उपवासाचे ढोंग

Submitted by कुमार१ on 15 February, 2017 - 21:43

सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न खावे तर लागतेच, पण खाण्यासाठीच जगणारा मात्र माणूस हाच एकमेव प्राणी असावा ! आपल्या उठसूठ ‘चरण्याच्या’ प्रवृत्तीला थोडा तरी आळा बसावा या उद्देशाने उपवासाची संकल्पना मांडली गेली असावी. आठवड्यातून निदान एक दिवस तरी एक वेळचे भोजन न घेणे आणि दुसऱ्या वेळेस पचायला अत्यंत हलका व मित आहार घेणे हा अर्थ उपवास करण्यामागे अभिप्रेत आहे. आपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे. परंतु वास्तव काय दिसते? नियमित उपवास करणाऱ्या कित्येकांना हा अर्थ समजलेला नाही, असे खेदाने म्हणावे लागेल. ‘कळतंय पण वळत नाही’ असा प्रकार बहुतेकांच्या बाबतीत दिसून येतो.

जरा नजर टाकूयात का मराठी माणसाच्या उपवासाच्या खास ‘मेन्यू’ वर? त्यातला ‘default’ पदार्थ म्हणजे साबूदाण्याची खिचडी ! त्यात स्टार्चने खच्चून भरलेला साबुदाणा, दाणे, तूप आणि ती अधिक चविष्ट करण्यासाठी त्यात बटाटाही घातलेला.तेव्हा या पदार्थाच्या उष्मांक मूल्याची कल्पनाच केलेली बरी. आता त्या दिवसभराच्या मेन्यूतील इतर पदार्थ बघा: रताळ्याचा कीस, गोडगोड रताळ्याच्या चकत्या, दाण्याची आमटी, दाण्याचा कूट घालून केलेली व तुपाची फोडणी दिलेली कोशिंबीर, ‘मधल्या’ वेळेस खायला बटाटा वेफर्स, साबुदाणा वडा, गोड राजगिरा चिक्की...... जाउद्यात, आता पुरे करतो, नाहीतर या यादीनेच एक परिच्छेद भरायचा! तेव्हा असे बरेच पदार्थ दिवसातून तीनदा यथेच्छ खाल्यावर तो दिवस हा ‘उपवासाचा’ म्हणता येईल?
अशा अशास्त्रीय पद्धतीने उपवास ‘साजरे’ करून तथाकथित धार्मिकता जोपासली जाते. पण, त्याचा आपल्या आरोग्याला कोणताही फायदा होत नाही. उलट तोटाच होण्याची शक्यता अधिक.

उपवासाला खायला काय ‘चालते’ आणि काय ‘चालत नाही’ हा तर एखाद्या लघुप्रबंधाचा विषय होईल! त्यातून देशभरातील ‘उपवासपंथीयांमध्ये’ याबाबत एकवाक्यता तर बिलकूल नाही. एखाद्या राज्यात अजिबात न ‘चालणारा’ पदार्थ दुसऱ्या राज्यात मात्र अगदी व्यवस्थित ‘पळत’ असतो ! किंबहुना, पचायला हलके पण जिभेला फारसे प्रिय नसलेले पदार्थ उपवासाला चालत नाहीत ! उलट, जिभेचे चोचले पुरवणारे, जठराम्ल वाढवणारे आणि मेदवृद्धी करणारे पदार्थ मात्र उपवासाच्या ‘मेन्यू’ मध्ये उच्च स्थानावर असतात. अनेक नियतकालिकांतून ‘उपवासाच्या पाककृती’ ची वर्णने करणारी सदरे जोरात असतात. त्यातून नवनवीन पदार्थांची भर या ‘मेन्यू’ मध्ये सतत होत असते.
थोडक्यात काय तर उपवासाचा दिवस म्हणजे ‘साबुदाणा – दाणे – बटाटा’ या त्रिकुटाची रेलचेल असलेला दिवस होय. काही विशिष्ट कालावधीत तर या त्रिकुटाचा सप्ताह देखील साजरा होताना दिसतो ! एकदा सहज गंमत म्हणून मी घरातील एका ज्येष्ठ व्यक्तीचा उपवास-दिन आहार बारकाईने पाहिला. तो असा होता:
सकाळी उठल्यावर : साखरयुक्त चहा.हे एक उत्तेजक पेय पण ते पाहिजेच कारण त्याच्याशिवाय ‘’मला होतच नाही’’.
सकाळचा नाश्ता: साबुदाण्याची दूध-साखरयुक्त खीर

औषधे : मधुमेह व उच्चरक्तदाबाच्या गोळ्या. नेहेमीचे एक आयुर्वेदिक चूर्ण मात्र टाळले गेले कारण त्यात हळद असते ( जी खरे तर आरोग्यदायी आहे) व ती ‘चालत नाही.’

दुपारचे जेवण: साबू-खिचडी, रताळ्याचा कीस, काकडीची फोडणी दिलेली कोशिंबीर, दाणे व कोथिंबीर यांची चटणी व ताक (अर्थातच ते साखर व मीठयुक्त).

औषधे: मधुमेहाची गोळी. नेहेमीची बडीशेप (जी खरे तर पाचक असते) मात्र टाळली कारण ती ‘चालत नाही’.

संध्याकाळचे खाणे: राजगिरा- शेंगदाणे चिक्की (विकतची) व चहा

रात्री: वरईचा भात व चवदार दाण्याची आमटी. घरी त्यांच्या नातवाने आईसक्रिम आणले होते ते थोडे खाल्ले कारण ते ‘चालते’.
तेव्हा या ‘उपवास-दिनाने’ त्यांच्या आरोग्याला काय फायदा झाला यावर काही भाष्य करण्याची गरज नाही. किंबहुना अशा दिवसाला नेहेमीपेक्षा ‘वेगळे पदार्थ खाण्याचा दिवस’ असे संबोधणे योग्य राहील.

आपल्याकडे बहुतेक लोक हा वरीलप्रमाणे ‘दुप्पट खाशी’ प्रकारचा उपवास करतात. परंतु, खरोखर आरोग्यदायी उपवास करणारेही लोक आहेत. जरी ते अल्पसंख्य असले तरी त्यांच्या उपवासाच्या पद्धती या नक्कीच अनुकरणीय आहेत. त्या खालील प्रकारच्या आढळून येतात:

१. दिवसाचे १२ तास अन्न व पाणी पूर्ण वर्ज्य
२. दिवसभर अन्न वर्ज्य पण, पाणी भरपूर पिणे. उष्ण हवामानाच्या प्रदेशात हा प्रकार सर्वोत्तम आहे.
३. फक्त द्रव पदार्थ पिणे (पाणी, शहाळे, सरबत इ.)
४. फक्त फळे खाणे. तीही पाणीदार व कमी गोडीची.
वरीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने उपवास केल्यास त्याचा आरोग्यास उत्तम फायदा होतो हे निःसंशय.

आता थोडेसे माझ्याबद्दल सांगतो. लहानपणी घरी पारंपारिक ‘दुप्पट खाशी’ प्रकारचे उपवास हे लादलेलेच होते. तेव्हा अर्थातच ती चंगळ वाटायची आणि ते पदार्थ मनमुराद खात असे. बहुतेक मुले ही त्यासाठी उपवास-दिनाची वाट पाहत असत. महाविद्यालयीन वयात या प्रकारातील फोलपणा ध्यानात आला होता.पण, घरात वाद नकोत म्हणून तसे उपवास ‘साजरे’ करत होतो. मात्र जेव्हा स्वतंत्र संसार थाटला आणि निर्णयस्वातंत्र्य मिळाले तेव्हा विचारपूर्वक या ढोंगातून बाहेर पडलो. मग स्वतःच्या पद्धतीने उपवास संकल्पना आचरणात आणली. सुरवातीस आठवड्यातून एक दिवस रात्रीचे जेवण बंद केले. पुढे वयाची चाळीशी उलटल्यावर तर रोज रात्रीचे ‘जेवण’ हा प्रकार बंद करून त्याऐवजी फक्त फलाहार ठेवला. याचे फायदे चांगलेच जाणवले.

मग ‘उपवास’ या संकल्पनेवर खोलवर विचार करू लागलो. खऱ्या उपवासातून जसा आरोग्याला फायदा होतो त्याचबरोबर एक प्रकारचा मनोनिग्रह आपण शिकतो. जरी एखाद्याने आपल्याला त्या दिवशी आपला सर्वात आवडता चमचमीत पदार्थ देउ केला तरी तो नाकारण्याचे बळ आपल्याला मिळते.

पुढे जाउन असे वाटले की असा मनोनिग्रह फक्त खाण्याबाबतच का असावा? गेल्या काही दशकांत आपली जीवनशैली खूप चंगळवादी बनली आहे. सतत ‘दिल मांगे मोअर’ असे वातावरण अवतीभवती दिसते. बौद्धिक श्रमांच्या आहारी गेल्याने आपण शारीरिक श्रमांना हीन लेखत आहोत. स्वावलंबनाचा आपल्याला विसर पडतो आहे. तर या दृष्टीने आपण अजून काही गोष्टींचा निग्रह करू शकू का असे स्वतःला विचारले. त्यातून एक कल्पना स्फुरली. ती म्हणजे आपण आठवड्यातून एक दिवस ‘मनोनिग्रह दिन’ पाळावा. त्या दिवशी खालील निग्रह करण्याचे ठरले:

१. चहा, कॉफी बंद. ही उत्तेजक पेये म्हणजे सौम्य व्यसनेच होत.
२. दिवसातले एक मुख्य जेवण नाही.
३. गार पाण्याने अंघोळ
४. स्वतःचे जेवणाचे ताट स्वतः घासणे आणि रोजचे कपडेही धुणे.
५. स्वतःचे स्वयंचलित वाहन रस्त्यावर आणायचे नाही.त्यादिवशीची कामे चालत, सायकलने अथवा सार्वजनिक वाहनातून जाऊन करायची.

असा दिवस पाळण्यास आपल्या साप्ताहिक सुटीचा दिवस उत्तम ठरतो. सुरवातीस या सर्व गोष्टी एकदम करणे जरा जड गेले पण, टप्प्याटप्प्याने सर्व जमत गेल्या. असा हा दिन खरोखर आनंददायी ठरला आणि त्याचा शारीरिक व मानसिक आरोग्यास चांगला फायदा झाला, हे सांगणे नलगे.

सध्याच्या सामाजिक आरोग्यावर नजर टाकता काही आजार ठळकपणे उठून दिसतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हृदयविकार हे त्यापैकी प्रमुख. आपली बिघडलेली जीवनशैली आणि अरबट चरबट खाणे हे त्यांच्या मुळाशी आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित स्वरूपात एखाद्या उपवासदिनाची नक्कीच गरज आहे. मात्र तो उपवास हा खराखुरा हवा. त्याचे निव्वळ ढोंग नको.

ज्यांना या विषयाकडे गांभीर्याने बघावेसे वाटते त्यांनी आपण करीत असलेल्या पारंपरिक उपवास पद्धतीकडे (म्हणजे साबूदाणा, दाणे, बटाटा इ.) डोळसपणे पाहावे. त्यावर जरूर विचार करावा. जेव्हा आपल्या अंतरंगात अशी विचार परिवर्तनाची ‘खिचडी’ शिजू लागेल तेव्हा आपण उपवासाच्या दिवशी नक्कीच साबुदाण्याच्या खिचडीची सुटी करू शकू!
***********************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

‘आपण एकट्याने करून फार काय होणार आहे असे म्हणून जो काहीच करत नाही तो ती सर्वात मोठी चूक करतो’. +११
अनुकरणीय आहे... _/\_

उपवास करावा तर मुस्लिमांसारखा,
>>>> या वाक्यावर बरेच दिवस मला माझे मत शेअर करायचे होते पण वेळ मिळत नव्हता

तसे मुस्लिमांवर बरेचसे ऋन्मेषने लिहिले आहेच. मी सुद्धा पाहिले, मुस्लिम स्त्रीयांना त्याच्या रोजाच्या वेळेत अगदी तुडुंब गर्दी असलेल्या ट्रेनम्ध्ये ऊभ्या उभ्या वडापाव-समोसा खाताना. ईतका त्रास होतो तर का करायचा ऊपास

मुस्लिमांपेक्शा कडक ऊपास खरतर युपी कडचे करतात अगदी आवंढा सुद्धा न गिळता... असे त्या सांगतात पण मी स्वतः पाहीलेय की बरेच जण फक्त पाणी पिवुन किंवा फळ खाऊन करतात.

अगदी गुजराती जैन लोक सुद्धा पर्युशन काळात काहीच खात नाहीत

सखी, मानव धन्स.
' उपवास' या कल्पनेची व्याप्ती खाण्यापासून इतर काही सुखांपर्यंत वाढवण्याचा तो एक प्रयत्न आहे.

दिनेशभऊंची पोस्ट छान.
लेखातल्या काही मतांशी सहमत असलो, तरीही, मुळात असले आक्षेप "तद्दन शहरी आळजी" जीवन जगणार्‍यांनी घ्यावेत, हाच मोठा विरोधाभास आहे. बाकी खेड्यापाड्यातील जन्ता, एरवी जितक्या कष्टांकरीता जे अन्न घेते, त्यानुसार, वर लेखात वर्णन केलेल्या क्यालरिज व्वगैरे बाबींमुळे त्यांना काही धाड भरत नाही, उलट ते उपयुक्तच ठरते. असे माझे मत.
तेव्हा तुम्हा शहरी "नाजुकसाजुक" लोकांची दिनचर्या व त्यानुसार अवलंबायच्या तुम्हांकरताच्या अपवादात्मक खाद्यसवयी, बहुसंख्य कष्टकरी जनतेवर लादू नयेत असे मला वाटते.

कुमार, निग्रहाच्या सगळ्या पोस्ट्स आवडल्या. << + १
माहीत आहेत करण्यासारख्या आहेत पण केल्या जात नाहीत.

लिंबू, तुमच्या मताबद्दल आदर आहे.
शेवटी ''प्रत्येक लेखन हे आत्मचरित्रात्मकच असते'' असे श्री.ना. पेंडसे म्हणून गेले आहेत.

@ अदिति : धन्स. बस्स! जाणीव व्हावी एवढाच कुठल्याही लेखनाचा हेतू असतो.

उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपवास म्हणजे परमेश्वर/आत्म चिंतन करणे, मी कोण हा शोध घेणे, ध्यान करणे. साधना वॄध्दिंगत करण्याचा दिवस म्हणजे उपवासाचा दिवस. त्यात जेवण बनवण्यात वेळ जास्त जाऊ नये म्हणून कमी प्रक्रिया लागणारे, हलके पदार्थ खाण्याची पध्दत सुरु झाली असावी असे मला वाटते.

हलके पदार्थ खाण्याची पध्दत सुरु झाली असावी असे मला वाटते. >> बरोबर, पण बटाटा, साबू व रताळे हे पचायला 'हलके' नाहीत ! राजगिरा , वरई योग्य.

उद्या एकादशी आहे, या निमित्ताने हा अत्यन्त वाचनीय धागा वर काढत आहे.
धन्यवाद कुमार्१जी.

Proud :-

ऊपवास आणि उपाशी रहाणे ही जोडी शब्दार्थ न कळल्याने झाली असावी. हा भाबडेपणा म्हणावा का ?
माझ्या साठी उपवास म्हणजे आवडत्या गोष्टीला नाकारण्याची शारिरीक आणि मानसिक तयारी व्यक्त करणे. आणि सर्वात आवड णारी गोष्ट म्हणजे खाणे ! म्हणून 'विशिष्ठ' पदार्थ कमी प्रमाणात खाणे .. जीभ आणखीन मागत असली तरी.

* प्राचीन,
या लेखाच्या समयोचित आठवणीबद्दल आभार.
आतापर्यंतच्या चर्चेत तुमचा सहभाग दिसत नाही. तरी तुमचे काही विचार जरूर लिहा.

* पशुपत, + ११

उपवास हा प्रकार मला कधीच जमला नाही .
त्या मुळे मी तो करत पण नाही
आपल्याला भूक सहन होत नाही .
त्यात कोण्ही जबरदस्ती केली तर दोन वेळेला भरपूर पुरेल एवढी शाबुदना खिचडी ऑफिस का घेवून येतो .
माझे सरळ मत आहे .
भुकेची जाणीव झाली की जेवावे उगाच डाएट करायची आणि भूक मारायची गरज नाही .
फक्त शारीरिक हालचाल नित्य नियमाने झाली पाहिजे

शरीराला काय हवं आहे किती हवं आहे हे आपण ठरवू शकत नाही तर पचनसंस्था आणि संबंधित अवयव ठरवतात असे माझे स्पष्ट मत .
व्हिटॅमिन,प्रोटीन हे आपण ओळखत नाही पचन संस्था ओळखते .
आणि हवं ते आणि हवं तेवढे घेते आणि बाकी फेकून देते .
तशी यंत्रणा आहे .
त्या मुळे खाताना calorie मोजायची गरज नाही .
फक्त प्रक्रिया केलेले अन्न टाळायचे .
अशास्त्रीय असेल माज मत पण मी तसाच विचार करतो

राजेश, प्र. १ शी सहमत.
असाही एक विचार मांडला गेला आहे:

हृदय व फुफ्फुसे जर क्षणभरही विश्रांती न घेता सतत काम करतात, तर मग पचनसंस्था- जी अधूनमधूनच काम करत असते तिला 'विश्रांती' कशाला द्यायची ?

(एका परिसंवादात हा मुद्दा निघाला. त्यावर निव्वळ वैद्यकीय दृष्टीने बघायचे आहे. मनोनिग्रह पूर्ण वेगळी बाब आहे.)

माननीय राजेश भाऊ आपला आरोग्य शास्राशी छत्तीसचा आकडा आहे का? कॅलरी, ग्लुकोज,ग्लायकोजन, जास्त आहाराचे चरबीत रूपांतर हे कधीच कानावर पडले होते की नाही? महाशय आपलं तेच खरे करणं योग्य नव्हे. भुक मारायची नाही तर हलका व कमी आहार घेणे अभिप्रेत आहे. धन्यवाद.

रजेश यांचा मुद्दा बरोबर पण आहे आणि चूक पण . चूक याच्यासाठी कि ते सगल्या बॉडी टाईप ला लागू नाहीय पण एक्टॉमोर्फ लोकांना लागू पडेल . कितीही खा बॉडी हवे तेवढे कॅलोरी ठेवते वजन वाढणार नाही.
माझ्या माहितीत आहे एक असा, हाडाचा सापळा पण आहार असा कि पेहलवानांना पण लाजवेल

सुरवातीची १८ वर्ष गावच्या वातावरण गेलेली आहेत .
त्या मुळे ज्वारी,नाचणी,बाजरी ह्याची भाकरी माझी आवडती आहे आणि रोजच्या जेवणात असते ( तिन्ही पैकी एकाच प्रकारची)
उडीद chya डाळी पासून बनवलेले (घुट)हिरव्या मिरचीचा वापर करून केलेलं,घेवडा(काळा)मूंग,अशा डाळी मेथीची भाजी ,पालक असे साधं जेवण असते आणि वेळेवर .
बुधवार,शुक्रवार,रविवार
चिकन,मासे,अंडे
नाष्टा पोहे ,उपमा ह्याच्या पुढे जात नाही .
आणि ठराविक प्रमाणात त्यात बदल होत नाही

चहा, कॉफी बंद. ही उत्तेजक पेये म्हणजे सौम्य व्यसनेच होत>>हे आणि अशी अनेक वाक्ये आवडली तुम्ही लिहिलेली. स्व नियंत्रण हा उपवासाचा हेतू ठेवायला हवा, हेही पटलं. किंबहुना तसे प्रयत्न व प्रयोग काही वेळा केलेले आहेत. उदाहरणार्थ चहा आपल्याला आवडतो की त्याचं व्यसन आहे, हे तपासण्यासाठी मध्येच कधीतरी चहा उशिरा प्यायचा (डोकं वगैरे दुखत नाही ना हे बघायला).
प्रतिसाद देखील विचार करण्यासारखेच आहेत, तुमच्या लेखाला साजेसे.
बाकी आध्यात्मिक दृष्टीने परमेश्वराच्या निकट राहण्यास उपवास म्हणत असू तर घरातील शक्य तितक्या माणसांनी मिताहार केला तर नक्कीच यासाठी परिस्थिती व मनःस्थिती पोषक असेल (त्या दिवसापुरती तरी).

>>>ऊपवास आणि उपाशी रहाणे ही जोडी शब्दार्थ न कळल्याने झाली असावी. >>>>+ 99
मूळ हेतू लक्षात न घेता आता ते कर्मकांड झाले आहे.

Pages