काबिल-ए-तारीफ (Movie Review - Kaabil)

Submitted by रसप on 27 January, 2017 - 00:38

हृतिक रोशन हा आजच्या काळातल्या अतिशय मेहनती अभिनेत्यांपैकी एक आहे. कदाचित अभिनय क्षमतेत इतर काही लोक त्याच्याहून सरस असतीलही, नव्हे आहेतच. खास करून संवादफेकीत तो खूप कमी पडतो, असं माझं एक निरीक्षण आहे. बऱ्याचदा त्याच्या वाक्यांच्या शेवटचा शब्द नीट समजून येत नाही. वाचिक अभिनयात कमी पडत असला तरी आपल्या मेहनतीतून तो त्यावर मात करत असतो. भारतात लोकप्रिय ठरलेला आजवरचा एकमेव देशी सुपरहिरो म्हणूनच तर तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरवू शकला आहे !
'काबिल' ही त्याने गाठलेली अजून एक उंची मानता येईल. 'मोहेंजोदडो'च्या वेळी 'रुस्तम' अक्षय कुमारशी हृतिकची टक्कर झाली होती. तेव्हा नकारात्मक प्रसिद्धीचा फटका त्याला बसला होता. मात्र तरीही पुन्हा एकदा एका मोठ्या सिनेमासमोर उभं राहताना हृतिक डगमगत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच, ह्यासाठी दाद द्यायला हवी. ह्या वेळी तर चक्क किंग खान च्या 'रईस' समोर हृतिकचा 'काबिल' उभा ठाकला आहे आणि believe me, ह्यावेळी तो नक्कीच मात खाणार नाही.

Kaabil Movie Poster.jpg

'काबिल'मध्ये 'काबिल-ए-तारीफ' होण्यासाठीचे जवळजवळ सर्व ingredients आहेत.
रोहन भटनागर (हृतिक रोशन) आणि सुप्रिया भटनागर (यामी गौतम) हे एक अंध दांपत्य. नवीनच लग्न होऊन आलेल्या सुप्रियावर स्थानिक नगरसेवक माधवराव शेलार (रोनित रॉय) च्या लहान भावाची (अमित - रोहित रॉय) वाईट नजर असते. तो व त्याचा मित्र तिच्यावर अत्याचार करतात. हे सगळं कथानक ट्रेलर्समधून स्पष्ट समजून आलंच असेल. ह्यानंतर, सूडभावनेने पछाडलेला अंध रोहन ह्या सगळ्या बाहुबलींचा बदला घेण्याचा प्लान आखतो. कसा ? तो किती यशस्वी ठरतो ? आणि त्यानंतर त्याला काय परिणाम भोगावे लागतात ? हे उर्वरित कथानक, जे ट्रेलर्सनी दाखवलेलं नाही.

पटकथेत काही त्रुटी आणि काही पळवाटाही आहेत. सगळ्यात मोठी पळवाट म्हणजे रोहन आणि सुप्रियाला कुणीही नातेवाईक नसणं. ह्यामुळे कुठलाही पसारा न होता फक्त मुद्द्याचं कथानकच मांडता येण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. अश्या अजूनही काही बाबी आहेत, पण ते सगळं किरकोळच.

दिग्दर्शकं संजय गुप्ता, त्यांच्या उचलेगिरीसाठी (कु)प्रसिद्ध असले, तरी कथानकाची वेगवान मांडणी मात्र त्यांच्या सिनेमात दिसून येतेच. तशीच ती इथेही आहे. नाही म्हणायला, अगदी सुरुवातीला गती जराशी धीमी आहे, पण लौकरच वेग पकडला जातो. त्यांच्या नेहमीच्या आवडत्या पिवळ्या व लाल रंगांची अनावश्यक उधळण इथे नाही, हे एक विशेष !

यामी गौतम अतिशय सुंदर दिसते. अंध व्यक्तीचा वावर सहज नसतोच. मात्र ते अवघडलेपण पडद्यावर सहजपणे आलं पाहिजे, अशी काहीशी विचित्र मागणी ह्या भूमिकांची होती आणि त्यात दोघेही कमी पडलेले नाहीत. यामीच्या भूमिकेला फारशी लांबी नाहीय. मात्र असलेल्या वेळेत तिने स्वत:ला चांगलंच सिद्ध केलेलं आहे.

'रोहित रॉय' गुप्तांचा आवडता असावा. इंडस्ट्रीतील साईड लाईन झालेल्या अनेक चांगल्या अभिनेत्यांपैकी रोहित रॉय एक असावा. कुवत असूनही एकही लक्षणीय भूमिका आजपर्यंत त्याला मिळू नये, हे एक दुर्दैवच. त्याचा बॅड बॉय अमित खूपच कन्व्हीन्सिंग आहे. अगदी पहिल्या फ्रेमपासून त्याची इमेज आपल्या मनात बनूनच जाते.

'रोनित रॉय' च्या करियरने गेल्या काही वर्षांत जो आकार घेतला आहे, त्याची अपेक्षा त्याने स्वत:देखील कधी केली नसावी. सोनी टीव्हीवरील एका टुकार मालिकेतील दमदार भूमिकेनंतर ह्याचे सगळे गहच पालटले आहेत ! ९० च्या आसपासच्या हिंदी सिनेमाच्या दळभद्रीणाचे जे काही चेहरे होते, त्यांच्यापैकी एक रोनित रॉय. पण आजकाल त्याला पडद्यावर पाहताना विश्वासच बसत नाही की जान तेरे नाम, बॉम्ब ब्लास्ट वगैरे टुकारक्यांतून सहनशक्तीचा अंत पाहणारा तो हाच का ? त्याचा हा कायापालट केवळ अविश्वसनीय आहे. गुंड आणि बेरकी 'माधवराव शेलार' लक्षात राहील. ग्लासआडून त्याने फिरवलेली नजर - ट्रेलरमध्येही दिसेल - तर हायलाईटच !

सिनेमा हृतिकसाठी आहे आणि त्याचाच आहे. सिनेमाच्या सुरुवातीला असलेल्या 'कदम से कदम जो मिले...' गाण्यावरील हृतिकच्या नाचासाठी त्याला सलाम आहे ! अप्रतिम कोरिओग्राफ केलेलं आणि सादर केलेलं गाणं खासकरून पाहायलाच हवं असं आहे.
वर म्हटल्याप्रमाणे अंध व्यक्तीच्या अवघडलेपणाला अत्यंत सहजपणे हृतिकने सादर केलं आहे. त्याची हताशा आणि नंतर मनात भडकलेला सुडाग्नी त्याने अप्रतिम रंगवला आहे. प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या प्रयत्नांत पूर्णपणे यशस्वी होते, तेव्हा एक त्रयस्थ म्हणूनही आपल्याला एक समाधान मिळतं. हृतिकचा 'रोहन भटनागर' पाहताना ते समाधान मिळेल.

व्हेटरन राजेश रोशन आजच्या काळाशी सुसंगत संगीत देतात. काबिल हूं, कदम से कदम.. आणि 'सारा जमाना..'चं रिमिक्स मस्त जमली आहेत.

अधिक काही लिहित नाही. बऱ्याच दिवसांनी 'रईस' आणि 'काबिल' अशी डबल ट्रीट आहे. बॉक्स ऑफिसचे आकडे ह्याला 'लढत' ठरवतील आणि दोघांतल्या एकाला विजेताही बनवतील. पण प्रेक्षकांनी ह्याकडे लढत म्हणून न बघता मनोरंजनाची मेजवानी पाहायला हवं. कारण जर एक 'दमदार' आहे तर दुसराही 'काबिल-ए-तारीफ' आहे.

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/01/movie-review-kaabil.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ह्रितिक , करीना चि बेस्त अच्तिन्ग आहे आत >>> ते बोल्ड केलेलं अक्षर अवघड जातं मला. शिकवाल का प्लीज ?

कुठे तरी ह्रितिक च्या नाचाची तुलना बाथरुम डान्स बरोबर ही झाली आहे त्यामुळे ह्रितिक vs देवगण काही वाईट नाही.

डोण्ट अंडरएस्टीमेट द बाथरूम डान्स ऑफ कॉमन मॅन ..
असे म्हणतात की नाचावे तर असे की कोणी बघत नाहीये. बाथरूममध्ये आपल्या अंगातील असाच डान्स बाहेर पडतो. त्या नाचाशी कुणाची तुलना करणे हे त्याचे कौतुकच नाही का..

>>अच्तिन्ग <<

@च्रप्स, पुरे की आता.. हे 'अच्तिन्ग ' वगैरे वाचून वारेल एखादा.

जसे आता मोडी लिपीचे अभ्यासवर्ग चालतात तसे काही काळाने चर्रप्स चे लिखाणासाठी काढावे लागतील.

माझी त्यांना विनंती आहे असे तुटक तुटक प्रतिसाद देण्यापेक्षा लांबलचक लेख लिहावेत, सुडोकू आणि शब्दकोडे वाल्याना नवीन चॅलेंज

बस्स का रओ... फिर्कि घेता मजि Happy

काबिल १०० च्रोरे मधे जओ ना जओ... रसप यन्चा दागा १०० जनार नक्कि ... अभिनन्दन रसप.

आज पाहिला. आवडला. गाणीही चांगली आहेत. चित्रपटातही बघायला बोर नाही होत. आंधळ्यांची प्रेमकथा जरा आणखी खुलवली असती आणि आणखी हृदयस्पर्शी रोमांचिक प्रसंग टाकले असते तर बघायला आवडले असते. जसे ते मॉलमध्ये हरवण्याचे दृश्य वगैरे. मला असले सीन फार आवडतात.

सूडनाट्य़ही तसे काही वाईट नाही. त्यातली मेन ट्रिक गोविंदाने एका चित्रपटात वापरून झाली आहे. (त्या चित्रपटाचे नाव नाही घेत अन्यथा स्पॉयरल होईल, आणि तुम्हीही आंधळा गोविंदा चित्रपटाचा शोध घेत बसू नका) असो, पण त्या ट्रिकचा वापर असणारच हा अंदाज मला ट्रेलरमध्येच आलेला. ट्रेलरवरून पिक्चर ओळखायच्या मी काबील आहे याचा मला पुन्हा प्रत्यय आला.

हृतिकने आंधळ्याची एक्टींग तोडलीय वगैरे नाही, पण अगदीच आंधळा वाटत नाही अश्यातलाही भाग नाही. तो काय आमीर खान नाही जे जास्तीचा अभ्यास करत भुमिका साकारेल. आणि या चित्रपटाला त्याची गरजही नव्हती. हृतिकचे रस्त्यात येणार्‍या प्रत्येक वस्तूला ओझरता स्पर्श करून जाणे आणि त्यानुसार मारलेले कॅमेर्‍याचे अ‍ॅंगल असे दिग्दर्शकानेच त्याला आंधळा दाखवायला मेहनत घेतलीय.

एकेकाला तो मारत जातो, पण पुरावा काहीच सोडत नाही. हे ऐकायला गोड वाटले तरी प्रत्यक्षात चित्रपटात कोणी पुरावे शोधतानाच दाखवत नाही. अन्यथा सारे सरळसोट मर्डर आहेत. कुठेतरी निर्जन जागी मारण्याला पुरावे न सोडणे बोलतात यावर फक्त विश्वास हवा. जर भर दुपारी नाक्यावर बोलवून मारला असता तर पुरावे तयार झाले असते. पण हृतिक तसले काही करत नाही.

ओवरऑल एकदा बघायला हरकत नाही असा चित्रपट आहे. रईससोबत प्रदर्शित झाला नसता तर कदाचित बॉक्स ऑफिसवर एवढा हिट गेला नसता, तरी किमान आपल्या हिश्याची कमाई त्याने केली असती ईतपत चांगला आहे.

अजून ज्यांनी चित्रपट पाहिला नाही त्यांच्यासाठी विशेष सूचना - जर पिक्चर मोबाईलवर बघत असाल तर हृतिक आणि यामी जेव्हा स्क्रीनवर येतात तेव्हा ब्राईटनेस जरा कमी करा. नाहीतर तुम्ही डोळे दिपून आंधळे व्हाल.
बाकी आंधळा हृतिकही आपल्यापेक्षा बरा नाचतो हे बघूनही माझा बाथरूम डान्सचा अभिमान अजूनही शाबूत आहे.

ब्लॅक चित्रपटात आयशा नावाच्या लहान मुलीने जितक्या तन्मयतेने "अंध" भुमिका साकारली होती त्याच्या १% पण रितिक आणि यामीने साकारली नाही. किमान "ब्लॅक" चित्रपट जरी १० वेळा "काबिल" टीम ने पाहिला असता तर कदाचित चित्र बदलले असते.

मला नाही आवडला फारसा. म्हणजे अगदी रटाळ नाहीये, बरा आहे. पण 'एका अंध व्यक्तीने घेतलेला सूड' या प्लॉट्वर अजून रोमांचक, थरारक काहीतरी दाखवता आले असते. अगदी सरळसोट, सोप्पा दाखवला आहे सूड.
अंध जोडप्याची लव्हस्टोरी दाखवण्यात १ला भाग वाया घालवला आहे. त्यामुळे, दुसर्‍या भागात कथा खुलवत न्यायला वेळच उरला नाही. असे माझे मत.
इन्स्पेक्टरला सगळे माहिती असतानाही तो काही करू शकत नाही हे जरा विचित्र वाटले. मेंटलिस्ट, कॅसल, rizzoli n isles वर पोसलेली माझी लेक पूर्णवेळ ' आई, तो फिंगरप्रिंटस का चेक करत नाहीये?' असे विचारत होती. Lol आंधळा असूनही तो वेगवेगळ्या जागी (ज्या त्याच्या सरावाच्या जागा नाहीत) सहजतेने फिरू शकतो, हे कितपत पॉसिबल आहे माहिती नाही Uhoh
बर्‍याच गोष्टी खटकल्या. प्रेक्षकांना गृहित धरून दाखवल्या आहेत.
असो. घरी टीव्हीवर बघण्यासारखा आहे.

Prachi +1 !
Oh yes and Ankhen was awesome.

प्राचीला अनुमोदन.
यामी अत्यंत सुंदर आहे.
फुकटात पैसे वसूल होतील >> Happy

काल लावला पण मला पहिली १० मि. ही असह्य झाली. मला ऋतिक फक्त जिंनामिदो मध्ये आवडला आहे. यामी विकी डोनरमध्ये खूप आवडली होती पण इथे दोघं एकत्र अगदीच सहन होईनात.
काबिल बंद करुन मसान लावला जो वर्थ होता.

Pages