बटाट्याच्या काचऱ्या

Submitted by विद्या भुतकर on 1 March, 2017 - 23:05

गेले काही दिवस झाले मुलगी म्हणत होती की मला बटाट्याची सुकी भाजी खायचीय, आजी करते तशी. दोनेक वर्षांपूर्वी कधीतरी खाल्ली असेल तिने आईच्या हातची भाजी तिला त्याची आठवण येत होती. आता मी ती का करत नसेन नियमित याला काही कारण असं नाहीये पण होत नाही. मग आज शेवटी सकाळी डब्याला देण्यासाठी बनवली आणि एकदम बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. सकाळी आवरायची, शाळेची गडबड, त्यात भाजीचा फोडणीचा वास, पोळ्या हे सगळं एकदम ओळखीचं वाटू लागलं. कुणी याला नुसती बटाट्याची भाजी म्हणत असेल, कुणी बटाट्याचे काप, आम्ही याला बटाटयाच्या काचऱ्या म्हणतो. Happy

तर कोरेगांवमध्ये आठवड्यातून एकदाच बाजार भरायचा पूर्वी, दर सोमवारी. आई, आम्ही शाळेत गेलेले असताना, बाजारात जाऊन वायरच्या बास्केटमधून भाज्या, फळे, पालेभाज्या इ त्या त्या ऋतूप्रमाणे घेऊन यायची. आम्ही शाळेतून येईपर्यंत तिचे बरेचसे निवडून झालेलं असायचं. मग त्यात आम्हाला निवडलेली चवळी, सोललेल्या मटारमध्ये बारीक, गोड लागणारे वेगळे काढलेले मटार, पेरू, देशी केळी, तोतापुरी आंबा अशा अनेक गोष्टी मिळायच्या. मला त्या देशी केळांचं शिकरण मला खूप आवडायचं. आठवड्यातून ३-४ वेळा माझं मी एका पेल्यात बनवून घ्यायचे. असो.

तर तेंव्हा आमच्याकडे फ्रिज नव्हता. त्यामुळे बऱ्याचशा पालेभाज्या, ओल्या भाज्या इ. पहिल्या ३-४ दिवसांत संपून जायचं. त्यातलं चाकवताचं गरगट बरेचदा सोमवारीच व्हायचं. मेथी, पालक, पोकळा वगैरे कधी डब्याला असायचे. अख्खा आठवडा ७ लोकांचं दोन वेळचं जेवण, डबे करेपर्यंत सर्व भाज्या संपून जायच्या. आणि त्या भाजीच्या टोपल्यात कांदा, थोडा लसूण आणि थोडे बटाटे उरलेले असायचे. बरेचदा रविवारी रात्री ऑम्लेट नसेल तर बटाट्याचा रस्सा नक्कीच असायचा. आणि ते नाही झालं तर सोमवारी सकाळी या बटाट्याच्या काचऱ्या हमखास असणारच. तर अशा अनेक सोमवारी सकाळी डब्यांत या काचऱ्या घेऊन गेल्याच्या आठवणी आज एकदम ताज्या झाल्या.

बरेचदा घाई असल्याने कांदा थोडा जास्तच भाजला जायचा. पण डब्यांत त्या एकदम मस्त लागायच्या, त्यातला तो खरपूस कांदा, मोहरीचे दाताखाली येणारे दाणे. नुसत्या काचऱ्या नाहीत तर त्या सोबत ताज्या चपातीचा खमंग वास. सोबत गरम गरम चपाती हवी मात्र. तीच गरम चपाती डब्यात नरम झालेली असायची. फुलके इत्यादी पेक्षा भारदस्त चपाती हव्यात. माझ्या आईच्या जरा मोठया असतात, फोटोत मी केलेल्या छोट्याच आहेत. शाळेतच असे नाही कधी एखाद्या प्रवासाला जायचे असेल, सहलीला वगैरे तर खराब न होणारी भाजी म्हणजे हीच. अनेकदा दादांनाही प्रवासाला जाताना बनवून ठेवलेली असली की आमच्या डब्यातही तीच भाजी असायची.

आज सान्वी दोन पैकी दीड पोळी संपवून आली त्यामुळे यापुढे त्या नियमित द्यायला हरकत नाही असे वाटू लागले आहे. कदाचित माझ्यासारख्याच तिलाही त्या नंतर कधी आठवण करून देतील,तिच्या शाळेची, या दिवसांची. Happy

आता यात विशेष काही रेसिपी अशी नाहीये पण तरीही इथे देत आहे. मुलांना डब्यात देताना चपातीला थोडे लोणच्याचा खार आणि दुसऱ्याला केचप लावून त्यात भाजी घालून रोल बनवून दिले.
मी वरण, चपाती आणि भाजी घेऊन गेले. Happy मस्त जेवण झाले. Happy

साहित्य: तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग, काळा मसाला किंवा लाल तिखट, धणे-जिरे पूड. २-३ बटाटे, एक छोटा कांडा. मीठ चवीनुसार, एक छोटा चमचा साखर.

कृती:
कांदा आणि बटाटा चिरून घ्यावेत. यात बटाटा कापण्याचा पद्धतीने मात्र नक्कीच फरक पडतो. शेवटच्या फोटोत दिसत आहेत तसे पातळ, बारीक काप करून घ्यावेत.

तेल थोडे नेहमीपेक्षा जास्त. नॉनस्टिक पॅनमध्ये जास्त नीट होतात.

तेल तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंग घालावे. लगेच कांदा घालून परतावा. कांदा भाजून झाला की त्यात हळद, एक छोटा चमचा तिखट, धणे-जिरे पूड घालावी.

एकदा परतून त्यात बटाटा घालावा.

मीठ,साखर घालून १० मिनिटे झाकण लावून शिजू द्यावे.

साधारण १५ मिनिटांत भाजी होते.

या १५ मिनिटांत मी मात्र आमचं आख्खा गाव, घर, बाजार, शाळा सर्व फिरून आले. Happy

IMG_3076.JPGIMG_3079.JPGIMG_3078.JPG

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सारे कमेंट्स. Happy धन्यवाद.
प्रभास, तुमचे दोन्ही पोस्ट मस्त आहेत. पिठले करुन बघणार नक्कि.

विद्या.

ही भाजी मी फार क्वचित करते. कारण ती एक अत्यंत जिव्हाळ्याची आणि स्पेशल गोष्ट आहे. कधीतरी जेव्हा खूप छान मूड असेल पण फार काही करायला वेळ नसेल तेव्हाच ही भाजी करायची!

@विद्या भुतकर
कृपया रेसिपी साठी लेखनाचा धागा न वापरता पाककृती हा प्रकार वापरा ज्यामुळे वर्गीकरण आणि नंतर शोधायला सोपे जाते.

@प्रभास, ते कांदेरसाच्या पिठल्याची पाककृती इथे प्रतिसादात न लिहता पाककृती असा प्रकार वापरून लिहिलीत तर वर्गीकरण करायला आणि नंतर शोधायला सोपे जाईल.
उदा इथे वेगवेगळ्या प्रकारे पाककृती वर्गीकृत केल्या आहेत. तुम्ही पाककृती म्हणून लिहिलीत तर योग्य त्या कप्प्यात जाऊन बसेल.
http://www.maayboli.com/hitguj/marathi-recipes

इथे वेगवेगळे पिठल्याचे १५० प्रकार आहेत. पण तुमचे पिठले कधी येणार याची बाकी पिठले वाट पाहत आहेत. Happy जगातला सगळ्यात जुना पिठल्यांच्या पाककृतीचा संग्रह पूर्ण करायला मदत करा.
http://www.maayboli.com/node/2548/by-subject/11/253

चाकवताचं गरगटं >>>> याची रेसिपी द्या ना कुणीतरी, सोबत चाकवताचे फोटो पण टाकाल का, कधी पाहीली नाही ही भाजी

@प्रभास कान्दा पिठले झक्कास! माझी आई चाळीसगावची आहे . तिची अस्सल खानदेशी हीच पद्दथ आहे.

>>
ब-याच आठवणी जाग्या झाल्या... श्रावणी सोमवारी तर संध्याकाळी उपास सोडताना चाकवताचं गरगटं हमखास ठरलेलंच असायचं. आणि सोबत ताज्या वाटाण्यांची उसळ... गरमागरम पोळ्या आणि मलिदा...
<<

प्रभास,
मलिदा हा कोणता पदार्थ आहे? याची रेसिपी पण लिहाल का? वरची कमाई खाणे या अर्थाने "मलिदा खाणे" असा वाक्प्रचार आहे , त्याच्याशी निगडीत असा काही प्रकार आहे का?

मलिदा हा खरोखरचा पदार्थ आहे. काही जण खवा या अर्थानेही मलिदा शब्द वापरतात. पण तो एक पूर्ण वेगळा गोडाचा खाद्यपदार्थ आहे. इथे मायबोलीवरच त्याची पाककृती आहे.
http://www.maayboli.com/node/25857
@गमभन, तुमच्या प्रतिक्रियेमुळे प्रभास यांचा गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे.

संपादक कृपया लक्ष देणे

Pages