उपवासाचे ढोंग

Submitted by कुमार१ on 15 February, 2017 - 21:43

सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न खावे तर लागतेच, पण खाण्यासाठीच जगणारा मात्र माणूस हाच एकमेव प्राणी असावा ! आपल्या उठसूठ ‘चरण्याच्या’ प्रवृत्तीला थोडा तरी आळा बसावा या उद्देशाने उपवासाची संकल्पना मांडली गेली असावी. आठवड्यातून निदान एक दिवस तरी एक वेळचे भोजन न घेणे आणि दुसऱ्या वेळेस पचायला अत्यंत हलका व मित आहार घेणे हा अर्थ उपवास करण्यामागे अभिप्रेत आहे. आपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे. परंतु वास्तव काय दिसते? नियमित उपवास करणाऱ्या कित्येकांना हा अर्थ समजलेला नाही, असे खेदाने म्हणावे लागेल. ‘कळतंय पण वळत नाही’ असा प्रकार बहुतेकांच्या बाबतीत दिसून येतो.

जरा नजर टाकूयात का मराठी माणसाच्या उपवासाच्या खास ‘मेन्यू’ वर? त्यातला ‘default’ पदार्थ म्हणजे साबूदाण्याची खिचडी ! त्यात स्टार्चने खच्चून भरलेला साबुदाणा, दाणे, तूप आणि ती अधिक चविष्ट करण्यासाठी त्यात बटाटाही घातलेला.तेव्हा या पदार्थाच्या उष्मांक मूल्याची कल्पनाच केलेली बरी. आता त्या दिवसभराच्या मेन्यूतील इतर पदार्थ बघा: रताळ्याचा कीस, गोडगोड रताळ्याच्या चकत्या, दाण्याची आमटी, दाण्याचा कूट घालून केलेली व तुपाची फोडणी दिलेली कोशिंबीर, ‘मधल्या’ वेळेस खायला बटाटा वेफर्स, साबुदाणा वडा, गोड राजगिरा चिक्की...... जाउद्यात, आता पुरे करतो, नाहीतर या यादीनेच एक परिच्छेद भरायचा! तेव्हा असे बरेच पदार्थ दिवसातून तीनदा यथेच्छ खाल्यावर तो दिवस हा ‘उपवासाचा’ म्हणता येईल?
अशा अशास्त्रीय पद्धतीने उपवास ‘साजरे’ करून तथाकथित धार्मिकता जोपासली जाते. पण, त्याचा आपल्या आरोग्याला कोणताही फायदा होत नाही. उलट तोटाच होण्याची शक्यता अधिक.

उपवासाला खायला काय ‘चालते’ आणि काय ‘चालत नाही’ हा तर एखाद्या लघुप्रबंधाचा विषय होईल! त्यातून देशभरातील ‘उपवासपंथीयांमध्ये’ याबाबत एकवाक्यता तर बिलकूल नाही. एखाद्या राज्यात अजिबात न ‘चालणारा’ पदार्थ दुसऱ्या राज्यात मात्र अगदी व्यवस्थित ‘पळत’ असतो ! किंबहुना, पचायला हलके पण जिभेला फारसे प्रिय नसलेले पदार्थ उपवासाला चालत नाहीत ! उलट, जिभेचे चोचले पुरवणारे, जठराम्ल वाढवणारे आणि मेदवृद्धी करणारे पदार्थ मात्र उपवासाच्या ‘मेन्यू’ मध्ये उच्च स्थानावर असतात. अनेक नियतकालिकांतून ‘उपवासाच्या पाककृती’ ची वर्णने करणारी सदरे जोरात असतात. त्यातून नवनवीन पदार्थांची भर या ‘मेन्यू’ मध्ये सतत होत असते.
थोडक्यात काय तर उपवासाचा दिवस म्हणजे ‘साबुदाणा – दाणे – बटाटा’ या त्रिकुटाची रेलचेल असलेला दिवस होय. काही विशिष्ट कालावधीत तर या त्रिकुटाचा सप्ताह देखील साजरा होताना दिसतो ! एकदा सहज गंमत म्हणून मी घरातील एका ज्येष्ठ व्यक्तीचा उपवास-दिन आहार बारकाईने पाहिला. तो असा होता:
सकाळी उठल्यावर : साखरयुक्त चहा.हे एक उत्तेजक पेय पण ते पाहिजेच कारण त्याच्याशिवाय ‘’मला होतच नाही’’.
सकाळचा नाश्ता: साबुदाण्याची दूध-साखरयुक्त खीर

औषधे : मधुमेह व उच्चरक्तदाबाच्या गोळ्या. नेहेमीचे एक आयुर्वेदिक चूर्ण मात्र टाळले गेले कारण त्यात हळद असते ( जी खरे तर आरोग्यदायी आहे) व ती ‘चालत नाही.’

दुपारचे जेवण: साबू-खिचडी, रताळ्याचा कीस, काकडीची फोडणी दिलेली कोशिंबीर, दाणे व कोथिंबीर यांची चटणी व ताक (अर्थातच ते साखर व मीठयुक्त).

औषधे: मधुमेहाची गोळी. नेहेमीची बडीशेप (जी खरे तर पाचक असते) मात्र टाळली कारण ती ‘चालत नाही’.

संध्याकाळचे खाणे: राजगिरा- शेंगदाणे चिक्की (विकतची) व चहा

रात्री: वरईचा भात व चवदार दाण्याची आमटी. घरी त्यांच्या नातवाने आईसक्रिम आणले होते ते थोडे खाल्ले कारण ते ‘चालते’.
तेव्हा या ‘उपवास-दिनाने’ त्यांच्या आरोग्याला काय फायदा झाला यावर काही भाष्य करण्याची गरज नाही. किंबहुना अशा दिवसाला नेहेमीपेक्षा ‘वेगळे पदार्थ खाण्याचा दिवस’ असे संबोधणे योग्य राहील.

आपल्याकडे बहुतेक लोक हा वरीलप्रमाणे ‘दुप्पट खाशी’ प्रकारचा उपवास करतात. परंतु, खरोखर आरोग्यदायी उपवास करणारेही लोक आहेत. जरी ते अल्पसंख्य असले तरी त्यांच्या उपवासाच्या पद्धती या नक्कीच अनुकरणीय आहेत. त्या खालील प्रकारच्या आढळून येतात:

१. दिवसाचे १२ तास अन्न व पाणी पूर्ण वर्ज्य
२. दिवसभर अन्न वर्ज्य पण, पाणी भरपूर पिणे. उष्ण हवामानाच्या प्रदेशात हा प्रकार सर्वोत्तम आहे.
३. फक्त द्रव पदार्थ पिणे (पाणी, शहाळे, सरबत इ.)
४. फक्त फळे खाणे. तीही पाणीदार व कमी गोडीची.
वरीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने उपवास केल्यास त्याचा आरोग्यास उत्तम फायदा होतो हे निःसंशय.

आता थोडेसे माझ्याबद्दल सांगतो. लहानपणी घरी पारंपारिक ‘दुप्पट खाशी’ प्रकारचे उपवास हे लादलेलेच होते. तेव्हा अर्थातच ती चंगळ वाटायची आणि ते पदार्थ मनमुराद खात असे. बहुतेक मुले ही त्यासाठी उपवास-दिनाची वाट पाहत असत. महाविद्यालयीन वयात या प्रकारातील फोलपणा ध्यानात आला होता.पण, घरात वाद नकोत म्हणून तसे उपवास ‘साजरे’ करत होतो. मात्र जेव्हा स्वतंत्र संसार थाटला आणि निर्णयस्वातंत्र्य मिळाले तेव्हा विचारपूर्वक या ढोंगातून बाहेर पडलो. मग स्वतःच्या पद्धतीने उपवास संकल्पना आचरणात आणली. सुरवातीस आठवड्यातून एक दिवस रात्रीचे जेवण बंद केले. पुढे वयाची चाळीशी उलटल्यावर तर रोज रात्रीचे ‘जेवण’ हा प्रकार बंद करून त्याऐवजी फक्त फलाहार ठेवला. याचे फायदे चांगलेच जाणवले.

मग ‘उपवास’ या संकल्पनेवर खोलवर विचार करू लागलो. खऱ्या उपवासातून जसा आरोग्याला फायदा होतो त्याचबरोबर एक प्रकारचा मनोनिग्रह आपण शिकतो. जरी एखाद्याने आपल्याला त्या दिवशी आपला सर्वात आवडता चमचमीत पदार्थ देउ केला तरी तो नाकारण्याचे बळ आपल्याला मिळते.

पुढे जाउन असे वाटले की असा मनोनिग्रह फक्त खाण्याबाबतच का असावा? गेल्या काही दशकांत आपली जीवनशैली खूप चंगळवादी बनली आहे. सतत ‘दिल मांगे मोअर’ असे वातावरण अवतीभवती दिसते. बौद्धिक श्रमांच्या आहारी गेल्याने आपण शारीरिक श्रमांना हीन लेखत आहोत. स्वावलंबनाचा आपल्याला विसर पडतो आहे. तर या दृष्टीने आपण अजून काही गोष्टींचा निग्रह करू शकू का असे स्वतःला विचारले. त्यातून एक कल्पना स्फुरली. ती म्हणजे आपण आठवड्यातून एक दिवस ‘मनोनिग्रह दिन’ पाळावा. त्या दिवशी खालील निग्रह करण्याचे ठरले:

१. चहा, कॉफी बंद. ही उत्तेजक पेये म्हणजे सौम्य व्यसनेच होत.
२. दिवसातले एक मुख्य जेवण नाही.
३. गार पाण्याने अंघोळ
४. स्वतःचे जेवणाचे ताट स्वतः घासणे आणि रोजचे कपडेही धुणे.
५. स्वतःचे स्वयंचलित वाहन रस्त्यावर आणायचे नाही.त्यादिवशीची कामे चालत, सायकलने अथवा सार्वजनिक वाहनातून जाऊन करायची.

असा दिवस पाळण्यास आपल्या साप्ताहिक सुटीचा दिवस उत्तम ठरतो. सुरवातीस या सर्व गोष्टी एकदम करणे जरा जड गेले पण, टप्प्याटप्प्याने सर्व जमत गेल्या. असा हा दिन खरोखर आनंददायी ठरला आणि त्याचा शारीरिक व मानसिक आरोग्यास चांगला फायदा झाला, हे सांगणे नलगे.

सध्याच्या सामाजिक आरोग्यावर नजर टाकता काही आजार ठळकपणे उठून दिसतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हृदयविकार हे त्यापैकी प्रमुख. आपली बिघडलेली जीवनशैली आणि अरबट चरबट खाणे हे त्यांच्या मुळाशी आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित स्वरूपात एखाद्या उपवासदिनाची नक्कीच गरज आहे. मात्र तो उपवास हा खराखुरा हवा. त्याचे निव्वळ ढोंग नको.

ज्यांना या विषयाकडे गांभीर्याने बघावेसे वाटते त्यांनी आपण करीत असलेल्या पारंपरिक उपवास पद्धतीकडे (म्हणजे साबूदाणा, दाणे, बटाटा इ.) डोळसपणे पाहावे. त्यावर जरूर विचार करावा. जेव्हा आपल्या अंतरंगात अशी विचार परिवर्तनाची ‘खिचडी’ शिजू लागेल तेव्हा आपण उपवासाच्या दिवशी नक्कीच साबुदाण्याच्या खिचडीची सुटी करू शकू!
***********************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपवास करावा तर मुस्लिमांसारखा, अन्यथा बाकी कशाला काय अर्थ नाही

आवडले. तैमुर खुष हुआ

ऋनेष , रमजानमध्ये रात्री मांसाहर चालतो

हर्पेन यांच्या सूचनेवरून ‘मनोनिग्रहदिना’ संबंधीचे माझे अनुभव लिहितो.एका प्रतिसादात एकच मुद्दा मांडतो.म्हणजे कंटाळवाणे होणार नाही.
सर्वानी लक्षात घ्यावे की, हा दिन फक्त आठवड्यातून एकदाच ठरवलेला आहे.त्यामुळे कुठल्याही सुखाचा कायमचा त्याग वगैरे इथे अपेक्षित नाही.

१. चहा, कॉफी बंद. ही उत्तेजक पेये म्हणजे सौम्य व्यसनेच होत >>>>>

हा निग्रह माझ्यासाठी सर्वात सोपा होता. कॉफी मी जवळजवळ पीतच नाही. चहा दिवसातून मोजून २ कप; उन्हाळ्यात तर फक्त १ कप. सकाळी उठल्यावर मी फक्त गरम पाणी पितो.त्यामुळे चहावर अवलंबित्व असे नाही. त्यातून तब्बेत आम्लपित्ताची. सुमारे १० वर्षांपूर्वी मी दूध-साखरयुक्त चहा बंद केला कारण याने त्रास जास्त होतो. म्हणून कोरा चहा (शक्यतो टी- ब्याग वाला) पिऊ लागलो. त्यामुळे निग्रहाच्या दिवशी चहा न पिणे हे सहज शक्य झाले. प्रवासात तर कित्येकदा हा निग्रह आपोआप होतो कारण मला हवा तसा सौम्य कोरा चहा भारतात तरी घराबाहेर कुठेच ( टपरी, हॉटेल्स किंवा स्थानके) मिळत नाही.

हर्पेन धन्स. आ ता दुसरा मुद्दा:

2. दिवसातले एक मुख्य जेवण नाही. >>>>>>

वयाच्या चाळीशीनंतर बुद्धीजीवी वर्गाला रात्रीच्या पूर्ण जेवणाची गरज नसते. बैठी कामे, सतत वाहनांचा वापर, पुरेसा व्यायाम न करणे अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. एव्हाना बऱ्याच जणांची वजनेही वाढलेली असतात. त्यामुळे पहिले नियंत्रण मी येथे आणले. रात्रीचे हे जेवण नसून फक्त ‘किरकोळ खाणे’ आहे असे स्वतःला बजावले. म्हणून ताट न घेता छोट्या ताटलीत मावेल असे काहीतरी न शिजवलेले घ्यायचे व जोडीस एखादे पाणीदार फळ.

सुरवातीस निग्रह करावा लागतो पण, हळूहळू ही चांगली सवय अंगवळणी पडते. असे एक दशकाहून अधिक काळ केल्यावर असे मनोमन वाटले की आपला रोज रात्रीचा एवढा मस्त मिताहार चालू असल्याने आपल्याला आता कुठल्याही वेगळ्या उपवासाची गरज नाही.

याच्या जोडीस अजून एक करायचे. आपली सणवारांची दुपारची जेवणे चांगलीच ‘जड’ असतात. त्यामुळे त्या रात्री पूर्ण लंघन. तसा सरासरी दरमहा एक सण असतोच. ही अजून आपल्या निग्रहात भर.

इथे मला माझ्या उलट प्रकार करणाऱ्यांविषयी लिहावे वाटते. हे लोक त्यांच्या ‘उपासाच्या’ दिवशी दिवसभर काहीही न खाता (किंवा मिताहार करून) रात्री पोटभर जेवतात. हे बरोबर नाही असे माझे वैद्यकिय मत आहे. रात्री शरीराची उष्मांक गरज खूप कमी असते. त्यामुळे असा उपवास करणाऱ्यांचची पोटे बरेचदा सुटलेली असतात.

छान लिहिलंत कुमार.
दिवसा चमचमीत खाल्ल्यावर रात्री काहीच खाऊ नये किंवा फळे/सॅलॅड्स खावीत हे योग्यच.
पण बरेच लोक 'जाऊदे , एवीतेवी दुपारी डाएट मोडलंच आहे तर आता रात्रीपण हाणूया. उद्यापासून बघता येईल' असे म्हणतात.

उपवास्/उपास = उपाशी रहाणे.

यात आपण सामान्यतः जे खातो ते काहीच खायला "धार्मिक" परवानगी नाही, अन उपाशीही राहवत नाही, अशा लोकांनी, मूळ प्रदेशात उपलब्ध नसलेले, पण नंतर इतर प्रदेशांतून आलेले पदार्थ उपासाला "चालतात" अशी पळवाट काढल्याने ते पदार्थ चालू लागले असावेत, असे मला वाटते. उदा. "मद्राशी"लोकांत उपासाला पोळी चालते. भात चालत नाही.

३ लाख वर्षांच्या मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात, सर्वच प्राण्यांप्रमाणे हंटर/गॅदरर स्टेजमधील माणसालाही नियमित फाके पडत असणारच. ते पडू नयेत म्हणूनच तर पशुपालन अन शेतीची (वनस्पतीपालन) सुरुवात झाली, अन दोन वेळचे अन्न मिळवण्यात दिवस अन दमून झोपण्यात जाणारी रात्र, दोहोंतून मोकळा वेळ मिळू लागला, अन अन्य बौद्धिक प्रगतीस सुरुवात झाली. अर्थात, उपाशी रहायलाच हवे, याची गरज नव्हती म्हणून मानवी प्रगतीस हातभार लागला, असे माझे मत. आजही खाण्यापिण्याची ददात मिटली की नंतर इतर गोष्टी सुचतात. तोवर आयुष्य फक्त अन्न मिळवण्याभोवती गुंतलेले असते.

अशा रितीने पोट भरल्यानंतर, रिकामपणी पोटोबानंतर विठोबा आठवताना, स्वयंताडन केल्याने काहीतरी दैवी शक्ती येते, असली संकल्पना सर्वच "धार्मिक" "पुढार्‍यांत" उत्पन्न झाली. व त्यातून देवाच्या नावाचे उपास सुरू झाले असावेत. उपासाचे जास्त फॅड माझ्या लिमिटेड अनुभवानुसार भारतीय उपखंड/व आसपासचा प्रदेश यांत जास्त आहे. मुसलमानांत रोजे करतात, पण ते व्यवस्थीत हवं ते, (अन जरा जास्तच चमचमीत) खाऊन पिऊन असतात, फक्त खाण्यापिण्याच्या वेळा बदलतात. ख्रिश्चनांत उपवास ऐकून आहे, पण ते सांप्रत काळात इतके बोकाळलेले ऐकिवात नाहीत. (मध्ययुगीन युरोपात हे प्रस्थ होते.) म्हणजे, सोमवार, गुरुवार, चतुर्थी, प्रदोष, एकादशी अन असले अनेक उपद्व्याप एकाच वेळी.

आपल्याकडे स्वयंपीडनाचा धार्मिक इतिहास पाहिला तर वैदिक->जैन->बौद्ध->हिंदू या भारतातील धर्मप्राबल्यांतील सर्वांतच पहिले स्वयंपीडन म्हणजे उपाशी रहाणे. केस उपटणे वगैरे इतर प्रकारही कुठे कुठे आहेत, पण तेही एक असोच.

तेव्हा उपास, हा प्रकार 'देव भेटायला कष्ट घ्यावे लागतात' (म्हणून अनेक देव्/देव्या डोंगरावर, खडतर प्रवास करून पोचता येतील अशा जागी) या प्रकारचा आहे, असे माझे मत आहे.

अन्यथा, नियमीत उपाशी रहाणे व आरोग्य, याचा काडीचाही संबंध मला ठाऊक नाही, जाणवलेला नाही. अती उपवासांनी होणारे त्रास मात्र भरपूर पाहिलेले आहेत.

असो.

रँडम विचार आहेत. मांडलेत. आपण वाचलेत, धन्यवाद!

जाई, तूच माझी समै!
जाईच्या या पानावरच्या दोन्ही पोस्ट माझ्या म्हणून वाचा..

उपवास करावा तर मुस्लिमांसारखा,
>>>>

हे आपण उपरोधाने म्हटले की गंमतीने कल्पना नाही. पण माझ्यामते तो फार वाईट प्रकार असतो. दिवसा जेव्हा एनर्जीची गरज असते तेव्हा खायचे नाही आणि रात्री जेव्हा कमी आणि हलकेफुलके खायला हवे तेव्हा हादडायचे हे चूक आहे. मी माझे रोजा ठेवणारे ऑफिसमधील मित्र पाहिलेत. त्या महिन्याभरात बरेच सुट्ट्या घेतात किंवा आले तरी कामाचा वेग प्रचंड मंदावलेला असतो. तेच कश्याला, इस्लामिक राष्ट्रे रोजा काळात साधे युद्धही करू शकत नाही. म्हणजे हा उपवास ताकद वा आरोग्य वाढवत नाही तर घटवतो.

@हर्पेन : आता तिसरा मुद्दा घेतो:

३. आठवड्यातून एकदा गार पाण्याने अंघोळ >>>>

याची थोडी पूर्वपीठीका अशी. कॉलेजच्या वसतिगृहात राहताना गरम पाण्याची अंघोळ हा एक कटकटीचा विषय असतो. गिझर समोर आपापल्या बादल्या ठेउन नंबर लावणे, वरिष्ठांची दादागिरी, धुसफूस हे सगळे असतेच. मग एके दिवशी निर्णय घेउन टाकला की गरम पाण्याची ऐसी की तैसी ! त्यामुळे त्या वयात महिनोंमहिने गार पाण्याची सवय झाली होती.

तीच सवय पुढे एक दिवसाचा निग्रह ठरल्यावर कामी आली. मग असे चाळीशीपर्यंत व्यवस्थित जमले. पुढे हळूहळू शारीरिक मर्यादा आल्या. डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ माझ्यासाठी त्रासदायक. तेव्हा त्या काळात स्वतःला माफ केले. कोणताही निग्रह शरीराला त्रास देणारा असेल तर त्याचा अट्टहास नको.

सध्या परिस्थिती अशी आहे : हा निग्रह उन्हाळ्यात जमतो, पावसाळ्यात अनियमित आणि थंडीत नाही.

हा निग्रह करण्यामागे दोन हेतू. एक म्हणजे वेळप्रसंगी गरम पाण्याची सोय नसल्यास आपले अडले नाही पाहिजे. दुसरे असे की शहरी जीवनात आपण पाणी तापवण्यासाठी इंधन वा विजेचा भरपूर वापर करतो. या दोन्ही संसाधनांच्या बाबतीत आपल्या देशाची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. तेव्हा याची मनाला बोच म्हणून त्यांची थोडी तरी बचत करण्याची सवय लाउन घ्यावी.(अर्थात हे सर्व स्वतःपुरते ठेवायचे.)

कुमार१,

चांगले लिहिताय, वाचतोय...
लिहित रहा. _/\_

कुमार आपले निग्रह भारी आहेत.
हर्पेन यांनी सुचवले तसे हे आणि पुढचे वेगळा धागा काढून टाका. ईतरही प्रतिसादात लिहू शकतील.
आणि हो, वेगळा धागा काढायला पैसे पडत नाहीत Happy

ऋ, धन्स. आता अजून दोनच निग्रह बाकी आहेत. तेव्हा ते इथेच पूर्ण करतो. या गती आलेल्या धाग्यात ते ठीक राहील. नंतर सर्व एकदम इथून उचलता येइल. माझ्या मते उपवास व निग्रह हे निगडीत विषय आहेत. एक प्रकरची चढती
भाजणी आहे ती.

तुमचे व हर्पेनचे प्रतिसाद उत्साहवर्धक आहेत. आभार
@ बी. एस. , धन्स.

ख्रिश्चनांत उपवास ऐकून आहे, पण ते सांप्रत काळात इतके बोकाळलेले ऐकिवात नाहीत....

त्यांच्यातही उपास असतात नव्हे तीर्थयात्राही असतात. अशी एक मोठी तीर्थयात्रा इथिओपिया मधे केली जाते ( यू ट्यूब वर आहे ती ) स्पेन मधेही तीर्थयात्रा आहे. त्यावर आधारीत द वे नावाचा सुंदर चित्रपटही आहे.

नेहमीपेक्षा वेगळे खाणे / कमी खाणे हेच यांचे स्वरुप आहे. मासे चालतात, रेड मीट नाही वगैरे .... !

उपवास चा अर्थ उपाशी राहणे असा नसून उप वास म्हणजे देवाजवळ असणे.. असा आहे.

ख्रिश्चनांत उपवास ऐकून आहे, पण ते सांप्रत काळात इतके बोकाळलेले ऐकिवात नाहीत.... >>>

बरोबर. त्यांच्यात 'lent' असा एक कालावधी असतो. अंदाजे ५० दिवस (चु भू दे घे). त्यात ३ गोष्टी पाळणे अपेक्षित असते : उपास, मदिरावर्जन आणि पश्चात्ताप करणे (penitence हा मूळ शब्द).
साधारण 'लेंट' च्या काळात मांस वर्ज्य करून 'लेंटील' सूप पिले जाते.

हो.
या बुधवारपासून चालू झालेत ख्रिश्चनांचे हे उपास.
सकाळपासून उपाशी राहून चार वाजता जेवतात.
कुठलीतरी एक आवडीची वस्तू ४०दिवस पूर्णच सोडतात.
(आमच्याकडे औषधांच्या वेळा बदलून घ्यायला आठवडाभर अगोदर गर्दी होते तेव्हा समजतं हे. लेंट, रमजान आणि श्रावण यांच्या अगोदरचा आठवडा आमच्या सुगीचा!

.......आता चौथा मुद्दा :

४. स्वतःचे जेवणाचे ताट स्वतः घासणे आणि रोजचे कपडेही धुणे. >>>>

तशी ही सवय इ. ११ वी ते शिक्षण संपेपर्यंत रोजच होती. त्यामुळे आताच्या निग्रहासाठी काहीच अडचण नव्हती.

आपल्याकडे उच्च व मध्यमवर्गीयांकडे यासाठी सर्रास नोकर असतात. त्यामुळे बालपणापासून आपण ‘ही आपली कामे नसतात’ या बाळकडूसह वाढतो. जर घरी राहून सर्व शिक्षण झाले तर मग आपण मोठेपणी ऐदी होतो. त्या कामांकडे व ती करणाऱ्यांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन उपेक्षेचा होतो. फक्त नंतर जर आपण श्रीमंत परदेशात गेलो तर मात्र तिथे आपण ती कामे ‘श्रमप्रतिष्ठा’ या गोंडस नावाखाली करू लागतो! असा हा विरोधाभास आहे.

तेव्हा ही कामे स्वतःच्याच स्वच्छतेची आहेत, त्याची लाज वाटू नये यासाठी हा निग्रह. निदान, त्यामुळे जेव्हा कामवाली व्यक्ती येत नाही तेव्हा आपल्यावर ‘आकाश कोसळत नाही’.

सध्या तर मी हा निग्रह वर्षातले १२० दिवस करीत आहे आणि त्याच्या जोडीला त्या दिवसांत माझा स्वयंपाकही मीच करतो. ते करत असताना जर कधी जाम कंटाळा आला तर तेव्हा स्वयंपाकघराच्या भिंतीवर लिहून ठेवलेल्या वाक्याकडे फक्त पाहतो आणि झटक्यात माझ्यात उत्साह संचारतो. ते वाक्य आहे, ‘’Work does not kill a man but, worries do’’.

आरोग्याच्या दृष्टीने उपवास (साबुदाणा वाले) फारसे चांगले नाहीत हे तर मान्यच आहे. पण उपवास ठेवायची पारंपरिक जबाबदारी बायकांकडेच जास्त असते. पुरुषांचा उपास असला की काही काही घरांमध्ये सगळेचजण उपास करतात कारण पुरुषाला खाणे मिळणे हे बाकीच्यांच्या जेवणापेक्षा जास्त महत्वाचे असते. पण जेव्हा घरात फक्त सुनेचा उपवास असतो (आणि तो देखील घरातील परंपरा जपण्यासाठी असतो) तेव्हा तिच्यासाठी मात्र असा काही खास बेत करून कुणीतरी दुसऱ्यांनी तिला गरम गरम वाढलंय असं बघायला क्वचित मिळतं. आणि काळाच्या ओघात सुना सासवा झाल्या की आपल्या तरुणपणी झालेल्या या अशा अत्याचाराचा दाखला देऊन नवीन सुनांनादेखील तसेच वागवतात. त्यामुळे उपास तापास हे घरात सासू आणि सुनांमध्ये (अकारण) वादाचे मुद्दे झालेले मी पहिले आहेत.

तुम्ही जे मुद्दे मांडले आहेत, ते कुठल्याही धर्माच्या चौकटीतून न बघता फक्त आरोग्याच्या चौकटीतूनदेखील पटण्यासारखे आहेत. आणि धार्मिक किंवा पारंपरिक करणे देऊन उपासाची सक्ती करण्यापेक्षा, असं कुणी समजावून सांगितलं तर कदाचित लोक उत्साहानी उपास करतील.

तुम्ही जे मुद्दे मांडले आहेत, ते कुठल्याही धर्माच्या चौकटीतून न बघता फक्त आरोग्याच्या चौकटीतूनदेखील पटण्यासारखे आहेत. >>>
धन्स सई. माझा कायम डॉक्टर म्हणून हाच वि चार असतो. हा विषय मुद्दामच 'आरोग्यम...' मध्ये घेतला आहे.

......आणि आता शेवटचा मुद्दा:
५. स्वतःचे स्वयंचलित वाहन रस्त्यावर आणायचे नाही.त्यादिवशीची कामे चालत, सायकलने अथवा सार्वजनिक वाहनातून जाऊन करायची.

हा तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय. प्रदूषणग्रस्त शहरामध्ये राहून प्रदूषणत्रस्त झालेला मी ! गेल्या २५ वर्षात सर्वत्र वाहनजन्य प्रदूषण खूप वाढले.त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागला. असे दिसते की या विषयावर लेखन, चर्चा, परिसंवाद आणि परिषदा अगदी भरपूर होतात पण, सर्वात गरजेची असलेली कृती मात्र अत्यल्प असते. बहुतेक सगळा मामला ‘लोका सांगे...’ असा असतो. अधूनमधून कृतीच्या छोट्या लाटा येतात अन लगेच त्या विरूनही जातात. कधी आपण ‘बस डे’ अनुभवतो, कधी सायकलची प्रभातफेरी पाहतो तर कधी पाच वर्षातून एखाद्याच दिवशी आपले काही मोजके खासदार संसदेत सायकलवरून जाताना फोटोत पाहतो !

पण, माझ्या पाहण्यात काही अपवादात्मक असे लोक आले. त्यापैकी काहीना स्वयंचलित वाहन परवडत असतानाही ते आजन्म सायकलनिष्ठ आहेत. मग मलाही काहीसे अपराधी वाटू लागले. पूर्णपणे स्ववाहनरहित आयुष्य जगणे कठिण होते पण, निर्धार केल्यास काही प्रमाणात स्ववाहन-संयम शक्य होता. मग पहिले पाउल टाकले ते म्हणजे आठवड्यातून एक दिवस फक्त चालत अथवा सायकलचा वापर. सुरवातीस हा शनिवार ठेवला होता जेणेकरून दुखऱ्या पायांना रविवारी विश्रांती मिळावी.

पुढच्या टप्प्यात सुटीच्या दिवशी काही कामे ठरवून दुपारच्या वेळांत बसने जाऊन करणे. तेव्हा आपण बसमध्ये शिरू शकतो! अखेर, विचारपूर्वक माझे वाहन-धोरण असे ठरले: १किमी पर्यंतची कामे चालत, ३ किमी पर्यंतची सायकलने, त्यापुढच्या अंतराची बसने आणि फक्त तातडीची कामे स्वतःच्या वाहनाने करणे. गेल्या २ वर्षात मात्र सायकल सोडावी लागली कारण आसपासच्या २ किमी परिसरातील हवा भरण्याची व तिच्या दुरुस्तीची दुकाने बंद पडली आहेत. तरी सांगायला आनंद वाटतो की आज मी वर्षातले निम्मे दिवस स्वतःचे वाहन रस्त्यावर आणत नाही.

हा निग्रह ( वाहन उपवास) अमलात आणताना बऱ्याचदा असा विचार मनात येतो की मी एकट्याने किंवा अत्यल्प लोकांनी असे करून या वैश्विक प्रश्नाबाबत असा काय फरक पडतो? मग हा निराशाजनक विचार झटकून टाकायला एडमंड बर्क यांचे पुढील वाक्य खूप कामी येते :
आपण एकट्याने करून फार काय होणार आहे असे म्हणून जो काहीच करत नाही तो ती सर्वात मोठी चूक करतो’.

Pages