बटाट्याच्या काचऱ्या

Submitted by विद्या भुतकर on 1 March, 2017 - 23:05

गेले काही दिवस झाले मुलगी म्हणत होती की मला बटाट्याची सुकी भाजी खायचीय, आजी करते तशी. दोनेक वर्षांपूर्वी कधीतरी खाल्ली असेल तिने आईच्या हातची भाजी तिला त्याची आठवण येत होती. आता मी ती का करत नसेन नियमित याला काही कारण असं नाहीये पण होत नाही. मग आज शेवटी सकाळी डब्याला देण्यासाठी बनवली आणि एकदम बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. सकाळी आवरायची, शाळेची गडबड, त्यात भाजीचा फोडणीचा वास, पोळ्या हे सगळं एकदम ओळखीचं वाटू लागलं. कुणी याला नुसती बटाट्याची भाजी म्हणत असेल, कुणी बटाट्याचे काप, आम्ही याला बटाटयाच्या काचऱ्या म्हणतो. Happy

तर कोरेगांवमध्ये आठवड्यातून एकदाच बाजार भरायचा पूर्वी, दर सोमवारी. आई, आम्ही शाळेत गेलेले असताना, बाजारात जाऊन वायरच्या बास्केटमधून भाज्या, फळे, पालेभाज्या इ त्या त्या ऋतूप्रमाणे घेऊन यायची. आम्ही शाळेतून येईपर्यंत तिचे बरेचसे निवडून झालेलं असायचं. मग त्यात आम्हाला निवडलेली चवळी, सोललेल्या मटारमध्ये बारीक, गोड लागणारे वेगळे काढलेले मटार, पेरू, देशी केळी, तोतापुरी आंबा अशा अनेक गोष्टी मिळायच्या. मला त्या देशी केळांचं शिकरण मला खूप आवडायचं. आठवड्यातून ३-४ वेळा माझं मी एका पेल्यात बनवून घ्यायचे. असो.

तर तेंव्हा आमच्याकडे फ्रिज नव्हता. त्यामुळे बऱ्याचशा पालेभाज्या, ओल्या भाज्या इ. पहिल्या ३-४ दिवसांत संपून जायचं. त्यातलं चाकवताचं गरगट बरेचदा सोमवारीच व्हायचं. मेथी, पालक, पोकळा वगैरे कधी डब्याला असायचे. अख्खा आठवडा ७ लोकांचं दोन वेळचं जेवण, डबे करेपर्यंत सर्व भाज्या संपून जायच्या. आणि त्या भाजीच्या टोपल्यात कांदा, थोडा लसूण आणि थोडे बटाटे उरलेले असायचे. बरेचदा रविवारी रात्री ऑम्लेट नसेल तर बटाट्याचा रस्सा नक्कीच असायचा. आणि ते नाही झालं तर सोमवारी सकाळी या बटाट्याच्या काचऱ्या हमखास असणारच. तर अशा अनेक सोमवारी सकाळी डब्यांत या काचऱ्या घेऊन गेल्याच्या आठवणी आज एकदम ताज्या झाल्या.

बरेचदा घाई असल्याने कांदा थोडा जास्तच भाजला जायचा. पण डब्यांत त्या एकदम मस्त लागायच्या, त्यातला तो खरपूस कांदा, मोहरीचे दाताखाली येणारे दाणे. नुसत्या काचऱ्या नाहीत तर त्या सोबत ताज्या चपातीचा खमंग वास. सोबत गरम गरम चपाती हवी मात्र. तीच गरम चपाती डब्यात नरम झालेली असायची. फुलके इत्यादी पेक्षा भारदस्त चपाती हव्यात. माझ्या आईच्या जरा मोठया असतात, फोटोत मी केलेल्या छोट्याच आहेत. शाळेतच असे नाही कधी एखाद्या प्रवासाला जायचे असेल, सहलीला वगैरे तर खराब न होणारी भाजी म्हणजे हीच. अनेकदा दादांनाही प्रवासाला जाताना बनवून ठेवलेली असली की आमच्या डब्यातही तीच भाजी असायची.

आज सान्वी दोन पैकी दीड पोळी संपवून आली त्यामुळे यापुढे त्या नियमित द्यायला हरकत नाही असे वाटू लागले आहे. कदाचित माझ्यासारख्याच तिलाही त्या नंतर कधी आठवण करून देतील,तिच्या शाळेची, या दिवसांची. Happy

आता यात विशेष काही रेसिपी अशी नाहीये पण तरीही इथे देत आहे. मुलांना डब्यात देताना चपातीला थोडे लोणच्याचा खार आणि दुसऱ्याला केचप लावून त्यात भाजी घालून रोल बनवून दिले.
मी वरण, चपाती आणि भाजी घेऊन गेले. Happy मस्त जेवण झाले. Happy

साहित्य: तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग, काळा मसाला किंवा लाल तिखट, धणे-जिरे पूड. २-३ बटाटे, एक छोटा कांडा. मीठ चवीनुसार, एक छोटा चमचा साखर.

कृती:
कांदा आणि बटाटा चिरून घ्यावेत. यात बटाटा कापण्याचा पद्धतीने मात्र नक्कीच फरक पडतो. शेवटच्या फोटोत दिसत आहेत तसे पातळ, बारीक काप करून घ्यावेत.

तेल थोडे नेहमीपेक्षा जास्त. नॉनस्टिक पॅनमध्ये जास्त नीट होतात.

तेल तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंग घालावे. लगेच कांदा घालून परतावा. कांदा भाजून झाला की त्यात हळद, एक छोटा चमचा तिखट, धणे-जिरे पूड घालावी.

एकदा परतून त्यात बटाटा घालावा.

मीठ,साखर घालून १० मिनिटे झाकण लावून शिजू द्यावे.

साधारण १५ मिनिटांत भाजी होते.

या १५ मिनिटांत मी मात्र आमचं आख्खा गाव, घर, बाजार, शाळा सर्व फिरून आले. Happy

IMG_3076.JPGIMG_3079.JPGIMG_3078.JPG

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईशप्पथ ..
त्यातला तो खरपूस कांदा, मोहरीचे दाताखाली येणारे दाणे. नुसत्या काचऱ्या नाहीत तर त्या सोबत ताज्या चपातीचा खमंग वास. सोबत गरम गरम चपाती हवी मात्र. तीच गरम चपाती डब्यात नरम झालेली असायची. फुलके इत्यादी पेक्षा भारदस्त चपाती हव्यात. >>>> एक्दम अगदी अगदी झालं .
माझी आज्जी हा प्रकार भन्नाट बनवायची Happy
आईपेक्शा आज्जीच्या हातची जास्त आवडायची

माझ्याही लेकीला माझ्या साबांच्या हातची ही भाजी आवडते.....किती साधी सरळ रेसिपी आहे पण आजी होइपर्यंत भाजणं/परतणं यात एक विषेश हातोटी येत असावी कदाचित ! म्हणून आजी कडून करून ही भाजी खाण्यात जास्त मजा येत असणार...

बाकी तुमचा लेख छान, विद्या! (एक दुरुस्ती सुचवते, कांदा ऐवजी कांडा झालय)

माझ्याही डब्यात खूपदा असायची हि भाजी , चपात्याही मोठ्याच, आईला फुलके अजिबात आवडत नाहीत, आम्हालाही नाहीत. ... बिन पाण्याची म्हणून टिकणारी भाजी.

माझ्या हातून मात्र क्वचितच होते.

माझी पण आवडती भाजी.
पण मी कांदा घालत नाही.
नुसत्या बटाट्याच्या काचर्‍या.

आईशप्पथ ..
त्यातला तो खरपूस कांदा, मोहरीचे दाताखाली येणारे दाणे. नुसत्या काचऱ्या नाहीत तर त्या सोबत ताज्या चपातीचा खमंग वास. सोबत गरम गरम चपाती हवी मात्र. तीच गरम चपाती डब्यात नरम झालेली असायची. फुलके इत्यादी पेक्षा भारदस्त चपाती हव्यात. >>>> एक्दम अगदी अगदी झालं ंमला पन समे फीलिन्ग

अरे वाह छानच... मी पण कोरेगावकर...
ब-याच आठवणी जाग्या झाल्या... श्रावणी सोमवारी तर संध्याकाळी उपास सोडताना चाकवताचं गरगटं हमखास ठरलेलंच असायचं. आणि सोबत ताज्या वाटाण्यांची उसळ... गरमागरम पोळ्या आणि मलिदा...
कुमठ्याकडची वांगी तर फार नामी लागत. मी तर आईला आवर्जून आणायला सांगत असे...
सोमवारी कधी सुट्टी असेल तर बाजारास जाणे हे खास आकर्षण असे... शेजारीच गणपतीचं मंदिर. त्याला मनोभावे पाया पडून मग बाजारास सुरुवात. भैरोबाच्या दिशेने जाणा-या रस्त्यावर पण वेगवेगळे लोक कायन काय घेऊन बसलेले असत. खूप मजा येत असे. त्या लहान वयात ते सगळं खूप अद्भुत आकर्षक वाटायचं.
बटाट्याच्या कात-या (हा आमचा शब्द) हा पण खास लहानपणाची आठवण आहे. अगदी कमी वेळेत व कमी कष्टात बनणारा पण तितकाच नामी पदार्थ... डब्यात दिला तर डबा पूर्ण संपणारच...
अजूनही तो कधी कधी बनवतो... माझी खास आवड म्हणजे साय-भात, बटाट्याच्या कात-या आणि लिंबाचं गोड लोणचं आणि सोबत एखादा पापड.. एकदा नक्की ट्राय करुन पहा...
आज या लेखामुळे अचानक आठवणीच्या गल्लीत फेरफटका घडला...

छान आठवण...

मी हि कांदा नाही घालत.

अरे वा. सर्वान्चीच आव्डती आहे म्हणजे ही तर. Happy छानच.
माझी खास आवड म्हणजे साय-भात, बटाट्याच्या कात-या >> हो हे लिहाय्चए राहिलच. Happy साय भात आणि काच्र्या भारी लागते एक्दम. Happy
मराठी खाद्य पदार्थ च्या धाग्यावर टाका फोटो.>> हा खास मराठी पदार्थ आहे का माहित नाही म्हणून नाही टाक्ले तिथे फोटो.

सर्वान्चे आभार. Happy

मायनस कान्दा अगदी सेम टु सेम, आवडति भाजी, डब्यात भरपुर वेळा असायची ... ही भाजी मोठ्या प्रमाणात करायला घेतली की तितकी खरपुस होतच नाही त्यामुळे डब्बा स्पेशलच भाजी... आई ही भाजी आणी पोळि एकाच डब्यात द्यायची, भाजितल तेल पिउन पोळिही चवदार व्हायची.
हा खास मराठी पदार्थ आहे का माहित नाही>> मराठीच आहे!

मस्तच ! आमच्या ही घरी आज्जी च्या हातच्या काचऱ्या बेस्ट होत्या !
मला कांदा घालून, आणि बहिणीला कांद्याशिवाय आवडतात, म्हणून आलटून पालटून दोन्ही बनत.
माझी खास आवड म्हणजे साय-भात, बटाट्याच्या कात-या >> मला सायीचे दही, भात आणि काचऱ्या जास्त आवडत.

विद्या आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद, आता आज-उद्या मध्ये बनवणे आले!

अगं कसलं खुसखुशीत लिहितेस.. झक्कास.. एकदम फोडणीचा वास इथपर्यन्त पोचवलास..यातच आलं नं सगळं..और क्या कहूँ Happy
शप्पथ.. विस्मरणाच्या खोल डोहात गेलेली ही भाजी अगदी चवीसकट परत आली मनाच्या तळ्यातून वर!!!

आम्ही बटाट्ञाच्या काचर्‍या म्हणतो. शाळेत आणि कॉलेजची आवडती भाजी.

आई घरात नसताना आणि आईने ताकिद दिलेली असतान की जेवून , आवरून ठेवा आणि त्यातच नावडीची भाजी असली की हि भाजी मी करायचे (खरे तर बाबाच) शाळेत असताना.
बाबाच करायचे, मी मदतीला. अंजलीची किसणीने बटाटाच्या काचर्‍या गोल पातळ करायच्या.
बाबा मग एकदम पातळ कांदा, लसूण, मिरची , कडेपत्ता, कोथिंबीर कातरून ठेवत. गॅस पेटवून देत आणि लोखंडी कढईत भरम्साठ तेल घालून , बाबाच फोडणी करत. मोहरी, हिंग, कडीपत्ता झाले टाकून कि हिरवी मिरची आणि लाल तिखट घालत तेलातच. असा तिखट आणि मिरचीचा वास याय्चा. मग लगेच लसूण . तो कुरकुरला की लगेच बटाटे परतत. त्यावर जीरा-धणा पूड, मीठ टाकून गॅस एकदम मोठा ठेवून परतायचे.
बटाटा चकती न तूटता कुरकुरीत करायची. मी फक्त मध्ये मध्ये परतायला.
मग बाबा, बाजूला सकाळच्या चपात्या तव्यावर गरम करायचे घरचे तूप फासून त्यावर उरलेला कच्चा कांदा आणि कच्ची कैरीचा कीस( कैरीचा मौसम असल्यास) नाहितर घरच्या लिंबाचच लोणचं खार आणि हि भाजी टाकली की भरपूर कोथिंबीर आणि रोल करून खायचा.
जी काय सुस्ती यायचीकी बस रे बस. ओटा नंतर साफ करून म्हणून दोघेहे झोपायचो आणि आई घरात आली की बडाबडायची पसारा पाहून तेव्हा जाग यायची.

हॉस्टेलमध्ये, कधी कधी उरलेल्या भाजीत कधी कधी मॅगी आणि मटर वेगळी उकडवून टाकायची आणि कोरडी मॅगी बनवायची.
नाहितर फक्त अंडी फोडून टाकायची आणि ब्रेडमध्ये मध्ये भरून सँडविच करून. खूप प्रकारे खाउ शकतो. दुसर्‍या दिवशी उत्तम लागायची.

सर्वांचे आभार. Happy
प्रभास, झंपी तुमच्या कमेंट खासच. Happy

छान लिहिलंय...
या १५ मिनिटांत मी मात्र आमचं आख्खा गाव, घर, बाजार, शाळा सर्व फिरून आले. >>>>>> मी सुद्धा हा लेख वाचताना सगळा गाव फिरुन आले.

शाळेतच असे नाही कधी एखाद्या प्रवासाला जायचे असेल, सहलीला वगैरे तर खराब न होणारी भाजी म्हणजे हीच
अजून एक प्रवास स्पेशल खास पदार्थ म्हणजे कांदेरसाचं पिठलं. आपल्या सातारा भागात बरेच प्रचारात आहे. लांबच्या प्रवासात जाताना टिकण्यास अगदी विश्वासू पाकृ...
या पाकृ सोबत पण लहानपणच्या खूप आठवणी संबंधित आहेत. शाळेच्या नाहीत. हा पदार्थ शाळेच्या डब्यात देता येत नाही कारण खूप कोरडा होतो. त्याच्यासोबत दही ही अगदी आवश्यक बाब. त्यामुळे सोबत दही व दहीभात घेऊन सहलीला वगैरे जाणारे कुणी असेल तर मग हमखास घरी बनवलं जायचं.
मी ज्या आठवणी सांगतोय त्या म्हणजे २६-२७ वर्षांपूर्वीच्या आहेत. तेव्हां एकत्र कुटुंबामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडच्या घरी २५-३० जणं तरी जमायचे. अशावेळीस आजोबा एखादा टेंपो वगैरे ठरवून आम्हांला दत्तस्थान औदुंबर येथे घेऊन जायचे. त्यावेळी पब्लिक ट्रानस्पोर्ट पण तसा कमीच होता... खाजगी गाड्या तर फारच कमी... त्यामुळे घरचे सगळे लोक घेऊन जाता येईल असा टेंपो ठरवला जाई...
आम्ही सर्व चिल्लीपिल्ली, महिला वर्ग, थोडी मोठी मुले मुली वगैरे मागे हौद्यात बसणार... आजोबा आणि अजून कुणीतरी एक चुलते वगैरे पुढे... आम्ही लहान मुले इतका धुडगुस करत असून मागे की कुणीही लहान मूल पुढे बसण्यासाठी हट्ट करत नसे...
अगदी भल्या पहाटेच महिला वर्ग उठून जेवणाचे पदार्थ तयार करुन घेत... तो बेत नेहमी ठरलेला... कांदेरसाचं पिठलं, दहीभात, हिरव्या मुगाची उसळ, पोळ्या आणि खास घरचं दही...
मग प्रवासातच वाटेत कुठे तरी एखादे वडाचे डेरेदार दाट सावलीचे झाड बघून तिथे जेवण करायला थांबायचो... अगदी चांदोबा मासिकात चित्रे असायची नं सेम तस्सं... झाडाखाली वर्तुळात बसून जेवण करायला फार मजा यायची...
असो... खूप खूप जुने दिवस अचानक आठवले तुमच्या या लेखनामुळे...

छान लिहिलंय . आम्ही पण काचऱ्याच म्हणतो पण फोडणीतच हळद /मिरची /कढीपत्ता असतो थोडीशी मुगाची डाळ भिजवून पण घालते. कोथिंबीर पण पाहिजे धन्या जिर्याची पूड मात्र नसते बाकी कृती सेम .
झटपट होणारी भाजी आणि खूप टेस्टी पण लागतेच Happy

दोन तीन कांदे खिसून घ्या. कढईत नेहमीप्रमाणे फोडणी करा. तेल जास्तच लागेल. कमी टाकले तर ते अपेक्षित टेक्श्चर येणार नाही.
भरपूर तेलात एक चमचा मोहरी घाला. ती तडतडल्यावर मग अर्धा चमचा हिंग घाला. लगेच पंधरावीस कढीपत्त्याची पाने चुरुन टाका. हिंग जळू नये यासाठी कढीपत्ता चटकन टाका. मग लगेच सात आठ लसूण पाकळ्या थोड्या ठेचून टाका. त्यानंतर मग तो दोन तीन कांद्यांचा खिस जो बाजूला ठेवलेला आहे, तो यात घाला. कांद्याचा खीस चांगला कोरडा होईपर्यंत परता. यात पाणी अजिबात घालायचं नाही. कांद्याचा खीस चांगला परतला की मग घरातील खास लाल तिखट (जे बहुतेक पिठल्यासाठीच वापरले जाते) ते टाका. तिखटाचा कच्चेपणा गेला की मग हलक्या हाताने नेहमीप्रमाणे बेसन टाका. साधारण भगरा भाजीसारखे दिसू लागेल. मग दोन तीन मिनिटे वाफ द्या. थोडे गार झाले की एकदम मोकळे होते. चव एकदम छान येते. कोरडेपणामुळे दह्यासोबत खूप छान लागते.

Pages