. ,mr. pandit, स्वप्नाली, असुफ लेखाबद्दल प्रतिकिया कळवलीत ..... धन्यवाद!

नंद्या४३----<<< गुळाची चव नसलेल्या आळशी माणसाकडून आलेले फालतू प्रतिसाद म्हणून सोडून द्या. मला माफ करा, तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता >>> अरे, माफी काय त्यात! सर्वांनी आपली मते मांडण्यासाठीच, ती एकमेकांबरोबर ‘शेअर’ करण्यासाठी तर हे व्यासपीठ आहे. आणि भिन्न मते तर असणारच; मला तुमच्याही मताचा आदर आहे. आपण ‘चर्चा’ म्हणून याकडे पाहायचं, नाही का?

स्वप्नाली--<<<अमेरीकेमध्ये ईण्डीयन ग्रोसरी शॉप मध्ये मिळणारे दही विरजण म्हणून वापरून बर्याचदा दही लावायचा प्रयत्न केलाय पन प्र्त्येक वेळेस ते चिकट झालेय>>> मलाही असाच अनुभव आला आहे.

राया --<<< स्वतः लावलेलं दही चांगलं झालं (माझ्यासारखे लोकं ज्यांना हे क्वचितच जमतं) की खुप आनंद होतो >>> किती साध्या साध्या साध्या गोष्टीत आनंद मिळतो नाही? फक्त तशी दृष्टी हवी!

असुफ --<<<, लोकल फार्म किंवा डेरी मधून जिथे गायीच कच्च दूध, पोल्ट्री इत्यादी मिळतं तिथे काऊ मिल्क योगर्ट मिळतं ते आणा त्याच दही इंडियन ग्रोसरी मधल्या दह्यापेक्षा जास्त छान लागत बाकी सगळी पद्धत साधारण तशीच ठेवा>>>छान सांगितलंत . आता हेही करून बघीन.

मनीमोहोर --- वा ! सुका मेवा, केशर वगैरे सजावट केलेला फोटो टाकून दह्याच्या या शुभ्र लेखाला रंगत आणलीत! धन्यवाद.

हे लिहिताना सुचलं की, बीट च्या रसाचे थोडे थेम्ब टाकूनही गुलाबी रंगाचं दही बनावट येईल. .

AavaDalaa lekh!
Ama, apalyala avadato to padarth avaDel asa karun khanyat Anand asato na! Vikat ananyat kahich problem nahi, pan chavit farak padatoch.
Agadi chitale ani baherachya Shriram dairy chya paneer , dahi vagaire prakarat dekhil farak padato. (Shriram chi chav uttam asate).
Punyala alat tar khayala ghalen

अमेरीकेमध्ये ईण्डीयन ग्रोसरी शॉप मध्ये मिळणारे दही विरजण म्हणून वापरून बर्याचदा दही लावायचा प्रयत्न केलाय पन प्र्त्येक वेळेस ते चिकट झालेय Sad
त्या साठी काय करता येईल ?>>>>>
स्वप्नाली , डॅनन, कुठलही ग्रीक योगर्ट, होरायझन, क्रोगर,टारगेट .. थोडक्यात कुठल्याही ब्रँडने दही व्यवस्थित होत.
दुध व्यवस्थित अगदी वर येवू पर्यंत तापवा . (थोडक्यात आपण भारतात तापवतो ,दिवसभर टिकाव म्हणुन तस) . गार व्हायला ठेवा. साधारण हाताला गरम लागेल अस. सुरुवातीला अंदाज येत नसेल , सरळ ,फुड थेर्मॉमीटर मिळतो , अ‍ॅमेझॉन किंवा ग्रोसरी स्टोअर मध्ये तो वापरा. ११० ते १२० फ टेंप आल कि दुध विरजणाला तयार झाल. आता त्यात एक चमचा दही ( ३ कप दुध असेल तर) घालुन व्यवस्थित मिक्स करा. ओव्हन मध्ये लाईट ऑन करा. त्यात हे विरजण ठेवा. दुसर्‍या दिवशी घट्ट सुरेख दही तयार होत. हव असेल तर दुपारपर्यंत ठेवल तर अगदी घट्ट आणि किंचित आंबट अशी चव येते.
मी काही रोज दही करत नाही. पण कधी कधी एकदम मुड आला कि करते.
विसु. ओव्हन चा लाईट चालूच ठेवा. माझ्या साऊथ इंडीअन मैत्रिणी ओव्हन लाईट ऑन न करता, किचन टॉवेल गुंडाळून ठेवतात. मला तस नाही जमल अजुन.
याप्रकाराने अगदी छान दही होत. आणि याच ताक जास्त छान लागत मठ्ठा करताना वगैरे.
गोपी किंवा इतर देसी ब्रँडच्या दह्याचे एकदमच उत्तम दही होते.
करून पहा आणि सांगा जमत का. Happy

मस्त आहे लेख . खूप छान . ज्यांना दही आयत आणायच असेल त्यांनी वाचु नये . दही लावण्याकरता दोन मिनिट लागतात. फार फार तर पाच मिनिट . त्यांनी कसं काय किचन मध्ये अडकून पडायला होत बुवा ? ना कळे . तास दोन तासाची प्रोसेस आहे का ? काहीही Happy

Pages