आवडती जागा (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 17 November, 2016 - 15:41

"ही तिची आवडती जागा होती, तिच्या वाढदिवसाला आम्ही इथेच यायचो"

"मला वाटते.."
"मला वाटते, तिने इथे येऊन जीव दिला" सर म्हणाले.

मी चक्रावलोच, हा माणूस असे काय बोलतोय.

"कधी?" मी विचारले.

"तेवीस जानेवारीला" सर माझ्याकडे न बघत म्हणाले.

"चोवीस फेब्रुवारीला तिचा वाढदिवस असतो" सर अगदी निराश होऊन म्हणाले.
आजची तारीख तेरा फेब्रुवारी होती.

मी परत विचारले, "हे कसे झाले?"

"आमचे जमत नसे, भांडणे होत होती, मी तिला खूप त्रास दिला" सर कुठे तरी शून्यात बघत म्हणाले.

मला पुढे काय बोलावे ते कळेना, मी काहीतरी बोलायच म्हणून म्हटलो,
"तुमची चौकशी झाली असेल ना?"

"हो खूप चौकशी झाली, बायको मेल्यावर पहिला आरोप नवऱ्यावरच होतो, पण मला खरच माहित नाही ती कुठे गेली" सर म्हणाले.

"माहित नाही? म्हणजे? " मी जरा जास्तच विचारतोय असे वाटले पण राहवले नाही.

"ती बहुतेक इथे आली असेल" सर म्हणाले.

बहुतेक? बायको कुठे गेली? कुठे आहे हे माहित नाही? मला सरांची द्या वाटली.

"त्या परत आल्या नाहीत का?" मी जरा अंदाज घेत प्रश्न विचारला, सरांनी फक्त नाही म्हणत मान डोलावली

"इथून खाली पडल्यावर काय होत?" सर दरीकडे बघत म्हणाले.

आम्ही "जयथडी सनसेट पॉईंट" वर उभे होतो, आमच्या गावात हा टुरिस्ट पॉईंट प्रसिद्ध होता, मोठ्या शहरापासून अगदी तास-दिड तासाच्या अंतरावर होता. शहरातील बरीच लोक इथे येत असत. हा पॉईंट म्हणजे एक टेकडी होती, निदान अर्धा तास वर चढून जावे लागत असे. मग उंचावरून सूर्यास्त आणि सूर्योदय पाहता येत असे.

हा पॉईंट एक सुसाईड पॉईंट म्हणून प्रसिद्ध होता, टेकडीच्या दुसऱ्या बाजूला एक दरी होती, म्हणायला लोंखंडाचे कुंपन होते, पण लहान पोरगा ही ते ओलांडत असे. शाळेतली पोर, नापास झाले म्हणून, काही जण घरात भांडणे झाले म्हणून इथे येऊन उडी मारत असत. शहरातल्या लोकांना ही इथे मुक्ती मिळत असे.

काही गिर्यारोहक थ्रिल म्हणून दरीत उतरण्याचा प्रयत्न करत असत, एक-दोन अपघात झाले, मग कोणी फिरकले नाही. दरी खोल होती, आत उतरायला काही मार्ग नव्हता, पाय घसरला की थेट ढगात!

आमचे सर गेल्या तीन आठवड्यापासून इथे येत होते. आठवड्यातून एक दोनदा इथे येत असत, पहिल्यांदा जेव्हा आले तेव्हा स्टेशनवरून माझ्या गाडीतूनच मी त्यांना इथे आणले. स्टेशन वर आले की मला फोन करत असत. गाडीत बसल्यावर म्हणायचे, "चल जयथडीला" मला लय आश्चर्य वाटायच, हा माणूस नेहमी एकाच ठिकाणी का जातो? या टेकडीत एवढे काय आवडते? एकटा माणूस एकाच जागी परत का येतो? पण कधी विचारता आले नाही, आज धाडस केले आणि विचाराल, जे उत्तर मिळाले, त्याने मी हादरलोच.

हे माझे रोजच काम होते. रोज सकाळी स्टेशनवर जायचे, शहरातून जे लोक येतात, ते म्हणतील तिथे त्यांना, माझ्या गाडीतून घेऊन जायचे. गावातल्या सगळ्या गोष्टी दाखवायच्या, गावात तश्या रिक्षा कमीच त्यामुळे टुरिस्टला माझ्यासारखा ड्रायव्हर बरोबर असणे सोयीचे होते.

"अरे मी विचारले, इथून खाली पडल्यावर काय होते?" सरांच्या या प्रश्नामुळे मी भानावर आलो.

"दरी खोल आहे, खाली सगळे जंगल आहे, काही शिल्लक राहणार नाही" मी बोलून गेलो.

"ती इथे आली असेल, तर कोणीतरी बघितले असेलच ना?" सर माझ्याकडे बघत म्हणाले.

मी शांतपणे म्हणालो, "संध्याकाळी सात नंतर इथे कोणी फिरकत नाही"

"असे कसे कोणी येत नाही?" परत प्रश्न आला.

"गावातील पोरे येतात, मी आधी यायचो, पण आता कोणी येत नसेल" साहेब द्या ना सोडून, कशाला आता काही उकरून काढताय, असे बरच काही तोंडावर आले होते, मोठ्या मुश्किलीने मी काही म्हणालो नाही.

"इथे सीसीटीव्ही कॅमेरे का नाहीत?" सरांनी विचारले.

"इथे नाहीये, एक स्टेशनला आहे, पण तो चालतो की नाही, माहित नाही" मी विनोद करायचा प्रयत्न केला.

"गस्त तर असायलाच पाहिजे"

"गस्त कधीतरी पान टाकीच्या रस्त्याला, रात्री कधीतरी" मला कंटाळा आला होता.

"स्टेशनवर तिला कोणीतरी बघितले असेल ना?" परत प्रश्न.

ए बाबा जा ना घरी का बोअर करतोय? मी एक मोठी मुद्दामून जांभई दिली "सकाळी साडे दहाला पहिली बस येते, रात्री कुठली बस येत नाही"

"पण मग ती कशी आली असेल?" सर स्वतःशीच पुटपुटले.

जाऊ द्या ना सर, कशाला पिच्छा पुरवताय, मी असे बोललो असतो तर सर अजूनच खच्ची झाले असते.

"ही बघ" सरांनी खिशातून मोबाईल काढून, एक फोटो दाखवला, त्यात सरांबरोबर एक तरुणी होती, चांगले हसत होते पण फोटोत तर सगळेच आनंदी दिसतात.

"या मिसेस का?" मी आपले काहीतरी विचारायचे म्हणून विचारले, सरांनी मान डोलावली.

हा भाऊ काय विषय सोडणार नाही, म्हणून मीच परत विचारले. "पोलीस काय म्हणाले?"

"काय म्हणणार, सगळे जण माझेच डोके खातात, मलाच दोष देतात, मीच मारले असे म्हणतात, मी पोलिसांना सांगितले ती इथेच आली असणार, म्हणून बॉडी पण सापडत नाहीये" सर वैतागून म्हणाले.

"अरे मंद माणसा कशावरून?" असे त्याच्या चेहऱ्या समोर जाऊन ओरडावेसे वाटले. आपण काहीतरी बोलू, याला पण राग येईल, त्यापेक्षा खाली गेलेल बरे, असा विचार करून मी सरांचा निरोप घेतला, तुमची खाली वाट बघतोय असे सांगून मी टेकडी उतरायला लागलो.

मी सरळ भाल्याच्या टपरीकडे गेलो, भाल्या आपला दोस्त होता, जिगरी होता. त्याची चहाची टपरी टेकडीच्या पायथ्याशी होती, टपरीवर कोणी नव्हते, मला बघताच त्याने चहा करायला घेतला. मी भाल्याला झालेल्या प्रकाराबद्दल सांगितले.

"त्यानेच मागून ढकलून दिले असेल" भाल्या त्याच कळकट कपड्यातून चहा गाळत म्हणाला.

"मग इथे सारखा का येतो?" मी कप पाण्यात विसळत विचारले.

"अजून बायकोची आठवण येते, असे पोलिसांना, घरच्यांना दाखवायला" भाल्याने चहाचा गाळ कचऱ्यात फेकला. "आठवण तर येणार ना बॉस, शेवटी बायको होती" भाल्या माझ्याकडून कप घेत म्हणाला.

"हा, तो म्हणाला तसे, बायकोला त्रास दिला म्हणून" मला भाल्याचा मुद्दा पटत होता.

भाल्या चहाचे कप भरत म्हणाला "पळून गेली असेल?"

मला गरम चहाच्या कपाचा चटका बसला, मी तर हा विचारच केला नव्हता, हो बरोबर आहे, बॉडी नाही सापडली, म्हणजे पळून गेली असणार.

"गुपचूप दुसरा संसार थाटला असेल, याला माहित पण नसेल आणि याने त्रास दिला असेल, मग ती तरी काय करणार?" " भाल्या चहा पीत म्हणाला.
मी विचारात अडकलो, भाल्या परत म्हणाला "ती याला इथेच भेटेल, नवीन नवऱ्या बरोबर...." मोठा विनोद केल्यासारखा भाल्या मोठयाने हसला.

पण मी हसलो नाही, मी या विचारातच गुंतलो, खरंच पळून गेली असेल?

ती जर हुशार असेल तर परत कधी इथे येणार नाही, कारण तिला माहितेय आपला जुना नवरा, आपल्या शोधात इथे नक्की येणार. मला सरांची कीव वाटली, त्यांना असे वाटत होते की कधीतरी, चमत्कार होऊन ते बायकोला इथे परत भेटतील, त्यामुळेच त्यांचे इथे येणे वाढले होते.

मी मोबाईलकडे बघितले, साडेसात वाजले होते.

एकटा माणूस, एकाच जागी परत का येत असेल?

ज्या वेगाने, मनात विचार आला त्याच वेगाने मी कप फेकून टेकडीकडे पळालो, भाल्याच्या हाकेला काही उत्तर दिले नाही. कसेतरी टेकडी चढायला लागलो, टेकडी चढायची सवय होती, पण तरी धडपडत, मी वर तसाच रेटत, चढत होतो, पडत होतो, परत चढत होतो, पायातले बूट कधी पण फाटतील, पाय मुरगळेल, मी खाली पडेल, असे वाटू लागले. तसाच धापा टाकत चढत होतो आणि मग अचानक थांबलो, आपण चुकलो तर नाही ना? हा रस्ता बरोबर आहे ना? अंधारात काही दिसत नव्हते, डोळे चोळले, डोळे ताणून परत टेकडीचा अंदाज घेतला, या गार वाऱ्यात, घाम फुटला होता.

कसाबसा, टेकडीच्या टोकावर गेलो, मिट्ट काळोख, पुढचे काही दिसत नव्हते, मी धापा टाकत होतो, डोक्यावरचा घाम छाती पर्यंत पोहचला होता, दम लागला होता, थोड थांबून दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून वाकून उभा राहिलो, परत दरीच्या दिशेने बघितले. दरीच्या अगदी टोकावर, एक आकृती स्थिर उभी होती, निश्चल.

पायातून एक सणक कमरेपर्यन्त गेली, थोडा अवघडलो, तोल संभाळला, उभा राहिलो, मोठा श्वास घेतला, आणि परत त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघितले.

ती पाठमोरी आकृती काही हालचाल करत नव्हती, एकटक समोर बघत होती.

बुटांचा आवाज होईल म्हणून, मी पायातले बूट हळूच काढले, पायाच्या पंज्यावर वाकून चालत, मी पुढे जाऊ लागलो, कुंपण ओलांडून मी एका उडीतच सरांच्या बाजूला जाऊन उभा राहिलो.

"अरे.." मला तसा आलेला पाहून सर एकदम दचकले.

"मी घाबरलो यार" सर माझ्यापासून दूर होत म्हणाले, माझ्या नजरेला त्यांची नजर भिडत नव्हती.

"चला सर जाऊ" मी सरांचा दंड पकडत त्यांना दरीपासून दूर केले "शेवटची एसटी पण जाईल" मी जरा रागातच बोललो.

टेकडी उतरताना कोणी काहीच बोलले नाही, या येड्याला ओरडावे तरी कसे?

आम्ही खाली आलो, माझे पाय दुखायला लागले होते, भाल्याने टपरी बंद केली होती, माझी वाट बघत होता, मी भाल्याला हातानेच जायला सांगितले, त्याने माझ्याकडे बघून अंदाज घेतला, पण काही न बोलता तो निघाला.
माझी गाडी भयाण शांततेमध्ये एकटीच उभी होती. मी आणि सर, गाडीत बसलो, अजून ही सर काही बोलले नव्हते, काय बोलणार? आता लाज वाटत असेल, मरायचे असेल तर एकटे येऊन मरा ना, मला कशाला अडकवताय? पण मी काही बोललो नाही आणि गाडी सुसाट वेगाने स्टेशनकडे पळवली.

स्टेशन येताच गाडी थांबवली, सर शांत होते, माझे पैसे दिले, मी निमूटपणे घेतले, वर दोन हजारांची करकरीत नोट दिली.

"हे नकोत" मी मागे सरकत म्हणालो.

"अरे घे रे" माझ्या शर्टच्या खिश्यात नोट कोंबत सर म्हणाले. मी कसानुसा हसलो. शेवटची एसटी लागली होती, सर एसटीकडे जायला लागले.

"सर.. " एवढे बोलून मी थांबलो, माझी हाक ऐकून सरांनी मागे बघितले, मला पुढे काय बोलावे ते कळेना, मी तसाच घुम्यासारखा त्यांच्याकडे बघत बसलो.

"परत लग्न करा" मी उगीचच हसून काहीतरी बोलून गेलो, सर ही हसले, अगदी मोठ्याने, मला तेवढेच बरे वाटले.
"प्रयत्न सुरु आहेत" सर हसत, एसटीकडे जात म्हणाले. माझ्या जीवात जीव आला.

आणि त्यानंतर मला जे वाटत होते तसेच झाले, मी परत सरांना कधी भेटलो नाही, सरांचा फोन आला नाही, कदाचित त्यांना लाज वाटली असेल, कोणी दुसरा ड्रायव्हर मिळाला असेल, पण गावात आले असते तर कधीतरी नक्कीच दिसले असते. मी झालेला सगळं प्रकार भाल्याला सांगितला, त्याने ही "ते येड हाय, लक्ष नको देऊ" असा सल्ला दिला. पण नंतर मी आणि सर परत भेटलोच नाही.

थोडे दिवस झाले असतील, सकाळीच भाल्याचा फोन आला, "डायरेक्ट जयथडीला ये" एवढे बोलून फोन कट केला, मला त्याचे बोलणे चमत्कारीक वाटले, मी पण आवरून गाडी घेऊन जयथडीला गेलो.

मला आलेला बघताच, भाल्या माझ्याकडे धावत आला, "अरे काय झाले?" मी थोडे वैतागून विचारले.

"काल रात्री कुणीतरी सुसाईड केलय" भाल्या म्हणाला.

"काय? कोणी?"
भाल्या सांगू लागला,
"आज सकाळी मी इथे आलो तेव्हा इथे एक ऍक्टिवा पडली होती, टेकडीच्या पायथ्याशी, काल संध्याकाळ पर्यंत नव्हती, रात्रीच आली असणार, मी थोडा वेळ वाट बघितली, पण कोणी ऍक्टिवा घ्यायला आले नाही, मला शंका आली, काहीतरी गडबड आहे, मी लगेच पोलीसांना फोन लावला, ते इथे आले, त्यांनी ऍक्टिवाची डिकी उघडली, त्यात लायसन्स आणि इतर कागदपत्रे होती, पोलीस गाडी घेऊन गेले, अजून आले नाहीत"

माझ्या पाया खालची जमीनच खचली, बधिर झालो, सर का परत इथे आले? त्यांनी असे का केले? मी त्यांना एकदाच वाचवू शकलो, त्यांना परत लग्न करायला हवे होते, मी त्यांना फोन करायला पाहिजे होता, मी त्यांना वाचवू...

मी मोबाईल मध्ये आजची तारीख बघितली.

चोवीस फेब्रुवारी, सरांच्या बायकोचा वाढदिवस आणि आजच सरांनी...मी एकदम हताश झालो, डोळे मिटले आणि भाल्याला म्हणालो,

"मला वाटतय..."

"मला पण.." भाल्या पण एवढेच म्हणू शकला. आम्ही दोघे काही बोललो नाही, हा विषय परत काढायचा नाही, असे मी ठरवले.

भाल्याने मला चहा केला, टेकडीवर तुरळक गर्दी होती, काही वेळाने पोलीस आले, त्यांनी टेकडीवरील सगळ्या लोंकाना परत पाठवले, मला जायला सांगितले, भाल्याला टपरी बंद करायला सांगितले, त्या दिवशी टेकडी सर्वांसाठी बंद करण्यात आली.

मी परत निघणार तेवढ्यात, पोलिसांची अजून एक गाडी, तिथे येऊन थडकली, त्यात काही पोलीस तर काही साधी माणसे होती,
एक चेहरा मात्र ओळखीचा होता.

मी भाल्याकडे बघितले, तो ही पोलिसांच्या गाडीकडे बघत होता, आम्हाला हसावे की रडावे हेच कळत नव्हते कारण त्या गाडीतुन सर बाहेर पडले.

मी, भाल्याने एकमेकांकडे बघितले, मला काही कळत नव्हते. सरांनी माझ्याकडे काही बघितले नाही. पोलीस, सर, घरातील काही माणसे सगळी टेकडीवर गेली.

अरे कोणीतरी सांगा काय चाललय, असे मला ओरडावेसे वाटले, पण डोक इतके बधिर झाले होते, की चालेल्या प्रकाराकडे आम्ही फक्त बघत होतो.

सर जर जिवंत आहेत, तर मग सुसाईड कोणी केलय? ऍक्टिवा कोणाची होती? सर का पोलिसांबरोबर आहेत? टेकडी वर का जात आहेत? परत का हा माणूस....?

एकटा माणूस, एकाच जागी परत का जात असेल?

तो भुंगा परत जागा झाला, माझ्या डोक्यात सरांचा आवाज घुमू लागला, सीसीटीव्ही आहेत का? गस्त आहे का? रात्री कोणी येते का? आणि हो...बॉडी सापडते का?

मी भाल्याकडे बघितले, मी काहीतरी बोलेल, याची तो वाट बघत होता.

"त्या दिवशी मी वाचवले नसते तर उडी..."

"मारली उडी?....मारली उडी? तुला काय माहित तो उडी मारणार होता? तो बघत होता, दरी किती खोल आहे" भाल्या एका दमात म्हणाला.

"इथे एवढे दिवस येऊन माहिती काढत होता" भाल्या माझ्या कानात पुटपुटला.

मी पुरता बधिर झालो.
आपण एवढे दिवस एका खुन्याला मदत करत होतो? एवढे दिवस एक खुनी प्लँनिंग करत होता आणि आपल्याला कळले ही नाही? बायको जिवंत असताना, बायको मेली हे खोटेच सांगितले जेणेकरून सहानभूती मिळेल आणि पाहिजे ती माहिती विचारता येईल.

काही वेळाने, पोलीस, सर, बाकीचे लोक खाली आले. मी, भाल्या सरांकडे बघत होतो, सर ओस्काबोक्शी रडत होते, बाकीचे लोक सरांचे सांत्वन करत होते.

सर रडत होता, पोलिसांना काहीतरी सांगत होता, ते दूर होते, त्यांचे बोलणे ऐकू येणार नव्हते, पण फक्त मलाच माहित होते तो पोलिसांना काय सांगत असणार.

सर म्हणत असणार,

"ही तिची आवडती जागा होती, तिच्या वाढदिवसाला आम्ही इथेच यायचो"

-चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी!

.

@अदिति, @स्वस्ति @अंकु @अनघा.@पलक @आनंदयात्री @चैत्राली उदेग @मॅगी @Swara@1 @जाई. @वावे @राया @रीया

धन्यवाद Happy तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया अशाच येत राहोत.

@मॅगी, @मी मानिनी @राया
कथेचा शेवट प्रिडिक्टबल वाटू शकतो, पुढच्या कथेवेळी ही गोष्ट लक्षात ठेवीन Happy

मला आवडली. प्रेडिक्टेबल असली तरी माझे ३-४ प्रेडिक्शन्स होते... त्यातलं कुठलं बरोबरेय ते बघायला मज्जा आली
>>>
+७८६ माझेही असेच झाले. मलाही आवडली कथा.
अश्या कथा वाचताना आपण प्रेडीक्शन करतोच. कधी एक तर कधी अनेक. जेव्हा एकच प्रेडीक्शन करतो आणि तेच योगायोगाने बरोबर येते तेव्हा आपल्याला मजा नाही आली असे फील येते. पण ते वाचक म्हणून आपले बॅडलक असते. लेखक म्हणून आपली शैली आवडतेय. पुढच्या कथेच्या प्रतीक्षेत Happy

सर इतका मंद असेल का? त्याला रोज पाहणारा आणि 2000 ची नोट घेणारा रिक्षावाला स्वतःहून पोलिसात काही सांगणार नाही असे त्याला का वाटले? की मला कथा कळली नाही?

रिक्षावाला स्वतःहून पोलिसात काही सांगणार नाही असे त्याला का वाटले?
>>>>>>
मलाही पहिला हेच वाटले,
पण नंतर लक्षात आले की कथा भारतात घडतेय

@साधना
तुम्ही म्हणताय तसे होऊ शकते, आताच कुठे खून झालाय, पोलीस तपास होईल, चौकशी होईल आणि सर म्हटल्या प्रमाणे "बायको मेल्यावर पहिला आरोप नवऱ्यावरच होतो" Happy

@ऋन्मेऽऽष

मी जरी सांगितले तरी, पुरावा असायला हवा Happy

Chaitanya sir,story kharach khup chhan vatli, shevat paryant suspense hota aani plz pudhcha bhag lavkr pathava.......................................................plz sir.

Pages