सुखन .. हिंदी उर्दू शेरोशायरीची मैफिल .. एक अविस्मरणीय अनुभव

Submitted by कविता क्षीरसागर on 5 November, 2016 - 06:34

सुखन ... एक अविस्मरणीय मैफिल

काल "सुखन" नावाचा एक सर्वांगसुंदर , भारावून टाकणारा उर्दू शेरोशायरीचा कार्यक्रम पाहिला .. शेरोशायरीच्या कार्यक्रमासाठी एवढे तिकिट असुनही, फुकट कार्यक्रमाची सवय झालेल्या पुणेकरांनी हाऊसफुल गर्दी केली होती हे विशेष . (आम्ही काही कवीसंमेलनांना जातो तेव्हा अगदी उलट चित्र दिसते. म्हणजे मी पण तशी पुणेकरच आहे पण असो, तो विषय वेगळा )

सुखन या कार्यक्रमाबद्दल मी पूर्ण अनभिज्ञ होते . माझ्या मुलीची मैत्रीण वैष्णवी ढोरे व माझा कवीमित्र माधव हुंडेकर यांच्या जोरदार शिफारशीवरुन मी व माझी मैत्रीण सुनीती लिमये या कार्यक्रमाला यशवंतराव नाट्यगृहात पोहोचलो . (आजकाल फोनवरून /online तिकिटे मिळतात हे किती सोयीचे झालेय)

नाट्यगृहात हीsss मोठी गर्दी ... ८०% तरुणाई कलाकारांवरील प्रेमाने उत्साहाने, छान आवरुन आलेली होती . कवितांना एवढे चांगले दिवस आलेत (भले हिंदी /उर्दू का असेना) हे पाहून मला खूपच छान वाटले . आत लाॕबीमधेच सुंंदर सुरांनी आमचे स्वागत केले . चार पाच जण तिथे कार्यक्रमाची झलक देत होते बहुधा . त्यांच्यामुळे आमच्या अपेक्षा अजूनच उंचावल्या.

आत गेलो . पडदा उघडला . आर्त सुरांनी जयदीपने अशी काही सुरूवात केली की बास ... नेपथ्यालाही आमच्या नजरेने दाद दिली. वर लटकवलेल्या १०,१२ केरोसीनच्या कंदिलांनी सर्व कलाकारांना स्निग्ध प्रेमाने आपल्या मिणमिणत्या प्रकाशात न्हाऊ घातले. ( नंतर प्रत्येक कलाकाराने रंगमंचावर आपापला उजेड पाडलाच (चांगल्या अर्थाने ) आणि त्यामुळे सर्व मैफिलच उजळून निघाली )

नंतरचे ३ तास म्हणजे आम्हा रसिकांना मिळालेली पर्वणी होती . दिवाळीची खुमासदार मेजवानी होती .

ओम भूतकर ..
तो आला . त्याने पाहिले . त्याने जिंकले . ही उक्ती मी सार्थ होताना पाहिली . आजवर तो अभिनेता म्हणून माहिती होता पण इथे त्याची उर्दूवरची पकड व हुकूमत पाहून अचंबित झाले . तो श्वासही उर्दूतून घेत असावा असे वाटायला लावणारी त्याची passion , शब्दफेक , उच्चार .. सगळेच लाजवाब .. आणि ते सारे रसिकांच्या हृदयापर्यंत सहजतेने पोहोचवत होता . त्याच्या देहबोलीतून एक प्रकारचा जुनून जाणवत होता .
त्याचे मंचावरुन प्रेक्षकांत बसलेल्या मित्र मैत्रीणींशी बोलणे , प्रेक्षकांशी संवाद साधणे , एखाद्याला शेर समर्पित करणे हे फार लोभस वाटले.
नचिकेत देवस्थळी पण त्याला सुरेख साथ देत होता . श्रुती या नवोदित गायिकेच्या आवाजाने काळजाचा ठाव घेतला . गझल गायनासाठी एकदम perfect आवाज.
त्यात अधुनमधून सारंगीचे अनवट सूर , सतारीची समंजस साथसंगत , कव्वालीची बेभानता , उत्तुंग कल्पनांची भरारी मारणारे , अवाक करणारे अनेक शेर , गझला , तरन्नूम ... सारे सारेच अविस्मरणीय ..

खरंतर या fantastic अनुभवाबद्दल लिहिण्यासारखे भरपूर आहे पण त्याहीपेक्षा ती मैफिल जास्त प्रत्यक्ष अनुभवण्यासारखी आहे.

इतका सुंंदर आणि वेगळा कार्यक्रम रसिकांना भेट दिल्याबद्दल ओम भूतकर व त्याच्या पूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार .

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद .. बेफिजी .. गझल जाणकारांनी तर अवश्य पहावा असाच कार्यक्रम आहे ..

धन्यवाद श्री , jayantshimpi ...
नमुन्यादाखलचे शेर ...

वही फिर मुझे याद आने लगे हैं
जिन्हें भूलने में ज़माने लगे हैं
वो हैं पास और याद आने लगे है
मुहब्बत के होश अब ठिकाने लगे हैं
सुना है हमें वो भुलाने लगे हैं
तो क्या हम उन्हें याद आने लगे हैं ?
Sukhan ....

वो उर्दू का मुसाफ़िर है, यही पहचान है उसकी
जिधर से भी गुज़रता है, सलीक़ा छोड़ जाता है

Sukhan ...