मसाला कारले

Submitted by नलिनी on 10 March, 2017 - 09:15
masala karle
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

कारले : अर्धा की.
मिठ : २ चमचे( उकडताना कारल्यात भरण्यासाठी)

मसाला घटक :
भाजलेले शेंगदाणे : १ वाटी
भाजलेले तिळ : १/२ वाटी
सुके खोबरे : १/२ वाटी
धने : पाव वाटी
लसूण : आवडीनुसार कमी अधिक
हळद : पाव चमचा
लाल तिखट : १ चमचा
गरम मसाला / काळा मसाला : २ चमचे ( माझ्याकडे घरी बनवलेला मसाला आहे मी तो वापरते)
मिठ : चवीनुसार
गुळ : एक चमचा ( वगळला तरी चालेल)
असल्यास सुर्यफुलाच्या बीया : अर्धी वाटी

क्रमवार पाककृती: 

कारले धुवून घ्यावे.
आकारमानानुसार कापून व चिरा देवून घ्यावे.
प्रत्येक फोडीमध्ये मिठ भरावे. (एका फोडीत साधारण पाच बोटांच्या चिमटीत बसेल एवढे)
कढईत २ - ३ चमचे (डाव नाही) तेल घेवून त्यात अर्धी वाटी पाणी घालावे.
मिठ भरलेल्या कारल्याच्या सर्व फोडी त्यात ठेवून झाकण ठेवावे.
५ - १० मि उकडू द्यावे. गरज भासल्यास जरासे पाणी परत घालावे.

MasalaKaralemasalaKarale

कारले उकडून घेईस्तोवर मसाल्याचे सर्व घटक मिक्सरम्ध्ये कोरडेच वाटून घ्यावे. व एका पसरट ताटात काढून घेऊन व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
कढईत शक्यतो पाणी शिल्लक राहत नाही त्यामुळे कारले निथाळायला लागत नाहीत. त्यातल्या बीया काढून टाकाव्या व प्रत्येक फोडीत मसाला दाबून भरावा.
(असे मसाला भरून ठेवलेले कारले फ्रिजर मध्ये ठेवू शकता. हवे तेव्हा जरावेळ आधी बाहेर काढून डिफ्रॉस्ट झाले की तेलावर भाजून घ्यायचे.)

तव्यावर तेल सोडून आधी मसाल्याकडची बाजू भाजून घेऊन मग मागची बाजू हवी त्या प्रमाणात खरपूस भाजून घ्यावी. भाजायला फारसे तेल लागत नाही.

masalaKarale

वाढणी/प्रमाण: 
आपल्या आवडीप्रमाणे
अधिक टिपा: 

मी जितके दिवस श्रीरामपूरला असेल तितके दिवस दर आठवड्याआड शेखरदादा मुंबईहून आम्हाला भेटायला यायचा. तो आला की जेवणाचा बेत ठरलेला असायचा. मसाला कारले, हिरव्या मिरचीची शेंगदाण्याची चटणी, एखादी पालेभाजी आणि भाकरी.
तो आला की शांडिल्यशी खेळून आणि फ्रेश होऊन आम्ही बाजार समिती च्या कांदा मार्केटला भाजी आणायला जायचो. भरपूर भाज्या आणि किमान १ की कारले घेवून यायचो.
दुपारच्या, रात्रीच्या जेवणाला कारलेच खावून तो मसाला भरलेले सर्व कारले सोबत घेवून जायचा.
मी बनवलेले मसाला कारले त्याच्या खास आवडीच्या पदार्थातले एक.

आता दादा नाही, उरल्या फक्त आठवणी. त्याची आठवण काढल्याशिवाय माझ्याकडे कारले बनतच नाही.

माहितीचा स्रोत: 
आई, काकू , स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसते आहे पाककृती!!
ते कारल्याचे पाणी काढून टाकणे म्हणजे मला त्यातले नेमकेपण काढून टाकण्यासारखे वाटते....म्हणून मी फक्त कारल्याच्या काच-या तव्यावर तिखट-मीठ टाकून परतते. आता अश्या पद्धतीने करुन बघेन. पाककृतीबद्दल धन्यवाद Happy

वा मस्त पाकृ. एक शंका: पाच पाच चिमटी मीठ एकेका फोडीला लावले तर खारट होत नाही का भाजी? मीठ फक्त कारल्याचा कडूपणा जावा म्हणुन की अजून काही कारणास्तव?

धन्यवाद!

कडूपणा जावा म्हणूनच. बीया काढतो तेव्हा तसेही हि मिठपण निघून जाते. फोडीत मुरले तेवढेच त्यात उरते.

व्वाव ! मस्त रेसिपी !
माझी अत्यंत आवडती भाजी आहे ही. मला बियांसहीत पण आवडते.

माझी एक्दम फेवरेट भाजी !! आमच्या शेजारच्या काकू अशीच करत्तात..बहुतेक सुर्य फूलाच्या बिया नाही घालत..मी नगर ला गेले की हमखास करून आणून देतात...

मस्त पाकृ. आमच्याकडे यात ओलं खोबरं घालतात इतकाच फरक.

एखाद्या मावे सेफ भांड्यात थोडंसं पाणी आणि छोटा अर्धा चमचा मीठ घालून त्यात कारल्यांचे तुकडे उकडले तर पटकन होतात. मीठ पण कमी लागतं. भांड्यावर झाकण ठेवलं तर थोडं तिरकं ठेवावं म्हणजे वाफेने उडणार नाही. ४ कारली साधारण ३ ते ५ मिनीटांत उकडून होतात. बिया आधीच काढलेल्या असतील तर लवकर उकडल्या जातात फोडी.

मस्त पाकृ.
आठवणीने दिल्याबद्दल धन्यवाद!
रविवारी करुन बघतो.

श्री मलापण बियांसकट आवडते कार्ल्याची भाजी.

मी फोटो बघाय्ला आले Happy
शेंगदाणे, खोबरं, तिळ आणि सुर्यफुल बिया -ह्या पैकी एकावेळी आम्ही १ /२ प्रकार च टाकतो. सु बि तर कुकिंग साठी वापरत नाही. हा प्रकार पण करुन बघायला पाहिजे.

मस्त रेसिपी आणि फोटो.

शिजवताना काही कारली आधीच पोखरलेली दिसत आहेत तर काहि नाही. असं का? तसंच आम्ही कधीच मीठ लावून/भरून शिजवत नाही. तशीसुद्धा छान लागतात, कदाचित कडवटपणा थोडा जास्त रहात असेल पण तशी आवडतात.

तसंच आम्ही कधीच मीठ लावून/भरून शिजवत नाही. >>> आम्ही कोरुन फक्त किचित मिठाच बोट लावतो आणी कुकरला लावुन उकडुन घेतो... सशल आतुन मिठ लावुन ते उकडल्याने मसाला भरल्यावर चव वेगळी येते अस मला वाटत... मसाला पण नेहमिचा दाण्याच्या कुटाचाच असतो, नलिनीचा मसाला पण छान खमन्ग लागत असणार अस वाटतय.. अशी ट्राय करेल.

नलिनी मस्त दिसतेय. मी कधी उकडून करुन बघितले नव्हते. मीठ लावून कारली ठेवुन द्यायची आणिइ१५-२० मिनिटांनी घट्ट पिळून भरायला घ्यायची हीच पध्द्त वापरते. आता असेही करुन बघेन.

धन्यवाद!
सशल, किती ते लक्ष? Happy
एक कारलं आतून पिकलं होत. लाल झालं होतं म्हणून पोखरलेलं आहे.
इथे सुर्यफुलाच्या सोललेल्या बीया मिळतात म्हणून त्यापण वापरते. आमच्याकडे घरी नाही वापरत.
कारल्यात मिठ भरताना मला नेहमी आठवते की पुर्वी जाडे मिठ वापरले जायचे तेव्हा प्रत्येक फोडीत मिठाचे ५-६ तरी खडे भरले जायचे.
तुम्ही करून पाहिल्यानंतर कसे झाले ते नक्की कळवा.

नलिनी खूप मस्तं वाटतेय तुझी रेसिपी.. कारली आवडतात पण फार कडू नाही आवडत.. उकडली नव्हती कधी , या उपायाने कडवटपणा नक्की कमी होत असेल.. लगे हात हिरव्या मिरच्या आणी शेंगदाण्याची चटणी कशी केलीस ते ही सांग..
,'सशल, किती ते लक्ष? ".. हाहा.. सो अ‍ॅलर्ट सशल.. मी परत जाऊन पाहिला फोटो Happy Happy

मस्त आहे रेसीपी.
आम्ही असच करतो भरल कारलं. पण त्यात कारळं घालतो इतक जबरदस्त लागत त्यामुळ. कारळं नसेल तर जवस. दोन्ही पैकी काहीही एकदा घालून बघा कारल्याच्या/ढब्बु मिरचीच्या भाजीला. अतिशय सुरेख आणि खमंग भाजी होते.
घरच मसाल्याच तिखट असत या भाजीत त्यामूळ सेपरेट मसाला/गरम मसाला घालत नाही.