सांजमळवट

Submitted by भुईकमळ on 16 March, 2017 - 10:55

बोलावतो घंटारव
धुकाळल्या घाटावर
बेडी काचते श्वासांची
नादहाका देहभर ...

पूर येई कहाणीला
अश्रू सांडता नदीत .
घट चालला वाहून
माझा स्पर्श सांभाळीत ...

तहानेच्या वादळात
आर्त वृक्षाचे आर्जव ,
'येग येग मेघावली
विडा वीजेचा भरव ".

जाओ नभापार झोका
रुपु देत चंद्रकाचा
तुटणाऱया तारकांचा
उरी प्राणांतिक ठेका ...

आता रानोमाळ गाते
सावलीला झुगारून .
रक्तशिंपण करते
पांगाऱ्याच्या फांद्यातुन

घेरलेल्या वणव्यात
सजे ठिणग्यांनी शेज
लाल पेटत्या फुलांनो
भरा सांजमळवट .

Group content visibility: 
Use group defaults

क्या बात है. खूप दिवसांनी वा असे म्हणुन गेलो.
कुठल्यातरी प्रसिद्ध कवितेत मृत्युसोहळा असा शब्द वाचल्याचे आठवते. ना ती कविता आठवत आहे ना ओळ. पण तो शब्द मनात आला हे वाचल्या वाचल्या.

छान!
चंद्रकाचा शब्द खूप आवडला.

आवडली कविता
बरेच दिवसांनी आली पण कसर भरून काढली सगळी Happy

खूपच ऊत्स्फूर्तशी दाद दिलीत टण्या ... त्याबद्दल आधी मनापासून धन्यवाद !
कुठल्यातरी प्रसिद्ध कवितेत मृत्युसोहळा असा शब्द वाचल्याचे आठवते >.>> होय,मी पण तसे ऐकल्यासारखे वाटतेय . 'पूजेतल्या पानाफुला ,मृत्यू सर्वांगसोहळा .'.. लहानपणापासून आपण जे काही नोंद घेण्याजोगे वाचतो, पाहतो ... ऐकतो त्याचा ठसा आपल्याही अभिव्यक्तीतून नकळत उमटत राहतो जेव्हा गच्चं काहीतरी आपल्या मनात मावेनासं होतं . असो , मोकळ्या प्रतिक्रियेसाठी पुन्हा एकदा आभार !

खूप धन्यवाद !सपना हरिनामे सत्वर दाद दिलीत म्हणून .

साती , खुप खूप धन्यवाद ! तुमच्यासारख्या रसिक विदुषीचाही अभिप्राय माझ्यासाठी खूप तोलामोलाचा आहे .

स्मिता २०१६, उत्कट प्रतिसादासाठी धन्यवाद !

ट्यागो ,खूप आभारीय !. . .

धन्यवाद! निरपेक्ष .. नियमित प्रतिसादासाठी मनीमोहर
हे अबोलसे मैत्र राहो निरंतर....

AMIT, thanks !....

अक्षय दुधाळ ,तुमचेही आभार !

खूप सुंदर..
जाओ नभापार झोका
रुपु देत चंद्रकाचा>>>
रक्तशिंपण करते
पांगाऱ्याच्या फांद्यातुन >> सुरेख शब्दकळा..

मॅगी ,खूप छान वाटलं... कुणी आपल्या शब्दांची इतकी दखल घेतेय ते पाहुन .
हर्षा , थँक्स या सुंदर अभिप्रायासाठी .
जिज्ञासा , तुमच्या सारख्या दर्दीची दाद मिळाली आणि काय हवं ... धन्यवाद !

थँक्स ! ...सिंथेटिक जिनिअस .

श्री ,किती छान प्रतिक्रिया .धन्यवाद ! पण माबोने कात टाकण्याचा प्रश्नच येत नाही .तिच्यातुन उगम पावलेल्या अनेक सळसळत्या शब्दवाटा नवख्यांनाही लिखाणाची जबरदस्त उर्मी देत असतात इतकच .

टण्या , होय तेच ते अप्रतिम गाणं नकळत आत्मचिंतन करायला लावणारं अगदी मार्मिक शब्दांत एखाद्याच्या जगण्याचं तत्वज्ञान मांडणारं .

चिन्नु , मनापासुन आभार .

मामी...तुमचा रिस्पॉन्स कोवळा हुरुप देऊन गेला .

मीनल , तुमचेही आभार .

>>>तहानेच्या वादळात
आर्त वृक्षाचे आर्जव ,
'येग येग मेघावली
विडा वीजेचा भरव ".>>>क्या बात है!

शेवट तर अजून गहिरा!
कविता काळजात रुतली म्हणायला काहीच हरकत नाही!

मीनल , काही हरकत नाही मी पण तिथे 'शब्दसाठा' हा शब्द असेल असं गृहीत धरलेलं .

जाई , धन्यवाद ग !..

सत्यजित... वाह ! मस्तच प्रतिक्रिया .... धन्यवाद !

शोभा १ ... प्रतिसादासाठी धन्यवाद !

आणि भारती तुमचे शब्द सुरंगीच्या शुभेच्छांसारखे दर्वळलेयत अवतीभवती जसे ... खूप आभारीय .

Pages