आकवर्डनेस आणि आजीबाई

Submitted by भास्कराचार्य on 16 January, 2017 - 12:36

मुंबई-पुणे-मुंबई हा 'आयकॉनिक' प्रवास बटाट्याच्या चाळीतल्या भ्रमणमंडळाने केला, त्याला आता बरीच युगे लोटली. सध्या तो इतका 'आयकॉनिक' राहिलेला नाही, हे इतिहासाचार्य बाबूकाका खर्‍यांचे सध्याचे मत चिंत्य आहे. (साला एक्प्रेस वे काय पटापट घेऊन जातो साला! उगाच नाय! - इति सोकाजीराव त्रिलोकेकर.) पण 'आयकॉनिक' नसलेला हा प्रवास 'आय कॉमिक' असे मधूनमधून उभे राहून हजेरी लावल्यागत म्हणतो, हे खरे. (खरे म्हणजे सत्य, बाबूकाका नव्हे.) ``मानवजातीने आजपर्यंत बरेच चिरंतन प्रवास पाहिले आहेत. मुंबई-पुणे हा त्यातील महत्वाचा होय.'' असे प्रसिद्ध तत्वज्ञ `प्ले. अ. टो' ह्याने आपल्या `लॉज' ह्या पुस्तकात लिहून ठेवले आहे. प्रत्यक्ष सृष्टीचाच हा न्याय आहे, ह्यावरूनच पुण्याची महती आयुष्यात कळून येते. ह्या वाक्यात `पुण्याची' हा शब्द पुणे व पुण्य अशा दोन्ही अर्थांनी घेता येतो. त्यातील कुठला बरोबर, ह्यावर पुणे विद्यापीठात सध्या तीन विद्यार्थ्यांचे संशोधननिबंध तयार होत आहेत. ह्यातील एकाने पुणे शहराची बाजू घेतली आहे, दुसर्‍याने पुण्यतत्वाची बाजू घेतली आहे, तर तिसर्‍याने `पुण्याची' हा शब्द 'पुसण्याची' ह्या शब्दाचा अपभ्रंश होऊन आला आहे, व `जुनी पाटी पुसल्याशिवाय नवीन लिखाण करता येत नाही' असा अर्थ लावला आहे. तेही बरोबरच आहे. शेवटी एक प्रवास पूर्ण झाल्याशिवाय दुसरा प्रवास सुरू कसा होईल, नाही का? असे प्रकांडपंडित ह्या पुणे शहरात राहत असतात, ह्याचा पुण्याला सार्थ अभिमान आहे.

अश्याच एका चिरंतन ( गाडी उशिराने धावत असल्याने वाटणार्‍या) पुणे-मुंबई प्रवासात अशाच एक पंडिता भासणार्‍या आजीबाई आम्हांस काल भेटल्या. त्यांचा सहवास आमच्यासारख्या पामरांना लाभला, ह्याबद्दल आम्हास फार हर्ष होत आहे. ह्या रोमहर्षक भेटीतील संवादाचा एक नमुना खास आमच्या रसिकांसाठी.

स्थळ - शिवाजीनगर रेल्वे स्थानक, पण खरेतर त्यात उभी असलेली डेक्कन एक्सप्रेस.
वेळ - डेक्कन एक्सप्रेसला वेळेसारखी क्षुल्लक बंधने मान्य नसल्याने कुठलीही असू शकते.
पात्रे - आजीबाई, व त्यांच्या सीटवर बसलेल्या एक विनातिकीट बाई. (ह्या पुण्याला आमच्या सीटवर बसल्या होत्या, पण त्यांना नम्रतापूर्वक विनंती केल्यावर त्यांनी उदारमनाने आपला हक्क सोडून देऊन तो आजीबाईंच्या सीटवर प्रस्थापित केला होता.)

आजीबाई (गच्च भरलेल्या गाडीत दिमाखदार एन्ट्री घेऊन सीटपाशी येत) - १०४ आणि तिकडे १०८.
शेजारच्या बाई (अशा दिमाखदार एन्ट्रीमुळे भारावून जाऊन) - ...
आजीबाई (नर्सेस थर्मोमीटरवर ज्या थंड सुरात तापमान वाचतात त्या सुरात) - १०४. (इथे आमच्या मणक्यांतून उगाच एक शिरशिरी निघून गेली.)
शेजारच्या बाई (आपल्याला विनंती केली जात आहे की नाही हे न कळल्याने) - तुम्हाला इथे बसायचंय?
आजीबाई - हो. इकडे १०४ आणि तिकडे १०८. (आजीबाई बहुधा एकाच गोष्टीचा जप करण्यात एक्स्पर्ट असाव्यात.)
शेजारच्या बाई - काहीही न बोलता शांतपणे उठल्या. त्या बाई आमच्यापेक्षा मोठ्या असल्याने आम्ही त्यांना मान दिला होता, तसाच तो त्यांनी बहुधा आजीबाईंना दिला.

ह्यानंतर काही काळाने गाडी तळेगाव-दाभाडे आणि वडगाव ह्यांच्यामध्ये असलेल्या शेतातल्या तिच्या डेसिग्नेटेड स्टॉपवर थांबली. भारतीय सरकारने देशी परंपरांना प्रोत्साहन मिळावे ह्यासाठी लोकांना ट्रेनमधील संडास वापर ह्या परकीय चालीपासून सुटका मिळवून देण्यासाठी शेतात गाडी थांबवायचा निर्णय घेतला असावा, असा काहीसा विचार माझ्या मनाला चाटून गेला. असे उपक्रम लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी सरकारने चित्रपटगृहे, टीव्ही, एफेम रेडिओ, अशा ठिकाणी जोरदार जाहिराती केल्या पाहिजेत, असेही वाटले. सध्या सरकारच्या कामांची काहीच माहिती ह्या अशा माध्यमांतून पोहोचताना दिसत नाही, जाहिराती जोरात झाल्या पाहिजेत.

एव्हाना आजीबाईंची चुळबूळ थोडी वाढली होती. त्यांनी माझ्याकडे एक-दोन वेळा संवादवर्धक दृष्टीने पाहिले होते, परंतु इतक्या प्रकांडपंडितेशी आपण काय बोलणार, ह्या भीडेस्तव मी नजर वळवून दुसरीकडे शांत बघत बसलो. एवढ्यात समोर बसलेले एक वडील आणि त्यांची दोन लहान मुले ह्यांना विनंती करून शे.बा.नी त्यांच्या जवळ चौथी सीट मिळवली होती. त्या बहुधा मुंबईच्या असाव्यात, कारण चौथी सीट ही तडजोडकारक गोष्टच पुण्याच्या अभिमानात बसणारी नाही. आता आपण त्यांना `समोरच्या बाई' असे म्हणू. शेवटी मानव हा आयुष्यात अशाच विविध भूमिकांमधून जात असतो, नाही का?

आजीबाई - तुम्ही कुठे निघालात?
समोरच्या बाई - कर्जतला जायचं आम्हाला.
आजीबाई - काय ही गाडी तरी थांबली आहे.
समोरच्या बाई - हो आता अर्धा अर्धा तास थांबली गाडी तर कसं व्हायचं? (म्हणजे?! हा डेसिग्नेटेड स्टॉप नाही? की ह्या सरकारविरुद्ध अपप्रचार करतायत? फेक्युलर लिबरल आहेत वाटतं ह्या.)
आजीबाई - काय बाई गर्दी झाली आहे! रविवारी ही अशीच गर्दी असते वाटतं.
समोरच्या बाई - हं हं. असंच असतंय बघा सगळीकडे.
आजीबाई - हो ना, म्हणून बरं रिझर्व्हेशन तरी आहे.
समोरच्या बाई - होय होय.
आजीबाई - ह्यापुढे रविवारी प्रवास करायचा नाही. जॉबवाल्यांना रविवारी सुट्टी असते म्हणून ते तेव्हा प्रवास करतात. आपण बरोबर उलटं करायचं. काय? (टाळीसाठी हात पुढे करत, हसत)
समोरच्या बाई (टाळी देत, हसत) - हो बघा ना.
आजीबाई - ३५ वर्षे सर्व्हिस झाली माझी. आता आरामच आराम.
समोरच्या बाई - बापरे आमचं म्हणजे वयच आता तेवढं असेल.
आजीबाई - हो मग. आणि त्यातून आम्हा म्हातार्‍यांना गर्दीतून प्रवास करता येत नाही. एक तर हे सगळे लोक रिझर्व्ह्ड डब्यात घुसतात पहा कसे.

इथे आम्ही स्तब्ध होऊन सशासारखे कान टवकारले. उपहासाचे धडे इतक्या सिनीयर माणसाने द्यावेत म्हणजे पर्वणीच, नाही का? पण आजीबाई उपहासाने बोलत असाव्यात, असे काही दिसले वा ऐकू आले नाही.

समोरच्या बाई (ह्यावर काय बोलावे ह्या विचारात) - हं हं.
आजीबाई (कळकळीने) - बघा ना हो. टीसी तर येतच नाही. त्याला माहीत असतं सगळं. तो तरी कशाला येईल? म्हणजे आपल्यासारख्या तिकीट काढणार्‍यांना उगाच त्रास.
समोरच्या बाई - ......!!!!????
आम्ही - ........!!!!!!!!!!!!!!!!!

रसिकहो, माफ करा. इथे आम्ही खिडकीबाहेर तोंड करून भयंकर हसलो, त्यामुळे पुढचे संवादथेंब चातकासारख्या आसुसलेल्या कानांपर्यंत काही पोचले नाहीत. आतापर्यंत हवेत तरंगत असलेला वायुरूपी ऑकवर्डनेस एकदम घनरूपी ठोकळा बनून त्या सीट्समधल्या जागेत धडामदिशी खाली पडलेला आम्ही याचि देही याची डोळा पाहिला. आजीबाईंनी खरेच उपहासाने काही म्हटले होते, असे वाटत नाही. नंतर त्यांनी समोरच्या बाईंसाठी चहासुद्धा मागवला आणि त्यांच्या कौटुंबिक गप्पांत चार प्रेमाचे सल्लेही दिले. आपणच आपल्याच जागेवरून उठवलेल्या, व नंतर समोर चौथ्या सीटवर बसलेल्या स्त्रीला इतक्या प्रेमाने आपल्यात सामील करून घेणे हे अश्या ज्ञान कोळून प्यायलेल्या व अहंभाव दुजा मनी नसलेल्या व्यक्तिमत्वालाच शक्य आहे, हे आम्ही खात्रीपूर्वक सांगू शकतो. अश्या व्यक्तीच्या नुसत्या सहवासाने आमच्यात ज्ञान जागृत होवो, हीच इच्छा मनी बाळगत आम्ही त्यांना कल्याणला मनातच टाटा म्हटले, व पुढील प्रवास खिन्न शांततेत केला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

जरा मराठी आणि काही पु ल संदर्भ थोडे जडशीळ झाले वाचताना Wink

"फेक्युलर लिबरल" Lol

Lol
आधी वाटलं की भ्रमणमंडळाचा वज्रेश्वरीकिस्सा लिहीताय की काय!

छान लिहिलीलंय. Lol
पण अनपेक्षीतरित्या मध्येच लिखाण संपलं असं वाटलं.

फारच मस्त!
इकडे १०४ आणि तिकडे १०८.....
ह्यानंतर काही काळाने गाडी तळेगाव-दाभाडे आणि वडगाव ह्यांच्यामध्ये असलेल्या शेतातल्या तिच्या डेसिग्नेटेड स्टॉपवर थांबली. ---
अशा वाक्यांनी बहार आणली. जरी जुनी शैली असली तरी आता कुठे असे वाचायला मिळते...? तीच ती जुनी पु लं ची पुस्तके वाचून समाधान मानावे लागते ना.
तुम्हाला (म्हणजे जरी असे अ‍ॅक्च्युअली झाले नसेल तरी!) खरे तर आजीबाईंचेच रिझर्व्हेशन नव्हते, पण त्यांनी तसा बहाणा केला व स.बांना कसे उठविले असे काहीतरी दाखवून रंगत आणता आली असती.
पण मस्त वर्णन.

हे फेसबुकवर वाचलं होतं. कोणीतरी शेअर केलं होतं. तुमचं नाव माहित नव्हतं Happy
मस्त लिहिलं आहे. सुरूवात तर एकदम मजेशीर. पण शेवट जरा अ‍ॅबरप्ट वाटला.

लेखन आवडल्याचे व नावडल्याचे सांगणार्‍या सगळ्यांना धन्यवाद. Happy शेवट अ‍ॅबरप्ट आहे हे खरे आहे. मला जास्त लिहायचा कंटाळा आला. शेवटी काय तर उगाच थोडासा हात जुन्या शैलीत चालवता येतो का बघू म्हटलं.

हर्पेनमामा, शेवट मायबोलीच्या उर्ध्वश्रेणीकरणासारखा आहे, हळूहळू होईल डागडुजी. Wink

थँक्स धनि. आता एकदा गडकर्‍यांची शैली ट्राय करायची आहे. Proud

Lol

तुम्ही खिडकीबाहेर तोंड करून हसलात, पण तुमच्या हालचालीवरून आजीबाईंना आणि स.बा.ना तुम्ही काय करताय हे कळलेच असेल ना? त्या काहीच बोलल्या नाहीत का? बाहेर तोंड केल्यानंतर हसताना नजर कुठे स्थिर केलीत? बाहेर शेतं होती त्यामुळे बाहेरून कोणाची प्रतिक्रिया येण्याची शक्यता नव्हती, असे गृहीत धरलेय. नाहीतर आणखी पेच! हे प्रश्न पडले कारण अशी लपून छपून हश्याचा निचरा करण्याची निकड आम्हासही अधून मधून भासते आणि हे काही फार सुलभ काम आहे, असे नाही.

कारण अशी लपून छपून हश्याचा निचरा करण्याची निकड आम्हासही अधून मधून भासते आणि हे काही फार सुलभ काम आहे, असे नाही.>>> हो ना!!! फार अवघड असतं ते!!! Rofl

गजाभाऊ, आजीबाई पुढेही काही बोलत होत्या, त्यामुळे त्यांचे लक्ष गेले नसावे. बाकी तुम्ही निकडीबद्दल म्हणता, ते अगदी बरोबर! Rofl

((:हहपुवा:))...जमो अगर ना जमो...प्रयत्न केलात तो ही जुन्या पु. ल च्या शैलीत....प्रयत्न चालु ठेवा... कदाचित विनोद प्रसंगानुसार जिवंत करता येईल...

आजच्या युगी विनोदी लेखन शैली लोप पावत चालली आहे की काय...???