रस्त्यावरचे आकस्मिक भांडण: एक प्रचंड मन:स्ताप...

Submitted by एक मित्र on 20 January, 2017 - 02:27

काल एक प्रसंग घडला. असे प्रसंग माझ्या आयुष्यात काही महिन्यातून एकदा घडतातच. पण त्याचे मनावर इतके वाईट डाग पडतात कि अनेक दिवस त्यातून बाहेर येता येत नाही. ते आठवले तरी मनाची प्रचंड चरफड होते. एरवी ज्यांची आपले जोडे सुद्धा पुसायची लायकी नाही असले नीच आणि हलकट लोक आपल्याला सहजगत्या अपशब्द बोलून गेले आणि आपण काहीच करू शकलो नाही हे आठवल्याने मनाचा संताप संताप होत राहतो.

झाले असे कि मी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला चाललो होतो. कारमध्ये बरोबर ऑफिसमधली एक सहकारी मैत्रीण होती. सकाळी आठ-साडेआठची वेळ असेल. रस्त्यावर फार वर्दळ नव्हती. इतक्यात डाव्या बाजूची पण माझ्या बरीच पुढे असलेली एक गाडी (टेम्पो ट्रॅक्स असावी) अचानक थांबली. सिग्नल वगैरे काही नव्हता. मुळात तो चौक पण नव्हता. त्यामुळे पुढे असलेले डाव्या बाजूचे वाहन का थांबले याची फिकीर करायची मला काही गरजच नव्हती. मी आपला माझ्या स्पीडने माझ्या लेन मधून तसाच पुढे जात होतो. डाव्या बाजूला उभ्या राहिलेल्या त्या टेम्पो ट्रॅक्सच्या पुढे आता मी जाणार इतक्यात एक उपटसुंभ (हाच तो हरामी) आपली फडतूस बाईक घेऊन त्या टेम्पो ट्रॅक्सच्या पुढून थेट आडवा माझ्यापुढे आला. मी करकचून ब्रेक दाबला. नशिबाने माझ्या कारचा स्पीड जास्त नव्हता नाहीतर तो जाग्यावरच गचकला असता (एका अर्थाने ते बरे झालेही असते. असले हलकट लोक जगून करायचे तरी काय? दुसऱ्यांना त्रास देत जगत राहणार. असल्या भिकार**ना एकत्र करून कुठेतरी लांब नेऊन जाळून टाकायला हवे खरे तर). पट्कन मी ब्रेक दाबल्याने बेसावध असलेली माझी सहकारी मैत्रीण समोर केवळ आदळायचीच बाकी राहिली होती. मी पण कसाबसा स्टीअरिंग पकडून स्वत:ला सावरले. क्षणार्धात घडलेल्या या प्रसंगाने दोघे पण हबकून गेलो. मी प्रचंड रागात त्या इसमाकडे पाहू लागलो. राग येणे स्वाभाविक आहे. पण मुजोर वृत्ती त्याच्या नसानसात भरलेली. पैदाइशच तशी असावी. डुक्कर घाणीतच लोळणार. तसे काही लोक शिकत नाही. आपली मूळ वृत्ती धरूनच राहतात. स्वत:ची चूक झालेली असूनही केवळ मी रागाने पाहत आहे म्हणून माझ्या कारच्या आडवी बाईक लावून हातवारे करून मला काहीतरी बोलू लागला. मी पूर्ण दुर्लक्ष केले. पण मी प्रतिकार करत नाही म्हणून त्याला जोर चढला. माझ्या कडे पाहून त्याने शिव्या दिल्यासारखे तोंड हलवले.

मग मात्र माझी सटकली. काहीही चूक नसताना माजोरडे पणा आणि वरताण म्हणून शिव्या पण खायच्या? मग मी पण त्याला तसेच हावभाव करून प्रत्युत्तर दिले. तर तो बाईक आडवी उभी करून तावातावाने माझ्या गाडीजवळ येऊ लागला. बरोबर मुलगी असल्याने मी फार काही प्रतिकार करू शकणार नाही असे त्याला वाटले असावे. पण मी पण त्याला न जुमानता दार उघडून बाहेर त्याच्याशी दोन हात करायची तयारी केली. तितक्यात मैत्रीण म्हणाली, "दार उघडून बाहेर जाऊ नकोस. तो चांगला वाटत नाही. ह्या भागात भुरटे गुंड आहेत. त्यांच्या खिशात काहीही हत्यार असते." तिचे म्हणणे मनाला पटले. पूर्वी पण अशा किरकोळ वादावादीतून खून पडल्याचे ऐकले होते. मी कसे बसे स्वत:वर नियंत्रण मिळवले आणि हाताने त्याला, "चल फूट इकडून मा***त" असे काचेतूनच खुणावले. तो अजून चवताळला. ओरडून शिव्या देऊ लागला. अशा प्रसंगी हे हिणकस लोक कारला बाहेरून लाथा मारणे किंवा खिडकीच्या काचेवर जोरजोरात थपडा मारून बाहेर यायला उद्युक्त करतात असा माझा पूर्वअनुभव आहे. पण याने तसे काही केले नाही. थोडा वेळ आरडाओरडा केल्यावर तो तिथून निघून गेला. तशी मी पण पटकन काच खाली करून त्याच्या दिशेने "हाड रे कुत्र्या. हरामी" वगैरे ओरडून थोडी भडास काढली. पण बरोबर सहकारी मुलगी असल्याने त्याच्या शिव्यांना तसेच प्रत्युत्तर देऊ शकलो नाही याचे खूप वाईट वाटले.

नंतर मी ऑफिसला आलो. पण सकाळी सकाळी आपली काहीही चूक नसताना घडलेल्या या प्रकाराने दिवसभर मन अस्वस्थ होते. कामात लक्ष लागत नव्हते. चूक नसताना एका हिणकस दर्जाच्या हलकटा कडून मैत्रिणी समोरच शिव्या खायची वेळ आली हि गोष्ट मनाला दिवसभर खूप बोचत राहिली. अजूनही बोचते आहे. ढेकूण चावल्यावर त्या जागी प्रचंड आग आग होते. तशी इथे हा दलदलीतला किडा चावल्याने मनाची आगआग झाली होती. नक्कीच तो काही कामधंदे न करणारा भुरटा गुंड असणार. कामधंदे करणारा असता तर अशी भाषा याने वापरली नसती. कुणाच्या तरी चुकीमुळे अशा औलादी कुठल्यातरी गटारात जन्माला येतात. काही कामधंदे न करता आयुष्यभर गुंडा मवालीगिरी करत इतरांना त्रास देत जगतात. आमच्या करावर यांना आम्ही पोसायचे. आणि हे वर आम्हालाच शिव्या देणार. आणि एकदिवस कुठल्यातरी गटारातच मरणार. हे लोक जिवंत ठेवायचे तरी कशाला? असले काहीबाही विचार माझ्या मनात दिवसभर येत राहिले. ह्या प्रवृत्तीच्या लोकांना मनातून प्रचंड शिव्याशाप देत दिवस गेला. ह्यांच्या पिढ्या तडफडून मरायला हव्यात. नामोनिशान नष्ट व्हायला पायजे ह्या हरामखोरांचे. इत्यादी इत्यादी शिव्याशाप मन दिवसभर देत होते. मनाची प्रचंड चरफड सुरु होती. अजूनही सुरूच आहे. ती पूर्ण शमायला अजून काही दिवस जातील.

असो. पण वर सुरवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे माझा एक अनुभव आहे. माझ्या आयुष्यात काही महिन्यातून किमान एकदा तरी अशा रस्त्यावरच्या वादावादीला सामोरे जायचा प्रसंग माझ्यावर येतोच असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. मला एक गोष्ट कळत नाही कि हे केवळ माझ्याबाबतच घडते कि सर्वांनाच असे अनुभव येतात? तुमची चूक नसतानाही केवळ तुमच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन कोणी असभ्य भाषेत तुम्हाला शिव्या देऊ लागले तर तुम्ही काय करता? खरोखरच या प्रश्नांची उत्तरे मला हवी आहेत. कारण मला खात्री आहे अजून सहा एक महिन्यात किंवा वर्षभरात मला काहीही ध्यानीमनी नसताना अचानकपणे अशाच अजून एखाद्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे.

Group content visibility: 
Use group defaults

You need to follow the serenity prayer! God (or whatever you believe in), grant me the serenity to accept the things I cannot change, Courage to change the things I can, And wisdom to know the difference.
सोडून देता येणं पण फार महत्वाचं आहे. What really matters and is this worth असा विचार केला की गोष्टी सोप्या होतात हा स्वानुभव आहे.

हैद्राबादला या, असे अनुभव रोज ऑफिसला जाता - येताना ४-५ वेळा घ्या.
हां, तुम्ही ऑफिसला जाणार नाहीत, साईट सिईंगला लांब लांब पण जाल, तर कदाचित ४-५ वेळेपेक्षा जास्त येतील असे अनुभव.
चार दिवस रहा आणि परत जा.
बघा फरक पडतो का ते.

गौतम बुद्धांची एक कथा आहे. एकदा ते ध्यानस्थ असताना एक इसम आला आणि त्याने त्यांना खूप शिवीगाळ केली. यथावकाश मन भरल्यावर तो माणुस गप्प बसला. आणि गौतम बुद्धांनी डोळे उघडले. त्या माणसाला त्या शांतपणाची कमाल वाटली. त्याने बुद्धांना विचारले की मी तुम्हाला इतकी शिवीगाळ केली तरी तुम्हाला माझा राग कसा काय आला नाही? त्यावर बुद्ध त्याला म्हणाले जी गोष्ट तू मला देऊ केलीस ती मी घेतलीच नाही, त्यामुळे ती तुझ्याकडे आपोआप परत गेली.
अशी स्थितप्रज्ञता आपण गाठण केवळ अशक्य असू शकतं. पण तरीही थोडा विचार केल्यास आपली पातळी आणि रस्त्यावर भांडण करणाऱ्या व्यक्तीची पातळी थोडक्यात लक्षात घेतली तर त्यांच्या बरोबर वाद घालणे म्हणजे स्वत:चे अध:पतन करून घेण्याजोगे आहे.
पण आपल्या मैत्रिणी समोर आपल्याला कुणीतरी शिव्या देतंय म्हणजे आपला इगो दुखावला जातोच, मग ठोश्यास ठोसा दिला तरच मनाला शांती मिळते अन्यथा मायबोली वर असे धागे निघतात.

शांत व्हा आणि शांतच राहा. मानव म्हण तात तसे हैद्राबाद साइडला असे पंगे घेणारे फार अनुभवलेत. माझ्या डायवरला पण मी सोबत असल्याने फार शिव्या घालता यायच्या नाहीत. पण तो एक्स्प्लोड व्हायच्या लेव्हललाच असायचा. रोड रेज नावाचा प्रकार अति डेंजरस.
असे काही झाले की थोड्या अंतरावर गाडी नेउन थांबवून डोके शांत होउ द्यावे. गार पाणी, ज्यूस, चहान कॉफी काहीतरी घ्यावे व मग पुढे जावे. हपिसात जाउन एसी लावुन लॅप्टॉप चालू करून शांत बसावे. व मग काम चालू करावे. मानहानी होतेच आपली व राग
द्वेष त्वेष खूप वा टतो पण तिथे व्यक्त न होता निघून जावे हे जिवासाठी बेस्ट.

माझ्या बाबतीत असे एकदा झाले होते. सिग्नलला उभा असताना एक खेडवळ बाई रस्ता क्रॉस करत होती. गाड्या अगदी खेटून असल्यामुळे तिला जात येत नव्हते त्यामुळे तिला जागा करून देण्यासाठी मी बाईकचे चाक तिरके करून तिला खुणावणार होतो ते दुर्दवाने तिच्या पायाला किंचित घासले.
त्यावर त्या बाईने इतका रुद्रावतार धारण केला आणि जणू मी तिच्यावर गाडी घातली असा आक्रस्ताळी थायथाटात केला. इतकेच नाही तर अंगावर धावून आली आणि जोरात डोक्यावर मारले. मी हेल्मेट घातल्यामुळे झाले काय नाही पण तिचा अविर्भाव बघून बाकीचे लोक चमत्कारिक नजरेने बघू लागले. त्यांना वाटले असावे जणू मी तिची छेड काढली. ती बाई अत्यंत गलिच्छ शिव्या देत होती आणि तिने मारल्यामुळे मी प्रचंड हबकलो होतो. त्या जागी पुरुष असता तर उलटी हाणली असती पण बाईवर हात टाकणे काय तिला उत्तर देणे ही शक्य नव्हते. त्यातून तिचा पट्टा इतका मोठ्याने आणि खालच्या दर्जाचा होता की मी काहीच बोलू शकलो नाही. सिग्नल सुटला आणि मी निघून आलो पण ती सल अजून मनात आहे.
खूप संतापाने थरथरत होतो बराच वेळ

तुमची जी प्रतिक्रिया होती ती अतिशय नैसर्गिक होती. पण थोडं या नैसर्गिक पणाच्या पुढे जाऊन तुम्हाला स्वतःला अशा प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी तयार करावंच लागेल. यालाच तर रोड रेज म्हणतात. अशा वेळेस आपली चूक असू दे, नसू दे, स्वतःवर बंधन घालून घ्यायचं की मी अशा गोष्टींना रिअ‍ॅक्ट होणारच नाही. रोड रे़ज मध्ये दोन्ही पार्टींचे मेंदू flight or fight mode मध्ये जातात आणि अनर्थ व्हायची शक्यता वाढते.
आमचे ड्रायव्हर काका पण अशा बाबतीत फार थंडपणे घ्यायचे. मी जेव्हा पंचविशीत होते, तेव्हा त्यांना सांगायचे, काका त्याला ओरडा जरा, किंवा काहे काही रागाचे gesture तरी द्या. ते म्हणायचे, गाडी चालवत अस्तांना असे प्रकार अ-जि-बा-त करायचे नाही. भांडण फक्त वाढत जातं.
लहानपणी आईवडील पण सांगायचे ना, 'तू शहाणी अहेस ना मग तुच समजुतीने घे', तसं समजायचं आणि काय Happy

पुण्यात अगदी नॉर्मल आहे हे . परवा खडकी रोड वर )जिथे गायींचा मुक्काम असतो) गाय समोर आल्यामुळे थांबलो . मागून आलेल्या गाडीची जोरात धडक बसली . गाडीवर पोलिटीकल पार्टीचा लोगो होता . मग काय माफी सोडा आणि खाली उतरून मलाच शिव्या . नशीब मला मराठी बोलता येत होत आणि ४ ५ माणस त्याची काही चूक नाही म्हणून मदतीला आली नाहीतर माझी काही धडगत नव्हती .

तेव्हा मी स्वतःला समजावल की आपण गाव सोडून पोटापाण्यासाठी दुसरीकडे आलोय , ही आपण विचार करून केलेली अ‍ॅडजेस्टमँट आहे , तेव्हा इथल्या "स्थानिक" लोकापासून जरा सावधच राहिलेल बर .

सुलक्षणा छान पोस्ट.

एखादा असा मुठी आवळायला लावणारा प्रसंग सहजा सह्जी विसरणे अती कठिण असते. भल्या भल्या शांत आणि संयमी लोकांना ते जमत नाही. कारण स्वतःवरचा वार परतवणे हा मानवी स्वभाव आहे. मग तो शारिरिक असो अथवा शाब्दिक. पण प्राणी फक्त जीवावर आल्यावरच रिएक्ट करतात. तुम्ही त्यांच्या समोर शब्दांचे किस पाडा काय रिअ‍ॅक्शन येउ शकते? (मला प्राण्यांसमोर असे प्रयोग करण्याचा अनुभव नाहिये म्हणून विचारतेय) पण मनुष्य प्राण्याचा अहंकार लगेच दुखावतो.
आणि मग आपली पावर दाखवायला लोक शाब्दिक बाचा बाची वरून शारिरिक मारहाणीवर उतरतात. आणि त्याने प्रकरण अधिक चिघळते.

वर आशुचॅम्प ने लिहिलेला प्रसंग खरंच दुर्दैवी आहे. त्याने चांगल्या हेतूने हँडल वळवले पण दुर्दैवाने तिला लागले आणि तिचा गैरसमज झाला. अशावेळी खरंच आपण काही करू शकत नाही. फारतर आशु तिला समजावून सांगू शकला असता, पण कधी कधी समोरच्याचा आवेग अनावर झालेल असताना आपल्या संयमी उत्तरा चा पण उलट अर्थाने इश्यु होऊ शकतो.

असे एक-दोन फारतर पाच प्रसंग झाले आणि तुम्ही शांततेत घेतलं तर तुम्हाला त्रास होईल कदाचित. पण सहाव्यांदा तुम्हाला कदाचित काडीमात्र फरक पडणार नाही.
सरकारी यंत्रणा आहेत मदतीला पण प्रत्येक क्षुल्लक गोष्टीसाठी किंवा सामान्य वादासाठी त्यांची कास धरणं योग्य नव्हे.

हा धागा आपण किस्सा घडल्याघडल्या लगेच काढलाय का?
की मध्ये वेळ गेला? गेला असल्यास किती?

हे एवढ्यासाठीच विचारतोय की किती संताप झळकतोय प्रत्येक वाक्यावाक्यातून.
एक प्रामाणिकपणे सांगितले तर राग मानणार नाहीत हे गृहीत पकडतोय, पण किती जहाल भाषा वापरली आहे आपण या पोस्टमधून.

आता मी त्या व्यक्तीला पाहिले नाही. पण तुमच्या वर्णणावर विश्वास ठेवून म्हणूया त्याला मवाली.
पण मग मवाली म्हणजे नेमके काय? रस्त्यावर शिवीगाळ करणारा? पण मग जर आपणही तेच केले तर त्यात आणि आपल्यात फरक काय उरला?

गैरसमज नसावा, मी तुम्हाला त्या व्यक्तीच्या पंगतीत नाही बसवत आहे. उलट मला तुम्हाला किंवा अश्या परीस्थितीत असे रिअ‍ॅक्ट होणार्‍या सर्वच सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोकांना सल्ला द्यायचा आहे की तुम्ही तसे नाही आहात तर केवळ जश्यास तसे उत्तर द्यायच्या नादात तसे वागायला जाऊ नका. संयमाचे भले कौतुक होत नसले तरी फायदा नक्की होतो Happy

ऋन्मेष ला +१
नक्कीच तो काही कामधंदे न करणारा भुरटा गुंड असणार. कामधंदे करणारा असता तर अशी भाषा याने वापरली नसती. >>>>>> तुम्हीही काम धंदा करता ना? मग तुम्हीही तर तसल्याच शिव्या दिल्यात की. मग तुमच्यात अन त्याच्यात फरक काय ?
ज्यांची आपले जोडे सुद्धा पुसायची लायकी नाही >>> हे कसे ठरवता बॉ तुम्ही ?

माझ्या आयुष्यात काही महिन्यातून किमान एकदा तरी अशा रस्त्यावरच्या वादावादीला सामोरे जायचा प्रसंग माझ्यावर येतोच >>>> यावरून काय तो बोध घ्या अन आत्मपरीक्षण करा!!

व्यसन सोडण्याचा आणि भांडण न होऊ देण्याचा क्षण एकच....... सुरु होण्यापूर्वीचा :-)

तिथे एकदा गाडी घसरली आणि सुरवात झाली कि मग अणुबॉम्ब मध्ये असते तशी "साखळी प्रक्रिया" सुरु होते. आणि विनाश करूनच थांबते. तेंव्हा पुढच्या वेळी लक्षात ठेवा, जे थांबवता येत नाही त्याची सुरवातच होऊ देऊ नका. निदान तुमच्याकडून तरी. तो एकटा भांडू नाही शकत... हा हा हा :D :D :D

संयमाचे भले कौतुक होत नसले तरी फायदा नक्की होतो >>>>> रुन्म्या: या विषयावर एक धागा निघालाच पाहिजे तुझ्याकडुन. Jokes apart, पण तुझं म्हणणं पटलं.

संयमाचे भले कौतुक होत नसले तरी फायदा नक्की होतो Happy ]. >> च्यामारी हे तू लिहावेस ? आता बरेच जण ऋन्मेऽऽष चा अमका बाफ : एक प्रचंड मन:स्ताप... असे बाफ उघडतील Lol

ऋनम्या, भावा, नेहमीच कसं माझ्या मनातलं लिहितोस. अगदी मला जे मला म्हणायचं होतं तेच.
इसी बात पे तुझ्या पोस्टला +७८६

भिदयला पहिजे होता ... नुसते भुक्नरे असतत हे ... मैत्रिन गेलि उदत ... सरल कनखलि अवज कधयच होता>>>>>>> हा प्रतिसाद सर्वोत्तम प्रतिसाद म्हणुन तारांकित करायला हवा खरंतर. Light 1

ऋन्मेषा, सकाळी तीन वेळा या अर्थाची पोस्ट लिहुन खोडली कारण एक्झॅक्ट शब्द सापडत नव्हते पण अगदी हेच हेच हेच म्हणायचं होतं..

आदिती +१

भिदयला पहिजे होता ... नुसते भुक्नरे असतत हे ... मैत्रिन गेलि उदत ... सरल कनखलि अवज कधयच होता

हा हा हा हा हा एक नंबर :-)))

रोडरेज चे प्रसंग करायचे म्हटले तर रोज दहा वेळ येऊ शकतात, टाळायचे म्हटले तर एकही नाही. चिडचिड होतेच, नो डाऊट.
माझ्या अनुभवावरुन मी शिकलो ते:
१. रोडरेज कधीच पर्सनली घ्यायची नसते. समोरचा समज-गैरसमजातून तुमच्यावर उखडतो त्याच्यासाठी तुम्ही एक क्ष व्यक्ति (हरामाच्या पैशावर गाड्या घेऊन बेदरकार चालवणारे) असता जसा तुमच्यासाठी तो 'मवाली'. जस्ट अ रॅन्डम पर्सन ऑन द रोड. इट्स नेवर "द यु".
२. दुसर्‍यांच्या इलाक्यात अजिबात आगावूपणा करु नये. मुकाट "हो बाबा, तु मोठा" करुन पुढे निघावे, चूक नसूनही स्वतःच सॉरी म्हणाल्यास अतिउत्तम.
३. कोणाला काही दुखापत झालेली नसल्यास चेहरा नेहमी सकारात्मक ठेवावा, तुम्ही दुसर्‍याचे ऐकत आहात, तुम्हाला ते पटतंय असं दिसलं पाहिजे, समोरच्याचा अर्धा राग तिथेच संपतो.
४. आपली अजिबात चूक नसल्यास सतत तेच वाक्य रिपिट करावे, त्याला बीट करायला समोरच्याकडे आरड्याओरड्याशिवाय मार्ग नसल्याने त्याचा आवाज चढतो व त्याचा तोल जातो, तेव्हा आपण शांत राहिल्यास अनेक पर्यायांवर विचार करायला वेळ मिळतो.
५. मारहाण करायची वेळ आलीच -कधी कधी येऊ शकते- तर आपण हात उगारणारे शेवटचे असलो पाहिजे. आणि आपला वार निर्णायक असला पाहिजे. समोरच्याला किमान पाच मिनिटे काय झालंय हे कळायला नको, तेव्हड्यात तुम्ही निघून जाऊ शकता. पण हे वेळ-काळ-स्थळ परिस्थिती पाहून घ्यायचे निर्णय आहेत, तेही अगदी अगदी कूल राहून. रागाने फणफणत असतांना अजिबात मारामारी करु नये.

लेखात उल्लेखलेल्या प्रसंगात लेखकाचा 'इगो' प्रचंड हर्ट झालाय. दॅट्स टोटली रॉन्ग थिंग. हाच प्रसंग तुम्ही बाजूला उभे असतांना दुसर्‍या दोघांत घडला असता तर तुम्ही नक्की काय रिअ‍ॅक्शन दिली असती त्याचा विचार करा आणि तेच करा. कारच्या आत बसून तडातडा उडणे, शिव्या देण्याने त्या सोकॉल्ड 'मवाल्या'चे शष्प बिघडले नाही, पण तुम्ही फणफणत राहिलात, इथे येऊन धागा टाकून आपली फणफण मल्टीप्लाय केलीत.. ती आणखी काही हजार लोकांपर्यंत पोचवलीत....

धागा काढणे वाईट नाही, मात्र तो मदतीसाठी असावा, फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी नव्हे. फ्रस्ट्रेशन काढून समस्या संपत नाही, मदत मागितल्याने व आलेल्या सल्ल्यांवर कृतीशील विचार केल्यास समस्यासमाधान लाभू शकते.

Streets are filled with idiots. आपण त्यातला भाग बनू नये इतकंच.

Pages