काबिल-ए-तारीफ (Movie Review - Kaabil)

Submitted by रसप on 27 January, 2017 - 00:38

हृतिक रोशन हा आजच्या काळातल्या अतिशय मेहनती अभिनेत्यांपैकी एक आहे. कदाचित अभिनय क्षमतेत इतर काही लोक त्याच्याहून सरस असतीलही, नव्हे आहेतच. खास करून संवादफेकीत तो खूप कमी पडतो, असं माझं एक निरीक्षण आहे. बऱ्याचदा त्याच्या वाक्यांच्या शेवटचा शब्द नीट समजून येत नाही. वाचिक अभिनयात कमी पडत असला तरी आपल्या मेहनतीतून तो त्यावर मात करत असतो. भारतात लोकप्रिय ठरलेला आजवरचा एकमेव देशी सुपरहिरो म्हणूनच तर तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरवू शकला आहे !
'काबिल' ही त्याने गाठलेली अजून एक उंची मानता येईल. 'मोहेंजोदडो'च्या वेळी 'रुस्तम' अक्षय कुमारशी हृतिकची टक्कर झाली होती. तेव्हा नकारात्मक प्रसिद्धीचा फटका त्याला बसला होता. मात्र तरीही पुन्हा एकदा एका मोठ्या सिनेमासमोर उभं राहताना हृतिक डगमगत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच, ह्यासाठी दाद द्यायला हवी. ह्या वेळी तर चक्क किंग खान च्या 'रईस' समोर हृतिकचा 'काबिल' उभा ठाकला आहे आणि believe me, ह्यावेळी तो नक्कीच मात खाणार नाही.

Kaabil Movie Poster.jpg

'काबिल'मध्ये 'काबिल-ए-तारीफ' होण्यासाठीचे जवळजवळ सर्व ingredients आहेत.
रोहन भटनागर (हृतिक रोशन) आणि सुप्रिया भटनागर (यामी गौतम) हे एक अंध दांपत्य. नवीनच लग्न होऊन आलेल्या सुप्रियावर स्थानिक नगरसेवक माधवराव शेलार (रोनित रॉय) च्या लहान भावाची (अमित - रोहित रॉय) वाईट नजर असते. तो व त्याचा मित्र तिच्यावर अत्याचार करतात. हे सगळं कथानक ट्रेलर्समधून स्पष्ट समजून आलंच असेल. ह्यानंतर, सूडभावनेने पछाडलेला अंध रोहन ह्या सगळ्या बाहुबलींचा बदला घेण्याचा प्लान आखतो. कसा ? तो किती यशस्वी ठरतो ? आणि त्यानंतर त्याला काय परिणाम भोगावे लागतात ? हे उर्वरित कथानक, जे ट्रेलर्सनी दाखवलेलं नाही.

पटकथेत काही त्रुटी आणि काही पळवाटाही आहेत. सगळ्यात मोठी पळवाट म्हणजे रोहन आणि सुप्रियाला कुणीही नातेवाईक नसणं. ह्यामुळे कुठलाही पसारा न होता फक्त मुद्द्याचं कथानकच मांडता येण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. अश्या अजूनही काही बाबी आहेत, पण ते सगळं किरकोळच.

दिग्दर्शकं संजय गुप्ता, त्यांच्या उचलेगिरीसाठी (कु)प्रसिद्ध असले, तरी कथानकाची वेगवान मांडणी मात्र त्यांच्या सिनेमात दिसून येतेच. तशीच ती इथेही आहे. नाही म्हणायला, अगदी सुरुवातीला गती जराशी धीमी आहे, पण लौकरच वेग पकडला जातो. त्यांच्या नेहमीच्या आवडत्या पिवळ्या व लाल रंगांची अनावश्यक उधळण इथे नाही, हे एक विशेष !

यामी गौतम अतिशय सुंदर दिसते. अंध व्यक्तीचा वावर सहज नसतोच. मात्र ते अवघडलेपण पडद्यावर सहजपणे आलं पाहिजे, अशी काहीशी विचित्र मागणी ह्या भूमिकांची होती आणि त्यात दोघेही कमी पडलेले नाहीत. यामीच्या भूमिकेला फारशी लांबी नाहीय. मात्र असलेल्या वेळेत तिने स्वत:ला चांगलंच सिद्ध केलेलं आहे.

'रोहित रॉय' गुप्तांचा आवडता असावा. इंडस्ट्रीतील साईड लाईन झालेल्या अनेक चांगल्या अभिनेत्यांपैकी रोहित रॉय एक असावा. कुवत असूनही एकही लक्षणीय भूमिका आजपर्यंत त्याला मिळू नये, हे एक दुर्दैवच. त्याचा बॅड बॉय अमित खूपच कन्व्हीन्सिंग आहे. अगदी पहिल्या फ्रेमपासून त्याची इमेज आपल्या मनात बनूनच जाते.

'रोनित रॉय' च्या करियरने गेल्या काही वर्षांत जो आकार घेतला आहे, त्याची अपेक्षा त्याने स्वत:देखील कधी केली नसावी. सोनी टीव्हीवरील एका टुकार मालिकेतील दमदार भूमिकेनंतर ह्याचे सगळे गहच पालटले आहेत ! ९० च्या आसपासच्या हिंदी सिनेमाच्या दळभद्रीणाचे जे काही चेहरे होते, त्यांच्यापैकी एक रोनित रॉय. पण आजकाल त्याला पडद्यावर पाहताना विश्वासच बसत नाही की जान तेरे नाम, बॉम्ब ब्लास्ट वगैरे टुकारक्यांतून सहनशक्तीचा अंत पाहणारा तो हाच का ? त्याचा हा कायापालट केवळ अविश्वसनीय आहे. गुंड आणि बेरकी 'माधवराव शेलार' लक्षात राहील. ग्लासआडून त्याने फिरवलेली नजर - ट्रेलरमध्येही दिसेल - तर हायलाईटच !

सिनेमा हृतिकसाठी आहे आणि त्याचाच आहे. सिनेमाच्या सुरुवातीला असलेल्या 'कदम से कदम जो मिले...' गाण्यावरील हृतिकच्या नाचासाठी त्याला सलाम आहे ! अप्रतिम कोरिओग्राफ केलेलं आणि सादर केलेलं गाणं खासकरून पाहायलाच हवं असं आहे.
वर म्हटल्याप्रमाणे अंध व्यक्तीच्या अवघडलेपणाला अत्यंत सहजपणे हृतिकने सादर केलं आहे. त्याची हताशा आणि नंतर मनात भडकलेला सुडाग्नी त्याने अप्रतिम रंगवला आहे. प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या प्रयत्नांत पूर्णपणे यशस्वी होते, तेव्हा एक त्रयस्थ म्हणूनही आपल्याला एक समाधान मिळतं. हृतिकचा 'रोहन भटनागर' पाहताना ते समाधान मिळेल.

व्हेटरन राजेश रोशन आजच्या काळाशी सुसंगत संगीत देतात. काबिल हूं, कदम से कदम.. आणि 'सारा जमाना..'चं रिमिक्स मस्त जमली आहेत.

अधिक काही लिहित नाही. बऱ्याच दिवसांनी 'रईस' आणि 'काबिल' अशी डबल ट्रीट आहे. बॉक्स ऑफिसचे आकडे ह्याला 'लढत' ठरवतील आणि दोघांतल्या एकाला विजेताही बनवतील. पण प्रेक्षकांनी ह्याकडे लढत म्हणून न बघता मनोरंजनाची मेजवानी पाहायला हवं. कारण जर एक 'दमदार' आहे तर दुसराही 'काबिल-ए-तारीफ' आहे.

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/01/movie-review-kaabil.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

श्री
काबिलच्या ट्रेलरचा इतका मारा झालेला की त्यात अर्ध्याहून अधिक चित्रपट दाखवला गेला.
त्यामुळे संपुर्ण चित्रपट बघितला नाही तरी चालतोय

काल काबिल बघितला.
प्रयत्न चांगला आहे. पण बर्‍याच न पटणार्‍या चुका सिनेलिबर्टी नावाखाली केल्या आहे. दोन्ही आंधळे हे जन्मतः आंधळे आहे की कुठल्याश्या अपघाताने आंधळे झाले आहे हे कुठे स्पष्ट केले नाही. मुळात आंधळी लोक कायम शुन्यात बघणे चालू असते त्यांना सर्वत्र अंधार दिसत असल्याने डोळ्यांची बुब्बुळे हे नेहमी वरच्या बाजूला वळलेली असतात. परंतू रितिक आणि यामी दोघे ही स्पष्टपणे एकमेकांना बघत असतात . आवाजाच्या दिशेने बघितल्यावर समोरचा इसम कुठे बसला आहे अशा दिशेला रितिक चे डोळे वळतात. हे कसे शक्य होईल ? नुसते दुसरीकडे वगैरे बघुन बोलले की झाला आंधळ्याचा अभिनय. हे बहुदा दिग्दर्शकाच्या डोक्यात फिट्ट बसलेले आहे. जे पडद्यावर बघताना फार हास्यास्पद वाटते.
दोघांचे डोळे लख्ख्पणे जिवंत टपोरे वाटतात. किमान लेन्स लावून पांढरे (मोतीबिंदू टाईप) वगैरे दाखवले असते तर जमून गेले असते.

रोहित रॉय बरोबरची मारामारी तर हाईट होती. तु एक मार मी एक मारतो. जसे दोघे हरिशचंद्रची मुलंच जणू. माझे एक मारून झाले आता मी विश्वासाने हा दांडूका मला मारण्यासाठी तुला देतो. Biggrin समोरचा तुम्हाला ठार मारायला आला आहे तिथे तुम्ही त्याच्याच बरोबर पासिंग द पिलो खेळत आहे. हायकायनायकाय.

बराच कंटाळवाणा आहे . त्यात यामी सुध्दा लवकर गायब होते. या सुडकथे पेक्षा "बदलापुर" लाख पटीने जबरदस्त आहे.
यामीला आंधळी नाही दाखवली असती तरी चालले असते.

परीक्षण आवडले. एक स्टार जास्तीचा दिला गेला असं मला वाटलं.

बाकिचं तू लिहीलंच आहेस. जमेची बाजू म्हणजे ही सूडकथा असल्याने मध्यांतरापर्यंत कथा आकार घेते. मध्यंतरानंतर नायकाला सूड घेण्यासाठी पुष्कळ वाव मिळालेला आहे. पण इथेच पटकथा अतिशय ठिसूळ वाटली. कुठेही मेहनत घेतलेली दिसत नाही. त्याच्याकडे जी कला आहे फक्त तिचा वापर इतकेच दिग्दर्शक, कथालेखक आणि पटकथालेखक यांना अभिप्रेत होते.

संजीवकुमार, सारिका, मार्क जुबेर यांचा कत्ल हा सिनेमा योगायोगाने गेल्या वर्षी पाहिला. तो अजूनही जसाच्या तसा लक्षात आहे. तुलना करू नये, पण एक अंध व्यक्ती आपला मार्ग कसा आखते हे दाखवण्यासाठी पटकथाकार, छायाचित्रकार यांनी दिग्दर्शकाला काम सोपे करून दिलेले आहे. इथे सगळेच सोपे करून टाकले हे पाहताना खटकत राहते. शिवाय आजच्या जमान्यात बटबटीत सूडकथा पाहणे त्रासदायक होते. जीव घेऊनच रोहितला "सुकून" मिळतो हे आज पटणारे नाही.

सिनेमाच्या सुरूवातीला थोडीफार घायलची आठवण झाली होती त्याप्रमाणे व्यवस्थेवर चाबूक वगैरे ओढण्यात निर्माता- दिग्दर्शक यांना रस नसावा हे जाणवते. प्रत्येक दृश्यात नायकाला हाणामारी करायला लावून ती दृश्ये अविश्वसनीय करून टाकल्याने मध्यांतरानंतरचा सिनेमा पटला नाही.

ती एक "च" ची भाषा असते ना.. त्यात धागाकर्ता रसप यांचे नाव लिहिले तर च्रप्स असे होईल का >>> ऋन्मेष हे संशोधन तुझे स्वतःचे की तुम्हीच दुस-या नावाने आधी केलेले मयसभेत ? (Ref - SMS)

सपना, "च" ची भाषा असते काहीतरी खरेच. मला नेमकी माहीत नाही, पण असेच काहीतरी च आधी घेत शब्दातल्या अक्षरांची फिरवाफिरव की काहीसे .. काही पटाईत रपरप बोलतात ही भाषा.. आणि समोरच्या सराईतालाच समजते.. त्यामुळे कोड लँगवेजच वाटते..

ऋ , रसप यांचं नाव च च्या भाषेत 'चसपर' असं होईल. मला येते च ची भाषा.

अवांतर लिहीलं म्हणून, सॉरी रसप.

मराठी टायपिंग खरंच इतकं अवघड आहे का?
म्हणजे काही काही शब्द किंवा अनुस्वार वगैरे ठिकेत पण नॉर्मल शब्द सुद्धा?

असो!

ऋन्मेषा, तू कधी कधी काहह्हीहीहीहीहीहीहीहीही बोलतोस. असु दे.. फॅनक्लाबात असल्याने चालवुन घेते Proud

काबिल बघणार नाही, सुड कथेत रस नाही (१०$ फार जास्त होतात Proud )

रईसही बघितला नाही Sad

रणजितचं लिखाण आवडत पण आता परिक्षणामधे तोच तोचपणा वाटायला लागलाय

मला च ची भाषा येते, कळते, ऋन्मेषला शिकवायला तयार आहे मी... अंजुतैचं बरोबरेय

@ अवांतराबद्दल क्षमस्व !

ऋन्मेष - गोलमोल उत्तराचीच अपेक्षा केली होती. रसप यांचा ड्युआय असेल असे मला वाटत नाही. च्रस्प यांचे वावर वेगळ्या टाईमझोनमध्ये असतो. विनाकारण कुणाबद्दल शंकेचे भूत उभे करू नये म्हणून तो प्रतिसाद दिला होता. विशेषतः तू स्वतः ड्युआय असताना असे उद्योग टाळलेले बरे.

>> रणजितचं लिखाण आवडत पण आता परिक्षणामधे तोच तोचपणा वाटायला लागलाय <<

नोटेड रीया.
माझ्या परीने प्रयत्न करतो नवीन काही करायचा.

ऋन्मेष - गोलमोल उत्तराचीच अपेक्षा केली होती. रसप यांचा ड्युआय असेल असे मला वाटत नाही
>>>>

ओह आय माय गॉड !!!
तुम्ही माझ्या त्या वाक्याचा अर्थ मी च्रप्स यांना रसपचा ड्यू आय बोलतोय असा काढलात?
सॉरी गाईज पण मी आजवर कधी या ड्यू आयच्या चर्चेत पडलो नाही. कोण कोणाचा आयडी वगैरे उठाठेवी करण्याऐवजी तो वेळ मी माझ्या गर्लफ्रेण्डला देणे पसंद करेन. किंबहुना मी सर्वांना हा सल्ला देऊ इच्छितो, असा जेम्स बॉन्ड मायकल शेरलॉक होम्स बनत ड्यूआयडी के पीछे कौन शोध लावून कोणाला कसले रेड एण्ड व्हाईट ब्रेव्हरी अवार्ड मिळणार आहे. आयुष्य खूप छोटे आहे, दुसरयाचा ड्यू आय शोधण्याऐवजी आपला काढून मोकळे व्हा आणि लोकांना ते शोधायच्या कामाला लावा Happy

रीया गरज नाही. अंजूतै यांच्या एका उदाहरणावरून मला कळली ती भाषा Happy

अवांतर पोस्ट वाढून काबिलचे प्रतिसाद रईसपेक्षा जास्त झाले तर हृतिकला आनंदच होईल.
आणि प्लीज, आता रसप हा हृतिकचा आयडी आहे असा अर्थ कोणी काढू नका Happy

दोघांचे डोळे लख्ख्पणे जिवंत टपोरे वाटतात. >>> परफेक्ट! ट्रेलर्समध्ये हेच जाणवलं, की ते दोघंही जराही आंधळे वाटतच नाहीत! त्यामुळे मी हृतिक आणि यामीची फ्यान असूनही सिनेमा थेटरला जाऊन पाहायचा नाही असं ठरवलं.

कंपनी नाहीये गं इशा Sad
रसप : खरंच खुप धन्यवाद... आजकाल कितीही मनापासून प्रांजळ प्रतिक्रिया दिली तरी लोकं इग्नोर मारतात किंवा मस्करी मधे घेतात.......काही काही तर ' तुला किती कळतं?, तू किती लिहितेस? तुला जमतं का मग फार वेगळं?' असा पवित्रा घेतात.. अर्थात अशा लोकांची वाढ तिथेच खुंटते पण तू तसं केलं नाहीस हे फार आवडलं. ... पुन्हा एकदा थॅंक्स

@रीया,
कुणाच्या प्रतिक्रिया सिरीयसली घ्यायच्या आणि कुणाच्या नाही, हे आताशा समजायला लागलंय मला ! Happy

बेक्कार मूवी

अचाट आणि अतर्क्य प्रसंग आणि प्रकार. तो यामीचा पंख्याला लटकून सीन अचाट होता. एक आंधळी जी लग्नानंतर त्या घरात येते तिला पंख्याचा अंदाज इतका अचूक की ती तो दुपट्ता का साडी पंख्यात अडकवून त्याचे दुसरे टॉक गळ्यात अडकवून मग बरिबर खुर्ची ठेवून मरते... अरे किती तो अचाटपणा दाखवाल?

रितिकचा अभिनय फालतु तर होता. थरथरत बोलणे आणि डोळे चिचित्र करणे अजूनही त्या वेड्यासारखा वाटतो त्याच्या एका मूवीसारखा( काय नाव आहे त्या मूवीचे... इधर चला मै उशर चला गाणे आहे). .
एक आंधळा इतक्या सफाईने त्या स्टोरेज मध्ये जातो कसा?

मला वाटतं वेट अनटील डार्क.. हा अजूनही माईलस्टोन आहे..
हेच कथानक मराठी रंगभूमीवर पण आले होते, अंधार माझा सोबती, असे नाव होते नाटकाचे. फैयाझ आणि डॉ. काशिनाथ घाणेकर असत त्यात.

माधवराव शेलारला १०० पैकी २०० मार्क्स! पिक्चर चांगला आहे. वर बाकीच्यांनी मेन्शन केलेल्या त्रुटी निदान पिक्चर पाहताना जाणवल्या नाहीत. फास्ट पिक्चर आहे. थोडासा धक्कातंत्राचा वापर आहे तो ही चांगला वाटतो. रसप म्हणाला तशी खरंच डबल ट्रीट झाली यावेळी.

पहिला चित्रपट.. ठीक ठाक कथानक आहे. चित्रपटाच्या वेगावर पकड ठेवल्याने सुसह्य झालाय. सगळ्यात जमेची बाजू म्हणजे हृतिक फ्रेश दिसलाय . मस्त दिसतोय मुव्हीत. गाणी पण ठीक ठाक आहेत.

काबील रईस बरोबर रिलिज झाला म्हणून त्याला इतका प्रतिसाद मिळाला. नाहीतर अजिब्बात चालला नसता. तसाही ह्रितिकचा फॅन बेस खूप कमी आहे. मुद्दाम त्याच्यासाठी कोणी सिनेमा बघायला जात नाही. रोशन आणि कंपनीने रईस विरोधात बोलून काबीलची पब्लिसिटी केली. लोक हि वेड्यासारखे जाऊन १९७० चा सिनेमा बघून आले. राजेश खन्ना आणि मौसमी चॅटर्जीचा असाच एक सिनेमा होता. फक्त त्यात नायिका एकटीच आंधळी होती. पण तीच घिसीपिटी स्टोरी आहे.
रईसची स्टोरी नवीन नाही पण शाहरुखचा स्वतःचा फॅन बेस आहे. आणि त्याने खूप दिवसात काही वेगळं केलंय. ह्रितिकला ते ह्या जन्मी तरी शक्य नाही.

काबील रईस बरोबर रिलिज झाला म्हणून त्याला इतका प्रतिसाद मिळाला. नाहीतर अजिब्बात चालला नसता.
>>>>>
अगदी अगदी +७८६
हेच मी दोन दिवसांपूर्वी व्हॉटसपवर एका ग्रूपवर लिहिलेले. रईसच्या तुलनेचा एक फायदा आपण म्हटले तसा झाला. म्हणजे चित्रपट चर्चेत आला. नाहीतर मोहेनजोदडो सारखा गाडला गेला असता.
दुसरा फायदा म्हणजे शाहरूख हेटर क्लब सुद्धा जोरदार काबीलची लॉबिंग करू लागला. काबीलला न बघताच अप्रतिम बोलू लागला. तसेच काबील रईस या दोन अर्थपुर्ण शब्दांना घेऊन जोक बनवू लागला.

अर्थात याचा थोडाफार फायदा रईसला सुद्धा झाला हे देखील नमूद करू इच्छितो,
मात्र काबील नसता तरी रईसने जास्त स्क्रीन मिळवत पहिल्या भल्यामोठ्या विकेंडमध्येच बॉक्स ऑफिस खाऊन टाकले असते.

काबील रईस बरोबर रिलिज झाला म्हणून त्याला इतका प्रतिसाद मिळाला. नाहीतर अजिब्बात चालला नसता. >>> Rofl

चांगला गल्लाभरू पिक्चर कसा असतो त्याबद्दल अतिशय मोठे अज्ञान दाखवते आहे हे वाक्य.

बाकी चालू द्या Wink

चांगला गल्लाभरू पिक्चर कसा असतो
>>>
गल्लाभरू चित्रपट त्यात दाखवलेल्या मसाल्यामुळे चालत नाही, तसे असते तर आपल्याला कुठलाही साउथेंडियन चित्रपट आवडला असता.
मसाला चित्रपट चालतो ते त्यासोबत जोडल्या गेलेल्या नावांमुळे चालतो. एक मोठे उदाहरण म्हणजे, सलमान खान.
पण हृतिक रोशन हे त्या कॅटेगरीतले नाव नाहीये. हृतिक गल्लाभरू सिनेमा चालवू शकत नाही. निव्वळ हृतिकसाठी असला मसालापट चित्रपट बघायला जावा ईतका त्याचा करीष्मा किंवा क्रेझ नाहीये. त्याचा चित्रपट खरेच चांगला असेल तर आणि तरच तो चालणार आणि तरीही ते देखील एका मर्यादेत.

ऋन्मेऽऽष तुला वाटतं त्यापेक्षा जास्तीच हृतिक चे फॅन्स आहेत. आणि बर्‍याचदा गल्लाभरू चित्रपट हा त्याच्या मसाल्यावर चालतो. हृतिक कडे इनिशियल करिझ्मा आहे आणि काबिल मधला मसाला एकदम परफेक्ट जमला आहे. भारी स्टोरी, मस्त फाईट्स, एक आयटम साँग, बदला वगैरे. प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. आणि काबिल उगीचच बदलापूर सारखे वेगळे असण्याचा आव आणत नाही. सरळ सरळ जे आहे ते आहे.

तू उगीच पिक्चर न बघता भारंभार प्रतिक्रिया देऊ नकोस रे. त्यांची काहीच किंमत राहत नाही. Lol

धनि + १

पिच्चर चन्ग्ला आहे काबिल ... उगच नावे क थेवतय...

मी पोस्टर बघून पिक्चर ताडणारा माणूस आहे, त्यामुळे अगदी शाहरूखचे बंडल चित्रपट बघायचेही मी टाळले आहे. रईसबाबत ट्रेलरवरूनच बांधलेला अंदाज एक सो ऐक टक्का सच झाला. एखादा असतो जमलेला मसालापट, पण तेवढेच प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचायला पुरेसे नसते. लोकं टिव्हीवर सिडीवर बघतात आणि एंजॉय करतात. पण तोच शाहरूखसारख्याचा जमलेला मसालापट चेन्नई एक्स्प्रेस कमाई करून देतो. हृतिक स्टारडममध्ये अगदीच ड दर्जाचा स्टार आहे असे नाही, पण अ दर्जाचाही नाही. मी बरेचदा त्याला अ‍ॅवार्ड शो मध्ये पहिल्या रांगेत छानपैकी बसलेला बघतो मला बरे वाटते. पण पैसे खर्च करून बघायला जावा असे नाही. बाकी फ्यान तर मिलिंद सोमनचेही आहेत जगात पण ते ईतर गुणांचे असतात.. पिक्चर बघायला जातील असे नाही.. जसे राज ठाकरेंचे भाषण ऐकायला आवडणारे राज ठाकरेला मत मात्र देत नाहीत असे आहे ते..

Pages