पुणे कोल्हापूर पॅसेंजरचा प्रवास (भाग १)

Submitted by पराग१२२६३ on 29 October, 2016 - 09:40

दिवाळी आली होती. दिवाळीसाठी कोल्हापूरला जायचे नक्की झाले होते. नेहमीप्रमाणे जाण्या-येण्यासाठी लोहरथाच्या पर्यायाला पहिली पसंती दिली होतीच. त्याप्रमाणे आरक्षण मिळवायचा प्रय.त्न करून पाहिला. पुण्य़ाहून कोल्हापूरला जाण्यासाठी हल्ली लोहरथाला अनेकांची पसंती मिळत आहे. पूर्वी या प्रवासाला महामार्गापेक्षा बराच वेळ लागतो, या कारणाने अनेक जण या पर्यायाकडे तशी पाठच फिरवत असत. म्हणून कोयनेचे तर कधीही आरक्षण मिळत असे. सह्याद्री त्यातल्या भरत असे. पण गेल्या 4-5 वर्षांमध्ये परिस्थिती बरीच बदलली आहे. त्यामुळे मला 3 आठवडे आधीही कोयनेचे आरक्षण मिळू शकले नाही. मग त्या दिवशी आणखी एक पर्याय उपलब्ध होता, तो म्हणजे 12148 निजामुद्दीन-कोल्हापूर एक्सप्रेसचा. पण त्याचेही आरक्षण संपत आलेले होते.

या सगळ्यामध्ये मग जनरलचं तिकीट काढून जावे असा विचार केला. पण दिवाळीची सुट्टी असल्यामुळे 12148 मध्येही जनरलला इतर दिवशीपेक्षा गर्दी असेल, असा अंदाज बांधला. कोयनेनं हल्ली जनरलनं प्रवास करणं आणि पुण्यात जागा मिळणं, तर जरा अवघडच झालेलं आहे. मग एक वेगळा पर्याय निवडायचा विचार केला. पुण्याहून सकाळी 9 ची 51409 पुणे-कोल्हापूर सवारी (पॅसेंजर)ने प्रवास करायचा. या गाडीला बाकीच्यांच्यापेक्षा कमी गर्दी असेल असे वाटत होते. पण दिवाळीचे दिवस असल्यामुळे तिलाही गर्दी दिसत होती. अगदी कोल्हापूरपर्यंतची. मलाही वाटत होतच, एकदा या गाडीचा अनुभव घ्यावा म्हणून.

गर्दीचे दिवस असल्यामुळे आणि तिकीटही काढायचे असल्यामुळे तासभर आधीच पुणे जंक्शनवर पोहचलो. तिकीट 5च मिनिटात तिकीट मिळाले. खिडकीच्या जरा बाजूला झाल्यावर पाहिले, तर कोल्हापूरऐवजी सोलापूर दिले होते. तरी मी मनातल्या मनात म्हणत होतोच की, माहितीपेक्षा 10 रु. कमी तिकीट कसं काय. तिकीट बदलून घेण्यासाठी पुन्हा खिडकीवर गेलो आणि कटकट न करता तिकीट बदलूनही मिळाले.

आत आलो, तर एक नंबरवरून यशवंतपूर-जयपूर सुविधा एक्सप्रेस निघत होती. ती गेल्यावर पेपर आणि नवीन वेळापत्रक घेऊन 4-5 नंबरच्या फलाटाकडे निघालो. कारण इलेक्ट्रॉनिक बोर्डवर पुणे-कोल्हापूर सवारी दाखवले जात असले तरी फलाट क्रमांकाचा रकाना कोराच होता. माझ्या अंदाजानुसार 5 किंवा 6 वर गाडी येण्याची शक्यता होती. कारण पुण्यामध्ये येऊन तासभर झाला तरी 12264 निजामुद्दीन-पुणे वातानुकुलित दुरंतोने अजून 2 नंबर अडवून ठेवला होता. म्हटले परतीच्या प्रवासाला निघायला या महाराणींना जेमतेम 3 तास राहिले आहेत. कधी या वॉशिंग लाईनवर जाणार आणि स्वतःचा सेकंडरी मेंटेनन्स करून घेणार कधी. कारण हातात आता 2 तासच राहिलेले आहेत, या सगळ्या कामाला. आज फलाटावर मला इकडे-तिकडे फारसे करता येणार नव्हते, कारण गाडीत जागेसाठी धडपड करावी लागणार होती. तेवढ्यात तिकडे 6 नंबरवर 12150 पाटलीपुत्र-पुणे एक्सप्रेस आली होती. त्यामुळे तिकडे तर माझी गाडी येणार नव्हती हे निश्चित. मग 4-5 नंबरवर गेलो, तर तिकडे सोलापूर पॅसेंजर आणि डाऊन इंद्रायणी कम डाऊन सोलापूर इंटरसिटी येणार होती. म्हणून पुन्हा 2 वर आलो. एकवर बडोद्याच्या लालभडक डब्ल्यूएपी-4 या कार्यअश्वाने 22944 इंदूर जं-पुणे जं. एक्सप्रेस आणून उभी केली होती. तेवढ्यात अप मेन लाईनवर अजनीहून आलेला हिरवागार डब्ल्यूएजी-9 कार्यअश्व शांतपणे सिग्नलची वाट पाहत उभा होता. मला वाटले याला मुंबई एंडच्या डिसपॅच यार्डात आपल्या गाडीची जबाबदारी घ्यायला जायचे असे. पण मी त्या कार्यअश्वाला न्हाळत उभा होता. कारण अजनीचा कार्यअश्व मला पहिल्यांदाच पुण्यात दिसत होता. आता पुणे-दौंड-मनमाड मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे तिकडचे इलेक्ट्रीक कार्यअश्व बिनधास्त पुण्यामध्ये येऊ लागले आहेत. त्यामुळे मला वाटले की, डब्ल्यूएजी-9 वर दौंड-मनमाडकडे जाणाऱ्या कोणत्या तरी मालगाडीचे हा सारथी असले. पण दोनच मिनिटात हा कार्यअश्व एकटाच लोणावळ्याच्या दिशेने निघून गेला. मग लक्षात आले की, मुंबई विभागात मालगाड्यांची नोंदणी जास्त झाली असेल, आणि तिथे इंजिने कमी पडत असतील. तिथे लोको होल्डींग वाढवण्यासाठी म्हणून शेजारच्या विभागांमधून तिथे जादा होत असलेले अतिरिक्त कार्यअश्व मुंबई विभागाने मागवले आहेत. आता गेलेला डब्ल्यूएजी-9 कार्यअश्व त्यापैकीच एक. मधल्या काळात कृष्णराजपुरमच्या अजस्त्र डब्ल्यूडीपी-4 डी या कार्यअश्वाने 12629 यशवंतपूर जं.-ह. निजामुद्दीन कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस 3 नंबरवर आणली होती. त्यापाठोपाठ लांबून इलेक्ट्रीक ट्रीप शेडकडून लालगुडाचा पांढराशुभ्र डब्ल्यूएपी-7 हा कार्यअश्व दौंडच्या दिशेने आला. एकदम मनात प्रश्नांचे काहूर माजले की, 12263 निजामुद्दीन वातानुकुलित दुरंतोला बराच वेळ आहे आणि हा कार्यअश्व आताच का शेडच्या बाहेर आला आहे. आणि तो तिकडे कुठे निघाला आहे. वगैरे-वगैरे.

दरम्यानच्या काळात आता आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे मोठी जबाबदारी घेण्यास अक्षम असलेल्या आणि त्यामुळे आता पूर्ण वेळ शंटर बनलेल्या पुण्याच्या डब्ल्यूडीएम-2 का कार्यअश्वाने 12264 दुरंतो 2 नंबरवरून वॉशिंग लाईनवर बॅक केली होती. त्यामुळे आता माझ्या सवारी गाडीलाही 2 नंबरवर येण्यावाचून पर्याय नव्हता. दुरंतो मागे गेल्यावर 3 नंबरवरच्या 12629 च्या डब्ल्यूडीपी-4 डीला वेगळे करून पलीकडच्या सायडींग नेले गेले. कारण आता दिल्लीपर्यंत इलेक्ट्रीक रुट असल्यामुळे 12629 चे सारथ्य मगाचच्या लालगुडाचा पांढराशुभ्र डब्ल्यूएपी-7 ने घेतले होते.

दरम्यानच्या काळात सहा नंबर मोकळा झाल्यामुळे तिकडून 22944 इंदूर-पुणेचा कार्यअश्व गाडीपासून वेगळा होऊन इलेक्ट्रीक ट्रीप शेडमध्ये निघून गेला होता. तेवढ्यात आमच्या गाडीचीही उद्घोषणा होऊ लागली होती. आज ती गाडी पुण्यात अर्धा तास उशीरा आली होती. त्याचवेळी निजामुद्दीन कोल्हापूरही 20 मिनिटे उशीरा येणार होती. साताऱ्याहून पुण्याला आलेलीच पॅसेंजर आपला कार्यअश्व बदलून पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने जाणार होती. अखेर 9 वाजता आमची गाडी आल्यावर जरा वेगाने आत शिरून जागा पकडली. तेवढ्यात एक जण येऊन म्हणू लागला, तुम्ही दुसरीकडे बसा, माझ्याबरोबर फॅमिली, पेशंट आहेत. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावर वयाने साधारण माझ्याबरोबरीच्याच एकाला त्याने असेच सांगून पाहिले. पण काही उपयोग झाला नाही. अखेर 9.22 ला आमची सवारी पुण्याहून निघाली.
----

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरवात आवडली पण जरा प्रवासाबद्द्ल पण लिहिले असते तर जास्ती आवडले असते. मी कधीच त्या दिशेने रेल्वेचा प्रवास केलेला नाही त्यामुळे पुण्याहून सातार्‍याला पोचायला इतका वेळ का लागतो. कशी जाते रेल्वे आणि वाटेल लागणारे स्टेशन या बद्द्ल उत्सुकता आहे.

पुणे कोल्हापूर पॅसिंजर. एकदम जुने प्रवास आठवले. ३६रुपयात व्हायचा हा प्रवास मी इंजिनीअरींगला असताना. सकाळी ७ला पुण्यात बसलं तर मिरजेत ४-५ वाजता पोचायची गाडी. प्रत्येक स्टेशनला थांबते. आदर्कीला गोल वळून येते तेव्हा स्टेशनची मागली बाजू आधी दिसते मग मोठा वळसा मग पुढे येते. नीरा स्टेशनला अंजीरं. पुणे ते सांगली या टप्प्यात खरेतर रेल्वेमार्ग सर्व मोठ्या गावांना टाळून जातो. कराड आणि सातार्‍याची स्टेशन शहरापासून फार लांब आहेत. त्यामुळे वाठार, सासवड, उंब्रज, नीरा, आदर्की Happy अशी स्टेशनंच मेन. किर्लोस्करवाडीला कारखान्यातल्या रोजच्या प्रवाश्यांची गर्दी होते.
कधी कधी ताकारीला उतरून आम्ही सागरेश्वरला जात असू. सागरेश्वरवरून कृष्णेचे पात्र व तिचे वळण फार सुंदर दिसते.

प्रत्येक स्टेशनला थांबते. आदर्कीला गोल वळून येते तेव्हा स्टेशनची मागली बाजू आधी दिसते मग मोठा वळसा मग पुढे येते. नीरा स्टेशनला अंजीरं. पुणे ते सांगली या टप्प्यात खरेतर रेल्वेमार्ग सर्व मोठ्या गावांना टाळून जातो. कराड आणि सातार्‍याची स्टेशन शहरापासून फार लांब आहेत. त्यामुळे वाठार, सासवड, उंब्रज, नीरा, आदर्की स्मित अशी स्टेशनंच मेन. किर्लोस्करवाडीला कारखान्यातल्या रोजच्या प्रवाश्यांची गर्दी होते. >> +११ आणि नीरेचे ते मेदु वडे. Happy पण मला ही गाडी कधीच आवडली नाही. महाभयानक कंटाळवाणा प्रवास. डकाव डकाव ..प्रत्येक स्टेशनला थांबणार. आजोबा रेल्वेत होते त्यामुळे सांगलीला गावी जायचे असले की ह्याच गाडीने जावे लागाय्चे कारण कोयनेला नेहेमीच गर्दी असायची. अजून एक शिक्षा म्हणजे पुण्यात बसल्यावर आजोबा लगेच एक डायरी आणि पेन देत आणि सर्व स्टेशनांची नावे लिहायला सांगत. Sad ताकारी, रहिमत्पुर, शेणोली, मसुर, नांद्रे अन अजुन कितेक Happy

टण्या, आपण सांगितलेल्या आठवणी वास्तवातही तशाच आजही लागू आहेत. पण आता या गाडीच्या वेळा बदलवेल्या आहेत. शुक्रवार असल्यामुळे आदर्कीला निजामुद्दीन-कोल्हापूर एक्सप्रेस आम्हाला ओलांडून पुढे निघून गेली.

लंपन, तुम्ही म्टल्याप्रमाणे मलाश्री कोयना किंवा निजामुद्दीन-कोल्हापूर एक्सप्रेसचे आरक्षण न मिळाल्यामुळे हा पर्याय निवडावा लागला. प्रवास १० तास १० मिनिटांचा झाला. पण कंटाळा नाही आला.

त्यामुळे वाठार, सासवड, उंब्रज, नीरा, आदर्की स्मित अशी स्टेशनंच मेन
>>> सासवडला कुठे आहे स्टेशन. ? सासवड रोड हे फुरसुंगीच्या जवळ आहे.सासवडपासून कोणतेही स्टेशन २०-२५ किमीच्या आत नाही

छान

सासवड रोडच म्हणायचे होते.
उंब्रज चुकून आले, मसूर डोक्यात होते. त्या स्टेशनाचे नाव मसूर आहे की अजूनच वेगळे काहितरी?