उपवासाचे ढोंग

Submitted by कुमार१ on 15 February, 2017 - 21:43

सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न खावे तर लागतेच, पण खाण्यासाठीच जगणारा मात्र माणूस हाच एकमेव प्राणी असावा ! आपल्या उठसूठ ‘चरण्याच्या’ प्रवृत्तीला थोडा तरी आळा बसावा या उद्देशाने उपवासाची संकल्पना मांडली गेली असावी. आठवड्यातून निदान एक दिवस तरी एक वेळचे भोजन न घेणे आणि दुसऱ्या वेळेस पचायला अत्यंत हलका व मित आहार घेणे हा अर्थ उपवास करण्यामागे अभिप्रेत आहे. आपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे. परंतु वास्तव काय दिसते? नियमित उपवास करणाऱ्या कित्येकांना हा अर्थ समजलेला नाही, असे खेदाने म्हणावे लागेल. ‘कळतंय पण वळत नाही’ असा प्रकार बहुतेकांच्या बाबतीत दिसून येतो.

जरा नजर टाकूयात का मराठी माणसाच्या उपवासाच्या खास ‘मेन्यू’ वर? त्यातला ‘default’ पदार्थ म्हणजे साबूदाण्याची खिचडी ! त्यात स्टार्चने खच्चून भरलेला साबुदाणा, दाणे, तूप आणि ती अधिक चविष्ट करण्यासाठी त्यात बटाटाही घातलेला.तेव्हा या पदार्थाच्या उष्मांक मूल्याची कल्पनाच केलेली बरी. आता त्या दिवसभराच्या मेन्यूतील इतर पदार्थ बघा: रताळ्याचा कीस, गोडगोड रताळ्याच्या चकत्या, दाण्याची आमटी, दाण्याचा कूट घालून केलेली व तुपाची फोडणी दिलेली कोशिंबीर, ‘मधल्या’ वेळेस खायला बटाटा वेफर्स, साबुदाणा वडा, गोड राजगिरा चिक्की...... जाउद्यात, आता पुरे करतो, नाहीतर या यादीनेच एक परिच्छेद भरायचा! तेव्हा असे बरेच पदार्थ दिवसातून तीनदा यथेच्छ खाल्यावर तो दिवस हा ‘उपवासाचा’ म्हणता येईल?
अशा अशास्त्रीय पद्धतीने उपवास ‘साजरे’ करून तथाकथित धार्मिकता जोपासली जाते. पण, त्याचा आपल्या आरोग्याला कोणताही फायदा होत नाही. उलट तोटाच होण्याची शक्यता अधिक.

उपवासाला खायला काय ‘चालते’ आणि काय ‘चालत नाही’ हा तर एखाद्या लघुप्रबंधाचा विषय होईल! त्यातून देशभरातील ‘उपवासपंथीयांमध्ये’ याबाबत एकवाक्यता तर बिलकूल नाही. एखाद्या राज्यात अजिबात न ‘चालणारा’ पदार्थ दुसऱ्या राज्यात मात्र अगदी व्यवस्थित ‘पळत’ असतो ! किंबहुना, पचायला हलके पण जिभेला फारसे प्रिय नसलेले पदार्थ उपवासाला चालत नाहीत ! उलट, जिभेचे चोचले पुरवणारे, जठराम्ल वाढवणारे आणि मेदवृद्धी करणारे पदार्थ मात्र उपवासाच्या ‘मेन्यू’ मध्ये उच्च स्थानावर असतात. अनेक नियतकालिकांतून ‘उपवासाच्या पाककृती’ ची वर्णने करणारी सदरे जोरात असतात. त्यातून नवनवीन पदार्थांची भर या ‘मेन्यू’ मध्ये सतत होत असते.
थोडक्यात काय तर उपवासाचा दिवस म्हणजे ‘साबुदाणा – दाणे – बटाटा’ या त्रिकुटाची रेलचेल असलेला दिवस होय. काही विशिष्ट कालावधीत तर या त्रिकुटाचा सप्ताह देखील साजरा होताना दिसतो ! एकदा सहज गंमत म्हणून मी घरातील एका ज्येष्ठ व्यक्तीचा उपवास-दिन आहार बारकाईने पाहिला. तो असा होता:
सकाळी उठल्यावर : साखरयुक्त चहा.हे एक उत्तेजक पेय पण ते पाहिजेच कारण त्याच्याशिवाय ‘’मला होतच नाही’’.
सकाळचा नाश्ता: साबुदाण्याची दूध-साखरयुक्त खीर

औषधे : मधुमेह व उच्चरक्तदाबाच्या गोळ्या. नेहेमीचे एक आयुर्वेदिक चूर्ण मात्र टाळले गेले कारण त्यात हळद असते ( जी खरे तर आरोग्यदायी आहे) व ती ‘चालत नाही.’

दुपारचे जेवण: साबू-खिचडी, रताळ्याचा कीस, काकडीची फोडणी दिलेली कोशिंबीर, दाणे व कोथिंबीर यांची चटणी व ताक (अर्थातच ते साखर व मीठयुक्त).

औषधे: मधुमेहाची गोळी. नेहेमीची बडीशेप (जी खरे तर पाचक असते) मात्र टाळली कारण ती ‘चालत नाही’.

संध्याकाळचे खाणे: राजगिरा- शेंगदाणे चिक्की (विकतची) व चहा

रात्री: वरईचा भात व चवदार दाण्याची आमटी. घरी त्यांच्या नातवाने आईसक्रिम आणले होते ते थोडे खाल्ले कारण ते ‘चालते’.
तेव्हा या ‘उपवास-दिनाने’ त्यांच्या आरोग्याला काय फायदा झाला यावर काही भाष्य करण्याची गरज नाही. किंबहुना अशा दिवसाला नेहेमीपेक्षा ‘वेगळे पदार्थ खाण्याचा दिवस’ असे संबोधणे योग्य राहील.

आपल्याकडे बहुतेक लोक हा वरीलप्रमाणे ‘दुप्पट खाशी’ प्रकारचा उपवास करतात. परंतु, खरोखर आरोग्यदायी उपवास करणारेही लोक आहेत. जरी ते अल्पसंख्य असले तरी त्यांच्या उपवासाच्या पद्धती या नक्कीच अनुकरणीय आहेत. त्या खालील प्रकारच्या आढळून येतात:

१. दिवसाचे १२ तास अन्न व पाणी पूर्ण वर्ज्य
२. दिवसभर अन्न वर्ज्य पण, पाणी भरपूर पिणे. उष्ण हवामानाच्या प्रदेशात हा प्रकार सर्वोत्तम आहे.
३. फक्त द्रव पदार्थ पिणे (पाणी, शहाळे, सरबत इ.)
४. फक्त फळे खाणे. तीही पाणीदार व कमी गोडीची.
वरीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने उपवास केल्यास त्याचा आरोग्यास उत्तम फायदा होतो हे निःसंशय.

आता थोडेसे माझ्याबद्दल सांगतो. लहानपणी घरी पारंपारिक ‘दुप्पट खाशी’ प्रकारचे उपवास हे लादलेलेच होते. तेव्हा अर्थातच ती चंगळ वाटायची आणि ते पदार्थ मनमुराद खात असे. बहुतेक मुले ही त्यासाठी उपवास-दिनाची वाट पाहत असत. महाविद्यालयीन वयात या प्रकारातील फोलपणा ध्यानात आला होता.पण, घरात वाद नकोत म्हणून तसे उपवास ‘साजरे’ करत होतो. मात्र जेव्हा स्वतंत्र संसार थाटला आणि निर्णयस्वातंत्र्य मिळाले तेव्हा विचारपूर्वक या ढोंगातून बाहेर पडलो. मग स्वतःच्या पद्धतीने उपवास संकल्पना आचरणात आणली. सुरवातीस आठवड्यातून एक दिवस रात्रीचे जेवण बंद केले. पुढे वयाची चाळीशी उलटल्यावर तर रोज रात्रीचे ‘जेवण’ हा प्रकार बंद करून त्याऐवजी फक्त फलाहार ठेवला. याचे फायदे चांगलेच जाणवले.

मग ‘उपवास’ या संकल्पनेवर खोलवर विचार करू लागलो. खऱ्या उपवासातून जसा आरोग्याला फायदा होतो त्याचबरोबर एक प्रकारचा मनोनिग्रह आपण शिकतो. जरी एखाद्याने आपल्याला त्या दिवशी आपला सर्वात आवडता चमचमीत पदार्थ देउ केला तरी तो नाकारण्याचे बळ आपल्याला मिळते.

पुढे जाउन असे वाटले की असा मनोनिग्रह फक्त खाण्याबाबतच का असावा? गेल्या काही दशकांत आपली जीवनशैली खूप चंगळवादी बनली आहे. सतत ‘दिल मांगे मोअर’ असे वातावरण अवतीभवती दिसते. बौद्धिक श्रमांच्या आहारी गेल्याने आपण शारीरिक श्रमांना हीन लेखत आहोत. स्वावलंबनाचा आपल्याला विसर पडतो आहे. तर या दृष्टीने आपण अजून काही गोष्टींचा निग्रह करू शकू का असे स्वतःला विचारले. त्यातून एक कल्पना स्फुरली. ती म्हणजे आपण आठवड्यातून एक दिवस ‘मनोनिग्रह दिन’ पाळावा. त्या दिवशी खालील निग्रह करण्याचे ठरले:

१. चहा, कॉफी बंद. ही उत्तेजक पेये म्हणजे सौम्य व्यसनेच होत.
२. दिवसातले एक मुख्य जेवण नाही.
३. गार पाण्याने अंघोळ
४. स्वतःचे जेवणाचे ताट स्वतः घासणे आणि रोजचे कपडेही धुणे.
५. स्वतःचे स्वयंचलित वाहन रस्त्यावर आणायचे नाही.त्यादिवशीची कामे चालत, सायकलने अथवा सार्वजनिक वाहनातून जाऊन करायची.

असा दिवस पाळण्यास आपल्या साप्ताहिक सुटीचा दिवस उत्तम ठरतो. सुरवातीस या सर्व गोष्टी एकदम करणे जरा जड गेले पण, टप्प्याटप्प्याने सर्व जमत गेल्या. असा हा दिन खरोखर आनंददायी ठरला आणि त्याचा शारीरिक व मानसिक आरोग्यास चांगला फायदा झाला, हे सांगणे नलगे.

सध्याच्या सामाजिक आरोग्यावर नजर टाकता काही आजार ठळकपणे उठून दिसतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हृदयविकार हे त्यापैकी प्रमुख. आपली बिघडलेली जीवनशैली आणि अरबट चरबट खाणे हे त्यांच्या मुळाशी आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित स्वरूपात एखाद्या उपवासदिनाची नक्कीच गरज आहे. मात्र तो उपवास हा खराखुरा हवा. त्याचे निव्वळ ढोंग नको.

ज्यांना या विषयाकडे गांभीर्याने बघावेसे वाटते त्यांनी आपण करीत असलेल्या पारंपरिक उपवास पद्धतीकडे (म्हणजे साबूदाणा, दाणे, बटाटा इ.) डोळसपणे पाहावे. त्यावर जरूर विचार करावा. जेव्हा आपल्या अंतरंगात अशी विचार परिवर्तनाची ‘खिचडी’ शिजू लागेल तेव्हा आपण उपवासाच्या दिवशी नक्कीच साबुदाण्याच्या खिचडीची सुटी करू शकू!
***********************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रताळी/ साबुदाणा / बटाटे वगैरे पदार्थ मुळात कडकडीत उपास करुन दुसर्‍या दिवशी उपास सोडताना खाण्याचे पदार्थ म्हणुन सांगितल्या गेले असावेत, कर्बोदकयुक्त, लौकर उर्जा मिळण्यास. पण त्यांचे प्रमाणपण माफक असावे. त्याचा मग अर्थ हे उपासात चालणारे पदार्थ, बाकीचे न चालणारे पदार्थ असा अर्थ घेतला गेला असावा... असे काहीसे वाटते.

तुम्ही मधुमेह असणार्‍या व्यक्तीचा उपासाच्या दिवशीचा आहार दिला तो धक्कादायक आहे. काय होइल त्या मधुमेहाचे!

बापरे,
माबोवर उपवासाची शेव बटाटा पुरी पण आहे.
आणि त्यावर हेच लिहिल्यावर मी शिव्याही खाल्ल्या आहेत.
Wink
ज्याला जे खायचंय ते खाऊ द्या झालं.
त्यांच्या मनाचं समाधान होतंय ना 'आपण उपवास केला' असं. तर डॉक्टर लोकांनी का मध्ये पडावं म्हणते मी!
Happy

अरोग्या च्या द्रुश्तिने ... उपवासच्या दिवशि अन्दि , चिच्केन खल्ले पहिजे... सगल्यत पोउश्तिक तेच आहे..

अरोग्या च्या द्रुश्तिने ... उपवासच्या दिवशि अन्दि , चिच्केन खल्ले पहिजे... सगल्यत पोउश्तिक तेच आहे..>>>धन्य आहत!
असेच विचर पहेजे... म्हन्जे देव पन पवेल लवक्र... Lol Lol

छान आहे लेख...मस्त!

आठवड्यातून निदान एक दिवस तरी एक वेळचे भोजन न घेणे आणि दुसऱ्या वेळेस पचायला अत्यंत हलका व मित आहार घेणे हा अर्थ उपवास करण्यामागे अभिप्रेत आहे. आपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे. >>>एकदम बरोबर मुद्दा मान्डलात...

छान लेख. मला बरेच दिवस असे वाटत होते. पण बोलले तर कोणाला पटणार नाही असे वाटले. ते स्वतः चे स्वतः धुणी भांडी करणे वगैरे मी नेहमीच करते. साबुदाण्यचे पदार्थ कधीतरी आव्डीने म्हणून करते कसलाच उपास करत नाही.

सर्व प्रतिसादकांचे आभार व सहमती.
@ अंकु : उपवासाचे पदार्थ जे मुळ भारतीय , भारतातले नाही ते उपवासाला कसे काय चालतात हाच मोठा प्रश्न आहे मला ??? >>>>>> सहमत.
एका लेखात मी वाचले होते की साबू व बटाटा हे मूळ दक्षिण अमेरिकेतून आले. तेव्हा हे पदार्थ उपवासाला खा असे आपले ५०० वर्‍षापूर्वीचे पूर्वज कसे सांगतील ?

बटाटा व साबुदाणा हे मूळ जमीनीखालचे खाद्य - लिन्क टू- कंदमुळे आणि फळे खाऊन उपवास करणे.

लेख उत्तम व शब्द आणि शब्द योग्यच आहे. उपवासाच्या नावाखाली हे सर्व करणारे फक्त स्वतःची फसवणूक करत असतात. अमूक चालतं तमूक चालतं हा भॉंगळ प्रकार आहे. उपवास करावा तर मुस्लिमांसारखा, अन्यथा बाकी कशाला काय अर्थ नाही.

उपवासाला देवाची भक्तीशी जोडल्याने पळवाटा काढणारांनी 'मेरे मन को भाया मै कुत्ता काटके खाया' प्रकार सुरु केला. सुरुवातीला कडक उपवास करुन भक्तीचा दिखावा करणार्‍यांना उपवास सहन झाले नसतील, मग एक एक करुन पळवाटा शोधत आजच्या शेवबटाटापुरी आणि उपवासाचे सिझलर्स च्या आचरटपणापर्यंत येऊन पोचलाय प्रवास. कदाचित कुठे उपवासाचे चिकन-मटन-तर्रीही कुणी खात असेल ते एक देवजाणे!

आपल्या पुर्वजांनी जे सांगितलं ते तंतोतंत कोणीच स्वतः पाळत नाही, मात्र वडिलधार्‍यांची आज्ञा नाही पाळली तर मात्र शास्त्राचे दाखले देऊन त्यांच्या मनमर्जीने वागण्याचा दबाव आणतात लहानांवर..!

नानाकळा, धन्स.
कंदमुळे आणि फळे खाऊन उपवास करणे.>> बरोबर. पण, कंद हे पचायला जड असतात. आणि भरपूर वातूळ असतात यावर दुमत नसावे !

लेख आवडला.
आता थोडेसे माझ्याबद्दल सांगतो. असे म्हणून पुढे जे लिहिले आहेत ते अजून जरा सविस्तर लिहाल का.
म्हणजे तुमच्या पाच निग्रहांवर प्रत्येकी एक लेख. सुरुवातीला काही त्रास झाला का ? किती प्रय्त्न करावे लागले काय काय साध्य झालं / जमलं वगैरे

I decide a day before fast day, how I want to fast.
Eg. Liquids only or quinoa only. When I say quinoa only, quinoa with lots of veggies is fine with me.
I do this in addition to intermittent fasting - so even if I eat a lot in one go - it's okay.
Another type of fast my mom suggested was "manache upas".
For eg. You decide and say "I would not talk bad about someone today".. or anything.

Upas is a very good way to train ur mind.

छान लेख. सहमत.
मी ही अगोदर उपास करत होते, साबुदाणा वैगरे सगळा फराळ करायचे..
पण जेव्हा साबुदाणा कसा बनतो हे वाचलं तेव्हा पासून साबुदाणा खायची इच्छा च नाहीशी झाली. त्या नंतर आजतागायत मी साबुदाणा खाल्ले ला नाही. भले साबुदाणा तसा बनतो किंवा नाही पण खिचडी खाल्ल्यावर अॅसिडीटी चा त्रास व्हायचा. त्यामुळे बंदच केला.
कालांतराने उपवासच बंद केले. होत नाही तर का करायचा म्हणून.. आणि आता व्यवस्थित पणे जेवणाच्या वेळा पाळते. रात्री 8 च्या आतच जेवण तेही हलका आहार..

आणि उपासाला काय चालते काय नाही हे ऐकून तर मला नेहमीच गंमत वाटते..
काही जणांना जिरे, कोथिंबीर, काकडी ही चालते तर काही जणांना काजू, जांभूळ इ नाही चालत कारण ते उलटे फळ आहे.. उपासाला काय चालते किंवा नाही हे कोण ठरवतं? सर्व आपापल्या सोयीनुसार ठरवतात.

https://youtu.be/22GqFL8xEvY ही लिंक पहा.
अगोदर वेगळं वाचलं होतं व्हॉटस अॅप वर.
पण तरीही आता साबुदाणा खायची इच्छा च नाही.

मी आधी बर्‍याचवेळा या विषयावर लिहिले आहे...
आपल्याकडचा राजगिरा आणि वरी हे उपवासासाठी योग्य जिन्नस आहेत. खरं तर राजगिर्‍याची पालेभाजी पण चालायला हवी.
( पण मूळातच ती भाजी कमी लोकांना माहीत आहे. )
फळ आणि कंदमूळे खाणेही योग्य. पण ती मूळ रुपात. त्यातील स्टार्च पचायला वेळ लागतो, त्यामूळे ती एकदाच खाऊन दिवसभर शक्ती मिळत राहते.
साबुदाणा कसावा पासून बनवतात ( आपल्याकडे हे पिक जास्त करून दक्षिणेकडे घेतात. माझा सविस्तर लेख आहे यावर )
हे देखील कंदमूळच आहे. आणि आफ्रिकेत आणि दक्षिण अमेरिकेत ते लोकांच्या आहारातील मुख्य घटक आहे.
तो अनेक प्रकारे ( कच्चा, भाजून, तळून, वाळवून भुकटी करून (फुंगी) , किसून आंबवून (गारी ) खातात. )
पण साबुदाणा मात्र आपल्याकडे आणि दक्षिण आशियाई देशातच खातात. इथे आफ्रिकेत नाही.
सॅगो पाम नावाचे झाड असते, त्याच्या गाभ्यातल्या स्टार्च पासूनही सॅगो पर्ल करतात. पण ते पांढरेशुभ्र नसतात.
साबुदाणा ( आणि अरारुट देखील ) हे नुसते स्टार्च आहेत. त्यात इतर कुठलेही घटक नाहीत. पण जेव्हा पचनसंस्था
बिघडलेली असते, खाल्लेले काही पचत नाही, तेव्हा हे पदार्थ दिल्यास ते पचतात.
कसावा हे तसे चांगले पिक आहे. त्याला मेहनत फारशी नसते. वीतभर खुंट रोवला कि झाले. याचे मोठे झाड
होते आणि जमीनीखाली हातभर लांबीची, जाड दहा मूळे तयार होतात. हे झाड दुष्काळातही तग धरते
आणि मूळे उपटली नाहीत, तर जमिनीखाली टिकून राहतात.

साबुदाणा करताना हे कसावा किसून त्याचा रस काढतात. तो गाळून स्थिर ठेवतात. त्याचा साका खाली बसला,
कि त्याच्या खोबरेल तेल लावलेल्या तव्यावर बुंदी पाडतात. तोच साबुदाणा.

हा साका अत्यंत दाट असतो. पण मध्यंतरी काही खोडसाळ पोस्ट्स पण फिरत होत्या, त्यात या साक्यामधे
ईल वगैरे मासे दाखवले होते, असे मासे या साक्यात जिवंत राहणे शक्य नाही. ( असल्या पोस्ट्स बघूनच
अनेकांनी साबुदाणे खायचे सोडले होते. )

साबुदाणा वाल्या पोस्ट ही पॉसिबिलिटी आहे, पूर्वीच्या काळी तो असा बनत असेल.
हल्लि एकंदर फूड इंडस्ट्रि लॉ बघता बंद ठिकाणी नीट निर्जंतुक ठिकाणी बनत असावा असे वाटते.
याबाबत खरे खोटे करायची इच्छा नाही.आवडतो, खाते.

आपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे >>> पर्फेक्ट! मुळात उपवासाचा संबंध देवाधर्माशी जोडण्याचीच काही गरज नाही असं मला वाटतं. आपल्याकडचे बहुतांश उपास हे अश्या कारणास्तव केले जातात आणी मग कुठल्या देवाला काय चालतं आणि काय नाही याच्या जंत्रीप्रमाणे उपवासाचा मेनू बनवला जातो (उदा: शंकराला वरई चालत नाही म्हणे!). त्यापेक्षा स्वतःच्या आरोग्यासाठी उपवास/लंघन करणे उत्तम कारण तेव्हा तुम्ही तो उपवास का करताय याचा उद्देश पक्का ठाऊक असतो. मग त्याप्रमाणे लंघन किंवा हलका आहार (अगदी रोजच्या अन्नातले पदार्थ पण कमी प्रमाणात) घेतला तरीही गिल्ट येत नाही.

>>>ज्याला जे खायचंय ते खाऊ द्या झालं.
त्यांच्या मनाचं समाधान होतंय ना 'आपण उपवास केला' असं.---- पते की बात. अ‍ॅटलिस्ट ज्येष्ठांना तरी काही समजवायच्या भानगडीत पडु नये. म्हातारपणी तसंही बंधने आल्यावर काही लोकांची जास्तं खा खा होते. त्याला ईलाज नसतो. उपवासाचे पदार्थ हे बहुतेकांच्या विशेष आवडीचे असतात.

दिनेशजी छान पोस्ट आहे. नाहीतर मध्ये ती साबुदाण्याची पोस्ट वाचून शिसारीच आली होती, साबुदाणा सगळया स्वरूपात आवडतो. पण हल्ली स्टार्च कमी केल्यामुळे कमी केलाय खायचा. परत एकदा धन्यवाद तुमच्या पोस्ट साठी

छान लेख. बराचसा पटला.

साबुदाणा आपल्याकडे परदेशातून आला आहे तर आपल्या पूर्वजांनी तो उपवासाला कसा सांगितला हा युक्तीवाद काही तितकासा पटला नाही. एक म्हणजे आपले पूर्वज परदेशात गेलेच नव्हते असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. कधी काळी सारे किंवा बरेचसे देश नक्कीच जोडले गेले असणार किंवा त्यात दळणवळणाची काहीतरी साधने असणारच.

जर ही शक्यता नाकारली तरी पूर्वजांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट हजारो वर्षांपूर्वीची रामायण महाभारताच्या काळचीच पाहिजे असे नाही. चारशे वर्षांपूर्वीही पूर्वज होतेच ज्यांनी त्या त्या काळात चालीरीती प्रथापरंपरा बनवल्या आहेत आणि त्या आपण आजही पाळतो.

आपल्या बर्‍याचश्या प्रथा काहीतरी लॉजिक लावूनच बनवलेल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच पोस्टमध्ये मानव पृथ्वीकर म्हणतात, ते पटते -
"" रताळी/ साबुदाणा / बटाटे वगैरे पदार्थ मुळात कडकडीत उपास करुन दुसर्‍या दिवशी उपास सोडताना खाण्याचे पदार्थ म्हणुन सांगितल्या गेले असावेत, कर्बोदकयुक्त, लौकर उर्जा मिळण्यास. पण त्यांचे प्रमाणपण माफक असावे. त्याचा मग अर्थ हे उपासात चालणारे पदार्थ, बाकीचे न चालणारे पदार्थ असा अर्थ घेतला गेला असावा... असे काहीसे वाटते. ""

किंवा कदाचित काही पदार्थांना नेहमीच्या आहारातून बाद करायला त्यांना उपवासाच्या लिस्टमध्ये ढकलले असावे. जेणेकरून लोकं रोज खाण्याऐवजी ते पदार्थ उपवास असतील तेव्हाच खातील. नाहीतर आहे आपले कांदापोहे. उठसूठ खा नाश्त्याला. तसे लोकं उठसूठ साबुदाना खायला लागले असते. किंवा एकेकाळी खात असावेत म्हणून ती सवय सोडवायला ते खाण्याचा एक च उपवास दिन ठरवला असावा.

किंवा उलटही असेल, लोकं साबुदाणा आणि रताळे (किती बोअर पदार्थ आहे हा,. ए रताळ्या सुद्धा ऐकायला कसेसेच वाटते) फारसे खात नसतील. आणि ही सिंपली एखाद्या साबुदाण्या व्यापाराच्या डोक्यातून आलेली सुपीक आयडीया असेल. चार बुवा भटजींना एकत्र घेऊन त्याने रचलेला एक सापळा असावा.

पण या धंद्याचे विरोधकही काही कमी नाहीत. सोशलसाईटवर हा साबुदाणा कसा बनवतात म्हणून कसल्या एकेक घाणेरड्या किडे-मकोड्यांच्या पोस्ट्स फिरत असतात की ते बघून हट्टाने साबुदाणा आणखी खावासा वाटतो. काही कर्मठ लोकं मात्र साबुदाण्याच्या अपमान म्हणजे उपवास प्रथेचा अपमान, पर्यायाने हिंदू धर्माचा अपमान अश्या आवेशात त्या पोस्टवर तुटून पडतात.

बाकी कॅलरी बिलरीचे गणित मला कळत नाही, स्कूलमध्ये ईतके सायन्स वायन्स तर केले नव्हते. पण माझ्या पाहण्यात जे उपवास ठेवणारे आहेत ते कमीच खातात. आणि ते लॉजिकलही आहे. कारण तेच ते उपवासाचे ठराविक पदार्थ किती खाणार. रोजची भाजीपोळी, भातआमटी, पापडलोणचे, झाल्यास एखादी स्वीट डिश असा चौरस आहार सोडून जर कोणी साबुदाणा खिचडीची ताटली पुढे ठेवली तर खाणारा खाऊन खाउन किती खाणार. बरं ऑफिसमध्येही लंच टाईमला दहाबारा लोकांच्या डब्यात दहाबारा प्रकारचे पदार्थ असतात जे शेअर करून खाल्ले जातात. पण ज्याचा उपवास असतो तो बिचारी आपलीच खिचडी खात असतो. वर उपवास नसणारेही त्याची खिचडी एक एक चमचा घेत त्याचा अर्धा डब्बा खाली करतात. त्यामुळे उपवास करणारे बरेपैकी उपाशी राहतात असे बोलू शकतो. लेखात जरी उपवासाच्या पदार्थांची भली मोठी लिस्ट दिली असली तरी दिवसभर असा विविध उपवासांच्या पदार्थांचा आहार करणे सर्वांच्या नशिबी नसते. मुंबईकरांच्या तर नाहीच नाही.

ज्यांच्या बायका उपवास करतात त्या नवर्‍याच्या माथी वेगळा डब्बा कुठे देणार म्हणून खिचडीच मारली जाते. नव्हे सक्तीने उपवासही करायला लागतो. देवाधर्माचे नाव जोडले असल्याने लोकं घाबरून करतातही. हे असंच सहज आठवले, ऑफिसातील दोनेक विवाहीत पुरुषांचे रडगाणे आहे. त्यावर एवढेच असेल तर एक दिवस त्यांनी डबा करायला काय झाले असा वाद अपेक्षित नाही.

मला साबुदाणा खिचडी म्हटलं की सर्वात पहिले हॉस्टेलचे दिवस आठवतात. एक फारच बंडल मेस काही काळासाठी आयुष्यात लावलेली. निदान एक दिवस तरी त्या रुचीहिन जेवणापासून सुटकारा मिळावा म्हणून दर मंगळवारी उपवास असल्याचा बहाणा करून साबुदाणा खिचडी विथ दही आणि बटाट्याच्या तळलेल्या चिप्स मिळायच्या त्या खायचो. त्यातही केळं परत करून एक दहीवाटी एक्स्ट्रा घ्यायचो. त्यामुळे अश्या परीस्थितीत हे उपवासाचे पदार्थ मदतीला धावून येतात असेही बोलू शकतो.

साबुदाणा आणि दहीवरून आठवले, उपवासाची कॉम्बिनेशन सुद्धा डोकॅलिटीने ठरवली आहेत. साबुदाण्याच्या खिचडीबरोबर दही भारी लागते म्हणून ते सुद्धा उपवासाला चालते च्या लिस्टमध्ये टाकले आहे. या ऊलट त्या खिचडीसोबत एकही नॉनवेज आयटम सूट होत नाही म्हणून सारे मांसाहारी पदार्थ उपवासाला निषिद्ध आहेत.

एक अवांतर शंका - मुसलमानांचे जे रोजा उपवास असतात त्यात संध्याकाळी मांसाहारी पदार्थ चालतात का? आमच्या ईथे त्या काळात रोज संध्याकाळी त्यांच्या खजूर, फालूदा, शेवया आणि चिकन मटणच्या विविध डिशेस विक्रीला ठेवलेल्या असतात. त्यासमोरून चालताना एवढी भूक चाळवते, आणि असले तोंडाला पाणी सुटते की आपणही रोजा ठेवावा असे वाटून जाते Happy

Pages